भावार्थ सौंदर्याची प्रतिमा रागातून प्रकट होणे आवश्यक : किशोरी आमोणकर

किशोरी आमोणकर यांच्या प्रकट मुलाखतीची रसयात्रा
भावार्थ सौंदर्याची प्रतिमा रागातून प्रकट होणे आवश्यक
(अमर पुराणिक)
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांना स्वभाव आहे, राग-स्वरांच्या समूहातून रागाच्या भावांचे प्रकटीकरण झाल्याशिवाय गाणे हृदयाला भिडत नाही, असे प्रतिपादन पद्मविभूषण गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी केले.
हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर व श्रीराम पुजारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘पंडित कुमार गंधर्व पुरस्कार’ व ‘पु.ल. देशपांडे बहुरुपी सन्मान‘ या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर झालेल्या प्रकट मुलाखतीत गानसरस्वती किशोरी आमोणकर बोलत होत्या. किशोरी आमोणकरांची मुलाखत केशव परांजपे यांनी घेतली. यावेळी केशव परांजपे व किशोरीताईंच्या शिष्या नंदिनी बेडेकर यांचा सत्कार डॉ. प्रकाश जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केशव परांजपे यांनी किशोरीताईंच्या गाण्याला दिव्यत्वाचा स्पर्श असल्याचे नमूद केले. किशोरीताई यावर बोलताना म्हणाल्या की, भारतीय राग-संगीताचे उद्‌बोधन व स्वरांची भाषा ही वैश्‍विक आहे, दिव्य आहे! रागांच्या भावार्थ सौंदर्याची प्रतिमा प्रकट होण्यासाठी स्वरांची वैश्‍विक परिभाषा समजावून घेतली पाहिजे. राग काय आहेत, हे समजून घेण्यासाठी प्रथम स्वर काय आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. गणित सुंदर आहे, हे संागणारं गाणं असतं. गणितात शून्याला जसे महत्त्व आहे, तसेच गाण्यातील शून्यावस्थाही महत्त्वाची आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ही शून्यावस्था ही साम्यावस्था म्हणून ओळखली जाते. ‘रंजयती इति रागा:|’ ही रागाची व्याख्या असून, या व्याख्येप्रमाणे आपल्या भावना ‘या हृदयापासून त्या हृदयापर्यंत’ पोहोचवण्याची भावना रागात आहे. राग म्हणजे इच्छा, इच्छा प्रकट करण्याची भाषा म्हणजे स्वरभाषा असल्याचे किशोरी आमोणकर म्हणाल्या.
रागांचा विचार करण्याआधी स्वर म्हणजे काय? रागनिर्मिती कशी होते? याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. रागांचे भावविश्‍व परखण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी स्वर आहेत. रागांचा अधिक खोलात जाऊन ऊहापोह करताना किशोरीताई म्हणाल्या की, सप्तकातील मान ठरविलेले स्वरच फक्त रागात लागतात असे नाही, तर प्रत्येक रागात प्रत्येक स्वर वेगवेगळ्या श्रुतींचा असतो. याचे उदाहरण देताना किशोरीताईंनी शुद्ध कल्याण रागातील गांधाराचा खुलासा केला. स्वरसमूहातील गांधारापेक्षा शुद्ध कल्याण रागातील गांधार वेगळा आहे. विभास रागात लागणारा धैवतही असाच वेगळा आहे. विभासातील धैवत हा शुद्ध धैवत व कोमल धैवताच्या मध्ये आहे, त्यातही तो कोमल धैवताकडे झुकणारा आहे. हा श्रुतिभेद सांगता येत नाही. त्यासाठी स्वत: सतत गाण्याचे चिंतन करणे आवश्यक आहे. या स्वरभेदांचा नमुना किशोरी आमोणकरांनी गाऊन दाखवून स्पष्ट केला.
किशोरी आमोणकरांच्या मातोश्री विदुषी मोगुबाई कुर्डीकर या रागांचे भाव प्रकट करणार्‍या स्वर व राग वैशिष्ट्यांचे विशेष महत्त्व किशोरीताईंना वारंवार समजावून सांगत असत. जयपूर घराण्याची गायकी ही आकारयुक्त असते. आकाराच्या स्वरूपात स्वरांचे अत्युच्च स्वरूप प्रकट होत असल्याचे सांगून किशोरीताईंनी आकाराचे महत्त्व स्पष्ट केले. स्वरांच्या बिंदूचे किरण किंवा प्रकटणारी आभा किती गहन व खोल जाते, याचे स्पष्टीकरण किशोरीताईंनी स्वत: गाऊन स्पष्ट केले. जयपूर घराण्यात शिकवताना रागांची नावे सांगितली जात नाहीत. याचे कारण हेच आहे की, सप्तकातील स्वरांच्या मानाकडे लक्ष न लागता त्या त्या रागांचे रागांग प्रकट होण्यासाठी असे केले जात असल्याचा खुलासा किशोरी आमोणकरांनी केला.
स्वर हे स्वयंप्रकाशित आहेत, या स्वरांच्या भावार्थ सौंदर्याची प्रतिमा प्रकट होण्यासाठी स्वराभ्यासाचे महत्त्व त्यांनी सांगितले. स्वर व राग हे नैसर्गिक आहेत आणि ते निसर्गाशी कधीही प्रतारणा करीत नाहीत, त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपात सादर केल्यास स्वरांचा आत्मानंद घेता येणे शक्य असल्याचे किशोरीताईंनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाला शहरातील बहुसंख्य मान्यवर हिराचंद नेमचंद वाचनालय व श्रीराम पुजारी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, सभासद व संगीतप्रेमीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ यांनी अतिशय सुरेख व नेहमीच्या ओघवत्या शैलीत केले.

0 comments:

Post a Comment