उद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी

सतत प्रगती साधायची असेल तर विकास कामात सातत्य महत्त्वाचे : ‘मैंदर्गीरत्न’ ए.जी. पाटील
उद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी 
• उद्योग भरारी : अमर पुराणिक

‘‘सतत प्रगतीसाठी विकास कामात सातत्य असणे महत्त्वाचे असते, असे ‘मैंदर्गीरत्न’ ए.जी. पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. सोलापूर शहराच्या वाढीमुळे जागेची मागणी देखील वाढली आहे. शासन नवे बिगरशेती परवाने देत नसल्याने जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जागेसाठी अवास्तव किंमत मोजावी लागत आहे, त्यामुळे शासनाने बिगरशेती परवाने देणे सुरू करणे आवश्यक आहे. मूलभूत सुविधांच्या बाबतीतही शासन उदासीन आहे. सोलापूरची गृहनिर्माण उद्योगात प्रगती चांगली आहे, पण शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती मात्र निराशजनक आहे. सोलापुरात आणखी शैक्षणिक संस्था निर्माण होणे गरजेचे आहे, शिवाय या संस्थांमधून दर्जेदार शिक्षण मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सोलापूरचा प्रत्येक बाबतीतच दर्जा उत्तम आहे. त्या दर्जाचे संंवर्धन करणेही अत्यावश्यक असून, प्रगतीचा समतोल साधला गेला पाहिजे, असे पाटील यांनी आवर्जून सांगितले. ..................................................
           अण्णाराव गुरुलिंगप्पा पाटील अर्थात ए.जी. पाटील हे एक शालीन, नम्र व धार्मिक व्यक्तिमत्त्व. सोलापूर शहरातील जुळे सोलापुरात नंदनवन निर्माण करणारे ए.जी. पाटील म्हणजे अध्वर्यूच आहेत. बहुसंख्य सोलापूरकर त्यांना ‘काका’ म्हणून ओळखतात. तडफदार शिवसेना नेते व माजी आमदार शिवशरणअण्णा पाटील यांचे ते काका आहेत. बांधकाम आणि शैक्षणिक क्षेत्रांत ए.जी. पाटील यांचे कार्य उल्लेखनीय आहे. बांधकाम व्यवसाय करताना ए.जी. पाटील यांनी फक्त व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक भान देखील राखले आहे. कित्येकांना त्यांनी व्यावसायिकता सोडून अत्यल्प दरात घरे दिली आहेत. या स्वभावातील अनेक उत्तम पैलूंमुळे सोलापूरच्या सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांत ए.जी. पाटीलकाकांचे नाव आदराने घेतले जाते.
ग्रामदैवत शिवचलेश्‍वराच्या वास्तव्याने पुनित झालेल्या मैंदर्गी येथे शेतकरी कुटुंबात ए.जी. पाटील यांचा जन्म झाला. ए.जी. पाटील यांचे वडील गुरुलिंगप्पा यांना ए.जी. पाटील यांच्याबाबत लहानपणापासूनच एक विश्‍वास होता की, अण्णाराव पाटील कुळाचे नाव उज्वल करतील. ए.जी. पाटील यांचे प्राथमिक शिक्षण मैदर्गी येथील श्री इंग्लिश स्कूलमध्ये झाले. माध्यमिक शिक्षणासाठी ते सोलापुरात आले. काडादी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. १० वीपर्यंतचे शिक्षण काडादी हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर ऍग्रिकल्चर डिप्लोमा पूर्ण केला आणि सन १९६० मध्ये शासकीय दूध डेअरीमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरीला सुरुवात केली. १९६१ साली शांताताई पाटील यांच्याशी ए.जी. पाटील यांचा विवाह झाला. ए.जी. पाटील यांनी त्यानंतर केलेली प्रगती पाहता शांताताई या साक्षात लक्ष्मीच्या रूपाने ए.जी. पाटील यांच्या जीवनात आल्या, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ए.जी. पाटीलकाकांना दोेन मुली व दोन मुले अशी चार अपत्यं असून, ज्येष्ठ चिरंजीव सिद्धेश्‍वर अण्णाराव पाटील हे ए.जी. पाटलांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक संस्थांचा कार्यभार पाहतात, तर संतोष अण्णाराव पाटील हे कनिष्ठ चिरंजीव बांधकाम व्यवसायाची धुरा वाहतात.
आपली जन्मभूमी मैदर्गी येथील ज्या शाळेत आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला, त्या शाळेचे ए.जी. पाटीलकाकांनी पुनरुज्जीवन केले. त्या श्री इंग्लिश मीडियम स्कूलचे ते गेली १८ वर्षे अध्यक्ष देखील आहेत. ग्रामीण भाग असून देखील ए.जी. पाटीलकाकांनी कोट्यवधी रुपये खर्चून या शाळेत, शाळेची अत्याधुनिक इमारत, विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जन्मगावाचे ऋण आणि सामाजिक जाणिवेतून ए.जी. पाटील काका यांनी मैंदर्गीतील विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधा देण्याचा सतत प्रयत्न केला आहे. न्यू इंग्लिश स्कूलमध्येच कनिष्ठ महाविद्यालयाचीही सुरुवात ए.जी. पाटील यांनी केली. कनिष्ठ महाविद्यालयामुळे मैंदर्गीचा नावलौकिक वाढला. मैंदर्गीग्रामाच्या शैक्षणिक गरजांबरोबरच सामाजिक क्षेत्रातही मोठे काम केले आहेे. ए.जी. पाटीलकाका यांची वृत्तीच मुळी धार्मिक व सालस असल्याने त्यांची आपल्या जन्मगावचे ग्रामदैवत ‘श्री शिवचलेश्‍वरा’वर प्रचंड श्रद्धा आहे. त्यांच्या यशाचे श्रेय म्हणजे श्री शिवचलेश्‍वराचाच आशीर्वाद आहे असे ते मानतात. त्यांनी १९८२ मध्ये मैंदर्गीचे ग्रामदैवत श्री शिवचलेश्‍वर देवस्थान ट्रस्टची नोंदणी केली. देवस्थानचा जीर्णोद्धार केला. त्या ट्रस्टचे देखील ए.जी. पाटीलकाकाच अध्यक्ष आहेत. ए.जी. पाटीलकाकांनी मैंदर्गीत केलेल्या कार्याची दखल घेत मैंदर्गी ग्रामस्थांनी त्यांना ‘मैंदर्गीरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
ए.जी. पाटील यांनी १९७३  साली बांधकाम व्यवसायाचा श्रीगणेशा केला. सर्वप्रथम जुळे सोलापुरातील विजयनगरचा प्रकल्प सुरू केला. त्यानंतर १९७५ साली जुने संतोषनगर, १९८४ मध्ये नवीन संतोषनगर, शांती अपार्टमेंटचा प्रकल्प साकारला. तत्पश्‍चात  शिवगंगानगरचा प्रकल्प पूर्ण केला. ए.जी. पाटील यांच्या धार्मिक व सात्विक वृत्तीचे प्रतीक म्हणजे या प्रत्येक प्रकल्पात त्यांनी एकेक मंदिर बांधले आहे. जुन्या संतोषनगरामध्ये गणपती मंदिर आहे, तर नव्या संतोषनगरामध्ये लक्ष्मी मंदिर आहे आणि शिवगंगानगरमध्ये संतोषीमातेचे मंदिर बांधले आहे.
सन १९९८ साली शांती एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून, शांती इंग्लिश स्कूल सुरू करून शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी उडी घेतली. शैक्षणिक क्षेत्रात ए.जी. पाटील यांनी भव्य यश संपादन केले. संतोषनगरमधील शांती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरी ते १२ वीपर्यंतच्या शिक्षणसुविधा दिल्या जातात. शांती इंग्लिश मीडियम स्कूलचा गेल्या तीन वर्षांपासून १०० टक्के निकाल लागत आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणणार्‍या ए.जी. पाटीलकाकांनी आपल्या सर्वच शिक्षणसंस्थांत शैक्षणिक दर्जाला विशेष महत्त्व दिले आहे. उच्चतम दर्जाकडे पाटील काकांचा नेहमीच कटाक्ष असतो. शांती इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरातच शांती डी.एड. कॉलेजही सुरू केले आहे. शिवगंगानगर येथे आजच्या युगातील तंत्रशिक्षणाचे महत्त्व जाणून ए.जी. पाटीलकाकांनी शांती आयटीआयची स्थापना केली. त्यानंतर ए.जी. पाटीलकाकांचे ज्येष्ठ चिरंजीव सिद्धेश्‍वर पाटील यांनी ए.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला, तो म्हणजे इंजिनीअरिंग कॉलेजचा. सिद्धेश्‍वर पाटील यांनी २००७ मध्ये ‘ए.जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ची स्थापना केली. आज ही संस्था अल्पावधीतच नावारूपाला आली आहे. ए.जी. पाटीलकाकांचा स्वभावच मुळी अलिप्त राहण्याचा.  राजकारण, प्रसिद्धीपासून ते लांब राहणेच पसंत करतात. ए.जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या उद्‌घाटनासाठी कोणताही राजकीय किंवा प्रसिद्धीचा प्रपोगंडा न करता इंजिनीअरिंग कॉलेजचे उद्‌घाटन प्रथम प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याच्या हस्ते केले.
ए.जी. पाटील यांना मोलाची साथ देणारी व्यक्ती म्हणजे शिवसेना नेते, माजी आमदार शिवशरणअण्णा पाटील.  खरे तर ए.जी. पाटीलकाका आणि शिवशरणअण्णा पाटील हे एकमेकांना पूरक अशी साथ देत असतात. शिवशरण पाटील यांच्या सर्वच्या सर्व निवडणुकांची धुरा ए.जी. पाटीलकाकांनी वाहिली आहे. शिवशरण पाटील हे आपल्याला आमदार बनवणारे शिल्पकार म्हणून ए.जी. पाटीलकाकांना मोठ्या आदराने संबोधतात. आपल्या यशात सिंहाचा वाटा ते पाटीलकाकांना देतात. ए.जी. पाटीलकाकांचे आपल्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम शिवशरणअण्णांवर आहे. शिवशरणअण्णा जेव्हा आमदार झाले, तेव्हा ए.जी. पाटीलकाकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते, हे अनेकांनी पाहिले आहे. शिवशरणअण्णा आमदार झाल्याचा आनंद शिवशरणअण्णांपेक्षाही ए.जी. पाटीलकाकांना अधिक झाला होता. शहरातील आपल्या कार्याचा व्याप सांभाळत असातानाही मैंदर्गीकडे दुर्लक्ष कधीच झाले नाही. सतत ते मैंदर्गीला जात असतात, तेथील कामांकडे स्वत: लक्ष देतात.
इतकं मोठं यश संपादन करूनही ए.जी. पाटीलकाकांना गर्वाची बाधा नाही. त्यांनी विनयशीलता कधी सोडली नाही. विनयशीलता ही काकांच्या रक्तातच भिनली असून, विनयशीलता हा एक त्यांचा दागिना आहे. काका सतत प्रसिद्धीपासून लांबच राहिले. स्वत:च्या कार्याचा कधीही गवगवा त्यांनी केला नाही, किंबहुना जाणीवपूर्वक ते प्रसिद्धी टाळत राहिले असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही, पण असे असले तरीही त्यांच्या कार्याची दखल सुजाण सोलापूरकरांनी घेतली. मैंदर्गीच्या ग्रामस्थांनी त्यांना ‘मैंदर्गीरत्न’ पुरस्कार बहाल केला. सोलापुरातील बसवभक्तांनी त्यांना ‘बसवश्री’ पुरस्काराने सन्मानित केले, तर जानेवारी २०१० मध्ये नवी दिल्लीच्या सिटिझन्स इंटिग्रेशन पीस सोसायटी या ख्यातनाम संस्थेच्या वतीने ‘उद्योगरत्न’ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. आपल्या सर्वसमावेशक स्वभावामुळे काका सार्‍यांनाच आपलं मानतात, आपल्यात सामावून घेतात. इतरांचे अश्रू पुसतात, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होतात. आज सर्व सुखं काकांच्या दारात हात जोडून उभी असली तरीही ए.जी. पाटीलकाका दु:खी, कष्टी माणसांना विसरत नाहीत. येवढं सगळं कर्तृत्व गाजवूनही ए.जी. पाटीलकाका म्हणतात की, ‘‘ही सर्व श्री सिद्धरामेश्‍वर आणि श्री शिवचलेश्‍वरांचीच कृपा आहे!’’ येत्या मे महिन्यात म्हणजे ८ मे २०११ रोजी ए.जी. पाटीलकाकांचा भव्य असा ‘अमृतमहोत्सव’ त्यांच्या समर्थकांकडून साजरा केला जात आहे.
ए.जी. पाटील यांनी अनेक दशकं श्रम करीत कोणाच्याही पाठिंब्याविना स्वकष्टातून जे भव्य यश संपादित केले आहे, त्याला उपमा नाहीच! त्यांच्या या यशात ए.जी. पाटीलकाका सर्व आप्त, सहकारी, मित्रांना समावून घेतात. त्यांना सर्व लोकांचे खूप सहकार्य लाभल्याचेही ते नम्रपणे नमूद करतात. त्यांच्या या यशाला, या दैवी आशीर्वादाबरोबरच त्यांनी जपलेली काही मूलतत्त्वे देखील कारणीभूत आहेत. ए.जी. पाटीलकाका नीतिमत्तेला खूप महत्त्व देतात आणि कसोशीने नीतिमत्ता जपतात. याशिवाय कामाप्रती असलेली निष्ठा देखील त्यांच्या यशाला तितकीच कारणीभूत आहे. काकांचे दुसरे तत्त्व आहे, ‘‘कोणालाही कमी लेखू नका, तिसरे तत्त्व म्हणजे कोणावरही अन्याय करू नका! आणि कोणी अन्याय केलाच तर सहनही करू नका! काकांच्या यशाला ही तत्त्वे खरेच समर्पक, समर्थक आणि सामर्थ्यवान ठरली आहेत.
-------------------------------------------------------------------
•सोलापूरचा औद्योगिक विकास  : ‘मैंदर्गीरत्न’ ए.जी. पाटील
‘मैंदर्गीरत्न’ ए.जी. पाटील
सोलापूरची औद्योगिक प्रगती चांगली आहे, पण ती स्थिर नाही. सतत प्रगती साधायची असेल तर विकास कामात सातत्य असणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ‘मैंदर्गीरत्न’ ए.जी. पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना केले.
सोलापूर शहराच्या वाढीमुळे जागेची मागणी देखील वाढली आहे. शासन नवे बिगरशेती परवाने देत नसल्याने जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जागेसाठी अवास्तव किंमत मोजावी लागत आहे. सोलापूरची वाढ लक्षात घेऊन शासनाने बिगरशेती परवाने देणे सुुरू करणे आवश्यक असल्याचे मत ए.जी. पाटील यांनी व्यक्त केले. शिवाय मूलभूत सुविधांच्या बाबतीतही शासन उदासीन आहे. सोलापूरची गृहनिर्माण उद्योगात प्रगती चांगली आहे, पण शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती मात्र निराशजनक आहे. सोलापुरातील विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांच्या भवितव्याचा विचार केल्यास सोलापुरात आणखी शैक्षणिक संस्था निर्माण होणे गरजेचे आहे, शिवाय या संस्थांमधून दर्जेदार शिक्षण मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे पाटील म्हणाले.
सोलापूरचा प्रत्येक बाबतीतच दर्जा उत्तम आहे. त्या दर्जाचे संंवर्धन करणेही अत्यावश्यक असल्याचे पाटील यांनी आवर्जून सांगितले. सोलापूरची जरी नैसर्गिकरीत्या प्रगती होत असली तरी सामाजिक, राजकीय, औद्योगिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रांत प्रगतीचा वेग वाढणे व त्याचा समतोल साधला गेला पाहिजे, असा आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा सल्लाही ए.जी. पाटील यांनी दिला.
तरुण भारत, सोलापूर, रविवार, दि. २१ नोव्हेंबर २०१०

0 comments:

Post a Comment