MANNA DEY

मन्नादांना २००७ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
चित्रपटगीतसृष्टीच्या नभांगणातील तळपणारा तारा : मन्ना डे
•अमर पुराणिक
पद्मभूषण मन्ना डे हे हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. चित्रपट व संगीत क्षेत्रांतील ज्येष्ठ गायक. ज्यांनी हिंदी चित्रपटगीतांना शास्त्रीय गाण्याची बैठक दिली. त्यांच्या भावपूर्ण व शुद्ध गायकीने हिंदुस्थानासह सर्व जगभरातील गानरसिकांना भुरळ घातली. अशा मन्नादांना २००७ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. या आधी पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या मन्ना डे यांना आता चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. हा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ पार्श्‍वगायकांचा सन्मानच आहे! खरे तर यापूर्वीच त्यांना हा पुरस्कार द्यायला हवा होता! माता महामायादेवी व पिता पूर्णचंद्र डे यांच्या पोटी १ मे १९१९ रोजी कोलकात्यात मन्ना डे यांचा जन्म झाला. मन्ना हे त्यांचे टोपणनाव. मन्ना डे यांचे खरे नाव प्रबोधचंद्र डे. त्यांचे शालेय शिक्षण इंदू बाबूर पाठशाळेत झाले. माध्यमिक शिक्षण स्कॉटिश चर्च स्कूल मध्ये झाले, तर विद्यासागर महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. मन्ना डे यांना कुस्ती व बॉक्सिंग या खेळांचीही आवड होती. धार्मिक व एकत्र कुटुंबात जन्मलेल्या मन्नादांच्या घरातच संगीतपरंपरा होती. मन्ना डे यांचे काका संगीताचार्य कृष्णचंद्र डे (ख्यातकीर्त संगीतकार के.सी. डे) यांच्याकडे शालेय जीवनापासूनच शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला सुरुवात केली. शाळेत आपल्या मित्रांसमोर मन्नादा गाणे गात असत. शाळेत, महाविद्यालयात ते चांगले ‘गवैया’ म्हणून लोकप्रिय झाले होते. काका के. सी. डे यांच्याबरोबरच मन्ना डे यांची उस्ताद डबीर खॉं यांच्याकडेही संगीताची तालीम सुरू होती. १९४१ मध्ये त्यांनी कला शाखेतील पदवीही पूर्ण केली. नंतर के.सी. डे मुंबईला आले व संगीतकार म्हणून नाव कमावले. १९४२ साली मन्ना डे मुंबईला आले व के. सी. डे यांचा सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हिंदी चित्रसृष्टीचे गौरीशंकर सचिनदेव बर्मन यांचेही सहाय्यक म्हणून मन्नादांनी काम करायला सुरुवात केली. त्यावेळी मुंबईत मन्ना डे यांनी भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खॉं व उस्ताद अब्दुल रहमान खॉं यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण चालू ठेवले. १९४२ मध्ये काका के.सी. डे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘तमन्ना‘ या चित्रपटात मन्ना डे यांना सर्वप्रथम गायची संधी मिळाली. हे युगलगीत मन्नादांनी सुरैय्यासोबत गायिले. १९४३ मध्ये ‘रामराज्य’ या चित्रपटातही मन्नादा गायिले. ही गीते बर्‍यापैकी गाजलीही, पण १९५० साली सचिनदेव बर्मनदांनी संगीतबद्ध केलेल्या ‘मशाल’ सिनेमात ‘उपर गगन विशाल’ हे गाणे गायची संधी मिळाली आणि बर्मनदांच्या या गाण्याने मन्ना डे नावाच्या गुणी गायकाची ओळख श्रोत्यांना झाली. हे गाणे प्रचंड गाजले! त्यानंतर प्रसिद्धीसाठी मन्नादांना मागे वळून पाहावेच लागले नाही. १९५२ साली ‘अमर भूपाळी’ हा मराठी व बंगाली भाषेत चित्रपट निघाला, हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला! या चित्रपटात मराठी व बंगालीत सर्वप्रथम मन्ना डे यांनी पार्श्‍वगायन केले. यातील गाणीही खूप गाजली. त्यांचे बंगाली पार्श्‍वगायक म्हणून मोठे नाव झाले.दि. १८ डिसेंबर १९५३ रोजी मन्नादांचा विवाह केरळच्या सुलोचना कुमारन यांच्याशी झाला. त्यांना १९ ऑक्टोबर १९५६ साली सुरोमा व २० जून १९५८ साली सुमिता अशी दोन कन्यारत्ने झाली.अतिशय वैविध्यपूर्ण गाणी गाणार्‍या मन्ना डे यांची ‘रवींद्र’ संगीतावरही चांगली पकड होती. मन्नादांचे शास्त्रीय संगीताबरोबरच पाश्‍चात्य व लोकसंगीतावरही चांगलेच प्रभुत्व होते. त्यांनी भारतीय व पाश्‍चात्य संगीतात अनेक नवनवे प्रयोग केले. त्यांनी साडेतीन हजारांहून अधिक गाणी गायिली आहेत. सचिनदांपासून पंचमदांपर्यंत सर्वच संगीतकारांबरोबर मन्ना डे यांनी काम केले. सचिनदा स्वत: धृपद-धमार गायकीच्या परंपरेतले, त्यामुळे शास्त्रीय अंगाची गाणी मन्नादांकडून खूपच सुंदर गाऊन घेतली व जवळ जवळ सर्वच गाणी लोकप्रिय ठरली. सर्वसामान्य रसिक श्रोत्यांना राग दरबारी कान्हडा मन्नादांमुळे कळायला लागला, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही. मन्नादांनी बरीच गाणी या रागात गायिली आहेत. सचिनदेव बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनातली मन्नादांची साधारणपणे सर्व गीते गाजली. ज्यात तलाश, मंजिल, जिंदगी जिंदगी, ज्वारभाटा अशी काही उदाहरणे देता येतील. मन्नादांनी सलील चौधरींसाठी वेगळी गाणी गायिली. अवघड व वक्र चालींची गाणी हे सलीलदांचे वैशिष्ट्य होते. अशी गाणी मन्नादांसारख्या कसलेल्या गायकाच्या आवाजात खूपच शोभतात! जसे ‘‘आनंद, गुड्डी, परिणिता, काबुलीवाला’’ आदी अनेक उदाहरणे सांगता येतील. हेमंतकुमार यांनीही मन्नादांना वैशिष्ट्यपूर्ण गाणी दिली. राहुलदेव बर्मन यांनी मन्नादांकडून खूप वेगळी गाणी गाऊन घेतली. विशेषत: शास्त्रीय संगीत गाणार्‍या मन्नादांकडून शास्त्रीय संगीताबरोबरच पाश्‍चात्य ढंगातील गाणी अप्रतिमरीत्या गा ऊन घेतली. हे पंचमदांचे वेगळेपण होते; ज्यात भूतबंगलामधील ‘आवो ट्विस्ट करे’, ‘प्यार करता जा’, पडोसनमधील,‘ एक चतुर नार’, ‘तू क्या जाने पिया सावरिया ’, अब्दुल्लामधील ‘लल्ला अल्ला तेरा’, अधिकारमधील ‘फॅशन की दिवानी’, बहारोंके सपनेमधील ‘चुनरी संभाल गोरी’, बुढ्ढा मिल गयामधील ‘आयो कहॉंसे घन:श्याम नंदलाल’, शोलेमधील ‘ये दोस्ती’, जुर्माना ‘ये सखी राधिके’ तसेच ‘प्यार किये जा, मेहबुबा, सीता और गीता, जाने अन्जाने’ अशी अनेक अवीट गोडीची गाणी मन्नादांनी पंचमदांसाठी गायिली. राज कपूरसाठी मन्ना डे यांनी मेरा नाम जोकर मधील ‘ए भाय, जरा देख के चलो’, सत्यम् शिवम् सुंदरम्‌मधील ‘यशोमती मैंयासे बोले नंदलाला’ आदी गीते प्रचंड लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर ‘‘चोरी चोरी, अनाडी, श्री ४२०, बूट पॉलिश’’ आदी चित्रपटांसाठी गीते गायिली. मन्नादांनी या संगीतकारांशिवाय जवळ जवळ त्या काळातील सर्वच संगीतकारांबरोबर काम केले. ज्यामध्ये ‘‘उपकार, वक्त, तीसरी कसम, मेरे हुजूर, नीलकमल, लाल पत्थर, शोर, आविष्कार, क्रांती, लावारिस’’ आदी चित्रपटांचा समावेश होतो. मन्नादांची शास्त्रीय, उपशास्त्रीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली! किंबहुना त्यांच्यावर फक्त शास्त्रीय गाणी गाणारा गायक असाच शिक्का पडला होता, पण पंचमदांनी मन्नादांकडून वेगवेगळ्या ढंगांतील गाणी गाऊन घेऊन हा शिक्का पुसला. मन्नादांची बसंत बहारमधील ‘भय भंजना वंंदना’, सूर ना सजे क्या गाऊँ मैं, जाने अन्जानेमधील ‘छम छम बाजे रे पायलिया’, तलाशमधील ‘तेरे नैना तलाश करे’, बूट पॉलिशमधील ‘लपक झपक तू आरे बादरवा’, मेरे हुजूरचे ‘झनक झनक तोरे बाजे पायलिया’ ही शास्त्रीय गाणी आजही लोकप्रिय आहेत. मन्नादांनी नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटासाठी शेवटचे गीत गायिले आणि चित्रपट गीतगायनातून संन्यास घेतला. आजच्या काळात विशेषत: १९९० नंतर मन्नादांनी चित्रपटगीत गायिलेच नाही. त्यांची यावरील प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. त्या दर्जाचे संगीतकार न राहिल्यानेच मन्नादांना संन्यास घ्यावा लागला, पण शास्त्रीय संगीतसाधना आणि जाहीर कार्यक्रम मन्नादांनी अजूनही सुरूच ठेवले आहेत. जवळपास ५० वर्षे मुंबईत घालविल्यानंतर आता मन्नादा सध्या बंगळुरूमधील कल्याणनगरमध्ये राहतात, पण त्यांनी कोलकात्यातील त्यांची जुनी वास्तू तशीच ठेवली आहे. मन्ना डे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात १९७० साली ‘निशिपद्म’ या बंगाली चित्रपटासाठी राष्टृीय पुरस्कार मिळाला आहे. तर १९७१ साली मेरा नाम जोकरसाठी राष्ट्रीय पुरस्कार, १९७१ साली भारत सरकारचा पद्मश्री, १९८५ साली मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, १९८८ साली संस्कृत परिषद, ढाक्का येथील पुरस्कार, १९९० साली मिथुन चक्रवर्ती असोसिएशन, कोलकाता यांचा ‘श्यामल मित्रा’ पुरस्कार, १९९१ ला संगीत स्वर्णांचूर पुरस्कार, १९९३ साली पी.सी. चंद्र पुरस्कार, कमलादेवी राय पुरस्कार, २००१ साली आनंद बाजार पत्रिका यांचा आनंदलोक पुरस्कार, पश्‍चिम बंगाल सरकारचा उस्ताद अल्लाउद्दिन खॉं पुरस्कार, २००४ साली केरळ सरकारचा पुरस्कार, २००४ सालीच रवींद्रभारती विद्यापीठाची डी.लिट., २००५ साली महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार, २००५ साली बुर्धवन विद्यापीठाची डी.लिट व २००५ साली भारत सरकारचा पद्मविभूषण असे अनेक पुरस्कार व गौरव मन्ना डे यांना प्राप्त झाले आहेत. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव केल्याने, चित्रपट व संगीत क्षेत्राचीच मान उंचावली आहे!
दै. तरुण भारत, सोलापूर. ४ ऑक्टोबर २००९

0 comments:

Post a Comment