दहावीनंतर योग्य करिअर निवडणे हेच यशाचे खरे गमक

दहावीनंतर योग्य करिअर निवडणे हेच यशाचे खरे गमक
हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट आपण प्रत्येकानेच कधी ना कधी तरी ऐकलेली असेल. शेवटपर्यंत खरा हत्ती आहे कसा? हे सातही जण अचूकपणे सांगू शकत नाहीत. आपल्याला त्या हत्तीचा जो अनुभव आला, त्या आधारे प्रत्येकाने हत्तीचे वर्णन केले. असे का घडले? साधक-बाधक विचार, सर्वांगीण अभ्यास, चौकस आकलन क्षमता आणि मर्मदृष्टी यांच्या अभावी असे घडले. सातही जणांनी आपल्या अनुभवाचे शेअरींग आपसांत केले असते तर कदाचित त्यांना हत्तीचे अधिक योग्य वर्णन करणे शक्य झाले असते. आपल्या दैनंदिन जीवनातही आपल्याला या गोष्टीतील आंधळ्यांसारखाच अनुभव येतो. आपण अनेकदा निर्णय घेताना आवश्यक तितका सारासार विचार करत नाही आणि आपल्याच मताला चिकटून राहतो, समोरच्याने दिलेला सल्ला योग्य असला तरीही स्वीकारत नाही, आणि समोर आलेली संधी दवडतो.
दहावीच्या निकालाचा दिवस जसजसा जवळ येतोय, तशी पालक आणि विद्यार्थ्यांमधली चिंता आणि उत्सुकता सुद्धा वाढतेय. आता पूर्वीसारखी गुणवत्ता यादीची पद्धत राहिली नाहीय. षण तरीसुद्धा दहावीची क्रेझ मात्र तशीच आहे. याचं कारण म्हणजे दहावीनंतरची शिक्षणपद्धती बदलणार आणि प्रवेश पात्रता सुद्धा दहावीच्या गुणांवरच ठरणार. याचा अर्थ असा की, ज्याला दहावीच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळतील त्यालाच पुढे चांगल्या ज्ञानशाखेत प्रवेश मिळणार! माझ्या विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, ही वस्तुस्थिती असली तरी हे पूर्णसत्य नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं.
शेखरला दहावीच्या परीक्षेत सर्वसाधारणच गुण मिळाले पण आई-वडील, नातेवाईकांचा आग्रह आणि मित्रांच्या दडपणामुळे त्याने हट्टाने शास्त्र शाखेला प्रवेश घेतला. बारावीमध्ये त्याची टक्केवारी आणखी खाली घसरली आणि त्यामुळे पुढे प्रवेश घेणे फारच कठीण बनले. आई-वडीलांनी साहजिकच सगळा दोष शेखरलाच दिला. त्यामुळे, आधीच चिंताग्रस्त झालेला शेखर आणखीनच खचला. आता तर या अपयशाला मीच जबाबदार आहे अशी त्याची पक्की समजून झाली. शेवटी कुठेच प्रवेश मिळत नाही हे लक्षात आल्यावर शेखर आज एका खाजगी संस्थेत व्यवसाय प्रशिक्षण घेत आहे. स्वत:च्या क्षमतांचा विचारच न करता चुकीचे करिअर निवडल्याचा खूप पश्‍चात्ताप आता त्याला होतो आहे. परंतु वेळ निघून गेल्यानंतर हाती काहीच उरत नाही. असे अनेक शेखर आज आपल्या आजूबाजूला असतील.
देशातील प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांचे उदाहरण आपण घेऊ त्यांनी हॉटेल व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले त्यावेळी त्यांच्यासह अनेकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल. पण या क्षेत्रातील अभूतपूर्व यश केवळ संजीव कपूरलाच मिळाले क्रिकेट अनेक जण अतिशय उत्तम खेळतात. परंतु सचिन तेंडुलकर एखादाच असतो. असे का होते ? याचा खरोखरच अतिशय गांभीर्यांने विचार आपण केला पाहिजे. आपल्या आयुष्याची योग्य दिशा गवसणे आणि स्वत:मधील क्षमतेची पुरेपूर खात्री पटणे हे खरे यशाचे गमक आहे. त्याला कष्टाची जोड दिली पाहिजे हा नंतरचा भाग झाला. परंतु खरी ओळख पटणे आधी महत्वाचे.
प्रत्येक विद्यार्थी आपापल्या आवडीनुसार अभ्यास करतो. काही विषयांचा अभ्यास तो अधिक प्रमाणात करतो, तर काही विषय अगदी नाईलाज म्हणून अभ्यासतो. जिथे गुणांचीच स्पर्धा आहे तिथे आवश्यक तितके गुण मिळवलेच पाहिजेत. परंतु गुणांच्या स्पर्धेला अवाजवी महत्व देणे अयोग्य आहे. शासनाने ठरवन दिलेल्या १०-१२ क्रमिक पाठ्‌यपुस्तकांवर एक वर्षभर मेहनत घेऊन भरपूर गुण मिळतील. परंतू आयुष्याच्या गुणपत्रिकेवर उत्तम गुण मिळवताना कोणती क्रमिक पाठ्यपुस्तके असतील? आपला मुलगा हुशार आहे, सर्वसामान्य आहे, उच्च बुद्धिमत्तेचा आहे, की सर्वसाधारण मुलांपेक्षाही कमी आहे, हे आपण कसे ठरवणार? (पुर्वार्ध)
परीक्षेतील यश हे बुद्धिमत्ता आणि परिश्रम या दोन्ही घटकांवर अवलंबून असते. आपली गुणवत्ता आपण कशाप्रकारे वापरतो, यावर ते अवलंबून असते. मग ही मार्कांची भानगड आली कुठुन? ही मार्कांची स्पर्धा खरी नाही. खरी स्पर्धा तर आता सुरू होणार आहे हे आपण ओळखलं पाहिजे.
दहावीनंतरच्या शिक्षणाकरिता आपण मार्कांचा निकष सोडून देऊन वैयक्तिक आवड, कुवत आणि अभिक्षमतेचा विचार आधी केला पाहीजे. आपल्याला आयुष्यभरासाठी निवडलेल्या क्षेत्रामध्ये उच्च प्रतीचे यश मिळवायचे असेल तर स्वत:मधील क्षमतांचा विचार आधी केला पाहिजे. केवळ एका मार्कलिस्टवर आपण आपले संपूर्ण करिअर ठरवून मोकळे होतो, हे चूक नाही का?
चांगले मार्क मिळाले की आधी शास्त्र शाखा, तिथे प्रवेश मिळाला नाही तर वाणिज्य शाखा आणि तिथेही प्रवेश मिळाला नाही तर शेवटी कला शाखा आहेच... असाच विचार सर्वसामान्यपणे केला जातो. इथे आपण आपल्या मुलाच्या आवडी-निवडीचा त्याच्यामधील क्षमतांचा विचार करतो का? शास्त्र, गणिताची अजिबात आवड नसलेल्या मुलाने केवळ चांगले गुण मिळाले म्हणुन शास्त्र शाखेत प्रवेश घ्यावा का? आणि भाषा विषयांची, सामाजिक शास्त्राची अजिबात आवड नसणार्‍या मुलाने केवळ कमी गुण मिळाले म्हणुन कला शाखेत प्रवेश घ्यावा का? या मुद्‌द्‌‌‌यंाचा जाणीवपूर्णक विचार विद्यार्थी आणि पालकवर्गाने करायला हवा, कारण दहावीनंतरची ज्ञानशाखेची निवड ही  केवळ पुढील शिक्षणाकरिता नसून आयुष्यभर मिळवण्याच्या भाकरीसाठी आहे. हे पक्के ध्यानात ठेवले पाहिजे.
माझी बुद्धिमत्तेची पातळी किती? माझ्यातील अंतभूत क्षमता कोणत्या! त्यापैकी कोणत्या क्षमता उच्च आहेत आणि कोणत्या क्षमता विकसित होण्यास  आणखी वाव आहे? माझी शारीरिक क्षमता कशी आहे? कष्ट करण्याची माझी तयारी आहे का? मी एकाच अपयशाने खचून जातो की पुन्हा जिद्दीने उभा राहून प्रयत्न करतो? माझ्या स्वत:च्या आवडी-निवडी कोणत्या? मी नवीन नवीन आव्हाने स्वीकारू शकतो का? मला चारचौघात राहून काम करणे आवडते की एकट्यानेच काम करणे आवडते? मला बैठे काम करणे आवडते की, बाहेरचे फिरतीचे काम करणे आवडते? रोजच्या त्याच त्याच स्वरूपाच्या कामाचा मला कंटाळा येतो का? मी रोजच्या कामात किती चुका करतो?  त्याच त्याच चुका पुन्हा:पुन्हा करतो का? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे स्वत: विद्यार्थ्यांनी शोधली पाहिजेत.
सध्याची वाढती स्पर्धा पाहता आपले करिअर उत्तम घडवणे हे आव्हानच आहे. पूर्वीसारखी सोपी शिक्षणपद्धती आता नाही. प्रत्येक ठिकाणी उच्च गुणवत्ता, प्रवेश परीक्षा, मुलाखती, गटचर्चा अशा चाचण्यांमधून आपल्या ज्ञानाची आणि पात्रतेची परीक्षा द्यावी लागणार. सध्याच्याकाळात कामाची क्षेत्रे वाढत आहेत. आज प्रत्येकालाच उच्च दर्जा आणि गुणवत्ता हवी आहे. अशावेळी, उच्च यश मिळवण्यासाठी पारंपारिक शिक्षणाच्या चौकटीपलिकडे जाऊन विचार केला पाहिजे.
आपले करिअर अधिक सजगपणे निवडण्यासाठी आपण आज उपलब्ध असणार्‍या अनेक पर्यायांचा विचार केला पाहिजे. बुद्धिमत्ता-अभिक्षमतामापन आणि करिअर समुपदेशन हा करिअर निवडण्याचा उत्तम विश्‍वसनीय मार्ग आहे. मानस शास्त्रज्ञ आणि करिअर समुपदेशकांकडून ऍप्टिट्यूूड टेस्ट करुन घेऊन योग्य करिअर मार्गदर्शन घेतल्यास विद्यार्थ्यांना याचा निश्‍चित फायदा होतो.
मी कोणते क्षेत्र करिअर करण्यासाठी निवडावे? आणि कोणत्या क्षेत्रात मी करिअर करणे योग्य ठरणार नाही, यावर मानसशास्त्रज्ञांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन अतिशय महत्वपूर्ण ठरते. बदलत्या काळानुसार आपणसुद्धा आपली करिअर निवडीची पद्धत बदलली आणि अधिक विश्‍वसनीय पर्यायाचा विचार केला तर आपले करिअर निश्‍चितच यशदायी आणि आनंददायी होईल. (उत्तरार्ध)
मयुरेश डंके
आस्था कौन्सीलींग सेंटर
विनायक सोसायटी, सात रस्ता,
सोलापूर.

भ्रमण ध्वनी - ९९७०८३२९१५

0 comments:

Post a Comment