सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या
(१५ सप्टेंबर १८६१ - १४ एप्रिल १९६२). 
·अमर पुराणिक· 
 मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या हे कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्मलेले भारत देशाचे भाग्यविधाते अभियंते व नागरीक होते. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला. ब्रिटीशांनी पण त्यांना, त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. काही ठिकाणी, विशेषतः, त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात, या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.
विश्वेश्वरैय्या यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला. ते श्रीनिवास शास्त्री व वेंकचम्मा यांचे अपत्य होते. त्यांचे जन्मगाव पुर्वी म्हैसूर राज्यात होते. त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान पंडित होते, ते हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते. विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले. त्या मूळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण बंगळूरू येथे झाले. ते १८८१ साली चेन्नई येथुन बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रिकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पुणे येथे घेतले.
अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर, त्यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले. त्यांनी, दक्षिणेच्या क्षेत्रात पाटबंधार्‍यांची एक अतीशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली' विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास लावण्यात आली. ही द्वारे, धरणातील साठ्याची पूरपातळी, पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत. या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे, ती टिग्रा धरण ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात आली. विश्वेश्वरैय्या यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्यामुळे त्यांना खूप सन्मान प्राप्त झाला. विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
सर विश्वेश्वरैय्या यांनी, कावेरी नदीवर के. आर. एस. धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व जबाबदारी पार पाडली. या धरणाचे बांधकामाने, ते बांधल्या गेल्याच्या वेळचे, आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, 'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले जायचे. त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान, त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी, कीटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट, बंगळूरू ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बॅंक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, मैसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीत देखील त्यांनी योगदान केले.
सन १९०८ मध्ये स्वेच्छा-निवृत्तीनंतर,  म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणुन त्यांना, नियुक्त करण्यात आले. कृष्णराज वडियार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजाच्या आधारामुळे, त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निर्विवाद असे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत, सन १९१७ मध्ये बंगळूरू येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय याची त्यांनी स्थापना केली. ती भारतातील   प्रथम अभियांत्रिकी संस्था होती. ती अद्यापही कर्नाटकातील एक गणमान्य संस्था आहे.
विविध सन्मान
ते म्हैसूर येथे दिवाण असतांना त्यांना, जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' या सन्मानाने गौरविले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले.
'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' पदक तसेच सर विश्वेश्वरैय्या यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व ,तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्सच्या बंगळूरू शाखेने फेलोशिप देउन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना 'डॉक्टर' ही अनेक विद्याशाखातली पदवी देउन गौरविले. ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स काँग्रेस चे अध्यक्ष होते.

0 comments:

Post a Comment