मुश्रिफांनी तोडले अकलेचे तारे...

मुश्रिफांनी तोडले अकलेचे तारे...
‘‘
हिंदूंमध्ये जातीजातीत, पंथापंथात शुक्लकाष्ट लावून फूट पाडण्याची कारस्थाने हिंदूंना नवी नाहीत. ‘हिंदू अतिरेकी’ हा शब्द रूढ करण्याचा हा प्रयत्न असून, मुश्रिफही हीच खेळी खेळत आहेत. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार केल्याने काही होणार नाही. कोंबडा झाकल्याने सूर्य उगवायचा राहणार नाही. सत्य हे सत्यच असते. अशा माथेफिरू लेखनाने काहीही फरक पडणार नाही. भारतीय जनता आणि मुस्लिम जनताही हे सर्व प्रकार ओळखून आहे. फक्त भारतच नव्हे तर पाकिस्तान्यांनाही याची कल्पना आहे.
’’..............................................................
•अमर पुराणिक•
 मुंबईवर २६ नोव्हेंबर ०८ रोजी झालेल्या हल्ल्याला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या हल्ल्याचे वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण भांडवल करीत सुटला आहे. कोणी २६/११ च्या हल्ल्याचे श्राद्ध घातले तर कोणी श्राद्धाच्या नावाखाली आनंदोत्सव साजरा केला. सत्ताधार्‍यांनी तर प्रचंड खर्च करीत ही घटना कशी ‘कॅश’ करता येईल, याचे नियोजन करून येनकेनप्रकारे घटना कॅश केली. या घटनेचे निमित्त करीत माजी आय.जी. शमशुद्दिन मुश्रिफ यांनी पोेटात मळमळणारी ‘गरळ’ ओकत ‘हू किल्ड करकरे? ः द रिअल फेस ऑफ टेररिझम इन इंडिया’ हे वादग्रस्त व भारताच्या राष्ट्रीय ढांचाला धक्का देणारे हे पुस्तक  लिहिले आणि या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन  २६/११ च्या वर्षपूर्तीच्या दिवशीच केले. हू किल्ड करकरे...? पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन दि १६ डिसेंबर ०९ रोजी झाले. नुकत्याच बाजारात आलेल्या या पुस्तकावरून सध्या मोठे वादंग उसळले आहे. ‘हू किल्ड करकरे ? ः द रिअल फेस ऑफ टेररिझम इन इंडिया’ हे राज्याचे माजी इस्पेक्टर जनरल एस.एम. मुश्रिफ यांचे पुस्तक नुसते वादगस्त श्रेणीतलेच नसून, इतक्या मोठ्या पदावर काम केलेल्या पोलीस अधिकार्‍याने इतके बेजबाबदार लिखाण करणे म्हणजे आश्‍चर्यच आहे! (कदाचित व्यक्तिस्वातंत्र्याचा हा परिणाम असावा.)
बहुसंख्य हिंदुत्ववादी संघटना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या निस्सीम राष्ट्रभक्त, राष्ट्रनिष्ठ संघटनेवर असंबद्ध आरोप करीत, हिंदुत्ववादी संघटना हिंदुराष्ट्राची भाषा बोलत असल्या तरी ब्राह्मण राष्ट्रवाद हेच त्यांचे अंतिम ध्येय असल्याची मळमळ मुश्रिफ यांनी या पुस्तकात व्यक्त करीत देशातील दहशतवादाच्या मुळाशी पाकिस्तान, तालिबान, लष्कर-ए-तैय्यबा, जैश-ए-मोहंमद या अतिरेकी मुस्लिम संघटना नसून, रा.स्व. संघ व इतर हिंदू संघटना असल्याचा खळबळजनक दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.
गेली १५-२० वर्षे आपला देश दहशतवादाने पोळला आहे. सतत या दहशतवादाचे चटके आपण सोसतोय. या दहशतवादाचे विश्‍लेषण करताना जहरी आणि निखालस खोटे आरोप करीत, असंबद्ध लिखाण त्यांनी केले आहे. मुश्रिफ यांनी आजवर न ऐकलेले असे विकृृत विचार व तर्क या पुस्तकात मांडले आहेत. अर्थात त्यांच्या अघोरी डोक्यातील या कल्पनांची ‘गरळ’ त्यांनी २६/११च्या वर्षपूर्तीचे निमित्त साधत ओकली आहे.
 देशाची सर्वोच्च गुप्तचर संस्था आयबी अर्थात इंटेलिजन्स ब्युरो पूर्णपणे संघाच्या भजनी लागली आहे. देशाच्या अन्य सुरक्षा यंत्रणाही त्यांना सामील आहेत. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशात दंगली घडवणे आणि मुस्लिमांना दहशतवादी ठरवणे हा एककलमी कार्यक्रम त्यांच्याकडून राबवला जातोय, असा मुश्रिफ यांच्या विकृत सिद्धांताचा सूर आहे.
देशातल्या दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तान किंवा बांगलादेश हे शेजारी देश आहेत. देवबंद, सिमीसारख्या कट्टरपंथी मुस्लिम संघटनांना हाताशी धरून हे देश भारतात दहशतवादी कारवाया करीत असतात, हे सर्वमान्य सत्य मुश्रिफ यांना मान्य नाही. या देशातला दहशतवादाचा खरा चेहरा मुस्लिम नसून हिंदू आहे, असा जावईशोध लावून हे लोकांच्या मनावर बिंबण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने केला आहे.
देशात उच्चवर्णीयांचे वर्चस्व कायम राहावे यासाठी ब्राह्मणांनी रचलेले हे योजनाबद्ध कारस्थान असून, संघाच्या स्थापनेमुळे या प्रयत्नांना संघटित रूप आल्याचे ते या पुस्तकात सांगतात. देशात गेल्या काही वर्षांत झालेल्या दंगली आणि बॉम्बस्फोट हिंदुत्ववादी संघटना व संघ परिवारातल्या संस्थांनीच घडवले असून, इंटेलिजन्स ब्युरो अर्थात ‘आयबी’ या गुप्तचर संघटनेच्या आशीर्वादाने हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू असल्याची मखलाशी मुश्रिफ महाशयांनी केली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटांचा तपास करताना एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना या षड्‌यंत्राचा साक्षात्कार झाला असल्याचे मुश्रिफ म्हणतात, पण ‘आयबी’च्या दबावाला न जुमानता त्यांनी या षड्‌यंत्राचा पर्दाफाश करीत आणला होता. अशावेळी त्यांची संशयास्पद परिस्थितीत हत्या झाली, असा शोध (?)ही मुश्रिफ यांना लागला आहे.
हे आरोप एखाद्या सर्वसामान्याने केले असते तर ते कुणी फारसे मनावरही घेतले नसते. या पुस्तकाकडे कुणाचे फारसे लक्षही गेले नसते, पण ते राज्याच्या इन्स्पेक्टर जनरल या महत्त्वाच्या व जबाबदार पदावर काम केलेल्या एका जबाबदार(?) अधिकार्‍याने केले असल्यामुळे त्याची दखल घेणे अत्यावश्यक ठरते. कोणताही हुशार माणूस आरोप करून गप्प बसत नाही. तो आपला मुद्दा पटवून देण्यासाठी काही ठोस तर्क देतो. दहशतवादाचा संघपरिवाराशी संबंध जोडून मुस्लिमांना क्लीन चिट देताना अतिहुशार मुश्रिफांनी काही तर्क (तर्कहीन) दिले आहेत. हे तर्क एखाद्याला कल्पनेचे तरंग वाटले तरी त्यांची मांडणी एखाद्या गाजलेल्या रोमांचकारी व सस्पेन्स कादंबरीच्या तोडीची आहे. मुश्रिफांचे हे लेखनकौशल्य मात्र नाकारता येत नाही.
११-१२ व्या शतकांपासून मुस्लिम आक्रमणाचे ‘वार’ हा देश झेलतोय.  बाबर, अल्लाउद्दिन खिलजी, मोघल, या मुस्लिम आक्रमकांचे देशात पाऊल पडल्यापासून देशाची जनता त्यांच्याशी प्राणपणाने लढते आहे, हा इतिहास आहे आणि हे सत्य आहे. सर्वच इतिहासतज्ञांनी हे लिहिले आहे. संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी यांच्या पुस्तकातले हेच विधान असत्य असल्याचे मुश्रिफ धडधडीत सांगतात. असे अनेक साक्षात्कार मुश्रिफ यांना झाले आहेत.
हिंदूंमध्ये जातीजातीत, पंथापंथात शुक्लकाष्ट लावून फूट पाडण्याची कारस्थाने हिंदूंना नवी नाहीत. ‘हिंदू अतिरेकी’ हा शब्द रूढ करण्याचा हा प्रयत्न असून, मुश्रिफही हीच खेळी खेळत आहेत. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार केल्याने काही होणार नाही. कोंबडा झाकल्याने सूर्य उगवायचा राहणार नाही. सत्य हे सत्यच असते. अशा माथेफिरू लेखनाने काहीही फरक पडणार नाही. भारतीय जनता आणि मुस्लिम जनताही हे सर्व प्रकार ओळखून आहे. फक्त भारतच नव्हे तर पाकिस्तान्यांनाही याची कल्पना आहे. मुश्रिफ म्हणतात की, भारतातील बहुसंख्य हल्ले मुस्लिम अतिरेक्यांनी केली नसून, हिंदूंंनीच केले आहेत. आपले नशीब केवढे थोर की, सध्या पाकिस्तानात होणारे हल्ले व आफगाणिस्तानात झालेल्या हल्ल्यात हिंदू संघटनांचा हात आहे, असे  मुश्रिफांनी म्हटले नाही. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचा हल्ला असो की ब्रिटनमधील हल्ला, तालिबान व ओसामा बिन लादेनने केलेला नसून, हिंदूंनी केला आहे असे मुश्रिफ म्हणत नाहीत, हेच त्यांचे हिंदूंवर थोर उपकार म्हणावे लागतील. त्यांनी असे म्हटले असते तर अमेरिका मात्र नक्कीच मूर्ख ठरली असती. मुश्रिफांच्या तर्कशास्त्राचा वेगळ्याप्रकारे अभ्यास तर्कशास्त्रज्ञांना करावा लागेल. की मुश्रिफांना नवे तर्कशास्त्र विकसिक करायचे आहे कोणास ठावूक?
१९ व्या शतकातल्या समाजसुधारकांच्या कार्यामुळे हक्कांबद्दल जागरूक झालेल्या बहुजनवर्गाचे लक्ष विचलित करण्यासाठी उच्चवर्णीय हिंदूंनी विशेषत: ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक मुस्लिमांना लक्ष्य बनवले. ही खेळी कमालीची यशस्वी झाल्याचे लक्षात आल्यामुळे पुढच्या शंभर वर्षात याची अनेकदा पुनरावृत्ती घडली, पण गुजरात दंगलीनंतर देशात निर्माण झालेल्या वातावरणामुळे देशात पुन्हा दंगली घडवणे कठीण बनून बसले. त्यामुळे आता वेगळी खेळी खेळणे भाग ठरले. यातूनच मुस्लिम दहशतवादी आहेत, असा प्रचार सुरू झाला. या देशातले बॉम्बस्फोट मुस्लिम घडवीत असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले. हिंदू संघटनांच्या या कारस्थानाला ‘आयबी’ने भरभरून मदत केल्याचा दावाही मुश्रिफ यांनी या पुस्तकात केला आहे. 
मुश्रिफ आणखी पुढे जाऊन म्हणतात की, १९९३ मध्ये झालेला मुंबई बॉम्बस्फोट हा बाबरी ढांचा कोसळल्यानंतर उसळलेल्या जातीय दंगलीचा मुस्लिम माफियांनी घेतलेला सूड होता. १९९८ मध्ये कोईम्बतूर येथे झालेला स्फोटही संघ परिवाराच्या कारवायांमुळेच संतापलेल्या मुस्लिम गुंडांच्या टोळीने घेतलेला सूड होता. या दोन्ही कारवाया दहशतवादी कृत्यात मोडत नाहीत, अशी मखलाशी करताना २००१ मध्ये झालेले कंदहार विमान अपहरण प्रकरण ही देशातली गेल्या काही वर्षांतली एकमेव दहशतवादी घटना असल्याचे मान्य केले आहे. देशात घडलेल्या उर्वरित सर्व बॉम्बस्फोटांतून पाकिस्तान, बांगलादेशासह देशातल्या सर्व कट्टरपंथी मुस्लिम संघटनांना दोषमुक्त ठरवताना या कारवायांत संघ परिवार कसा गुंतला आहे, याचे तथाकथित पुरावे(?) मुश्रिफ यांनी दिले आहेत. पोलीस अधिकारी असे पुरावे देऊ लागल्यावर देशाचे काय होणार? असे पुरावे त्यांना किंवा न्यायालयाला चालतात का, याचा अनुभव त्यांनी आपल्या हयातभराच्या पोलीस सेवेत अनेकवेळा घेतला असेल. यावरून या पुस्तकाचा हेतू काय आहे, हे यावरून पुरेसे उघड होते.
साध्वी प्रज्ञासिंह यांना विनाकारण बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली गुंतवून देशविघातक प्रवृत्तंना हेच साधायचे आहे. ‘सनातन’सारख्या आध्यात्मिक कार्य करणार्‍या संस्था, योगगुरू रामदेवबाबा, आसारामबापू आदींवर खोटे आरोप करून हिंदूंना नीतिभ्रष्ट ठरवण्यात दुसरा कोणता हेतू असणार? साध्वी प्रज्ञासिंह यांचा अमानुष छळ करीत असताना ‘कसाब’ व ‘अफझल गुरू’ मात्र बिर्याणी आणि तंदुरीचा यथेच्छ आस्वाद घेत आहेत. एका पोलीस अधिकार्‍याने मडगाव स्फोटात हिंदू संघटनांचा संबंध नसावा असे म्हटले आहे. जवळ जवळ वर्ष झाले तरी पोलिसांना पुरावे का सापडत नाहीत? मुळातच तथ्यहीन आरोप करून विनाकारण हिंदूंना छळल्याने सत्य थोडेच झाकले जाणार आहे? खोटे आरोप केल्याने हिंदू संघटनांविरुद्ध पुरावे असण्याचे किंवा सापडण्याचे कारणच नाही. आकाश पाताळ एक केले तरी नसलेल्या गोष्टी सापडणार नाहीत. हिंदू अतिरेकी ही संकल्पना रुजवून स्वत:चे उखळ पांढरे करण्याचे हे प्रयत्न असून, ही सर्व कारस्थाने याच षड्‌यंत्राचे भाग आहेत.
या पुस्तकातून जातीयवादी प्रसार केला जात असल्याने या पुस्तकावर त्वरित बंदी घालण्यात यावी, अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे. हिंदू अथवा मुस्लिम दहशतवाद असे म्हणून मुश्रिफ यांनी समाजातील तेढ वाढवण्याचा प्रयत्न पुस्तकाद्वारे केला असल्याचे अनेक संघटनांनी म्हटले आहे.
 दहशतवादी हल्ल्यात पोलीस अधिकार्‍यांना आलेले वीरमरण हा अतिशय संवेदनशील मुद्दा असून, त्याचे विश्‍लेषण करताना धार्मिक दृष्टिकोन ठेवणे चुकीचे आहे. केंद्रीय गुप्तचर संस्था हिंदुत्ववादी मानसिकतेखाली काम करीत असल्याचे मुश्रिफ यांचे संशोधन चुकीचे आहे, इतकेच नव्हे तर प्रसारमाध्यमांवरही हिंदुत्ववादी विचारांच्या व्यक्तींचा पगडा आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमे योग्य वार्तांकन करू शकत नाहीत, असा आरोप मुश्रिफ यांनी पुस्तकात केला आहे, तो अत्यंत हास्यास्पद व चुकीचा आहे. हिंदूंच्या बाजूने प्रसारमाध्यमे कधीच लिहीत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा यावर अनेकदा पत्रकारांशी व प्रसारमाध्यमांशी संघर्ष झाला आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या विकृत विचार प्रसवणार्‍या लेखकांवर व लिखाणांवर शासन कारवाई करण्याची शक्यताही कमीच आहे. सामान्य जनता मात्र हा व असे खेळ ओळखून आहे.

0 comments:

Post a Comment