APPA JALGAONKAR

महाराष्ट्राची संवादिनी झाली अबोल
संवादिनीशी स्वरसंवाद साधणारे अप्पा जळगांवकर
•अमर पुराणिक
स्वर आणि स्वरसंवादाचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अनन्य साधारण महत्त्व आहे. संवादिनी अर्थात हार्मोनियम हे ख्याल, ठुमरी, दादरा आदी गायनशैलींच्या साथीचे वाद्य. अशा संवादिनीशी स्वरसंवाद साधणारी व्यक्ती म्हणजे कै. अप्पा जळगांवकर. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हा स्वरसंवाद संपल्यासारखे वाटते. अप्पांनी अनेक दिग्गज गायकांना संवादिनीवर साथ करीत त्या गायकांच्या गाण्याला चार चॉंद लावले. अशा या स्वरांच्या गाढ्या अभ्यासकाच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.अप्पा जळगांवकरांचा जन्म जालन्यातील जळगाव या गावी ४ एप्रिल १९२२ रोजी झाला. त्यांचे बालपणही जालन्यातच गेले. ६२ वर्षांपूर्वी ते पुण्यात आले आणि पुण्यातच स्थाईक झालेे. मुंबई आणि पुणे ही अप्पांच्या आवडीची गावं. संगीत क्षेत्राला अनुकूल अशीच ही दोन्ही गावं असल्याने अप्पांचा जीव येथेच रमला, सात स्वरांची साथ, संगत आणि अभ्यास याशिवाय अप्पांना कधी करमलेच नाही!पुण्यात आल्यावर आप्पांची ओळख संगीत क्षेत्रातील दिग्गजांशी झाली. अप्पा जळगांवकरांनी उस्ताद बडे गुलाम अली खॉं, पंडित कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, जसराज, रोशनआरा बेगम, माणिक वर्मा, किशोरी आमोणकर, गंगुबाई हनगळपासून ते आताच्या पिढीतील पं. मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ, राहुल देशपांडे अशा दिग्गज गायकांना अप्पांनी संवादिनीची सुरेल साथ केली होती. पंडित भीमसेन जोशींच्या बहुतांशी मैफलीत ते आपल्या बहारदार हार्मोनियम वादनाने सप्तरंग भरतहोते. किंबहुना अप्पा जळगांवकरांनी भीमसेन जोशींच्या मैफली रंगविल्या म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही. गायन, वादन आणि नृत्याच्या कार्यक्रमात साथसंगत करण्याबरोबरच सोलोवादन हेही त्यांच्या वादनाचे खास वैशिष्ट्य होते.मुळात अप्पांची आवड म्हणजे धृपद गायकी. धृपद गायकीच्या मैफलीमध्ये त्यांचे मन रमायचे, पण कर्मधर्म संयोगाने अप्पा संवादिनीवादन करू लागले. त्यांनी बाळकृष्ण चिखलेकर आणि उस्ताद छब्बू खॉं यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले, पण संवादिनी वादनाचे कोणाकडून प्रशिक्षण घेतले नाही. एकलव्याप्रमाणे कठोर रियाज करीत संवादिनी वादनात त्यांनी प्राविण्य प्राप्त केले. अशा स्थितीतच अप्पांनी संवादिनीवादनात स्वतःचे असे अढळ स्थान प्रस्थापित केले. संवादिनी वादनाचे क्षेत्र म्हटल्यानंतर सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल ते संवादिनी वादनाचे अध्वर्यु गोविंदराव टेबे यांचे. गोविंदरावांच्या पश्‍चात या क्षेत्रात काही मोजक्या कलावंतांनीच आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले. यात गोविंदराव पटवर्धन, अप्पा जळगांवकर, तुळशीदास बोरकर, पं. ज्ञानप्रकाश घोष, पुरुषोत्तम वालावलकर, महंमद ढोलपुरी, संजय चक्रवर्ती, ज्योती गुहा अशी काही थोडीच नावे नजरेसमोर येतात.
संवादिनीवादन हे मुळात गायनाला साथ करणारे वाद्य असल्याने संवादिनी वादकालाही अर्थातच दुय्यम स्थान आहे. त्यामुळे संवादिनी वादकांच्या वादनकौशल्याकडे पाहिले जात नाही. किंबहुना साथसंगत करण्याचा पहिला नियम हा की, साथ करताना आपण ज्या गायक, वादकाला साथ करीत असतो, त्याला ओव्हरटेक करता कामा नये, हाच यातला कायदा आहे. गायक, वादकांना साथ करीत स्वत: संवादिनीने स्वत:च आनंदाने कायम दुय्यमत्व स्वीकारले. जसे संवादिनीने दुय्यमत्व स्वीकारले तसेच संवादिनी वादकांनीही स्वीकारले आणि तेही आनंदाने. अप्पा जळगांवकरांनीही आपल्या वादनात साथसंगतीचा हा उसूल कटाक्षाने पाळला. किंबहुना अप्पांनी साथ संगत करता करताच आपले वेगळेपण व वैशिष्ट्य सिद्ध केले. साथसंगत करीतच आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविणे तसे अवघडच, पण अप्पांनी हे लीलया करून दाखविले. अप्पा जसे स्वभावाने शांत व संयमी, तसे त्यांचे वादनही संथ व संयमी होते.प्रत्येक घराण्याच्या गायकीची पद्धत वेगळी, प्रत्येक गायकाची गायनशैली वेगळी. कोणत्याही कलाकाराच्या व घराण्याच्या शैलीच्या अनुषंगाने अप्पा साथ करीत असत. आपली जोड त्यात ते कधीही देत नव्हते. कुमार गंधर्वांच्या चपल, परिपूर्ण गायकीला पोषक अशी साथ अप्पा करीत. कुमारांची गायकी म्हणजे विजेसारखी होती. उसळत आरोहण करणार्‍या व कोसळल्याप्रमाणे अवरोहण करणार्‍या कुमारांच्या तानांना अप्पा साजेशी साथ करीत असत. जसराजांच्या सौम्य गायकीला तशीच सौम्य साथ करीत. पं. प्रभुदेव सरदारांच्या जयपूर घराण्याच्या बलपेचांच्या आक्रमक, वक्र व अवघड गायकीलाही ते सुंदर साथ करीत. जयपूर घराण्याचे वैशिष्ट्य असलेल्या पं. प्रभुदेव सरदारांच्या गमकयुक्त तानांनाही ते तशीच साथ करीत होते. त्याचप्रमाणे पं. वसंतराव देशपांडे यांच्या भेंडीबाजार घराण्याच्या खंडमेरू पद्धतीच्या गायकीलाही अप्पा त्याच ताकदीने साथ करायचे. पं. भीमसेन जोशींच्या गायकीलाही त्यांच्या किराना गायकीला अनुसरूनच साथ करीत होते. प्रसिद्ध शास्त्रीय नर्तिका रोहिणी भाटे यांच्याही बर्‍याच कार्यक्रमांत अप्पांनी साथ केली. अप्पा कदाचित याचमुळे गायक, वादकांना प्रिय होते. अप्पांचा लेहर्‍याचा हात ही अप्रतिम होता आणि लयीवरहीप्रभुत्व होते, परंतु सोलोवादनात मात्र ते आपल्या वादनाचे कौशल्य दाखवीत असत. शुद्ध स्वर, कोमल, तीव्र स्वरांप्रमाणेच मींड, सुत, गमक आदी प्रकार स्वच्छ व स्पष्टपणे अप्पाच्या संवादिनीतून निघत होते. प्रत्येक रागाच्या रागांगाचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकटीकरण हे ही अप्पांच्या वादनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अप्पा कलाकार म्हणून जेवढे मोठे होते, तेवढेच माणूस म्हणूनही मोठे होते. प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रवर्ग फार मोठा होता. अप्पांच्या मित्रवर्गाप्रमाणेच त्यांचा शिष्यवर्गही फार मोठा आहे. त्यांनी अनेक संवादिनीवादक तयार केले. तसेच नव्या ख्याल गायकांपैकी बर्‍याच जणांना अप्पांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मोठ्या शिष्यगणांत मुकुंद फडकरी, राहुल देशपांडे ही काही नावाजलेली नावे आहेत. पं. कुमार गंधर्व यांचे चिरंजीव, गुणी व सुप्रसिद्ध गायक पंं. मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ हे अप्पा जळगांवकरांचे जावई होत. अप्पांच्या पत्नी शालिनीताई जळगांवकर यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते.
गेली ४० ते ५० वर्षे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी, आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमी यांसारख्या ख्यातनाम संस्थांनी पुरस्कार देऊन अप्पा जळगांवकर यांचा यथोचित गौरव केला आहे. तसेच ‘स्वरविभूषण’ आणि ’स्वर-लय-ताल रत्न पुरस्कारा’नेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शासनाने मात्र अप्पा जळगांवकरांसारख्या दिग्गजाकडे दुर्लक्ष केले आहे. अप्पांनी भारतात जवळ जवळ सर्व ठिकाणी आपली कला सादर केली आहे, तसेच अमेरिका, युरोप, श्रीलंका, बांगला देश असे अनेक परदेश दौरेही त्यांनी केले होते. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफिती, कॉम्पॅक्ट डिस्क देखील प्रकाशित झालेल्या आहेत. अप्पा जळगांवकरांसारख्या ज्ञानी व गुणी कलावंताच्या जाण्याने हिंदुस्थानी संगीताचे अतोनात नुकसान झाले आहे! अप्पांसारख्या कलावंतांनी आपल्या प्रतिभेने, अभ्यासाने व कष्टाने संगीत क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. आता अप्पांच्या जाण्याने ही पोकळी भरून येेणे अशक्य आहे. आता ‘तानसेनां’ना अप्पांची साथ मिळणार नाही, ‘कानसेनां’ना अप्पांची साथही ऐकता येणार नाही अन् लेहराही ऐकता येणार नाही!
दै. तरुण भारत, सोलापूर. २० सप्टेंबर ०९

0 comments:

Post a Comment