NARAYAN SURVE

क्रांतीची बीजे पेरणारे ज्येष्ठ कवि नारायण सुर्वे कालवश
कष्टकर्‍यांच्या भावना झाल्या मुक्या
•अमर पुराणिक
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे | सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे
अशा शब्दांत श्रमिक, कष्टकरी आणि कामगारांच्या वेदना कवितेतून मांडत शब्दाशब्दांतून क्रांतीची बीजे पेरणारे ज्येष्ठ कविवयर्र् नारायण सुर्वे यांनी गोड, गुलाबी भावभावना आणि शृंगार आदी परंपरागत पठडीतून मराठी काव्याला मुक्त करीत रोजच्या जगण्यातील जिते-जागते संघर्षमय वास्तव साध्या आणि थेट शब्दांत मांडणार्‍या वास्तववादी काव्यरचना करण्याची अजरामर कामगिरी बजावली. कामगार, कष्टकरी, वंचित वर्गांच्या व्यथा आणि वेदनांना धारदार शब्दरूप देणार्‍या नारायण सुर्वे या थोर कवीच्या जाण्याने कवितेचे ‘ब्रह्म’ लोपल्याची शोकसंवेदना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. 
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दु:खात गेले| हिशेब करतो आहे, आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे ॥
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली| भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली ॥
हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले | कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले ॥
हरघडी अश्रू वाळविले नाही, पण असेही क्षण आले | तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले ॥
सर्वसामान्यांच्या आयुष्याचे यापेक्षा प्रभावी आणि वास्तववादी वर्णन काय असू शकणार? नारायण सुर्वे स्वत: जे आयुष्य जगले, तेच त्यांच्या काव्यातून प्रगट झाले. कामगार वस्तीत, कामगारांच्या सान्निध्यात, कामगाराचा मुलगा म्हणून आणि कामगार म्हणून जगलेले जीवन अतिशय दाहकपणे मांडणारे असे एकमेवाद्वितीय कवी म्हणजेच फक्त आणि फक्त नारायण सुर्वेच होय!
अपमान, अवहेलना आणि आत्मवंचना यांचीच त्यांना जीवनप्रवासात सोबत. असा माणूस आत्मानुभवातून जे साहित्य प्रसवतो, त्यात ह्या दु:खाचे विदारक दर्शन असणारच असणार! पण त्यांचं वेगळेपण आणि थोरपणही हेच की, त्यांनी या कटुतेचा मळ आपल्या साहित्यात येऊ दिला नाही, उलट आपली आत्मपरता ही कामगारांच्या ‘आम्ही’ या समूहात विलीन करून टाकली आणि समष्टीची वेदना स्वत:ची म्हणून मांडली. कष्ट आणि जगण्यासाठी केलेल्या संघर्षातून सुर्वे यांनी मराठी काव्याला नवा सूर मिळवून दिला. त्यांनी कवितेतून, आपल्या काव्यातून जाती-पातीचा कधीही पुरस्कार केला नाही. मराठी कवितेला सामाजिक भान आणले. झोपडपट्टीपासून विद्यापीठापर्यंत, बुद्धिजीवींपासून ते रसिकांपर्यंत आणि शिक्षितांपासून ते अशिक्षित कामकर्‍यांपर्यंत त्यांना मान्यता मिळाली. त्यांच्या असंख्य कविता वाचकांच्या मनात नेहमीच घर करून राहतील; कारण त्यांचे काव्य पदोपदी जीवनाचे वास्तव सांगणार्‍या आहेत आणि या वास्तवाला प्रत्येकाला सामोरे जावेच लागते!नारायण सुर्वे हे स्वत:ला सूर्यकुळातले कवी म्हणायचे. शोषित-कष्टकर्‍यांचे जग साहित्यात प्रस्थापित करताना त्यांनी सूर्याची प्रतिमा सतत वापरली. या प्रतिमेची नुसती द्वाहीच फिरवली नाही, तर ती प्रस्थापित करण्याचा जिवंत प्रयत्न केला. हे सूर्यतेज साहित्यात आता अधिक प्रखर झाले आहे. सोलापूरचे प्रसिद्ध शाहीर अमर शेख यांनी डफावर कष्टकर्‍यांच्या भावना प्रभावीपणे प्रकट करीत नारायण सुर्वेंच्या कविता अनेक ठिकाणी सादर केल्या आहेत. कामगार चळवळीतील तुटलेला, फाटलेला माणूस त्यांच्या कवितेमध्ये आला. तो नुसताच कवितेत आला नाही, तर त्या कवितांचा तो नायक होता; त्यामुळे प्रत्येकालाच या कविता आपल्याशा वाटू लागल्या.जन्मत:च ‘अनाथ’ झालेला हा मुलगा गंगाराम कुशाजी सुर्वे यांना सापडला. हे गंगाराम सुर्वे मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये साचेवाले म्हणून काम करीत आणि त्यांच्या पत्नी काशीबाई या कमला मिलमध्ये काम करीत. या दाम्पत्याने हे सापडलेले मूल घरी आणले आणि सुर्व्यांना नवा जन्म व नारायण हे नाव दिले. सुर्वे यांनी आपल्या या अनाथपणाची नाळ थेट संत कबिरांशी जोडून घेतली होती. कबीरही त्यांच्या मातापित्याला टाकून दिलेल्या अवस्थेत सापडले होते. एका विणकरानेच त्यांचाही प्रतिपाळ केला आणि ‘कबिरा खडा बाजार में लिए लूकाठी हाथ’ असे म्हणत आपले भणंगपण साजरे करीत एक युगविधान करणार्‍या कवीमध्ये ते परावर्तित झाले. सुर्वे देखील नेहमी आपल्या भाषणात संत कबिरांची साक्ष काढत, पुरावा देत आणि त्यांच्या व आपल्या अनाथपणाचा एकत्रित उल्लेख करीत साम्यभाव प्रकट करीत. नारायण सुर्वे यांनी संतकवीच्या भाषेत साम्यवादी विचारांची कविता लिहिली. आपले क्रांतिकारी विचार त्यांनी तुकाराम आणि सावता माळी यांच्याप्रमाणे सोप्या व बोलीभाषेत प्रभावीपणे मांडले. जीवनभर अनुभवलेले दु:ख आणि आसपासची परिस्थिती त्यांनी

‘ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती| 
दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती ॥ 
अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची उठबस करता करता|
टोपलीखाली माझ्यासह जग झाकीत दररोज अंधार येत जात होता॥
अशा धाटणीच्या कवितांमधून मांडली आणि ती मराठी मनाला भिडली आणि असे विदारक सत्य मांडत असताना जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी त्यांनी सोडली नाही, हे या पुढच्या ओळीतून प्रखरपणे जाणवते.
त्याच दिवशी मनाच्या एका कोर्‍या पानावर लिहले, हे नारायणा| 
अशा नंग्याच्या दुनियेत चालायची वाट; लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा ॥
भेटला हरेक रंगात माणूस, पिता, मित्र, कधी नागवणारा होईन | 
रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत पायाचे तळवे होरपळवून ॥
तरी का कोण जाणे! माणसा इतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही | 
आयुष्य पोथीची उलटली सदतीस पाने; वाटते, अजून काही पाहिलेच नाही ॥
नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेत विद्रोह अत्यंत साधेपणाने, संयतपणे मांडला. त्याचा उद्रेक किंवा विद्वेष होऊ दिला नाही.मराठी कवितेला स्वप्नरंजनातून सोडवण्याचे मोठे काम मर्ढेकरांनी केले. त्यांच्या आधी केशवसुतांनी ते केले. आधुनिक मराठी कवितेची सुरुवात त्यांच्यापासून होते. त्यांनी मानवी मूल्यांना तात्त्विक बैठक दिली, हे नाकारता येणार नाही. सौंदर्यवादी आणि जीवनवादी असे प्रवाह तेव्हाही साहित्यात होते. जीवनवादी लोक प्रतिभेला दैवी देणगी मानत नाहीत. प्रतिभा ही खडतर जीवनातून अधिक परिपक्व होते, स्वत:कडे आणि समाजसंबंधाकडे डोळसपणे पाहिले तर द्विगुणित होते, ‘ऐसा गा मी ब्रह्मा’ मधल्या त्यांच्या कविता अप्रतिम आहेत. कामगार जाणिवेने भारलेल्या आहेत. साम्यवादी राजकीय बांधिलकी मानणार्‍या या कवीने शब्दांचा हत्यारासारखा वापर केलेला दिसतो. ‘इथून शब्दांच्या हाती खड्‌ग मी ठेवीत आलो’, असे ते म्हणतात.
सुर्वे मार्क्सवादी चळवळीतून पुढे आले होते. तरीही कोणतेही लेबल लावून सुर्वेंचा विचार करणे अन्यायकारक ठरेल. लेबलच्या पलीकडचा हा कवी होता. सर्जनशील कलावंताने कोणत्याही विचारसरणीने बांधून घेऊ नये, असेे म्हणतात. त्याप्रमाणे सुर्वेंच्या लेखनाच्या आड ती विचारसरणी आली नाही. तुमची कलाकृती ताकदीची असेल तर ती रसिकप्रिय होते. सुर्वेंची कलाकृती अशीच सशक्त होती. अनुभवातून आलेली ‘लोकमानसा’ची भाषाशैली व व्याकूळ काव्यांच्या बळावर सुर्वे यांनी मराठी काव्याला फार उंचीवर नेऊन ठेवले. मराठी कवितेवर असा अवीट ठसा उमटवणारा सुर्वेंसारखा महान माणूस पुन:पुन्हा जन्म घेत नाही. काव्याची स्वत:ची अशी भाषा असणारा हा कवी व त्यांच्या कविता जिवंत व काळजाला भिडणार्‍या ठरल्या. सुर्वेंच्या कवितेत प्रचंड प्रतिभा आणि ऋजुता होती. खडबडीत डोहातले पाणी जसे स्पष्ट दिसते, तसे सुर्वेंचे मन काव्यातून दिसते. 
कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते| 
निदान देणेकर्‍यांचे तगादे तरी चुकविता आले असते॥
असे झाले नाही; आम्ही शब्दांतच इतके नादावलो; बहकलो, 
असे झाले नसते तर कदाचित इमलेही बांधले असते॥
 त्यांनी स्वत: आयुष्यात इतके चटके खाल्ले, याचा नमुना दाखवणार्‍या या ओळी आहेत. इतका त्रास सोसला तरी आजुबाजूच्या परिस्थितीविषयी तक्रार केली नाही आणि माणसांचा दुस्वासही केला नाही. विद्रोहींचे साहित्य संमेलन असो वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो, शांत स्वभावाचे सुर्वे सार्‍यांच्याच मांडीला मांडी लावून बसू शकत. कोणत्याही विचारांची त्यांना ऍलर्जी नव्हती; त्यामुळेच तथाकथित बंडखोर साहित्यिकांना ते ‘ब्राह्मणाळलेले’ वाटायचे, पण सुर्वेंना त्याची पर्वा नव्हती. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच सर्वसमावेशकता असल्याने त्यांनी सर्वांना आणि सर्वांनी त्यांना स्वीकारले होते. कामगारांच्या समस्यांत गुंतलेले सुर्वे यांना स्वत:विषयी विचार करायला वेळच मिळाला नसेल, असे नाही. त्यांच्या ‘ऐसा गा मी ब्रह्मा’ कवितेत ‘गलबलून जातो तेव्हा तुझ्याच कुशीत शिरतो’ यासारख्या भावनांना हात घालणार्‍या ओळी आहेत. त्यांनी स्वत:बद्दलही वारंवार विचार केल्याचे त्यांच्या कवितेतून दिसते, पण हा स्वत:चा विचार त्यांनी एक व्यापक पट समोर ठेवून केल्याचे दिसून येते.गेली जवळपास ५ दशके शब्दांतच नादावलेल्या नारायण सुर्वे नावाच्या फाटक्या इसमाविषयी लिहिण्याची लेखक, पत्रकार मंडळींची ही पहिलीच वेळ नाही, पण त्यामुळेच ते लिहिणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. कारण सुर्वे हे नाव आता मराठी माणसाला तर अनोळखी राहिलेले नाहीच, शिवाय देश-परदेशांतील अनेकांनाही या ‘उठवळ’ आयुष्य जगलेल्या कवीविषयी नको तितके माहीत होऊन गेले आहे.

‘माझ्या पहिल्या संपातच, मार्क्स मला असा भेटला, 
निवडणुकीच्या मध्यभागी, माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता’॥
अशा आठवणीत दंग होऊन गेलेला हा विद्रोही कवी पुढे यथावकाश मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊन प्रस्थापितांच्या मांदियाळीत रुळला आणि त्यानंतर कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी स्वीकारले. पुरस्कारांनी त्यांची पाठ सोडली नाही. ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच’ बरबाद झालेल्या सुर्व्यांच्या जिंदगानीची अचूक ओळख महाराष्ट्राबाहेरही पटली होती आणि मध्य प्रदेश सरकारनेही ‘कबीर पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला होता. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने दिलेल्या ‘जनस्थान पुरस्कारा’मुळे सुर्वे यांच्या उत्तुंग क्षमतेची अधिकच ओळख गडद झाली. कुसुमाग्रजांशी त्यांचे संबंध अगदीच वेगळे आहेत. सुर्व्यांच्या कविता इंग्रजीत अनुवादित होऊन प्रकाशित झाल्या. त्या संग्रहास कुसुमाग्रजांचीच प्रस्तावना होती आणि मुख्य म्हणजे सुर्व्यांच्या प्रतिभेचे सामर्थ्य ज्या अगदी मोजक्याच लोकांनी ही पुरस्कारांची व अध्यक्षपदांची मालिका सुरू होण्यापूर्वीच ओळखले, त्यात कुसुमाग्रज अग्रस्थानी होते. त्यांच्या जाण्याने कामकरी काव्याची उणीव भरून काढणे शक्य नाही. त्यांच्या जाण्याने कामगार, कष्टकरी, साहित्यक्षेत्राचेच नव्हे तर देशाचेही नुकसान झाले आहे. वाचक, चाहते यांच्याप्रमाणेच वयाची ८० वर्षे पार केलेल्या नारायण सुर्वे यांनाही आपल्या कवितेचा रास्त अभिमान होता, म्हणूनच ते म्हणू शकले : 
आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र, तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते | 
बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते? ॥
जन्म-मरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते| 
चला, बरे झाले! आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते ॥
दै. तरुण भारत, सोलापूर. २२ ऑगस्ट २०१०

0 comments:

Post a Comment