बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती

बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती
(अमर पुराणिक)
२१ व्या शतकात सर्वच क्षेत्रांतील कामांची गती प्रचंड वाढली आहे. टेक्नॉलॉजी प्रगत झाल्याने माणसाची काम करण्याची गतीदेखील वाढली आहे. गेल्या २०, २५ वर्षांत तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाल्याने बँकिंग क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती होऊन ते जलद, अचूक आणि पारदर्शक झाले आहे. ग्राहक घरबसल्या, दिवसातल्या कोणत्याही वेळी बँकेचे व्यवहार करू शकतात. पूर्वीप्रमाणे घरातून बाहेर पडा, बँकेच्या वेळेतच बँकेत जा, रांगेत उभे राहा, बँकेतल्या कर्मचार्‍यांचं खेकसणं सहन करा आणि स्लिप भरून व्यवहार करण्याचा हा सारा त्रासदायक प्रवासाचा जमाना तंत्रज्ञानामुळे इतिहासजमा झाला असून, आपली बँक आपल्या घरात आली आहे.
बँकिंग क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचा वापर वाढल्याने अधिकाधिक लोकांना विविध प्रकारच्या सेवा देणे आता बँकांनाही शक्य झाले आहे. विविध सेवा लोकांना एकाचवेळी अनेक ठिकाणी देणे तंत्रज्ञानाखेरीज शक्य झाले नसते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे बँकिंग क्षेत्राचाही चेहरामोहरा बदलला आहे.
नेट बँकिंग, एसएमएस बँकिंग, मोबाईल बँकिंगमुळे बँकिंग सेवेला कोणत्याही मर्यादा राहिलेल्या नाहीत. घरात बसून आता आपण बँकेचे व्यवहार करू शकतो. ही किमया फक्त टेक्नॉलॉजीमुळेच शक्य झाली आहे. एटीएम, कोअर बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि आरटीजीएस सेवेमुळे बँकिंग क्षेत्राचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. कोणताही निर्णय घेण्यासाठी आज जास्त वेळ लागत नाही, कारण त्यासाठी आवश्यक लागणारी संपूर्ण व अद्ययावत माहिती क्षणार्धात उपलब्ध होते. ग्राहक घरबसल्या आपले खाते पाहू शकतात. तंत्रज्ञानामुळे बँकिंग सेवेची व्याप्तीही वाढली आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातून बँकिंग करणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाचा वापर जसा वाढत गेला, तशी ट्रॅन्झॅक्शन कॉस्टही कमी होत गेली. बँकिंग सेवेचे पूर्वीच दर आता खूप कमी झाले आहेत. बिझनेस प्रॉडक्टॅव्हिटी वाढली, त्याचबरोबर संपूर्ण यंत्रणेवर योग्य नियंत्रण ठेवणेही शक्य झाले आहे. सर्वच सेवा ऑनलाईन झाल्यामुळे घर, ऑफिस किंवा इंटरनेट कॅफेतूनही ग्राहक बँकेशी व्यवहार करू शकतात.
रिअल टाईम ग्रॉस सेटलमेण्ट (आरटीजीएस) तंत्रज्ञानामुळे कमीतकमी शुल्कामध्ये भारतात कुठेही पैसे ट्रान्स्फर करता येतात. छोट्यातल्या छोट्या रकमेपासून अगदी लाखांची रक्कम जरी असली तरी केवळ ५० रुपये इतकाच खर्च येतो. चेक, डिमाण्ड ड्राफ्ट आणि परगावचे चेक क्लिअर होण्यासाठी किमान २ आठवड्यांचा कालावधी पूर्वी लागत असे, पण आता ही सेवा फक्त तासाभरात मिळते. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार एप्रिलपासून सेव्हिंग खात्याच्या रकमेवर डेली प्रॉडक्ट बेसिसवर व्याज मिळणार आहे. त्यामुळे खातेदारांना सर्वाधिक साडेतीन टक्के व्याज मिळेल.
ग्राहकांप्रमाणेच बँक अधिकारी व कर्मचार्‍यांनाही आता कोणताही निर्णय घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्यासाठी आवश्यक असणारी अद्ययावत माहिती क्षणार्धात उपलब्ध होते. येत्या काळातही तंत्रज्ञानात सतत प्रगती व सुधारणा होत राहणार आहेत. त्यामुळे आणखी कोणकोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत, ते येणारा काळच सांगेल.

0 comments:

Post a Comment