सृष्टीचा मनभावन श्रावण

सृष्टीचा मनभावन श्रावण
अमर पुराणिक
श्रावणमास हा हिंदुधर्मशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा व अत्यंत पवित्र महिना आहेे. जसे दिवे घासून पुसून स्वच्छ करतात, तसेच देवोपासनेने मनही लख्ख करणारा श्रावण. अशा स्वच्छ आणि स्वात्विक मनाचेच प्रतिबिंब श्रावण महिन्यात पडत असते. श्रावणी सोमवार, प्रदोष या पर्वकाळाचे श्रावणात विशेष महत्त्व असते. सर्व देवांचा देव महादेव, भगवान शिव, त्याला प्रसन्न करण्यासाठीच जणू हा महिना आहे. श्रावणाच्या कालावधीतच सर्व देव-देवतांनी शिवाची उपासना करून त्याला प्रसन्न करून घेतले होते, अशी अख्यायिका आहे,  म्हणूनच प्रत्येक श्रावण सोमवारी शंकराला शिवामूठ वाहण्याचा प्रघात आहे.
पहिल्या श्रावण सोमवारी शिवशंकराला तांदळाची शिवामूठ, दुसर्‍याला तिळाची, तिसर्‍या सोमवारी मुगाची, चौथ्याला जवस आणि जर पाचवा सोमवार आला, तर सातूची शिवामूठ अर्पण केली जाते. यात आध्यात्मिक पूजेचे समाधान आहेच, पण पूर्वी आपल्याच शेतात पिकवलेल्या धान्याचा काही भाग देवाची कृतज्ञता म्हणून देवाला अर्पण करण्याची पद्धत होती. सध्याही ग्रामीण भागात काही ठिकाणी ही प्रथा आहेे.
याच काळात जास्तीत जास्त उपास केले जात असण्याचे कारण, देवाच्या सान्निध्यात वास करावयाला मिळावा हे आहेच. शिवाय कमीतकमी आहाराने आपला जठराग्नी जो या काळात मंद झालेला असतो, त्या जठराग्नीला प्रदीप्त करण्याही त्यामागील शास्त्रीय अर्थ आहे. पावसाळ्यात पचनाच्या तक्रारी वाढतात. थंड, दमट हवामानामुळे शरीराच्या हालचाली कमी होण्याने तसेच जठराग्नी प्रदीप्त नसल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण, पावसाचे गढूळ पाणी यामुळे या काळात पोटाचे विकार वाढतात. त्यावर लंघन किंवा अल्प सात्विक आहार हे अत्यंत प्रभावी औषध आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने का होईना, तोंडाचे खाण्याचे काम कमी होऊन जपजाप्य, उपासना अनुष्ठानाद्वारे शरीरशुद्धी आणि मनशुद्धी साधली जाते.
जिभेचे चोचले पुरविण्याचे कमी झाल्यामुळे साहजिकच त्या दिवशी घरच्या गृहिणीलाही थोडा विश्राम मिळतो व तीही आपल्या सख्यांसमवेत देवाच्या पूजेला, मंगळागौरीची पत्री गोळा करायला जाऊ शकते. फुलाची आरास करून प्रसन्न अशा रांगोळ्यांनी वातावरण निर्मिती तर होतेच, पण त्यातून तिलाही सृजनाच्या निर्मितीचा आनंद मिळतो व तीही प्रसन्न होते. मंगळागौरीच्या निमित्ताने सगळ्या माहेरवाशिणी जमतात. यथासांग महादेवाची पूजा करतात व जसा उमेने भोळ्या सांबाची आराधना करून आपल्याशी लग्न करायला प्रवृत्त केले व त्याच्याबरोबर सुखाने कैलासावर राज्य केले, तशाच ह्या नवविवाहिता आपल्या पतीसमवेत सुखी संसाराच्या स्वप्नात मग्न होतात.
 नारळी पौर्णिमा, नागपंचमी, शुक्रवारची पुरणपोळी, कडबोळी, गोकुळाष्टमीचा गोपाळकाला, हे विशिष्ट पदार्थ व त्यांची चव कायम जिभेवर राहते. राखीपौर्णिमेला प्रत्येकजण आपल्या भावा-बहिणींची आतुरतेने वाट बघतो. श्रीकृष्णाचा जन्म (कृष्णाष्टमी) याच काळातला. जागोजागी बांधल्या जाणार्‍या दहीहंड्या, त्या फोडण्याची  धडपड, काल्याचा प्रसाद हे देखील श्रावणातले एक वैशिष्ट्य आहे.
या महिन्याच्या शेवटी येणारा पोळा हा सण तर शेतकर्‍यांच्या दृष्टीने सर्वात मोठा सण आहे. बळीराजा आपल्याला धान्यदेणार्‍या वसुंधरेची कृतज्ञता यावेळी व्यक्त करतो. निसर्गाबरोबरच प्राणिमात्रांची कृतज्ञता म्हणून नागपंचमी, बैलपोळा साजरा केला जातो. आपण आपल्या नित्यजीवनातील सहकारी असलेल्या वृषभराजाच्या उपकाराची जाण पोळा या सणाच्या दिवशी व्यक्त करतो. शेतकरी मंडळी यादिवशी त्याला सजवतात, गरम पाण्याने न्हाऊ घालतात. झूल घालतात, गोंडे लावतात. त्याला कडबूचा घास भरवतात. त्याला ओवाळतात, त्याची पूजा करतात. कर्नाटकात बेंदूर साजरा करतात, तेव्हा पुरणपोळीपेक्षा पुरणाच्या कडबूचाच मान असतो.
श्रावणात धरित्रीवरही वेगवेगळी असंख्य प्रकारची फुले उमलतात, अंकुर याच काळात उगवतात. शिरीष, पारिजातक, सोनचाफा, बकुळ ही फुले तर या ऋतूत भरपूर येतातच. काही ठिकाणी दुर्मिळ अशी सायली व गौरीची फुलेही दिसतात. सोनटक्याची पिवळट पांढरी झाक असणारी फुलेपण श्रावणातच दिसतात.
श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. कोवळ्या तृणांकुरांनी पृथ्वीचे विशाल अंग तर झाकून जातेच, पण उघडे-बोडके दगडही शेवाळाची मखमल पांघरून बसतात व आपल्याला खुणावतात. अशा श्रावणाच्या आगमनाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे, अगदी तुम्हाला, आम्हाला आणि धरतीलाही.

0 comments:

Post a Comment