DR. HOMI BHABHA

होमी भाभा यांची जन्मशताब्दी 
भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा
•अमर पुराणिक
भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते. ज्यांची जन्मशताब्दी आज आपण साजरी करत आहोत. भारताने केलेल्या अणु संशोधनाचा पाया याच होमी भाभांनी घातल्यामुळे आज आपला देश अण्वस्त्र संपन्न झाला आहे. अणु तंत्रज्ञानाचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक होते. वडील जहांगीर होरमजी भाभा आणि आई मेहेरबाई या दांपत्याच्या पोटी डॉ. होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंंबईत सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. बालपणी वाचनाची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीच जास्त पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्तेही होते.त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालूनच. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली. भौतिकशास्त्र हे कार्यक्षेत्र असलेल्या होमी भाभांनी कॅव्हेंडिश लॅबोरेटरी, टाटा मूलभूत संशोधन संस्था, भारतीय अणुऊर्जा आयोग आदी संस्थांचे संचालक व संशोधक म्हणून कार्य केले. १९३३ साली भाभा यांनी ‘ऍभसॉर्बशन ऑफ कॉस्मिक रेडिएशन‘ हे पहीले वैज्ञानिक संशोधन साहित्य प्रकाशीत केले आणि तेथूनच्या त्यांच्या प्रचंड संशोधन कार्याला प्रारंभ झाला.१९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगळूरु येथे प्राध्यापक म्हणून काम केले. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन केंद्राची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन केंद्राचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारतात अणु भट्टीची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक होते. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणुभट्ट्या सुरू करून भारताने अणुभट्ट्यांंचा विज निर्मितीसाठी उपयोग करण्यास सुरुवात केली. भारताची सामरिक क्षमता वाढवण्यासाठीही भाभांनीच प्रथम सुरुवात केली आणि १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.२४ जानेवारी १९६६ रोजी संयुक्त राष्ट्रच्या सभेला जातांना फ्रान्समधील मोंट ब्लँक येथे एअर इंडिया बोईंग ७०७ या विमानाच्या अपघातात त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यु नंतर मुंबईतील अणूशक्तीनगर येथील अणु संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) असे ठेवण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स, स्पेस सायन्स, रेडिओ ऍस्ट्रॉनॉमी, आणि मायक्रो बायोलॉजी आदी विषयांच्या अभ्यास व संशोधनातही होमी भाभांनी संशोधकांना मोठे प्रोत्साहन दिले होते. सन १९६७ पासून होमी भाभा फेलोशिप काउन्सिल च्यावतीने होमी भाभा फेलोशिप दिली जात आहे. भाभांच्या नावे होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्‌‌‌युट हे अभिमत विद्यापीठ सुरु करण्यात आले आहे. होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्यकेशन ही संस्था ही या महान अणुसंशोधकाच्या नावाने सुरु करण्यात आली आहे.
दै. तरुण भारत, सोलापूर. १ नोव्हेंबर ०९

1 comments:

Anonymous said...

Good information for project.

Post a Comment