राष्ट्र, हिंदुराष्ट्र : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार

राष्ट्र, हिंदुराष्ट्र : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार'राष्ट्र, हिंदुराष्ट्र ' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.

जगातील मानव एक व्हावे ही सदिच्छा असली तरी
जगातील मजुरांनी एक व्हावे ही सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. - (१९४३ अ.हिं.ल.प.पृ. २०१)
राष्ट्रवाद कालबाह्य नाही
राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. -(१९४३ अ.हिं.ल.प.पृ. २०१)
सिंधू शब्द राष्ट्रवाचक
..... सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : २०)
हिंदुराष्ट्राचे घटक
'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. - (स.सा.वा. ३ : ७१३)
हिंदूंची समान बंधने , वैशिष्टये
हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ५५)
सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.
सातत्य ही गोष्ट आपणास नवीन नाही. वेद जेव्हा जेव्हा अस्तित्वात आले तेव्हापासून एका सुरात नि स्वरात म्हटले जातात. अशा आपल्या अनेक अभिमानास्पद परंपरा आहेत. - (१९४१ अ.हिं.ल.प.पृ. १०)
आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६३)
राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६४)
ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.
शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत. - (स.सा.वा. २ : ४३४)
कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६२)
हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६३)
हिंदूंमध्ये भेद, वैचित्र्य आहे त्याचे काय ?
कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि तदितर समाजांशी होणार्‍या टक्करीत तगते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणेच अशक्य. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्‍या समाजाशी असणार्‍या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते. - (१९४९ स.सा.वा. ३: ७१८)
ह्या हिंदू संस्कृतीच्या शेवटच्या अक्षरापर्यंत तपशिलाविषयी प्रत्येक हिंदूचे इतर हिंदूंशी एकमत आहे असे नव्हे. परंतु हिंदूंचे अरबांशी वा इंग्रजांशी साम्य आहे त्याहून अधिक साम्य इतर हिंदूंशी आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६४)
हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ?
संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका. -(१९२३ हिं.,स.सा.वा. ६ : ८८,८९)
आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे. - (१९४९ स.सा.वा. ३ : ७१९)
हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही
हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान एक जाती आहेत. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३२४)
हिंदुस्थानावाचून हिंदूंना अन्य गती नाही
हिंदुस्थानात हिंदूंचे पूर्वज राहिले नि वाढले. त्यांची सर्व पवित्र स्थाने याच पुण्यभूमीत आहेत. त्यांना जिवंत राहायला नि मरायलाही या देशाबाहेर दुसरी जागा नाही. त्यांना पृथ्वीतलावरच नव्हे तर स्वर्गात दुसरी गती नाही. त्यांचे देवही क्षीणपुण्य झाले की त्यांना हिंदुस्थानच्या कर्मभूमीवर येऊन पुण्य करुन स्वर्गपद प्राप्त करुन घ्यावे लागते. म्हणून हिंदुस्थान हे हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्र आहे. हिंदुस्थानातील हिंद्वेतरांशी आमचे भांडण नाही परंतु त्यांना हिंदूंबद्दल अभेद्यपणा वाटत नसेल तर हिंदूंनी काय करावे ? -(१९३८ स.सा.वा. ४ : ४१४)
हिंदुराष्ट्र एक सत्य
... वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्‍या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्‍या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३०७)
नकारात्मक दृष्टीनेही हिंदुराष्ट्र
प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते. - (१९३९ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५३)
राष्ट्रीय जीवनाचा धागा पुन्हा उचलून धरा
आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३२४)
हिंदुराष्ट्राचे ध्येय
राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...
हिंदुराष्ट्र हे एकच राष्ट्र असे आहे की त्याने पूर्ण नि:श्रेयसाच्या आधारावरील निर्दोष अभ्युदय हे आपले ध्येय स्वीकारले आहे. - (१९२६ स.सा.वा ६ : ५२१)
मनोराज्ये करावयाची तर अशी करा
उज्जयिनी ही अखिल हिंदुसाम्राज्याची राजधानी झालेली असून तिच्यावर अप्रतिरथ असा तो कुंडलिनी-कृपाणांकित हिंदुध्वज डुलत आहे ! नवे नवे भाऊसाहेब पेशवे, हरिसिंग नलवे, प्रतिचंद्रगुप्त, प्रतिविक्रमादित्य लक्ष लक्ष सैनिकांचे तुंबळ दळभार घेऊन, ज्यांनी ज्यांनी आमच्या पडत्या काळात आमच्या हिदुराष्ट्रास अवमानिले, दडपले, छळले त्यांच्या त्यांच्यावर चढाई करुन चालले आहेत, त्यांची त्यांची रग जिरवून, सूड उगवून कोणी रुमशाम तर कोणी लंडन गाठले आहे, कुणी लिस्बन तर कोणी पॅरिस ! दिग्दिगंती हिंदू खड्गाचा असा दरारा बसला आहे की हिंदू साम्राज्याकडे डोळा उचलून पाहण्याची कोणाची छातीच होऊ नये ! अद्ययावत यंत्रे, अद्ययावत तंत्रे, हिंदू विमानांचे आणि वियानांचे थवेच्या थवे आकाशात उंच उंच उडत आहेत. हिंदूंच्या प्रचंड रणभेरी पूर्व समुद्रात नि पश्चिम समुद्रात (अरबी समुद्र हे नाव सुध्दा बदलून) प्रचंड पाणतोफांचा खडा पहारा देत आहेत; हिंदू संशोधकांची वैमानिक पथके उत्तर धृवावर नव नवे भूभाग शोधून त्यावर हिंदुध्वज रोवीत आहेत ! ज्ञान, कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यक प्रभृती प्रत्येक कर्तृत्वक्षेत्रात सहस्त्रावधी हिंदू स्पर्धालू जागतिक उच्चांक पटकावीत आहेत ! लंडन, मॉस्को, पॅरिस, वॉशिंग्टनादी राष्ट्रप्रतिनिधींची दाटी हिंदुसाम्राज्याच्या बलाढय राजधानीच्या त्या उज्जयिनीच्या महाद्वाराशी हिंदू छत्रपतींना आपापले पुरस्कार अर्पिणास्तव हाती उपायने घेऊन वाट पाहात उभी आहे ! अरे मनोराज्येच करायची तर अशी काही तरी करा!! -(१९३६ वि. नि., स.सा.वा.३ : ४२०)
माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे
वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.
मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !
या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.
माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन.
माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे! - (१९३९ स.सा.वा. ४ : ५३१)

0 comments:

Post a Comment