मेघदूत : आषाढस्य प्रथम दिवसे...

मेघदूत : आषाढस्य प्रथम दिवसे...

•अमर पुराणिक•
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्‍लिष्टसानुं|
वप्रक्रीड़ापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श॥

आषाढाचा पहिला दिवस आला, आषाढाच्या मेघांनी डोंगरशिखरांना आपल्या कवेत घेतले, जसे महामत्त गजराज आपल्या डोक्याने मातीच्या ढिगांना भिडतो तसे.

 कवी कुलगुरू महाकवी कालीदासांनी जेव्हा आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात मेघांची दाटी पाहिली, तेव्हा त्यांच्या कविकल्पनेने उत्तुंग भरारी मारली. भावनांच्या कल्लोळांनी त्यांच्या हृदयात काव्यारव सुरू झाला आणि आषाढी मेघांची काव्यसुधा बरसू लागली. यक्ष आणि मेघ या त्यांच्या काव्यपात्रांच्या माध्यमातून प्रियकर आणि प्रेयसीच्या विरहव्यथेचे वर्णन मल्हाराप्रमाणे वर्षू लागले. मेघदूताचा नायक, विरही यक्ष आपल्या प्रियतमेच्या भेटीसाठी तडफडू लागला, पण शापामुळे तो अलंकापुरीत वर्षभर परतू शकत नव्हता. आपल्या प्रेयसीच्या भेटीसाठी आतुर झालेला यक्ष आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघांकरवी आपल्या प्रियतमेसाठी संदेश पाठवण्यासाठी मेघांना याचना करू लागला आणि यातूनच कालीदासांनी ‘मेघदूत’ या आजरामर महाकाव्याची निर्मिती केली.
कोणत्याही ग्रंथाची महत्ता त्याच्या लोकप्रियतेवरून गणली जाते. विद्वान व अविद्वान या दोघांनाही समसमान रूपात ग्रंथ प्रिय असणे हेच त्या ग्रंथाचे श्रेष्ठत्व असते आणि असेच ग्रंथ कोणत्याही काळात प्रशंसनीय ठरतात. संस्कृत साहित्य आणि कालीदास यांचा संबंध अतूट आहे. संस्कृत साहित्याचे सारे सार व सौष्ठव काही ग्रंथांवर अवलंबून आहे. त्यात कालीदासांचे साहित्य अग्रगण्य आहे. जर संस्कृत साहित्यातून कालीदासांना हटविले तर अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ असूनदेखील संस्कृत साहित्याच्या लोकप्रियतेत न्यूनता येईल; कारण कालीदासांनी आपल्या साहित्यात सौंदर्य व श्रृंगारप्रधान वर्णनाला जो उच्चतम नैतिक दर्जा दिला आहे आणि विशेषत: मेघदूतात ज्या पद्धतीने निसर्गाच्या भावभावनांशी संवाद साधत निसर्गाच्या हृदयाचे गुपित अतिशय लालित्यपूर्ण भाषेत आणि प्रत्येकाच्या हृदयात घर करेल, असे सांगितले आहे. कालीदासांच्या रचनांचे अनेकानेक अनुवाद झाले. स्थल, काल बदलत गेले तसे कालीदासांच्या रचनांचे नवनीत सतत वेगवेगळ्या आशयांनी प्रगट होत गेले. विश्‍वकवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या बहुसंख्य काव्यांवर कालीदासांचा खोल ठसा उमटल्याचे दिसून येते. मराठीत कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर, शांता शेळके अशांनी कालीदासांच्या मेघदूताचे भाषांतर केले आहे. मराठीबरोबरच हिंदीत अनेक भाषांतरे झाली, त्यात बाबा नागार्जुन यांचे भाषांतर उत्तर भारतात लोकप्रिय आहे. तर मैथिलीशरण गुप्त, जयदेव अशा ज्येष्ठ कवींच्या काव्यांवर कालीदासांचाच प्रभाव दिसून येतो. मेघदूत हे भारतीय वाङ्‌मयांचा परिसांश आहे. कालीदासांची ही रचना भारताबरोबरच विश्‍वभरात देखील अद्वितीय व विश्‍ववंद्य ठरली आहे. जर्मन, इंग्रजी, फ्रेन्च, रशियन, सिंहली, तिबेटी आदी अनेक विदेशी भाषांमध्ये याचे अनुवाद उपलब्ध आहेत. भारतीय भाषांत हिन्दी, उर्दू, बंगाली, मराठी आदी सर्व भारतीय भाषांतील अनुवाद लोकप्रिय आहेत. यात बंगाली भाषेने विशेष बाजी मारली आहे. आजदेखील बरेच बंगाली साहित्य, चित्रपट हे कालीदासांच्या साहित्याने प्रभावित झालेले दिसतात. काही दिवसांपूर्वी मिथुन चक्रवर्ती, अपर्णा सेन, कंकणा सेन-शर्मा अभिनीत आणि रितुपर्णो घोष दिग्दर्शित ‘तितली’ नावाचा बंगाली चित्रपट पाहण्याचा योग आला. हा चित्रपट कालीदासांच्या मेघदूतावरच आधारलेला आहे. त्याच्या शीर्षकगीतात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ याचेच वर्णन आहे. बंगाली भाषांतरकारांनी खूपच कल्पकतेने, वैविध्यतेने आणि नजाकतीने कालीदासांची काव्ये हाताळ्याचे हे सिद्ध प्रमाण आहे. खरे तर या लेखाची कल्पना ‘तितली’ हा चित्रपट पाहूनच सुचली.
कालीदासांच्या कृतींचे प्रशंसक फक्त भारतातच नसून, भारताबाहेर देखील मोठ्या संख्येने आहेत. युरोप आणि पाश्‍चिमात्य देशात कालीदासांच्या या अनुपम रचना नेण्याचे श्रेय हॉरेस हेल्मन विल्सन यांना जाते. त्यांनी सन १८१३ मध्ये ‘क्लाऊड मेसेन्जर’ हा मेघदूताचा इंग्रजी अनुवाद कोलकाता येथे प्रकाशित केला होता. अमेरिकन विचारवंत रायडर यांनी कालीदासांची श्रेष्ठता बिनशर्त स्वीकारली होती. जर्मन कवी ‘गटे’ यांनीही कालीदासांच्या प्रशंसेत खूप गौरवोद्‌गार काढले आहेत. कालीदासांची अनन्यकृति ‘शाकुन्तलम्’ वाचून गटे यांच्या तोंडून उद्गार निघाले होते की, जर तुम्ही स्वर्ग आणि मृत्युलोक यांना एकाच स्थानावर पाहू इच्छित असाल, तर माझ्या मुखातून एकच नाव निघते, ते म्हणजे शाकुंतलम्!
महाकवी कालीदासांचा ‘मेघदूत’ जरी छोटा काव्यग्रन्थ असला तरीही यातील काव्यांच्या माध्यमातून प्रेयसीच्या विरहाचे, निसर्गाचे, भावभावनांचे जेे वर्णन कालीदासांनी केले आहे, त्यासारखे श्रेष्ठ उदाहरण अन्यत्र सापडणे असंभव! आषाढ़ आणि श्रावणातील निसर्गाचे वर्णन प्रेमभाव प्रकटन, व्याकूळता आणि शृंगारिक प्रसंगांचे वर्णन हे अद्वितीय आणि सर्वांगसुंदर आहे. ‘शापग्रस्त एक विरही यक्ष आषाढाच्या मेघांनाच आपल्या प्रेयसीच्या विरहाने व्याकूळ होऊन निरोप देण्यासाठी दूत बनण्याची प्रार्थना करतो’ ही कल्पनाच कालीदासांच्या कल्पनाशक्ती आणि उत्तुंग प्रतिभेची चुणूक आपल्याला दाखविते.
भारतीय कवींमध्ये अनोखी सृजनशीलता होती. वैदिक, औपनिषद आणि पौराणिक प्रतिभा तर उत्तुंग होतीच, पण कालीदासांच्या कृती या भारतीय साहित्य शास्त्राला नवे आयाम देणार्‍या ठरल्या. कालीदासांच्या कल्पनाशक्तीचीही नवक्षितिजे पादाक्रांत करणारी भरारी म्हणावी लागेल. भारतीय साहित्य शास्त्रातील गद्यांना व काव्यांना वेगळी भाषाशैली व उत्कट भावनांचे प्रकटीकरण हे वैशिष्ट्य कालीदासांनीच दिले. आषाढाचा मेघ आपल्या मस्तीत धुंद होता, धीरगंभीर आणि ललितगतीने आकाशातून गमन करीत होता. त्याला विरही यक्षाची संपूर्ण करूण कहाणी ऐकावी लागली आणि यक्षाच्या स्नेहभाव बंधनांना तो जोडत असलेल्या निर्मळ मैत्रीच्या, बंधुत्वाच्या नात्याला मेघ तोडू शकला नाही. या काव्यऋचा काय सांगतात? कालीदासांच्या या काव्यांनंतर अनेक भारतीय कवींनी या संकल्पनेचा यथेच्च वापर केला आणि पुढेही करीत राहतील! भारतीय जनमानसावर हा आषाढाचा मेघ असाच दाटून राहील. प्रेयसीच्या विरहाचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे केवळ कविकर्म नव्हे, तर कालीदासांच्या स्वत:च्या वैयक्तिक संवेदनांचा सहज परिपाक होता. रामगिरी ते अलंकापुरीच्या मेघयात्रेतील सर्व ओळी स्वाभाविक सौरभ घेऊनच वाहतात. यातील एकेक ओळ भारतीय आत्मा ध्वनित करते. या प्रवासातील पृथ्वी, आकाश, नद्या, डोंगर, जंगले, वन-उपवने, मैदाने, शेती, वृक्ष, वनस्पती, गावे, नगरे, उपनगरे, बाग-बगीचा, नर-नारी, पशु-पक्षी, देव-देवता यांच्या वर्णनात याची प्रचिती येते.
 आजच्या नागपूरजवळील ‘रामगिरी’ येथे यक्षाला शापावधी पूर्ण करावयाचा असतो. मेघदूतातील काव्यप्रवास रामगिरी ते कैलास पर्वतापर्यंतचा असून, यात्रा वर्णनाचीच अधिकांश पदे आहेत. अलंकानगरीच्या वर्णनाची आठ पदे आहेत आणि साधारणपणे पंधरा पदे विरहिणी यक्षिणीच्यावर्णनाची आहेत. कालीदासांचा हा मेघ रामगिरीतून सरळ अलंकापुरीला जात नाही. अनेक वेडीवाकडी वळणे, आढेवेढे घेत, रमत-गमत तो कैलास पर्वतावर जातो. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे अनंतकालापासून येणारा मोसमी पाऊस (मान्सून) आजही ढोबळमानाने याच मार्गाने जातो. आजच्या २१ व्या शतकातील शास्त्रज्ञांनी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे सिद्ध केलेला, तपासलेला मार्गही असाच आहे. याला कोणता चमत्कार म्हणायचे? त्याकाळी कालीदासांनी कोणत्या वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारे हा मार्ग सांगितला असावा, या विचाराने आपण आवाक् होतो. कालीदासांच्या या प्रवासात मेघ उज्जयनीत श्री महांकालेश्‍वराचे (शिवाचे) दर्शन घेतो. क्षिप्रा नदीच्या चपल लाटांशी संवाद साधतो. पुढे हा मेघ गर्जत, बरसत माळव्यात येतो. मानसरोवराच्या दिशेने उडणार्‍या राजहंसांचा सहयात्री बनतो, तर नद्यांशी मेघ प्रणय करतो. जेथील तेथील वन्यजीव त्याला मार्ग दाखवितात. मोर आपल्या नृत्याने मेघांचे स्वागत करतात, तर मंदिरातील ढोल-नगार्‍यांच्या नादाने मेघाचे हृदय दाटून येते. अंधार्‍या रात्री मेघांची संगिनी विद्युतप्रकाश त्याचा पथ प्रशस्त करते. पुढे मेघाला यक्ष सांगतो की, गंभिरी, चम्बळ, कुरुक्षेत्र, गंगा आदी नद्या, पहाडांवरून भ्रमण करीत असता पर्वतराज हिमालयाचे दर्शन होईल. नंतर देवाधिदेव महादेवाचे निवासस्थान स्फटिक, धवल असा कैलास पर्वत दिसेल. याच कैलास पर्वताच्या गर्भात यक्षनगरी ‘अलंकापुरी’ आहे आणि येथे यक्षाची विरहिणी पत्नी आहे. तिला भेटून यक्षाचा संदेश देण्यापर्यंतचे अद्‌भुत वर्णन आपल्याला रोमांचित करते.
आषाढाच्या प्रथमदिवशी मेघाशी यक्षाच्या काव्यमय संवादांचे वर्णन कालीदासांचेच कविमन करू शकते. संस्कृतमधील महिमाप्राप्त ‘मेघदूत’मधील काव्यांचे वर्णन करण्यात माझ्यासारखे सर्वसामान्य लोक किती तोकडे पडतात, यांची जाणीव होते.
....................................

0 comments:

Post a Comment