गुरु तेग बहादुर सिंह बलिदान दिन

२४ नोव्हेंबर : गुरु तेग बहादुर सिंह बलिदान दिन
•अमर पुराणिक•
शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादुर सिंह यांचा आज बलिदान दिन. हिंदू धर्म, मानवी मूल्ये व तत्त्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती गुरु तेगबहादूर सिंह यांनी दिली.
धरम हेत साका जिनि कीआ
सीस दीआ पर सिरड न दीआ|
धर्मरक्षणासाठी, शीलासाठी आपले शिर तोडून देऊ, पण धर्म भ्रष्ट होऊ देणार नाही, असाच काहीसा या काव्याचा अर्थ आहे. गुरु तेगबहादुर यांचे बलिदान केवळ धर्म पालनासाठीच नसून समस्त मानवाच्या सांस्कृतिक तत्त्वांसाठी होते. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान हे साहसिक आणि संपूर्ण मानवजातीला अंतर्मुख करणारे होते.
गुरु तेग बहादूर सिंहजी धार्मिक प्रचारासाठी आपल्या अनुयायांसह विविध ठिकाणी यात्रा करत असत. त्या काळात काश्मिरी पंडितांना औरंगजेबाच्या जुलमी सत्तेने हैराण करुन सोडले होते. छळ-कपटाची परिसीमा गाठली होती. ते काश्मिरी पंडित गुरु तेगबहादूर यांना शरण गेले. गुरु तेगबहादुरांनी औरंगजेबाला निरोप पाठवून ‘आधी तेगबहादूरांना मुसलमान कर, मग सगळे काश्मिरी पंडित मुसलमान होतील’, असे कळविले. यानंतर औरंगजेबाच्या फौजेने गुरु तेगबहादूरांना अटक केली आणि दगलबाजीने त्यांचा दिल्लीतील चांदणी चौकात जाहीर शिरच्छेद करविला. ह्या घटनेला उद्देशून गुरु तेगबहादुरांचे चिरंजीव आणि शीख धर्माचे संवर्धक गुरु गोविंदसिंह यांनी ‘सीस दिया पर सिर्र न दिया’ असे उद्गार काढले. धर्मासाठी या थोर वीरपुरुषाने बलिदान केले आणि शीख संप्रदायात नवचैतन्य निर्माण झाले.
आततायी मोघल शासकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याचे दमन करु पाहणार्‍या नितीविरुद्ध गुरु तेगबहादुरजी यांचे बलिदान ही एक अभूतपूर्व ऐतिहासिक घटना होती. तेग बहादुरांच्या निर्भय आचरण, धार्मिक निष्ठा आणि नैतिक उदारतेचे हे उच्चतम उदाहरण आहे. हिंदू धर्म व वैचारिक स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे ते एक क्रांतिकारी युगपुरुष होते. अशा हुतात्मा गुरुस विनम्र अभिवादन!

0 comments:

Post a Comment