This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
प्रशांत देशपांडे
सरहद को प्रणाम हा कार्यक्रम देशाच्या आजच्या नवीन  पीढीला देशाची  भूसीमा किती आहे, तेथील भागात राहणार्‍यांचे जीवन. परिवारासोबत परिचय व्हावा तेथील पर्यावरण व सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करावा आपल्या ज्ञानात भर पडावी ‘देश रक्षा धर्म हमारा देश रक्षा कर्म हमारा’ हा मंत्र जपत आपण एक चांगले नागरिक आहोत या नात्याने सीमावासीयांच्या समस्या, जीवनमान समोर याव्यात या समस्यांचे निराकरण व्हावे, असा प्रयत्न करावयाचा हा उद्देश ‘सरहद को प्रणाम’ या कार्यक्रमाचा आहे.
‘सरहद को प्रणाम’ २०१२ राष्ट्र जागरणाचा हा आगळा वेगळा कार्यक्रम. यात देशातील भूदलीय सीमा एकूण १५१०६.७ किमी आहे. या ठिकाणी देशातील प्रत्येक जिल्ह्यातील एक युवकांचे गट तयार करून १९ ते २३ नोव्हेंबर २०१२ या कालावधीत सीमेवरती जाऊन सैनिक व तेथील स्थानिक प्रशासन नागरिकांशी संवाद साधला हा कार्यक्रम फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी  (ऋखछड) या संस्थेने आयोजित केला याद्वारे सीमावरती भागातील जंगली प्रदेश वाळवंट काही ठिकाणी बर्फ तर काही ठिकाणी दुथडी भरून वाहणार्‍या नद्या याचा अनुभव घेतला. विविधतेने नटलेल्या भूभागातील पशू, पक्षी, जलचर, प्राणी यांच्या प्रजाती समजवून घेणे. सीमेवरील नागरिकांशी चर्चा करणे, तेथील रस्ते, वीज, पाणी आदी गोष्टींचा अभ्यास सीमेवरती कर्त्यव्य बजावत असणार्‍या सैनिकांचा अनुभव जाणून घेणे ‘कमी बोलणे, जास्त ऐकणे व समजवून घेणे’  अशा पद्धतीने सीमावरती भागातील नागरिक व सैनिक यांच्याशी संवाद साधणे हा उद्देश होता. आपल्या मातृभूमीची सीमा पाहण्याचा आगळावेगळा अनुभव घेऊन घरी परतले. हा अनुभव अविस्मरणीय असा आहे.
देशाची एक इंच जमिनीचा तुकडा न पडता आणि देशाची अखंडता कायम राखावी यासाठी सरकारला सावधान करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून युवक सहभागी झाले होते. देशामध्ये चारही बाजूंनी वाढत राहणारी घुसखोरी, आंतकवाद, नक्षलवादी आणि शास्त्रांची होणारी तस्करी या वर बंदी घालावी. सरकार आणि स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून ग्राम सुरक्षा समिती स्थापन करावी व त्यांना प्रशिक्षण द्यावे आणि तेथील लष्कर आणि पोलीस यांना आधुनिक शस्त्रे आणि प्रशिक्षण द्यावे हा मुख्य उद्देश.
या कार्यक्रमासाठी सोलापुरातून युवराज माळगे, अहमद शेख, संतोष तोनशाळ, भालचंद्र शेेजवलकर, विश्‍वनाथ बागलकोटी, समर्थ बंडे आणि मी प्रशांत देशपांडे असे ७ युवक सहभागी झालो होतो. येथून पुणे मार्गे कलकत्ता ते न्यू अलीफरद्वारला १९ नोव्हेंबर २०१२ सकाळी पोहचलो तेथे केरळ, पंजाब, महाराष्ट्र, उत्तरबंग, कोलकत्ता येथून मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले. तेथे ६० जणांचेप्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १९ व २० नोव्हेंबर २०१२ दोन दिवस शिबीर झाले. त्यानंतर १८,१८, १८ चे ३ गट करण्यात आले. ३ वेगवेगळ्या ठिकाणी कुमारग्राम, बीरपाडा, जयगाव या ठिकाणी हे गट रवाना झाले. तेथूनच खर्‍या अर्थाने खर्‍या कार्यक्रमास सुरुवात झाली. २० नोव्हेंबर २०१२ सुरुवात झाली. घराघरात दुकानात, वाडी, वस्ती वरती जाऊन सोबत तिरंगा व तेथील नागरिकांना रक्षा सूत्र बांधून तेथील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारत आणि भूतान सीमेवरती जाऊन आम्ही भारताच्या सीमेवर असलेल्या मातीस व दगडावर सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर येथून चंद्रभागा नदीतील पाण्याचा अभिषेक केला. पहिल्या दिवशी २५ किमी. अंतर पार करून संध्याकाळी बीरपीडा येथे पोहोचलो. २२ नोव्हेंबर २०१२ बीरपाडा ते मलकापाडा तेथून भूतान चौकीपर्यंत १७ किमी चालत जात नागरिकांशी संवाद साधला. तेथे असलेल्या त्रुटींचा फायदा घेऊन धर्मांतर करावयाचा इतर देशांचा प्रयत्न सुरू आहे, असे तेथील अनेक नागरिकांनी सांगितले. आणि भूतान देश महिन्याला १०० मीटर भारताच्या दिशेने सरकत आहे असे तीन महिन्यांत ३०० मीटर पुढे सरकत असताना तेथील एक कालीमातेचे मंदिर हस्तगत केले. गेल्या महिन्यात तेथे सीमा दर्शविणारा पोल नव्हता पण या महिन्यात पोल होता. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ३ ते ४  किलोमीटर चालत जावे लागते. किंवा खाजगी बस ट्रक यांच्यातून प्रवास करावा लागतो. तेथील लष्कर जे आहे ते भूतान मधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे, असे तेथील नागरिकांनी आर्वजून सांगितले. भूतान सरकारकडून सीमावर्ती नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते. ज्यास पैसे मोजून अल्प पाणी भूतान सरकारकडून मिळते. तेथे आमच्या १०० युवक, युवतींची मानवी साखळी तयार करण्यात आली. याचा आमच्या शहरात, जिल्ह्यात, गावात, वाडीवस्तीवर अनुभव कथन करणार आहोत.
एकूण सीमा - २२,६२३,३० घच
एकूण सागरी सीमा - ७५१६.६ घच
एकूण भूदलीय सीमा- १५,१०६,७० घच
एकूण सीमा
भूतान ६६९ घच
मानयम्यार १,६४३ घच
नेपाळ १,७५१ घच
अफगाणिस्तान १०६ घच
पाकिस्तान ३,३२३ घच
तिबेट ३,४८८ घच
बांगलादेश ४,०९६.७० घच
आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी गेलो तेथे पाऊस असतो. वर्षातून आठ महिने पाऊस असतो, पण तेथील नद्यांना पाणीच नसते. फक्त पावसाळ्यातच पाणी असते. पावसाळ्यात इतके पाणी असते की, अलीकडील गावाचा आणि पलीकडील गावाचा संपर्क तुटतो. जर व्यापार व्यवहार किंवा इतर कोणत्याही गोष्टीचे काम ठप्प होते. आता हिवाळा सुरू आहे. म्हणून तेथील सर्व नद्या कोरड्या ठणठणीत असतात. तेथे हिमालय असल्यामुळे त्या डोंगराभोवती खूप दाटीवाटीने झाडी, झुडपे आहेत. त्यामुळे थंडीचे प्रमाण खूप असते. या पेक्षाही जानेवारी महिन्यात थंडीचे प्रमाण वाढते. प्रशासनाकडे ‘पावसाळ्यात’ पाणी वाचवा पाणी अडवा’ हा उपक्रम आहे, पण अमलात अजूनही आणला गेला नाही. तेथील नागरिकांना सांगितले पाणी आणायाला १० ते ३० किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावे लागते. मी जेव्हा तेथील एका गृहस्थाला विचारले, ‘तुम्ही पिण्याचे पाणी कोठून आणता?’ तो म्हणाला, ‘कधी कधी १० ते ३० किमी चालत किंवा सायकलवर जाऊन पाणी आणावे लागते.’ आणि कधीतर भूतान सरकारकडून  पाणी आणावे लागते तेही महिन्याकाठी एक हजार ते सतराशे रु. मोबदला देऊन पाणी आणावे लागते. तेथील एका माणसाने सांगितले की, तेही आता पाणी देण्याचे बंद करणार असल्याचे सांगितले. तेथील मुख्य व्यवसाय शेती आहे. तेथे जास्त प्रमाणात चहाचे मळे जास्त आहेत. पण पाण्याची व जंगली हत्तींची व हिंस्त्र प्राण्याची संख्या जास्त असल्याने पुढील काही काळात चहाचे मळे नष्ट होण्याची भीती वाटते. भूतानच्या सीमेवरील तेथील सरकार सिमेंटचा कारखाना उभा करणार असल्याने तेथे धुळीचे साम्रज्य असल्याने चहाच्या पिकाचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असे तेथील नागरिकांनी सांगितले. ज्या ठिकाणी भूतानची चौकी आहे, त्या भागातील जवळपास ५ ते ६ किमी भाग जो भारतात येतो तेथे चहाचे मळे होते, पण भूतान सरकारने जबरदस्तीने काढण्यास सांगितले, पण  ते न काढल्याने त्यांनी स्वत: काढून टाकले. तेथे  जंगल जास्त असल्याने व पहाडी क्षेत्र असल्याने जळाऊ लाकूड किंवा घर बांधण्यासाठी लागणारे वासे यांची आयत निर्यात केली जाते. तेथे जास्त करून सिमेंटचे मोठमोठे दगड मिळतात मोठमोठ्या नद्या असल्याने व वर्षातून ३ ते ४ महिने नदी कोरडी असल्याने वाळू उपसाचे प्रमाण जास्त आहे. तेथे पशुपालन जास्त प्रमाणात करतात. कारण तेथे त्यांना खायला व त्यांचे पालनपोषण करण्यास चांगले वातावरण व परिस्थिती आहे आणि तेथील सर्व प्राणी देशी आहेत.  तेथील लोक गाय, म्हैस, शेळी, मेंढी इत्यादी प्राणी पाळतात. जंगली हत्तीचे प्रमाण जास्त असल्याने तेथील शेतीचे व इतर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आम्ही जेथे गेलो तेथील एक शिक्षक भेटले. त्यांना विचारले इथे शाळा कुठे आहे, तर त्यांनी असे उत्तर दिले की, चार गाव मिळून एक शाळा आहे आणि तेथे छोटी छोटी गाव बरीच आहेत. शाळेत विद्यार्थी येतात, पण शिक्षकांची कमतरता आहे. मग आम्ही तेथील एका शाळेस भेट दिली तेथील शिक्षकांनी सांगितले १५० विद्यार्थ्यांसाठी ३ शिक्षक आहेत. सीमावर्ती भागात घुरवा आणि आदिवासी जमात राहत असल्यामुळे यांची मातृभाषा हिंदी आहे, पण शैक्षणिक अभ्यासक्रम बंगाली आणि इंग्रजी माध्यमातून शिकवले जात असल्याने त्यांना समजण्यास कठीण जात आहे. तेथे हिंदी माध्यमातील शिक्षकांची कमतरता भासत आहे.
वर्षातून सहा महिने पाऊस पडत असल्याने शाळा बंद असतात. शाळा दूर असल्याने जाण्यासाठी व घरी परतण्यासाठी सरकारी व खाजगी व शाळेची बसची व्यवस्था नाही. त्यामुळे मिळेल त्या वाहनातून प्रवास करावा लागतो असे तेथील पालकांनी सांगितले. फक्त आठवीपर्यंत शिकण्याची सोय असल्याने पुढचे शिक्षण घेण्यासाठी एखादे शहर किंवा तालुकालेवलच गाव शोधावे लागते आणि तेथे जाऊन शिक्षण घ्यावे लागते. तेथे  काही ठिकाणी रुग्णालय आहेत, पण डॉक्टर कधी येतात व जातात ते त्यांनाच माहिती आहे. काही ठिकाणी दवाखानेच नाहीच. सरकारी दवाखाने आहेत, पण डॉक्टर नाही. बिजली आहे, तीही काही निवडक घरामध्येच. तेथील राजकीय पुढार्‍यांना जे पाठिंबा देतात त्यांच्याच घरात लाईट आहे. तेथील रस्त्यांची स्थिती इतकी खराब आहे की खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे ते कळतच नाही. तेथील पाणी प्यायला चांगले आहे. पण पाण्याची कमतरता असल्याने पाणी जपून वापरावे लागते. तेथील पिण्याच्या पाण्याचे माध्यम विहीर, बोर, हपसा आहे. सरकारी हपसा आहे, पण मशनरी बसवली नाही. पाण्यासाठीही वणवण हिंडावे लागते. रोजगाराचे साधन आहे, पण मोबदला कमी मिळतो. एका मजदुराने  सांगितले आम्ही दोघे दिवसभर काम केल्यावर तेव्हाकुठे शंभर रुपये मिळतात तेच भूतानमध्ये रोजगारासाठी जावे लागते तेथेही भेदभाव सहन करावा लागतो. सामाजिकता तेथे जपतात. एकत्र येऊन कार्यक्रम करतात तेथील लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्कच नाही. आम्ही गोलो तर ते लोक घाबरून घरात जात होते. सुरक्षेचा प्रश्‍न तर फार मोठा आहे. भारत कुठे सुरू होतो आणि भूतान कुठे सुरुवात होते तेच कळत नाही.
माझ्या मित्रांनी सांगितले त्यांची जेथे भोजनाची व्यवस्था केली आहे ते हॉटेल भारतात आहे आणि तेथील पायर्‍या भूतानमध्ये आहेत. तेथील साधू आपल्या भारतात येऊ शकतात, पण आपले भगवे वस्त्र परिधान केलेले साधू लोक तेथे जाऊ शकत नाहीत. तेथे एक कालीमातेचे मंदिर आहे. भूतान सरकारने आपल्या ताब्यात घेऊन तेथील साधूला हाकलले व परत न्याय मिळवायला गेल्यास मारून पाठवले. महिन्याला शंभर मीटर पुढे सरकत असल्याचे आम्ही स्वतः तीन पोल पाहिले. आमच्या व्यवस्थाप्रमुखांचे नाव अलोक रॉय होते. त्यांनी सांगितले, ‘मी महिन्याअगोदर आलो होतो, तर पोल नव्हता, पण आम्ही गेल्यावर पोल होता तेथे कोणत्याही प्रकारचे कुंपण नाही. तेथील महत्त्वाचे पदार्थ भात,  डाळ, मांसाहार आणि सब्जी.
रविवार, दि. ०९ डिसेंबर २०१२

डॉ. मनमोहन वैद्य
अखिल भारतीय प्रचारप्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
घुसखोर म्हटलं की आपल्या मनात सीमेपलीकडून आपली सुरक्षा व्यवस्था भेदून आपल्या देशात घुसणारी परदेशी माणसंच येतात. त्यांच्यामुळे निर्माण होणार्‍या राष्ट्रीय सुरक्षा, देशांतर्गत कायदा व्यवस्था, रोजगार, सामाजिक तणाव आदी देशाला भेडसावणारे प्रश्न डोळ्यांपुढे येतात. ही भौतिक  पातळीवरील घुसखोरी झाली; व त्याचा योग्य बंदोबस्त करायला हवा व आपली सीमा सुरक्षा दले आपल्या परीने त्यासाठी प्रयत्न देखील करीत असतात.
परंतु घुसखोरीचा विचार असा केवळ भौतिक पातळीवरच करून चालणार नाही. आपल्या राष्ट्रजीवनात, सामाजिक जीवनात, पारिवारिक जीवनात, मानसिकतेत अनेक विदेशी संकल्पनांनी, विचारांनी, व्यवस्थांनी ठाण मांडले आहे. आपले मनोविश्व, भावविश्व या अभारतीय कल्पनांनी असे व्यापून टाकले आहे की या घुसखोरांना हद्दपार करणार्‍यांना राष्ट्रविरोधी, सांप्रदायिक म्हणून हिणविले जात आहे अथवा प्रगतिविरोधी, प्रतिगामी, संकुचित म्हणून त्यांची अवहेलना केली जात असताना दिसत आहे. असे का व कधीपासून घडत गेले याचा साकल्याने विचार केला, तर ही घुसखोरी आपल्या राष्ट्रीयत्वाच्या आधारावरच, तसेच राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेच्या गाभ्यावर घाला आहे, असे लक्षात येते. आपल्याला स्वराज्य मिळाले तेव्हापासूनच आपण दिशाभ्रमित होऊन गोंधळलो आहोत, भरकटलो आहोत, असे आढळून येते.
सर्वप्रथम आजच्या आपल्या राष्ट्रीय व सामाजिक जीवनात एका शब्दाने बराच धुमाकूळ माजविला आहे. तो शब्द आहे ‘सेक्युलॅरिज्म.’ हा उपरा शब्द आपल्या देशात घुसवून प्रतिष्ठित केला गेला आहे. त्याचा नेमका अर्थ काय, याची घटनेत देखील व्याख्या केली नाहीय. १९७६ साली देशात आणिबाणी असताना, सर्व लोकशाही प्रक्रिया ठप्प झाली असताना, संसदेत विरोधी पक्षच अनुपस्थित असताना (कारण विरोधी पक्षांचे बहुतांश नेते तुरुंगात होते व जे तुरुंगात नव्हते ते भूमिगत होते) हा शब्द घटनेत जोडण्यात आला. सेक्युलॅरिज्म अथवा सेक्युलर या शब्दाचे मूळ युरोपात एका ऐतिहासिक पृष्ठभूमीत आहे. भारताचा तसा इतिहास नाहीय् आणि सर्व उपासनापंथांना समान दृष्टीने बघणे अथवा समान अधिकार अथवा संधी असणे, असा त्याचा अर्थ गृहीत धरला, तर हिदूंची तशी परंपराच राहिली आहे. भारत हिंदूबहुल देश असल्यामुळेच, घटना बनविताना १९५० सालापासूनच सर्व उपासनापंथांना समान अधिकार अथवा संधीचा त्यात समावेश होताच. इतकेच नव्हे, तर अल्पसंख्य म्हणविणार्‍या उपासनापंथांच्या अनुयायांना बहुसंख्य हिदू समाजाला नाहीत असे काही विशेष अधिकार घटनेने दिले आहेत. असे असताना ‘सेक्युलर’ शब्द घटनेत जोडण्याची काय आवश्यकता होती? आणि आज समाजात काय चित्र दिसत आहे? तर सेक्युलॅरिज्मच्या नावाखाली घोर सांप्रदायिकता व फुटीरतावादाला पोषण व प्रोत्साहन सर्रास दिले जात आहे व याला विरोध करणार्‍याला सांप्रदायिक म्हणून हिणविले व बदनाम केले जात आहे.
स्वातंत्र्यासाठी लढा सुरू असताना १९३१ साली कॉंग्रेसने नेमलेल्या ध्वजसमितीचा जो प्रस्ताव आहे, त्याच्यावरून एक गोष्ट अधिक स्पष्ट होते. १९२० साली लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर कॉंग्रेसचे नेतृत्व महात्मा गांधींकडे आले. त्यांच्या मनात हिंदू-मुस्लिम एकी निर्माण करावी व दिसावी असे खूप होते. म्हणूनच खिलाफत आंदोलनाला, अनेक राष्ट्रवादी मुसलमानांचा विरोध असताना देखील, त्यांनी कॉंग्रेसला पाठिंबा घोषितकेला. त्याच काळात, १९२१ साली महात्मा गांधींच्या सूचनेवरून आंध्रप्रदेशच्या व्यंकय्या नामक कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्याने हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला लाल व हिरवा रंग असलेला एक ध्वज महात्मा गांधींना करून दिला. गांधीजींनी इसाई-पारसी आदी समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यात पांढरा रंग जोडण्याची सूचना केली. त्यावरून वर पांढरा, मध्ये हिरवा व त्याखाली लाल असा सर्वांच्या एकतेचे प्रतीक असलेला पहिला तिरंगा ध्वज, त्यावर निळ्या रंगात चरखा असा ध्वज प्रचलित झाला. पुढे १९२९ साली शीख बांधवांनी राष्ट्रीय ध्वजाच्या या संकल्पनेलाच विरोध केला. त्यांचे म्हणणे होते की, वेगवेगळ्या संप्रदायांचा वेगवेगळा विचार करून त्यांच्यात एकी साधण्याचा विचारच सांप्रदायिक (कम्युनल) आहे. म्हणून सर्वांमधील एकतेचा भाव पुष्ट करणारा राष्ट्रीय ध्वज असला पाहिजे आणि तुम्हाला असा सांप्रदायिक ‘कम्युनल’ ध्वजच ठेवायचा असेल, तर आमच्या समाजाचा पिवळा रंग त्यात जोडण्यात यावा. हा अत्यंत मूलभूत असा आक्षेप होता.
पुढे १९३० च्या सत्याग्रहानंतर १९३१ साली यावर विचार करण्यासाठी सात सदस्यीय ध्वज समिती नियुक्त करण्यात आली. त्यात पं. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, मास्टर तारासिंह, काका कालेलकर, डॉ. हर्डीकर व पट्टाभिसीतारामय्या होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून प्रचलित ध्वजासाठी ज्या ज्या सूचना व आक्षेप आलेत, त्यांचे प्रमुखत: दोन गट होते. हा ध्वज बदलावा असे म्हणणार्‍यांचा मुख्य आक्षेप होता की वेगवेगळ्या समुदायांचा वेगळा विचार करून त्यांच्यात एकी दाखविण्याचा हा विचारच सांप्रदायिक ‘कम्युनल’ आहे. म्हणून आपला ध्वज राष्ट्रीय असावा. त्याशिवाय वर्तमान प्रचलित ध्वज बल्गेरिया व पर्शिया या देशांच्या ध्वजांशी मिळता-जुळता आहे. आपला ध्वज वैशिष्ट्‌यपूर्ण- ‘डिस्टिंक्ट’ असावा.
ध्वज हाच ठेवावा, असे म्हणणारा दुसरा गट होता. त्यांचे प्रतिपादन होते की, दहा वर्षे हा ध्वज प्रचलित आहे, जनमानसात प्रतिष्ठित आहे म्हणून हाच सुरू ठेवावा. या गटाचे आणखी एक म्हणणे होते की ह्या तीन रंगांचा जो सांप्रदायिक भाव जनमानसात रुजला आहे, त्याच्या ऐवजी वेगळा भावात्मक भाव त्याग, समृद्धी, शांती असा आहे, असे आपण लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करू. यावर ध्वज समितीने असा युक्तिवाद केला जो प्रस्तावात नमूद केला आहे की, लोकांना एक ध्वज मिळाला म्हणून त्यांनी तो स्वीकारला व दुसरा मिळाल्यासते तो देखील स्वीकारतील; आणि आपण या रंगांचे भावात्मक संदर्भ कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी जे सांप्रदायिक संदर्भ जनमानसात रुजले आहेत, ते तसेच राहतील. असे म्हणून ध्वज समितीने जो प्रस्ताव एकमताने दिला त्यातील पहिली दोन वाक्ये विशेष महत्त्वाची आहेत. त्यात ते म्हणतात-
१) असे ठरविण्यात आले की, आपला राष्ट्रीय ध्वज कलात्मक वैशिष्ठ्यपुर्ण व असांप्रदायिक असावा.
२) असे सर्वानुमते ठरविण्यात आले की, तो एकाच रंगाचा असावा. आणि असा एक रंग जो सर्व रंगांमध्ये वैशिष्ट्‌यपूर्ण आहे, जो सर्व भारतीयांना समानरूपे स्वीकार्य आहे  आणि जो भारताच्या प्राचीन इतिहासासोबत प्रदीर्घ परंपरेने जोडला गेला आहे तर तो आहे भगवा अथवा केशरी. म्हणून भगव्या रंगाचा आयताकृती ध्वज ज्यावर निळ्या रंगाचा चरखा रेखांकित असेल, असा भारताचा राष्ट्रध्वज असावा. यातील महत्त्वाची बाब अशी आहे की, वेगवेगळ्या संप्रदायांचा वेगवेगळा विचार करणे याला ध्वजसमितीने सांप्रदायिक म्हंटले आहे व सर्वांना जोडणारा समान दुवा शोधून त्यावर भर देण्याच्या वृत्तीला राष्ट्रीय असे मानले आहे व या अर्थाने भगव्या रंगाला त्यांनी असे मुद्दाम म्हणून राष्ट्रीय ध्वज भगव्या रंगाचा असावा, असे सर्वानुमते सुचविले आहे.
परंतु स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांहून अधिक काळ गेल्यानंतर चित्र एकदम बदललेले दिसतेय. त्या काळी जे सांप्रदायिक म्हणून नाकारले गेले, ते आज सेक्युलर बनून शेखी मिरवीत आहे व जे तेव्हा राष्ट्रीय होते ते आज कम्युनल म्हणून हिणविले जात आहे. त्या काळी भगवा रंग, वंदे मातरम्, रामराज्याची कल्पना, गौरक्षा आदी विषय राष्ट्रीय होते, ते आज सांप्रदायिक (कम्युनल) ठरविले जात आहेत.
१८९३ साली शिकागो येथील आपल्या व्याख्यानात स्वामी विवेकानंदांनी भारताची एक ओळख ‘मदर ऑफ ऑल रिलिजन्स’ अशी करून देऊन, सार्‍या जगातील पीडित व प्रताडित लोकांना देखील भारतात हिंदू परंपरेमुळेच सन्मानपूर्वक आपल्या उपासनापंथाचे मुक्त अनुसरण करण्याचे अगाध स्वातंत्र्य मिळाले होते, असा गौरवपूर्ण उल्लेख आहे. ते उदार हिंदुत्व आज सांप्रदायिक ठरवून खर्‍या सांप्रदायिक विचारांना सेक्युलर या नावाखाली प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न सर्रास होताना दिसत आहे. म्हणूनच देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्यकांचा (म्हणजेच मुसलमानांचा) पहिला अधिकार आहे, असा घोर सांप्रदायिक विचार आपले पंतप्रधान बिनदिक्कतपणे मांडताना दिसतात किवा उच्च व सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा नाकारून देखील, घटनासंमत नसून देखील सांप्रदायिक आधारावर आरक्षण देण्याची निर्लज्ज भाषा काही पक्षांचे नेते करताना दिसत आहेत.
हे सर्व सेक्युलर शब्दाच्या घटनेतील घुसखोरीमुळे सर्रास सुरू आहे. या अभारतीय संकल्पनेला, राष्ट्रविरोधी व फुटीरतावाद जोपासणार्‍या वृत्तीला हद्दपार करण्याची आवश्यकता आहे.

दुसरी घुसखोरी...
दुसरी घुसखोरी शिक्षणाच्या क्षेत्रात झालेली आहे. आधुनिक भारताचा पाया ज्या शिक्षणावर आधारित आहे, त्या शिक्षणाचा गाभा आणि उद्देश यात बदल होण्याची गरज आहे. आजचं आपलं शिक्षण केवळ पोटार्थी, उपजीविकेसाठी अर्थार्जन मिळविण्याशी निगडित झालं आहे. उदारनिर्वाहासाठी अर्थार्जन आवश्यक आहेच व अधिक आरामदायक जीवन जगण्यासाठी अधिक अर्थार्जनाची इच्छा असणे, त्यासाठी प्रयत्न करणे ते देखील ठीक आहे; परंतु अर्थार्जन हे जीवनाचे साधन आहे, ते चांगले असणे उत्तमच आहे, पण जीवनाचे साध्य काय आहे? त्याचा पत्ताच नाहीय. एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी साधन म्हणून वाहन आवश्यक आहे. ते अधिकाधिक आरामदायक असण्याची इच्छा असण्यातही काहीच वावगे नाही. परंतु ते वाहन घेऊन जायचं कुठे आहे, तेच माहिती नसल्यास काय उपयोग? पण सध्या तर जीवनाचे साधनच साध्य बनत चालले आहे व नुसती साध्यहीन धावाधाव सुरू असलेली दिसते.
अधिक शिक्षण, उच्चशिक्षण याचा केवळ कमाईशी असलेल्या संबंधामुळेच सगळा घोळ झाला आहे. अधिक शिक्षित व्यक्ती अधिक भौतिकवादी, उपभोगवादी  व आत्मकेंद्रित, स्वार्थी बनत असलेली दिसते. शिक्षणासंबंधी विचार करण्यासाठी स्वतंत्र भारतात जेवढे आयोग नेमले गेले, त्या सर्वांनी नैतिक शिक्षणाच्या अभावावर बोट ठेवून त्या दृष्टीने काही उपाय सुचविले. शिक्षणासंबंधी आयोजित कोठारी आयोगाने देखील सुचविले आहे की, नैतिक व आध्यात्मिक विकासासाठी विद्यार्थ्यांना धर्माचे शिक्षण दिले पाहिजे. धार्मिक शिक्षणाचा अर्थच नैतिक शिक्षण आहे. परंतु सेक्युलॅरिज्मच्या नावाखाली धार्मिक व नैतिक बाबींना फाटा दिल्यामुळे आपण जैसे थे आहोत. स्वतंत्र भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा विचार करताना आपला देश, त्याचा प्राचीन सांस्कृतिक वारसा, जीवनदृष्टी, त्यानुसार संस्कारांची योजना याचा विचार न केल्याने गोंधळ वाढला आहे. आधुनिकतेच्या नावाखाली पश्चिमीकरणाचा चाललेला प्रयत्न, त्यांचे उधार घेतलेले जीवनाचे तत्त्वज्ञान याचा पुरस्कार केल्यामुळे नैतिकतेचे उच्चाटन होऊन भौतिकवाद, आत्मकेंद्री वृत्ती व समाजाच्या प्रश्नांबद्दल अनास्था यांची घुसखोरी या क्षेत्रातील पवित्रता नासविते आहे. शिक्षणाचा मूळ उद्देशच आपण गमावून बसलो आहोत. भरकटलेपणा हा इतर क्षेत्रांप्रमाणे ह्या क्षेत्रालाही शाप ठरला आहे.

घुसखोरी तीन...
शहरांचा विकास म्हणजे भारताचा विकास, असे समीकरण बनल्यामुळे शहरकेंद्रित विकासाचा आराखडा व खरा भारत जेथे वसतो ती खेडी उपेक्षित, असे आजचे चित्र आहे. खरे तर ज्या ठिकाणी खरी संपत्ती म्हणजे अन्न निर्माण केले जाते, ती गावे ओस पडत आहेत व कागदी संपत्ती निर्माण करणार्‍यांचे महत्त्व वाढत चालले आहे. मंगेश पाडगावकर म्हणतात... पिकवी कुणी न काही विकतात मात्र सारे वाहून भार ह्यांचा शरमून जाय माती खेड्यात राहण्यात प्रतिष्ठा, संपन्नता, शिक्षण, आरोग्य, व्यापार, शुद्ध पाणी व सुचारू दळणवळण असेल, असे चित्र पुढे ठेवून भारताच्या विकासाची योजना तयार झाली असती, तर भारत, भारत राहिला असता. सहा लाख खेड्यांमध्ये वसलेला भारत हे भारताचे बलस्थान होते. खेडी स्वयंपूर्ण होती, म्हणून अनेक परकीय शासक येऊन देखील भारत परत उभा झाला. राष्ट्रीय अस्मिता कायम राहिली. आता भारतातील इंडिया वाढत आहे, फोफावत आहे. भारत ओस पडत चालला आहे. गरीब होत चालला आहे. ही जी अभारतीय विकासाची गंगा उलट्या दिशेने वाहत आहे, त्याची दिशा बदलविण्याची आवश्यकता आहे.

घुसखोरी चार...
समाजातील जीवनाच्या श्रेष्ठत्वाच्या आपल्या कल्पनाही बदलल्या आहेत. चारित्र्य आणि प्रतिष्ठा यांची फारकात झालेली दिसते. धनवान असणे म्हणजे प्रतिष्ठित व चारित्र्यवान अशी कल्पना रूढ होत आहे. धनवान असणार्‍यांनी ते धन कुठल्याही मार्गाने गोळा केलेले असो, तरी ते प्रतिष्ठित ठरतात. जीवनमूल्यांचा निकषच कुचकामी झालेला दिसत आहे.
सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. एस. के. चक्रवर्ती यांच्या मते एखाद्याचा जीवनस्तर उच्च आहे, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा सर्वसाधारणपणे तो किती महाग जीवन जगत आहे, असाच अर्थ अभिप्रेत असतो. त्याला खरेतर पैसाच नाहीतर नैसर्गिक स्रोतही वापरण्याचा स्तर अधिक आहे असे म्हटले पाहिजे आणि जीवनाचा स्तर हा त्याचे जीवन कसे मूल्याधिष्ठित त्यावर ठरवायला हवे.
अमृतलाल वेगड नावाचे नर्मदा परिक्रमेचे साधक, उत्तम चित्रकार व लेखक आहेत. ते अगदी लहान असताना चित्रकला शिकण्यासाठी शांतिनिकेतन येथे प्रसिद्ध चित्रकार श्री नंदलाल बोस यांच्याकडे गेले. अनेक वर्षे अध्ययन केल्यानंतर अध्ययन पूर्ण करून परत जाण्याआधी आपले गुरू नंदलाल बोस यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पाया पडले. तेव्हा नंदलाल बोस यांनी आपल्या शिष्याला आशीर्वाद काय दिला असेल? ते म्हणाले, ‘‘बेटा तुझं जीवन सफल न होवो.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘जगात सफल होणारे पुष्कळ आहेत. त्यांची कमतरता नाहीय. रोज त्यांची नावे वर्तमानपत्रातून छापून येत असतात. तू आपलं जीवन सार्थक कर.’’
जीवन सार्थक करण्याचे मर्म सांगताना अमृतलाल वेगड म्हणतात की, जेव्हा मी समाजाकडून कमी घेतो किवा कमी मिळण्याची अपेक्षा ठेवतो आणि समाजाला अधिक देण्याचा प्रयत्न करतो, हे जीवन सार्थक करण्याचे मर्म आहे.
विवेकानंद केंद्राच्या प्रार्थनेत एक श्लोक आहे-
जीवने यावदादानम् स्यात् प्रदानम् ततोऽधिकम् |
इत्येषा प्रार्थनाऽस्माकम् भगवन् परिपूर्यताम् |
अर्थ- जीवनात समाजाकडून मला जेवढं मिळाले त्याहून अधिक मी समाजाला देईन, ही आमची प्रार्थना हे भगवन्, तू पूर्ण कर.
आपल्या येथे जो अधिक त्याग करतो, तो श्रेष्ठ अशी धारणा होती. ‘त्येन त्यक्तेन भुञ्जीथा’ हे सूत्र जीवनाचा आधार असल्यामुळे त्यागाधारित जीवनाचा गौरव, असे मूल्य समाजात प्रतिष्ठित होते.
आपण बरेचदा दुहेरी निष्ठांचे बळी ठरत आहोत. अशी मूल्ये बाळगणार्‍यांना आपण व्यक्तिगत जीवनात महत्त्व देतो, परंतु सार्वजनिक जीवनात उपभोगवादी व धनवंतांचाच उदो उदो होताना दिसतो. या दोगलेपणाला हद्दपार करणे आवश्यक आहे. 

घुसखोरी पाचवी...
आपल्या समाजातील अधिकांश व्यवस्था  राजसत्ताकेंद्रित झाल्यामुळे राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे समाजात प्रस्थ वाढत चालले आहे. सत्ताधार्‍यांनी पण आम्हीच सर्व करू, सत्ताच सर्व करेल असे भासविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समाजाचे राजसत्तेवरील अवलंबित्व वाढत चालले. विनोबा भावे म्हणतात की, समाज जेवढा राजसत्तेवर अवलंबित होतो, तेवढाच तो अकर्मण्य बनतो व परिणामी दुर्बल होतो. आपल्या येथे हजारो वर्षांपासून राजसत्तेचे महत्त्व मान्य करून देखील त्याचे वर्चस्व समाजात सीमित होते. त्यामुळेच समाजाचे सर्वस्व राजसत्तेच्या ताब्यात कधीच नव्हते. समाजाने राजसत्तेहून स्वतंत्र अशा आपल्या व्यवस्था निर्माण केल्या होत्या. परंतु आता स्थिती बदलली आहे. कल्याणकारी राज्य ही भारतीय परंपरेतील रचना नाही, असे कविवर्य रवींद्रनाथ टागोर म्हणतात. त्या काळी बंगालमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असताना मायबाप सरकारकडे लोकांनी धाव घेतली. त्यावर टीका करताना रवींद्रनाथ म्हणतात की, चहा व दारूची तृष्णा भारतीय समाजात ब्रिटिश सरकारने निर्माण केली. त्या तृष्णेचे शमन करण्याची व्यवस्था ब्रिटिश सरकार करो. परंतु पाण्याची तहान आम्हाला युगानुयुगांपासून राहिली आहे. ती शमविण्याची आमच्याकडे व्यवस्था होती. त्यासाठी सरकारपुढे हात किवा पदर पसरविण्याची काय गरज आहे? शिक्षा, स्वास्थ्य, जल, अन्न, न्याय आदी व्यवस्था समाजाच्या स्वतंत्र होत्या. त्या अधिकतर राज्याच्या कक्षेच्या बाहेर होत्या. त्या गरजांची पूर्ती करण्याची समाजाची आपली स्वत:ची व्यवस्था होती. भारतीय समाज स्वयंपूर्ण व स्वयंसिद्ध होता, स्वावलंबी होता म्हणून रवीन्द्रनाथ टागोर म्हणतात की, भारताला राजनायकापेक्षा समाजनायकाची अधिक आवश्यकता आहे. हा समाजनायक कसा असावा व कसा निवडावा याचे वर्णन देखील त्यांनी ‘स्वदेशी समाज’ नामक आपल्या निबंधात केले आहे.
कंपनी, संघटना अथवा समाजाची खरी शक्ती एककेन्द्रित सत्ता असण्यापेक्षा बहुकेन्द्रित सत्ता रचना असण्यात असते असा विषय मांडणारे एक पुस्तक नुकतेच वाचनातआले. स्फायडर म्हणजे कोळी. त्याला असंख्य पाय असतात व त्यातील ५-७ पाय मोडले, तरी त्या कोळ्याचे फारसे बिघडत नाही. त्याचे सर्व क्रियाकलाप सुरूच असतात. परंतु त्याची सर्व प्राणशक्ती ज्या त्याच्या छोट्याशा डोक्यात एकवटली असते, ते डोके एकदा चिरडले गेले की तो कोळी संपतोच. असे काही कंपन्यांचे, संघटनांचे व समाजाचे पण असते. एकच सत्ताकेन्द्र असते व ते एकदा नेस्तनाबूत झाले की ती कंपनी, संघटना किवा समाज नष्ट होतो. परंतु स्टारफिश हा असा एक मासा आहे की त्याची प्राणशक्ती त्याच्या शरीरात एकाच ठिकाणी एकवटली नसते, तर अनेक ठिकाणी विखुरली असते. म्हणून त्या माशाचे कसेही व कितीही तुकडे केले तरी तो मरत तर नाहीच, उलट त्याचे जेवढे दोन अथवा तीन तुकडे झाले असतील तर त्यातून परत तितकेच नवे मासे तयार होतात. हे पटवून देताना त्या पुस्तकात एक घटनाक्रम दिला आहे. लॅटिन अमेरिकेतील मूळ रहिवाशांच्या जीवनाचा गाढा अभ्यास असलेले एका टॉम नेविन नामक अभ्यासकाने ही गोष्ट नमूद केली आहे. सोळाव्या शतकात स्पेन येथील लोकांच्या अनेक तुकड्या शस्त्रास्त्र घेऊन सोने मिळविण्यासाठी (कमावण्यासाठी नव्हे मिळविण्यासाठी- बाहेर पडले. त्यातील एक तुकडी १५१९ साली लॅटिन अमेरिकेतील ऍझटेक नामक जमातीच्या प्रदेशात पोहोचली. तेथील मोठी शहरे, रुंद रस्ते, पाण्याचे कालवे, विशाल मंदिर, ६० हजार लोक खरेदी-विक्री करू शकतील अशी बाजारपेठ व सर्व स्पॅनिश सेना राहू शकेल एवढा मोठा त्यांच्या प्रमुखाचा महाल बघून ते चकितच झाले. त्यांनी त्यांच्या प्रमुखाच्या डोक्याशी बंदूक धरून त्याला ठणकावले, सर्व सोने आमच्या स्वाधीन कर नाही तर तू प्राणाला मुकशील. मॉंटेझुमा या त्यांच्या नेत्याला असे जबरदस्तीने लुबाडणारे लोक पहिल्यांदा भेटले होते. त्याने आपले प्राण वाचविण्यासाठी सर्व सोने देऊन टाकले. स्पॅनिश लोकांनी सोने तर घेतलेच आणि नंतर त्या नेत्याला देखील मारून टाकले. दोन वर्षांतच १५२१ मध्ये ऍझटेक साम्राज्य व सभ्यता नष्ट झाली. असाच इतिहास इंकाज नामक जमातीचा आहे. १९३२ मध्ये स्पॅनिश लोकांनी इंकाजच्या अटाहुआल्पा नामक नेत्याला पकडून ठार केले. त्याची सर्व संपत्ती लुटली. १५३४ पर्यंत इंकाज साम्राज्य व सभ्यता नष्ट झाली.
असे हे निर्बाधपणे सुरूच राहिले व अमेरिका खंडावर स्पॅनिश लोकांचे अधिपत्य झाले. अशाच विजयाच्या उन्मादात त्यांची गाठ १६८० मधे अपाची नामक मूळ अमेरिकन जमातीशी पडली. अन्यांच्या तुलनेत हे लोक अधिक गरीब व मागासलेले दिसले. त्यांना स्पेनच्या लोकांनी कॅथॉलिक इसाई बनवून शेतीच्या कामात मजुरी करायला लावले. परंतु त्यांचा नेता परास्त झाल्यावर देखील अधिकांश लोकांनी त्यांना विरोध केला, युद्ध केले व जे जे स्पॅनिश दिसले ते ते, ते नष्ट करीत गेले. त्या शताब्दीच्या अखेरीपर्यंत तेथील स्पॅनिश अधिपत्य नष्ट झाले आणि त्यांच्या पराक्रमामुळे, पुरुषार्थामुळे पुढील दोनशे वर्षे ते स्पॅनिश आक्रमणाला थोपवू शकले.
हे सांगताना टॉम नेविन म्हणतो की, असे का घडले? अपाची लोकांपाशी ऍझटेक किवा इंकाज यांच्यापेक्षा अधिक चांगली सेना अथवा शस्त्रास्त्रे नव्हती किवा स्पॅनिश सैन्यही आधीपेक्षा कमजोर झाले नव्हते. तर मग काय कारण होते? तर नेविन म्हणतो की, ‘अपाची’ समाज वेगळ्या प्रकारे संघटित होता त्याचे शक्तीकेंद्र अथवा प्राणशक्ती एकाच ठिकाणी केन्द्रित नव्हती. ती संपूर्ण समाजात विखुरली होती, विकेन्द्रित होती. ते असंघटित नव्हते, तर वेगळ्या प्रकारे संघटित होते. त्यांचे नियम होते, परंपरा होत्या पण त्या सत्ताधार्‍यांकडून लादल्या जात नव्हत्या. त्यांचे अनेक आदर्श समाजात होते. त्यांना बघून समाज त्याचे अनुसरण करीत असे. त्यांच्याकडे सत्ताधीशांपेक्षा अधिक प्रभावी आध्यात्मिक-सांस्कृतिक नेतृत्व होते. त्यांना नँतन म्हणत. हे नँतन समाजाकडून कमीत कमी घेऊन समाजासाठी जगत असत. त्यांच्याकडे बघून तो समाज आपले आचरण ठरवायचा. असा नँतन एक नसून अनेक होते, समाजात विखुरले होते. ते समाजासोबत राहत असत. त्यांचे पूर्ण जीवनच समाजासमोर पारदर्शी काचेसारखे होते. ते लोकांना तुम्ही असे करा, असा उपदेश करीत नसत. ते फक्त जे योग्य आहे ते करू लागत व समाज त्यांचे अनुकरण व अनुसरण करीत असे. या समाजशक्तीपुढे स्पॅनिश सेना हारली. समाजशक्तीचा हा प्रताप होता.
ही गोष्ट इतकी खुलासेवार सांगण्याचे कारण एवढेच की, राजकीय सत्तेचे समाजातील वर्चस्व कमी करून राजकीय सत्तेच्या हाती समाजाचे सर्वस्व असण्याच्या अभारतीय संकल्पनेला हद्दपार करून स्वावलंबी, स्वयंसिद्ध, स्वयंपूर्ण समाजरचना व व्यवस्था नव्याने प्रतिष्ठित करण्याची आवश्यकता आहे.

घुसखोरी सहा...
राजसत्ताकेन्द्रित समाजरचना जशी नसावी तसेच सत्तेचे केन्द्रीकरण देखील अयोग्यच. सत्ता विकेन्द्रित न राहता एककेन्द्री असली की भ्रष्टाचार व अत्याचाराची संभावना वाढते. आधी गावाचे निर्णय गावच करीत असे. आता दिल्ली किवा मुंबईत निर्णय होत असल्याचे परिणाम आपण भोगतच आहोत. माझ्या एका परिचिताने आपल्या गावी मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून शाळा काढण्याचा निर्णय घेतला, तर त्याच्या परवानगीसाठी त्याला मुंबईला खूप खेटे घालावे लागले. शेवटी परवानगी मिळाली नाही ती नाहीच. गावाच्या प्राथमिक गरजांसाठी गाव स्वावलंबी का असू नये? आधी गाव स्वावलंबी होते. त्यामुळे गावात एकोपा होता, सुबत्ता होती, शांती होती, गाव सबळ होते. आता सगळी सत्ता, शक्ती, ऊर्जा व पैसा (अर्थ) देशाच्या व राज्याच्या राजधानीत एकवटले आहेत. ही व्यवस्था बदलवून अधिकाधिक अधिकारांचे विकेंद्रीकरण करणारी, तरीही देशाची एकता एकसंध ठेवणारी नवी व्यवस्था आणण्याचा विचार करायला हवा.

घुसखोरी सात....
भारताचा गाभाच आध्यात्मिक असल्यामुळे आपल्या येथे जीवन हा एक यज्ञ होता; उत्सव होता. आज त्याचे बाजारीकरण होत चालले आहे व या बाजारीकरणाने समाजाची जीवनमूल्येच बदलून टाकली आहेत. भौतिकतावाद आणि उपभोगावर आधारित विकासाच्या संकल्पनेला हुरळून आम्ही या बाजारीकरणाची घुसखोरी मान्य केली. पूर्वी श्रेष्ठ जीवनपद्धती, संस्कृती असलेला संपन्न देश म्हणून भारताकडे जग आकर्षित होत असे. आता एक मोठी बाजारपेठ म्हणून आकर्षण वाढत आहे. या देशाचे नागरिक ‘ग्राहक’ आहेत. त्यांना काय हवं, काय नको ते बाजार ठरवू लागला आहे. आधी गरज पाहून वस्तूंचे उत्पादन करण्यात येत होते. मागणीनुसार पुरवठा करण्याचा प्रयत्न असायचा. आता माणसाच्या गरजा उत्पादक ठरवीत आहेत व त्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून गरज निर्माण करण्यात येत आहे. ‘युवर प्राईड अँड नेबर्स एन्वी’ अशा जाहिराती करून आपले पायाभूत संस्कार मिटविले जात आहेत. पैसा आणि पैसा हाच एकमेव उद्देश राहिला आहे. क्रयशक्ती वाढावी यासाठी कर्ज दिले जात आहे. मागणी वाढावी यासाठी जाहिरातबाजी वाढली आहे. या सर्वांसाठी होणारा अधिक व्यय ग्राहकाकडून वसूल करून वरून नफाही कमविला जात आहे. उपभोगाची वासना जागवून उपभोगासाठी पैसा व पैशासाठी पिसाट धावणे. त्यात आपण आपला आत्मा, आनंद, समाधान, सुख सारेच गमावून बसत आहोत.
भारतीय संस्कृती उपभोगवादी नसून अध्यात्मवादी आहे. येथील विचार सांगतो की, प्रत्येकातच ईश्वराचा अंश आहे व हे देवत्व प्रकट करून मुक्तीचा आनंद घेणे हे मानवजीवनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आपल्या भक्तियोग, ध्यानयोग, ज्ञानयोग, कर्मयोग यातील कोणताही एक किवा अनेक अथवा सर्वांचा उपयोग करून मुक्त व्हा, असे दिशादर्शन आहे. आधुनिक बाजारीकरणात नसत्या गरजा निर्माण करून स्पर्धा, असूया, लोभ, आसक्ती यांचा आधार घेऊन उत्पादनांची अवास्तव मागणी निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे शांती मृगतृष्णेसारखी दूर पळत आहे. म्हणून बाजारीकरणाच्या या अभारतीय व्यवस्थेला हद्दपार करून आपल्या शाश्वत जीवनमूल्यांची जोपासना करणारी आधुनिक, पण आपली व्यवस्था स्थापिली पाहिजे.
या सर्व घुसखोरीतून मुक्त होण्याचा मार्ग दुष्कर वाटला, तरी ते अशक्य मुळीच नाहीय. परंतु त्यासाठी आपला ‘स्व’ जागविला पाहिजे. आपण स्वतंत्र, स्वराज्य, स्वाभिमान असे शब्द सर्रास वापरतो. परंतु यातील ‘स्व’ म्हणजे आम्ही, राष्ट्र म्हणून कोण आहोत, प्राचीन समाज म्हणून आमची ओळख काय याचे समर्पक उत्तर शोधणे आधी आवश्यक आहे. सॅम्युएल हंटिग्टन नावाच्या सुप्रसिद्ध अमेरिकन चितकाचे एक बहुचर्चित पुस्तक आहे ‘हू आर वुई?’ त्यात तो म्हणतो, ‘‘जोपर्यंत समाज म्हणून आम्ही कोण आहोत हे आम्ही ठरवीत नाही, तोपर्यंत राष्ट्र म्हणून आपल्या प्राथमिकता, आपली दिशा आपण ठरवू शकत नाही.’’
जगातील प्रत्येक राष्ट्राला ते कोण आहेत, त्यांची अस्मिता, ओळख, त्यांचे मूळ, त्यांचे पूर्वज कोण आहेत याची स्पष्ट कल्पना आहे. दुर्दैवाने भारतात त्यासंबंधी एकवाक्यता नाही, संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करून आपल्या प्राचीन समाजाच्या एकतेचा आधार ओळखून, आपला ‘स्व’ ओळखून त्याच्या प्रकाशात आपल्या नीतींचा विचार केला, तर आपण या संभ्रमाच्या, आत्मविस्मृतीच्या भोवरयातून बाहेर पडू शकू. एकदा आपला ‘स्व’ जागला व आपण स्वाभिमानाने पेटून उठलो की आपला पुरुषार्थ जागेल व त्याच्या आधारावर आपण या सर्व घुसखोरांना हद्दपार करून, आपल्यावरील सर्व संकटांना नेस्तनाबूत करून परत एकदा पुरुषार्थाने व पराक्रमाने रसरसलेले, संपन्न, समाधानी व आनंदी असे आपले समाजजीवन उभे करू शकू. जीवन जगण्याचा व मनुष्यजन्म सार्थक करण्याचा आपला हा स्वयंसिद्ध आदर्श जगापुढे उभा करून संघर्षाने, स्पर्धेने, असूयेने ग्रस्त, पीडित मानवजातीला चिरशांतीचा, समन्वयाचा, संवादाचा मार्ग दाखविणारा दीपस्तंभ होऊ.
स्वामी विवेकानंदांनी हेच स्वप्न भारतासाठी बघितले होते व हाच आदर्श उभा करण्याचे आवाहन भारतमातेच्या पुत्रांना केले होते. वयं अमृतस्य पुत्रा: असे म्हणून त्यांनी भारतीय समाजाचे सिंहत्व जागविण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त हा ‘स्व’ जागरणाचा, पुरुषार्थ आपण सर्व मिळून प्रगट करू या.
(तरुण भारतच्या सौजन्याने)
 राज्याला स्वावलंबी आणि आर्थिकदृष्टया सक्षम बनविणे हे या सरकारने आपले लक्ष्य ठेवले. भाजपा सरकारने केलेली हीच विकासकामे निवडणूक अजेंडयावर घेऊन भाजपा नेते आणि कार्यकर्ते प्रचाराच्या रणभूमीत उतरले आहेत. ‘मिशन रिपीट’चा नारा देत भाजपाने जनतेच्या मनात स्वतःचे स्थान पक्के करण्याचा प्रयत्न केला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये नवरात्रीचे ढोल वाजण्याच्याही आधी  निवडणुकांचे ढोल वाजू लागले. पितृपंधरवडा संपताच सर्वच उत्सुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी रांगा लावल्या. जागोजागी लागलेल्या बॅनर्स व स्वागत फलकांवरून, सणासुदीच्या दिवसात उत्साहाने व चैतन्याने भारलेल्या या वातावरणाचा निवडणूक प्रचारासाठी फायदा करून घेण्याची चढाओढ दिसू लागली आहे. नवरात्र संपल्यानंतर आणि दिवाळीच्या तोंडावर 4 नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
शुभ्र, उत्तुंग हिमालयाला जवळचे असणारे हे राज्य निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. लोकसंख्या तशी विरळ, म्हणजे 76 लाख इतकी. येथील नागरिक हे विशेषतः शेतकरी, मजूर, बागायतदार अशा वर्गातील. राज्यात भाजपा आणि काँग्रेस हेच प्रमुख पक्ष. त्याशिवाय अनेक छोटे, तसेच प्रादेशिक पक्षही निवडणुकीत आपला कौल अजमावतील. त्यात हिम लोकतांत्रिक पक्ष, हिमाचल विकास काँग्रेस, हिमाचल प्रदेश लोकराज पक्ष, ऑल इंडिया ट्राईब्ज ऍण्ड मायनॉरिटी फ्रंट, जनहित मोर्चा आणि लोकतांत्रिक मोर्चा हिमाचल प्रदेश, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, समाजवादी पक्ष, बसपा व डावे पक्ष यांचा सहभाग असेल. अर्थात येथील जनतेवर आतापर्यंत केवळ भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांचाच प्रभाव आहे. या दोन पक्षांनाच तिने आलटून पालटून सत्ता दिली आहे. 2007 च्या निवडणुकीत काँग्रेसला 68 पैकी 23, तर भाजपाला 41 जागा मिळाल्या होत्या. 4 जागा मिळवणाऱ्या हिमाचल विकास काँग्रेसशी युती करत भाजपा सत्तास्थानी आली होती.
भाजपा सरकारचे मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल यांनी गेल्या 5 वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे ते चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी वर्ग हाच या सरकारच्या केंद्रस्थानी होता. धुमल सरकारने या वर्गाच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या. केवळ निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्यापर्यंतच आपल्या कामाच्या मर्यादा न ठेवता या सरकारने त्याही पुढे जाऊन सर्वसामान्य माणसाचा विकास जलदगतीने करण्यासाठी पावले उचलली. दुर्गम क्षेत्रातही दळणवळणाची साधने सहज उपलब्ध व्हावीत यासाठी त्यांनी राज्यभर ज्याप्रकारे रस्त्यांचे जाळे उभारले आहे, त्यामुळे ‘सडकवाला मुख्यमंत्री’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्याशिवाय सर्व स्तरातील मुलांना शालेय शिक्षण उपलब्ध करून देण्यातही सरकारने यश मिळवले. राज्याला स्वावलंबी आणि आर्थिकदृष्टया सक्षम बनविणे हे या सरकारने आपले लक्ष्य ठेवले. भाजपा सरकारने केलेली हीच विकासकामे निवडणूक अजेंडयावर घेऊन भाजपा नेते आणि कार्यकर्ते प्रचाराच्या रणभूमीत उतरले आहेत. ‘मिशन रिपीट’चा नारा देत भाजपाने जनतेच्या मनात स्वतःचे स्थान पक्के करण्याचा प्रयत्न केला आहे.
याउलट काँग्रेसच्या आमदारांनी मात्र गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत आपल्या तिजोरीत भर घालण्यावरच लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी करणाऱ्या 445 पैकी 33 टक्के उमेदवार कोटयधीश असल्याचे निरीक्षण येथील एका सर्वेक्षण संस्थेने नोंदवले आहे. त्यापैकी पहिल्या क्रमांकावर काँग्रेसचेच नेता बृज बिहारी पटेल असून त्यांची संपत्ती 169 कोटी इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह हे असून त्यांची संपत्ती 33 कोटी इतकी आहे. काँग्रेसच्या बहुतांश आमदारांचा या यादीत समावेश असून 2007मध्ये त्यांची जी संपत्ती होती, त्यात गेल्या 5 वर्षांत मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे या संस्थेने निदर्शनास आणले आहे.
त्याशिवाय राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी कोटयवधी रुपयांचे गैरव्यवहार केल्याचे आरोप भाजपा नेते अरुण जेटली यांनी केले. वीरभद्र यांनी प्राप्तिकर विभागाला चुकीचे विवरण देऊन कोटयवधी रुपयांचा कर चुकवला असल्याचे, तसेच विमा पॉलिसीच्या माध्यमातून पैशांची हेराफेरी केल्याचे जेटली यांनी निदर्शनास आणले. इस्पात नामक स्टील कंपनीने व्हीबीएस या नावावर पैसे जमा केल्याचेही पुरावे त्यांनी लोकांसमोर आणले आहेत. ही एकूण रक्कम सुमारे 2.28 कोटी इतकी असून व्हीबीएस ही वीरभद्र सिंह यांच्या नावाची अद्याक्षरे आहेत, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. त्याशिवाय डीएलएफ कंपनीद्वारे जमिनीचे घोटाळे केल्याचे आरोपही त्यांच्यावर केले गेले होते. या सर्व आरोपांनी वीरभद्र सिंह हे खूपच बिथरले असावेत. सुरुवातीला तर त्यांनी अरुण जेटली यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकण्याची धमकी दिली. आणि नुकतेच एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांनी जेव्हा त्यांना भ्रष्टाचाराविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, तेव्हा ते अधिकच चिडले. तुमचे कॅमेरे फोडून टाकीन, असे म्हणत ते पत्रकारांच्याच अंगावर धावून गेले. आधीच त्यांच्या गैरव्यवहार प्रकारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस गोत्यात आली होती. त्यात वीरभद्र यांच्या या पवित्र्याने काँग्रेस नेते अधिकच चिंताग्रस्त झाले. त्यांनी वीरभद्र यांच्या कृतीबद्दल प्रसारमाध्यमांकडे परस्परच क्षमा मागितली. त्यामुळे वीरभद्र यांनाही नंतर क्षमायाचना करावी लागली.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी निवडणूक रणधुमाळीचा रंग अधिकच गडद करत आहेत. नुकतेच सोनिया गांधी यांनीही निवडणूक प्रचारासाठी हिमाचल प्रदेशला भेट दिली आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणारा विकास हा केंद्र सरकारचीच कृपा असल्याचा दावा केला. तसेच भाजपा सरकारविरुध्द येथील ओबीसी समाजाचे मन कलुषित करणारी वक्तव्येही त्यांनी केली. मात्र येथील जनतेने धुमल यांच्या सुशासनाचा अनुभव घेतलेला असल्याने त्यांच्या या आरोपांनी फार काही साध्य होणे कठीणच आहे. दुसरे म्हणजे, संपूर्ण देशच काँग्रेसी नेत्यांच्या भ्रष्टाचारी कारनाम्यांनी आणि संपुआ सरकारच्या महागाई वाढविणाऱ्या आर्थिक धोरणांनी काँग्रेसवर रुष्ट आहे. या निवडणुकीत त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे.
भाजपा आणि काँग्रेस यांच्याबरोबरच अन्य पक्षही निवडणुकीच्या प्रचारात कसून उतरले आहेत. किमान आपल्या सोयीच्या मतदारसंघात तरी आपले अस्तित्व सिध्द करण्याची धडपड सर्वच पक्ष करत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये नव्याने सुरुवात करणाऱ्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत काँग्रेसची साथ नाकारली आहे. नाही म्हणायला हिम लोकतांत्रिक पार्टीने व जनता दलाने समाजवादी पक्ष आणि डावे पक्ष यांच्या बरोबरीने तिसरी आघाडी निर्माण करून हिमाचलच्या जनतेसमोर नवा पर्याय ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण या आघाडीवर लोकांनी विश्वास ठेवावा इतके तिचे कर्तृत्व नाही. त्यामुळे हा पर्याय फुसकाच ठरणार आहे. मात्र मते फोडण्यासाठी हे पक्ष कितपत प्रभावी ठरताहेत, हे निकालानंतरच कळेल.
सध्या तरी भाजपा सरकारच्या सुशासनाला कौल देण्याच्या मनःस्थितीत हिमाचलची जनता दिसत आहे. त्यामुळे ‘मिशन रिपीट’ यशस्वी होण्याचीच शक्यता अधिक दिसत आहे
४ नोहेंबर २०१२
डॉ. मोहनजी भागवत
दर वर्षीप्रमाणे यंदाही नागपूरच्या रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा झाला. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी या वेळी आपल्या भाषणात विजयादशमीच्या पर्वाचे आजच्या काळातील महत्त्व प्रतिपादित केले. तसेच देशातील विविध समस्यांचा परामर्श घेत त्यांनी हिंदू जनतेला जागृतीचे आवाहनही केले. या कार्यक्रमाला आर्ष विद्या गुरुकुलम संस्थेचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मोहनजी यांच्या भाषणाचा अनुवादित सारांश.
 
आजच्या दिवशी आपल्याला स्व. सुदर्शनजी यांच्यासारख्या मार्गदर्शकाची आठवण होते. विजययात्रेत आपल्याला अर्ध्यावर सोडून गेलेल्या वीरांचे स्मरण पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देत असते.
विजयादशमी हे विजयाचे पर्व आहे. दानवतेवर मानवतेच्या, दुष्टतेवर सज्जनतेच्या विजयाच्या रूपात देशभरात ते साजरे केले जाते. विजयाचा संकल्प करून आपल्याच मनात आपल्या दुर्बळ कल्पनांनी आखून घेतलेल्या क्षमतेची आणि पुरुषार्थाची सीमा ओलांडून पराक्रम करण्यासाठी आजचा दिवस उपयुक्त समजला जातो. देशाच्या जनमानसाला याच सीमोल्लंघनाची आवश्यकता आहे. कारण देशात आज द्विधा आणि गोंधळाची परिस्थिती आहे. यातून देशाला बाहेर काढण्यासाठी लोकशक्तीच्या बहुमुखी, सामूहिक उद्यमाची गरज आहे. आपल्यात तशी क्षमता आहे, हे स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या 65 वर्षांच्या काळात आपण अनेकदा सिध्द केलेले आहे. विज्ञान, व्यापार, कला, क्रीडा इ. सर्व क्षेत्रात भारताने आपली गुणवत्ता सिध्द केल्याची वर्तमानातील बरीच उदाहरणे सहज देता येतात. सध्या देशातील जनमानस भविष्याविषयी चिंतित आणि कुठेकुठे निराशही दिसून येते. देशातील आंतरिक व सीमेवरील सुरक्षा याबाबतची परिस्थिती फारशी आशादायक नाही. आपल्या सैन्यदलांना देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली शस्त्रास्त्रे आणि साधने यांचा पुरवठा, सीमेवरील त्यांच्या ठाण्यांवर साधने व अन्य रसद पोहोचविण्यासाठी आवश्यक रस्ते, वाहने व दळणवळणाच्या सोयी यात असणाऱ्या कमतरता तत्परतेने दूर केल्या पाहिजेत. सुरक्षेशी संबंधित सर्व साधनांच्या उत्पादनात आपला देश स्वावलंबी व्हावा, असे धोरण हवे. सुरक्षेशी संबंधित माहिती तंत्रज्ञानात तत्परता, क्षमता व समन्वय यांचा अभाव दूर झाला पाहिजे. आपल्या सीमांचे संरक्षण करण्याची व्यवस्था सुदृढ झाली पाहिजे. सामरिक व्यवस्थापन व संरक्षण व्यवस्था, याचबरोबर आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मुत्सद्देगिरीवरही सीमा सुरक्षा अवलंबून असते. त्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी ‘लूक ईस्ट पॉलिसी’ नावाचा वाक्यप्रयोग उच्च शासकीय अधिकाऱ्यांनी वापरात आणला. भारत आणि आपले राष्ट्रजीवन यांची पायाभूत मूल्ये समान आहेत आणि इतिहासकाळापासून सांस्कृतिक व व्यापारी दृष्टीने देवाणघेवाण करण्याविषयी घनिष्ठ संबंध आहेत, असे दक्षिण-पूर्व आशियातील सर्व देश मानतात. या सर्व देशांशी मैत्रिपूर्ण संबंध वाढविण्याचा सरकारने निश्चय केला आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु ही घोषणा ज्या गतीने वास्तवात येत आहे, ती गती फारशी आशादायक नाही. या क्षेत्रात आपला स्पर्धक बनून चीन संपूर्ण शक्तीनिशी आधीच उतरला आहे, ही गंभीर चिंतेची बाब आहे. चीनने आपले अणुतंत्रज्ञान पाकिस्तानला देण्याइतपत त्याच्याशी मैत्री साधली आहे. नेपाळ, श्रीलंका व ब्रह्मदेश या देशांमध्ये भारतीय वंशाचे लोक बहुसंख्येने आहेत. त्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या परंपरागत स्वाभाविक मित्रदेशांना आपल्या सोबत राखण्याची दृष्टी आपल्या आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रभावी बनली पाहिजे.

जम्मू-काश्मीरच्या समस्येबाबत गेल्या 10 वर्षात अवलंबलेल्या धोरणामुळे तेथे दहशतवादी शक्ती आपले डोके पुन्हा वर काढत आहे. पाकिस्तानच्या ताब्यातून काश्मीर खोऱ्याचा भूभाग मुक्त करणे, जम्मू, लेह-लडाखमधील व खोऱ्यातील प्रशासन व विकास यांचा भेदभाव संपवून उर्वरित भारतासोबत त्यांच्या सात्मिकरणाच्या प्रक्रियेला शीघ्रतेने पूर्णत्वास नेणे; खोऱ्यातून विस्थापित झालेल्या हिंदूंना सन्मानाने पुन्हा तेथे वसविणे; फाळणीच्या वेळी भारतात आलेल्या निर्वासितांना नागरिकत्वाचा अधिकार देणे, इत्यादी न्याय्य अपेक्षांची पूर्तता करण्याऐवजी तेथे आणखी घोळ घालण्याचे कार्य सुरू आहे.

देशाच्या पूर्वेकडील भागाची परिस्थिती पाहता, राष्ट्रीय वृत्तीच्या हिंदूंची लोकसंख्या घटल्यामुळे देशाच्या उत्तर भागात निर्माण झालेल्या समस्यांवरून आपण कोणताही बोध घेतलेला नाही, असेच दिसून येते. आसामच्या आणि बंगालच्या सीमेवरून होणारी घुसखोरी, बनावट नोटांची आणि अमली पदार्थांची तस्करी याबद्दल आम्ही वेळोवेळी इशारे दिले आहेत. देशाच्या गुप्तचर संस्थांनी, न्यायालयांनी आणि राज्यांच्या राज्यपालांनीसुध्दा वेळोवेळी भयसूचक घंटा वाजविलेली आहे. त्याकडे काणाडोळा करून लांगूलचालनाचे धोरण अवलंबल्यामुळे ईशान्य भारतात विक्राळ संकट उभे ठाकले आहे. घुसखोरीमुळे तेथील राष्ट्रवादी प्रवृत्तीची लोकसंख्या घटलेली आहे. व्यापक धर्मांतरामुळे तेथे फुटीरतावादाच्या व दहशतवादाच्या विषवल्लीला सरकारचे बोटचेपे धोरण वारंवार खतपाणी घालत आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन अल कायदासारख्या धर्मांध शक्ती तेथे चंचुप्रवेश करू पाहत आहेत. तेथे आपल्या समर्थ सशस्त्र बलाची उपस्थिती, प्रतिकारासाठी जनतेचे सुदृढ मनोबल हेच सुरक्षेचा आधार आहेत. ईशान्य भारतात व अन्य राज्यांतही शिरलेल्या घुसखोरांना वेळीच ओळखून त्यांची देशातून हकालपट्टी केली पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचा गडबड, गोंधळ होऊ नये यासाठी दक्षता घेतली पाहिजे. राष्ट्रीय नागरिक सूची (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स) योग्य पुराव्यानिशी तयार करायला हवे. परंतु अनुभव असा येतो की देशातून घुसखोरांची हकालपट्टीची कारवाई करण्याचा देखावा जेव्हा शासनाने केला, तेव्हा त्यांच्या पकडीतून बांगला देशी घुसखोर सहीसलामत सुटले; मात्र तेथील गांजलेल्या आणि भारतात येऊन वसलेल्या अनेक निरुपद्रवी व निरपराध हिंदूंची विनाकारण परवड झाली.

परंपरेने हिंदुस्थान म्हणून ओळखला जाणारा भारत हीच जगभरातील हिंदू समाजासाठी पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे, ही गोष्ट सर्वांनी स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे आणि मान्य केली पाहिजे. हिंदूंचा प्रभाव आणि संख्या जेथे घटली, त्या भूभागांची नावे बदलली गेली आहेत. आपल्याच देशातून त्याला हाकलून लावले तर त्याला आश्रय घेण्यासाठी पृथ्वीतलावर दुसरा देश नाही. त्यामुळे अन्य देशांतून निर्वासित होऊन भारतात परतणाऱ्या हिंदूंना विदेशी म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे सिंधमधून असो की बांगला देशातून असो – अत्याचारांनी गांजल्यामुळे नाइलाजाने भारतात आलेल्या निर्वासित हिंदूंना आदराने आणि स्नेहाने स्वीकारले पाहिजे. जगभरातील हिंदूंच्या हितांच्या संरक्षणासाठी शासनाने तत्परतेने अपेक्षित भूमिक पार पाडली पाहिजे.

घुसखोरांना हाकलून लावण्याची कारवाई होते, तेव्हा केवळ ते आपल्या संप्रदायाचे आहेत म्हणून त्यांची पाठराखण करण्याचे वातावरण काही घटकांनी तयार केले आहे. शिक्षणासाठी आणि नोकरी-धंद्यासाठी भारताच्या विविध भागात आलेल्या पूर्वांचलातील बांधवांना धमक्याही देण्यात आल्या आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावरील घटना कुप्रसिध्द आहे. अमर जवान ज्योतीची विटंबना करणाऱ्यांचा अभिमान बाळगणारे घटक देशात अजूनही टिकून आहेत, हा आपल्यासाठी गंभीर इशारा होय. परंतु सत्तास्थानी असलेली आपलीच माणसे देशविरोधी घटकांना थैमान घालण्यास खुली मुभा देण्याचे धोरण राबवीत आहेत, हे दुर्दैवच होय. समाजात राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणे तर दूरच, मतांच्या लोभाने धर्मांधतेला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. आपल्या परमश्रध्देय आचार्यांवर खोटेनाटे आरोप लावून त्यांची मानहानी करण्याचे प्रयत्न झाले आहेत. वनवासी बांधवांची सेवा करणारे स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची भेकडपणे हत्या करण्यात आली. गुन्हेगार अजूनही मोकाट आहेत. हिंदू मंदिरांच्या अधिग्रहित संपत्तीचा अपहार आणि दुरुपयोग होत आहे. हिंदू संतांनी स्थापन केलेले न्यास व तिरुअनंतपुरममधील पद्मनाभ स्वामी मंदिरासारख्या मंदिरांतील संपत्तीविषयी हिंदू समाजातील धारणा, श्रेष्ठ परंपरा आणि संस्कार यांना कलुषित करणारे विषय समाजात जाणूनबुजून पसरवले जात आहेत. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि घटनेचा आदर बाळगण्याचा दावा करणारे लोक मतांच्या लोभापोटी ”या राष्ट्रातील संपत्तीवर अल्पसंख्याकांचाच पहिला हक्क आहे” असे बेधडकपणे सांगून धार्मिक आधारावर आरक्षणाची पाठराखण करीत आहेत.

‘लव्ह जिहाद’च्या आणि धर्मांतराच्या माध्यमातून हिंदू समाजावर छुपे आक्रमण करणाऱ्या प्रवृत्तींशी राजकीय हातमिळवणी केली जात आहे. त्यामुळे आमच्या बाजूने बोलणारे आणि आमचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व या देशात अस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न हिंदू जनतेसमोर उभा ठाकला आहे. हिंदुत्व आणि हिंदुस्थान यांचे नामोनिशाण मिटवून टाकणाऱ्या एकाधिकारवादी, भौतिकवादी व धर्मांध शक्ती आणि आपले केंद्र व राज्य सरकारे यांमध्ये ठाण मांडून बसलेली मतलोलुप, संधिसाधू प्रवृत्ती यांच्या अभद्र युतीला मदत पुरवली जात आहे.

श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या परिसरातील विस्तृत जमीन ताब्यात घेऊन तेथे मोठी इमारत उभी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कानावर येते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशा गोष्टी करून समाजाच्या भावनांशी खेळ केला तर धार्मिक सौहार्दाची भावना धोक्यात येईल. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 30 सप्टेंबर 2010 रोजी दिलेल्या निर्णयानुसार, रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासाला तेथे भव्य मंदिर उभारण्याची परवानगी देण्यासाठी संसदेने लवकरात लवकर कायदा करावा आणि अयोध्येच्या सांस्कृतिक सीमेच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी मुसलमानांसाठी एखादे बांधकाम व्हावे, हाच या विवादात घुसलेल्या राजकारणाला बाहेरचा रस्ता दाखविण्याचा व संतोषजनक आणि सौहार्दपूर्ण मार्गाने प्रश्न सोडविण्याचा एकमेव उपाय आहे.

मोठमोठया विदेशी कंपन्या किरकोळ व्यापार क्षेत्रातही गुंतवणूक करीत आहेत, हा चांगला अनुभव नव्हे. किरकोळ व्यापारात व विमा व निवृत्तिवेतन क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवल्यामुळे आपल्याला लाभ होण्याऐवजी छोटे व्यापारी बेरोजगार होणे, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचा कमी भाव मिळणे आणि ग्राहकांसाठी महागाई वाढणे, हेच परिणाम होणार आहेत. देशाच्या नैसर्गिक संपदेची बेकायदेशीर लूट होणे आणि जैवविविधतेवर आणि निसर्गावर अवलंबून असणाऱ्या लोकांसाठी बेरोजगारीपासून विस्थापनापर्यंत विविध समस्या निर्माण झालेल्या आहेतच. केवळ मूठभर लोकांच्या विकासाला देशाची आर्थिक प्रगती संबोधणे व विकास दर वाढत असल्याची भलामण करणे सुरू होते. पण तो दरही 9 टक्कयांहून 5 टक्कयांवर घसरला आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील विषमतेची दरी अधिकच रुंदावली आहे. यावर मात करण्यासाठी पुरेसा विचार न करता अपक्व कायदे संमत केले जात आहेत आणि त्याउलट निवडणूक पध्दत, करपध्दत, आर्थिक परीक्षण, शैक्षणिक धोरण, माहिती अधिकाराचा कायदा या क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्या जाव्यात, या रास्त मागणीकडे काणाडोळा केला जात आहे. जगात अर्धवट विचारांती ज्या विकास प्रक्रियेची दिशा धरली आहे, तेथे सर्वत्र असेच परिणाम दिसून आलेले आहेत. धनदांडग्या बहुराष्ट्रीय आस्थापनांना अनुकूल धोरण राबवले जात आहे. समग्र व एकात्म दृष्टिकोनाच्या आधारावर आपली क्षमता, आवश्यकता आणि साधनसामग्री यांना अनुरूप व्यवस्थांचे नवीन कालसुसंगत नमुने जोपर्यंत आपण विकसित करणार नाही, तोपर्यंत भारताला सर्वांसाठी फलदायी ठरणारा संतुलित विकास आणि प्रगती साधता येणार नाही; तसेच अपूर्ण विसंवादी जीवनापासून जगाची मुक्तता होणार नाही. देशातील राष्ट्रीय आणि व्यक्तिगत चारित्र्याचा अभाव दिसून येतो. मनाला सुन्न करून टाकणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे सतत उघडकीस येतात. भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा ठोठावणे आणि विदेशात दडवलेला काळा पैसा देशात परत आणणे, यासाठी लहानमोठी आंदोलने केली जात आहेत. पण शील आणि चारित्र्य यांच्या अभावामुळे भ्रष्टाचार फैलावतो, हे ध्यानात घेऊन संघाने चारित्र्यनिर्माणाच्या कार्यावर लक्ष केंद्रित केले आहे. लोकांच्या मनात निराशा आणि देशातील व्यवस्थेविषयी असंतोष न माजवता परिवर्तन घडवून आणावे लागणार आहे. अन्यथा मध्य-पूर्वेतील देशांमध्ये अराजक माजवून धर्मांध आणि विदेशी शक्तींनी आपली पोळी भाजून घेतली होती, तशी शक्यता नाकारता येत नाही. व्यापक चिंतनाच्या आधारावर मूलगामी आणि दूरगामी परिणाम घडवून आणावे लागणार आहेत. जातीय अभिनिवेश, मागास आणि वंचित घटकांचे शोषण, कन्या भ्रूण हत्या, स्वैराचार, मोडकळीस आलेली कुटुंबव्यवस्था, व्यसनाधीनता अशा घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. शाश्वत मूल्यांच्या आधारावर समाजात नवरचना निर्माण करण्यासाठी कालसुसंगत व्यवस्थेचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे राजकारणी, शासन आणि प्रशासन यांच्या डोक्यावर सगळी जबाबदारी टाकून आपण हात झटकू शकत नाही. आपण आपल्या घरापासून समाजापर्यंत स्वच्छता, सुव्यवस्था, स्वयंशिस्त, उचित व्यवहार व शुचिता, संवेदनशीलता इ. सुदृढ राष्ट्रजीवनासाठी आवश्यक व्यावहारिक बाबींचे दर्शन घडवतो का? आपल्या स्वतःच्या जीवनातील दृष्टिकोनाने आणि आचरणानेच सर्व प्रकारच्या परिवर्तनाचा आरंभ होतो, हे विसरून केवळ आंदोलने केल्याने हेतू साध्य होणार नाही.

महात्मा गांधींनी 1922च्या ‘यंग इंडिया’च्या एका अंकात सात सामाजिक पापांचा उल्लेख केला आहे. ती म्हणजे, तत्त्वहीन राजनीती (पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल्स), श्रमाविना संपत्ती (वेल्थ विदाऊट वर्क), विवेकहीन उपभोग (प्लेजर विदाऊट कॉन्शिएन्स), शीलविना ज्ञान (नॉलेज विदाऊट कॅरेक्टर), नीतिशून्य व्यापार (कॉमर्स विदाऊट मोरॅलिटी), मानवता विरहित विज्ञान (सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी) आणि त्यागरहित पूजा (वर्कशिप विदाऊट सॅक्रिफाइस).

आपल्या देशाच्या सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचेच हे वर्णन वाटते. अशा परिस्थितीत समाजातील सज्जनशक्तीलाच समाजात, तसेच समाजाला सोबत घेऊन उद्यम करावे लागते. या आव्हानाचा स्वीकार करून आपल्याला पुढे जावेच लागेल. भारतीय नवोत्थानाच्या ज्या उद््गात्यांकडून प्रेरणा घेऊन महात्मा गांधींसारखे कर्तृत्ववान लोक काम करत होते, त्यांपैकी एक स्वामी विवेकानंद होते. येत्या काही दिवसांपासून स्वामीजींच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम सुरू होईल. आपण त्यांच्या संदेशाचे पालन केले पाहिजे. निर्भयतेने, आत्मसन्मानाने आणि आत्मविश्वासाने शुध्द चारित्र्याची साधना केली पाहिजे. जनता हा जनार्दन मानून तिची निःस्वार्थपणे सेवा करण्यासाठी कठोर परिश्रम करत धर्मप्राण भारताला जागृत करावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सर्व गुणांनी युक्त व्यक्तींच्या निर्मितीचे कार्य करीत आहे. हे कार्य ही काळाची अनिवार्य गरज आहे. आपल्या सर्वांना यात प्रत्यक्ष सहभागी व्हावे लागेल. निरंतर साधना आणि कठोर परिश्रम यांमुळे समाज अभिमंत्रित होऊन संघटित कार्यासाठी तयार होईल, तेव्हा सर्व अडथळयांना भेदत समुद्राच्या दिशेने धावणाऱ्या गंगेप्रमाणे राष्ट्राचा भाग्यसूर्यही उदयाचलाहून शिखराकडे प्रयाण करण्यास सुरुवात करील. म्हणूनच स्वामीजींच्या शब्दात सांगायचे तर ”उठा, जागृत व्हा आणि तोपर्यंत न थांबता परिश्रम करत राहा, जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करत नाही.”
उत्तिष्ठत! जाग्रत! प्राप्यवरान्निबोधत!!
४ नोहेंबर २०१२
भाष्य - मा. गो. वैद्य
गेल्या शनिवारी म्हणजे दि. १५ सप्टेंबर २०१२ ला माजी सरसंघचालक श्री सुदर्शनजी यांचे रायपूरला निधन झाले. कुप्पहळ्ळी सीतारामय्या सुदर्शन असे त्यांचे पूर्ण नाव. ते जन्माने मराठी भाषी असते, तर हेच नाव सुदर्शन सीतारामय्या कुप्पहळ्ळीकर असे झाले असते. त्यांचे मूळ गाव कर्नाटकातील कुपहळ्ळी. सीतारामय्या हे त्यांचे वडील.
सार्थकता आणि धन्यता
दिनांक १८ जून १९३१ हा त्यांचा जन्मदिन आणि १५ सप्टेंबर २०१२ हा त्यांचा मृत्युदिन. म्हणजे वयाची ८१ वर्षे त्यांनी पूर्ण केली होती. त्यामुळे, त्यांचे अकाली निधन झाले असे म्हणता यावयाचे नाही. पण कोण किती जगला, यापेक्षा कसा जगला, हे महत्त्वाचे असते. अनेक महापुरुषांनी फारच लवकर आपली जीवनयात्रा संपविलेली आहे. आद्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्‍वर, स्वामी विवेकानंद ही त्यातली लक्षणीय नावे. एक जुनी लोकोक्ती आहे. जीवनाचे मर्म ती सांगते. ती आहे- ‘‘विना दैन्येन जीवनम्, अनायासेन मरणम्’’ लाचारी न पत्करता जगणे आणि कुणालाही त्रास न देता, अगदी स्वत:ही त्रास न सोसता, मृत्यूला कवटाळणे, यात जीवनाची सार्थकता आहे अणि मृत्यूचीही धन्यता आहे. सुदर्शनजींचे जीवन या जीवनसार्थकतेचे आणि मरणधन्यतेचे उदाहरण आहे.
स्पृहणीय मरण
लाचारी न पत्करता जीवन जगणे, हे बरेचसे आपल्या हाती आहे. आपण ठरवू शकतो की, मी असेच ताठ मानेने जगणार. मग संकटांचे पहाड कोसळले तरी पर्वा नाही. अनेकांनी असे ठरवून जीवन व्यतीत केले आहे. पण मरण? ते थोडेच आपल्या हाती असते? सुदर्शजींनी मात्र असे मरण स्वीकारले की जणू काही त्याला त्यांनी विशिष्ट वेळेला आमंत्रित केले होते! सकाळी पाच-साडेपाचला उठून फिरायला जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता. सुमारे तासभर फिरून आल्यावर ते प्राणायामादि आसने करीत. दिनांक १५ सप्टेंबरलाही ते असेच फिरायला गेले होते. बहुधा ६.३० च्या सुमारास त्यांनी प्राणायामाला आरंभ केला असणार; आणि ६.४० ला त्यांनी मृत्यूला कवटाळले. खरेच, कुणीही अशा मरणाचा हेवा करावा, असे ते अक्षरश: स्पृहणीय होते.
संघशरण जीवन
सुदर्शनजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. ‘प्रचारक’ शब्दाचा अर्थ, इतरांना उलगडून सांगणे कठीण असते, असा माझा अनुभव आहे. मी संघाचा प्रवक्ता असताना, अनेक विदेशी पत्रकार मला त्या शब्दाचा नेमका अर्थ विचारीत. मी तो सांगू शकत नसे. मी वर्णन करी. तो पूर्णकालिक असतो. अविवाहित असतो. त्याला कुठलेच मानधन मिळत नाही; आणि जेथे सांगितले व जे सांगितले, तेथे, ते काम त्याला करावे लागते. असा अर्थ मी सांगीत असे. खरेच ‘प्रचारक’ शब्दाचे एवढे अर्थायाम आहेत. सुदर्शनजी प्रचारक होते. ते सुविद्य होते. सुमारे ५७-५८ वर्षांपूर्वी त्यांनी बी. ई.ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तीही त्या काळी नवीन असलेल्या ‘टेलिकम्युनिकेशन्स’ म्हणजे दूरसंचार या विषयात. चांगल्या पगाराची, चांगल्या सन्मानाची नोकरी, त्यांच्या समोर हात जोडून उभी राहिली असती. पण सुदर्शनजी त्या वाटेने जाणारे नव्हते. ती वाट पकडायची नाही आणि आपले संपूर्ण जीवन संघसमर्पित करावयाचे, हे त्यांनी पूर्वीच ठरविलेले असणार. म्हणून ते ‘प्रचारक’ बनले. संघाच्या दृष्टीने यात काही अप्रूप नाही. आजही संघाचे अनेक प्रचारक उच्च पदवीविभूषित आहेत. अनेक प्रचारक पीएच. डी. आहेत. एक माझ्या माहितीतल्या प्रचारकाचे संशोधन आण्विक रसायनशास्त्राशी संबंधित आहे. एम. बी. ए. आहेत. एमबीबीएस आहेत. बी. ई. व एम्. ई. ही आहेत. मजेची गोष्ट ही आहे की, एवढी महान् अर्हता प्राप्त केलेल्या या मंडळींना आपण काही अद्वितीय अथवा अभूतपूर्व करीत आहोत, असे वाटतही नाही; आणि कुणी सांगितले नाही तर इतरांना ते कळावयाचेही नाही. प्रचारक बनून सुदर्शनजींनी आपल्या जीवनाचा एक मार्ग पत्करला. हा संघशरण जीवनाचा म्हणजेच, समाजशरण जीवनाचा म्हणजेच, राष्ट्रशरण जीवनाचा मार्ग होता. तो जो त्यांनी एका क्षणी स्वीकारला, त्या मार्गावर ते शेवटच्या श्‍वासापर्यंत चालत राहिले.
‘प्रज्ञाप्रवाहा’चे जनक
संघाच्या कार्यपद्धतीची जी काही वैशिष्ट्ये आहेत, त्यात शारीरिक व बौद्धिक या दोन विधांचा अंतर्भाव आहे. सुदर्शनजी दोन्ही विधांमध्ये पारंगत होते. अनेक वर्षेपर्यंत, तृतीय वर्षाच्या संघ शिक्षावर्गांमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. ते अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुखही झाले होते. सरसंघचालक झाल्यानंतरही, ते जेव्हा संघ शिक्षावर्गाच्या मैदानावर उपस्थित राहात, तेव्हा विशिष्ट अवघड प्रयोग स्वत: करून दाखविण्याचा त्यांना संकोच नसे. नव्हे, ते त्याचा आनंदही घेत. थोड्या वेळासाठी का होईना, आपण सरसंघचालक आहोत, हे ते विसरून जात आणि एक गणशिक्षक बनून जात. जसे शारीरिक विधेत तसेच बौद्धिक विधेतही. ते अखिल भारतीय बौद्धिक प्रमुखही झाले. त्याच काळात, ‘प्रज्ञाप्रवाह’च्या क्रियाकलापांना आकार आला व शिस्तही लागली. निरनिराळ्या प्रांतांमध्ये मौलिक बौद्धिक चिंतनाचे काम निरनिराळ्या नावांनी चालत असे. आताही चालत असावे. प्रतिदिनच्या शाखेशी याचा संबंध नसे. पण, राष्ट्र, राज्य, धर्म, संस्कृती, साम्यवाद, समाजवाद, राष्ट्रवाद, इत्यादी मौलिक अवधारणांच्या संबंधात जे प्रचलित विचार आहेत, त्यांचा मूलगामी परामर्श घेऊन, या संकल्पानांचा खरा अर्थ प्रतिपादन करणे, हे या बौद्धिक क्रियाकलापांचे उद्दिष्ट असे. त्याचप्रमाणे, तात्कालिक प्रचलित विषयांचाही परामर्श या कार्यक्रमांतून घेतला जाई. ‘प्रज्ञाप्रवाह’ही या सर्वांना आश्रय देणारी, त्यांच्यावर सावली धरणारी, एक विशेष छत्री होती आणि या छत्रीचे मार्गदर्शक होते सुदर्शनजी.
सरसंघचालकाची नियुक्ती
प्रथम छत्तीसगडमध्ये, नंतर मध्य भारतात प्रांतप्रचारक या नात्याने, त्यानंतर आसाम, बंगाल या भागात क्षेत्रप्रचारक या नात्याने, अनुभवांची समृद्धी लाभलेले ते, पुढे संघाचे सहसरकार्यवाह बनले; आणि इ. स. २००० मध्ये ते सरसंघचालक या सर्वोच्च पदावर अधिष्ठित झाले.
संघाच्या घटनेप्रमाणे, सरसंघचालकांची नियुक्ती होते. ती नियुक्ती पूर्व सरसंघचालक करतात. त्या नियुक्तीच्या पूर्वी, काही ज्येष्ठ सहकार्‍यांशी ते विचारविनिमय करीत असतात. आद्य सरसंघचालक डॉ. के. ब. हेडगेवार यांनी श्री मा. स. गोळवलकर उपाख्य गुरुजी यांची नियुक्ती केली होती. डॉक्टरांचे एक जुने सहकारी श्री आप्पाजी जोशी, यांनी आपल्या एका लेखात, या संबंधी डॉक्टरांनी त्यांना विचारले होते, असे लिहिले आहे. १९३९ साली, संघाच्या कार्यपद्धतीचा पुनर्विचार करण्यासाठी, वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथे, तत्कालीन प्रमुख संघ कार्यकर्त्यांची जी बैठक झाली होती, त्यावेळी डॉक्टरांनी आप्पाजींना विचारले होते. श्रीगुरुजींनी आपला उत्तराधिकारी ठरविताना कुणाशी विचारविनिमय केला होता हे मला माहीत नाही. पण श्री बाळासाहेब देवरस यांची नियुक्ती करण्याचे पत्र त्यांनी लिहून ठेवले होते; व ते तत्कालीन महाराष्ट्र प्रांत संघचालक श्री ब. ना. भिडे यांनी वाचून दाखविले होते. माझे भाग्य हे की, त्यानंतरच्या तिन्ही सरसंघचालकांनी म्हणजे श्री बाळासाहेब देवरस, प्रो. राजेंद्रसिंह आणि श्री सुदर्शनजी यांनी या नियुक्तीच्या संदर्भात माझेही मत जाणून घेतले होते. अर्थात्, एकट्या माझे नाही. अनेकांचे. सुदर्शनजींनी तर निदान २०-२५ जणांशी परामर्श केला असावा. डॉक्टरांच्या मृत्यूनंतर गुरुजींची घोषणा झाली. गुरुजींच्या मृत्यूनंतर बाळासाहेबांच्या नियुक्तीचे पत्र वाचण्यात आले. पण नंतरच्या तिन्ही सरसंघचालकांनी आपल्या हयातीतच आपल्या उत्तराधिकार्‍याची नियुक्ती घोषित केली. १९४० पासून म्हणजे जवळजवळ पाऊणशे वर्षांपासून हा क्रम अगदी सुरळीत चालू आहे. ना कुठे वाद ना मतभेद. हेच संघाचे संघत्व आहे. याचा अर्थ विशिष्ट पदासाठी एकच व्यक्ती योग्य असते, असा करण्याचे कारण नाही. अखेरीस, कोणतीही नियुक्ती हा व्यवस्थेचाच भाग असतो. पण पदासाठी योग्यता असावीच लागते. १९७२ साली श्रीगुरुजींवर कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली असताना, एका विदेशी महिला पत्रकाराने, मला विचारले होते (त्यावेळी मी तरुण भारताचा मुख्य संपादक होतो) Who after Golwalkar? मी म्हणालो, असे अर्धा डझन तरी लोक असतील! तिला आश्‍चर्य वाटले. ती म्हणाली, ‘‘आम्हाला ती नावे माहीत नाहीत.’’ मी म्हणालो, ‘‘तुम्हाला माहीत असण्याचे कारण नाही. आम्हाला माहीत आहेत.’’
निर्मळ व निर्भय
सन २००० मध्ये तत्कालीन सरसंघचालक प्रो. राजेंद्रसिंहजी यांनी सुदर्शनजींची सरसंघचालकपदी नियुक्ती केली. नऊ वर्षे ते त्या पदावर राहिले; आणि आपल्या हयातीतच तो पदभार श्री मोहनजी भागवत यांच्यावर सोपवून ते मोकळे झाले. सुदर्शनजी स्वभावाने निर्मळ होते. थोडे भोळे म्हटले तरी चालेल. आपल्या मनात जे आहे, ते प्रकट करण्याचा त्यांना संकोच नव्हता. जणू काही त्यांचे अंत:करण तळहातावर ठेवल्यासारखे सर्वांसाठी खुले होते. कुणाच्याही सांगण्याने ते प्रभावित होत असत. काही प्रसारमाध्यमे याचा गैरफायदाही घेत असत. पण त्याची त्यांना पर्वा नसे. ते जसे निर्मळ होते, तसेच निर्भयही होते. कुणाशीही चर्चा करण्याची त्यांची तयारी असे; आणि मानापमानाचाही ते विचार करीत नसत.
अल्पसंख्य आयोगापुढे
एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. २००१ मध्ये संघाने एक व्यापक जनसंपर्काचे अभियान निश्‍चित केले होते. मी त्यावेळी दिल्लीत संघाचा प्रवक्ता होतो. काही लोकांशी दिल्लीच्या संघ कार्यकर्त्यांनी माझ्या भेटी ठरविल्या होत्या. त्यात, सध्याचे प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंग, दक्षता आयुक्त एल. विठ्ठल, मुख्य निवडणूक आयुक्त एम. एस. गिल, नावाजलेल्या पत्रकार तवलीनसिंग, आऊटलुकचे संपादक, (बहुधा विनोद मेहता हे त्यांचे नाव असावे) आणि अल्पसंख्य आयोगाचे उपाध्यक्ष सरदार तरलोचनसिंग (त्रिलोचनसिंग) यांच्या भेटी मला आठवतात. एक गिलसाहेब सोडले, तर बाकी सर्व भेटी, त्या त्या व्यक्तींच्या कार्यालयात न होता, घरी झाल्या होत्या. तरलोचनसिंगांनी शीख आणि हिंदू यांच्या संबंधात खोदून खोदून मला विचारले. माझ्याबरोबर बहुतेक सर्व ठिकाणी त्यावेळचे दिल्ली प्रांताचे संघचालक श्री सत्यनारायण बंसल असत. माझ्या बोलण्याने तरलोचनसिंगांचे समाधान झाले असावे, असे दिसले. ते म्हणाले, ‘‘हे जे तुम्ही माझ्या घरात बोलत आहात, ते अल्पसंख्य आयोगापुढे बोलाल काय?’’ मी म्हणालो, ‘‘आमची हरकत नाही.’’ त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला वेळ दिली. आम्हीही इंग्रजी भाषेत एक लेखी निवेदन तयार केले व ते आयोगाला दिले. काही प्रश्‍नोत्तरे झाली. बाहेर पत्रकारांचा तांडा उभा होता. त्यांनीही आडवेतिडवे प्रश्‍न विचारायला सुरवात केली. तरलोचनसिंग म्हणाले, ‘‘यांच्या निवेदनाने माझे समाधान झाले आहे. तुम्ही का उगाच अकांडतांडव करता?’’
कॅथॉलिकांशी संवाद
या अल्पसंख्य आयोगात जॉन जोसेफ (की जोसेफ जॉन) या नावाचे ख्रिस्ती सदस्य होते. ते केरळीय होते. ते म्हणाले, ‘‘तुम्ही ख्रिस्ती धर्मगुरूंशी बोलाल काय?’’ मी होकार दिला. त्यांनी या बाबीचा पाठपुरावा केला. ते संघाच्या झंडेवाला कार्यालयात मला दोनदा भेटायला आले. त्याप्रमाणे रोमन कॅथॉलिक चर्चच्या प्रमुखांशी बोलण्याचे निश्‍चित झाले. त्यांच्या दोन अटी होत्या. (१) त्यांच्याबरोबर प्रॉटेस्टंट ख्रिश्‍चन असणार नाहीत (२) आणि त्यांचे बिशप, प्रवक्त्याशी वगैरे बोलणार नाही. संघाच्या सर्वोच्च नेत्यांशीच बोलतील. मी सुदर्शनजींशी संपर्क साधला. ते तयार झाले. दोघांच्या सोयीने दिनांक व वेळ ठरली. अन् बैठकीला दोन-तीन दिवस उरले असताना चर्चकडून निरोप आला की, संघाच्या अधिकार्‍याला आमच्या चर्चमध्येच चर्चेसाठी यावे लागेल. चर्च नाही, संघाचे कार्यालयही नाही, अशा तटस्थ ठिकाणी भेट व्हावी, असे जॉन जोसेफ यांच्याशी बोलण्यात ठरले होते. मला कॅथॉलिक चर्चच्या या अटीचा राग आला आणि मी म्हणालो, बैठक रद्द झाली असे समजा. सुदर्शनजी केरळमध्ये प्रवासावर होते. दुसरे दिवशी दिल्लीला यावयाचे होते. मी त्यांच्या कानावर झालेला प्रसंग सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘जाऊ की आपण त्यांच्या चर्चमध्ये!’’ मीच चकित झालो. लगेच मी जॉन जोसेफ यांना सांगितले. त्याप्रमाणे सुदर्शनजी, मी आणि महाराष्ट्र प्रांताचे तत्कालीन कार्यवाह डॉ. श्रीपती शास्त्री असे आम्ही तिघे कॅथॉलिक चर्चमध्ये गेलो. आमचे चांगले औपचारिक स्वागत झाले. तेथे झालेल्या चर्चेसंबंधी येथे सांगणे अप्रस्तुत आहे. तो वेगळा विषय आहे. सुदर्शनजी चर्चेला भीत नसत, हे मला येथे अधोरेखित करावयाचे आहे.
नंतर प्रॉटेस्टंट पंथीय धर्मगुरूंशी बैठक झाली. ती नागपुरातील संघ कार्यालयात, डॉ. हेडगेवार भवनामध्ये झाली. प्रॉटेस्टंटांच्या चार-पाच उपपंथांचीच नावे मला माहीत होती. पण या बैठकीला २७ उपपंथांचे २९ प्रतिनिधी आले होते. दीड तास त्यांच्याशी खेळीमेळीत चर्चा झाली. सर्वांनी संघ कार्यालयात भोजनही केले.
मुस्लिम राष्ट्रीय मंच
मुसलमानांशीही त्यांचे अनेकदा बोलणे झाल्याचे माझ्या कानावर होते. पण त्या बोलण्यात मी त्यांच्याबरोबर नव्हतो. या संपर्कातूनच ‘मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या’ स्थापनेचा जन्म झाला. या मंचाच्या संघटनेचे श्रेय संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जम्मू-काश्मीर प्रांताचे माजी प्रांतप्रचारक आणि विद्यमान संघाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य इंद्रेशकुमार यांचे आहे. पण सुदर्शनजी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. ‘मुस्लिम राष्ट्रीय मंचाची’ जेवढी म्हणून अखिल भारतीय शिबिरे किंवा अभ्यासवर्ग आयोजित असत, त्यांना सुदर्शनजी आवर्जून उपस्थित राहात. मुसलमानांना त्यांचे सांगणे असे की, ‘‘तुम्ही बाहेरून हिंदुस्थानात आलेले नाहीत. इथलेच आहात. तुमची उपासनापद्धती तेवढी वेगळी आहे. तुमचे पूर्वज हिंदूच आहेत. त्यांचा अभिमान बाळगा. या देशाला मातृभूमी माना. हिंदूंप्रमाणे आपणही येथील राष्ट्रीय जीवनाचे अभिन्न घटक आहोत, असे तुम्हाला वाटू लागेल.’’ या मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमांमुळे मुसलमानांच्या मध्येही हिंमत आली. देवबंदच्या पीठाने ‘वंदे मातरम्’ न म्हणण्याचा फतवा काढला, तर या मंचाने अनेक ठिकाणी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले. सर्व प्रकारचे धोके पत्करून जम्मू-काश्मीरच्या राजधानीत श्रीनगरमध्ये मंचाने तिरंगा फडकविला आणि वंदे मातरम्चे गायन केले. एवढेच नव्हे, तर १० लाख मुसलमानांच्या सह्यांचे एक निवेदन राष्ट्रपतींना सादर करून संपूर्ण देशात गोहत्याबंदी व्हावी अशी मागणी केली. अलीकडेच म्हणजे गेल्या जून महिन्यात राजस्थानातील पुष्कर या तीर्थक्षेत्री या मुस्लिम मंचाचे तीन दिवसांचे राष्ट्रीय शिबिर संपन्न झाले होते. सुदर्शनजी त्या शिबिरात उपस्थित होते. सुदर्शनजींना, त्यांच्या मृत्यूनंतर जे अनेक मुस्लिम नेते श्रद्धांजली अर्पण करायला आले होते, त्याचे हे कारण आहे.
तृतीय सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांनी काही नव्या चांगल्या प्रथा संघात पाडल्या. त्यातली एक म्हणजे रेशीमबागेला सरसंघचालकांची स्मशानभूमी बनू दिले नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर- म्हणजे आम जनतेसाठी असलेल्या घाटावर, झाला होता. सुदर्शनजींचाही अंत्यसंस्कार तेथेच झाला. तो दिवस होता रविवार १६ सप्टेंबर २०१२. एक संघसमर्पित जीवन त्या दिवशी संपले. खरेच ते संपले म्हणावयाचे? नाही. फक्त शरीर संपले. ते अग्नीने भस्मसात् केले. पण असंख्य आठवणी व प्रेरणाप्रसंग कायम ठेवून.
श्री सुदर्शनजींच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली.
• रमेश पतंगे
‘मेरा मुझ में कुछ नही, जो कुछ है सब तेरा|
तेरा तुझको सोप दे, क्या लागे है मेरा|’
अशी मनोवृत्ती बनवावी लागते. खरं म्हणजे बनवावी लागते हे म्हणणेही बरोबर नाही. सरसंघचालक हे या भावनेचे मूर्तिमंत रूप असते. सुदर्शनजी असे होते. ते समष्टिरूप झाले होते. म्हणूनच त्यांच्या वागण्या-बोलण्या-चालण्यात-रोजच्या व्यवहारात अगदी सहजता असे. त्यांची भेट घेत असताना आदरयुक्त  भीती असे. परंतु, त्यांच्यापासून दूर जावे असे कुणाला वाटत नसे. खर्‍या अर्थाने ते आधारवड होते. सर्वांवर शीतल छाया धरणारे होते. ही छाया आता गेली आहे. परंतु, शीतलता मात्र तशीच कायम राहणार आहे. अशा प्रज्ञाचक्षू सुदर्शनजींना ही आदरांजली...


सुदर्शनजी गेल्याची बातमी शनिवारी सकाळी समजली आणि मन सुन्न झाले. डोक्यावरील कृपाछत्र गेल्याची तीव्रपणे जाणीव झाली. एकामागोमाग एक प्रसंग डोळ्यापुढे उभे राहू लागले. संघाची ऐकीव आणि पुरोगामी माहिती असणार्‍या मंडळींना संघातील सरसंघचालक पद हे गूढ वलय असलेले पद वाटते. प्रत्येक जण आपापल्या कल्पना रंगवून त्याचे वर्णन करतो. कुणी सरसंघचालकांना संघाचे गुरू म्हणतात, तर दुसरा कुणी त्यांना संघपरिवारातील महान शक्तिमान व्यक्ती म्हणतात. त्यांच्या आदेशाशिवाय संघ आणि संघसंस्थाजीवनाचे पान हालत नाही, असा एक गोडसमज अनेकांचा असतो. काही लोकांना तर सरसंघचालक म्हणजे संघाचे हुकूमशहा वाटतात. मा. सुदर्शनजी २००९ पर्यंत सरसंघचालक होते. ते कसे होते? म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते?
‘सा. विवेक’तर्फे आम्ही ‘अमृतपथ’ या नावाचा, महाराष्ट्रातील संघकार्याचा इतिहास मांडणारा एक ग्रंथ तयार केला. अशा प्रकारचे काम हे पहिल्यांदा होत होते. संघाची पद्धती, प्रसिद्धीच्या झोतात न राहण्याची आहे. त्यामुळे कार्यकर्ते आपल्या कामाचा डांगोरा पिटत नाहीत. परंतु, आपल्या मागच्या पिढीने कोणत्या परिस्थितीत संघकाम केले? त्यांच्या पुढील आव्हाने कोणती होती? हे नव्या पिढीला समजणे फार आवश्यक आहे. म्हणून ‘अमृतपथ’ ग्रंथ करण्याचे काम विवेकने हातात घेतले.
ग्रंथाचे प्रकाशन मा. सुदर्शनजींच्या हातून व्हावे असे ठरले. तेव्हाचे संघाचे प्रांतप्रचारक मुकुंदराव पणशीकर यांना तसे मी सांगितले. त्यांचे सुदर्शनजींशी बोलणे झाले. परंतु, काहीतरी समजुतीत घोटाळा झाला आणि सुदर्शनजी येणार नाहीत, असा निरोप आमच्याकडे आला. त्यानंतर मी तेव्हाचे सरकार्यवाह मोहनजी भागवत यांच्याशी बोललो आणि त्यांची तारीख नक्की केली. तशा पत्रिका छापल्या आणि एके दिवशी विमल केडिया यांचा मला फोन आला. ते म्हणाले, ‘‘मी आजच दिल्लीहून आलो आहे आणि मा. सुदर्शनजी म्हणत होते की, ‘अमृतपथ’ ग्रंथ प्रकाशनासाठी मी मुंबईला येणार आहे.’’ विमलजींचे बोलणे ऐकून मी हादरलोच. मोठी गडबड झाल्याचे माझ्या लक्षात आले. मी सुदर्शनजींना फोन केला तेव्हा ते दिल्लीच्या संघकार्यालयात होते. (सरसंघचालकांशी थेट दूरध्वनीवरून संवाद करता येतो.) त्यांना सर्व परिस्थिती सांगितली आणि काहीतरी घोटाळा झाल्याचे त्यांना सांगितले. ते हसले आणि म्हणाले, ‘‘अरे! चिंता करू नकोस, कार्यक्रमात बदल करू नकोस. मोहनजी येत आहेत ना? मग त्यांच्याच हस्ते प्रकाशन करून घे.’’ आणि हा विषय संपला. कसली खळखळ नाही, रागावणे नाही, नियोजन नीट करता येत नाही का? असले बोल नाहीत. असे होते सुदर्शनजी.
त्यांची माझी शेवटची भेट ऑगस्ट महिन्यात बंगळूरला झाली. मी बंगळूरला जाण्यापूर्वीच दोन दिवस अगोदर ‘सुदर्शनजी गायब झाले आहेत,’ अशा ब्रेकिंग न्यूज सकाळच्या वार्तापत्रात झळकत होत्या. दोन तासांनंतर समजले की, त्यांचे अपहरण झाले नसून, सकाळी फिरायला गेले असता ते वाट चुकले आणि खूप थकून एका घरात विश्रांती घेत होते. बंगळूरच्या संघकार्यालयात त्यांची माझी भेट झाली. नेहमीच्या आपुलकीने त्यांनी विचारले- ‘‘कधी आलास? कोणता कार्यक्रम होता?’’ माझ्या येण्याचे प्रयोजन मी त्यांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘कृष्णप्पा आजारी आहेत. (संघाचे ज्येष्ठ प्रचारक) त्यांना भेटून ये.’’ कृष्णप्पांशी गप्पा मारत असताना निरोप आला, सुदर्शनजी जेवायला थांबले आहेत. जेवायला बोलावले आहे.
त्यांच्या शेजारीच माझे पान मांडले होते. त्यांच्याबरोबर जेवण्याचा हा शेवटचा प्रसंग असेल, असे तेव्हा मला वाटले नाही. पानात सर्व तांदळाचे पदार्थ होते. सुदर्शनजी म्हणाले, ‘‘अरे, त्याला पोळी, पुरी वाढा. तो काय भातखाऊ नाही.’’ सरसंघचालक घरातील वडीलधार्‍या माणसाप्रमाणे असतात. सर्वांची सहजपणे काळजी घेतात. आल्यागेल्याची वास्तपुस्त करतात. त्यांच्या गरजांकडे लक्ष देतात. म्हणून कार्यकर्त्यांना सरसंघचालक कधीही महान नेते, त्यांच्याविषयी भीती वाटावी असे वाटत नाहीत. ते श्रद्धेचे स्थान असते. आपुलकीचे स्थान असते.
सुदर्शनजी विद्वान होते. त्यांचे वाचन अफाट होते. बारीकसारीक विषयांचे संदर्भ ते गोळा करीत. विवेकच्या एका दिवाळी अंकात ‘तथागत आणि श्रीगुरुजी’ यांच्यावर मी एक लेख लिहिला होता आणि या लेखासाठी धर्मानंद कोसंबी यांचे समाधिपाद हे पुस्तक संदर्भासाठी घेतले होते. लेखात त्यांचा उल्लेख आहे. सुदर्शनजींनी लेख वाचला. त्यांना तो खूप आवडला आणि लगेच त्यांनी समाधिपाद हे पुस्तक मागवून त्याचे वाचन करून  टाकले. वेगवेगळ्या राष्ट्रीय समस्यांवरील त्यांचे बौद्धिक वर्ग म्हणजे समस्या जाणून घेण्याच्या ज्ञानाचा खजिना असे. पंजाबची समस्या, आसामची समस्या, मिशनर्‍यांचे प्रश्‍न अशा बहुविध विषयांवरील त्यांचे बौद्धिक वर्ग एक एक समस्या मुळापासून उलगडून दाखविणार्‍या असत. तसे ते ज्ञानसागर होते.
ज्ञानामुळे व्यक्ती अहंकारी होते. श्रेष्ठ बौद्धिक क्षमतेमुळेदेखील अहंकार आणखी वाढतो. आपला जन्म दुसर्‍याला ज्ञान देण्यासाठीच झाला आहे, कुणाचे ऐकण्यासारखे काही नाही, अशी विद्वान माणसांची धारणा होते. यांचे अनुभव मी भरपूर घेतले आहेत. परंतु, सुदर्शनजी त्याला अपवाद होते. ‘फळभाराने वृक्ष वाकतो, म्हणजे नम्र होतो.’ म्हणून तुकोबाराय म्हणाले की, ‘नम्र झाला भूतां, त्याने कोंडिले अनंता|’ सुदर्शनजींची नम्रता थक्क करणारी आहे.
पुण्याला दामूअण्णा दाते यांच्या ‘स्मरणशिल्पे’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. मा.  सुदर्शनजींच्या हस्ते प्रकाशन होते. पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात होता. पहिल्या रांगेत माजी सरसंघचालक रज्जुभय्या बसले होते. सुदर्शनजी मला म्हणाले, ‘‘पुस्तकाची पहिली प्रत रज्जुभय्यांना नेऊन दे.’’ मी तसे केले. याच कार्यक्रमात त्यांनी एक विषय मांडला की, ज्येष्ठ संघस्वयंसेवकांनी आपल्या आठवणी लिहाव्यात. भावी पिढीसाठी त्या आवश्यक आहेत आणि भाषणाच्या ओघात त्यांनी  ‘मी, मनु आणि संघ’ या पुस्तकाच्या संदर्भातला करुणानिधींचा किस्सा सांगितला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांना भाजपाचे तेथील कार्यकर्ते गोपालन यांनी पुस्तकाची तामीळ प्रत दिली. करुणानिधींनी ते पुस्तक वाचून काढले. पुन्हा भेट झाली असता गोपालन यांनी करुणानिधींना  विचारले, ‘‘तुम्हाला ‘मी, मनु आणि संघ’ पुस्तक कसे वाटले?’’ करुणानिधी म्हणाले, ‘‘या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे संघ जर आहे, तर संघावर टीका करण्यात आयुष्याची चाळीस वर्षे आम्ही वाया घालविली, असे म्हणावे लागेल.’’ असे कौतुक करायला मनाचा फार मोठेपणा लागतो. खरं म्हणजे आमच्यासारखे कार्यकर्ते सुदर्शनजींसारख्यांच्या जीवनातून संघ समजून घेत असतात. असे म्हणतात की, एखाद्या मोठ्या वृक्षाखाली अन्य झाडं वाढू शकत नाहीत, परंतु सुदर्शनजी असे वृक्ष होते की, ज्यांच्या शीतल छायेखाली सामान्य कुवतीचे कार्यकर्तेही मोठे होत गेले.
मनाची निर्मळता हा सुदर्शनजींच्या व्यक्तिमत्त्वाचा विलोभनीय पैलू होता. त्यांचे मन गंगाजलासारखे निर्मळ आणि पवित्र होते. त्यात एक बालसदृश निर्मळता होती. लहान मूल जसे सदा आनंदी, सदा प्रसन्न असते, तशी प्रसन्नता सुदर्शनजींकडे होती. दोन वर्षांपूर्वी भोपाळच्या संघकार्यालयात मी त्यांना भेटायला गेलो. त्यांच्याबरोबर जेवण झाले आणि नंतर ते  मला घेऊन बसले. ऊर्जेचे विविध स्रोत या विषयाच्या त्यांनी काही फाइल्स तयार केल्या होत्या. त्या मला दाखवीत बसले. पर्यायी ऊर्जा मिळविण्याचे कुठे कुठे कसे प्रयत्न चालू आहेत, त्याची माहिती त्यांनी मला दिली. ती सर्वच माहिती मला खूप नवीन होती. आपले  ज्ञान प्रकट करण्यासाठी सुदर्शनजी हे मला सांगत नव्हते, तर ऊर्जेचे संकट कसे दूर करता येईल, हा त्यांच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होता.
अगदी छोट्याशा जागेतदेखील (जमिनीत) भाजीपाल्याचे भरपूर उत्पादन कसे घेता येईल, त्यासाठी प्लांटिंग कसे करावे, जैविक खते कोणती वापरावी, गोविज्ञानाचा उपयोग कसा करावा याची सचित्र माहिती त्यांनी मला दिली. ती ऐकून  मी अचंबित झालोच, पण आणखी अचंबित करणारी गोष्ट मला पाहायची होती. सुदर्शनजी मला कार्यालयाच्या गच्चीवर घेऊन गेले. या गच्चीवर कारली, दुधी, पालक, वांगी अशा विविध भाज्यांची लागवड केलेली होती आणि सुदर्शनजी मोठ्या अभिमानाने सांगत होते की, गेले सहा महिने आम्ही याच भाज्या खात आहेत. एका विश्‍वव्यापी संघटनेचे प्रमुख राहिलेले सुदर्शनजी, मर्यादित जागेत भाजीपाल्याची लागवड कशी करावी, स्वयंपूर्ण कसे व्हावे, ऊर्जा कशी निर्माण करावी, याचे व्यावहारिक प्रात्यक्षिक मला दाखवीत होते. वेगळ्या भाषेत हिंदू राष्ट्र म्हणजे काय आणि त्याच्या किती अंगांचा आपण विचार केला पाहिजे, हे न बोलता, कोणतेही भाषण न देता ते करून दाखवीत होते. सगळ्या वागण्या-बोलण्यामध्ये निर्व्याज सहजता होती. आपुलकी होती.
चार-पाच वर्षांपूर्वी राष्ट्रजीवनातील विविध विषयांच्या अभ्यासबैठकांची सत्रे सुरू होती. समरसता या विषयाची अशीच महत्त्वपूर्ण बैठक नागपुरात होती. चिंतनासाठी मोजकेच कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. एका सत्रात समरसता या विषयावरील बीजभाषण मला करायचे होते. भाषण मी लिहून काढले होते. त्यातील एक मुद्दा असा होता की, राष्ट्रीय स्तरावर सामाजिक क्षेत्रात अनेक कळीचे विषय निर्माण होतात. संघाची भूमिका अशा वेळी स्पष्ट असावी लागते. ही भूमिका सरसंघचालक किंवा सरकार्यवाह यांनी  मांडणे आवश्यक असते. माझ्यापुढे प्रश्‍न होता की, सुदर्शनजींच्या उपस्थितीत हा विषय मांडावा की मांडू नये? ते काय म्हणतील? मी श्रीपती शास्त्रींना माझी अडचण सांगितली. ते म्हणाले, ‘‘ही बैठक मोकळेपणाने विचार मांडण्यासाठी आहे. तेव्हा तू जरूर विचार            
मांड.’’ मी टिपणातील विषय मांडला. सुदर्शनजी मला नंतर खाजगीत असे म्हणाले नाहीत की, ‘‘काय रे तू सरसंघचालकांनादेखील अक्कल शिकवितोस का?’’ त्यानंतर  महू येथे  पू. डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमात त्यांचे, बाबासाहेबांवर अप्रतिम भाषण झाले आणि त्यात त्यांनी अनेक सामाजिक प्रश्‍नांचा ऊहापोह केला. योग्य व्यासपीठावर योग्य वेळी त्यांनी आपले विचार मांडले.
सरसंघचालक संघाचे सर्वोच्च प्रमुख असतात. याचा अर्थ ते मन मानेल तसा संघ चालवू शकत नाहीत. ते संघमनाचे प्रतिनिधित्व करतात आणि संघमन आपल्या भाषणातून प्रकट करतात. सरसंघचालक होण्यासाठी संघमनाशी एकरूप व्हावे लागते आणि त्यासाठी स्वत:च्या अहंकाराचा संघात विलोप करावा लागतो. यालाच आत्मविलोप असे म्हणतात. ‘मेरा मुझ में कुछ नही, जो कुछ है सब तेरा| तेरा तुझको सोप दे, क्या लागे है मेरा|’ अशी मनोवृत्ती बनवावी लागते.  खरं म्हणजे बनवावी लागते हे म्हणणेही बरोबर नाही. सरसंघचालक हे या भावनेचे मूर्तिमंत रूप असते. सुदर्शनजी असे होते. ते समष्टिरूप झाले होते. म्हणूनच त्यांच्या वागण्या-बोलण्या-चालण्यात-रोजच्या व्यवहारात अगदी सहजता असे. त्यांची भेट घेत असताना आदरयुक्त  भीती असे. परंतु, त्यांच्यापासून दूर जावे असे कुणाला वाटत नसे. खर्‍या अर्थाने ते आधारवड होते. सर्वांवर शीतल छाया धरणारे होते. ही छाया आता गेली आहे. परंतु, शीतलता मात्र तशीच कायम राहणार आहे...
---------------------------
दिव्य ध्येयासाठी समर्पित
•दिलीप धारूरकर
केंद्रात आणि अनेक राज्यात हिंदुत्त्वाचा विचार मानणारा राजकीय पक्ष सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झालेला असताना आणि हिंदुत्त्वाचा विचार देशातील वैचारिक चर्चेत केंद्रस्थानी असताना ते सरसंघचालक झाले होते. अशा काळात संघटनेला जी दिशा दिली पाहिजे त्यासाठी त्यांनी सतत चिंतन आणि मार्गदर्शन केले. सत्ता हे अंतिम साध्य नसून समाजपरिवर्तन आणि देशाला परमवैभवाप्रत घेऊन जाणे हे अंतिम साध्य आहे याची जाणीव सतत सर्वांना राहील याबाबत ते सतर्क होते. वैचारिक संघर्ष हा आता महत्त्वाचा आहे असे सांगून  वैचारिक संघर्षासाठी सर्वांनी तयार असले पाहिजे असे ते सांगत असत. प्रसारमाध्यमांच्या भूमिकेची समीक्षा त्यांच्या बोलण्यातून अत्यंत प्रखरपणे आणि देशहिताचा संदर्भ देऊन सतत घडत असे. गुजरातमधील दंगलीत एका ठिकाणी आग लागली तर दिवसभर तोच तो धूर दाखवत टीव्ही वाहिन्यांनी भयावह चित्र कसे उभे केले, भारतीयत्वाचा विचार देणारे प्रसंग, घटना यांना माध्यमांनी कसे महत्त्व दिले पाहिजे हे सांगताना ते अतिशय आग्रही होत असत. 

जीवनासाठी उच्च ध्येय आणि उच्च ध्येयासाठी संपूर्ण जीवनाचे समर्पण हे कसे असते ते जगून दाखविणारे अधुनिक युगातील कर्तव्यकठोर तपस्वी म्हणजे कुपहळ्ळी सीतारामय्या सुदर्शनजी! वयाच्या नवव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचे स्वयंसेवक झाल्यानंतर हळूहळू ध्येय साकारत गेले. हा देश परमवैभवाला घेऊन जाण्याचे संघाचे ध्येय हेच आपल्या जीवनाचे ध्येय मानून त्यासाठी सर्वस्व समर्पणाचा संकल्प त्यांनी केला. १९५४ साली वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी संघासाठी सर्वस्व समर्पणाचा विचार करून संघाचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम सुरू केले. वास्तविक त्या काळात टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या तरुणांना चांगले करिअर करण्याची संधी होती. आपले भवितव्य आणि देशाचे भवितव्य हे वेगळे असूच शकत नाही असे मानून आपल्या करिअरपेक्षा राष्ट्रीय चारित्र्यनिर्मितीला प्राधान्य देण्याची आणि त्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची उत्कटता त्यांच्याकडे होती. राष्ट्रकार्याला प्राधान्य देऊन तेच जीवनाचे ध्येय ठरलेले असल्याने त्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याचा निग्रह त्यांनी केला. मग जिल्हा प्रचारक, विभाग प्रचारक अशा जबाबदार्‍या पार पाडत दहा वर्षांत ते प्रान्तप्रचारक या पदापर्यंत पोहोचले. नंतर पूर्वांचलातही क्षेत्र प्रचारक म्हणून त्यांना जबाबदारी दिली गेली. हा सगळा सुदर्शनजींचा जीवनपट सर्वांना माहिती आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता, स्वतःची विश्‍लेषणात्मक दृष्टी, प्रचंड वाचन, जबरदस्त स्मरणशक्ती, अमोघ वक्तृत्त्व अशा अनेक गुणांचा समुच्चय त्यांच्या  व्यक्तिमत्त्वात होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शारीरिक विभाग आणि बौद्धिक विभाग असे दोन विभाग शाखेच्या कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी यासाठी काम करत असतात. या दोन्ही विभागात गती असणारे स्वयंसेवक फारच दुर्मिळ असतात. सुदर्शनजी हे अशा दुर्मिळ स्वयंसेवकांपैकी होते. शारीरिक कार्यक्रमातील सर्व विषयात ते पारंगत होते आणि बौद्धिक विषयातही त्यांची मोठी तयारी आणि व्यासंग होता. त्यामुळे संघाच्या इतिहासात अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख आणि अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख अशा दोन्ही पदांवर राहिलेले आणि सक्षमपणे दोन्ही जबाबदार्‍या पार पाडणारे ते एकमेव कार्यकर्ते होते. त्यानंतर सहसरकार्यवाह झाले आणि रज्जूभैय्या यांनी आपल्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्यानंतर सरसंघचालकपदाची जबाबदारी सुदर्शनजी यांच्याकडे सोपविली.
सुदर्शनजी यांचे व्यक्तिमत्त्व एखाद्या तपस्वीसारखे होते. त्यांच्या असंख्य आठवणी आज मनात दाटल्या आहेत. ते जेव्हा अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते तेव्हा मी एका जिल्ह्याचा बौद्धिक प्रमुख होतो. जिल्हा बौद्धिक प्रमुखांची मुंबईत बैठक होती. संघात बौद्धिक कार्यक्रम म्हणजे शाखेतील पद्य, बोधकथा, सुविचार, सुभाषित, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे बौद्धिक वर्ग इतकेच असे आमचा समज होता.  या बैठकीत सुदर्शनजी यांचे सत्र झाले. त्यांनी संघाच्या शाखेत स्वयंसेवकांची संख्या कशी वाढेल हे सांगताना आठवी, नववी, दहावी या वर्गातील वयोगट असलेल्या मुलांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि या वयोगटातील स्वयंसेवकांसाठी त्यांना आकर्षित करतील, त्यांच्या भावविश्‍वाला आवाहन करतील असे कार्यक्रम आयोजित करावेत असे सांगितले. या प्रकारचे कार्यक्रम कसे असावेत याची दहापेक्षा अधिक उदाहरणे अगदी बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात तशा गतीने त्यांनी सांगितली. अखंड भारताचा नकाशा मैदानावर आखावा, एकेका स्वयंसेवकाने भारताच्या इतिहासातील वैभवशाली कार्य करणार्‍या एकेका महापुरुषाच्या  ठिकाणावर उभे राहून हातात मशाल घेऊन जावे. त्या महापुरुषाची थोडक्यात माहिती द्यावी, असे करत करत एकेका प्रान्तातील एक-दोन महापुरुषांची माहिती देत संपूर्ण देशाचा नकाशा भरून जावा. नंतर सर्वांनी भारताच्या नकाशाच्या सीमेवर उभे राहून भारत मातेचा जयजयकार करावा. असे कितीतरी उपक्रम त्यांनी सुचविले. आम्ही थक्क झालो. याच बैठकीत थक्क होण्याची वेळ पुन्हा लगेच आली. दोन सत्रांच्या मधल्या वेळेत कोणाला तरी शोधत मी चाललो होतो. स्नानगृहातून कपडे धुण्याचा आवाज आला. सहज डोकावले तर तेथे सुदर्शनजी आपले कपडे धुण्यात मग्न झालेले होते. संघातील शब्देविण संवादे ही व्यक्तिमत्त्व विकासाची जी प्रक्रिया असते तिचे असे अनुभव मनावर कोरले जात असतात. सुदर्शनजी सहसरकार्यवाह असताना मी काही कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. झंडेवाला कार्यालयात गेलो. अटलजी सरकारने केलेल्या पोखरणच्या अणुचाचणीबाबत मी दिवाळी अंकासाठी मुलाखती घेण्यासाठी तेथे गेलो होतो. सुदर्शनजी यांची भेट घेतली. ते म्हणाले, उद्या जेएनयूमध्ये याच विषयावर माझे आणि डॉ. मुरलीमनोहर जोशी यांचे भाषण आहे. तिथे चल. आमची भाषणे टेप करून घे. मध्ये मध्ये तुझे प्रश्‍न टाक म्हणजे झाली मुलाखत. तुझ्या काही प्रश्‍नांची उत्तरे भाषणातून मिळाली नाही तर नंतर चहापान आहे तेव्हा तेवढेच विचारून घे. मी जेएनयूमध्ये येतो असे म्हणताच विनाविलंब ते म्हणाले तिकडे कशाला जातोस. इकडेच ये. येथून माझ्याबरोबरच चल. माझी म्हणजे आपल्या तरुण भारतच्या एका आवृत्तीच्या संपादकाची ते कशी काळजी करतात हे त्यातून डोकावत होते. त्यांची ही आत्मीयता मनाला
 उभारी देणारी होती. आमचे हे संभाषण चालू होते तेव्हा माझ्याशी बोलत बोलत त्यांनी आपला स्वतःचा गणवेश अतिशय काळजीपूर्वक बाहेर काढला. त्यातल्या पट्ट्याला पॉलिश केले. पदवेश म्हणजे काळे बूट बाहेर काढून त्यावर पॉलिश केले. मी कुतूहल म्हणून विचारले. सुदर्शनजी गणवेशाची तयारी कशाकरिता करत आहात? ते शांतपणे म्हणाले, अरे, या झंडेवालामध्ये एक शाखा लागते. तिचा आज गणवेश दिन आहे. मग गणवेश तयार करायला नको? संघात कितीही मोठ्या पदावर असलो तरी आपण ज्या शाखेत जातो तिथे स्वयंसेवकच असतो, त्यामुळे तिथल्या सगळ्या आज्ञा, नियम, कार्यक्रम यांचे अनुसरण एक स्वयंसेवक म्हणून काटेकोरपणे केले पाहिजे याचा हा  वस्तुपाठ कधीही विसरता येणार नाही असा होता.
सुदर्शनजी सरसंघचालक झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा मराठवाड्यात नांदेड येेथे खालसा पंथाच्या त्रिशताब्दीनिमित्त प्रवास होता. देवगिरी तरुण भारतसाठी त्यांची मी मुलाखत घ्यावी असे ठरले. मी नांदेडला पोहोचलो. तेथे विभाग कार्यवाह यांच्याशी बोलणे झाले. वारंगा फाटा येथे त्यांचे स्वागत होणार आहे. तेथे मी जावे आणि तेथून नांदेडपर्यंत त्यांच्या गाडीतच बसून यावे. येताना त्यांची मुलाखत गाडीतच पूर्ण करावी असे ठरले. मी टेपरेकॉर्डर वगैरे तयारी करून वारंगा फाटा येथे गेलो. स्वागत, परिचय, चहा पान झाले. सुदर्शनजी यांनी गाडीत बसताना मला पाहिले. चल बैस असे म्हणताच मी गाडीत बसलो. आता मुलाखत नक्की असे मला वाटले. मी त्यांना गाडीत बसताच त्याबाबत बोललो तेव्हा ते म्हणाले, हे बघ, माझा हा प्रवास शाखेच्या कामासाठी आहे. यात मुलाखत, पत्रकार परिषद काही नाही. तुला माहिती आहे ना? असे म्हणून ते पुढे लगेच म्हणाले -
वृत्तपत्र में नाम छपेगा, पहनेंगे  स्वागत समुहार
छोड चलो यह क्षूद्र भावना, हिंदू राष्ट्र के तारणहार॥
माझे बोलणेच खुंटले. अन्य खूप गप्पा झाल्या. तरुण भारतची त्यांनी बारकाईने चौकशी केली. मुलाखत अर्थातच झाली नाही.
संभाजीनगरमध्ये तीन दिवसांची बैठक होती. सुदर्शनजी मार्गदर्शन करणार होते. त्या दरम्यान तीन दिवसात केव्हातरी त्यांची वेळ घेऊन मी सविस्तर मुलाखत तरुण भारतच्या दिवाळी अंकासाठी घ्यायची असा प्रयत्न चालू होता. प्रान्त प्रचारकांनी मला सांगितले की तुम्हाला वेळ दिली आहे. त्यांचा निवास डॉ. तुपकरी यांच्या घरी आहे. आज रात्रीच्या जेवणानंतर मुलाखतीसाठी तेथे तुम्हाला सुदर्शनजी मुलाखत देतील. मी ठरलेल्या वेळेपेक्षा थोडे आधीच डॉ. तुपकरी यांच्या घरी पोहोचलो. सुदर्शनजी यांचे जेवण संपत आले होते. गप्पा मारत जेवण चालू होते. डॉ. अश्‍विनीकुमार, डॉ. जयंत तुपकरी , दोघांच्याही डॉक्टर पत्नी, तुपकरींच्या भगिनी डॉ. मधुश्री सावजी व मेव्हणे डॉ. संजीव सावजी असे सहा डॉक्टर्स तेथे जेवता जेवता गप्पांत सहभागी झालेले. मीही गप्पा ऐकण्यात सहभागी झालो. विषय चालला होता हृदयरोग! सुदर्शनजी त्यांच्या वाचण्यात देशी, विदेशी लेखकांच्या लेखनात हृदयरोगावरचे उपचार, वेगवेगळे घरगुती उपाय, अनुभव असे जे त्यांच्या वाचनात होते ते सुदर्शनजी सांगत होते. कुठे कोणाला तिखट खाल्ल्याने कसा फायदा झाला, कोठे भोपळ्याचा रस सेवन करून हृदयविकारावर कसा फायदा झाला असे वेगवेगळे विषय त्या सांगण्यात होते. जेवण संपून हात वाळून गेले तरी त्यांचे सांगणे चालूच होते आणि सर्व डॉक्टर्स आणि मी ऐकण्यात रंगून गेलो होतो. चौफेर वाचन, भारतीय उपचार पद्धती, भारतीय आयुर्वेद यातील उपायांबाबत विश्‍वास असे अनेक विषय त्यात डोकावत होते. जेवणापेक्षाही या श्रवणभक्तीने तृप्त करणारा तो अनुभव होता.
डेहराडून येथे देशभरातील हिंदुस्थान समाचारच्या प्रतिनिधींची दोन दिवस बैठक होती. सुदर्शनजी बैठकीत पूर्णवेळ उपस्थित होते. बातमी लेखनावर चर्चा चालू होती. शीर्षकामध्ये संक्षिप्त रूपे वापरून वाचकांना कोड्यात टाकू नये असे सांगत असताना माझ्याकडून उदाहरण म्हणून एक इंग्रजी शब्द उच्चारताच सुदर्शनजींनी लगेचच त्याचा हिंदी प्रतिशब्द सांगितला आणि शीर्षकात इंग्रजी शब्दही असता कामा नयेत असे तात्काळ सांगितले. इंडिया मानसिकता आणि भारत मानसिकता असे ते नेहमी आपल्या विवेचनात फरक सांगत. स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कृती याबाबत अत्यंत अग्रही भूमिका ते मांडत असत. गोपाल, भारतीय तंत्रज्ञान आणि भारतीय विज्ञान या संदर्भात त्यांचा गाढा अभ्यास होता. त्याबाबत ते अत्यंत आग्रहाने उदाहरणांसह विवेचन करत. बौद्धिकामध्ये कवितांच्या ओळी,  जोशपूर्ण समारोप अशी वैशिष्ट्ये असत. भलेही राजकीय पक्ष, भारतीय जनता पक्ष यांच्या चुकलेल्या भूमिकेविषयी ते कठोरपणे टीका करत, मात्र आपल्या भाषणात अटलजींच्या कवितेतील ओळींचा वापर करून आत्मीयतेचा एक धागा कसा आहे ते नकळत सांगून जात.
दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवनभर अविचल चलता है|
अशा एका संघगीताच्या ओळी आहेत. सुदर्शनजींचे जीवन या ओळींचे जणू प्रात्यक्षिकच होते. ते शेवटपर्यंत  दिव्य ध्येयाकडे अविचल राहून सतत त्यासाठी चालत राहिले. ज्या रायपूरमध्ये त्यांचा जन्म झाला त्याच रायपूरमध्ये नित्यनेमाप्रमाणे फिरायला जाऊन आल्यानंतर प्राणायाम करत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. रायपूर ते रायपूर असा हा ध्येयनिष्ठेचा अविचल प्रवास प्रत्येकाला हे राष्ट्र परमवैभवाला नेण्याच्या दिव्य ध्येयासाठी काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. त्याच्या स्मृती जागवत हत्तीचे बळ अंगी घेऊन लाख संकटांना सामोरे जात लवकरात लवकर हे दिव्य ध्येय गाठण्यासाठी सर्वजण कृतीबद्ध होतील यात शंका नाही ! तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!
सुधीर पाठक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रत्येक सरसंघचालक हे एक आगळेवेगळे रसायन राहते. प्रत्येकाच्या जीवनातील उद्दिष्ट एकच होते, ते म्हणजे हिंदू राष्ट्र या विचाराचा प्रभाव समाजावर पडला पाहिजे. पण, प्रत्येकाच्या कार्यकाळात ज्यावर त्यांनी भर दिला असे उपविषय मात्र एका सूत्रातील असले, तरी त्यात भिन्नता होती. डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना केली आणि १९३९ च्या ओ. टी. सी.त त्यांना अखिल भारताचे एक मिनी रूप बघता आले. श्रीगुरुजींनी तर डॉक्टरांनंतर जवळजवळ तीन दशके विभिन्न अडीअडचणी आणि संकटे यावर मात करत संघाला एक भरपूर स्थायित्व मिळवून दिले. श्रीगुरुजींची बैठक ही आध्यात्मिक बैठक होती, तर श्री. बाळासाहेब देवरसांनी ‘सेवा है यज्ञकुंड, समिधासम हम जले’ हा मंत्र दिला. रज्जुभय्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक वैज्ञानिक होते. त्यांनी त्या कृतिपरतेला एक वेगळा आयाम दिला होता. सुदर्शनजी यांनी या कृती प्रत्यक्षात आणून सामाजिक समरसता वेगळ्या अर्थाने प्रस्थापित केली. ते स्वत: दीक्षाभूमीवर गेलेत आणि त्यांनी ख्रिश्‍चन आणि मुसलमान यांच्या प्रतिनिधींना संघकार्यालयात आमंत्रित केले.
सुदर्शनजींच्या जीवनात रेशीमबागला एक वेगळेच महत्त्व होते. त्यांची अंत्ययात्राही त्याच रेशीमबागमधून सुरू झाली होती, ज्या रेशीमबागमध्ये त्यांनी १० मार्च २००० अनुभवला होता. त्या दिवशी प्रतिनिधिसभेत व्यासपीठावर दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. रज्जूभय्या अन् सुदर्शनजी त्या खुर्च्यांवर बसले होते. त्याच दिवशी रा. स्व. संघाचे पाचवे सरसंघचालक म्हणून सुदर्शनजींच्या नावाची घोषणा झाली होती. याच रेशीमबाग परिसरात सरसंघचालक म्हणून त्यांनी पहिला प्रणाम स्वीकारला होता. त्याच दिवशी या परिसराला लक्षात आले होते, एरव्ही इतरांबरोबर बोलतबोलत वा आपल्या विचारात असणारे सुदर्शनजी- फार झपझप चालत ध्वजापावेतो जात असत. ते काही क्षण हे फक्त एका राष्ट्रवादी-हिंदुत्ववादी अ.भा. संघटनेचे रा.स्व. संघाचे प्रमुख म्हणून तेच राहत असत.
सुदर्शनजींनी आपल्या पूर्वसुरींचे ऋण, श्रेय कधीच अमान्य केले नाही, पण आपला स्वतःचा असा वेगळा बाज निर्माण केला होता. सुदर्शनजी सरसंघचालक झाल्यावर एक दिवस संघकार्यालयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे कार्यवाह श्री. सदानंदजी फुलझेले यांना फोन गेला की, सुदर्शनजी दीक्षाभूमीवर दर्शनाला येत आहेत. क्षणभर त्यांचा आपल्या कानांवर विश्‍वासच बसला नाही. त्यांना माहीत होते, तृतीय सरसंघचालक श्री. बाळासाहेब देवरस यांचे पुण्यातील वसंत व्याख्यानमालेतील भाषण- ‘‘जर अस्पृश्यता वाईट नसेल, तर या देशात काहीच वाईट असू शकत नाही.’’ पण, स्वतः सरसंघचालक दीक्षाभूमीवर येतील, असे त्यांना कधीच वाटले नव्हते. पण, तो क्षण प्रत्यक्षात आला होता. ‘‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’’ हे सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दीक्षाभूमीवर धम्मचक्रप्रवर्तन केले होते. आपल्या लाखो अनुयायांसह याच दीक्षाभूमीवर बौद्धधर्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर राजकारणात एक शक्ती म्हणून बौद्धधर्मीय रिपब्लिकन पक्ष उभा राहिला. प्रत्यक्ष व्यवहारातील अनुभव काहीही असला, तरी राजकारणापायी प्रत्येक दलित नेता ब्राह्मणत्वाचे प्रतीक म्हणून संघाला शिव्याशाप घालून आपली मतपेटी मजबूत करून जात असे. रा. स्व. संघाने त्याबद्दल कधीही वैषम्य व्यक्त केले नाही. संघजीवनात तर जातीला स्थानच नव्हते. बाजूला फक्त स्वयंसेवक राहत असे. तो कोणत्या जातीचा आहे, याची विचारपूसही कधी होत नसे. सुदर्शनजी जवळजवळ तासभर दीक्षाभूमीवर होते. त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली. एका महामानवाला अभिवादन केले. स्मारक समितीनेही सुदर्शनजींचे स्वागत केले होते. त्यावेळच्या चर्चेत बौद्धधर्माबद्दल इतके अचूक ज्ञान, माहिती सुदर्शनजींकडून त्यांना मिळत होती की, ती मंडळीदेखील आश्‍चर्यचकित झाली होती. सुदर्शनजी ही भेट आटोपून कार्यालयात परतले आणि नागपूरच्या सामाजिक जीवनात विलक्षण उलथापालथ सुरू झाली. अनेकांना सुदर्शनजींनी दीक्षाभूमीवर जावे हे मान्य नव्हते. नागपुरातील दहा-बारा जणांनी दीक्षाभूमीवर जाऊन हा पुतळा धुवून काढला होता. यात एकही दलित बांधव नव्हता. बव्हंशी समाजवादी विचारवंत होते. त्यांच्या या कृत्यालाही प्रसिद्धी मिळाली, पण सुदर्शनजी फक्त स्मित करीत होते. ‘‘अरे, ते मला भेटले असते तर मी त्यांना माझी भूमिका सांगितली असती,’’ हेच त्यांचे शब्द होते. त्यानंतर या कृत्यामागे जे प्रमुख विचारवंत होते, त्यांच्या विचाराची कीव करण्यासाठी आम्ही तरुण भारतमधून त्यांच्यावर अघोषित बहिष्कार घातला. हे बहिष्कार घालणेही सुदर्शनजींना अमान्य होते. काही वर्षांनी त्या विचारवंताला महाराष्ट्रातील मोठा पुरस्कार मिळाला अन् तरुण भारतने वृत्त छापले नाही, तर पहिला फोन सुदर्शनजींचा आला होता, ते वृत्त तरुण भारतमध्ये का नाही म्हणून. शेवटी त्या विचारवंताच्या निधनानंतर हा बहिष्कार भाग आम्ही थांबविला होता व त्यावर अग्रलेखही लिहिला होता.
फक्त दीक्षाभूमीवर जाऊनच सुदर्शनजी थांबले नव्हते, तर पुढे त्यांच्याच काळात ख्रिश्‍चन व मुस्लिमबंधूही संघकार्यालयात, महालावरील डॉ. हेडगेवार भवनात आले होते. या दोन्ही धर्मांचा सुदर्शनजींचा मोठाच अभ्यास होता. ख्रिश्‍चनांचे एखादे शिष्टमंडळ संघकार्यालयात येण्याचा तो पहिला प्रसंग होता. त्याच वेळी सुदर्शनजींनी ‘भारतीय चर्च’ ही संकल्पना मांडली होती.
मुसलमान बांधवांना तर ते नेहमीच सांगत असत, ‘‘तुम्ही कोण वेगळे आहात, तुम्ही-आम्ही याच मातीचे. याच मातेचे पुत्र आहोत. तुमची श्रद्धा व्यक्त करण्याची पद्धती वेगळी आहे. तुम्ही मूर्तिपूजा मानीत नाही, पण अल्ला मानता ना? आपण वेगळे मुळीच नाही.’’ मुस्लिम बांधवांचे हे प्रतिनिधिमंडळ कार्यालयात असताना, चर्चा सुरू असताना अचानक त्यांच्यात चुळबूळ सुरू झाली. सुदर्शनजींनी पृच्छा केली- ‘‘काय झाले?’’ उत्तर आले- ‘‘आमच्या नमाजाची वेळ झाली आहे.’’ सुदर्शनजी म्हणाले, ‘‘मग काय अडचण आहे? आपण चर्चा थांबवू. तुम्ही इथेच नमाज पढा आणि पुन्हा चर्चा करू.’’ अन् त्या दिवशी संघाच्या मुख्यालयात वजू झाली, नमाज अदा झाला! हा एक वेगळाच इतिहास होता. संघ हा मुस्लिमविरोधी आहे मानणार्‍यांना ती एक चपराक होती. फक्त त्यात, चपराक हाणतो आहे, हा आविर्भाव नव्हता.
सुदर्शनजींमध्ये लहान बालकांतील निरागसता होती. एखादी गोष्ट, कल्पना स्फुरली की, त्यांचे निळे डोळे मंदपणे चमकत असत. या निरागसतेमुळेही अनेकदा ते वादळाचा केंद्रबिंदूही ठरत. पण अगदी खरं सांगायचं, तर वाद अंगावर घ्यायला त्यांना मनापासून आवडत असे. रामजन्मभूमी आंदोलन काळात बाबरी ढांचा पडला त्या वेळी सुदर्शनजी अयोध्येत रामललाच्या मूर्तीच्या प्रांगणातच होते. प्रभू राम हा त्यांच्या श्रद्धेचा विषय होता. बाबरी ढांचा हा बॉम्ब लावून उडविण्यात आला, असे एक विधान त्यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी संदर्भ दिला होता, तो सर्वोदयी नेत्या निर्मलाताई देशपांडे यांचा. त्यांच्या या विधानावरून चांगलाच वाद उत्पन्न झाला होता. त्यातूनच पुढे सुदर्शनजींना न्या. लिबरहान आयोगापुढे साक्ष द्यायलाही जावे लागले होते. सरसंघचालकांनी अशाप्रकारे आयोगापुढे साक्ष द्यायला जाऊ नये, असे मानणारा एक मोठा वर्ग संघपरिवारात होता. पण, सुदर्शनजी मात्र आयोगापुढे साक्ष द्यायला ठाम होते- ‘‘त्यात काय आहे? आयोग त्याला सोपविलेले काम करीत आहे. त्या वेळी त्याला सहयोग द्यायलाच पाहिजे.’’ सरसंघचालक या अतिशय मोठ्या पदावर असतानाही सामान्य माणूस म्हणून चिंतन करायला त्यांना नेहमीच आवडत असे. त्यांच्यातील निरागसतेमुळे हे त्यांना जमत असे. आपल्या मागेपुढे कमांडोज राहणे वा आपण जनतेपासून वेगळे एका सुरक्षित आवरणात राहणे, हे त्यांना कधीच आवडले नाही. अगदी संघकार्यालयासमोर सुरक्षेसाठी भिंत घालण्याचा प्रस्ताव आला तेव्हाही त्यांचा विरोध होता. हे त्यांना मान्य नव्हते. पदामुळे काही निर्बंध तुम्हाला सहन करावेच लागतील, हे जेव्हा त्यांना ठामपणाने सांगण्यात आले, तेव्हाच त्यांनी या निर्बंधांना मान्यता दिली.
त्यांच्या सुरक्षापथकात असणारा माझा एक मित्र सांगत असे, ‘‘आम्ही तर या महापुरुषासोबत राहून धन्य होतो. क्वचित एखाद नेता बघायला मिळतो, जो आपल्या स्टाफच्या जेवणाखाण्याची, चहापाण्याची काळजी घेत असतो. सुदर्शनजी आम्हा सर्वांची काळजी करायचे. जेवण झाले की नाही, हेही विचारायचे. आम्हा सर्वांना ते नावाने ओळखत असत. फक्त काही निर्बंध त्यांच्या हालचालीवर, सुरक्षेच्या दृष्टीने घातले तर ते नाराज व्हायचे. घरातील आजोबांनी रुसून बसावे तसे रुसतही असत. काही वेळाने त्यांना आमची अडचण समजत असे आणि ते सहकार्य करत.’’
एक सहजता सुदर्शनजींच्या वागण्यात होती, पण जरूर तेव्हा ठामपणाही त्यांच्या ठायी होता. रा. स्व. संघाच्या एका समारंभात ओटीसी समाप्तीला निवृत्त एअर चीफ मार्शल ए. वाय. टिपणीस प्रमुख अतिथी म्हणून आले होते. पाकिस्तानचे सर्वेसर्वा जनरल मुशर्रफ भारत दौर्‍यावर आले होते, तेव्हा त्यांना सॅल्युट न करणारे जिगरबाज वायुसेनाप्रमुख म्हणून त्यांच्याबद्दल तरुणवर्गात खूप आदराची भावना होती. त्यांच्यामागे मोठे वलय होते. त्यांनी बोलताना काही प्रतिपादन केले होते, ते संघतत्त्वज्ञानाला मान्य होणारे नव्हते. सर्वांसमोर प्रश्‍न होता की, याचा प्रतिवाद करायचा का? असा प्रतिवाद करणे त्यांचा अपमान करणे तर ठरणार नाही ना? पण प्रतिवाद केला नाही, तर संघ ते विचार मानतो, असे होणार होते.
सुदर्शनजी समारोपाच्या भाषाला उभे झालेत. त्यांनी सुरवातीला एअर चीफ मार्शल टिपणीस यांचे भरपूर कौतुक केले. त्यांच्या राष्ट्रभक्तीला अभिवादन केले आणि नंतर ठामपणाने त्यांचे प्रतिपादन खोडून काढणे सुरू केले. या प्रतिपादनातील शब्द सौम्य होते. त्यात कुठेही अपमान होईल, असा शब्दप्रयोग नव्हता, पण विचारांतील स्पष्टता जागोजागी जाणवत होती. त्या क्षणाला त्या रेशीमबाग मैदानावरील सर्वांना जाणवून गेले की, एक सरसंघचालक संघतत्त्वज्ञान जीवनशैली उलगडून दाखवीत आहेत. एका सच्च्या राष्ट्रभक्ताला संघ समजावून सांगत आहेत. संपूर्ण भाषण संपले, पण कुठेही कटुतेचा लवलेश त्यांच्या भाषणातून झाला नाही. हा अनुभव एअर चीफ मार्शल टिपणीस यांनाही नवीन होता. निरागसतेचा एक वेगळा पैलू त्या वेळी बघता आला.
सुदर्शनजी नागपूरला असलेत की, तभा नियमितपणे वाचत असत. त्यातील एखादे प्रतिपादन आवडले नाही, काही चूक असेल, तर लागलीच शेजारी ठेवलेला फोन फिरवीत असत. त्या क्षणी ती चूक दाखविल्याविना त्यांना चैन पडत नसे. पण, ही चूक दाखविताना त्यांच्याशी जे बोलणे होई, त्यातून त्यांचे चिंतन, अभ्यास, विषयातील सखोल जाण स्पष्टपणाने दृग्गोचर होत असे, दिसून येत असे. जीवनातील सहजता एवढी होती की, कुणाला सांगून फोन करणे वगैरे भाग राहतच नसे. संघकार्यालयातून बोलतो आहे, वगैरे उल्लेख अनेक जण फोनवर करीत असत, पण सुदर्शनजींचा त्यावर विश्‍वास नव्हता.
एकदा रात्री ११ वाजताची घटना होती. पेजेस गेल्यामुळे संपादक विभाग काहीसा सुस्तावला होता. फोन वाजला. त्या वेळी बिसन मानकर नावाचे एक शिपाई आत होते. ते फोनजवळ होते. त्यांनी फोन उचलला. फोनमधून शब्द आलेत- ‘‘मी सुदर्शन बोलतो आहे. सुधीर आहे?’’ फोन खाली ठेवून बिसन ओरडत निघाला- ‘‘पाठकसाहेब, कुणी सुदर्शन बोलतो आहे.’’ लागलीच धावत येऊन मी फोन घेतला. तो फोन सुदर्शनजींचा होता. त्यांचे बोलणे संपल्यावर फोन खाली ठेवला. बिसनला जवळ बोलावले. म्हटले, ‘‘असे ओरडत सांगू नये. माऊथपीसवर हात ठेवून बोलावे. ते रा. स्व. संघाचे सरसंघचालक सुदर्शनजी बोलत होते.’’ तो तर फक्त पाया पडायचाच बाकी राहिला होता. संपूर्ण तरुण भारतभर तो सांगत फिरत होता की, ‘‘मी सुदर्शनजी साहेबांचा फोन घेतला होता. त्यांनी मला सांगितले. मी सुदर्शन बोलतो. मी तसेच साहेबांना सांगितले. पण तो सुदर्शनजींचा फोन होता.’’ बिसन मानकरचे संपूर्ण जीवन त्या फोनने धन्य होऊन गेले होते. त्याला जमिनीवर यायला चार-दोन दिवस लागले होते.
कार्यालयातून फोन करताना त्यांनी स्वतः फोन न करता स्वीय सहायकाला फोन लावायला सांगावे वगैरे अधिकारीवर्गाने सांगावे, असा प्रयास केला, पण त्यांना ते शेवटपावेतो मान्य झाले नाही. तरुण भारतात फोन करायला कशाला हवी आहे औपचारिकता, यावर ते ठाम होते. त्यांनी आपली शैली कधीच बदलली नाही.
१९९७-९८ चा सुमार असेल. दै. तरुण भारतात परिवर्तनाचे वारे सुरू झाले. तत्कालीन संपादक श्री. लक्ष्मणराव जोशी वर्षभराने निवृत्त होणार होते. नवीन संपादक येणार होते. एके दिवशी नरकेसरी प्रकाशनाचे अध्यक्ष प्राचार्य विनायकराव फाटक घरी आलेत आणि म्हणाले, ‘‘दिल्लीला दै. जागरणमध्ये प्रशिक्षणासाठी जाता येईल काय? महिना-दीड महिना कितीही काळ थांबावे लागेल.’’ राहण्याची व्यवस्था काय वगैरेही विचारणा झाली. तशी कल्पना नव्हती म्हणून झंडेवालात राहण्याची व्यवस्था झाली. झंडेवालामध्ये सुदर्शनजींची भेट झाली. तेच दै. जागरणच्या संपादकांना पत्र देणार होते. ते पत्र घेतले आणि दै. जागरणला रोज जाणे सुरू झाले. कधी आय.एन.एस. भवनातील कार्यालयात, तर कधी नोएडात जावे लागत असे. या कालावधीत अधूनमधून सुदर्शनजींची भेट होत होती आणि काय प्रगती आहे, याबाबत ते विचारणा करीत असत. दीड महिन्याने सुदर्शनजींशी सविस्तर भेट ठरली. त्यानंतर मी नागपूरला परत जाणार होतो.
ती भेट खरोखर संस्मरणीय होती. एका अर्थानं ती मुलाखत होती, म्हटले तर संवाद होता. सुदर्शनजींसोबत तास-दीड तास बसण्याची ती पहिली वेळ होती, पण त्याचा कसलाही तणाव सुदर्शनजींनी माझ्यावर येऊ दिला नाही. त्या वेळी मला माहीत नव्हते, पण दै. जागरणच्या संपादकांकडून त्यांनीही माझ्या कामाची माहिती घेतली होती. भेट चांगली संस्मरणीय झाली. शेवटी मी त्यांना माझ्याकडून सांगितले, ‘‘मी शालेय व महाविद्यालयीन जीवनात अ. भा. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो. मध्यप्रदेश, विदर्भ व महाराष्ट्र प्रदेशात काम केले होते, पण या कालावधीत दैनंदिन शाखेत जाणे मात्र थांबले होते. मी तृतीय वर्ष काय, प्रथम वर्षही केले नव्हते.’’ माझे बोलणे संपल्यावर हसतहसत सुदर्शनजी विचारते झालेत- ‘‘अरे, तू किती वर्षं तरुण भारतात आहेस?’’ मला पंचवीस वर्षे झाली होती. मी तसे सांगितले. ते म्हणाले, ‘‘इतके वर्षं तरुण भारतात राहणे हे तृतीय वर्ष होण्यासारखेच आहे.’’ पुढे एकदा तरुण भारतच्या दिवाळी अंकासाठी सुदर्शनजींची मुलाखत मी घेत होतो तेव्हा असाच एक प्रश्‍न त्यांना विचारला होता, ‘‘स्वयंसेवक हा भाजपाचा असणे, परिषदेचा असणे, विहिंपचा असणे हे पर्याय असू शकतात काय?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुझा अनुभव काय म्हणतो? पण तुम्ही कुठेही असा, रोज संघस्थानावर एक तास जा. मनावरील मळभ दूर होते. कशासाठी आपण कार्यरत आहोत, याचे भान येते. जाणिवा प्रगल्भ होतात.’’
प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती पदावर आरूढ झाल्यात. त्यांना इंग्रजीत तर ‘राष्ट्रपती मॅडम’ संबोधता येत होते. पण, मराठीत काय? तरुण भारतात प्रसिद्ध झाले, ‘राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’ अन् त्यावर आक्षेप घेणारा फोन रात्री नऊ-सव्वानऊ वाजता आला. तो सुदर्शनजींचा होता- ‘‘प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती पदावर आहेत, असे जरूर म्हणा, पण जेव्हा त्यांना त्या पदाने संबोधण्याची वेळ येईल, त्या वेळी त्यांना राष्ट्राध्यक्षा म्हणा.’’ हे त्यांचे आग्रही प्रतिपादन होते. राष्ट्राध्यक्ष हा शब्दप्रयोग आपण अध्यक्षीय शासनप्रणालीत करू, हे त्यांना मान्य नव्हते. आजपावेतो आपल्याकडे राष्ट्राध्यक्षपद नाही. त्यामुळे आपण कुणालाच राष्ट्राध्यक्ष संबोधत नाही. प्रजातांत्रिक लोकशाहीवादी भारतात पद राष्ट्रपतींचं आहे हे सर्वांना ज्ञात आहे. त्यांना इंग्रजीतही अध्यक्ष संबोधिले जात नाही. त्यामुळे आपल्या राजकीय प्रणालीत अध्यक्षपद नाही. पण, राष्ट्रपती हे पद आहे व त्या पदावर स्त्री आहे म्हणून त्या पदावरील स्त्रीचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ करणे व्याकरणदृष्ट्या कदाचित बरोबर राहील, पण व्यवहारात ‘पत्नी’ या शब्दाचा अर्थ वेगळा आहे म्हणून तो शब्दप्रयोग वापरता येणार नाही. आपण मराठीत राष्ट्राध्यक्षा हाच शब्दप्रयोग रूढ करायला हवा. त्यातून अध्यक्षीय प्रणाली ध्वनित होणार नाही.
त्यांच्या या प्रतिपादनावर आमच्या संपादक विभागात चर्चा झाली. अनेकांना असे वाटत होते की, पंतप्रधान हा शब्दप्रयोग आपण जसा वापरतो तसे राष्ट्रपती प्रतिभाताईंना संबोधिले जावे. हा पर्याय मान्य नसणार्‍या काही सहकार्‍यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. आपल्या शैलीपुस्तिकेप्रमाणे आपण ‘राष्ट्राध्यक्षा’ हा शब्द प्रयोग वापरू, असा निर्णय संपादक म्हणून मी घेतला आणि प्रतिभाताई राष्ट्रपती पदावरून निवृत्त होईस्तोवर आम्ही कसोशीने वापरला. कुणीतरी प्रयोग करावा लागतो, आघाडी घ्यावी लागते, त्यामागे प्रेरणास्थान सुदर्शनजी होते.
साधारणत: दै. तरुण भारताला रा. स्व. संघाचे मुखपत्र मानण्याची फॅशन आहे. जेव्हा की माझा स्वतःचा जवळजवळ चार दशकांचा अनुभव आहे की, संघकार्यालयातून कधीही संपादकांना सूचना येत नाहीत की, अमुक विषयावर तुम्ही लिहा, असे मुद्दे घ्या, तमुक विषयावर लिहू नका. एखाद्या प्रश्‍नावर संपादकाचे जे स्वतःचे आकलन असते त्याप्रमाणे तो लिहितो. ते आकलन संघाचे मत आहे, असे समजून त्यावर टीकाटिप्पणी होत राहते. भाजपा-एनडीए सत्तेवर होते तेव्हा संघ- भाजपात-एनडीएत प्रत्येक विषयात एकमत नव्हते, एकवाक्यता नव्हती. रा. स्व. संघाच्या प्रतिनिधिसभेने त्या वेळी आयोडीनयुक्त मिठाची सक्ती अन् विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक या विषयावर नापसंती व्यक्त करणारे ठराव केले होते व त्या भूमिकेची अंमलबजावणी न केल्याबद्दल रालोआ सरकारवर टीका केली होती. सहसरकार्यवाह म्हणून सुदर्शनजींनी त्या पत्रपरिषदेला संबोधित केले होते व लागलीच प्रमोद महाजन यांनी नागपूरला येऊन पक्षाची भूमिका मांडली होती. हा सगळा प्रसंग गंभीर, आगळावेगळा होता. तो विषय मी सोडला असता तरी हरकत कुणीही घेतली नसती, पण मी तो विषय अग्रलेखासाठी घेतला. त्या संपूर्ण प्रश्‍नाबाबत माझे जे आकलन होते त्यानुसार अग्रलेख लिहिला. ते आकलन नक्कीच प्रतिनिधिसभेच्या आकलनापेक्षा भिन्न होते. दुसर्‍या दिवशी सकाळी खूप गोंधळ होईल, वगैरे माझी अपेक्षा होती. पण, सकाळी सकाळी सुदर्शनजींचाच फोन होता- कौतुक करणारा. वेगळा विचारबिंदू त्या अग्रलेखात आहे, याबाबत.
त्या अग्रलेखात मी पाञ्चजन्यच्या दिल्लीतील कार्यक्रमाचा उल्लेख केला होता. पंतप्रधान अटलजींना त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलविले होते व सरसंघचालक श्री. रज्जूभय्या अध्यक्षस्थानी राहणार होते. तुघलकचे संपादक चो रामास्वामी यांना सन्मानित करण्याचा तो सोहळा होता. पंतप्रधानपद व त्यांची सुरक्षाव्यवस्था याची माहिती आयोजकांना नव्हती. सहा वाजताचा कार्यक्रम व बरोबर सहा वाजता अटलजी आपल्या निवासस्थानाहून निघाले आणि कार्यक्रमस्थळी जाणारे सर्व रस्ते सुरक्षापथकाने बंद केलेत. त्यात पूजनीय सरसंघचालकांना घेऊन येणारी कार अडकली होती. अटलजी कार्यक्रमस्थळी आलेत अन् सरळ व्यासपीठावर गेले. रज्जूभय्यांची गाडी सोडा, असे संदेश गेलेत, पण तब्बल चाळीस मिनिटांनी सरसंघचालक व आयोजन समितीचे प्रमुख कार्यक्रमस्थळी पोहोचले. तोवर अटलजी एकटे व्यासपीठावर होते. समोर चो रामास्वामी, लालजी वगैरे बसले होते. हे उदाहरण नमूद करून मी लिहिले होते की, पंतप्रधान कार्यालय कसे चालते, त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेआड स्वतः पंतप्रधानही येऊ शकत नाही, हे आयोजकांना उमगले नाही म्हणून सरसंघचालक कार्यक्रमस्थळी उशिराने आलेत व नंतर उशिराने कार्यक्रम सुरू झाला. आमच्या लेखी कुणी कितीही महत्त्वाचा असला, वंदनीय असला तरी सुरक्षापथकाच्या दृष्टीने पंतप्रधान आणि फक्त पंतप्रधानच महत्त्वाचे राहतात. आयोजकांनी सरसंघचालकांना पंतप्रधान घरून निघण्याआधीच कार्यक्रमस्थळी आणले असते, तर अटलजी चाळीस मिनिटे फक्त श्रोत्यांकडे बघत व्यासपीठावर उपस्थित आहेत, असा प्रसंग घडला नसता.
सरकार म्हणून सरकारचे आकलन, सरकारला असणारी माहिती व बाकी इतर सर्वांना असणारी माहिती भिन्न राहते. त्यामुळे भाजपा व संघाच्या प्रतिनिधिसभेच्या आकलनात भिन्नता आहे, असे मी नमूद केले होते.
तसाच नाजूक प्रसंग भामसंचे दत्तोपंत ठेंगडी अन् अटलजी यांच्या संदर्भात नागपूरला उद्भवला होता. पंतांनी अटलजींना ‘गिनिपिग’ संबोधिले होते. त्यावरही माझा अग्रलेख वादळी ठरला होता. त्याच्याही भूमिकेबाबत सुदर्शनजींची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडली होती.
चालताबोलता ज्ञानकोश असणार्‍या सुदर्शनजींबरोबर संवाद साधणे हा विलक्षण आनंदाचा भाग राहत असे. आपल्याला त्यातून भरपूर ज्ञानाचा साठा मिळत असे. आसाम प्रश्‍न असो, की पंजाबचा विषय असो, इतरांना असते त्यापेक्षा वेगळी माहिती सुदर्शनजींजवळ राहत असे.
स्वदेशीबाबत ते फार आग्रही राहत असत. संघाचे एक ज्येष्ठ अधिकारी परदेश दौर्‍यावर गेले होते. त्या ठिकाणी त्यांना ५० शिट्‌ट्यांचा संच भेट म्हणून मिळाला होता. नागपूरला आल्यावर त्यांनी त्या शिट्‌ट्या विभिन्न कार्यकर्ते, स्वयंसेवक, अधिकारी यांना देण्याचे ठरविले. पण, त्या शिट्‌ट्या विदेशी. संघात चालतील काय, हा प्रश्‍न होता. त्यांनी सुदर्शनजींना विचारले. सुदर्शनजींनी लागलीच होकार भरला, पण होकार भरताना सांगितले, ‘‘या शिट्‌ट्या त्या देशातील पैशातून निर्माण झाल्या आहेत. तो पैसा आपला नाही. त्यामुळे या शिट्‌ट्या भेट देणार्‍यांसाठी देशीच होत्या. त्या आपण वापरायला हरकत नाही.’’
वैचारिक स्पष्टता असली तरी इतरांचे विचारस्वातंत्र्य, चिंतनस्वातंत्र्य त्यांना मान्य होते. वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्याशी मैत्री करायला सुदर्शनजींना आवडत असे. साम्यवादी नेता श्रीपाद अमृत डांगे यांची कन्या- माजी खासदार रोझा देशपांडे व त्यांचे पती बानी देशपांडे हे सुदर्शनजींच्या अभिन्न मित्रांपैकी होते. मुंबईत गेल्यावर त्यांच्याशी गप्पा मारल्याविना सुदर्शनजी मुंबई सोडत नसत.
नागपूरलाही ख्यातनाम साहित्यिक प्राचार्य राम शेवाळकर त्यांचे खास मित्र होते. ‘पाणियावर मकरी’ हे आपले आत्मचरित्र सुदर्शनजींना द्यायची रामभाऊंची इच्छा होती. त्यांनी ‘कधी भेटायला येऊ’ वगैरे म्हणून संपर्क साधला. दुसर्‍या दिवशी नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात कुठला तरी कार्यक्रम होता. कार्यक्रम आटोपल्यावर सुदर्शनजी थेट रामभाऊंच्या घरी पोहोचले. सुदर्शनजींचे आगतस्वागत झाले. प्यायच्या पाण्याचे ग्लास घेऊन रामभाऊंच्या सुनबाई समोर आल्यात. सर्व ग्लासेस पाण्याने भरलेले होते. सुदर्शनजी हसत हसत म्हणाले, ‘‘सर्वांना पूर्ण ग्लासभर पाणी प्यावे एवढी तहान नसते. आपण अर्धा ग्लास द्यावा. ज्याला अजून लागेल तो मागून घेईल. पण बाकीच्या ग्लासमधील पाणी वाया जात नाही.’’ अशा लहानलहान बाबींबाबत सुदर्शनजी फार आग्रही होते.
ते संघाचे बौद्धिकप्रमुख होते तसेच शारीरिकप्रमुखही होते. नियुद्धातील ते आक्रमक खेळाडू होते. ही दोन्ही पदे भूषविणारे ते संघातील एकमेव अधिकारी होते. या दोन्ही क्षेत्रांत त्यांची तज्ज्ञता वादातीत होती.
२१ मार्च २००९ याच रेशीमबागेत उगवला होता. संघाचे सरकार्यवाह असणारे डॉ. मोहनजी भागवत यांनी सरकार्यवाह पदाचे दायित्व सोडले होते. सुदर्शनजींनी त्यांना जवळ बसवून घेतले आणि आपले उद्बोधन सुरू केले. ‘‘माझी प्रकृती आता पूर्वीसारखी दायित्व उचलण्यासाठी चांगली राहत नाही. विस्मरणाचा एक भाग आता जीवनात आला आहे. तासभर एखाद्या व्यक्तीशी गप्पा मारल्यावरही ती व्यक्ती आठवते, पण नाव आठवत नाही. कोण भेटले होते हे समोरच्याला काय सांगावे, असा प्रश्‍न पडतो. ही स्थिती सरसंघचालकाला चांगली नाही म्हणून मी हे पद सोडत आहे व ही जबाबदारी डॉ. मोहन भागवतांवर सोपवत आहे.’’
जितक्या सहजतेने जबाबदारी स्वीकारली होती, तेवढ्याच सहजतेने त्यातून सुदर्शनजी मुक्तही झाले होते. त्यानंतर चार-दोन दिवसांनी महालातील संघ मुख्यालयात जाण्याची वेळ आली. संध्याकाळची मोहिते शाखा लागली होती अन् चार-दोन दिवसांपूर्वीपावेतो सरसंघचालक असणारे सुदर्शनजी बालगण घेत होते. त्यांचे गणशिक्षक झाले होते. एवढी सहजता, साधेपणा संघाशिवाय अन्य संघटनेत बघणेही शक्य नाही. फार कशाला, मार्च १२ मध्ये झालेल्या प्रतिनिधिसभेत सुदर्शनजी सर्व प्रतिनिधींबरोबर खाली सतरंजीवर बसले होते व सांगत होते, ‘‘माजी सरसंघचालक. पण स्वयंसेवक तर आयुष्यभर राहणार आहे. तेव्हा इथे बसणं हे कर्तव्य आहे.’’
एका अर्थाने बघितले, तर सुदर्शनजी आगळेवेगळे होते. प्रत्येकाच्या मनात ते स्वत:चे स्थान कधी निर्माण करून जात ते समजतही नव्हते. म्हणूनच सुदर्शनजींच्या निधनाचे वृत्त येताच फक्त संघस्वयंसेवक आणि भाजपाचेच नेते त्यांच्या अंत्यदर्शनाला आले होते असे नाही, तर विविध पक्षांतील आणि विविध धर्मांतील लोकही त्या ठिकाणी आले होते. त्यात मुसलमान होते, ख्रिश्‍चन होते, बौद्धधर्मीय होते आणि विविध राजकीय छटांचे प्रतिनिधित्वही त्यांत होते. असे सुदर्शनजी प्रत्येकाच्या मनात स्वत:चे चिरंतन स्थान निर्माण करून राहतील, यात शंका नाही. जे जीवनकार्य सुदर्शनजींनी स्वीकारले होते, ते पूर्णत्वाला नेणे हीच पुरुषोत्तम मासाच्या अखेरच्या दिवशी दिवंगत झालेल्या रा. स्व. संघाच्या पाचव्या सरसंघचालकांना खरी श्रद्धांजली ठरेल.