This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
अमर पुराणिक  
अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणाबाजी किंवा सईदची यासिनने घेतलेली भेट, याबाबीचे कोणालाच गांंभीर्य वाटले नाही. शेवटी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती एक दिवस आपल्यावर शेकणार आहे याची जाणिव आता  देशवासियांना कसोशीने ठेवावी लागणार आहे. जर आपण जागृत राहीलो नाही तर दुर्दैवाने जेव्हा तशी परिस्थिती येईल तेव्हा मात्र आपल्याला पळता भूई थोडी होणार आहे. याचा विचार गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे.
भारतातील प्रसारमाध्यमं असूद्यात, राजकारणी जमात असू द्या  नाही तर  स्वत:ला बुद्धीजीवी समजणारे मानवतावादी आणि मानवाधिकारवाद्यांची बहुरंगी पैदास असूद्या; सगळेजण काश्मिरशी संबंधित विभिन्न प्रश्‍नांकडे योग्य दृष्टीने पाहू इच्छित नाहीत. केवळ काश्मरीच नव्हे, तर अधिकांश प्रश्‍न आणि समस्यांबाबतीत हेच झाले आहे आणि होत आहे. जम्मू, काश्मरि, लड्डाख किंवा मुंबई, दिल्ली, कोलकाता असूद्यात या सर्व बाबतीत या लोकांची अशीच भूमिका आहे.
योत काश्मिरातील हिंदूतर देशोधडीला लागलेच, पण भारताप्रती निष्ठा ठेवणार्‍या काश्मिरी मुसलमानांवरही अन्याय होतोय, मतपेटीवर डोळा ठेऊन फुटीरवाद्यांना कुर्नीसात करत लांगुलचालन केले जाते आहे. भारतीय जवानांकडून यदाकदाचित मानवधिकाराचे उल्लंघन झाले तर हे तथाकथित मानवाधिकारवाले बुद्धीजीवी आकाशपाताळ एक करतात. यासाठी जाणीवपूर्वक केल्या जाणार्‍या गदारोळात भारतीय सेनेला बदनाम केले जाते. पाकिस्तानी आणि फुटीरवाद्यांच्या षड्‌यंत्राला पोषक अशी विधाने करत त्यांच्या सुरात सूर मिसळून गरळ ओकू लागतात आणि स्वत: प्रखर मानवतावादाचे पाईक असल्याचे ढोल बडवले जातात. याच पद्धतीने राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या महत्त्वपूर्ण संवैधानिक पदावर बसलेले वजाहत हबीबुल्लाह सारखे लोक जनरल व्ही.के. सिंह यांच्यावर स्वैर आरोप करत भारतीय सेनेला आरोपीच्या पिंजर्‍यात ओढण्याचे दुष्कृत्य करत भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणात नाचक्की करतात. अफझलच्या फाशीवरून हे सेक्युलरवाले आणि प्रसारमाध्यमे असेच राष्ट्रद्रोही तुणतुणे वाजवत आहेत आणि काश्मिरी जनतेची चिंता सोडून अफझल सारख्या क्रूर दहशतवाद्याचा कैवार घेत आहेत. 
१३ डिसेंबर २००१ च्या ‘त्या’ भीषण हल्ल्यात सात जवान, एक माळी आणि एक छायाचित्रकार शहीद झाले. अर्ध्या तासाच्या चकमकीत सर्व अतिरेक्यांचा फडशा पाडत संसदेवरील तिरंगा ताठ मानेने फडकत ठेवणार्‍या या जवांनांच्या शौर्याला तोड नाहीच. पण त्यांच्या शौर्याची राज्यकर्त्यांना कोणतीच किंमत नाही. त्या जवानांच्या आप्तांनी शौर्यपदके सरकारला परत केली. याची लाजही या संपुआ सरकारला वाटली नाही. केवळ मतांचे राजकारण करत दहशतवाद्यांचे मनोबल वाढवण्याचे कार्य मात्र केले. याचा परिणाम मात्र असा झाली की, हल्ल्यांमागून हल्ल्यांची मालिका सुरूच राहिली आहे. त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत.
अफझलच्या फाशीनंतर देशात अशा लोकांकडून हेच प्रकार करण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. काश्मिरात हिंसाचार तसा नवा नाही, पण अफझलच्या फाशीनंतर काश्मिरात हिंसाचार माजला आणि कर्फ्यू लागू करण्यात आला. गेल्या दोन दशकांत झालेल्या काश्मिरी हिंदू पंडिताच्यानरसंहाराची कोणालाही चिंता वाटली नाही. काश्मिरातील मशिदीतून खूलेआम राष्ट्रद्रोही कृत्ये घडत असताना, उघड उघडहिंदूंना अल्टिमेटम दिले जात होते की, जर जिवंत राहायचे असेल तर काही तासांत काश्मीर सोडून निघून जा! अशा आशयाचे पोस्टर्स काश्मिरातील गल्लोगल्ली लागत असल्याच्या अनेक बातम्या गेल्या वीस वर्षांत आपण वाचल्या आहेत. हिंदूंना अशा धमक्या देऊन काश्मिरातून पळवून लावणार्‍यांकडून अफझलच्या फाशीनंतर काश्मिरात हिंसाचार घडवून आणत अफझलच्या फाशीबद्दल नक्राश्रू वाहणार्‍या फुटीरवाद्यांकडून अशीच राष्ट्रद्रोही अपेक्षा असू शकते.
काश्मीरात अशी अवस्था तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थी दहशतवादी अफझलच्या समर्थनासाठी राष्ट्रद्रोही नारे देत, भारत मुर्दाबादच्या घोषणा देतात हा तर कहरच म्हणावा लागेल. ‘‘अफझल तेरी याद में रो रही ये जमीं, रो रहा आसमॉं, अफझल के वारिस जिंदा है, आय ऍम अफझल, हँग मी टू इंडिया वी ऑल आर अफझल, भारत मुर्दाबाद’’ ही भारतविरोधी घोषणाबाजी पाकिस्तानात नव्हे तर भारतातच होते हे संतापजनक आणि दुर्दैवी  म्हणावे लागेल. या देशाचे मीठ खाऊन याच देशावर हल्ला करणार्‍या अफझलचा एवढा या पाकधार्जिण्यांना पुळका आहे. दहशतवादी अफझलचा कैवार घेत शेकडो मुस्लिम विद्यार्थ्यांनी अलीगढ विद्यापीठाच्या आवारामध्ये जोरदार मोर्चा काढतात. ‘शहीद मिस्टर अफझल गुरू’ वगैरे आशयाचे फलक घेऊन अफझलला फाशी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संताप व्यक्त करतात. एवढेच नव्हे तर  ‘यू किल्ड वन अफझल अँड गेव बर्थ टू हंड्रेड अफझल’ अशा धमकीवजा घोषणाही देण्याचा कहर केला गेला आणि यावेळी साध्वी प्रज्ञासिंह व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशी देण्याची मागणीही करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या निदर्शनाकडे विद्यापीठ आणि सतत सेक्युलरवादाची जपमाळ ओढणार्‍या केंद्र सरकारने आणि मुस्लिमधार्जिण्या मुलायम सरकारने पूर्ण कानाडोळा केला.
याउपर तिसरा प्रकार म्हणजे जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रन्टचा (जेकेएलएफ) नेता यासिन मलिक हा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-ऊद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हफीज सईद याच्याबरोबर अफजलला फाशी दिल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आयोजित केलेल्या शोकसभेत  जाऊन उपोषणात सहभागी झाला.
यासिन मलिकला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिलीच कशी, सरकारने त्याचा व्हिसा मंजूर केला कसा, हा प्रश्‍न उपस्थित होतो. मलिक पाकमध्ये जाऊन मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफिज सईद याची भेट घेतो आणि अफझलला श्रद्धांजलीही वाहतो यावरून यासिन मलिकचे दहशतवादी हाफिज सईदसोबत जवळचे संबंध असल्याचे सिद्ध होते. पाकिस्तानात अफझलला श्रद्धांजली वाहिली जाते हे एकबाजूला होत असताना भारताचे नागरिक असलेले मुसलमान विद्यार्थी मात्र न्यायाधीशांचा आणि न्यायव्यवस्थेचा अवमान करत देशविरोधी घोषणा देतात. यावर आपले राज्यकर्ते एक चकार शब्द काढत नाहीत आणि नसलेल्या भगव्या दहशतवादावर वाट्टेल तशी वाह्यात विधाने करतात. हा भ्रष्ट आणि सत्तालोलूप सोनिया सरकारच्या निस्संगपणाचा कळस झाला. या काही अलिगढ मुस्लिम विद्यार्थ्यांच्या देशद्रोही भूमिकेमुळे या देशातील सच्च्या देशभक्त मुसलमानांच्या राष्ट्रनिष्ठेवर संशय घेतला जातो याचे भानही हे देशद्रोही कृत्य करणार्‍यांना नव्हते आणि नाही.
तब्बल बारा वर्षांनंतर अफझलला फाशी दिली गेली. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोर अजमल कसाबच्या फाशीलाही विलंब लावला. याचे कारण तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील या फाशीच्या कागदपत्रांवर सही करत नाहीत, असे दिले जात होते. मिसाईल मॅन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यापर्यंत फाशीची कागदपत्रे पोहोचू दिली जात नव्हती. असे असताना सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मात्र कसाब आणि अफझलच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले. त्याचे श्रेय मात्र प्रणवदांना दिले जात नाही. सोनिया गांधी आणि सुशीलकुमार शिंदे यावर ‘मी केले’चा ढोल बडवत आहेत. फाशीचा मार्ग मोकळा करणारे प्रणवदा राहिले बाजूला आणि फाशीबद्दल सोनिया-शिंदेच पाठ थोपटून घेताहेत. हा दुटप्पी राजकारणाचा नमुना पाहिल्यावर राष्ट्ररक्षेला तिलांजली देत निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, दहशतवादाच्या मुद्द्याच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष करत आम जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करत सत्तापिपासूवृत्तीचे राजकारण कॉंग्रेसकडून खेळले जातेय.
या देशातील कॉंग्रेस सरकार, सोनिया गांधी, फुटीरवादी, मानवाधिकारवाले, सेक्युलरवाले, प्रसारमाध्यमे यांनी आपल्यासारख्या तथाकथित भारतीय बुद्धीजीवी नागरिकांची सतत सेक्युलरवादी विचारांचा मारा करून आपली वैचारिक सूंता केली आहे. आता बरेचशे भारतीय नागरिक आता अशा राष्ट्रद्रोही सेक्युलॅरिझमच्या मार्‍यामुळे कोणतीही राष्ट्रद्रोही घटना खूप सहजतेने घेऊ लागले आहेत आणि जनता ‘चलता है|, होता है,’ म्हणत आत्मकेंद्री बनली आहे. असे करण्यात माध्यमे, सेक्युलरवाले यशस्वी झाले आहेत आणि हे अतिशय घातक ठरणार आहे. कोणतीही देशविघातक घटना घडली की केवळ मेणबत्त्या लावून किंकर्तव्यमुढासारखे थंड बसतात. आणि सर्व विसरून आपले लाईफ एन्जॉय करण्यात मग्न होतात. त्यामुळे अफझलला फाशी दिली काय, देशाचा अवमान झाला काय, अस्मितांना धक्का लागला काय; सर्वबाबतीत आपल्या भावना बोथट होऊन गेल्या आहेत.(की केल्या गेल्या आहेत.) त्यामुळे अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणाबाजी किंवा सईदची यासिनने घेतलेली भेट, याबाबीचे कोणालाच गांंभीर्य वाटले नाही. शेवटी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती एक दिवस आपल्यावर शेकणार आहे याची जाणिव आता देशवासियांना कसोशीने ठेवावी लागणार आहे. जर आपण जागृत राहीलो नाही तर दुर्दैवाने जेव्हा तशी परिस्थिती येईल तेव्हा मात्र आपल्याला पळता भूई थोडी होणार आहे. याचा विचार आता खूप गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे. 
तरुण भारत, आसमंत, १७ जानेवारी २०१३.  
अमर पुराणिक
आता भारतातील मुस्लिम असुरक्षित असल्याची आवई उठवली जात आहे. सामान्य भारतीय मुसलमान नागरिकच काय तर बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानही असुरक्षित असल्याचा गळा काढला जातोय. त्याच्या सुरक्षेची मागणी पाकिस्तान, आयएसआय आणि सईद सारख्या अतिरेक्याकडून केली जाते. हे बळ कशामुळे आले हे आता वेगळे सांगायला नको. आत त्यांचे हे अनैतिक बळ आणखीन वाढतच जाणार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायात आता भारताला सतत हे ओरडून सांगावे लागणार आहे की, भारत दहशतवादाला खतपाणी घालत नाही. हिंदू दहशतवाद नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. जन हो, आपली राष्ट्रीय धोरणे हे कॉंग्रेस सरकार आंतरराष्ट्रीय समुदायात पटवून देऊ शकत नाही, समजावून सांगू शकत नाही, तर या गोष्टी समजावून सांगणे या कॉंग्रेसला काय जमणार आहे. शिंदे साहेबांची जीभ सरकली असेल असे सारवासारवीचे विधान कॉंग्रेसकडून माध्यमाद्वारे करून यावर एकवेळेस पांघरुण घातले जाईलही, पण जागतिक समुदायात हे पटवून देऊ शकणार का?
रायपूर येथे झालेल्या कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘संघ-भाजपाच्या शिबिरांमध्ये हिंदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते’, असे अविचारी आणि प्रक्षोभक विधान केले. देशात जातीय शांतता आणि सलोखा कायम ठेवण्याची जबाबदारी पार पाडण्याचे कर्तव्य विसरून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देशात हिंदू आणि मुस्लिम अशी उभी फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सर्व स्तरांतून होत आहे. शिंदे इतके बोलून थांबले नाहीत तर, रा. स्व. संघ आणि भाजपाच्या शिबिरांमध्ये हिंदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असते आणि बॉम्बस्फोट करून ते मुस्लिमांना बदनाम करीत असतात, असे धक्कादायक विधानही शिंदे यांनी कॉंगे्रसच्या चिंतन शिबिरात केलेे. समझोता एक्स्प्रेस, मक्का मशीद आणि मालेगाव येथील बॉम्बस्फोटात हिंदू दहशतवाद्यांचाच हात असल्याचे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या टिप्पणीने सार्‍या देशात संतापाची लाट उसळली. नंतर मात्र जनक्षोभाच्या भीतीने त्यांनी घुमजाव करत मी ‘हिंदू दहशतवाद’ असे म्हणालोच नाही तर ‘सफ्रॉन टेररिझम’ असे म्हणाल्याची सारवासारव केली. या दोन्ही शब्दांत फरक असला तरी साधारणपणे अर्थ सारखाच होतो.
सुशीलकुमार शिंदे हे एका जबाबदार देशाचे जबाबदार गृहमंत्री असून, ते आपली जबाबदारी विसरले. मुळात परराष्ट्र धोरण नावाची चिज शिल्लक नसलेल्या संपुआ सरकारने कमीत कमी देशांतर्गत गोष्टीबाबत तरी योग्य, राष्ट्रपोषक व संयमित विधाने करायला हवीत. कमीत कमी विरोधी राष्ट्रांच्या हतात आयते कोलीत मिळणार नाही याचा तरी विचार करणे गृहमंत्र्यांकडून अपेक्षित असते. राजकीय मतभेदातून शिंदे असे बोलले असे म्हणण्याचे कारण नाही. कारण ते कॉंग्रेसचे नेते असले तरी आता देशाचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी वाढते. हे विसरून जर शिंदे असे बेछूट आरोप करत असतील, तर मात्र त्यांना राष्ट्रहितापेक्षा सत्ता ताब्यात ठेवण्याची चिंता सतावतेय असे म्हणावे लागेल.
एकटे शिंदेच नाहीत तर या आधीचे गृहमंत्री आणि आताचे अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनीही सन २०१० मध्ये अशीच बेजबाबदार विधाने केली होती. कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह हे तर कायम अशी वाह्यात विधाने करीत असतात. शिंदे यांच्या या विधानावर कॉंगे्रसचे नेते मणिशंकर अय्यर यांनीही शिंदे यांच्या मताशी सहमती दर्शवत त्यांनी वादात तेल ओतण्याचा प्रयत्न केला. प्रखर राष्ट्रभक्त असलेले भाजपा-संघ परिवार या विधानावर संतप्त होणे साहजिकच आहे. भाजपा-संघाने यावर शिंदेच्या हकालपट्टीची मागणी केली. भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांनी भगवा हा वैराग्याचे प्रतीक असून, आतंकवादाच्या विरोधात आहे. भगवा आमची परंपरा आहे, भगवा ही भारतीय संस्कृती आणि त्यागाचे प्रतीक आहे, असे असताना सुशीलकुमार शिंदे अशी विधाने करतात, त्यांनी समस्त देशवासीयांचा अपमान केला असून, देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली. संघ-भाजपा हिंदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे ते सांगतात. मग, थेट पुरावे सादर का करीत नाहीत? त्यांना कोणी अडवले आहे. जर पुरावे नसतील तर शिंदे तरी कोठून पुरावे आणणार.
दूसर्‍या बाजूला या विधानाने देशाचा क्रमांक एकचा शत्रू पाकिस्तान आणि आतंकवादी मात्र प्रचंड खुष झाले आहेत. सुशीलकुमार शिंदे हे आता आतंकवाद्यांचे लाडके झाले आहेत. त्यांना जमात-उल-दावाने या विधानाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याने शब्बासकी दिली आहे. शिंदे साहेबांचे ‘श्री’ हफिज सईद ‘यांच्या’ आनंदाला तर पारावार राहिलेला नाही. हा नराधम सईद म्हणतोय की, ‘सुशीलकुमार शिंदे का यह बयान एक दम सच है|’ हाफिज सईद म्हणतो शिंदे यांचे हे विधान म्हणजे अल्लाहकडून ही पाकिस्तानला मदत आहे. एवढेच नव्हे तर भारत पाकिस्तानवर इतकी वर्षे विनाकारण दहशतवादाचे खोटे आरोप करत आहे. याला म्हणतात आपणहून आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेणे! आंतरराष्ट्रीय स्थरावर हे अतिरेकी आता पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत नसून भारत घालतोय हे ओरडून सांगायला मोकळे झाले. नव्हे तसे ते आता शिंदेंच्या विधानामुळे गळा फाडून सांगू लागले आहेत.
आपलेे हे वक्तव्य खर्‍या दहशतवाद्यांचे मनोबल वाढविणारे आणि पाकप्रायोजित दहशतवादाला प्रोत्साहन देणारेच असल्याचा विचारही गृहमंत्र्यांनी हे विधान करण्यापूर्वी केला नाही. त्यांचे हे वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षेसाठी अतिशय धोकादायक असून, केवळ राजकीय स्वार्थासाठी देशाचे गृहमंत्री असूनही मुस्लिमांच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवून हिंदू आणि मुस्लिमांत तणाव निर्माण करण्याचा आणि देशातील शांतता आणि जातीय सलोखा भंग करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न शिंदे यांनी केला आहे. यातून खर्‍या दहशतवाद्यांना पकडण्याची ताकद आपला देश अशा गृहमंत्र्यांमुळे गमावून बसला आहे. सीमेवर पाकिस्तानचे सैनिक आणि अतिरेकी भारतीय हद्दीत घुसखोरी करतात. हे सिमोल्लंघन सततच सुरूच असते. भारतीय जवानांचा शिरच्छेद करून एका जवानाचे शिर पळवून नेतात आणि आपले सरकार व कॉंगे्रस पक्ष पाकिस्तानशी चर्चाच करतोय, क्रिकेट सामने खेळतोय हे लांच्छनास्पद आहे. या घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळते, मात्र आपले सरकार, गृहमंत्री आणि पंतप्रधान एक शब्दही बोलले नाहीत. मुस्लिम मतांच्या लांगूलचालनात राष्ट्रहिताचे धिंडवडे हा कॉंग्रेस पक्ष काढतोय.  मुस्लिमांचे लाड पुरविणार्‍या आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणार्‍या कॉंगे्रस पक्षाने सत्तेवर येताच, पोटासारखा प्रभावी कायदा रद्द करून दहशतवाद्यांना हैदोसासाठी देश मोकळा करून दिला.
इतकेच नव्हे तर आता भारतातील मुस्लिम असुरक्षित असल्याची आवई उठवली जात आहे. सामान्य भारतीय मुसलमान नागरिकच काय तर बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानही असुरक्षित असल्याचा गळा काढला जातोय. त्याच्या सुरक्षेची मागणी पाकिस्तान, आयएसआय आणि सईद सारख्या अतिरेक्याकडून केली जाते. हे बळ कशामुळे आले हे आता वेगळे सांगायला नको. आत त्यांचे हे अनैतिक बळ आणखीन वाढतच जाणार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायात आता भारताला सतत हे ओरडून सांगावे लागणार आहे की, भारत दहशतवादाला खतपाणी घालत नाही. हिंदू दहशतवाद नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. जन हो, आपली राष्ट्रीय धोरणे हे कॉंग्रेस सरकार आंतरराष्ट्रीय समुदायात पटवून देऊ शकत नाही, समजावून सांगू शकत नाही, तर या गोष्टी समजावून सांगणे या कॉंग्रेसला काय जमणार आहे. शिंदे साहेबांची जीभ सरकली असेल असे सारवासारवीचे विधान कॉंग्रेसकडून माध्यमाद्वारे करून यावर एकवेळेस पांघरुण घातले जाईलही, पण जागतिक समुदायात हे पटवून देऊ शकणार का? हाच एक मुद्दा धरून पाकिस्तान, आयएसआय, अतिरेकी आपल्या देशाला नाचवू लागले तर मग मात्र अवघड होऊन बसेल. एवढ्या एका मुद्द्याने असे होणार नाही हे आम्हालाही कळते. पण अशी सतत विपरित विधाने करून पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राला भारताविरुद्ध जागतिक मत खराब करण्यासाठी रेकॉर्ड निर्माण करू दिले जाता कामा नये.
भ्रष्टाचार, बलात्कार आणि विकासशून्य अशा धोरणांमुळे यावेळी जनता कॉंग्रेसला धोबीपछाड देणार हे आता निश्‍चितच आहे. निवडणुका जवळ आलेल्या पाहून या पक्षाला पुन्हा एकदा गरीब आणि मध्यमवर्गीयांची आठवण झाली आहे. कॉंग्रेस पक्ष या वर्गांना नेहमीच धोका देत आलेला, आधीची आश्‍वासने पूर्ण न करणारा कॉंगे्रस पक्ष त्यांना आता नवे स्वप्न दाखवीत आहे. पंतप्रधान, सोनिया गांधी तर धडधडीत ‘आम्ही सर्व अश्‍वासने पूर्ण केली असे सांगत आहेत. या बेजबाबदार विधानाबद्दल शिंदे आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागायला हवी होती, पण शिंदे यांनी हायकमांडला खुष करण्यासाठी हे विधान केले असून, या मागे कॉंग्रेसचे मतांचे राजकारण आहे. कॉंग्रेसचे चिंतन शिबीर ‘चिंतनासाठी नव्हे, तर राहुल गांधींना युवराजपदाचा राज्याभिषेक करण्यासाठी आणि कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते यांच्या गळी राहुलचे नेतृत्व उतरवण्यासाठी हे शिबीर घेतले होते. 
तरुण भारत, आसमंत, दि. ०३ फेब्रूवारी २०१३.