This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
माझी मुलगी प्रज्ञा
काही नेते उघडपणे प्रज्ञाच्या समर्थनार्थ पुढे आले नाहीत, त्यामुळे मी अजीबात विचलित झालेलो नाही. कारण माझ्या मुलीने काहीही चुकीचे केलेले नाही. मालेगाव स्फोटात प्रज्ञाचा हात नाही, याची मला 99 टक्के खात्री आहे. एक टक्का यासाठी नाही कारण, गेल्या दोन वर्षांपासून ती साध्वी आहे आणि ती माझ्या येथील घरी आलेली नाही. कारण साध्वीने आईवडिलांच्या घरी यायचे नसते, असा नियम आहे. ती आता मला "पिताजी' म्हणत नाही आणि त्याऐवजी "डॉक्टरसाब' असे म्हणते.
""मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोप ठेवून पोलिसांनी जरी माझ्या मुलीला अटक केली असली, तरी माझी मुलगी निर्दोष आहे, ती असे कृत्य करूच शकत नाही,'' असे तिचे वडील डॉ. चंद्रपालसिंग यांनी "रेडिफ डॉट कॉम' या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
डॉ. चंद्रपालसिंग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि गेल्या 35 वर्षांपासून ते संघाचे काम करीत आहेत. आपली मुलगी निर्दोष कशी आहे, हे त्यांनी रेडिफच्या शीला भट यांच्याशी आपल्या सुरत येथील निवासस्थानी बोलताना सांगितले.
""साध्वीचे जीवन हेच खरे जीवन आहे असे मला वाटते आणि त्यामुळेच तिला साध्वी होण्यासाठी मी स्वत: प्रोत्साहन दिले. प्रज्ञाला खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे आणि या खोटारडेपणाचा आम्हा सर्वांना खूप त्रास होत आहे. साध्वी झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत तिने "जय वंदे मातरम्‌' ही संघटना स्थापन केली. ज्या महिलांचे, दिशाभूल करून धर्मांतरण करण्यात आले, त्या महिलांना मदत करणे, ज्यांच्या दाम्पत्य जीवनात वाद आहेत, त्यांना मदत व मार्गदर्शन करणे अशी कामे ती या संघटनेमार्फत करीत आहे. संपूर्ण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिवार हा तिचा परिवार होता.''
पोलिस हे राजकीय पक्षांच्या दबावाखाली काम करीत आहेत, असे त्यांनी पोलिसांबाबत विचारले असता सांगितले. ""पोलिसांना राजकारण्यांचे 85 टक्के ऐकावेच लागते. नंतर ते माफी मागतात आणि सांगतात की, आम्हाला असे करण्यास भाग पाडण्यात आले होते.
आणिबाणीच्या काळात हे सर्व मी अगदी जवळून बघितले आहे. पोलिसांच्या यादीत माझे नाव सगळ्यात वर होते. मी देशविरोधी आहे, महात्मा गांधी यांचा वध करणाऱ्या संघटनेशी माझा संबंध आहे आणि मी समाजातील सौहार्द नष्ट करीत आहे, असा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला होता. त्या वेळी मी भूमिगत झाल्याने मला अटक झाली नव्हती,'' असेही डॉ. सिंग यांनी सांगितले.
""प्रज्ञाजवळ मोटारसायकल होती हे आम्ही नाकारत नाही. साडेचार वर्षांपूर्वी भोपाळ येथे तिच्या गाडीची कागदपत्रे आणि तिचे पदवी प्रमाणपत्र हरविले होते. तिला एका ऑटोरिक्षाने धडक दिल्यानंतर तिची पर्स हरविली होती, त्या वेळी तिच्या डोक्यालाही मार लागला होता. आजारातून बरे झाल्यानंतर तिने मोटारसायकल विकण्याचे ठरविले. ही गोष्ट अभाविपतील तिच्या सहकाऱ्यांना कळली. एक वर्ष जुनी तिची मोटारसायकल चांगल्या स्थितीत होती आणि तिची किंमत 43 हजार रुपये होती. गाडीचा सौदा झाला. ज्या मनोज शर्माने गाडी घेतली त्याने केवळ 24 हजार रुपये दिले. तो अभाविपच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहायचा आणि सुरतलाही यायचा.
आम्ही कागदपत्रांवर सह्या केल्या. गाडी शर्माच्या नावे करण्यासाठी आम्ही मदत करू, असे आरटीओची कामे करणाऱ्या दलालांनी सांगितले. दरम्यानच्या काळात शर्माच्या घरून मोटारसायकलच चोरी गेली. मग मोटारसायकल चोरी गेल्याची तक्रार त्याने का दिली नाही, असे विचारले असता, ती गाडी माझ्या नावाने नसल्याने तक्रार केली नाही, असा दावा मनोजने केला होता. मनोजला "सिमी' आणि चर्चमधील काही मंडळींनीही लक्ष्य केले होते. कॉंग्रेसच्या एका ख्रिश्चन सदस्याचा खून झाला होता आणि त्या प्रकरणात मनोजचे नाव घुसवण्यात आले. अशा प्रकारे प्रज्ञाची मोटारसायकल त्या "कॅम्प'मध्ये पोहोचली होती. मग मालेगाव स्फोटात ही मोटारसायकल आढळून आली, तेव्हा चेसिस नंबरवरून पोलिसांनी आमचे घर गाठले आणि प्रज्ञाला अटक केली.
9 ऑक्टोबर रोजी दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सामंत हे सुरतमधील आमच्या घरी आले. काही प्रश्न विचारायचे आहेत असे मला म्हणाले. हा चेसिस नंबर असलेली मोटारसायकल कुठे आहे, असे त्यांनी मला विचारले. ती माझी नाही, माझ्या मुलीची आहे, असे मी सांगितले. चार वर्षांपूर्वीच तिने ती विकली. हा प्रश्न का विचारत आहे, हे मी त्या अधिकाऱ्याला विचारले तेव्हा नंतर सांगतो असे तो म्हणाला.
प्रज्ञाचा फोन नंबर त्याने मला विचारला. मी त्याला तो मिळवून दिला. त्याने मोटारसायकलबाबत तिला विचारले असता, काही वर्षांपूर्वी ती माझी होती, नंतर मी ती विकली असे तिने सांगतिले. सुरतला येऊ शकतेस का, असे अधिकाऱ्याने प्रज्ञाला विचारले. प्रज्ञा 12 ऑक्टोबरला मध्यप्रदेशातून आली. पोलिसांनी लागलीच तिला ताब्यात घेतले आणि तिला बेकायदेशीर रीत्या 12 दिवस कोठडीत ठेवले.
मी याबाबत तक्रार केली नाही. कायद्याच्या प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने सहकार्य केले पाहिजे अशी माझी धारणा आहे. तुम्ही कडक वागू शकता आणि तसे झाले तर तुम्ही प्रामाणिक आहात याचा मला आनंदच होईल, असे मी त्यांना म्हणालो. तुम्ही प्रामाणिक असाल तर मी तुमचे स्वागतच करील. मी तुम्हाला कशाला घाबरू? जे दोषी असतील ते तुम्हाला घाबरतील. मी घाबरण्याचे कारण नाही. प्रज्ञा मला म्हणाली, ""पिताजी, माझा हेतू वाईट नव्हता, मी काहीही चूक केलेली नाही, अशा प्रकारची कल्पनाही कधी माझ्या मनात आली नाही. माझी काळजी करू नका. तुम्ही अगदी तणावमुक्त राहा. या संकटातून मी सहीसलामत परत येईन. माझ्यावर विश्वास ठेवा. जरी मी तुरुंगात असले तरी निर्दोष सिद्ध होऊनच परत येईन.''
प्रज्ञाचे अनेक मित्र-मैत्रिणी ख्रिश्चन व मुसलमान आहेत. माझा हिंदू धर्मावर आणि अहिंसेवरही विश्वास आहे. त्यामुळे माझी मुलगी प्रज्ञा निर्दोष सुटून परत येईल, याची मला खात्री आहे. राजकीय वातावरण तापविण्यासाठीच हे प्रकरण उभे करण्यात आले आहे. सिमी चुकते आहे हे तुम्ही ऐकले आहे?''
डॉ. चंद्रपालसिंग पुढे म्हणतात, ""मी तुम्हाला प्रश्न विचारतो. ज्याचा बॉम्बस्फोटात प्रत्यक्ष संबंध आहे, ती व्यक्ती आपले वाहन वापरू देईल काय? दहशतवादी कृत्यात सहभागी असलेली व्यक्ती सहजासहजी एटीएसच्या बोलावण्यावरून शरण येईल काय? नातेवाईक प्रज्ञाला भेटायला गेले असता, इथे येण्याची गरज काय, माझ्यावर तुमचा विश्वास नाही काय, असा प्रश्न प्रज्ञाने कशाला विचारला असता? एवढेच काय, तर पोलिसांना त्यांचे काम करू द्या, एक दिवस त्यांना मला सोडावेच लागेल, असेही ती म्हणाली होती.
साध्वी असल्याने ती तशीही कमी अन्नग्रहण करते. खाण्यापूर्वी ती पोळी आणि वरण एका छोट्या बाऊलमध्ये एकत्र कुस्करते आणि त्याची चव सौम्य होऊ देते. आता ती तुरुंगात कशी आहे हे मला माहिती नाही. तिने स्वत:ची संघटना स्थापन केली असल्याने तिचा आता अभाविपशी काही संबंध नाही. भारतीय जनता पार्टी आणि विश्व हिंदू परिषदेशी तिचा कधीच संबंध आला नाही. त्यामुळे भाजपा व विहिंपचा दावा खरा आहे. मी संघाचा स्वयंसेवक आहे. पण, संघात स्वयंसेविका नसतात. त्यामुळे तिचा संघाशीही थेट संबंध नाही. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा अभाविपशी संबंध होता आणि प्रज्ञाही अभाविपशी संबंधित होती. त्यामुळे काही कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्या भेटी झाल्या होत्या.
काही नेते उघडपणे प्रज्ञाच्या समर्थनार्थ पुढे आले नाहीत, त्यामुळे मी अजीबात विचलित झालेलो नाही. कारण माझ्या मुलीने काहीही चुकीचे केलेले नाही. मालेगाव स्फोटात प्रज्ञाचा हात नाही, याची मला 99 टक्के खात्री आहे. एक टक्का यासाठी नाही कारण, गेल्या दोन वर्षांपासून ती साध्वी आहे आणि ती माझ्या येथील घरी आलेली नाही. कारण साध्वीने आईवडिलांच्या घरी यायचे नसते, असा नियम आहे. ती आता मला "पिताजी' म्हणत नाही आणि त्याऐवजी "डॉक्टरसाब' असे म्हणते.
देशात झालेल्या स्फोटांबाबत ती अस्वस्थ आहे हे मला माहिती आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि तो तिला मान्य आहे. नागरिकांनी आधी राष्ट्राचा विचार करावा असे तिला वाटते. भारतात जेव्हा हिंदू राष्ट्र स्थापित होईल, त्या वेळी या भूमीवर कोणतेही पाप होणार नाही असे आम्हाला वाटते. हिंदुत्व हा काही धर्म नाही, तर तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे, असे सुप्रीम कोर्टानेही स्पष्ट केले आहे.''
बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलताना डॉ. सिंग म्हणतात, ""ते प्रज्ञाला मदत करीत नाहीत, तर हिंदू मते एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेसही तेच करीत आहे. हे काही योग्य नाही. हिंदू मतपेढी तयार करण्यासाठी ठाकरे प्रज्ञाला पाठिंबा देत आहेत, तर मुसलमानांची मते मिळविण्यासाठी कॉंग्रेस तिचा छळ करीत आहे. कॉंग्रेस काय खेळी खेळत आहे, हे मुस्लिमांना चांगले ठाऊक आहे.
मला मोदींच्याही पाठिंब्याची गरज नाही. मी जर काही अन्याय केला असेल, तर मला त्याची शिक्षा झालीच पाहिजे आणि प्रसंगी फासावरही लटकवले पाहिजे. मी जर काही चुकीचे कृत्य केलेच नाही तर मोदी माझ्या मदतीला न धावले तरीही मी सुरक्षित बाहेर येणारच. गरज आहे ती आत्मविश्वासाची. मी औपचारिकपणे कधीही मोदी यांना भेटलो नाही. पण, ते मला आणि मी त्यांना चांगले ओळखतो. तेही रा. स्व. संघाचे कार्यकर्ते आहेत आणि मी स्वयंसेवक आहे.
मला गरज आहे ती ईश्वराच्या आणि समाजाच्या पाठिंब्याची. माझ्या मुलीने काही चुकीचे कृत्य केले असते तर केव्हातरी तिने त्याबाबत मला सांगितलेच असते. माझ्यापासून काही लपवून ठेवण्याइतपत ती सक्षम नाही. मी मेली तरी चालेल, पण मी बॉम्ब पेरणारच, असे तिने मला सांगितलेच असते. पण तसे तिने केले नाही. म्हणूनच माझी मुलगी निर्दोष आहे, याची मला खात्री आहे.''
(रेडिफवरून साभार)
अनुवाद : गजानन निमदेव
दहावीनंतर योग्य करिअर निवडणे हेच यशाचे खरे गमक
हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट आपण प्रत्येकानेच कधी ना कधी तरी ऐकलेली असेल. शेवटपर्यंत खरा हत्ती आहे कसा? हे सातही जण अचूकपणे सांगू शकत नाहीत. आपल्याला त्या हत्तीचा जो अनुभव आला, त्या आधारे प्रत्येकाने हत्तीचे वर्णन केले. असे का घडले? साधक-बाधक विचार, सर्वांगीण अभ्यास, चौकस आकलन क्षमता आणि मर्मदृष्टी यांच्या अभावी असे घडले. सातही जणांनी आपल्या अनुभवाचे शेअरींग आपसांत केले असते तर कदाचित त्यांना हत्तीचे अधिक योग्य वर्णन करणे शक्य झाले असते. आपल्या दैनंदिन जीवनातही आपल्याला या गोष्टीतील आंधळ्यांसारखाच अनुभव येतो. आपण अनेकदा निर्णय घेताना आवश्यक तितका सारासार विचार करत नाही आणि आपल्याच मताला चिकटून राहतो, समोरच्याने दिलेला सल्ला योग्य असला तरीही स्वीकारत नाही, आणि समोर आलेली संधी दवडतो.
दहावीच्या निकालाचा दिवस जसजसा जवळ येतोय, तशी पालक आणि विद्यार्थ्यांमधली चिंता आणि उत्सुकता सुद्धा वाढतेय. आता पूर्वीसारखी गुणवत्ता यादीची पद्धत राहिली नाहीय. षण तरीसुद्धा दहावीची क्रेझ मात्र तशीच आहे. याचं कारण म्हणजे दहावीनंतरची शिक्षणपद्धती बदलणार आणि प्रवेश पात्रता सुद्धा दहावीच्या गुणांवरच ठरणार. याचा अर्थ असा की, ज्याला दहावीच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळतील त्यालाच पुढे चांगल्या ज्ञानशाखेत प्रवेश मिळणार! माझ्या विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, ही वस्तुस्थिती असली तरी हे पूर्णसत्य नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं.
शेखरला दहावीच्या परीक्षेत सर्वसाधारणच गुण मिळाले पण आई-वडील, नातेवाईकांचा आग्रह आणि मित्रांच्या दडपणामुळे त्याने हट्टाने शास्त्र शाखेला प्रवेश घेतला. बारावीमध्ये त्याची टक्केवारी आणखी खाली घसरली आणि त्यामुळे पुढे प्रवेश घेणे फारच कठीण बनले. आई-वडीलांनी साहजिकच सगळा दोष शेखरलाच दिला. त्यामुळे, आधीच चिंताग्रस्त झालेला शेखर आणखीनच खचला. आता तर या अपयशाला मीच जबाबदार आहे अशी त्याची पक्की समजून झाली. शेवटी कुठेच प्रवेश मिळत नाही हे लक्षात आल्यावर शेखर आज एका खाजगी संस्थेत व्यवसाय प्रशिक्षण घेत आहे. स्वत:च्या क्षमतांचा विचारच न करता चुकीचे करिअर निवडल्याचा खूप पश्‍चात्ताप आता त्याला होतो आहे. परंतु वेळ निघून गेल्यानंतर हाती काहीच उरत नाही. असे अनेक शेखर आज आपल्या आजूबाजूला असतील.
देशातील प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांचे उदाहरण आपण घेऊ त्यांनी हॉटेल व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले त्यावेळी त्यांच्यासह अनेकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल. पण या क्षेत्रातील अभूतपूर्व यश केवळ संजीव कपूरलाच मिळाले क्रिकेट अनेक जण अतिशय उत्तम खेळतात. परंतु सचिन तेंडुलकर एखादाच असतो. असे का होते ? याचा खरोखरच अतिशय गांभीर्यांने विचार आपण केला पाहिजे. आपल्या आयुष्याची योग्य दिशा गवसणे आणि स्वत:मधील क्षमतेची पुरेपूर खात्री पटणे हे खरे यशाचे गमक आहे. त्याला कष्टाची जोड दिली पाहिजे हा नंतरचा भाग झाला. परंतु खरी ओळख पटणे आधी महत्वाचे.
प्रत्येक विद्यार्थी आपापल्या आवडीनुसार अभ्यास करतो. काही विषयांचा अभ्यास तो अधिक प्रमाणात करतो, तर काही विषय अगदी नाईलाज म्हणून अभ्यासतो. जिथे गुणांचीच स्पर्धा आहे तिथे आवश्यक तितके गुण मिळवलेच पाहिजेत. परंतु गुणांच्या स्पर्धेला अवाजवी महत्व देणे अयोग्य आहे. शासनाने ठरवन दिलेल्या १०-१२ क्रमिक पाठ्‌यपुस्तकांवर एक वर्षभर मेहनत घेऊन भरपूर गुण मिळतील. परंतू आयुष्याच्या गुणपत्रिकेवर उत्तम गुण मिळवताना कोणती क्रमिक पाठ्यपुस्तके असतील? आपला मुलगा हुशार आहे, सर्वसामान्य आहे, उच्च बुद्धिमत्तेचा आहे, की सर्वसाधारण मुलांपेक्षाही कमी आहे, हे आपण कसे ठरवणार? (पुर्वार्ध)
परीक्षेतील यश हे बुद्धिमत्ता आणि परिश्रम या दोन्ही घटकांवर अवलंबून असते. आपली गुणवत्ता आपण कशाप्रकारे वापरतो, यावर ते अवलंबून असते. मग ही मार्कांची भानगड आली कुठुन? ही मार्कांची स्पर्धा खरी नाही. खरी स्पर्धा तर आता सुरू होणार आहे हे आपण ओळखलं पाहिजे.
दहावीनंतरच्या शिक्षणाकरिता आपण मार्कांचा निकष सोडून देऊन वैयक्तिक आवड, कुवत आणि अभिक्षमतेचा विचार आधी केला पाहीजे. आपल्याला आयुष्यभरासाठी निवडलेल्या क्षेत्रामध्ये उच्च प्रतीचे यश मिळवायचे असेल तर स्वत:मधील क्षमतांचा विचार आधी केला पाहिजे. केवळ एका मार्कलिस्टवर आपण आपले संपूर्ण करिअर ठरवून मोकळे होतो, हे चूक नाही का?
चांगले मार्क मिळाले की आधी शास्त्र शाखा, तिथे प्रवेश मिळाला नाही तर वाणिज्य शाखा आणि तिथेही प्रवेश मिळाला नाही तर शेवटी कला शाखा आहेच... असाच विचार सर्वसामान्यपणे केला जातो. इथे आपण आपल्या मुलाच्या आवडी-निवडीचा त्याच्यामधील क्षमतांचा विचार करतो का? शास्त्र, गणिताची अजिबात आवड नसलेल्या मुलाने केवळ चांगले गुण मिळाले म्हणुन शास्त्र शाखेत प्रवेश घ्यावा का? आणि भाषा विषयांची, सामाजिक शास्त्राची अजिबात आवड नसणार्‍या मुलाने केवळ कमी गुण मिळाले म्हणुन कला शाखेत प्रवेश घ्यावा का? या मुद्‌द्‌‌‌यंाचा जाणीवपूर्णक विचार विद्यार्थी आणि पालकवर्गाने करायला हवा, कारण दहावीनंतरची ज्ञानशाखेची निवड ही  केवळ पुढील शिक्षणाकरिता नसून आयुष्यभर मिळवण्याच्या भाकरीसाठी आहे. हे पक्के ध्यानात ठेवले पाहिजे.
माझी बुद्धिमत्तेची पातळी किती? माझ्यातील अंतभूत क्षमता कोणत्या! त्यापैकी कोणत्या क्षमता उच्च आहेत आणि कोणत्या क्षमता विकसित होण्यास  आणखी वाव आहे? माझी शारीरिक क्षमता कशी आहे? कष्ट करण्याची माझी तयारी आहे का? मी एकाच अपयशाने खचून जातो की पुन्हा जिद्दीने उभा राहून प्रयत्न करतो? माझ्या स्वत:च्या आवडी-निवडी कोणत्या? मी नवीन नवीन आव्हाने स्वीकारू शकतो का? मला चारचौघात राहून काम करणे आवडते की एकट्यानेच काम करणे आवडते? मला बैठे काम करणे आवडते की, बाहेरचे फिरतीचे काम करणे आवडते? रोजच्या त्याच त्याच स्वरूपाच्या कामाचा मला कंटाळा येतो का? मी रोजच्या कामात किती चुका करतो?  त्याच त्याच चुका पुन्हा:पुन्हा करतो का? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे स्वत: विद्यार्थ्यांनी शोधली पाहिजेत.
सध्याची वाढती स्पर्धा पाहता आपले करिअर उत्तम घडवणे हे आव्हानच आहे. पूर्वीसारखी सोपी शिक्षणपद्धती आता नाही. प्रत्येक ठिकाणी उच्च गुणवत्ता, प्रवेश परीक्षा, मुलाखती, गटचर्चा अशा चाचण्यांमधून आपल्या ज्ञानाची आणि पात्रतेची परीक्षा द्यावी लागणार. सध्याच्याकाळात कामाची क्षेत्रे वाढत आहेत. आज प्रत्येकालाच उच्च दर्जा आणि गुणवत्ता हवी आहे. अशावेळी, उच्च यश मिळवण्यासाठी पारंपारिक शिक्षणाच्या चौकटीपलिकडे जाऊन विचार केला पाहिजे.
आपले करिअर अधिक सजगपणे निवडण्यासाठी आपण आज उपलब्ध असणार्‍या अनेक पर्यायांचा विचार केला पाहिजे. बुद्धिमत्ता-अभिक्षमतामापन आणि करिअर समुपदेशन हा करिअर निवडण्याचा उत्तम विश्‍वसनीय मार्ग आहे. मानस शास्त्रज्ञ आणि करिअर समुपदेशकांकडून ऍप्टिट्यूूड टेस्ट करुन घेऊन योग्य करिअर मार्गदर्शन घेतल्यास विद्यार्थ्यांना याचा निश्‍चित फायदा होतो.
मी कोणते क्षेत्र करिअर करण्यासाठी निवडावे? आणि कोणत्या क्षेत्रात मी करिअर करणे योग्य ठरणार नाही, यावर मानसशास्त्रज्ञांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन अतिशय महत्वपूर्ण ठरते. बदलत्या काळानुसार आपणसुद्धा आपली करिअर निवडीची पद्धत बदलली आणि अधिक विश्‍वसनीय पर्यायाचा विचार केला तर आपले करिअर निश्‍चितच यशदायी आणि आनंददायी होईल. (उत्तरार्ध)
मयुरेश डंके
आस्था कौन्सीलींग सेंटर
विनायक सोसायटी, सात रस्ता,
सोलापूर.

भ्रमण ध्वनी - ९९७०८३२९१५
किशोरी आमोणकर यांच्या प्रकट मुलाखतीची रसयात्रा
भावार्थ सौंदर्याची प्रतिमा रागातून प्रकट होणे आवश्यक
(अमर पुराणिक)
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांना स्वभाव आहे, राग-स्वरांच्या समूहातून रागाच्या भावांचे प्रकटीकरण झाल्याशिवाय गाणे हृदयाला भिडत नाही, असे प्रतिपादन पद्मविभूषण गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी केले.
हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर व श्रीराम पुजारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘पंडित कुमार गंधर्व पुरस्कार’ व ‘पु.ल. देशपांडे बहुरुपी सन्मान‘ या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर झालेल्या प्रकट मुलाखतीत गानसरस्वती किशोरी आमोणकर बोलत होत्या. किशोरी आमोणकरांची मुलाखत केशव परांजपे यांनी घेतली. यावेळी केशव परांजपे व किशोरीताईंच्या शिष्या नंदिनी बेडेकर यांचा सत्कार डॉ. प्रकाश जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केशव परांजपे यांनी किशोरीताईंच्या गाण्याला दिव्यत्वाचा स्पर्श असल्याचे नमूद केले. किशोरीताई यावर बोलताना म्हणाल्या की, भारतीय राग-संगीताचे उद्‌बोधन व स्वरांची भाषा ही वैश्‍विक आहे, दिव्य आहे! रागांच्या भावार्थ सौंदर्याची प्रतिमा प्रकट होण्यासाठी स्वरांची वैश्‍विक परिभाषा समजावून घेतली पाहिजे. राग काय आहेत, हे समजून घेण्यासाठी प्रथम स्वर काय आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. गणित सुंदर आहे, हे संागणारं गाणं असतं. गणितात शून्याला जसे महत्त्व आहे, तसेच गाण्यातील शून्यावस्थाही महत्त्वाची आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ही शून्यावस्था ही साम्यावस्था म्हणून ओळखली जाते. ‘रंजयती इति रागा:|’ ही रागाची व्याख्या असून, या व्याख्येप्रमाणे आपल्या भावना ‘या हृदयापासून त्या हृदयापर्यंत’ पोहोचवण्याची भावना रागात आहे. राग म्हणजे इच्छा, इच्छा प्रकट करण्याची भाषा म्हणजे स्वरभाषा असल्याचे किशोरी आमोणकर म्हणाल्या.
रागांचा विचार करण्याआधी स्वर म्हणजे काय? रागनिर्मिती कशी होते? याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. रागांचे भावविश्‍व परखण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी स्वर आहेत. रागांचा अधिक खोलात जाऊन ऊहापोह करताना किशोरीताई म्हणाल्या की, सप्तकातील मान ठरविलेले स्वरच फक्त रागात लागतात असे नाही, तर प्रत्येक रागात प्रत्येक स्वर वेगवेगळ्या श्रुतींचा असतो. याचे उदाहरण देताना किशोरीताईंनी शुद्ध कल्याण रागातील गांधाराचा खुलासा केला. स्वरसमूहातील गांधारापेक्षा शुद्ध कल्याण रागातील गांधार वेगळा आहे. विभास रागात लागणारा धैवतही असाच वेगळा आहे. विभासातील धैवत हा शुद्ध धैवत व कोमल धैवताच्या मध्ये आहे, त्यातही तो कोमल धैवताकडे झुकणारा आहे. हा श्रुतिभेद सांगता येत नाही. त्यासाठी स्वत: सतत गाण्याचे चिंतन करणे आवश्यक आहे. या स्वरभेदांचा नमुना किशोरी आमोणकरांनी गाऊन दाखवून स्पष्ट केला.
किशोरी आमोणकरांच्या मातोश्री विदुषी मोगुबाई कुर्डीकर या रागांचे भाव प्रकट करणार्‍या स्वर व राग वैशिष्ट्यांचे विशेष महत्त्व किशोरीताईंना वारंवार समजावून सांगत असत. जयपूर घराण्याची गायकी ही आकारयुक्त असते. आकाराच्या स्वरूपात स्वरांचे अत्युच्च स्वरूप प्रकट होत असल्याचे सांगून किशोरीताईंनी आकाराचे महत्त्व स्पष्ट केले. स्वरांच्या बिंदूचे किरण किंवा प्रकटणारी आभा किती गहन व खोल जाते, याचे स्पष्टीकरण किशोरीताईंनी स्वत: गाऊन स्पष्ट केले. जयपूर घराण्यात शिकवताना रागांची नावे सांगितली जात नाहीत. याचे कारण हेच आहे की, सप्तकातील स्वरांच्या मानाकडे लक्ष न लागता त्या त्या रागांचे रागांग प्रकट होण्यासाठी असे केले जात असल्याचा खुलासा किशोरी आमोणकरांनी केला.
स्वर हे स्वयंप्रकाशित आहेत, या स्वरांच्या भावार्थ सौंदर्याची प्रतिमा प्रकट होण्यासाठी स्वराभ्यासाचे महत्त्व त्यांनी सांगितले. स्वर व राग हे नैसर्गिक आहेत आणि ते निसर्गाशी कधीही प्रतारणा करीत नाहीत, त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपात सादर केल्यास स्वरांचा आत्मानंद घेता येणे शक्य असल्याचे किशोरीताईंनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाला शहरातील बहुसंख्य मान्यवर हिराचंद नेमचंद वाचनालय व श्रीराम पुजारी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, सभासद व संगीतप्रेमीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ यांनी अतिशय सुरेख व नेहमीच्या ओघवत्या शैलीत केले.
निवेदनाच्या क्षेत्रात देखील मोठी संधी  
प्रसिद्ध निवेदिका ज्योती आंबेकर यांनी दै. तरुण भारतशी केलेली बातचित
(अमर पुराणिक)
लातूरसारख्या जिल्ह्यात जन्मलेली एक साधीसुधी महिला सूत्रसंचालन, निवेदनासारख्या सामान्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून दाखवते, हेच मुळात कौतुकास्पद आहे. आजपर्यंत सूत्रसंचालन किंवा निवेदनासारख्या क्षेत्रांना तसे वलय प्राप्त झालेले नव्हते, पण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदिका ज्योती आंबेकर यांच्यामुळे निवेदनाच्या क्षेत्राला मोठे वलय प्राप्त झाले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
ओघवती भाषाशैली, सूत्रबद्ध मांडणी आणि प्रभावी वाक्‌चातुर्य असे त्रिविध कौशल्य कमावलेल्या ज्योती आंबेकर  रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या ‘भाषणकला’ शिबिरासाठी सोलापूरला आल्या होत्या, तेव्हा त्यांनी दै. तरुण भारतशी दिलखुलास संवाद साधला. ज्योती आंबेकरांनी वांद्रे-वरळी सी-लिंकचे उद्‌घाटन, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सोनिया गांधी आदींच्या कार्यक्रमांत सूत्रसंचालन केलेले लोकांच्या स्मरणात कायम राहिले आहे. शिवाय पत्रकार या नात्याने विधिमंडळ अधिवेशन, साहित्य सम्मेलने, नाट्य संमेलनाचे वृत्तसंकलन आणि विशेष म्हणजे पंढरपूरला पायी चालत जाऊन पंढरीच्या वारीचे देखील त्यांनी वृत्तसंकलन केलेले आहे.
यूपीएस्सीच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ज्योती आंबेकरांनी भारतीय माहिती सेवेत आपल्या बुद्धिकौशल्याच्या बळावर नोकरी मिळवली. त्या गेल्या १७ वर्षांपासून भारतीय माहितीसेवेत कार्यरत आहेत. त्या आकाशवाणी, दूरदर्शन व इतर अनेक कार्यक्रमांतून  निवेदन व सूत्रसंचालन यांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. हे करता करता त्यांनी निवेदन आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांत मोठे स्थान निर्माण करीत आपला वेगळा ठसा उमटवला. निवेदनाची तर ज्योती आंबेकरांना बालपणापासूनच आवड होती. शाळा-महाविद्यालयांत एनसीसी, एनएससी व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली आवड जोपासायला सुरुवात केली होती, पण हा मार्ग खूप अवघड होता, असे सांगून ज्योती आंबेकर म्हणाल्या की, उमेदवारीच्या काळात हे यश मिळवायला खूप कष्ट केलेले आहेत. आजचे बहुसंख्य मोठे कलावंत हे संघर्षातूनच मोठे झालेले आहेत, असे सांगून त्या म्हणतात की, माणूस जितका मोठा होत जातो तसतसा त्यांच्या वागण्यात साधेपणा यायला लागतो, याचे उदाहरण म्हणजे गानकोकिळा लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर. ही माणसे इतकी मोठी होऊनसुद्धा त्यांच्या वागण्यात अतिशय साधेपणा व नम्रपणा आहे.
निवेदनासारख्या छोट्या समजलेल्या क्षेत्रात देखील मोठी संधी मिळू शकते, याचे उदाहरण मी स्वत:च असल्याचे ज्योती आंबेकर म्हणतात. या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍या नवोदितांना खूप मोठी संधी आहे. प्रदीर्घकाळ परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर याही क्षेत्रात चांगले करिअर होऊ शकते. स्टुडिओ रेकॉर्डिंग आणि प्रत्यक्ष कार्यक्रम यातील फरकाबद्दल बोलताना आंबेकर यांनी यात तसा खूप फरक असल्याचे सांगितलेे. प्रत्यक्ष कार्यक्रमातून आपल्याला तत्काळ प्रतिसाद कळतो, त्यामुळे निवेदनाला हुरूप येतो. पत्रकारिता किंवा निवेदनासारख्या क्षेत्रात काम करीत असताना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, वकिलांपासून ते राजकीय, साहित्य क्षेत्रातील लोक पाहायला मिळतात; त्यामुळे व्यक्तिपरीक्षण आणि समाजातील सर्व पैलू जवळून पाहायला मिळतात.
ज्योती आंबेकरांच्या या यशस्वी प्रवासात त्यांचे पती अजय आंबेकर यांची  मोलाची साथ आणि पाठिंबा आहे. त्यांची कन्या जयती आंबेकर या देखील आता ज्योती आंबेकरांच्या पावलावर पाऊल ठेवत निवेदन, प्रोफेशनल अँकरिंगच्या क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली आहे. जयती हिचे इंग्रजीवर प्रभुत्व असल्याने ती इंग्रजी कार्यक्रमांच्या अँकरिंगमध्ये चांगले यश मिळवीत असल्याचे ज्योती आंबेकर यांनी अभिमानाने सांगितले. अनेक कार्यक्रमांतून आपल्या निवेदन कौशल्याची  रसिकांंच्या मनावर छाप पाडण्यात जयती यशस्वी झाली आहे.
सोलापूरकरांबाबत बोलताना ज्योती आंबेकर म्हणाल्या की, सोलापूरकर खूप मनस्वी आणि कष्टाळू आहेत. सोलापूरने अनेक मोठे कलावंत दिले असल्याचे सांगून आंबेकर म्हणतात की, अतुल कुलकर्णी, प्रा. दीपक देशपांडे अशी अनेक नावे सांगता येतील; ज्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे.
अशा या अष्टपैलू निवेदिका ज्योती आंबेकर यांचा आज दि. १८ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. ‘तरुण भारत’ परिवार, वाचक आणि समस्त सोलापूरकरांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन
अमर पुराणिक
६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेबांचे निधन झाले. दिल्लीहून त्यांचे पाथिर्र्व विमानातून रात्री ३.१५ वा. मुंबईत आणण्यात आले. रात्री सांताक्रूझ विमानतळावर सुमारे २५ हजारांचा जमाव जमला होता. त्यानंतर ऍम्ब्युलन्समध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून ऍम्ब्युलन्समध्ये खास प्रकाशयोजना करण्यात आली होती. सांताक्रूझ ते दादर हे ५ मैलांचे अंतर पार करण्यासाठी ३ तास लागले होते. ५ वा. ५ मिनिटांनी ऍम्ब्युलन्स राजगृहापाशी आली. तेथे रात्रभर साडेतीन लाख लोक वाट पाहत उभे होते. धीरगंभीर वातावरणात ‘बुद्धं शरणं गच्छामी’चा घोष होत होता. प्रचंड गर्दीवर काबू मिळवणे पोलिसांना आणि समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना अशक्य झाले होते. ५.१५ वा. बाबासाहेबांचे पार्थिव ऍम्ब्युलन्समधून उतरवण्यात आले, तेव्हा जनसमुदायाच्या अश्रूंचा बांध फुटला. अर्ध्या तासानंतर लोकांना दर्शनाची मुभा देण्यात आली.
७ डिसेंबर रोजी दुपारी २ वा. राजगृहापासून अंत्ययात्रा निघाली. सुमारे १२ लाख लोक त्यात सामील झाले होते. सायं. ७ वा. दादर चौपाटीवर बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या हस्ते बौद्ध धम्म दीक्षाविधी झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाल्यानंतर वर्षभराने चैत्यभूमीची उभारणी झाली. बौद्ध संस्कृतीनुसार या स्थळावर चैत्यस्तूप उभारण्यात आला. म्हणून त्या परिसराला चैत्यभूमी म्हणतात. दरवर्षी लाखो आंबेडकरप्रेमी व अनुयायी या महामानवाला आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर जमतात.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, ऐतिहासिक बदलांचे अग्रणी. भारतीय समाजात समरसता निर्माण करून दलित, पीडितांचे पुनरुज्जीवन त्यांनी केले. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!’ हा मंत्र या समाजाने स्वीकारला. त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन, पण आपल्या अपत्यांना शिकवीन, त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर करीन! हा ध्यासच सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुले डॉक्टर, इंजिनीअर झाली आहेत असे नाही, पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार केला. आज या समाजाच्या साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के इतके विक्रमी आहे. आज ५० वर्षांनंतर ऍड. शंकरराव खरात, डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि डॉ. नरेंद्र जाधव हे महाराष्ट्रातल्या नामवंत अशा पुणे, मुंबई, संभाजीनगर या विद्यापीठांचे कुलगुरू झाले आहेत. युनिव्हर्सिटी गँ्रड कमिशनचे आजचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात सार्‍या देशातल्या उच्चशिक्षणाची धुरा सांभाळीत आहेत; तर डॉ. भालचंद्र मुणगेकर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य आहेत. डॉ. नरेंद्र जाधव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ असून, ते रिर्झव्ह बँकेचे सल्लागार होते. शेकडो लोक पीएच.डी. झाले तर हजारो लोक डॉक्टर आहेत, इंंजिनीअर आहेत, आर्किटेक्ट आहेत. हजारो लोक प्राध्यापक आहेत आणि प्राथमिक-माध्यमिक शिक्षकांची तर फौजच आहे. समाजातील सर्वोच्च समजल्या जाणार्‍या आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांमध्ये डझनाने अधिकारी या आंबेडकरी समाजातले आहेत. अभिमान वाटावा असा मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग या समाजामध्ये निर्माण झाला आहे. हे सर्वकाही डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांनी आपल्या अपूर्व कष्टातून रुजविलेल्या तत्त्वरूपी बीजांचे फलित आहे. आयएएस, आयपीएस, यूपीएससी, एमपीएससी या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आंबेडकरी समाजाने मोठा दबदबा निर्माण करीत उत्तुंग यश मिळवीत आहेत. साहित्याच्या क्षेत्रातही दलित साहित्याने आपला ठसा उमटवीत स्वतंत्र असा इतिहास निर्माण केला आहे. दलित कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, निबंध, प्रवासवर्णन आणि वैचारिक लेखनादी क्षेत्रांतील कार्याने भल्याभल्या सरस्वतीपुत्रांनाही तोंडात बोटे घालायला लावले आहे. केवळ ग्रंथच लिहिले नाहीत, तर आपला वाचकवर्गही त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपाशीर्वादाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक ग्रंथ अभिमानाने व तेजाने आज तळपताना दिसत आहेत. दलित साहित्य आणि दलित जाणीव, दलित चळवळ आणि अलीकडे आंबेडकरी चळवळ ही देशातल्या अन्य कोणत्याही प्रांतात निर्माण होऊ शकली नाही इतकी मोठी ती महाराष्ट्रात निर्माण झाली; याचे कारण स्वत्व, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि अस्मिता यांची पेरणी या आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. या समाजाला अनेक क्षेत्रांत ‘गरुडभरारी’ घेण्यासाठी पंखांना बळ दिले या महामानवाने.
नागपुरातील दीक्षाभूमी असूद्यात किंवा मुंबईतील चैत्यभूमी असूद्या, तेथे लागणारी पुस्तकांची दुकाने, गावोगाव भरणारी साहित्यसंमेलने आणि त्या प्रत्येक साहित्य संमेलनाच्या बाहेर थाटलेली पुस्तकांची दुकाने, सीडी, कॅसेट्स यांची लागणारी दुकाने हा खरोखर आश्चर्याचा विषय आहे. तीर्थक्षेत्रावर हार, तुरे, माळा, नारळ, कुंकू, बुक्के, शेले, दुपट्टे, चादरींची रेलचेल असते, अगदी तशीच दीक्षाभूमीवर नानाप्रकारच्या हजारो प्रकारच्या ‘ग्रंथसंपदेची मांदियाळी’ झालेली दिसते. हिंदू तीर्थक्षेत्रांवरून हिंदू बांधव पवित्र गंगाजल आणतात, मुस्लिम बांधव हज यात्रेवरून ‘आब-ए-जमजम’ आणतात, आमचे बौद्ध बांधव मात्र दीक्षाभूमीवरून बुद्ध, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आणि प्रतिमा घेऊन येतात. ज्या समाजाला अक्षरबंदी होती, तो समाज ज्ञानाकांक्षी बनविला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्म चळवळीने. ही ज्ञानाकांक्षा हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या समृद्ध समाजाचे सामर्थ्य आहे. अशा या महामानवाला महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!
बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती
(अमर पुराणिक)
२१ व्या शतकात सर्वच क्षेत्रांतील कामांची गती प्रचंड वाढली आहे. टेक्नॉलॉजी प्रगत झाल्याने माणसाची काम करण्याची गतीदेखील वाढली आहे. गेल्या २०, २५ वर्षांत तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाल्याने बँकिंग क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती होऊन ते जलद, अचूक आणि पारदर्शक झाले आहे. ग्राहक घरबसल्या, दिवसातल्या कोणत्याही वेळी बँकेचे व्यवहार करू शकतात. पूर्वीप्रमाणे घरातून बाहेर पडा, बँकेच्या वेळेतच बँकेत जा, रांगेत उभे राहा, बँकेतल्या कर्मचार्‍यांचं खेकसणं सहन करा आणि स्लिप भरून व्यवहार करण्याचा हा सारा त्रासदायक प्रवासाचा जमाना तंत्रज्ञानामुळे इतिहासजमा झाला असून, आपली बँक आपल्या घरात आली आहे.
बँकिंग क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचा वापर वाढल्याने अधिकाधिक लोकांना विविध प्रकारच्या सेवा देणे आता बँकांनाही शक्य झाले आहे. विविध सेवा लोकांना एकाचवेळी अनेक ठिकाणी देणे तंत्रज्ञानाखेरीज शक्य झाले नसते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे बँकिंग क्षेत्राचाही चेहरामोहरा बदलला आहे.
नेट बँकिंग, एसएमएस बँकिंग, मोबाईल बँकिंगमुळे बँकिंग सेवेला कोणत्याही मर्यादा राहिलेल्या नाहीत. घरात बसून आता आपण बँकेचे व्यवहार करू शकतो. ही किमया फक्त टेक्नॉलॉजीमुळेच शक्य झाली आहे. एटीएम, कोअर बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि आरटीजीएस सेवेमुळे बँकिंग क्षेत्राचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. कोणताही निर्णय घेण्यासाठी आज जास्त वेळ लागत नाही, कारण त्यासाठी आवश्यक लागणारी संपूर्ण व अद्ययावत माहिती क्षणार्धात उपलब्ध होते. ग्राहक घरबसल्या आपले खाते पाहू शकतात. तंत्रज्ञानामुळे बँकिंग सेवेची व्याप्तीही वाढली आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातून बँकिंग करणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाचा वापर जसा वाढत गेला, तशी ट्रॅन्झॅक्शन कॉस्टही कमी होत गेली. बँकिंग सेवेचे पूर्वीच दर आता खूप कमी झाले आहेत. बिझनेस प्रॉडक्टॅव्हिटी वाढली, त्याचबरोबर संपूर्ण यंत्रणेवर योग्य नियंत्रण ठेवणेही शक्य झाले आहे. सर्वच सेवा ऑनलाईन झाल्यामुळे घर, ऑफिस किंवा इंटरनेट कॅफेतूनही ग्राहक बँकेशी व्यवहार करू शकतात.
रिअल टाईम ग्रॉस सेटलमेण्ट (आरटीजीएस) तंत्रज्ञानामुळे कमीतकमी शुल्कामध्ये भारतात कुठेही पैसे ट्रान्स्फर करता येतात. छोट्यातल्या छोट्या रकमेपासून अगदी लाखांची रक्कम जरी असली तरी केवळ ५० रुपये इतकाच खर्च येतो. चेक, डिमाण्ड ड्राफ्ट आणि परगावचे चेक क्लिअर होण्यासाठी किमान २ आठवड्यांचा कालावधी पूर्वी लागत असे, पण आता ही सेवा फक्त तासाभरात मिळते. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार एप्रिलपासून सेव्हिंग खात्याच्या रकमेवर डेली प्रॉडक्ट बेसिसवर व्याज मिळणार आहे. त्यामुळे खातेदारांना सर्वाधिक साडेतीन टक्के व्याज मिळेल.
ग्राहकांप्रमाणेच बँक अधिकारी व कर्मचार्‍यांनाही आता कोणताही निर्णय घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्यासाठी आवश्यक असणारी अद्ययावत माहिती क्षणार्धात उपलब्ध होते. येत्या काळातही तंत्रज्ञानात सतत प्रगती व सुधारणा होत राहणार आहेत. त्यामुळे आणखी कोणकोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत, ते येणारा काळच सांगेल.
गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’
सततच्या वैद्यकीय संशोधनाद्वारे संततीनियमनासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आले आहे. यापूर्वी वापरल्या जाणार्‍या तंत्रामंध्ये तात्पुरत्या संतती नियमानासाठी निरोध, संततीनियमनाच्या गोळ्या, कॉपर-टी  आशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत, पण कायमस्वरुपी उपाय म्हणून मात्र गर्भाशय काढून टाकणे हाच पर्याय इतके दिवस वापरला जात होता, पण आता गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला उत्तम, सुरक्षित व कमी खर्चाचा पर्याय म्हणजे ‘बलून थेरपी’. या नव्या तंत्रज्ञानाबद्दल स्पायर इंडिया रेमेडीज्‌च्या वतीने प्रबोधन केले जात आहे.
प्रत्येक वेळी गर्भाशयाची पिशवी काढण्याची खरच गरज असते का?
मासिक पाळी हा स्त्रीच्या जीवनातील अविभाज्य घटक! वयाच्या १३/१४ व्या वर्षी सुरू झालेली ही क्रिया गरोदरपणाचा काळ सोडल्यास रजोनिवृत्तीपर्यंत दर महिन्याला अव्याहतपणे चालूच असते. इस्ट्र्रोजन व प्रोजेस्टेरॉन या अंत:स्त्रावाच्या असमतोलतेमुळे कधी-कधी गर्भाशयाच्या आतील स्तराची प्रमाणाबाहेर वाढ होऊन हा स्तर जेव्हा पाळीच्या वेळी बाहेर फेकला जातो तेव्हा अनियमितता अतिरक्तस्त्राव व पोटात जास्त दुखणे (वूीाशपेीीहरसळशी) अशा प्रकारचा त्रास संभवतो. हा काळ स्त्रीला शारीरिक व मानसिकदृष्ट्या खूपच क्लेषदायक ठरतो. साधारणत: वयाच्या ३० वर्षांनंतर ही तक्रार आपले उग्र स्वरूप दाखवायला सुरुवात करते.
प्रचलित तपासणी व उपचार पद्धती :-
१) सोनोग्राफी व रक्ताच्या तपासण्या २) महिन्याला हार्मोन्सच्या गोळ्या घेणे ३) क्युरेटिंग करणे ४) गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे ५) टीसीआरई ६) मायक्रोवेव्ह ऍब्लेशन.           हार्मोन्सच्या गोळ्या सतत घेतल्यानेही शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. उदा. पित्त वाढणे, वजन वाढणे, स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाणही या महिलांमध्ये येते. गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे ही एक मोठी शस्त्रक्रिया असते. शारीरिक, आर्थिक व मानसिक दृष्ट्या पेशंट यामध्ये अधू होतो. शिवाय सर्वसामान्य शस्त्रक्रियेत असणारे व त्यासाठी लागणार्‍या भुलेतील धोकेही वेगळेच! पिशवीबरोबर अंडाशयही काढून टाकल्यास पेशंटला मोनोपॉजल सिंड्रोम अधिक तीव्रतेने जाणवतो. यात अंगातून गरम वाफा येणे, घाम येणे, चिडचिडेपणा, कातडीचा रुक्षपणा, योनीमार्गाचा कोरडेपणा, हाडे ठिसूळ होणे, हृदयावर परिणाम होणे, मूत्राशयाचे वारंवार इन्फेक्शन होणे इ. प्रकार जाणवतात. आतापर्यंत गर्भपिशवीच्या ऑपरेशनला कोणताही पर्याय नव्हता, परंतु या शस्त्रक्रियेस अत्यंत प्रभावी व निर्धोक असे पर्याय आता उपलब्ध झालेले आहेत.
१) बलून थेरपी २) टीसीआरई ३) मायक्रोवेव्ह ऍब्लेशन
बलून थेरपी काय आहे ?
मासिक पाळीच्या अति रक्तस्त्रावाचे एक प्रमुख कारण असते, आतील अस्तराची अनियमित व अनिर्बंध वाढ. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या साह्याने सोयीस्कर तरीही अत्यंत प्रभावी अशी बलून थेरपी अस्तित्वात आली. या थेरपीमध्ये छोट्याशा भूलीखाली एक विशिष्ट नळी गर्भाशाच्या तोंडातून आत टाकणेत येते. तिच्या तोंडाशी एक खास फुगा बसविलेला असतो. अत्याधुनिक मायक्रो प्रोसेसर असलेल्या मशिनच्या साह्याने हा फुगा पाण्याच्या साह्याने फुगविल्यावर तो पिशवीचा आकार घेतो. त्यानंतर त्यातील तापमान व दाब नियंत्रित केला जातो. या नियंत्रित उष्णतेमुळे गर्भाशयाचे आतील स्तर व आवरण नष्ट होते. शिवाय नियंत्रित दाबामुळे प्रत्यक्ष गर्भाशयाच्या पिशवीबाहेरील अवयवांना इजा होत नाही.
बलून थेरपीचे फायदे
१) गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्यासाठी मोठे ऑपरेशन करावे लागत नाही. २) शरीरावर कोणतीही जखम किंवा व्रण नसतो. ३) भूल व शस्त्रक्रिया छोटी असल्याने तिच्या अनुषंगाने येणारे धोकेदेखील कमी असतात. ४) महिना दीड महिना विश्रांतीची गरज असत नाही. दोन-तीन दिवसांमध्ये कामाला सुरुवात करता येते. ५) रक्तदाब, डायबेटिस, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणापूर्वी पोटावर शस्त्रक्रिया असणार्‍या स्त्रियांना अत्यंत फायदेशीर व कमी धोकादायक. ६) ८५ ते ९० टक्के महिलांची पाळी बंद होते. उरलेल्यांमध्ये पाळी चालू राहिली तरी रक्तस्त्रावाचे प्रमाण अल्प असते. ७) गर्भ अंडकोष शरीरात राहिल्याने मेनोपॉजचे सर्व त्रास कमी होतात. ८) ऑपरेशनच्या वेळी जरुरी असणार्‍या बाहेरील रक्ताची गरज भासत नाही. ९) उपचारानंतर तीन-चार दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतात. १०) प्रत्येक रुग्णासाठी वेगळा बलून वापरला जातो. ११) रुग्ण त्याचदिवशी घरी जातो.
बलून थेरपीचा खर्च
नवीन अत्याधुनिक उपचारपद्धती म्हटली की, ती महाग व सर्वसामान्यांना परवडणार नाही अशी वाटते, परंतु बलून थेरपी याला अपवाद आहे. उपचार, औषध, हॉस्पिटल, भूलतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ यांचा सर्व खर्च गर्भपिशवी काढून टाकणार्‍या ऑपरेशनच्या मानाने कमी आहे. गर्भपिशवी काढून टाकण्याच्या ऑपरेशनच्या मानाने कमी आहे. गर्भपिशवी काढून टाकण्याच्या ऑपरेशनपूर्वी बलून थेरपीचा आपण जरूर विचार करावा.
बलून थेरपी कोणासाठी ?
१) ज्या महिलांना पाळीत अतिरक्तस्त्राव होतो. २) ज्यांच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये मोठ्या गाठी (षळलीेळवी) नाहीत. ३) उच्चरक्तदाब, हृदयविकार, मधुमेह इ. आजार आहेत.
बलून थेरपीबद्दल रुग्णांच्या व नागरिकांच्या प्रबोधनासाठी स्पायर इंडिया रेमेडीज्‌च्या वतीने  विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन केले आहे. बलून थेरपीच्या अधिक माहितीसाठी  यातील तज्ज्ञ डॉ. सतीश दोशी यांचे ‘बलून थेरपी’ या विषयावर व्याख्यान व कार्यशाळा आयोजित केल्या जातात. अधिक माहितीसाठी डॉ. सतीश दोशी यांच्याशी (०२१८५)-२२२६९४ येथे संपर्क साधावा.
- अमर पुराणिक
आनंद देशपांडे यांची किल्ले भटकंतीची सफर
‘कातळमनीचा ठाव’  हृदयाचा ठाव घेणारे लिखाण
•अमर पुराणिक•
ऍड. आनंद देशपांडे एक शिवरायभक्त, उदयोन्मुख लेखक, ज्यांचे लेखन त्यांच्या वयापेक्षा २० वर्षांनी प्रगल्भ आहे. ज्यांच्यावर गो.नी. दांडेकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अशा दिग्गजांचे संस्कार झाले आहेत. १ जून २००९ रोजी गो.नी. दांडेकरांच्या पुण्यतिथीदिनी आनंद देशापांडे यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन गोनीदांच्या कन्या व जावयांच्या हस्ते झाले होते. प्रकाशक पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी त्याचदिवशी ‘कातळमनीचा ठाव’ या दुसर्‍या पुस्तकाच्या प्रकाशनाची घोषणाही केली होती. पहिल्या पुस्तकाच्या यशस्वी प्रकाशनानंतर केवळ चारच महिन्यांत ‘कातळमनीचा ठाव’ हे दुसरे पुस्तक ३ ऑक्टोबर रोजी प्रकाशित होत आहे. दै.तरुण भारतचे माजी संपादक व विद्यमान अध्यक्ष विवेक घळसासी यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
 ‘कातळमनीचा ठाव’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील किल्ले, विशेषत: रायगडाच्या पर्यटनाचा आनंद स्वत: आनंद देशपांडे यांनी अनुभवला आणि तेच अनुभव दै. सोलापूर तरुण भारतमधून पर्यटन व भटकंती विषयक लेखमालिकेच्या माध्यमातून प्रकाशित केले. आता महाराष्ट्रातील दुर्गप्रेमी वाचकांना हे लेखन पुस्तक स्वरूपात वाचता येणार आहे. शिवरायप्रेमींना ही एक अद्वितीय पर्वणीच आहे!
आनंद देशपांडे हे गाढे शिवभक्त, शिवरायांचा वावर जेथे जेथे झाला, तेथे तेथे प्रत्यक्ष अनेकवेळा जाऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली किल्ले पर्यटन करून आपले चित्तथरारक व अंतर्मुख करणारे अनुभव ‘कातळमनीचा ठाव’ या पुस्तकातून नेमक्या व प्रभावी शब्दांत टिपले आहेत. या पुस्तकावर बाबासाहेब पुरंदरे व गो.नी. दांडेकरांच्या लेखनाचा प्रभाव जाणवतो. ते या दोन्ही दिग्गजांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिष्यच असल्याने असे होणे स्वाभाविकच आहे, पण स्वत: आनंद देशपांडेही त्यात प्रभावीपणे प्रकट होतात. ‘कातळमनीचा ठाव’ वाचल्यानंतर एक गोष्ट ध्यानात येते, ती म्हणजे आनंद देशपांडे हे निसर्गाशी संवाद साधणारे आणि निसर्गाच्या गूढ अंतरंगात डोकावून आपले कल्पक विचार अतिशय प्रभावीपणे मंाडणारे लेखक असल्याची प्रचिती वाचकांना आल्याशिवाय राहात नाही. या पुस्तकातील बरेचसे अनुभव व प्रसंग थेट वाचकांच्या काळजाला हात  घालतात. आनंद देशपांडे स्वत: मी कोणी मोठा लेखक नसल्याचे म्हणतात, पण त्यांचेच लिखाण त्यांचे हे विधान खोडून टाकते. कदाचित त्यांच्यातला हा विनय असावा.
३० प्रकरणांतून केलेले किल्लेवर्णन वाचताना प्रत्येक वाचकाच्या अंगात वीरश्री संचारेल यात शंकाच नाही! मला हे पुस्तक वाचताना सर्वात भावली ती ‘गढ मे गढ रायगढ’ व ‘आता सुखाने मरेन’ ही दोन प्रकरणे आणि त्यातील ७३ वर्षीय बंगाली ग्रहस्थ सोमदत्त चट्टोपाध्याय हे व्यक्तिमत्त्व. पोक्त, वैचारिक बैठक असणारे, हिंदूंच्या व विशेषत: मराठी माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे हे दादा व्यक्तिमत्त्व आनंद देशपांडे यांनी फारच प्रभावीपणे उभे केले आहे.
भिषोण सुंदर - अशी खास बंगाली ढंगात सोमदत्त चट्‌टोपाध्याय यांनी दिलेली गडाच्या सौंदर्यावर अर्थपूर्ण प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब असणारे सोमदत्तदां ‘मुझे कुछ नही होगा’ असे म्हणत कोलकात्याहून शिवप्रेम, हिंदुत्वप्रेमापायी रायगड पाहायला आले होते. ७३ वर्षीय बंगाली सोमदत्तदांची जिद्द व श्रद्धाभाव विलक्षण वाटतो आणि आपण मराठी माणसे मात्र येथल्या येथे रायगडही पाहत नाही, हा आपल्या वागण्यातला विरोधाभास आनंद देशपांडेंनी अगदी पोटतिडकीने मांडलाय. शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर सोमदत्तदांचे ध्यान लागणे शिवरायांचे योगीत्व स्पष्ट करते आणि ‘आज मेरा जीवन सफल हो गया, रायगढ देख लिया, अब चैनसे मरूंगा’ चा  त्यांचा सार्थक भाव वैराग्य व तृप्ती दर्शवितो. शिवरायांना ‘योद्धा योगी’ का म्हटले जाते, त्याचे उत्तर देशपांडे यांनी येथे दाखवून दिले आहे.
‘उत्तर का इतिहास समझौतोंका इतिहास है| दख्खन का इतिहास जो इतिहास शिवछत्रपतीने निर्माण किया, वह संघर्षोंका इतिहास है’ याचे नेमक्या शब्दांत सोमदत्तदांद्वारे केलेल हे वर्णन आनंद देशपांडेंनी प्रभावीपणे व्यक्त करीत नेमकी भेदकता साधली आहे.
‘सुनो आनंद, मेरी एक बात ध्यान मे रख्खो, सही मायने मे अगर जीवन का अर्थ समझना चाहते हो, तो बेचैनी में जिओ और चैनसे मरो|’ हा सोमदत्तदांचा अनुभवाचा सल्ला आपणा वाचकांनाही जगण्याची नवी ऊर्मी व दिशा दाखवतो. इतिहास संरक्षण ऐतिहासिक स्थळ संरक्षणाबाबत आनंद देशपांडे यांनी सणसणीत ताशेरेच ओढले आहेत व महाराष्ट्रीयांची शिवाजी महाराजांबद्दल असलेली बेगडी आस्था, मान खाली घालायला लावणारी असल्याचे त्यांनी आत्मपरीक्षणाच्या दृष्टीने योग्यरीतीने मांडली आहे.
‘रायगडावरील धुकेजलेला पाऊस’ या पहिल्या प्रकरणात पावसाळ्यातील रायगडाचे निसर्गवर्णन सृष्टिदेवतेच्या दिव्य स्वरूपाची प्रचिती देते आणि तेथील चित्तथरारक अनुभवांचे वर्णन शिवरायांच्या काळातील प्रतिकूल परिस्थितीची चुणूक दाखविते. दर्‍या, खोरे, घाट आदी रायगड परिसराचे आनंद देशपांडे यांनी केलेले लालित्यपूर्ण सुंदर वर्णन आपल्यात एकदातरी गड पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण करते.
‘शिवथरघळीची निसरडी वाट’मध्ये समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिलेल्या स्थानाचे यथोचित वर्णन, वैराग्यसंपन्न वातावरणनिर्मिती झाल्याचा अनुभव वाचकांना देते.
तिसर्‍या लेखांकातील प्रतापगडाचे वर्णन आणि लेखकाच्या बहिणीवर पडलेला शिवचरित्राचा प्रभाव व श्रद्धा यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेबद्दलचा प्रचंड आत्मविश्‍वास, आपल्यातही आत्मविश्‍वास निर्माण करतो. ‘हिरवा हिरवा घाट’ हे प्रकरण आपल्याला निसर्गाविषयी जागृत करते, तसेच ‘वृक्षायन’मधील निसर्गसंगोपन व वृक्षमहिमा वाचकांत पर्यावरणाच्या असंतुलनाच्या परिणामांची नव्याने जाणीव करून देते. ‘भग्न भुलेश्‍वर’मध्ये सोलापूर-पुणे मार्गावरील महादेेवाचे भव्य व प्राचिन मंदिर, सुंदर कोरीवकामांचा उत्कृष्ट नमुना असल्याचे देशपांडे म्हणतात आणि भग्नावस्थेतील या मंदिरातील अवशेष पाहून मुस्लिम धमार्ंध राजवटीची क्रूर कृत्ये पाहून लेखकाच्या मनात काय त्वेष निर्माण झाला असेल, याची कल्पना येते.
शिवकालीन किंवा एकूणच सर्व इतिहासकालीन संपत्ती जपण्याबाबत शासन उदासीन आहे. शिवरायांच्या दिग्विजयी पुरुषार्थाला वाट चुकलेला देशभक्त म्हणणारे नपुंसक सर्वधर्मवादी राजकीय नेत्यांच्यावरही लेखकाने आसूड ओढले आहेत. छत्रपती शंभुराजांचे जन्मस्थान पुरंदर गडाची अतिशय दुरवस्था पाहूनही हेच जाणवते. नेत्यांची घरे राष्ट्रीय स्मारकाच्या नावाखाली जपण्यात व्यर्थ पैसा खर्च करतात, पण या प्राचीन इतिहासाकडे कोणालाही बघायला वेळ नाही, याची आनंद देशपांडे यांना वाटणारी खंत वाचकांनाही चिंता करायला लावते.
आयुर्वेदिक वनौषधी, शतकानुशतके निसर्गाकडे दुर्लक्षाचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. झाडे तोडताना तिशीतला लाकूडतोड्या आणि साठीची वसंताची आई दोन भिन्न प्रवृत्तीची माणसे एकाच ठिकाणी, एकाच वेळी पाहिल्यावर लेखकाच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता जाणवते.
‘किल्ले भ्रमंतीबरोबरच निसर्गाचं संतुलन राखा, निसर्ग वाचवा!’ हाच संदेश लेखक आनंद देशपांडे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून दिला आहे. आनंद देशपांडे यांचे सकस लिखाण आपल्याला काहीतरी वेगळे आणि चांगले वाचल्याचे समाधान नक्कीच देईल, यात शंका नाही!
वेतनवाढ मंजूर, पण देणार कोठून?
 - अमर पुराणिक  -
केंद्राने आपल्या कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी सहा महिन्यांपूर्वीच देऊ केल्या. त्याचीच री ओढत राज्य शासनांनीही वेतनवाढ दिली. काही राज्यांनी तत्काळ वेतनवाढ दिलीही, तर बाकीच्यांनी वेळकाढूपणा केला. महाराष्ट्र शासनही त्यातलेच. पण दोन महिन्यावर आलेल्या निवडणुकीसाठी सहाव्या वेतन आयोगाचा गाजरासारखा वापर सुरू आहे. शासकीय कर्मचार्‍यांची संख्या आणि गठ्ठा मतदान पाहता वेतनवाढ अधिक लांबणीवर टाकणे दोन्ही कॉंग्रेसला परवडणारे नाही आणि हे न कळण्याइतकी कॉंग्रेस दुधखुळी नाही! तोंडावर आलेल्या निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मान्य करीत शासकीय कर्मचार्‍यांना वेतनवाढ देण्याची आमिषपूणर्र् घोषणा केली.
पण शासन हा प्रचंड वेतनवाढीचा पैसा आणणार कोठून? वेतनवाढ देऊन सरकारी कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे काय?  आणि खरेच ही वेतनवाढदेण्याची मानसिकता आहे काय? की व्होट बँकेवर नजर ठेवत शासकीय कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाचे गाजर दाखवत फक्त झुलवायचे आहे? निवडणुका जवळ आल्यामुळे कर्मचार्‍यांना नाराज करणे सत्ताधार्‍यांना परवडणारे नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनानेही आता वेतनवाढ दिली आहे.
संपूर्ण वेतनवाढ देण्याइतका पैसा केंद्राकडेही नाही आणि राज्याकडेही नाही. केंद्रीय कर्मचार्‍यांना अगोदरच भरघोस वेतनवाढ पाचव्या आयोगाने दिली होती. भारतातील विद्वान अर्थशास्त्रज्ञ, अभ्यासक, शासकीय व राजकीय सल्लागारांनी अशी वेतनवाढ द्यायला कडाडून विरोध केला होता. एवढी प्रचंड वाढ देणे शासनाला मुळीच परवडणारे नाही, असे त्यांचे म्हणणे होते. तो विरोधाला ‘हात’ दाखवीत आयोगाने भरघोस वेतनवाढीच्या शिफारसी केल्या. सहाव्या आयोगाचे ‘गाजर’ हे फक्त गाजर नसून त्याला ‘हायर मॅग्नेटिक फील्ड फॉर व्होट’ही जोडली आहे. कर्मचार्‍यांना ही वेेतनवाढ दिली तर महाराष्ट्र सरकारचे कंबरडेच मोडेल! कंबरडे मोडेल हा शब्दप्रयोगही उद्‌भणार्‍या परिस्थितीच्या वर्णनाला कमी पडतो.
केंद्र सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच महाराष्ट्रात राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांची संख्या प्रचंड आहे. म्हणजे गरजेपेक्षा अंदाजे ४० टक्के जास्त आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांची सतत भरती होत राहिली. ही भरती करीत असताना गुणवत्ता आणि क्षमतेपेक्षा राजकीय हितसंबध व लागेबांधेच साधले गेले आणि गेली तीस-चाळीस वर्षे ही प्रक्रिया सतत चालूच राहिली.
कर्मचार्‍यांच्या या संख्येला लगाम घालण्याची राज्यकर्त्यांकडे इच्छाशक्तीच नव्हती, कारण काय तर व्होट बँक! दुसरे म्हणजे या संख्येत कपात करायला अधिकारी व कर्मचारी यांचा सक्त विरोध राहिला. करबुडवेगिरीला खतपाणीच घातले गेले. अनावश्यक खर्चही मोठ्या प्रमाणात होतच आहेेत.  देशहित व भविष्यातील संकटांचा विचार करून कणखरपणे हा निर्णय घेण्याची क्षमता या कॉंग्रेसमध्ये तरी नाहीच नाही. रालाओ सरकारच्या काळात हा प्रयोग राबविला होता. रालोआचे निर्गंुंतवणूकमंत्री व ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांच्या या धोरणांना त्यावेळी कॉंग्रेसनेच खो घातला होता. रालोआच्या निर्गुंतवणुकीकरण, खाजगीकरण आणि आजारी उद्योग बंद करणे आदी धोरणांना विरोध केला आणि पुन्हा सत्ता बळकावली. अशा कणखर धोरणांच्या अंमलबजावणीची अपेक्षा सत्तेची चटक असलेल्या निष्क्रीय कॉंग्रेसकडून करणे किंवा स्वप्ने पाहणे म्हणजे निव्वळ शेखचिल्लीची स्वप्नेच!
अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संघटनांना हे सर्व कळत असले तरी भविष्यात देशातील इतर घटकांचा, आर्थिक उत्पन्नाच्या समतोलाचा कोणताही व्यवहारी विचार करायला हे कर्मचारी तयार नाहीत. खरे तर त्यांनी ही भूमिका सोडली पाहिजे.
लोकशाहीत जनता मालक आणि कर्मचारी, अधिकारी हा सेवक असतो असे म्हणतात, पण जनतेला विचारतो कोण? शासकीय कर्मचारी पगाराइतके प्रामाणिकपणाने काम करतात का? करदात्याच्या उत्पन्नातून पगार होत असल्यामुळे, लोकांची सरकारी कामे तातडीने व्हावीत, असे असताना नागरिकांची अर्थात राजकीय पक्षांच्या भाषेत मतदार राजाची अवस्था या लोकशाहीत दयनीय झाली आहे. सरकारी कामांसाठी मारावे लागणारे हेलपाटे, दफ्तरदिरंगाई, प्रशासनाच्या कामकाजात जनतेचे होणारे नुकसान आणि ससेहोलपट, चिरीमिरी दिल्याशिवाय सरकारी कामे होत नाहीत, अशी सर्वसामान्य जनता, जे करदाते आहेत त्यांच्या तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, अधिकार्‍यांना शासनाची तिजोरी रिकामी असताना, देश कर्जबाजारी असतानाही वेतनवाढ लागू केली आहे.
राज्यापुढे अनेक महत्त्वाच्या समस्या असून, शेतकर्‍यांसाठी पॅकेज, सुरक्षेवरील वाढता खर्च आणि जागतिक मंदीच्या काळात पगारवाढीचा निर्णय अपेक्षित होता का?
१९९९-२००० साली पाचवा वेतन आयोग लागू केल्यामुळे ५ हजार कोटींचा वार्षिक बोजा वाढून महसुली उत्पन्नाच्या रकमेतून पगारावर ६३.६७ टक्के खर्च केला गेला होता. सहाव्या वेतन आयोगाच्या पगारवाढीमुळे ८ हजार ९९ कोटींचा वार्षिकजादा बोजा वाढेल. शिवाय ३९ महिन्यांच्या थकबाकीसाठी  १८  हजार ३७० कोटी रु.ची रक्कम ५ वर्षांत प्रॉव्हिडंट फंडात जाणार आहे. चालू आर्थिकवर्षात महसुली जमेचे अपेक्षित उत्पन्न ८० हजार कोटी रु. असून, एकूण महसुली उत्पन्नाच्या तुलनेत पगारावरील खर्च ९ टक्क्यांनी वाढून तो ४९ टक्क्यांवर जाणार आहे. अन्य भत्त्यांपोटी त्या खर्चात आणखी ४ हजार कोटींची भर पडणार आहे.
...आणि बुद्ध हसला!
सन्मानजनक भारताच्या बुद्धिसामर्थ्याची प्रचिती  : पोखरणच्या ‘ऑपरेशन शक्ती’ची
(अमर पुराणिक)
राष्ट्रतेज अटल बिहारी वाजपेयी
मिसाईल मॅन’ डॉ. अब्दुल कलाम
 ‘...आणि बुद्ध हसला’! माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी प्रचंड आत्मविश्‍वास आणि आत्मसन्मानाने नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. दिवस होता दि. ११ मे १९९८. कारण होते पोखरण येथे झालेल्या ‘ऑपरेशन शक्ती’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या यशस्वी अणू चाचण्यांचे. याची माहिती संपूर्ण देशाला व जगाला देण्यासाठी अटलजींनी ही पत्रकार परिषद बोलावली होती. संपूर्ण देश अटलजींकडे अतिशय अभिमानाने पहात होता. त्यावेळचे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार व अणू संशोधन कार्यक्रमातील मुख्य संशोधक, महामहिम माजी राष्ट्रपती ‘मिसाईल मॅन’ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम व त्यांच्या वैज्ञानिक सहकार्‍यांकडे सार्‍या देशासह आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या या ‘राष्ट्रतेजा’कडे आवाक् होऊन पहात होता, चकित व अचंबित झाला होता. भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांच्या बुद्धिसामर्थ्यशाली व प्रभावी कर्तृत्वाची  प्रचिती देत होता.
डॉ. आर. चिदंबरम्
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पंतप्रधान अटलजींच्या नेतृत्वाखाली राजस्थानातील पोखरण येथे ५ अणुचाचण्या यशस्वी केल्या. त्यात दि. ११ मे १९९८ रोजी ३ व १३ मे रोजी २ अशा चाचण्या घेतल्या. या ‘ऑपरेशन शक्ती’ ला आज बुद्ध पौर्णिमा दि. ९ मे २००९ रोजी १० वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्या कॉंग्रेस, संपुआ सरकारला अणुचाचण्यांची दशकपूर्ती हा राष्ट्रसन्मानजनक दिवस साजरा करावासा वाटला नाही, पण भाजपा व इतर विरोधी पक्ष मात्र या अणुचाचणीची दशकपूर्ती साजरी करीत आहेत. या अणुचाचण्यांमुळे भारत वैज्ञानिक व आथिर्कक्षेत्रात अतिशय सक्षम झाला. हिंदूंची आराध्यदेवता भगवती शक्तिदेवीच्या नावाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन शक्ती’, पोखरण- २ या अणू उपक्रमामुळे देशाची शक्ती शतपटीने वाढली आहे. पाकिस्तानसारख्या उपद्रवजन्य शेजारी राष्ट्राच्या कुरापतींमुळे सतत भारत असुरक्षित राहिला आहे. त्या सारख्याच गुरकावणार्‍या पाकिस्तानला अटलजींनी आपल्या मुत्सद्देगिरीने पाचर ठोकली. पाकिस्तानने, आपण केले म्हणून क्षमता नसतानाही अणुचाचण्या घेतल्या. त्याचे परिणाम आज पाकिस्तानी जनता भोगतेय !
अटलजींसह तेव्हाचे प्रमुख नेते उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्र, अरुण शौरी, अर्थमंत्री यशवंत सिन्हा, संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस आदी रथींसह वैज्ञानिक महारथी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, ऑटोमिक एनर्जी विभागाचे प्रमुख डॉ. आर. चिदंबरम्, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी), डिफेन्स रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट  ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) या भारतीय सेनेच्या ५८ रेजिमेंट आर्मी इंजिनीअरिंग ग्रुपचे सैनिक व अधिकारी यांच्या प्रभावी समन्वयाने व अतिशय गुप्तता राखत पोखरणच्या अणुुचाचण्या यशस्वी केल्या, याचा जगाला पत्ताही लागला नाही. ‘तंत्रज्ञानातील बाप’ म्हणवणार्‍या अमेरिकेलाही आपल्या वैज्ञानिकांनी भरदिवसा तारे दाखवले. त्यांच्या अत्याधुनिक उपग्रह यंत्रणेला याचा सुगावाही लागला नाही. पोखरणमधील सैनिक व संशोधक चाचण्यांच्या तयारीचे काम शक्यतो रात्रीच्या वेळीच करीत. हे सर्व करत असताना गोपनीयता महत्त्वाची होती. अमेरिकेची उपग्रहयंत्रणा अद्ययावत असल्याने त्यांच्या उपग्रहावर या चाचण्यांचा कोणताही मागमूस येता कामा नये याची खबरदारी घेत आपल्या सर्व संशोधकांनी जवानांची वेशभूषा व सैन्यातील पदे धारण करीत ५८ इंजिनीअरिंग रेजिमेंटबरोबर उत्तम संवाद जमवला होता. ऐन चाचणीच्या दिवशी सकाळपासूनच होणारे हवेतील बदल व हवेची दिशा बदलल्याने सतत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत चाचण्या यशस्वी केल्या.
मुळात अणुचाचण्यांची संकल्पना थोर संशोधक डॉ. राजा रामण्णा यांची. सन १९६४ साली याला सुरुवात झाली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील १९६२ सालच्या चीन युद्धातील अपमानजन्य व निराशजनक पराभवानंतर अणुशक्ती निर्मितीची खरी सुरुवात झाली. १८ मे १९७४ साली पहिली चाचणी घेण्यात आली, पण ती फारच सामान्य अवस्थेतील होती आणि त्यानंतरच्या काळात भारतीय शास्त्रज्ञांनी अणू संशोधनात आजतागायत देदीप्यमान प्रगती केली आणि त्याचा प्रत्यय १३ मे १९९८ या बुद्ध पौर्णिमेला आला. आंतरराष्ट्रीय समुदाय व अमेरिकेने एलटीबीटी, एनएनपीटी, सीटीबीटी अशा करारांचा बडगा सतत भारतावर उगारला, पण देशात प्रथमच भाजपाप्रणित सरकारचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दमदार नेतृत्वाची चुणूक दाखवीत या अणुचाचण्या यशस्वी करून दाखविल्या. इच्छाशक्तिहीन कॉंग्रेसला ५० वर्षांच्या सत्ताकालात हे करता आले नाही. गेल्यावर्षीच्या अणुकरारात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या संपुआ सरकारने ‘हाईड ऍक्ट’समोर आपली नांगी टाकली व संपूर्ण देशाला अंधारात ठेवत अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण कराराच्या जाचक अटींचा खुलासा करणारे पत्र लापवीत आपली लाचार भूमिका दाखवली. याला कारण फक्त सकारात्मक काम व इच्छाशक्तीचा आभाव. अटलजींच्या सरकारातील योजनांची सत्तापालटानंतर फक्त अंमलबजावणी जरी केली असती तरी कॉंग्रसला मोठी प्रगती साधता आली असती, पण ‘विरोधासाठी विरोध’ हेच कॉंग्रेसचे घातकी धोरण देशाला महागात पडले.
‘ऑपरेशन शक्ती’अंतर्गत एकूण ५ अणुचाचण्या घेण्यात आल्या, ज्या ‘शक्ती १, शक्ती २, शक्ती ३, शक्ती ४ आणि शक्ती ५’ या सांकेतिक नावाने ओळखल्या जातात. या अणुचाचण्यांच्या माध्यमातून भारताने संरक्षणात्मक तंत्रज्ञानाबरोबरच वैज्ञानिक, उपग्रह, ऊर्जा असे अनेक अद्ययावत व प्रगतीशील तंत्रज्ञान साध्य केले आहे. यात वर उल्लेखिलेल्या संशोधकांबरोबरच पडद्यामागील व अप्रकाशित अशा संशोधकांचा उल्लेखही कृतज्ञतेने करणे आपले कर्तव्य आहे. यात बीएआरसीच्या थर्मो न्युक्लियर वेपन डेव्हलपमेंटचे डॉ, सतींद्रकुमार सिक्का, न्युक्लियर फ्युएल ऍन्ड ऑटोमेशन मॅन्युफॅक्चरिंग ग्रुप; नुक्लियर कांपोनंट मॅन्युफॅक्चरचे संचालक डॉ. रामकुमार, रेडिओ केमिस्ट्री ऍन्ड आयसोटॉप ग्रुप; न्युक्लियर मटेरिअल ऍक्विझिशनचे संचालक डॉ. डी.डी. सूद, सॉलिड स्टेट फिजिक्स ऍन्ड स्पेक्ट्रोस्कोपी ग्रुप; डिवाईस डिझाईन ऍन्ड असिस्टंटचे संचालक डॉ. एस.के. गुप्ता, इलेक्ट्रॉनिक्स ऍन्ड इन्स्ट्रुमेंटेशन ग्रुप; फील्ड इन्स्ट्रुमेंटेशनचे संचालक डॉ.जी. गोविंदराज तसेच डीआरडीओचे वरिष्ठ अधिकारी इंजिनीअर्स डॉ. के. संतनाम, डॉ. एम. वासुदेव आदींबरोबरच डीआरडीओ, बीएआरसी, मुंबई, पिलानीसह सर्व शाखांचे सर्व इंजिनीअर्स, भारतीय सेना, जैसलमेर सेनातळ यांच्याही महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण प्रत्येक भारतीयाला भूषणास्पद आहे.
भारतात असलेल्या दर्जेदार तंत्रज्ञ व संशोधकांना भाजपाच्या अटलजींच्या सरकारप्रमाणेच सहकार्य देत अथक परिश्रम करीत नव्या युगाच्या नव्या तंत्रज्ञानाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवल्यास भारत महासत्ता होणारच होणार ! माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम म्हणतात त्याप्रमाणे सन २०२० पर्यंत भारत देश महासत्ता होणार ! ते याच जोरावर, पण येणारे प्रत्येक शासन याला किती महत्त्व देते, यावर सर्वकाही अवलंबून आहे.
सृष्टीचा मनभावन श्रावण
अमर पुराणिक
श्रावणमास हा हिंदुधर्मशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा व अत्यंत पवित्र महिना आहेे. जसे दिवे घासून पुसून स्वच्छ करतात, तसेच देवोपासनेने मनही लख्ख करणारा श्रावण. अशा स्वच्छ आणि स्वात्विक मनाचेच प्रतिबिंब श्रावण महिन्यात पडत असते. श्रावणी सोमवार, प्रदोष या पर्वकाळाचे श्रावणात विशेष महत्त्व असते. सर्व देवांचा देव महादेव, भगवान शिव, त्याला प्रसन्न करण्यासाठीच जणू हा महिना आहे. श्रावणाच्या कालावधीतच सर्व देव-देवतांनी शिवाची उपासना करून त्याला प्रसन्न करून घेतले होते, अशी अख्यायिका आहे,  म्हणूनच प्रत्येक श्रावण सोमवारी शंकराला शिवामूठ वाहण्याचा प्रघात आहे.
पहिल्या श्रावण सोमवारी शिवशंकराला तांदळाची शिवामूठ, दुसर्‍याला तिळाची, तिसर्‍या सोमवारी मुगाची, चौथ्याला जवस आणि जर पाचवा सोमवार आला, तर सातूची शिवामूठ अर्पण केली जाते. यात आध्यात्मिक पूजेचे समाधान आहेच, पण पूर्वी आपल्याच शेतात पिकवलेल्या धान्याचा काही भाग देवाची कृतज्ञता म्हणून देवाला अर्पण करण्याची पद्धत होती. सध्याही ग्रामीण भागात काही ठिकाणी ही प्रथा आहेे.
याच काळात जास्तीत जास्त उपास केले जात असण्याचे कारण, देवाच्या सान्निध्यात वास करावयाला मिळावा हे आहेच. शिवाय कमीतकमी आहाराने आपला जठराग्नी जो या काळात मंद झालेला असतो, त्या जठराग्नीला प्रदीप्त करण्याही त्यामागील शास्त्रीय अर्थ आहे. पावसाळ्यात पचनाच्या तक्रारी वाढतात. थंड, दमट हवामानामुळे शरीराच्या हालचाली कमी होण्याने तसेच जठराग्नी प्रदीप्त नसल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण, पावसाचे गढूळ पाणी यामुळे या काळात पोटाचे विकार वाढतात. त्यावर लंघन किंवा अल्प सात्विक आहार हे अत्यंत प्रभावी औषध आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने का होईना, तोंडाचे खाण्याचे काम कमी होऊन जपजाप्य, उपासना अनुष्ठानाद्वारे शरीरशुद्धी आणि मनशुद्धी साधली जाते.
जिभेचे चोचले पुरविण्याचे कमी झाल्यामुळे साहजिकच त्या दिवशी घरच्या गृहिणीलाही थोडा विश्राम मिळतो व तीही आपल्या सख्यांसमवेत देवाच्या पूजेला, मंगळागौरीची पत्री गोळा करायला जाऊ शकते. फुलाची आरास करून प्रसन्न अशा रांगोळ्यांनी वातावरण निर्मिती तर होतेच, पण त्यातून तिलाही सृजनाच्या निर्मितीचा आनंद मिळतो व तीही प्रसन्न होते. मंगळागौरीच्या निमित्ताने सगळ्या माहेरवाशिणी जमतात. यथासांग महादेवाची पूजा करतात व जसा उमेने भोळ्या सांबाची आराधना करून आपल्याशी लग्न करायला प्रवृत्त केले व त्याच्याबरोबर सुखाने कैलासावर राज्य केले, तशाच ह्या नवविवाहिता आपल्या पतीसमवेत सुखी संसाराच्या स्वप्नात मग्न होतात.
 नारळी पौर्णिमा, नागपंचमी, शुक्रवारची पुरणपोळी, कडबोळी, गोकुळाष्टमीचा गोपाळकाला, हे विशिष्ट पदार्थ व त्यांची चव कायम जिभेवर राहते. राखीपौर्णिमेला प्रत्येकजण आपल्या भावा-बहिणींची आतुरतेने वाट बघतो. श्रीकृष्णाचा जन्म (कृष्णाष्टमी) याच काळातला. जागोजागी बांधल्या जाणार्‍या दहीहंड्या, त्या फोडण्याची  धडपड, काल्याचा प्रसाद हे देखील श्रावणातले एक वैशिष्ट्य आहे.
या महिन्याच्या शेवटी येणारा पोळा हा सण तर शेतकर्‍यांच्या दृष्टीने सर्वात मोठा सण आहे. बळीराजा आपल्याला धान्यदेणार्‍या वसुंधरेची कृतज्ञता यावेळी व्यक्त करतो. निसर्गाबरोबरच प्राणिमात्रांची कृतज्ञता म्हणून नागपंचमी, बैलपोळा साजरा केला जातो. आपण आपल्या नित्यजीवनातील सहकारी असलेल्या वृषभराजाच्या उपकाराची जाण पोळा या सणाच्या दिवशी व्यक्त करतो. शेतकरी मंडळी यादिवशी त्याला सजवतात, गरम पाण्याने न्हाऊ घालतात. झूल घालतात, गोंडे लावतात. त्याला कडबूचा घास भरवतात. त्याला ओवाळतात, त्याची पूजा करतात. कर्नाटकात बेंदूर साजरा करतात, तेव्हा पुरणपोळीपेक्षा पुरणाच्या कडबूचाच मान असतो.
श्रावणात धरित्रीवरही वेगवेगळी असंख्य प्रकारची फुले उमलतात, अंकुर याच काळात उगवतात. शिरीष, पारिजातक, सोनचाफा, बकुळ ही फुले तर या ऋतूत भरपूर येतातच. काही ठिकाणी दुर्मिळ अशी सायली व गौरीची फुलेही दिसतात. सोनटक्याची पिवळट पांढरी झाक असणारी फुलेपण श्रावणातच दिसतात.
श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. कोवळ्या तृणांकुरांनी पृथ्वीचे विशाल अंग तर झाकून जातेच, पण उघडे-बोडके दगडही शेवाळाची मखमल पांघरून बसतात व आपल्याला खुणावतात. अशा श्रावणाच्या आगमनाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे, अगदी तुम्हाला, आम्हाला आणि धरतीलाही.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या
(१५ सप्टेंबर १८६१ - १४ एप्रिल १९६२). 
·अमर पुराणिक· 
 मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या हे कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्मलेले भारत देशाचे भाग्यविधाते अभियंते व नागरीक होते. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला. ब्रिटीशांनी पण त्यांना, त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. काही ठिकाणी, विशेषतः, त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात, या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.
विश्वेश्वरैय्या यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला. ते श्रीनिवास शास्त्री व वेंकचम्मा यांचे अपत्य होते. त्यांचे जन्मगाव पुर्वी म्हैसूर राज्यात होते. त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान पंडित होते, ते हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते. विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले. त्या मूळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण बंगळूरू येथे झाले. ते १८८१ साली चेन्नई येथुन बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रिकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पुणे येथे घेतले.
अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर, त्यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले. त्यांनी, दक्षिणेच्या क्षेत्रात पाटबंधार्‍यांची एक अतीशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली' विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास लावण्यात आली. ही द्वारे, धरणातील साठ्याची पूरपातळी, पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत. या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे, ती टिग्रा धरण ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात आली. विश्वेश्वरैय्या यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्यामुळे त्यांना खूप सन्मान प्राप्त झाला. विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
सर विश्वेश्वरैय्या यांनी, कावेरी नदीवर के. आर. एस. धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व जबाबदारी पार पाडली. या धरणाचे बांधकामाने, ते बांधल्या गेल्याच्या वेळचे, आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, 'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले जायचे. त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान, त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी, कीटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट, बंगळूरू ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बॅंक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, मैसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीत देखील त्यांनी योगदान केले.
सन १९०८ मध्ये स्वेच्छा-निवृत्तीनंतर,  म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणुन त्यांना, नियुक्त करण्यात आले. कृष्णराज वडियार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजाच्या आधारामुळे, त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निर्विवाद असे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत, सन १९१७ मध्ये बंगळूरू येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय याची त्यांनी स्थापना केली. ती भारतातील   प्रथम अभियांत्रिकी संस्था होती. ती अद्यापही कर्नाटकातील एक गणमान्य संस्था आहे.
विविध सन्मान
ते म्हैसूर येथे दिवाण असतांना त्यांना, जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' या सन्मानाने गौरविले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले.
'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' पदक तसेच सर विश्वेश्वरैय्या यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व ,तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्सच्या बंगळूरू शाखेने फेलोशिप देउन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना 'डॉक्टर' ही अनेक विद्याशाखातली पदवी देउन गौरविले. ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स काँग्रेस चे अध्यक्ष होते.
श्रीनिवास रामानुजन
(२२ डिसेंबर १८८७ : तंजावर -२६  एप्रिल  १९२०)
·अमर पुराणिक· 
श्रीनिवास रामानुजन हे महान भारतीय गणितज्ञ होते. त्यांची प्रतिभा अलौकिक होती. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.
अशा या महान गणितज्ञाचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.
रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. 
१९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजन यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.
१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २६, १९२० रोजी – हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.
नितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष
·अमर पुराणिक·
 भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या भाजपाध्यक्ष पदाच्या कारकीर्दीला नुकतीच दोनवर्षे पूर्ण झाली. त्यांनी आपल्या गेल्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत देशभर दौरे करून भाजपाला नवसंजीवनी दिली, नवचैतन्य निर्माण केले. राष्ट्रीय स्तरावर आज गडकरींनी भाजपाला एका नव्या उंचीवर नेले आहे. येत्या काळातही ही चढती कमान चढतीच राहणार आहे! त्यांच्या अद्भुत कार्यशैलीचे फलित आपण पाहतच आहोत. त्यांच्या कल्पक नेतृत्वातून अनेक अभिनव उपक्रम भाजपाच्या वतीने राबविण्यात आले, राबविले जात आहेत. त्यांचे फलित येत्या निवडणुकांमध्ये प्राप्त होणार आहे. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सच्चे आणि हाडाचे स्वयंसेवक असलेले नितीन गडकरी यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळून त्यांच्यात ऊर्जा निर्माण केली. आज देशातील राजकारणात, महाराष्ट्राबरोबरच विशेषत: भाजपाशासित राज्यांत गडकरींनी अनेक दमदार सामाजिक, राजकीय, विकासाचे उपक्रम राबविले आहेत. राष्ट्रीय राजकारण, योजना, अर्थकारण, पक्षकार्य, विकासकाम, उद्योगक्षेत्र, तंत्रज्ञान आदींबाबत गडकरी यांचे चिंतन, योजना आणि धडाडी ही अनुकरणीय अशीच आहे. हाडाचा कार्यकर्ता काय असतो, हे नितीन गडकरी यांनी आपल्या आचरणातून सिद्ध करून दाखविले आहे.
सकारात्मक बेरजेचे राजकारण हा भाजपा नेते कै. प्रमोद महाजन यांचा हातखंडा होता. नितीन गडकरी यांनीही अशीच भूमिका घेत आपले कौशल्य वापरून भाजपा-शिवसेना-रिपाइं ही महायुती साकार केली आहे. नितीन गडकरी, शिवसेना नेते उद्धव ठाकरे, भाजपा नेते खा. गोपीनाथ मुंडे, रिपाइं नेते रामदास आठवले यांनी या महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचा सत्तेचा सोपान दृष्टिपथात आणला आहे. येत्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार आहे.
गुजरातमध्ये नरेंंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाची जोरदार घोडदौड सुरूच आहे. कर्नाटकमध्येही माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली चांगली घोडदौड सुरू होती, पण कॉंग्रेस आणि जनतादलाने अनेक खोटे आरोप करून भाजपाच्या विकास कार्यक्रमात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. या स्थितीत गडकरींनी अतिशय परिपक्व भूमिका घेऊन कॉंग्रेसच्या राजकारणाला शह दिला आहे. बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आदी राज्यांतही विकासगती अतिशय प्रभावी राहिली आहे. नितीन गडकरी अध्यक्ष झाल्यापासून अनुसूचित जाती, जमाती, असंघटित क्षेत्रांत कामगार संघटना उभी करून भारतीय जनता श्रमिक महासंघाचा भव्य कार्यक्रम केला. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात १५ ते २० हजार कामगार उपस्थित होते. याशिवाय बुद्धिवाद्यांची संख्या वेगळीच. तसेच मध्य प्रदेशमध्ये आदिवासी विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले. आदिवासी इलाख्यात सर्वत्र पोहोचण्याचा सतत प्रयत्न सुरूच आहे. ‘इंडिया व्हीजन २०२५’ या उपक्रमाचे नियोजन आणि रूपरेषा आता अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपाकडे आता २७ कक्ष आणि प्रकोष्ट आहेत. उत्तम व पारदर्शी प्रशासनासाठी भाजपाशासित राज्यांतील कार्यालयांच्या पद्धती बदलल्या आहेत. नवे कार्यकर्ते, नागरिक यांना भाजपापर्यंत पोहोचविण्यात चांगले यश मिळत आहे.  या प्रयत्नात तरुणांमध्ये पोहोचण्यात नितीन गडकरी यांनी आघाडी घेतली आहे.
आता होऊ घालणार्‍या उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा या चारही राज्यांमधील निवडणुकांत नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाचा करिश्मा दिसणारच आहे. भाजपाने  अंत्योदय, ग्राम, गरीब, कामगार, शेतकरी, तरुणवर्ग, उद्योग आणि आर्थिक मुद्दे यांना प्रधान्य दिले आहे. यामध्ये दारिद्ऱ्यनिर्मूलन, रोजगार निर्मिंती, शेती, ग्रामीण अर्थशास्त्र बदलवणे याला विशेष महत्त्व असून, गडकरी यांच्या विकासाच्या राजकारणाला हळूहळू चांगले यश मिळत आहे.  बिहारचा ११ टक्के जीडीपी पोहोचला. मध्य प्रदेश हे पूर्वी कॉंग्रेसच्या काळात अतिशय कमकुवत राज्य होते. ते ८.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. अजून पुष्कळ गोष्टी सुधारण्याची इच्छाशक्ती गडकरी यांच्याजवळ आहे. गुड गव्हर्नन्सचा महामंत्र जपत भाजपाने ऊर्जा, दळणवळण, खाजगी, सार्वजनिक गुंतवणुकीला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. आज भाजपा कर्नाटकमध्ये शेतकर्‍यांना वीज मोफत देते आणि १ टक्कादराने कर्ज देते, तर मध्य प्रदेश ३ टक्के दराने कर्ज देते.
उत्तर प्रदेशासाठीही भाजपाजवळ अनेक चांगल्या योजना आहेत. उत्तर प्रदेशात नुसती पिकाची एक जात बदलली तर तेथील उत्पन्न ६ हजार कोटी रुपयांनी वाढेल, असा गडकरींना विश्‍वास आहे. ज्यादिवशी येथे भाजपाचे राज्य येईल तेव्हा  सिंचन आणि पाटबंधारे यांना केंद्र व राज्याच्या संयुक्त सूचीमध्ये आणले जाईल. तसे झाले तरच लोक पुन्हा एकदा गावाकडे जातील, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे.
विकास कामांसाठी काम करण्याची मानसिकता हवी, प्रबळ इच्छाशक्ती हवी. ही इच्छाशक्ती असल्यास अडचणीतही विकासकामे चांगल्याप्रकारे करता येतात. याचा प्रत्यय नितीन गडकरी यांनी या आधीच भाजपाप्रणित रालोआ सरकारच्या काळात आणि महाराष्ट्रातील भाजपा-शिवसेना युतीच्या काळात दाखवून दिले आहे. बीओटीचा अतिशय प्रभावी आणि अनोख्या पद्धतीने उपयोग गडकरी यांनी केला. किंबहुना नितीन गडकरीच बीओटी तंत्राचे जन्मदाते आहेत. या तंत्राच्या माध्यमातून १६ हजार गावांत पक्के रस्ते करून दाखविले. मुंबईच्या उड्डाणपुलांसाठी भांडवली बाजारपेठेतून पैसा उभा केला. मुंंबई-पुणे द्रुतगती मार्ग, ठाणे-भिवंडी मार्ग तयार केला.
बर्‍याचदा नितीन गडकरी यांचा उल्लेख उद्योजक म्हणून केला जातो. गडकरी म्हणतात की, मी उद्योजक म्हणजे कारखानदार वगैरे नाही, तर बरीच एनजीओ चालवतो. त्यांचे पाच ऊर्जाप्रकल्प आहेत. तेथे आज ४ रुपये दराने वीज दिली जाते. पर्यावरण हवे, पण विकासदेखील हवा. असे असताना याचा समन्वय साधत गडकरींनी सौरऊर्जा प्रकल्पांकडे विशेष लक्ष देऊन सौरऊर्जा निर्मितीत मोठी आघाडी घेतली आहे. त्याचप्रमाणे बायोमासपासून वीज तयार केली जाते. असे अनेक उपक्रम नितीन गडकरी यांच्या कल्पक नेतृत्वातून फुलले आहेत, फुलू पाहत आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून गडकरींनी १० हजार लोकांना रोजगार दिला असून, पुढील वर्षी ४० हजार जणांना रोजगार देण्याचा त्यांचा मानस आहे.
आज देशात ५८ हजार कोटी रुपयांचे अन्न सडतेय. अशावेळी गरीब, बेरोजगारांची किमान उपासमार तरी होऊ नये म्हणून अन्न सुरक्षेअंतर्गत सुरक्षा दिली पाहिजे आणि सरकारने सबसिडी दराने जीवन जगण्यापुरते का होईना अन्न दिले पाहिजे, अशी गडकरी यांची भूमिका आहे. गरिबांना स्वस्त दरात अन्न दिले पाहिजे. भाजपाशासित छत्तीसगढ सरकार १ रुपया दराने तांदूळ देत आहे. त्याप्रमाणेच पंजाब, हरियाणातही गहू सडवण्याऐवजी तो गरिबांना मोफत द्या, अशी गडकरी यांची मागणी आहे. त्याचप्रमाणे इथेनॉल, जैविक इंधन, जलविद्युत प्रकल्प हे गडकरी यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
अटलजींच्या एनडीएच्या काळात केलेला कारभार, ग्रामसडक योजना, ऊर्जाप्रकल्प, किसान क्रेडिट कार्ड योजना केल्या. त्या काळात निर्यातीत मोठी वाढ झाली, विकासदर वाढला. भाजपाने जागतिक बँकेकडे गहाण पडलेले सोने पुन्हा देशात आणले. यात भाजपाची तत्त्वे, भूमिका आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या अनेक नेत्यांचे कठोर परिश्रम व देशाप्रती प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचे फलित असून, या विकासाच्या बळावर कॉंग्रेसने नंतरची कारकीर्द चालवली, पण स्वत: कोणत्याही नव्या योजना, उपक्रम राबवले नाहीत. त्याची फळे आज देश भोगतोय! फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच शिल्लक राहिला आहे! भ्रष्टाचार, महागाई, काळा पैसा यांबाबत कॉंग्रेस निरुत्तर झाली आहे. टू-जी, कॉमनवेल्थ घोटाळा, आदर्श, लवासा अशा अनेक महाघोटाळ्यांमुळे कॉंग्रेसची विश्वासार्हता संपली आहे. अशा स्थितीत नितीन गडकरी यांचे नेतृत्व आणि भाजपा यांच्यावर जनतेची मोठी भिस्त आहे.
नितीन गडकरी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून कार्यकर्त्यांना ‘लढा, आक्रमक व्हा’, हा मंत्र दिला. ‘राजकारण म्हणजे सत्ताकारण’ ही व्याख्या बदलली पाहिजे. ‘‘राष्ट्रवाद ही आमची प्रेरणा आहे. विकास आणि सुशासन ही मोहीम आणि अंत्योदय हे आमचे उद्दिष्ट असून, राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर मी असा क्रम असला पाहिजे’’, अशी भूमिका घेत गडकरी यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत मोठी मजल मारली आहे. यापुढेही प्रामाणिक प्रशासन, पारदर्शकता, विकासकामे कशी होतील? या प्रयत्नातून प्रभावी कामगिरी करीत गडकरी हे भाजपाला सत्तासोपानापर्यंत पोहोचवतील यात शंकाच नाही!