This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
अमर पुराणिक -
 नुकत्याच झालेल्या जदयुच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देखील नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. आम्हाला भाजपा हवी आहे, पण मोदी नको. अशीच भूमिका मांडत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नाकारण्याची मानसिकता कायम ठेवली आहे. मुळात नितीश कुमार हे भाजपाच्या भक्कम पाठिंब्यावर आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान आहेत, हे वरील विधाने करत असताना नितीश कुमार विरसत आहेत. बिहारच्या विकासातील भाजपाचे योगदान हे मोठे असतानाही नितीश कुमार ते सोयिस्कररित्या झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. जर नितीश कुमारांनी बिहारचा उत्तम विकास केला असेल तर सेक्युलॅरीझमच्या कुबड्यांची त्यांना का गरज पडावी? हा प्रश्‍न पडतो. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीस विरोध करण्यामागची भूूमिका ही बिहारमधील मुस्लिम व्होट बँक गमावण्याच्या भीतीपोटी आहे हे जगजाहीर आहे. मोदी यांनी गुजरातमध्ये हॅट्‌ट्रिक केली, ती खर्‍याखुर्‍या विकासाच्या जोरावर. सेक्युलॅरीझमच्या कुबड्या घेऊन नव्हे. विकासाची धमक, जनतेच्या सुखाची चिंता असल्यावर असल्या कुबड्यांची गरजच नरेंद्र मोदी यांना पडली नाही.
 लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप जवळजवळ १ वर्षाचा कालावधी आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाची तयारी सुरू झाली आहे. भाजपा देखील २०१४ ची निवडणूक जिंकून सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे, पण भाजपाच्या या वाटचालीत सर्वात मोठा अडथळा केला जातोय तो त्यांच्याच रालोआमधील सहकारी पक्ष जदयुकडून. भाजपाने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा यासाठी प्रसारमाध्यमं, विरोधी पक्ष आणि जदयुनीच जास्त तगादा लावला आहे. विशेषत: जदयुनेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे रडगाणे सतत सुरू आहे. मतदार, भाजपा कार्यकर्ते आणि भाजपा श्रेष्ठींनी मात्र अशी कोणतीही मागणी केलेली नाही. नितीश कुमार आणि प्रसारमाध्यमांनाच भाजपाच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची घाई लागली आहे.
नुकत्याच झालेल्या जदयुच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देखील नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. आम्हाला भाजपा हवी आहे, पण मोदी नको. अशीच भूमिका मांडत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नाकारण्याची मानसिकता कायम ठेवली आहे. मुळात नितीश कुमार हे भाजपाच्या भक्कम पाठिंब्यावर आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान आहेत, हे वरील विधाने करत असताना नितीश कुमार विरसत आहेत. बिहारच्या विकासातील भाजपाचे योगदान हे मोठे असतानाही नितीश कुमार ते सोयिस्कररित्या झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. जर नितीश कुमारांनी बिहारचा उत्तम विकास केला असेल तर सेक्युलॅरीझमच्या कुबड्यांची त्यांना का गरज पडावी? हा प्रश्‍न पडतो. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीस विरोध करण्यामागची भूूमिका ही बिहारमधील मुस्लिम व्होट बँक गमावण्याच्या भीतीपोटी आहे हे जगजाहीर आहे. मोदी यांनी गुजरातमध्ये हॅट्‌ट्रिक केली, ती खर्‍याखुर्‍या विकासाच्या जोरावर. सेक्युलॅरीझमच्या कुबड्या घेऊन नव्हे. विकासाची धमक, जनतेच्या सुखाची चिंता असल्यावर असल्या कुबड्यांची गरजच नरेंद्र मोदी यांना पडली नाही. त्यामुळेच मुस्लिम समाजही नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा आहे, पण नितीश कुमारांना मात्र अल्पसंख्यकांच्या, मुस्लिमांच्या मतपेट्या गमावण्याची भीती वाटतेय आणि तरीही नितीश कुमार म्हणतात की, मी एकट्यानेच म्हणजे नितीश कुमार आणि जदयुने बिहारचा विकास केला. बिहारचा त्यांनी विकास केला, हे जर खरे असेल तर व्होटबँकेच्या कुबड्यांची नितीश कुमारांना गरज असता कामा नये. गेली अनेक वर्षे प्रचंड दारिद्र्य आणि त्रास भोगलेल्या बिहारी जनतेला जात, धर्म नव्हे, तर विकासच दिसणार आहे. नव्हे तो दिसतोय आणि तरीही नितीश कुमार मोदी आणि भाजपापासून भयभित का होतात. इतकेच नव्हे, तर स्वत: गेल्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ले, त्यांना स्वत:ला निवडून येता आले नाही, स्वत:च्या जोरावर विकास करण्याची क्षमता नाही. स्वपक्षातील शिस्त राखता येत नाही ही वस्तुस्थिती असताना नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यातूनच नितीश कुमार अशी विक्षिप्त भूमिका घेत आहेत.
फाजिल महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या नितीश कुमारांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी गेल्या महिन्यात दिल्लीत शक्तीप्रदर्शन केले. ज्या संपुआच्या नावाने बोटे मोडतात त्या भ्रष्ट संपुआच्या दारात वाडगा घेऊन बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून भिक मागत होते. जर ते खरेखुरे विकासपुरुष असतील, तर बिहारच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांना हे करण्याची गरज का पडावी? नरेंद्र मोदींनी केंद्राकडून अशी कोणतीही भीक घेऊन गुजरातचा सर्वांगीण विकास केला नाही, तर तो स्वत:च्या जोरावर केला आहे. त्यांनी गुजरातच्या जनतेत प्रचंड आत्मविश्‍वास जागवला आहे आणि तेच मोदींच्या यशाचे एक महत्त्वाचे अंग आहे. उपलब्ध साधनांवर राज्याचा विकास करताना जनसहभागाचे महत्त्व ओळखून मोदींनी हे प्रभावी तंत्र वापरले. असली अनेक मोदीतंत्रं गुजरातच्या विकासाला कारणीभूत आहेत आणि हा सर्व भाग अजून नितीश कुमारांच्या गावीही नाही. भाजपाचे विकासाचे फॉर्म्युले वापरून हे नितीश कुमार भाजपाशासित गुजरातच्या विकासाची सतत टिंगल करत आहेत.
नरेंद्र मोदींच्या गुजरात विकासाच्या मॉडेलची टिंगल करताना नितीश कुमार आपण बिहारमध्ये भाजपाच्या पाठबळावर आहोत आणि भाजपा-जदयु सरकार बिहारमध्ये राज्य करतेय. भाजपा तोच फॉर्म्युला बिहारमध्येही वापरत आहे याचीही नितीश कुमारांना विस्मृती झालेली दिसतेय.
जदयु कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या घटनावरून आणि सुंदोपसुंदीवरून अनेक तर्क वितर्क सुरू झाले आहेत. कारण त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय सचिव असलेल्या शिवराज सिंह यांनी ऐन बैठकीच्या प्रारंभीच थेट नितीश कुमारांनाच आव्हान दिले. ‘मोदी विरोधात बोलायचे बंद करा आणि हिंमत असेल तर पक्षातच सेक्युलॅरिझमची चर्चा घडवून आणा,’ असे नितीश कुमारांना अडचणीत आणणारे पत्र लिहून शिवराज सिंह यांनी आव्हान दिले. नरेंद्र मोदीं यांच्याविरोधात अपप्रचाराच्या मोहिमा चालवण्यासाठी परदेशातून जदयुच्या नेत्यांना किती पैसा मिळाला; त्याचाही हिशोब द्यायची मागणी शिवराज सिंह यांनी केलेली आहे. शिवराज सिंह यांनी उपस्थित केलेले प्रश्न अतिशय गंभीर आहेत, पण नितीश कुमारांनी मात्र या मुद्द्याला फाटा दिला.
मात्र नरेंद्र मोदी यांच्यावरचे दंगलीचे आरोप व त्यांना बदनाम करण्याचे राबवण्यात आलेले कारस्थान केवळ राजकीय आहे की, त्यामागे कुणा परदेशी शक्तीचा हात आहे? असे अनेक प्रश्‍न शिवराज सिंह यांच्या आरोपामुळे उपस्थित होतात.
अशी दारूण अवस्था असतानाही ‘पडले तरी नाक वर’ या म्हणीप्रमाणे नितीश कुमार यांचा मोदीद्वेष सुुरूच आहे. ते मोदींना विरोध करायची कोणतीही संधी सोडत नाहीत. त्यांनी शिवराज सिंह प्रकरणानंतर कार्यकारिणीच्या बैठकीत अटलजींच्या ‘राजधर्मा’चा राग आळवला. ‘अटल बिहारी वाजपेयींंसारखा सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेताच देशाचा पंतप्रधान व्हायला हवा’, असे सांगताना, देश का नेता कैसा हो, अटलबिहारी जैसा हो, असा नारा देण्याची नौटंकी नितीश कुमारांनी केली.
मुळात अटलजी यांनी केलेल्या राजधर्माच्या विधानाचा विपर्यास केला गेला. तेव्हा अटलजींनी नरेंद्र मोदींबाबत ‘राज्यकर्त्यांनी राजधर्म पाळावा आणि नरेंद्र मोदी तो पाळत आहेत’, असे विधान केले होते. पण माध्यमांनी या वरील विधानाची मोडतोड करून ‘मोदींनी राजधर्म पाळावा’ असे तोडून मोडून अर्धवट विधान प्रस्तुत केले. अटलजी काय म्हणाले होते याची व्हीडिओ यु ट्यूबवर उपलब्ध आहे. ती पाहिल्यावर सर्वांच्या लक्षात येईलच की, अटलजी काय म्हणाले होते आणि त्यांचे विधान कसे प्रसिद्ध केले गेले आणि हेच विधान वापरून गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान करण्याची संधी कॉंग्रेस आणि इतर विरोधकांनी सोडली नाही. नितीश कुमार यांनी तर ही तुटकी रेकॉर्ड सतत वाजवून वाजवून गुळगुळीत केली आहे. पुन्हा जदयुच्या कार्यकारिणीच्या बैठकीतही ही रेकॉर्ड वाजवून त्यांचेच सहकारी शिवराज सिंह यांनी केेलेले आरोप झाकण्याचा प्रयत्न केला.
अटलजींनी राजधर्म सांगितला. तो मोदींनी पाळला. नितीश कुमारजी तुम्हीही राज्यकर्ते आहात. तुमच्या राजधर्माचे काय? राजधर्म फक्त नरेंद्र मोदींनीच आणि भाजपानीच पाळायचा का, राजधर्म पाळण्याची आपली काही जबाबदारी नाही का?  स्वत:च्या डोळ्यातील मुसळ न पाहता नितीश कुमार मोदींच्या डोळ्यातील कुसळ दाखवत आहेत. आता राजधर्म काय आहे याचे चिंतन आणि त्याची पारायणं करण्याची गरज खरे तर नितीश कुमारांना आहे.
रालोआच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून सुरू असलेली नितीश कुमार यांची मनमानी आणि त्यांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या जाहीर टीकेमुळे भाजपा कार्यकर्ते संतापणे सहाजिकच आहे. जदयुशी असलेली युती तोडण्यासाठी बिहारमधील भाजपाच्या  नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वावर दबाव वाढवला असून,  नितीश कुमारांना जशास तसे उत्तर देण्याची मागणी पक्षात होत आहे.
बिहारमधील भाजपा नेत्यांनी जेदयुशी असलेली युती तोडण्याचा आग्रह धरण्याचे दुसरे कारण म्हणजे आणिबाणीनंतर जनता पार्टीच्या सरकारच्या वेळीही समाजवादी नेत्यांनी अशाचप्रकारे जनसंघाच्या नेत्यांना धोका दिला होता. नितीश कुमारही त्यांच्याच मार्गाने चालले आहेत. त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. आता माघार घेणे शक्य नाही, असा कडक सूर बिहारच्या भाजपा नेत्यांनी लावला तर ते अयोग्य कसे म्हणता येईल. नितीश कुमारांचे जुने समाजवादी सहकारी लालुप्रसाद यादव व रामविलास पासवान, याचप्रकारे भाजपाच्या विरोधातले सेक्युलर नाटक करत करत रसातळाला गेलेले आहेत.
मुळात भाजपामध्ये लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, जसवंत सिंह, अरुण शौरी, सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा, अरुण जेटली अशी अनेक दमदार नेत्यांची फळी आहे. जे पंतप्रधान होण्यास सक्षम आहेत, पण जाणिवपूर्वक प्रसारमाध्यमं आणि विरोधक पंतप्रधानपदाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. भाजपामध्ये कोण पंतप्रधान होणार यावरून कोणताही वाद नाही. मागे नितीन गडकरी यांनी काही वेळात आम्ही पंतप्रधान ठरवू शकतो असे सांगितले होते ते याच बळावर आणि याच विश्‍वासावर.
नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या माध्यमातून नेता काय असतो, विकास काय असतो हे दाखवून दिले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना आता आपली क्षमता सिद्ध करावी लागणार नाही; ती भारतवासीयांनी पाहिली आहे. आज देश संपुआ आणि कॉंग्रेसने रसातळाला नेला आहे. भ्रष्टाचाराचा आगडोंब उसळलेला असताना देशाच्या विकासाचा आणि भविष्याचा पत्ताच नाही. अशा विदारक परिस्थितीत नरेंद्र मोदी हे ‘आशेची किरण’ आहेत.
आज नरेंद्र मोदी केवळ गुजरातपुरतेच लोकप्रिय नाहीत, तर देशाच्या काना-कोपर्‍यात त्यांच्याकडे देशाचा विकासपुरुष म्हणून पाहिले जातेय. राष्ट्राच्या चिंतेची भिस्त आज भारतवासी नरेंद्र मोदी यांच्यावर ठेऊ पाहतोय. वेब आणि सोशल नेटवर्किंग साईटस जसे फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस, ब्लॉंगर, टंब्लर अशा अनेक साईट्‌सवर केवळ नरेंद्र मोदी हे एकच नाव धुमाकूळ घालतेय. गावोगावचे लोक केवळ भाजपा आणि नरेंद्र मोदींवर विश्‍वास ठेवतात. का? तर नरेंद्र मोदी यांनी अतिशय स्वच्छ आणि प्रभावी धोरणे राबवत अनेक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, प्रसारमाध्यमे, काही विशिष्ट एनजीओ, कॉंग्रेस, सेक्युलरवाले आदींच्या विरोधाचा सामना करत ही पातळी  गाठली आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण देश नरेंद्र मोदींकडे आशेने पाहतोय. हा पल्ला गाठणं नितीश कुमारांच्या दृष्टीने खूप अवघड आहे आणि खूप लांब पल्ल्याचे आहे.