This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
•चौफेर : अमर पुराणिक•
गेल्या वीस वर्षात देशात इतके दहशतवादी हल्ले झाले, बॉम्ब स्फोट झाले, अब्जावधींची भ्रष्टाचारांची प्रकरण उघडकीस आली तेव्हा या अमीर खान, शाहरुख खानाला असुरक्षित वाटले नाही. पण आता मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात अशा घटना घडल्या नाहीत तरी या खानाला अचानकच असुरक्षित वाटू लागते याला काय म्हणावे. प्रेक्षक, जनता दूधखूळी वाटली की काय याला? बिहार निवडणूकीआधीपासून काही सेक्यूलर विचारवंत, लेखकांकडून आणि विशेषत: माध्यमांकडून पद्धतशीरपणे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यात आता चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि अमीर खानची भर पडली आहे.
अभिनेता अमीर खाननं त्याची बायको किरण रावला भारतात असुरक्षित वाटतयं असं विधान करुन देशात वातावरण भडकवले आहे. देशात असहिष्णूता वाढतेय असं भोंगळ कारण पुढे करत पुरस्कार परत करणार्‍यांचा पुरस्कार वापसीचा अध्याय संपला न संपला तोच या अमीर खानानं याचा दुसरा अध्याय सुरु केला. देशात असहिष्णूता वाढतेय असे काल्पनिक वातावरण निर्माण करत देशात प्रचंड असुरक्षितता असल्याचा भास निर्माण करण्यासाठी हा टुकार अभिनेता अशी विधानं करुन भारतासारख्या सहिष्णू देशात सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करतोय, भारतीय जनतेला ब्लॅकमेल करतोय. त्यात तथाकथित सेक्यूलर माध्यमं, विचारवंत आणि कॉंग्रेस, डावे व्यक्ती स्वतंत्र्याच्या नावाखाली तेल ओतण्याचं काम करताहेत. या कृत्यालाही अनेक पैलू आहेत. अशी विधानं करण्यापाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मोदी सरकार अस्थिर करणे, देशातील शांततेला आणि विकासाला खीळ लावणे आहे.
गेल्या वीस वर्षात देशात इतके दहशतवादी हल्ले झाले, बॉम्ब स्फोट झाले, अब्जावधींची भ्रष्टाचारांची प्रकरण उघडकीस आली तेव्हा या अमीर खान, शाहरुख खानाला असुरक्षित वाटले नाही. पण आता मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात अशा घटना घडल्या नाहीत तरी या खानाला अचानकच असुरक्षित वाटू लागते याला काय म्हणावे. प्रेक्षक, जनता दूधखूळी वाटली की काय याला? बिहार निवडणूकीआधीपासून काही सेक्यूलर विचारवंत, लेखकांकडून आणि विशेषत: माध्यमांकडून पद्धतशीरपणे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यात आता चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि अमीर खानची भर पडली आहे. काही दिवसांपुर्वी शाहरुख खाननेही अशीच वाह्यात विधानं केली होती. या अमीर खान आणि शाहरुख खानाला या देशातील जनतेने मोठे केले. आफाट पैसा आणि प्रसिद्धी दिली. चाहत्यांनी यांना आपल्या गळ्यातला ताईत बनवलं. हे टुकार अभिनेते याचा अर्थ असा घेत आहेत की यांनी काहीही केलं तरी यांचे चाहते यांना डोक्यावर घेतील. पण अमीर खान, शाहरुख खान विसरत आहेत की, जर देशद्रोही विधानं आणि कृत्यं केली तर जनता यांना पायदळी तुडवून काढल्याशिवाय राहणार नाही. या देशात राहून इथल्या जनतेच्या पैशावर मोठे झालेल्या या बांडगुळांना याच देशातील जनता उखडून फेकायला कमी करणार नाही हे विसरु नये.
आज ज्येष्ठ पत्रकार, ‘सडेतोड’कार कै. अरुण रामतीर्थकर सर आपल्यात नाहीत. अमीर खानचं हे प्रकरण चालू झाल्यापासून रामतीर्थकर सरांची प्रकर्षाने आठवण होतेय. रामतीर्थकर सर जर आज असते तर ‘देश सोडून चालता हो!’ अशा मथळ्याचा ‘सडेतोड’ त्यांनी तरुण भारतमध्ये लिहिला असता. अक्षरश: रामतीर्थकर सरांनी या खानाची पीसं काढली असती. या देशाने यांना इतके मोठे केले. मान, पैसा, प्रेम, प्रसिद्धी दिली. शेवटी हे या देशावरच उलटले. आणि म्हणतोय भारतात असुरक्षित वाटतयं. जर भारतात तशी परिस्थिती असती तर अमीर खान, शाहरुख खान ही नावं देखील कोणाला माहित झाली नसती. आज हे बोलण्याचं धाडस हा करतोय किंवा हे बोलण्याचं स्वातंत्र मिळालय ते मिळालं असतं का?
देशात असहिष्णूता असल्याचा कांगावा करत देशाची बदनामी करण्याचे षडयंत्र पद्धतशीरपणे राबले जातेय. या षडयंत्राच्या माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे आणि देशाच्या प्रगतीच्या वाटेत काटे पसरवण्याचे काम याच देशातील या सेक्यूलर मंडळींकडून करवून घेतले जातेय. गेल्या दिड वर्षात पंतप्रधान मोदी यांनी घेतलेले राष्ट्रहीताचे निर्णय या बांडगुळांना त्रासाचे वाटताहेत. मुंबईच्या सिनेसृष्टीतील या सेक्यूलरांच्या पाचावर धारण बसण्याचे आणखी एक कारण आहे. देशातील अतिरेकी कारवाया उखडून फेकण्याच्यादृष्टीने सरकार पावले टाकतेय. दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी मोदी सरकारकडून फास आवळला जातोय. त्याचा हा परिणाम आहे. या सेक्यूलरवाद्यांना आणि विशेषत: मुंबई चित्रपटसृष्टीतील काही लोकांनी याचा धसका घेतला आहे. मुंबईच्या चित्रपटसृष्टीवर दाऊद इब्राहिमची पकड आहे. येथील काही लोकांचे साम्राज्य दाऊद इब्राहिमच्या पाठींब्यावर उभे आहे. दाऊदची हिंदी चित्रपटसृष्टीवरील पकड सुटू नये, जर दाऊद पकडला गेला तर यांची दुकाने बंद पडतील म्हणून हा अकांडतांडव केला जातोय. जसजसे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अधिक आक्रमक होतील आणि दाऊदच्या मुसक्या आवळत जातील तसतसे या सिनेसृष्टीतील काही सेक्यूलरांचा थयथयाट वाढत जाणार आहे.
या देशातील जनतेने यांना इतके प्रेम दिले, पैसा दिला, पण हे अमीर खान, शाहरुख खान कधीही कोणत्या सामाजिक कामात योगदान देताना दिसलेले नाहीत. या देशातील जनतेच्या जीवावर मिळालेल्या पैशावर हे लोक इतकी माजोरी भाषा बोलताहेत. महाराष्ट्रात शेतकर्‍यांनी इतक्या आत्महत्या केल्या तेव्हा यांना सहिष्णूतेची जाणिव झाली नाही. अभिनेता अक्षय कुमारने आत्तापर्यंत जवळजवळ एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना दिली आहे. तेही कोणताही गवगवा न करता. अजुनही मदत करतोच आहे. पण प्रसारमाध्यमांना या बातमीला प्रसिद्धी द्यावीशी वाटली नाही. पण हा अमीर खान ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमातून कोट्‌यवधी रुपये घेऊन लोकांना शहाणपणाचे उपदेश देतोय. पण कोणत्याही सामाजिक समस्येत, राष्ट्रीय समस्येत या अमीर खानने कवडीची मदत केली नाही. उलट कोट्यवधी रुपये खिशात घालून फुशारकी मारतोय. जेव्हा देशात दहशतवादी हल्ले झाले, शेकडो लोक मारले गेले, नैसर्गिक दुर्घटना घडल्या तेव्हा यांची सहिष्णूता कोठे वाळुत तोंड खुपसून बसली होती. देशाच्या सीमेवर भारतीय जवानांचे मुडदे पडत होते तेव्हा यांना असहिष्णूता वाटली नाही का?
अशा संधीसाधू आणि देशप्रेमाचा लवलेश नसलेल्या अभिनेत्यांना त्यांची जागा जनता दाखवेलच दाखवेल. सोशल मिडीयात अमीर खानच्या विकृत विधानावरुन तुफान वादळ उठलेय. अमीर खान आणि शाहरुख खानवर प्रचंड टीकेची झोड उठली आहे. यांचे चित्रपट पाहू नये, त्यांनी केलेल्या जाहिरातींची उत्पादने घेऊ नये अशी आवाहनं करणारी, विनंती करणारे पोस्ट फिरताहेत, केवळ फिरतच नाहीत तर अशा पोस्टचा अक्षरश: पूर आलाय. अमीर खान ब्रँड अम्बॅसीडर असलेल्या स्नॅपडील या कंपनीला याचा खूप मोठा फटका बसला आहे. स्नॅपडीलचं ऍप धडाधड अनइनस्टॉल केले जात आहे. या शिवाय अमीर खानने जाहिराती केलेल्या इतर कंपन्यांनाही याचा फटका बसला आहे.
गेल्या पंधरा-वीस वर्षात जेव्हा एखादा मोठ्‌या बजेटचा चित्रपट प्रदर्शित होणार असतो तेव्हा चित्रपटाचे प्रमोशन केले जाते. त्याचबरोबर अशी वादग्रस्त विधानं करुन चित्रपटाची हवा निर्माण करण्याची कुप्रथा पडली आहे. टूकार चित्रपट काढून असला गदारोळ माजवून गल्ला जमवला जातो. हा ट्रेंड घातक आहे. अमीर खान, शाहरुख खान यांचे चित्रपट गुणवत्तेच्या जोरावर आणि स्वत:च्या बळावर, अभिनयाच्या बळावर कधीच चाललेले नाहीत. परफेक्शनिस्ट हे अमीर खानचे नामाभिधान माध्यमातील काही टूकार दलालांनी दिलेले आणि स्वयंघोषित आहे. हा लेकाचा इंग्रजी किंवा विदेशी चित्रपटांच्या कथा चोरून ऑस्कर पुरस्कार मागायला निघालाय. अन्यथा अशा टुकार अभिनेत्यांना आपले चित्रपट चालावे म्हणून स्टंटबाजी करण्याची गरज पडली नसती. लवकरच अमीर खानचा ‘दंगल’ आणि शाहरुख खानचा ‘दिलवाले’ प्रदर्शित होतोय. हे चित्रपट चालावे हाही या वादातून परभारे लाभ उठवण्याचा प्रयत्न आहे. भले देशात अराजकता निर्माण झाली तरी चालेल पण यांचा गल्ला जमला पाहिजे. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याआधी असली वाह्यात विधाने करुन चित्रपटाकडे लोकांना आकर्षित करण्याचा धंदा झाला आहे.
आजची परिस्थिती पाहता आता असले उद्योग बंद होतील अशी आशा आहे. जनतेला आता पडद्यामागील स्थिती कळत आहे. यांना जनताच धडा शिकवेल. आता वाद्रग्रस्त विधानं करुन, वादळ उठवून नंतर माफी मागेल. जनताही विसरुन जाईल. आजपर्यंत असेच झाले आहे पण यावेळी मात्र या अमीर खान आणि शाहरुख खान यांनी कितीही याचना केली, माफी मागितली तरीही प्रेक्षक त्यांना माफ करणार नाहीत. अशी देशविधातक विधाने करणार्‍या लोकांचे चित्रपट जनता  पाहणार नाही. अशांचे चित्रपट जनतेच्या पैशावर चालतात. अशा विकृतांचे सिनेमे न पाहता लोक जोरदार झटका देणार अशी स्थिती आहे. आता कितीही माफी मागीतली तरी जनता क्षमा करणार नाही.
•चौफेर : अमर पुराणिक•
मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शिद यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीवर बोलताना मणीशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे याचना केली, अक्षरश: भीक मागितली आहे की, पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवावे. भारतीय जनतेने बहुमताने निवडलेले सरकार हटवण्याची मागणी भारताच्या विरोधी पक्षाचा नेता, कॉंग्रेसचा नेता पाकिस्तानकडे करतो यातच यांच्या राष्ट्रद्रोही वृत्तीचे पुरावे आले.
नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्याचा आनंद जदयु-राजद आणि महागठबंधनातील इतर पक्षांना नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला आणि त्यांना आनंद होणे स्वाभाविक ही आहे. पण, बिहारमधील विजेत्या पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला नसेल इतका आनंद पाकिस्तानला झाला. पाकिस्तानला आनंद होण्याचे कारण लालूप्रसाद यादव-नीतिश कुमार हे विजयी झाले यापेक्षा भाजपा पराभूत झाल्याचा हा असूरी आनंद होता. पाकिस्तानमध्ये या विजयाचा आनंदोत्सव बिहारपेक्षा मोठ्‌याप्रमाणावर साजरा केला गेला.
पाकिस्तानला भाजपा पराभूत झाला, मोदींना पराभव पहावा लागला याचा इतका हर्षवायू झाला की, पाकिस्तानला त्यांच्या परराष्ट्र धोरणाचेही भान राहिले नाही. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर यामुळे पाकिस्तानची भारताबद्दल आणि विशेषत:  पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारबद्दलची नेमकी भूमिका आणि मानसिकता आपोआपच मांडली गेली. पाकिस्तानला मोदी यांच्या नेतृत्वातील उभरता भारत पाहायचा नाहीये. त्यांना भारतात कॉंग्रेसच्या नेतृत्वातील पाकधार्जिणे सरकार हवे आहे. दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानच्या तोंडाला मोदींच्या खंबीर नेतृत्वाला तोंड देताना अक्षरश: फेस येत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाकिस्तानला अशा बिकट परिस्थितीचा सामना करण्याची बहूदा पहिल्यांदाच वेळ आली आहे. भारतात मोदींचे भाजपा सरकार नकोय असे पाकिस्तानला जसे वाटतेय तसेच भारतातील सेक्यूलरवाद्यांनाही वाटतेय. विरोधी पक्षांना तर हे वाटणे स्वाभाविकच आहे. पण विशेषत: कॉंग्रेस, डावे आणि नीतिश कुमार, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव यांना सत्तेची प्रचंड लालसा लागली आहे. त्यासाठी ते पाकिस्तानचीही मदत घेताहेत. हे सत्तालोलूप विरोधक आणि सेक्यूलरवाद्यांना सत्ता उपभोगायची आहे, त्यांना सत्तासुंदरीचा विरह ५ वर्षेही सहन होईना. मग त्यासाठी देश गहाण ठेवण्याचीही त्यांची तयारी आहे. बिहारच्या जनतेला हे कळले नाही हे या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.
गेल्या अनेक दशकांपासून भाजपाला सत्ता मिळू नये म्हणून निकराचे प्रयत्न झाले आहेत. भाजपाचा, नरेंद्र मोदींचा पराभव व्हावा म्हणून आंतरराष्ट्रीय स्थरावरुन मोठे प्रयत्न झालेत, होताहेत. भाजपाची सत्ता उलथून टाकण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न विदेशातून होताहेत. त्याला या देशातील कॉंग्रेसचे नेते, डावे आणि सेक्यूलर मंडळी साथ देताहेत. त्यासाठी या सेक्युलर मंडळींची पाकिस्तानचे मांडलिकत्व स्विकारण्याचीही तयारी आहे. पाकिस्तान, ख्रिश्‍चन मिशनर्‍या आणि बर्‍याच स्वयंसेवी संस्था अनेक दशकांपासून हाच प्रयत्न करताहेत. पाकिस्तानने भारतातील काही माध्यमांना हाताशी धरून दशकानुदशक हा अघोरी सारिपाट मांडला आहे. राजदीप सरदेसाई, बरखा दत्तसारखे माध्यमातील काही प्रेस्टीट्यूट वृत्तीचे लोक स्वार्थासाठी देशविघातक कृत्यं करत आहेत.
भारतातील प्रत्येक घटनेवर पाकिस्तानचे बारिक लक्ष असते. पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्था भारतातील असल्या सेक्यूलर बांडगुळांचा सर्रास वापर करत असते. बिहार निवडणुकांचे वेध लागल्यानंतर अचानक भारतात असहिष्णूता फोफावल्याचा साक्षात्कार या सेक्यूलर विचारवंतांना झाला. आणि त्यांनी एका पाठोपाठ एक पुरस्कार वापसी सुरु केली. सतत भाजपा आणि मोदी सरकारविरोधात वाट्टेल तशी विधाने करणे सुरु केले आणि माध्यमांनी ती विधाने मसाला लावून भडकपणे दाखवली. आता बिहारच्या निवडणुका संपल्यापासून हे सेक्यूलर विचारवंत कुठल्या बिळात लपून बसले आहेत. की बिहारच्या निवडणुका संपल्यानंतर एकदमच भारतातील असहिष्णूता संपली आहे? बिहारमध्ये भाजपाची सत्ता येऊ नये म्हणून या सेक्युलर विचारवंतांनी असहिष्णुतेची अवई उठवली होती. पाकिस्तानलाही बिहारमध्ये भाजपाचे सरकार येऊ नये असे वाटत होते हे त्यांनी भाजपाचा पराभव साजरा केला यावरून दिसून येतेच ना! सेक्यूलर विचारवंतांना मोदी सरकारचा राग येण्याचे दुसरे एक कारण असावे. ते म्हणजे मोदींनी विदेशी एनजीओकडून येणार्‍या पैशावर चाप लावला आहे. त्यामुळे यांचे चोचले थांबले आहेत हाही राग असावा.
मूळात केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आल्यापासून पाकिस्तानच्या पाचावर धारण बसली आहे. मोदींनी पाकिस्तानच्या मुसक्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्थरावर आवळायला सुरुवात केली आहे. पण लोकसभेत भाजपाकडे बहूमत असले तरी राज्यसभेत भाजपाचे बहूमत नाही. आणि जर भाजपाने बिहारच्या निवडणुका जिंकल्या असत्या तर भाजपा राज्यसभेतही बहुमताजवळ पोहाचली असती आणि जर भाजपा राज्यसभेत बहुमताजवळ पोहोचली असती तर मग भाजपा अनेक राष्ट्रहीताचे निर्णय कोणत्याही अडथळ्याविना घेऊ शकली असती. मोदी सरकारने आता घेतलेला विकासाचा वेग चौपटीने वाढला असता. मग पाकिस्तानची पळता भूई थोडी झाली असती. याच भीतीतून पाकिस्तानने भारतातील या व्हाईट कॉलर्ड सेक्युलर दलालांकरवी खेळी सुरु केली आणि बिहारची जनता या खेळीत फसली आणि देशाचे प्रचंड मोठे नुकसान करुन गेली.
नीतिश कुमारांच्या विजयोत्सवात सामिल झालेली मंडळी पाहिली की अनेक बाबीचा उलगडा होतो. नीतिश कुमारांना शुभेच्छा द्यायला बरखा दत्त स्वत: बिहारला गेल्या होत्या इतकेच नाही तर नीतिश कुमारांना शुभेच्छा देतानाचा फोटोही ट्वीटरवर टाकला होता. पुरस्कार वापसीतील बरीच मंडळी या विजयाने आनंदून गेली आहेत. असहिष्णूतेचा दंभ खास बिहार निवडणुकीसाठीच राबला गेला की काय? ही शंका आता खरी ठरली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्यावेळीही असेच प्रकार घडले. ही सर्व सेक्यूलर मंडळी आम आदमी पार्टीच्या पाठीशी उभी राहिली. अरविंद केजरीवाल यांनीही त्यावेळी पाकिस्तानची हाजी-हाजी केली होती. त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये घडली. अशा सेक्यूलरांच्या पाठींब्यामुळे आणि भारतविरोधी राष्ट्राच्या मदतीने भारताच्या विकासात अडथळा आणून पाकधार्जिणे सरकार भारतात आणण्याचा प्रयत्न होतोय. आता बिहारमध्ये सत्ता मिळाल्यानंतर नीतिश कुमारांना पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहेत. तेही याच जोरावर लागलेले असावेत.
याचा आणखीन एक लख्ख पुरावा म्हणजे काही दिवसांपुर्वी कॉंग्रेस नेते मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शिद यांनी केलेली विधाने. मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शिद यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीवर बोलताना मणीशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे याचना केली, अक्षरश: भीक मागितली आहे की, पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवावे. भारतीय जनतेने बहुमताने निवडलेले सरकार हटवण्याची मागणी भारताच्या विरोधी पक्षाचा नेता, कॉंग्रेसचा नेता पाकिस्तानकडे करतो यातच यांच्या राष्ट्रद्रोही वृत्तीचे पुरावे आले. याच कार्यक्रमात पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ ही होते. त्यांनी मणीशंकर अय्यर यांच्या विधानावर नापसंती व्यक्त करत पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही असा जोडा हाणला. याचा अर्थ असा होतो की, भारतात भारतीय नागरिकांनी लोकशाही मार्गाने निवडलेले सरकार हटवण्याची मागणी पाकिस्तानकडे करणे म्हणजे या देशातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. या कॉंग्रेस नेत्यांना आणि सेक्यूलरांना या सरकारला काम करण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी देण्याचीही इच्छा नाही. इतकी सत्तापिपासा या कॉंग्रेस नेत्यांना लागली आहे.
मणीशंकर अय्यर, सलमान खुर्शिद यांची विधाने, बिहारमधल्या भाजपाच्या पराभवाचा पाकिस्तानातील विजयोत्सव आणि प्रसारमाध्यमातील बरखा दत्त, राजदीप सरदेसाई यांच्यासारख्या माध्यमातील लोकांची आणि सेक्युलर विचारवंताची भूमिका पाहिल्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी मागे काही महिन्यांपुर्वी केलेले एक विधान आठवते की, भारताच्या डीप असेटस पाकिस्तान, चीनमध्ये  नाहीत. पण पाकिस्तानच्या डीप असेटस भारतात प्रचंड मोठ्‌याप्रमाणात आहेत. पाकिस्तानसह इतर शत्रु राष्ट्रांनी जहाल अतिरेक्यांपासून ते व्हाईट कॉलर्ड विचारवंतांपर्यंत डीप असेटस भारतात पेरलेले आहेत. पाकधार्जिणी काही मंडळी, पुरस्कार वापसीवाले सेक्यूलर विचारवंत, माध्यमातील काही लोक, कॉंग्रेस, डावे यांसारखे पक्ष पाकिस्तानी डीपअसेटसचे भाग असावेत? यासाठीच आता संपुर्ण भारतीय जनतेने हे समजून सावध वागण्याची वेळ आली आहे.
•चौफेर : अमर पुराणिक•
राष्ट्रीय स्थरावर मोदींच्या करिश्म्यावर निवडणूका भाजपा सहज जिंकेल पण स्थानिक स्थरावर भाजपा कमकुवत आहे. भाजपाला आता स्थानिक स्थरावर पक्षबांधणीकडे लक्ष देण्याशिवाय पर्याय नाही. लोकसभा निवडणूका जिंकल्यानंतर भाजपाकडून स्थानिक स्थरावर पक्षबांधणीच्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसले नाहीत. आता बिहारच्या निकालानंतर भाजपाला पक्षबांधणीचा विचार करणे अपरिहार्य आहे. कारण कोणत्याही पक्षाचे खरे बळ हे स्थानिकबळावर अवलंबून असते.
नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. लालूप्रसाद यादव, नीतिश कुमार यांच्या महागठबंधनने निर्विवाद बहूमत मिळवले. भाजपाचा पराभव झाला. अनेकजण आपापल्यापरिने निकालाचे विश्‍लेषण मांडत आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने चांगले काम करुनही भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले लालूप्रसाद यादव यांनी या निवडणुकीत नीतिश कुमारांना मागे टाकत सर्वाधिक जागा जिंकल्या. हे बिहारसह बिहार बाहेरील जनतेला आश्‍चर्यकारक वाटले. याचे एक प्रमुख कारण म्हणजे विकासाच्या राजकारणावर जातीच्या राजकारणाने मात केली हे आहे. याशिवायही अनेक पैलू आहेतच. हा पराभव भाजपाचा आहे की बिहारच्या जनतेचा हा मात्र खूप चिंताजनक प्रश्‍न आहे.
आजपर्यंत बिहार अतिशय मागासलेला राहिला आहे. या निकालानंतर बिहारच्या जनतेला भाजपाचे विकासाचे राजकारण समजू शकले नाही का? असा प्रश्‍न निर्माण होतो.  बिहारमधील वस्तूस्थिती अशी आहे की, बिहारमध्ये उद्योगधंदे नाहीत. वैद्यकिय सेवा उपलब्ध नाहीत. बिहारी जनतेला प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे बिहारी लोक इतर राज्यात पलायन करतात. उपजीविकेसाठी विकसित राज्यात जाण्याला त्यांच्यासमोर पर्याय नाही. आजपर्यंत बिहार अविकसित राहिल्यानेच इतर विकसित राज्यांसह महाराष्ट्रात बिहारींचे लोंढे येऊ लागले. याला बिहार राज्य सरकारच जबाबदार आहे. आजपर्यंत लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार यांनी प्रदीर्घकाळ बिहारची सत्ता चालवली आहे. आजपर्यंत मागास राहिलेल्या बिहारची सत्ता आता पुन्हा बिहारच्या जनतेने लालूप्रसाद आणि नीतिश कुमार यांनाच सोपवली आहे. सोशलमिडियात आता पुन्हा महाराष्ट्रात बिहारींचे लोंढे येण्याचे प्रमाण वाढणार असल्याच्या व्यंगात्मक पोस्ट फिरु लागल्या आहेत. याचा अर्थ बिहारच्या जनतेला विकास नकोय असा होत नाही. पण अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेल्या बिहारच्या जनतेला पटवण्यात लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार यशस्वी झाले आहेत आणि भाजपा अयशस्वी ठरली आहे.
विकासाच्या राजकारणापेक्षा बिहारमध्ये आजपर्यंत जातीचे राजकारणच प्रभावी ठरले आहे. जातीगत व्यूहरचना करण्यात भाजपा अपयशी ठरली आहे. लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार यांनी भाजपा सत्तेत आली तर तुमचे आरक्षण काढून घेईल अशा प्रकारची भीती दाखवत सर्व मागास जातींना एकत्रितपणे आपल्याकडे खेचण्यात यशस्वी ठरले आहेत. याशिवाय यादवांसह इतर उच्चवर्गियांनीही लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार यांनाच झुकते माप दिले आहे. या निवडणूकीत भाजपा न मागासवर्गीयांची मते मिळवू शकला ना उच्चवर्गीयांची. या शिवाय सर्वात प्रभावी ठरणारे मुस्लिम गठ्ठा मतदान लालूप्रसाद यादव, नीतिश कुमार आणि कॉंग्रेस यांच्याच पदरात पडले. बिहारमध्ये सर्वात जास्त मतदान मुस्लिम मतदारांचे आहे. त्यामुळे भाजपाला नेहमीप्रमाणे केवळ मागासवर्गीय आणि उच्चवर्गीय मते मिळणे अपेक्षित होते. पण भाजपाला ही मते आपल्याकडे खेचता आली नाहीत. जितनराम मांझी, कुशवाह आणि रामविलास पासवान हे तिघेही निष्प्रभ ठरले. या तीनही दलित नेत्यांचा भाजपाला काडीचाही फायदा झाला नाही. हे भाजपाचे सर्वात मोठे अपयश म्हणावे लागेल. याशिवाय स्थानिक भाजपा नेत्यांचा प्रभाव निवडणुकीत दिसला नाही. काही अभ्यासकांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांना बिल्कूलच बळ नसल्याचे मत मांडले आहे शिवाय हे स्थानिक नेते संघटीतपणे लढले नाहीत त्यासाठी निकराचे प्रयत्न स्थानिक नेत्यांकडून झाले नाहीत. स्थानिक नेत्यांच्या हेव्यादाव्यांचा फटका भाजपाला बसला आहे. भाजपाकडे बिहारमध्ये राज्यस्थरावर प्रभाव असलेला लोकनेता नाही हे अधोरेखित झाले आहे.
मुळात बिहारची सामाजिक स्थितीच अशी आहे की, बिहार राज्य हे इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही वीस ते तीस दशके मागे आहे. इतर सुशिक्षित राज्यांच्या तुलनेत अशिक्षित आणि जंगलराज असलेल्या बिहारची निवडणूक लढताना भाजपाला वेगळी रणनीती आखणे आवश्यक होते. कारण लोकसभेच्या निवडणूका वेगळया पद्धतीने लढल्या जातात, विधानसभेच्या वेगळ्या तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका त्याहून वेगळया मुद्द्यांवर होत असतात. मतदारही लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणूका वेगवेगळे पैलू समोर ठेऊन मतदान करत असतो. विधानसभा आणि स्थानिक निवडणूका जिंकण्यासाठी स्थानिक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे मजबूत बळ असणे आवश्यक आहे. याचीच कमतरता भाजपाकडे आहे, हे भाजपाला मान्य करावे लागेल. कारण माध्यमांनी बिहारची हार ही मोदींची हार असल्याचे मत मांडण्याचा सपाटा लावला आहे. हा वेडगळपणाच आहे. स्थानिक निवडणूकींच्या जय पराजयला पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचे बळ कारणीभूत ठरत असते हे माध्यमातील टीकाकार मोदींवर टीका करताना विसरत आहेत.
या निकालानंतर आता बिहार येत्या पाच वर्षात आणखी पाच-दहा वर्षे मागे जाणार आहे. गेली वीसएक वर्षे लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार यांचं सरकार पाहिलं आहे. या वीस वर्षांत विकासाची वाणवाच होती. बिहारचं जंगलराज जगप्रसिद्ध आहेच. आता पुन्हा लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार यांच्या हातात सत्ता गेल्यामुळे यापेक्षा वेगळे काही अपेक्षित असणे शक्य नाही. अर्थात लालूप्रसाद यादव, नीतिश कुमार आणि कॉंग्रेस हे तिघेही किती समन्वयाने सरकार चलवतात हा प्रश्‍न आहेच. हे तिघेही विकासापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्याच दंग राहणार आहेत. त्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्थेचा नेहमीप्रमाणे बोर्‍या वाजणार आहेच.
बिहारच्या या निकालामुळे केंद्र सरकारसमोरील संसद सुरळीत चालवण्याची समस्या कायम राहिली आहे. राज्यसभेतील भाजपाचे संख्याबळ या निवडणुकीमुळे वाढलेले नाही त्यामुळे संसदेच्या कामकाजात अडथळा यापुढेही राहणारच आहे. विकासाच्यादृष्टीने हे घातक ठरणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात काही चांगले निर्णय होतील याची अपेक्षा आता ठेवता येणार नाही तर केवळ गदारोळच होणार हे नक्कीच आहे. यासाठी केंद्र सरकारला वेगळा मार्ग शोधावा लागणार आहे.
राष्ट्रीय स्थरावर मोदींच्या करिश्म्यावर निवडणूका भाजपा सहज जिंकेल पण स्थानिक स्थरावर भाजपा कमकुवत आहे. भाजपाला आता स्थानिक स्थरावर पक्षबांधणीकडे लक्ष देण्याशिवाय पर्याय नाही. लोकसभा निवडणूका जिंकल्यानंतर भाजपाकडून स्थानिक स्थरावर पक्षबांधणीच्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसले नाहीत. आता बिहारच्या निकालानंतर भाजपाला पक्षबांधणीचा विचार करणे अपरिहार्य आहे. कारण कोणत्याही पक्षाचे खरे बळ हे स्थानिकबळावर अवलंबून असते. शहरा-शहरात गावा-गावांत पक्ष बळकट केला तरच भाजपाला भविष्यात चांगले दिवस दिसणार आहेत. मोदींच्या मॅजिकवर लोकसभेच्या निवडणूका जिंकता येतील पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकता येणार नाहीत याची खूणगाठ भाजपाने कायमची बांधून ठेवावी. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ‘पार्लमेंट से पंचायत तक’चा मानस व्यक्त केला आहे. पण हे पक्ष संघटनेच्या बळाशिवाय केवळ अशक्य आहे. भाजपाने संघटना बळकट केली तर हे सहज शक्य आहे. कारण जनमानस भाजपाच्या बाजूनेच आहे. पण पक्षसंघटना बळकट नसल्यामुळे स्थानिक पातळीवर जनमानस सोबत असतानाही भाजपा कमकुवत ठरतो. बिहारची हार याचाही परिणाम आहे. भाजपा जर संघटनात्मकदृष्ट्या बळकट झाला तर भाजपाला तोड नाही. आणि त्याचा फायदा देशाच्या बांधणीला आणि देशाच्या विकासाला होणार आहे.
•चौफेर : अमर पुराणिक•
पाकिस्तानमध्ये येऊ घालणार्‍या भयानक स्थितीची जाणीव बहुदा पाकिस्तानी माध्यमांना झाली आहे. काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाकडे पाकिस्तानी माध्यमं अतिशय गंभीरपणे पहात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गेल्या काही महिन्यात केलेली विधाने आणि कृती पाहता देशवासियांना खात्री झाली आहे की, आता पाकिस्तानची खैर नाही.
पाकिस्तानची स्थिती गेल्या काही दिवसांपासून खूपच वाईट झाली आहे. भारताशी वैरभाव पोसता पोसता आता पाकिस्तानला देशांतर्गत स्थिती सांभाळणे अशक्य होऊन बसले आहे. पाकिस्तानने आजपर्यत भारताशी तीन युद्धं केली. पण प्रत्येकवेळी पाकिस्तानला दारुन पराभव स्विकारावा लागला. तरीही भारतद्वेशाचा कंडू काही कमी होताना दिसत नाही. काश्मीर मिळवण्यासाठी पाकिस्तान भारताशी सतत युद्धाच्या पवित्र्यातच राहीला. काश्मीर मिळणे तर लांबच पण आता पाकिस्तानला देशांतर्गत स्थिती सांभाळणे अशक्य झाले आहे. पाकिस्तानच्या जन्मापासूनच पाकने काश्मीरचा राग आळवणे सुरु केले. तशात तेव्हाचे भारताचे निष्क्रीय परराष्ट्र धोरण पाकच्या पथ्यावर पडले. आज अर्धशतक उलटले तरीही पाकिस्तानची काश्मीर मिळवण्याची मनिषा काही पुर्ण होताना दिसत नाहिये. उलट केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भारताच्या प्रभावी परराष्ट्र धोरणामुळे पाकिस्तानची त्रेधातिरपीट उडाली आहे. अक्षरश: पाकिस्तानवर ‘भीक नको पण कुत्रे आवर’ म्हणण्याची वेळ येणार आहे. कारण गेल्या वर्षापासून पाकिस्तानची अंतर्गत व्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. पाकिस्तानला एकाचवेळी अनेक आघाड्‌या सांभाळणे अशक्य झाले आहे.
भारताशी तीन युद्धं करुन पाकिस्तानने हे जाणले की थेट युद्धात आपण भारताशी टक्कर देऊ शकत नाही. तेव्हापासून पाकिस्तानने दहशतवादाचा आश्रय घेतला. भारतात अतिरेकी पाठवून सतत भारतात दहशतवादी कारस्थाने सुरु ठेवली. गेल्या २५ वर्षांत भारताला या दहशतवादी कारवायांचा सामना करावा लागला. पाकिस्तानला जे युद्ध करुन साध्य करता आले नाही ते पाकिस्तानने जिहादच्या नावाखाली भारतभर इस्लामिक दहशतवाद पसरवून साध्य करण्याचा प्रयत्न केला. भारताचे यात खूप नुकसान झाले, अनेक नागरिकांचे जीव गेले. पण तत्कालिन सरकारने निषेध करण्यापलिकडे कोणतीही ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे पाकिस्तानला आणखी चेव चढला. पण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या वर्षभरात पाकिस्तानला विपरित परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आजपर्यंतच्या भारताच्या निष्क्रीय परराष्ट्रधोरणामुळेे पाकिस्तानला आपण बलवान असल्याचा भास होत होता. पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पाकिस्तानला वस्तुस्थितीची जाणीव होऊ लागली आहे. काश्मीर मागणे तर सोडाच पण बलूचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, पंजाब(पाक) सांभाळणे मुश्किल झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर याचना करावी लागत आहे. युनोमध्ये पाकिस्तानला आपले तोंड काळे करण्याची पाळी आली आहे.
हे सर्व घडतेय ते आजपर्यंत पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेमुळे. पाकिस्तानने  अतिरेकी संघटनांच्या माध्यमातून भारताशी छेडलेले छुपे युद्ध आता पाकिस्तानच्या अंगाशी आले आहे. अल कायदा, लष्कर ए तोयबासारख्या अनेक दहशतवादी संघटना आता पाकिस्तानलाच जड जात आहेत. काश्मीरमध्ये सतत हल्ले करुन  काश्मीरतर बळकावता आला नाही पण आता काश्मीरमधले नागरिकच पाकिस्तानविरोधात उघड उघड आंदोलने करु लागले आहेत. आजपर्यंत धर्माच्या नावाखाली, जिहादच्या नावाखाली तेथील नागरिकांच्या जीवनाची राखरांगोळी केल्याचे तेथील नागरिकांनी जाणले आहेच. हा झाला सामान्य नागरिकांचा क्षोभ. पण पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादी संघटना पाकिस्तानातच अराजक माजवू लागले आहेत. गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले झाले. हजारो नागरिकांचे प्राण गेले आहेत. एका बाजूला पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात राहण्याची मागणी होत आहे, तर दुसर्‍याबाजूला बलूचिस्तान पेटला आहे. सध्या पाकिस्तानची अवस्था पाकव्याप्त काश्मीर सांभाळू की बलूचीस्तान सांभाळू अशी झाली आहे.
आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायात कोणतीही सहानुभूती मिळणे अशक्य आहे. कारण आता पाकिस्तानची विकृत नीती पुरती उघडी पडली आहे. दोन दिवसांपुर्वीच पाकिस्तानचे माजी हुकुमशहा परवेज मुशर्रफ यांनी पाकमधील ‘दुनिया’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताविरुद्ध गरळ ओकण्याच्या नादात पाकिस्तानची आजवरची नीती उघडी पाडली आहे. त्यांनी जम्मु-काश्मीरात आमचेच अतिरेकी आहेत. लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना आम्हीच जन्माला घातली आहे, अशी जाहीर कबूली दिली आहे. हाफिज सईद, झकिउर रहमान लखवी आदींसारखे दहशतवादी त्यांनी पाकसाठी दहशतवादी नसून स्वातंत्रसैनिक आहेत अशी मुक्ताफळे उधळली. मुलाखत घेणार्‍या पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हे लोक स्वातंत्र सैनिक कसे ठरु शकतात असा सवाल उपस्थित केला, पण मुशर्रफ त्यांना स्वातंत्र सैनिक ठरवण्यात दंग होते. याचा अर्थ असाच होतो की, पाकिस्तानच्या एका माजी राष्ट्रप्रमुखाने पाकिस्तान दहशतवादी कारवाया करतो हे कबूल केले आहे त्यामुळे त्यामुळे पाकिस्तानने आजवर केलेल्या  कुकृत्यांवर शंका घेण्याचे कारण नाही.
पाकिस्तानमध्ये येऊ घालणार्‍या भयानक स्थितीची जाणीव बहुदा पाकिस्तानी माध्यमांना झाली आहे. काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाकडे पाकिस्तानी माध्यमं अतिशय गंभीरपणे पहात आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गेल्या काही महिन्यात केलेली विधाने आणि कृती पाहता देशवासियांना खात्री झाली आहे की, आता पाकिस्तानची खैर नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची रणनीती हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. लवकरच पाकव्याप काश्मीर पुन्हा भारताचा भाग होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.