इंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान व संस्कारांचा समन्वय

सोलापूरला नैसर्गिकदृष्ट्याच पर्यटन विकासाला संधी : इंडियन मॉडेल स्कूलचे अध्यक्ष ए.डी. जोशी
इंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान व संस्कारांचा समन्वय
शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक
 ‘‘सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने येथील शैक्षणिक संस्थांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. सुसंस्कारित विद्वानांच्या पिढ्याच आपल्या गावचे भविष्य घडवणार आहेत. त्यासाठी सोलापुरात आणखीन शैक्षणिक संस्था असणे अपरिहार्य असून शैक्षणिक संस्थांनी अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरुन विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने ज्ञानदान करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ए.डी. जोशी यांनी केले. सोलापूर शहराची व्याप्ती, विद्यार्थ्यांची संख्या पाहता इतर शहरांच्या तुलनेत शिक्षण संस्थांची संख्या कमी आहे. शिवाय असलेल्या शिक्षण संस्थांचा दर्जा देखील इतर शहरांच्या मानाने कमीच असल्याचे मत इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी यांनी व्यक्त केले. चांगल्या किंवा अद्ययावत संस्था सोलापूर शहरात उशिरा आल्या, किंबहुना उच्च शिक्षणासाठी मुंबई, बंगळूर सारख्या शहरातील संस्था सोलापूरात येणे अपेक्षित आहे................................................................................................................
काळ बदलतोय, परिस्थिती बदलतेय आणि त्याप्रमाणे मानवाच्या गरजाही बदलताहेत. जर सोयीचे बदल मनुष्य पटकन स्वीकारतो. पण गैरसोयीचे असतील तर ते बदल स्वीकारण्याची मानसिकताच आजचा सुशिक्षित वर्ग हरवून बसला आहे. इंग्रजांची कारकून निर्माण करण्याची म्हणजेच मॅकॉलेची शिक्षण पद्धती भारतीयांच्या इतकी अंगवळणी पडली आहे की, तो त्यापलीकडे विचारच करू शकत नाही. गेल्या साठ वर्षात पारंपरिक ठरलेल्या या शिक्षण पद्धतीने व्यापक शिक्षणाची आणि आपल्या प्राचीन शिक्षणपद्धतीतील ‘ज्ञानासाठी ज्ञान’ हेे मूळतत्त्व तर कोसो दूर फेकले जाऊन ‘पैशासाठी ज्ञान’ ही संकल्पना रुजली आहे. यात आपण स्वत:च व्यापक ज्ञानार्जनाचे मार्ग बंद करुन टाकले आहेत. पण, अशा प्रतिकूल स्थितीत प्रवाहाच्या विरुद्ध जात व्यापक शिक्षण पद्धतीचा प्रयोग सोलापूरच्या ए.डी. जोशी सरांनी इंडियन मॉडेल स्कूलच्या माध्यमातून केला.  तेव्हा अशक्यप्राय  वाटणारा हा प्रयोग ए.डी. जोशींनी यशस्वी करून दाखवला, दै. तरुण भारतने याविषयी श्री शिक्षण प्रतिष्ठानच्या इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक व अध्यक्ष ए.डी. जोशी, सचिव अमोल जोशी व कार्यकारी संचालिका सायली जोशी यांच्याशी संवाद साधला.
महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करताना आणि नंतर कोचिंग क्लास चालवत असताना मला एक गोष्ट लक्षात आली. की शाळा, शिकवणी आणि घरचा अभ्यास यामध्ये आजचा विद्यार्थी भरडला जाऊन त्याचे बालपण हिरावून घेतले जात आहे, याची जाणीव झाली. यावर काहीतरी उपाय शोधून काढला पाहिजे या विचाराने माझ्या मनात तेव्हापासून रुंजी घालण्यास सुरुवात केली. तेव्हा अमेरिकेत शिक्षण घेऊन भारतात परत आलेले माझे चिरंजीव अमोल यांनी शाळेची संकल्पना मांडली. आम्ही यावर विचार करुन विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीचे शिक्षण देणारी शाळा काढण्याचे ठरवले. त्याकाळात आमचे कोचिंग क्लासेस जोमात चालले होते आणि विद्यार्थ्यांची संख्या व आर्थिक उलाढाल उत्तम होती. चांगले उत्पन्न देणारे क्लास बंद करून शाळा काढण्याच्या संकल्पनेवर काही शिक्षण तज्ज्ञ, शिक्षणाधिकारी सुद्धा उपहासाने हसले. ते म्हणाले, ‘‘सर,  शाळा चालवून तुमचे आर्थिक नुकसान होईल, कशाला शाळा काढण्याच्या फंदात पडता?’’ पण आपण या समाजाचे काहीतरी ऋण देणे लागतो, ही सामाजिक ऋणाची जबाबदारी लक्षात घेऊन हा नवा उपक्रम चालू करण्याचा संकल्प केल्याचे ए.डी. जोशी यांनी सांगितले. सन २००२ साली जागा घेऊन मोठे बांधकाम उभे केले. तेेव्हा अद्ययावत व्यवस्था पुरवण्याइतके आर्थिक पाठबळ नव्हते. त्यामुळे तीन वर्ग, पाच-सहा शिक्षक आणि वाहतुकीसाठी एक बस इतक्या तुटपुंज्या बळावर जुळे सोलापूर सारख्या तेव्हाच्या ओसाड भागात शाळा सुरू केली. इंग्रजी माध्यम, पण मराठी संस्कार असे मूळ सूत्र पाळत बाहेरचा कोणताही आधार न घेता विद्यादानाच्या ज्ञानयागाचा श्री गणेशा केला. माझ्या शाळेच्या विद्यार्थ्याने शिकवणी अगर पालकांचा आधार न घेता स्वत: अभ्यास करुन यश मिळवले पाहिजे हा उद्देश आहे आणि पालकांनी माझ्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिल्याचे ए.डी. जोशी यांनी अतिशय नम्रतापूर्वक सांगितले.
सायली जोशी,  कार्यकारी संचालिका, इंडियन मॉडेल स्कूल
उत्तम दर्जाचे शिक्षण, नाष्टा, जेवण, वाहतूक व्यवस्था, येता जाता दफ्तराचे ओझे नाही, शाळेतच संपूर्ण अभ्यास, शिकवणीची गरजच नाही, यासर्व गोष्टी पालकांच्या लक्षात आल्या आणि पुढे याच गोष्टी संस्थेच्या यशोवृद्धीचे बलस्थान ठरल्या असल्याचे अमोल जोशी यांनी सांगितले. ए.डी. जोशी पुढे बोलताना म्हणाले की, ‘‘माझ्या शाळेचे विद्यार्थी अभ्यासाबरोबरच खेळ आणि कला क्षेत्रात देखील चमकत आहेत, त्यांच्या अष्टपैलू यशाकडे पाहून आमचा आगळावेगळा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून येते.’’ या शिक्षण पद्धतीमुळे माझ्या विद्यार्थ्याचा आत्मविश्‍वास  दुणावला आणि त्यांच्या यशाचे गुणोत्तर अनेक पटीने वाढले. पहिली दहावीची बॅच शंभर टक्के यश घेऊन बाहेर पडली. त्यामुळे पालकांचा आमच्या संस्थेवर विश्‍वास आणि श्रद्धा वाढली. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली. पालकांनी आग्रह केला आणि कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. त्यावर्षी नव्या महाविद्यालयांना परवानगी द्यायची नाही असे सरकारचे धोरण असतानाही पालकांनी पुढाकार घेऊन परवानगी आणली. पालक संस्थेची परवानगी आणतात असे हे एकमेव उदाहरण असावे.
आमच्या कल्पना, शिक्षकांचे मनापासून सहकार्य आणि पालकांचा विश्‍वास यामुळे आमचे यश वाढत गेले. बारावी शास्त्र विभागाचे विद्यार्थी कोणतीही शिकवणी न लावता केवळ महाविद्यालयातील शिक्षण आणि स्वत:च्या अभ्यासाच्या जोरावर उत्तम यश मिळवू शकतात हे इंडियन मॉडेल स्कूलने सिद्ध करुन दाखवले आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. आज शाळेत तीन इमारती आहेत. ३००० विद्यार्थी आणि १०० शिक्षक आहेत.
ग्रामीण विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने अक्कलकोट येथे शाळा सुरू केली. तेथे सुद्धा चांगला प्रतिसाद लाभला आहे. २००९ मध्ये पोलीस खात्याने शाळा सुरू करण्याचे ठरवले आणि ती चालवण्याचे संस्थांना आवाहन केले. तेव्हा पोलीसखात्याने त्यांच्याकडे आलेल्या पंधरा संस्थांच्या प्रस्तावातून आमची निवड केली. यावरुन आमच्या शिक्षण प्रणालीवर किती विश्‍वास आहे हे दिसून आल्याचे  जोशी यांनी अभिमानाने सांगितले.
 विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासात यश न मिळवता खेळ आणि कलेच्या क्षेत्रातही नाव मिळवले पाहिजे हे लक्षात ठेवून आम्ही विशेष मार्गदर्शन करतो आणि त्याचे यश मिळत आहे. आमचे विद्यार्थी सर्व खेळात व कलेत सर्वस्थरावर यश मिळवत आहेत. आमच्या शाळेतील ४० टक्के विद्यार्थी हे ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवतात हा एक विक्रमच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विद्यार्थी हा हुशार असतो, फक्त त्यांना प्रेरणा देणे गरजेचे आहे. आम्ही तेच करतो, त्यांच्यातील आत्मविश्‍वास जागृत केल्यास विद्यार्थी मोठे कर्तृत्व गाजवू शकतात हे सिद्ध झालेले असल्याचे जोशी म्हणालेे.
१६ ते १८ हे वय मुलांच्या दृष्टीने अतिशय नाजूक व महत्त्वाचे आहे.  या वयात होणार्‍या चुकांचे परिणाम पुढे आयुष्यभर विद्यार्थ्यांना भोगावे लागतात, त्यामुळे याकाळात मुलांवर विशेष लक्ष पुरवणे अपरिहार्य ठरते, त्यासाठी ११ वी व १२ वी या दोन्ही इयत्ता कॉलेजमध्ये न राहता हे वर्ग शाळांशीच जोडले जाणे आवश्यक असल्याचे ए.डी. जोशी यांनी आवर्जुन सांगून या योगे या वयातील विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देता येऊ शकत असल्याचे म्हणाले. सर्वच क्षेत्रात खाजगीकरण झाल्यास चांगले बदल होतील. यापूर्वी झालेल्या  खाजगीकरणामुळे हे सिद्ध झाले आहे. आज काळाबरोबर धावत असताना विद्यार्थ्यांना भारतीय संस्कार देणे व ते टिकवणे ही आता काळाची गरज बनली आहे. संस्कारहीन विद्वान असून काहीही उपयोग नाही त्यामुळे संस्काराचे विशेष महत्त्व आहे. विद्यार्थ्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले पाहीजेत, त्यामुळे डोक्यात यशाची हवा न शिरता प्रगतीचा आलेख सतत चढता राहतो.
सामाजिक कार्य - शैक्षणिक कार्याबरोबरच आम्ही सामाजिक कार्यात कार्यरत असल्याचे सांगून जोशी म्हणाले की,  या परिसरात अष्टविनायकाचे मंदिर बांधले आहे, येेथे धार्मिक कार्यक्रम होतात. तसेच अरुणोदय नागरी सहकारी पतसंस्थद्वारे विद्यार्थी व पालकांना आर्थिक सहाय्य देत विविध योजना राबवल्या जातात. ‘साई महिला प्रतिष्ठान’च्या माध्यमातून महिलांना उद्योग व्यवसायासाठी प्रयत्न केले जातात. ‘अलकनंदा जोशी महिला गौरव पुरस्कार’ कर्तृत्ववान महिलांना दिला जातो. हा पुरस्कार सुरू करण्यामागचा हाच दृष्टिकोन आहे.
भविष्यातील उपक्रम - पुढील वर्षी आम्ही ‘योगविद्या वर्ग’ सुरू करत असल्याचे सांगून जोशी म्हणाले की, नाशिक येथील योगविद्याधाम तर्फे योगाचे शास्त्रशुद्ध शिक्षण व परीक्षा घेऊन प्रमाणपत्र दिले जाईल. यामुळे उत्तम आरोग्य व तणावमुक्तीसाठी मदत होणार आहे. लवकरच ‘अलकनंदा जोशी वाचनालय’ देखील सुरू करत आहोत. आज वाचनसंस्कृती हळूहळू लोप पावण्याच्या मार्गावर आहे. म्हणून पालक विद्यार्थी व नागरिकांत वाचनाची गोडी वृद्धिंगत करण्याच्या हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी या वाचनालयात वृत्तपत्र विभाग ठेवणार आहोत.
भविष्यात अनेक योजना साकारण्याचा विचार आहे. सोलापुरातील जनतेचे सहकार्य आहेच व असेच राहिल, अशी अपेक्षा आहे.
................................................................................
•सोलापूरचा सर्वांगीण विकास : ए.डी. जोशी
प्रा. ए. डी. जोशी,  इंडियन मॉडेल स्कूलचे अध्यक्ष
   सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने येथील शैक्षणिक संस्थांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. सुसंस्कारित विद्वानांच्या पिढ्याच आपल्या गावचे भविष्य घडवणार आहेत. त्यासाठी सोलापुरात आणखीन शैक्षणिक संस्था असणे अपरिहार्य असून शैक्षणिक संस्थांनी अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरुन विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने ज्ञानदान करणे आवश्यक आहे. यात सर्वात महत्त्वाचा घटक आहे शिक्षक. शिक्षकांची निवड करताना अतिशय जागरुक राहणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक तितका अभ्यासू असला पाहिजे. विद्यार्थ्यांना शिकवण्यात शिक्षकांची इनव्हॉल्वमेंट असली पाहिजे. हा शिक्षकवर्ग स्वत: अभ्यासू, कामसू व जिज्ञासू असला पाहिजे तरच तो उत्तमोत्तम विद्यार्थ्यी घडवू शकतो. पण दुर्दैंवाने हडाचा शिक्षक ही संकल्पना आता लोप पावत आहे. ज्ञानासाठी ज्ञान अशी भूमिका न ठेवता प्रत्येकजण पैशासाठी ज्ञान अशी मानसिकता बाळगून आहे आणि ती या देशाला घातक ठरणार आहे.
सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने वैद्यकीय आणि पर्यटन व्यवसाय ही बलस्थाने ठरु शकतात. कारण, पर्यटनाच्या दृष्टीने येथे मोठी संधी आहे. सोलापूरमध्ये काय नाही? येथे सर्वच अनुकूलता आहे. असे असताना सोलापूर मागे का आहे तर, सरकारच्या प्रयत्नांच्या कमतरतेमुळे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने मार्केटिंग, वेबसाईटस आणि हॉटेल्स होणे गरजेचे आहे, बाकी सर्व प्रेक्षणीय स्थळे सोलापूर परिसरात आहेत फक्त ते मेंटेन करणे गरजेचे आहे. श्री सिद्धेश्‍वर देवस्थान, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, पंढरीचा विठूराया, तुळजापूरची भवानी, गाणगापूरचे श्री दत्त शिवाय विजापूरचा गोलघुमट आदींच्या सहवासामुळे सोलापूरला नैसर्गिकदृष्ट्याच पर्यटन विकासाला संधी आहे. सोलापूर हे चांगले वैद्यकीय केंद्र होत आहे याला पूरकता निर्माण करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे. याचबरोबर सोलापूरकरांनी मार्केटिंगचे तंत्र शिकणे ही गरजेचे आहे. कारण आपल्याकडे सर्व काही असून त्याचा योग्य प्रचार होत नाही हे देखील सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला घातक ठरत आहे.
पुणे, कोल्हापूर, नाशिक आदी सारखी शेतीच्या दृष्टीने सधन क्षेत्रे बंद करुन तेथे उद्योग धंदे उभारले जात आहेत आणि सोलापूर सारखे माळरान तसेच सोडले जात आहे ही शासनाची भूमिका विसंगत आहे. असे करुन शेती उत्पादनाचे नुकसान करुन घेत आहोत. चांगले शेती उत्पन्न देणारी पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक आदी भागात शेती उत्पादनाला आणखी पूरक करुन सोलापूर सारखे माळरान उद्योग क्षेत्रासाठी वापरले जाणे आवश्यक आहे त्यामुळे राज्याचा समातोल विकास साधणे शक्य होईल. विद्यापीठ आणि उद्योगक्षेत्र यांच्यात समन्वय आवश्यक असून त्यामुळे रोजगाराभिमुख किंवा उद्योगांना लागणारे नेमके शिक्षण विद्यार्थ्यांना मिळू शकेल. शासनाची करप्रणाली अतिशय चुकीची असून, त्या उद्योगाला पूरक असे बदल होणे अपरिहार्य आहे.
...................................................................................
•सोलापूरचा शैक्षणिक विकास : अमोल जोशी
अमोल जोशी,  सचिव,  इंडियन मॉडेल स्कूल 
सोलापूर शहराची व्याप्ती, विद्यार्थ्यांची संख्या पाहता इतर शहरांच्या तुलनेत शिक्षण संस्थांची संख्या कमी आहे. शिवाय असलेल्या शिक्षण संस्थांचा दर्जा देखील इतर शहरांच्या मानाने कमीच असल्याचे मत इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी यांनी व्यक्त केले. चांगल्या किंवा अद्ययावत संस्था सोलापूर शहरात उशिरा आल्या असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात नव्या तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक असताना आपल्या शहरातील संस्था या तंत्रज्ञानाबाबत अद्याप जागरुक झालेल्या दिसत नाहीत. इंटरनेटद्वारे मिळणारे माहिती व ज्ञानाचे भांडार प्रचंड मोठे आहे. याचा वापर आपल्या शालेय विद्यार्थ्यांना झाला पाहिजे त्यासाठी इंडियन मॉडेल स्कूलने शहरात पहिल्यांदा हा उपक्रम राबवला. त्यासाठी अद्ययावत संगणक कक्ष उभा केला आहे. इंटरनेट आणि संगणक शिक्षणाबाबत आम्ही आग्रही असतो. आता इंडियन मॉडेल स्कूलमध्ये सोलापुरात सर्वप्रथम ऑडिओ व्हीजुअल टेक्नॉलॉजीचा वापर सुरु केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कोणतेही क्लीष्ट विषय समजायला सोपे जातात. त्यामुळे सर्वच शैक्षणिक संस्थांनी या अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरणे अपरिहार्य आहे. सोलापुरातील नव्या संस्थांबरोबरच जुन्या संस्थांनीही आता प्रवाह ओळखून प्रवाहाबरोबर गेले पाहिजे. आपल्या सोलापूरच्या संस्थांमध्ये निकोप स्पर्धा असणे आवश्यक आहे. कारण स्पर्धेशिवाय प्रगतीचा वेग वाढत नाही. शहरातील सर्व संस्थांची प्रगती किंवा वाढ समान असणे ही तितकेच महत्त्वाचे असून त्यामुळे संपूर्ण शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठे बळ येईल. शैक्षणिक क्षेत्रात नवनवे प्रयोग करणे ही महत्त्वाचे असून इंडियन मॉडेल स्कूलने हे सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही केलेल्या प्रयोगामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे निदर्शनाला आले आहे. याचबरोबर अभ्यासात नेमकेपणा व स्पेशलायझेशन देखील तितकेच आवश्यक आहे. शिवाय त्यांंच्या प्रगतीची असेसमेंट होणे ही तितके गरजेचे आहे. विद्याथ्यार्ंना कला, क्रीडा, भाषा आदी सर्व विषयात ज्ञान मिळाल्यास या विद्यार्थ्यांत अष्टपैलूत्व निर्माण होताना दिसते.
आजपर्यंत महाराष्ट्र राज्य बोर्डाचा अभ्यासक्रम होता, आता केंद्रिय बोर्डाचा(सीबीएसई) अभ्यासक्रम आमच्या संस्थेत सुरु केलेला आहे. सन २०१३ पर्यंत संपूर्ण भारतभर एकच म्हणजे सीबीएससी अभ्यासक्रमाच्या शाळा असणार आहेत. त्यामुळे सोलापुरातील सर्वच शिक्षण संस्थांनी सीबीएससीचा अभ्यासक्रम अंमलात आणणे महत्त्वाचे आहे.  सध्या कोल्हापुरात १२ सीबीएससी बोर्डाच्या संस्था आहेत. तर सोलापुरात या वर्षी फक्त ३ संस्था आहेत. तसेच इंडियन मॉडेल स्कूलचा सीईटीची इंटरनेटद्वारे तयारीचा उपक्रमही गेल्या दोन वर्षांपासून यशस्वीरित्या सुरू आहे.
तरुण भारत, सोलापूर, रविवार, दि. २६ डिसेंबर २०१०

0 comments:

Post a Comment