This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
•चौफेर : अमर पुराणिक•
राज्यपातळीवरील छोट्‌या पक्षांमुळे १९८९ पासून राज्यसभेत महत्त्वाच्या विधेयकांबाबत मोठे गतिरोध निर्माण झाले आणि ही एक मोठी समस्या बनली. त्यामुळे अनेक विकास कामात त्याचा अडथळा निर्माण झाला. आता नव्याने पुन्हा भूमी अधिग्रहण विधेयकावरुन या गतीरोधाचा सामना मोदी सरकारला करावा लागत आहे. केवळ भूमी अधिग्रहण विधेयकच नाही तर कोणतेही मोठे विकास प्रकल्प किंवा योजना राबवण्याबाबतीत आता भाजपाच्या मोदी सरकारला यासाठी दोन हात करावे लागणार आहेत.
भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मे २०१४ ला निर्विवाद जनादेश मिळविलेला असला तरीही भूमी अधिग्रहण विधेयक मंजुर करण्यासाठी सुुरु असलेला संघर्ष पाहिला की, लोकसभेत बहूमत असले तरी राज्यसभेत बहूमत नसल्यामुळे योजना पुर्ण करण्यासाठी सरकारसमोर अनेक समस्या येत आहेत. राज्यसभेत एक तृतियांश जागा दर दोन वर्षांनी होणार्‍या निवडणूकांच्या माध्यमातून नव्याने भरल्या जातात. जर मोदींना संसदेच्या वरिष्ठ सदनावर म्हणजे राज्यसभेवर नियंत्रण मिळवायचे असेल तर त्यांना आगामी चार वर्षात अनेक राज्यात होणार्‍या निवडणूकांमध्ये मोठ्‌याप्रमाणात बहूमत प्राप्त करावे लागेल. त्यांना देशाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यसभेवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.
बर्‍याच जणांना वाटत होतं की आता मोदी यांना स्पष्ट बहूमत मिळालेले आहे त्यामुळे त्यांना विकास कामात कोणताही अडथळा येणार नाही. पण लोकसभेत बहूमत मिळाले असले तरीही राज्यसभेत बहूमत मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आणखी काही काळ भाजपाच्या मोदी सरकारला वाट पहावी लागणार आहे. असे म्हंटले जातेय की दोन मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी, अर्थात भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस यांच्यातील सुरु असलेली संघर्षाची राजनीती पाहता संसदेच्या दोन्ही सदनांचे संयुक्त सत्र बोलवावे लागेल. जेणेकरुन भूमी अधिग्रहण विधेयकासाठी आवश्यक बहूमत प्राप्त करता येईल आणि विधेयक पारित करता येईल. हा पर्याय असला तरीही हा मार्ग अवलंबला जाईलच हे सांगणे अवघड आहे, कारण इतर बरेच पक्ष भूमी अधिग्रहण विधेयकाचा विरोध करत आहेत.
जर आपण सुरुवातीपासून राज्यसभेतील राजकीय पक्षांच्या बळाचे विश्‍लेषण केले तर आपल्या लक्षात येईल की, स्वतंत्र भारताच्या इतिहासात केवळ दोघा पंतप्रधानांना म्हणजे जवाहरलाल नेहरु आणि लालबहादुर शास्त्री यांनाच आपल्या संपुर्ण कार्यकाळात संसदेच्या वरीष्ठ आणि कनिष्ठ सदनात म्हणजे राज्यसभेत आणि लोकसभेत बहूमत होते. बाकीचे ९ पंतप्रधान राज्यसभेतील संख्येच्या आभावामुळे कमकुवतच राहिले आहेत. संसदेची दोन्ही सदनं पहिल्यांदा १९५२ साली गठीत करण्यात आली होती. सध्या राज्यसभेत एकूण २५४ सदस्य आहेत. पण कायम असे राहीले नाही. या सदनाची सुरुवात २१६ सदस्यांनी झाली आणि कॉंग्रेसने यात आपल्या १४६ सदस्यांनी सुरुवात केली होती जी एक तृतियांश बहुमतापेक्षा जास्त होती. १९५६ साली हा आकडा वाढुन तीन चतुर्थांश झाला. वास्तविकता ही आहे की, जवाहरलाल नेहरु यांच्या पुर्ण कार्यकाळात वरिष्ठ सदनात कॉंग्रेसच्या सदस्यांची संख्या १४६ ते १८६ च्या दरम्यान राहिली आहे. १९६४ साली जेव्हा नेहरु यांचा मृत्यू झाला तेव्हा राज्यसभेत कॉंग्रेसचे १६६ सदस्य होते.
इंदिरा गांधी यांनीही १९६६ साली याच सदनात आपली राजकीय कारकिर्द सुरु केली होती. पण १९६९ मध्ये कॉंग्रेसच्या बहूचर्चित फुटीनंंतर राज्यसभेतील कॉंग्रेसचे वर्चस्व समाप्त झाले. पण पुन्हा १९७२ साली राज्यसभेत बहूमत प्राप्त करण्यात कॉंग्रेस यशस्वी झाली. १९७७ च्या निवडणूकीत इंदिरा गांधी यांचा दारुण पराभव झाला. नंतर १९७७ ते १९७९ पर्यंत पंतप्रधान मोरारजी देसाई आपल्या कार्यकाळात राज्यसभेतील बहूमतापासून वंचित राहिले. नंतर १९८० साली इंदिरा गांधी यांनी पुन्हा सत्ता काबिज केली तेव्हापासून १९८५ पर्यंत आणि नंतर १९८५ ते राजीव गांधी यांना कार्यकाळात चार वषार्ंपर्यंत कॉंग्रेसला राज्यसभेत बहूमत मिळाले होते. बोफोर्स घोटाळ्यामुळे वी.पी. सिंह वेगळे झाल्यानंतर २४५ सदस्यांच्या राज्यसभेत कॉंग्रेसचे संख्याबळ घसरुन १०८ वर पोहोचले. येथून पुढे राज्यसभेत कोणत्याच पक्षाला बहूमत प्राप्त झाले नाही. पी.व्ही. नरसिंहराव यांनाही  राज्यसभेतील बहूमतापासून वंचित रहावे लागले. त्यांना लोकसभेतही बहूमत नव्हते. त्यांनी अल्पमतातच सरकारचा पुर्ण कार्यकाळ चालवला. राव यांच्या काळात कॉंग्रेसच्या राज्यसभेतील सदस्यांची संख्या ८५ ते ९९ दरम्यान राहिली.
१९९८ ते २००४ काळात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भाजपा प्रणित रालोआ सरकार चालवले. पण त्यांचे सरकार दुसर्‍यांच्या पाठींब्यावरच निर्भर राहिले. अनेक पक्षांचा पाठींबा घेऊन चालवलेल्या या युतीच्या सरकारच्या कार्यकाळात भाजपाचे राज्यसभेत ४५ ते ४९ सदस्य होते. तेव्हा तेलगु देसम पार्टीचे राज्यसभेत १३ सदस्य होते.
रालोआनंतर २००४ साली अनेक पक्षांच्या पाठींब्यावर सत्तेत आलेल्या कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकारलाही राज्यसभेत कमी संख्याबळाचा सामना करावा लागला. २००४ पासून दहा वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकारमध्ये कॉंग्रेसचे राज्यसभेतील संख्याबळ ७१ ते ७३ दरम्यान राहिले. संपुआ सरकार अनेक छोटे राजकीय पक्ष, अपक्षांच्या पाठबळावर तगून राहिले. यात राष्ट्रीय जनता दल, बहुजन समाज पार्टी आणि डाव्यांचे पाठबळ मोठे होते. भाजपाच्या पुर्वी जनसंघाजवळ १९५२ साली केवळ १ च जागा होती. पण १९९० साली भाजपाचे राज्यसभेतील संख्याबळ वाढून ४० पेक्षा जास्त झाले. गेल्या दशकभरात भाजपाच्या राज्यसभेतील सदस्यांच्या संख्या ४१ ते ५१ दरम्यान राहिली. अशा कमकुवत संख्याबळामुळे कायदे बनवणे आणि सरकारचे योग्य संचलन करण्यावर याचा गंभीर परिणाम झाला, कारण संविधानाप्रमाणे अर्थिक विधेयके सोडून अन्य सर्व विधेयके  दोन्ही सदनात पारित करणे अनिवार्य आहे.
जर कोणतेही विधेयक एका सदनात पारित झाल्यानंतर दुसर्‍या सदनात फेटाळले गेले किंवा विधेयकात केले गेलेले संशोधन किंवा दुरस्त्यांबाबत दोन्ही सदनात ते असहमत झाले तर कलम १०८ राष्ट्रपतींना हा अधिकार देतो की त्यांनी दोन्ही सदनांचे संयुक्त सत्र बोलावून विधेयकावर मतदान घ्यावे. पहिल्यांदा दोन्ही सदनांचे संयुक्त सत्र १९६१ साली बोलावले होते. तेव्हा हुंडा विरोधी विधेयकाबाबतीत राज्यसभा आणि लोकसभामध्ये असहमती झाली होती. मे १९७८ साली जनता पार्टी सरकारने बँकिंग सर्व्हिस कमिशन विधेयकासाठी संयुक्त सत्र बोलावले होते. तेव्हा राज्यसभेत कॉंग्रेसने हे विधेयक फेटाळले होते. तिसर्‍यांदा संयुक्त सत्र २००२ साली बोलवले गेले. तेव्हा वाजपेयी सरकार आतंकवाद विरोधी विधेयक पारित करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी याचा विरोध केला होता.
राज्यपातळीवरील छोट्‌या पक्षांमुळे १९८९ पासून राज्यसभेत महत्त्वाच्या विधेयकांबाबत मोठे गतिरोध निर्माण झाले आणि ही एक मोठी समस्या बनली. त्यामुळे अनेक विकास कामात त्याचा अडथळा निर्माण झाला. आता नव्याने पुन्हा भूमी अधिग्रहण विधेयकावरुन या गतीरोधाचा सामना मोदी सरकारला करावा लागत आहे. केवळ भूमी अधिग्रहण विधेयकच नाही तर कोणतेही मोठे विकास प्रकल्प किंवा योजना राबवण्याबाबतीत आता भाजपाच्या मोदी सरकारला याचा सामना करावा लागणार आहे. या गतिरोधामुळे पंतप्रधान मोदी यांना राष्ट्र विकासाच्या योजनांमध्ये अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. अर्थात आता त्यासाठी मोदी यांना येत्या काही काळात होणार्‍या राज्यांतील निवडणुकात मोठे यश मिळवणे आवश्यक आहे. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल मध्ये होऊ घालणार्‍या निवडणूकांत घवघवी यश प्राप्त करावे लागणार आहे. असे झाले तर मग मोदी यांचा विकास रथ कोणीच रोखू शकणार नाही.
•चौफेर : अमर पुराणिक•
अशा विद्वानांना खरे तर जनरल सिंह यांनी योग्य नामाभिधान दिले आहे. हे देशाला लागलेले जळू आहेत. यांना राष्ट्रहिताशी काहीही देणं-घेणं नाही. फक्त विधानांचा विपर्यास्त करणे इतकच यांना हवं असतं. अशा पत्रकार आणि विद्वानांमध्ये स्वत:मधील प्रेस्टीट्यूट वृत्ती सिद्ध करण्याची जणू अहमहमिकाच लागली आहे. त्यामुळे आता या १० टक्के पत्रकारांनी कसं वागावं याचा धडा नव्याने घालून देण्याची जबाबदारी जनतेवरच येऊन पडली आहे.
युद्धग्रस्त येमेनमधून मागील आठवड्‌यापर्यंत ५६०० भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणले आहे. या शिवाय ४१ देशांच्या ९६० नागरिकांनाही येमेनमधून बाहेर काढले आहे. अमेरिका, फ्रांस आणि श्रीलंकासमावेत २३ देशांनी यासाठी भारताला मदत मागितली होती. २७ मार्च रोजी परराष्ट्र मंत्रालय नौसेना, वायुसेना आणि एअर इंडियाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत युद्धग्रस्त झालेल्या येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचा निर्णय झाला होता, त्यासोबतच परदेशी नागरिकांची मदत करण्याबाबत निर्णय झाला होता. ‘ऑपरेशन राहत’ अंतर्गत हे अभियान चालवले गेले. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन राहतची मोहिम राबवली गेली आणि जनरल सिंह यांनी ही मोहिम अतिशय प्रभावीपणे राबवत यशस्वी करुन दाखवली.
पण माध्यमांनी मात्र याची विशेष दखल घेतली नाही. माध्यमांतील काही तज्ज्ञांच्यामते केवळ ४-५ हजार लोकच अडकले होते. त्यांच्या मते याआधी  २०११ मध्ये लिबीयातून १५ हजार भारतीयांना बाहेर काढले होते तर १९९० मध्ये इराक आणि कुवेत मधून १ लाख ७६ हजार भारतीयांना मायदेशी परत आणले होते. त्यामानाने ४-५ हजार ही संख्या नगण्य आहे असा युक्तीवाद हे तथाकथित माध्यमातील तज्ज्ञ करतात. इकडे प्रत्येक भारतीयाचा जीव महत्त्वाचा आहे यासाठी प्रयत्न सुरु असताना असला भोंगळ युक्तीवाद करणे म्हणजे केवळ विरोधाला विरोध करणे होय.
येमेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्याच्या अभियानात गर्क असलेले जनरल व्ही.के. सिंह यांच्या वक्तव्याचा विपर्यास्त करण्यात काही तथाकथित विचारवंत आणि माध्यमे गर्क आहेत. यावर एका वाहिनीच्या पत्रकाराने चर्चेचे आयोजन केले होते, त्याने टि्‌वटरवर तशी घोषणाही केली होती. पण यामुळे लोक इतके चिडले की त्यांनी चॅनलवरच हल्ला केला. ही घटना शांत होते ना होते तोपर्यंत जनरल सिंह यांचे ‘प्रेस्टीट्यूट’ हे विधान चिघळले. ‘प्रेस्टीट्यूट’ हा तसा नवा शब्द नाही. काही स्वयंघोषित विचारवंत आणि काही पत्रकारांनी हे समजुन घेणे गरजेचे आहे की, प्रॉस्टिट्यूट हा शब्द वेश्या अर्थाचा आहे आणि ‘प्रेस्टीट्यूट’ हा शब्द पक्षपाती आणि पुर्वाग्रहदूषित बातम्या देणारे या अर्थाने हा शब्द वापरला जातो आणि जनरल सिंह यांनी याच अर्थाने हा ‘प्रेस्टीट्यूट’ हा शब्द वापरला आहे.
‘प्रेस्टीट्यूट’ या शब्दाचे जनक अमेरिकन लेखक सेलेंट गेराल्ड हे आहेत. यात आश्‍चर्याची गोष्ट ही आहे की, इंग्रजी पत्रकारही या शब्दाबाबत अनभिज्ञ आहेत. नाही तर मग हे लोक जाणिवपुर्वक जनरल सिंह यांच्या विधानाचा प्रॉस्टिट्यूट या शब्दाशी संदर्भ जोडून वादळ उठवू पाहात आहेत. एक पत्रकार तर इतका अनभिज्ञ निघाला की त्याने जनरल व्ही.के. सिंह याच्या विधानावर वेश्या आणि त्यांच्या हितासाठी काम करणार्‍या संघटनांच्या प्रतिक्रिया प्रकाशित करुन टाकल्या. हे पत्रकार महोदय हे सिद्ध करु पहात होते की, पहा जनरल व्ही.के. सिंह यांचे विधान वेश्यांनापण अयोग्य वाटले. यावर कहर म्हणजे लेखिका शोभा डे यांनी ‘‘प्राउड टू बी अ प्रेस्टीट्युट! बेटर दॅन बिईंग अ जोकर जनरल’’ असा टीवटीवाट केला. नंतर व्ही.के. सिंह यांनी प्रेस्टिट्यूट या विधानाचा अर्थ स्पष्ट करुन माध्यमांची माफी ही मागितली, पण केवळ ९० टक्के पत्रकारांची. ते अशासाठी की त्यांच्या मते १० टक्के पत्रकार असे आहेत की ते प्रेस्टिट्यूटच्या व्याख्येत चपखल बसतात. यात १० टक्के आणि ९० टक्के या प्रमाणावर न जातात त्यांच्या मते काही थोडे पत्रकार असे आहेत इतकाच त्याचा अर्थ होतो. हे जे काही थोडे पत्रकार आहेत ते पुर्वाग्रहदूषित आणि दूराग्रहाने ग्रस्त अशी पत्रकारिता करणारे आहेत. हे असे लोक जनमत चूकीच्या पद्धतीने प्रभावित करतात हाच जनरल व्ही.के. सिंह यांच्या विधानाचा अर्थ होते.
भारतीय माध्यमात जनरल सिंह यांनी सांगितलेल्या प्रेस्टिट्यूट प्रवृत्तीच्या लोकांच्या अस्तित्वाची दोन उदाहरणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या फ्रांस दौर्‍यात दिसली. फ्रांसच्या भूमीवर पाय ठेवताच नरेंद्र मोदी यांनी ‘एनएम’ अक्षर लिहिलेली शाल पांघरलेले पत्रकारांनी आणि लोकांनीही पाहिले. कोणास ठाऊक कोठून पत्रकारांनी शोध लावला की, मोदी यांनी फ्रेंच कंपनी ‘लुई विटन’ची शाल पांघरली आहे. लगेचच पत्रकारांनी रागाच्या भरात मोदी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. कोणी त्याची किंमतीचा अंदाज लावला तर कोणी त्या शालीच्या लिलावाचा सल्ला दिला. तर कोण म्हणाला की मोदी विदेशी कंपनीची शाल पांघरुन ‘मेक इन इंडिया’ अभियान राबवणार आहेत काय? यातील कोणत्याही पत्रकाराने यातील सत्य समजाऊन घेण्याचा प्रयत्न केला नाही, मुळात पत्रकारितेतील मुलभूत सिद्धांत हाच आहे की, कोणतीही विधानं किंवा प्रसंगाची सत्यता पारखून पाहिली पाहिजे. मोदीच्या शाल पांघरण्याबाबतीत हे तत्व विशेषत: पाळणे आवश्यक होते. पण असे न करता मोदींवर आरोप केले जात होते. विशेष म्हणजे यात भारतीय पत्रकार आघाडीवर होते. याची सत्यता तपासून पहाण्याचे काम एका अन्य व्यक्तीने केले. त्यांनी ‘लुई विटल’ कंपनीला मोदी यांचा शाल पांघरलेला फोटो फाठवून पृछा केली की, काय आपली कंपनी असल्या शाली बनवते/विकते का? तर यावर कंपनीने खूलासा करत उत्तर दिले की, आम्हाला खेद आहे की आम्ही असल्या शाली बनवत नाही. ज्या कंपनीचे नाव घेऊन मोदींना आरोपीच्या पिंजर्‍यात माध्यमं उभा करु पाहात होती, दस्तूरखुद्द या कंपनीने हा खूलासा केल्यामुळे हे सगळे प्रेस्टीट्‌‌‌यूट माध्यमवाले तोंडघशी पडले. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हीच शाल जर्मनीतही परिधान केली. कदाचित मोदी यांनी आता ही शाल जाणून-बूजन पांघरली असेल, पाहू अजुन कोण माध्यमवाला खोटेनाटे आरोप करुन तोंडघशी पडतो का? पण एकदा तोंड काळे झाल्यानंतर या प्रेस्टट्यूटवाल्यांनी पुन्हा हिंम्मत केली नाही.
पंतप्रधान मोदी यांचा फ्रांस मधलाच एक फोटो चर्चेत आला. या फोटोत मोदी फ्रांसच्या प्रातिनीधिक मंडळाच्या बैठकीत बसलेले दिसत होते, पण ते बिना हेडफोन घातलेले दिसत होते. बस्स यावरुन एका पत्रकाराने अंदाजावरच ठरवून टाकले की मोदी फ्रेंच भाषा येत असल्याचा दिखावा करत आहेत. मोदी यांची सुपर पीएम म्हणून हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला. पण याच प्रातिनीधिक मंडळाच्या बैठकीतील परराष्ट्र सेवेतील अधिकार्‍याने या दूराग्रही पत्रकाराला सांगितले की, हेडफोन शिवाय कानात लावायचा इयरफोन नावाचा एक प्रकार असतो, तो मोदींनी घातला आहे. तो तुम्ही पलिकडच्या बाजूला जाऊन पाहिलात तर दिसेल. त्यावर या पत्रकाराने, ‘मी चेष्टा करत होतो’ अशी सारवा-सारव केली तर त्या परराष्ट सेवेतील अधिकार्‍याने उत्तर दिले की, जरा सभ्यतेने चेष्टा करायला शिका!
अशा पत्रकारांना जनरल व्ही.के. सिंह यांनी प्रेस्टीट्यूट म्हंटले तर काय बिघडले असा प्रश्‍न निर्माण होतो. या अशा काही पत्रकारांनी ऑपरेशन राहतच्या प्रेस्टीट्यूट प्रकरणात जनरल सिंह यांना मानसिक स्थिती खराब आहे, डिप्रेशनमध्ये आहेत, मुर्ख आहेत असे म्हणत जनरल सिंह यांच्यावर देशाला राग कमी आणि दया अधिक आली असेल अशी असंबद्ध विधाने केली. जनरल व्ही.के. सिंह यांनी यावर बोलताना म्हंटले आहे की, ‘शस्त्रास्त्र दलाल माझ्याविरुद्ध काही पत्रकारांना हाताशी धरुन हल्ले करत आहेत’. याविधानावर अजुन कोणी उत्तर दिलेले नाही. अशा विद्वानांना खरे तर जनरल सिंह यांनी योग्य नामाभिधान दिले आहे. हे देशाला लागलेले जळू आहेत. यांना राष्ट्रहिताशी काहीही देणं-घेणं नाही. फक्त विधानांचा विपर्यास्त करणे इतकच यांना हवं असतं. अशा पत्रकार आणि विद्वानांमध्ये स्वत:मधील प्रेस्टीट्यूट वृत्ती सिद्ध करण्याची जणू अहमहमिकाच लागली आहे. त्यामुळे आता या १० टक्के पत्रकारांनी कसं वागावं याचा धडा नव्याने घालून देण्याची जबाबदारी जनतेवरच येऊन पडली आहे. देशाच्या सुदैवाने जनता असल्या अनिष्ट वृत्ती ओळखून आहे.
•चौफेर : अमर पुराणिक•
बहूसंख्या नागरिक आणि विशेषत: शेतकरी भूमी अधिग्रहण विधेयकाचे महत्त्व जाणून आहेत. पण ही स्वयंघोषीत विद्वानमंडळी भूमी अधिग्रहण विधेयकाबाबतीत अपप्रचार करून शेतकर्‍यांच्या पायावर कुर्‍हाड मारू पाहात आहेत. या विद्वानांनी हवा तर आपल्या पायावर धोंडा मारुन घ्यावा पण शेतकर्‍यांचे हितचिंतक असल्याचा आव आणून शेतकर्‍यांनाच बुडवण्याचा डाव खेळू नये. अर्थात शेतकरी या सर्व चाली ओळखून आहेत. ते असल्या माध्यामातील तथाकथित विद्वानांच्या कोल्हेकुईला भिख घालणार नाहीत.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने ११ महिन्यांपुर्वी जोरदार यश मिळवत सत्ता हस्तगत केली आणि देशाला एक नव्या दमाचे सरकार लाभले. आता जवळ-जवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ११ महिने पुर्ण झाले असून या गेल्या ११ महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय चांगली कामगिरी करत देशाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून हळूहळू बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. सध्या देश विकासाच्या मार्गावर चांगली घोडदौड करतो आहे. अनेक योजना आता बर्‍यापैकी मार्गी लागल्या आहेत. विशेषत: नागरी योजनांच्या अंमलबजावणीत मोदी सरकारने जोरदार आघाडी घेतली आहे. शिवाय आर्थिक बाबतीतही समाधानकारक कामगिरी केली आहे. देशाची गंगाजळी आणि परकीय चलनाच्या गंगाजळीत समाधानकारक भर घालण्यात यश मिळवले आहे.
असे असले तरीही प्रसारमाध्यमे आणि तथाकथित स्वयंघोषित विद्वानांनी मोदी सरकारबाबतीत सतत कोल्हेकुई चालूच ठेवली आहे. कोणत्याही बाबतीत विरोधाला विरोध इतकीच भूमिका राबवण्यात हे विद्वान धन्यता मानत आहेत. यात विशेषत: शेतकरी आणि शेती विषयक धोरणाबाबत मोदी सरकारला अपयशी ठरवण्यात कोणतीही कसर या तथाकथित पंडितांनी ठेवली नाही. भाजपा आणि मोदी सरकारला शेतकरी विरोधी ठरवण्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा सुरुच आहे. मग ते भूमी अधिग्रहण विधेयक असो किंवा इतर कोणतेही मुद्दे असोत. मोदी सरकार कसे शेतकरी विरोधी आहे याचा सतत उच्च रवात उहापोह सुरु आहे.
नुकतीच बंगळूरुत झालेली भाजपाची कार्यकारिणीची बैठक अयशस्वी ठरल्याची विनाकारण ओरड सुरु आहे. भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक म्हणजे संसदेचे कामकाज असल्यासारखे हे विद्वान बोलत आहेत. एखाद्या पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आणि संसदीय कामकाज यातला फरकही हे लोक विसरुन गेले आहेत. पक्षीय बैठकीत पक्षासंबंधी निर्णय घेतले जातात, पक्षाच्या कार्याची चर्चा होत असते हे आता नव्याने या प्रकांड पंडितांना(?) सांगण्याची वेळ आली आहे. भूमी अधिग्रहण विधेयकाबाबतीत प्रसारमाध्यमे आणि ही विद्वान मंडळी जितका शक्य होईल तितका शेतकर्‍यांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. भूमी अधिग्रहण विधेयकाचा विरोध करत भारतीय जनता पक्षाची प्रतिमा शेतकरी विरोधी बनवण्याचा पुरेपुर प्रयत्न चालवला आहे. भूमी अधिग्रहण विधेयकाबाबतीत भाजपा आणि मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचा विचार केलेला आहे आणि शेतकरी मंडळीही हे जाणून आहेत. पण तरीही शेतकर्‍यांना भडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. भूमी अधिग्रहणाच्या बाबतीत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सरकार यातून शेतकर्‍यांचे हित साधू पाहात आहे आणि याचे वारंवार स्पष्टीकरण सरकारकडून दिले जात आहे. भूमी अधिग्रहण विधेयकातील तरतूदींबाबतही सरकारने खूलासा केला आहे. तरतूदीवर चर्चा सुरु आहे, तरीही केवळ विरोधाला विरोध हीच भूमिका विरोधक आणि माध्यमांकडून ठेवली गेली आहे. लोकसभेत हे विधेयक पारित झालेले आहे पण आता ते राज्यसभेत लटकवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे. भाजपाच्या राज्यसभेतली अल्पमताचा गैरफायदा घेतला जातोय. विरोधी पक्षातील केवळ बीजू जनता दलाने भूमी अधिग्रहण विधेयकाला पाठींबा दर्शवला आहे.
भाजपा आणि मोदी सरकारला शेतकरी विरोधी ठरण्याबाबतीत दुसरा मुद्दा म्हणजे गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याबाबतील सरकारने कोणताही विलंब न लावता तात्काळ मदत जाहीर केली आहे. देशातील विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी सरकारने केवळ मदत जाहीर केली नाही तर त्याचे गांभिर्य ओळखून या मदतीत वाढ जाहीर केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँकेच्या उद्घाटनाप्रसंगी यावर विशेष खूलासा करत मदतीत भरीव वाढ जाहीर केलीय. शेतकर्‍यांंना मिळणार्‍या नुकसान भरपाईत पंतप्रधानांनी सरसकट ५० टक्क्‌यांची वाढ जाहीर करतच, सरकारी मदत प्राप्त करण्यासाठीचे निकष शिथिल करताना, ज्यांचे ३३ टक्के नुकसान झाले, त्यांनाही मदत मिळणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. शिवाय प्रभावित शेतकर्‍यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. आतापर्यंत ५० टक्के नुकसान झालेले शेतकरीच सरकारी मदतीस पात्र होते. पण, हे निकष बदलत ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाही आता मदत मिळणार आहे. त्या मदतीतही ५० टक्क्‌यांनी वाढ जाहीर केली आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशातील ११३ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. याचे गांभिर्य लक्षात घेऊन मोदी सरकारने उचलेले पाऊल शेतकर्‍यांच्या हिताचेच आहे. असे असतानाही भाजपाच्या मोदी सरकारला शेतकरी विरोधी ठरवण्याची जणू स्पर्धाच प्रसारमाध्यमात सुरु आहे. भूमी अधिग्रहण विधेयकाबाबत अपप्रचार करुन भाजपाची बदनामी करण्याची राजकीय खेळी खेळली जात आहे. पण हे लोक विसरताहेत की भूमी अधिग्रहण विधेयकामुळे छोट्‌या प्रकल्पापासून नद्याजोड सारखे भले मोठे प्रकल्प राबवणे साध्या होणार आहे. भूमी अधिग्रहण विधेयकाची सर्वात जास्त गरज भासणार आहे ती या नद्याजोड प्रकल्पासाठी. मोठ्‌या प्रमाणात या प्रकल्पासाठी सरकारला भूमी अधिग्रहण करावे लागणार आहे. त्या शिवाय हाच काय कोणताही प्रकल्प पुढे सरकणार नाही.
 आता नद्याजोड प्रकल्प कोणाच्या हिताचा आहे हे सांगायला न कोणत्या तज्ज्ञाची गरज आहे ना कोणत्या अभ्यासकाची ना कोठल्या ज्योतिषाची गरज आहे. बहूसंख्या नागरिक आणि विशेषत: शेतकरी या प्रकल्पाचे महत्त्व जाणून आहेत, अशा प्रकल्पांमुळे शेतकर्‍यांचेच भले होणार आहे. पण ही स्वयंघोषित विद्वानमंडळी भूमी अधिग्रहण विधेयकाबाबतीत अपप्रचार करून शेतकर्‍यांच्या पायावर कुर्‍हाड मारू पाहात आहेत. या विद्वानांनी हवा तर आपल्या पायावर धोंडा मारुन घ्यावा पण शेतकर्‍यांचे हितचिंतक असल्याचा आव आणून शेतकर्‍यांनाच बुडवण्याचा डाव खेळू नये. अर्थात शेतकरी या सर्व चाली ओळखून आहेत. ते असल्या माध्यमातील तथाकथित विद्वानांच्या कोल्हेकुईला भिख घालणार नाहीत. विरोधकांनी आणि माध्यमांनी भाजपाला कितीही शेतकरीविरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला तरीही भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रामाणिक भूमिका शेतकरी ओळखून आहेत. भाजपा आणि मोदी सरकार यातून शेतकर्‍यांचे हित साधतीलच.
•चौफेर : अमर पुराणिक•
२८ मार्च रोजी आम आदमी पार्टीच्या तीनशेहून अधिक सदस्यीय राष्ट्रीय परिषदेत जे झाले त्याचा थोडा फार अंदाज येऊ शकत होता. पण हा वाद या थराला जाईल याची मात्र कोणाला कल्पनाही आली नसेल. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर कार्यकारिणीतून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकलपट्‌टी करण्यात आली. नंतर एक एक करत बर्‍याच समित्यांतून त्यांना बाजूला सारण्यात आले. त्याच बरोबर एक एक स्टिंग ऑपरेशनचे बॉम्ब फुटू लागले. अनेक आरोप प्रत्यारोप, व्हिडीओ, ऑडीओ टेप्स बाहेर आले. सोशल मिडीयातून याचा मुक्त प्रसार होऊ लागला. नंतर आपच्या वरीष्ठांकडून यावर समझोते करण्याचा प्रयत्न झाला पण तोही असफल ठरला. सत्तेची नशा आम आदमी पार्टीला खूपच चढली आहे. पण का चढली? याचे उत्तर एक हाती सत्ता आणि सत्तालोलूपता हेच आहे.
शिमगा संपून एक महिना झाला तरीही आम आदमी पार्टीतील शिमगा काही संपेना. हे तर होणारच होतं! हे वाक्य आम आदमी पार्टीत गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या कलहावरुन लोकांच्या तोंडून येतं. दिल्लीकरांना दिलेल्या भरमसाठ आश्‍वासनांना हरताळ फासत आपवाले पाडवा येऊन गेला तरीही अजून धूळवड खेळतच आहेत. २८ मार्च रोजी आम आदमी पार्टीच्या तीनशेहून अधिक सदस्यीय राष्ट्रीय परिषदेत जे झाले त्याचा थोडा फार अंदाज येऊ शकत होता. पण हा वाद या थराला जाईल याची मात्र कोणाला कल्पनाही आली नसेल. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर कार्यकारिणीतून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकलपट्‌टी करण्यात आली. नंतर एक एक करत बर्‍याच समित्यांतून त्यांना बाजूला सारण्यात आले. त्याच बरोबर एक एक स्टिंग ऑपरेशनचे बॉम्ब फुटू लागले. अनेक आरोप प्रत्यारोप, व्हिडीओ, ऑडीओ टेप्स बाहेर आले. सोशल मिडीयातून याचा मुक्त प्रसार होऊ लागला. नंतर आपच्या वरीष्ठांकडून यावर समझोते करण्याचा प्रयत्न झाला पण तोही असफल ठरला. सत्तेची नशा आम आदमी पार्टीला खूपच चढली आहे. पण का चढली? याचे उत्तर एक हाती सत्ता आणि सत्तालोलूपता हेच आहे. याचे उत्तर नेपाळ मधील माओवाद आणि आसाम गण परिषद यांच्या इतिहासात पण मिळू शकते. रस्त्यावरुन दिल्ली विधानसभेपर्यंत पोहोचलेला हा पक्ष पुन्हा रस्त्यावर उतरला आहे ते ही पक्षांतर्गत मतभेद सार्वजनिक करण्यासाठी. टिळक, गांधीजींच्या ‘स्वराज्य’ या शब्दाची व्याख्या आपापल्या सोयीप्रमाणे प्रत्येक आपचे नेते करु लागला आहे.
आम आदमी पार्टीने ज्या ‘हमे चाहिये स्वराज्य’चा नारा देत आपली राजकीय यात्रा सुरु केली होती त्याचा मात्र आता निव्वळ दोन पैशाचा तमाशा झाला आहे. पक्षांतर्गत भांडणाचा परिणाम आता आम आदमी पार्टीच्या उत्पन्नावरही पडू लागला आहे. त्यांना मिळणार्‍या देणग्याही आता ७३३ रुपये, २६४ रुपये अशा स्वरुपात मिळू लागल्या आहे. आपच्या देणग्यांचा सेन्सेक्स इतका घसरेल याचा कोणालाही अंदाज आला नसेल. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव ही जोडी पक्षाला मिळणारा निधी, पक्षांतर्गत आरटीआय लागू करणे आणि अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय संयोजक पदावर न रहाणे अशा तीन-चार मुद्द्यांवरुन मागे हटायला तयार नाही. नोव्हेंबर २०१२ मध्ये विधीज्ञ शांती भूषण यांनी आम आदमी पार्टीला एक कोटी रुपयांची देणगी दिली तेव्हापासून गेल्या दोन-तीन महिन्यांपर्यंत हा पक्ष परिवारवादी ठरला नव्हता. जेव्हा केजरीवाल आणि कंपनीला वाटले की दिल्ली निवडणूकीसाठी विदेशी देणग्या रोखल्या जात आहेत तेव्हा मात्र प्रशांत भूषण यांच्यावर परिवारवादी असल्याचे ब्रह्मास्त्र चालवले गेले. निवडणूका जिंकल्यानंतरच्या विजयी सभेत बोलताना केजरीवाल यांनी आपली पत्नी सुनीता यांच्या समावेत व्हिक्टरीचे व्हि निशान दाखवत आपच्या विजयाचे श्रेय आपली पत्नी आणि वडिलाना देत होते तेव्हा हा परिवारवाद ठरला का नाही. यालाच म्हणतात सोयीचं राजकारण!
अरविंद केजरीवाल हे प्रचंड सत्तालोलूप आहेत हे लपत नाही आणि त्यांच्या जवळचे लोक सुद्धा हे बोलून दाखवतात. मफलर गुंडाळलेला, सामान्य कपडे घालणारा हा मृदूभाषी व्यक्ती आतून किती सत्तालोलूप आहे हे आता चव्हाट्‌यावर आले आहे. योगेंद्र यादवही असेच विनम्र, अहिंसावादी अशी प्रतिमा बनवण्यात यशस्वि झाले आहेत पण या मागे ते नैतिकेची केलेली हिंसा लपवत आहेत. केजरीवाल पाच वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर चिटकून राहतील हे सर्व ठिक आहे. पण पक्षाला राष्ट्रीय स्वरुप देण्याबाबतीत मात्र ते खूप जागृक आहेत. ती कमान ते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या ताब्यात देऊ इच्छित नाहीत. आणि वादाचे हेच प्रमुख कारण असल्याचे पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात बोलले जातेय. केजरीवाल यांना सर्वसत्ताधीश व्हायची स्वप्ने पडत आहेत. त्यांना दिल्लीही आपल्याच ताब्यात हवी आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदही हवं आहे, आणि राष्ट्रीय राजकारणातही पक्षावर आपली हूकुमत ठेवायची आहे. आता पुन्हा आम आदमी पार्टी इतर राज्यात आपले बस्तान बसवू पहात आहे. हे आम आदमी पार्टीचे संकेतस्थळ पाहिल्यावर लपून रहात नाही. योगेंद्र यादव यांना शेतकरी आंदोलनाशी जोडून दक्षिण भारतात कुच करण्याची योजना आम आदमी पार्टीचा सर्वसाधारण कार्यकर्ताही समजू शकतो पण कृत्य मात्र योगेंद्र यादव यांना काळ्यापाण्यावर पाठवण्याचे सुरु आहे. योगेंद्र यादव हरियाणात आपली पकड जमवू पहात आहेत पण त्यांची पकड ढिली करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे नवीन जयहिंद यांना जाणून बुजून लावले आहे. आरटीआयच्या जोरावर आपली राजकीय धार निर्माण करणारे नवीन जयहिंद यांचे कधी योगेंद्र यादव यांच्याशी जमले नाही. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर ठेवण्याचा प्रस्ताव ठेवणारे नवीन जयहिंदच होते. त्यानंतर अंजली दमानियांसारख्या आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी पक्ष सोडला तेव्हाच अंदाज आला की हे वादळाचे पुर्व संकेत आहेत. किरण बेदी तर पक्षात कधी नव्हत्या पण शाजिया इल्मी, दिलीप पांडे, विनोदकुमार बिन्नींसारखे नेते जेव्हा भाजपात सामिल झाले तेव्हा त्यांच्यावर संधीसाधू असल्याचा आरोप केला गेला. पण आजच्या तिथीला या नेत्यांचे चेहरे पाहिले तर ते त्यांच्या निर्णयावर ते समाधानी असल्याचे दिसून येते, की त्यांचा निर्णय योग्य होता.
तीस वर्षांपुर्वी आम आदमी सारखा प्रयोग आसाममध्ये झाला होता. १९८५ च्या निवडणूकीत तेथे आसाम गण परिषद सत्तेवर आली होती. तेव्हा प्रफुल्लकुमार महंत सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री झाले होते. प्रफुल्लकुमार महंत यांचे नेतृत्व पाहून अनेकांना भ्रम झाला होता की आता महंत देशाचे नेतृत्व सांभाळतील. हा किस्सा अनेक जुने लोक, अभ्यासक सांगतात. १९८५ च्या निवडणूकीत आसाम गण परिषदेने ६७ जागांवर विजय मिळवला होता. अगदी तसेच २०१५ च्या दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीने बहूमत मिळवले. पण काही वर्षात आसाम गण परिषदेत पक्षांतर्गत धूसफुस सुरु झाली. महंत यांना एकाधिकारशाहीची नशा चढली आणि इतरांची सत्तेची महत्त्वकांक्षा जागृत झाली आणि पक्षात फुट पडली. यातील भृगुकुमार फुकन, दिनेश गोस्वामी, वृंदावन गोस्वामी, पुलकेश बरुआ अशा नेत्यांनी मिळून नूतन आसाम गण परिषद या नव्या पक्षाची स्थापना केली. नंतर प्रफुल्लकुमार महंत यांना पदाचा दुरुपयोग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर आसाम गण परिषद(प्रोग्रेसिव्ह)ची स्थापना करण्यात आली. नंतर त्यातही फूट पडली. काही वर्षांनी सर्व आसाम गण परिषदेचे फुटलेले गट एकत्र करण्याचा प्रयत्न झाला पण जनतेने पुन्हा कधीच त्यांना सत्तासोपान चढण्याची संधी दिली नाही.
आजच्या स्थितीत आसाम गण परिषदेच्या नेत्यांना न केंद्रात कोण किंमत देत ना राज्यात. अगदी अशीच स्थिती आम आदमी पार्टीची होणार आहे, आणि तीही वेगात. आम आदमी पार्टीचे भविष्यात लवकरच पतन झाले तर त्यात काही आश्‍चर्य राहणार नाही. कारण आजच्या राजकारणाचा वेग खूप वाढला आहे. दिल्लीची जनता आज मुर्ख ठरली असली तरीही येत्या काळात आम आदमी पार्टीला आपली जागा दाखवेलच.