काश्मिर समस्या : निर्णायक कृतीची वेळ!

•चौफेर : अमर पुराणिक•
भारतासाठी पाकव्याप्त काश्मिरचे विशेष रणनीतिक महत्त्व आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून पाकव्याप्त काश्मिरबाबत खूप सक्रीय झाला आहे. जर पाकव्याप्त काश्मिरमधील लोकांना अधिक जवळीकीने आणि सक्रिय दृष्टीकोनाने आपलेसे केले तर नरेंद्र मोदी मोठा इतिहास घडवू शकतील. कारण तेथील नागरिक स्वत:ला भारतीय म्हणवून घेऊ इच्छितात आणि मोदी सरकारच्या गुड गव्हर्ननंसने आणि वेगवान विकासकामांमुळे ते प्रभावित झाले आहेत. भाजपा काश्मिर केंद्रीत दृष्टीकोन पहिल्यापासून ठेऊन आहेच पण आता सत्ता हातात असल्यामुळे त्याला आकार देणे शक्य होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. त्यांचे अभूतपुर्व असे स्वागत करण्यात आले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी त्याची विशेष दखल घेतली. त्यांनी संयुक्त राष्ट्र संघात अतिशय प्रभावी भाषण केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा  परिषदेच्या विस्ताराची मागणी केली व भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी आग्रह धरला. मोदी यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादापासून ते आर्थिक विकासापर्यंत सर्वच बाजू मांडल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मात्र नेहमीप्रमाणे काश्मिरचाच मुद्दा आळवला. १९४७ मध्ये पाकिस्तानने बेकायदेशीररित्या काश्मिरचा भाग गिळंकृत केल्यापासून पाकचे संयुक्त राष्ट्रसंघात एक कलमी रडगाणं सुरु आहे. काश्मिरच्या मुद्द्यावर नेहमीप्रमाणे याहीवेळी नवाज शरीफ यांनी रडगाणं सुरु ठेवलं. खुद्द पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगाण केले. तर नवाज शरीफ यांच्याबाबत आणि पाकिस्तानच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्‍नचिन्हं उपस्थित केली आहेत.
तिकडे शरिफ काश्मिरचा राग आळवत असतानाच इकडे पाकव्याप्त काश्मिरमध्ये तेथील नागरिकांनी निदर्शनं करत आमची पाकिस्तानच्या तावडीतून मुक्तता करा, आम्हाला भारतात रहायचे आहे अशी मागणी केली. पाकव्याप्त काश्मिरमध्ये खूप मोठ्‌या संख्येने लोक जमले होते. अशी मागणी मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सुरु झाली आहे. आणि आता ती मागणी जास्त तीव्र होत आहे. पाकिस्तानने आजपर्यंत केवळ दहशतवादी कारवाया करण्यासाठी आणि चीनशी चुंबाचुंबी करण्यासाठी पाकव्याप्त काश्मिरचा वापर केला आहे. त्यामुळे तेथील लोक यात प्रचंड भरडले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून पाकव्याप्त काश्मिरमधील नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे की, मोदी काश्मिरचा मुद्दा सोडवतील आणि आम्हाला सुखाचे दिवस पहायला मिळतील. 
पाकिस्तान व्याप्त काश्मिर म्हणजे जम्मु काश्मिर आणि गिलगिट बाल्टिस्तान असा प्रांत आहे. पाकव्याप्त काश्मिर हे भारताचे अभिन्न अंग आहे. २२ ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानने जम्मु-काश्मिरचा हा भाग गिळंकृत केला. हा भाग तेव्हापासून पाकिस्तानच्या बेकायदेशीर नियंत्रणात आहे. जम्मु-काश्मिर रियासतीचे राजे महाराज हरी सिंह यांनी जम्मु-काश्मिर रियासत भारतात विलय करण्याच्या करारावर हस्ताक्षर केले होते. पण तेव्हापासून हा भाग पाकिस्तानच्या अवैध कब्जात राहिला. भारत सतत पाकव्याप्त काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे अशी भूमिका मांडत आलाय. पण कॉंग्रेस सरकारने विशेषत: नेहरु सरकारने यावर कोणतीही हलचाल केली नाही, प्रयत्नही केले नाहीत. त्यामुळे तेथील नागरिकांची आजतगयात उपेक्षा झाली आहे. त्यामुळे विकासाआभावी तेथील नागरिक अतिशय हलाकीच्या स्थितीत जगत आला आहे. पाकिस्तानने याच परिसरात दहशतवाद फोफाऊ दिला. तेथील नागरिकांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी पाकने तर काहीच केले नाही आणि पाकव्याप्त असल्यामुळे भारतही काही करु शकला नाही. संविधानिक प्रावधान आणि संसदीय प्रस्तावाप्रमाणे त्यांचे अधिकार आणि संरक्षण हे सरकारचे दायित्व आहे. मोदी सरकार आल्यापासून मात्र यावर हलचाली सुरु झाल्या आहेत. नुकतेच या मुद्द्यावर पाकिस्तानवर पलटवार करताना पीएमओचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी पाकिस्तानचे सैन्यप्रमुख राहिल शरीफ यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
ही पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची घटना आणि पुढील घटनाक्रम फार महत्वाचा आहे कारण ६५-६६ वर्षांच्या निष्क्रीयतेनंतर भारत पाकव्याप्त काश्मिरबाबत आक्रमक झाला आहे. आणि भारताने हाच मुद्दा मध्यवर्ती केला आहे. नुकतेच अंजुमन मिन्हाज-ए-रसूलचे अध्यक्ष मौलाना सैयद अतहर हुसैन देहलवी यांनी पाकव्याप्त काश्मिरचा दौरा केल्यानंतर सांगितले की, येथील नागरिक भारताचा हिस्सा बनू इच्छितात. सध्या हीच बाब महत्त्वाची आहे की पाकव्याप्त काश्मिरमध्ये भारताच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे पाकिस्तान हताश झाला आहे. पाकिस्तानी माध्यमंही येथील घटनांची दखल घेत आहेत. दुदैवाने भारतीय माध्यमांना मात्र केवळ मोदीद्वेषाने पछाडले आहे, त्यामुळे काश्मिरच्या मुद्द्यावरील ही राष्ट्रहिताची घटना त्यांना दखलपात्र वाटत नाहीये. असो. गेल्या महिन्यात ७ सप्टेंबर रोजी नवाज शरीफ यांनी पाकव्याप्त काश्मिरमधील पुरग्रस्त भागाचा दौरा केला तेव्हा येथील नागरिकांनी त्यांचे स्वागत ‘गो बँक नवाज’ अशा नारेबाजीने केले आणि पाकिस्तान विरुद्ध जोरदार निदर्शने केली.
अशा पुराच्या संकटाच्या काळातही लोक संतापून निदर्शनं करतात याचा अर्थ हेच ध्वनीत करतो की तेथील लोक आता पाकिस्तानच्या दडपशाहीला वैतागले आहेत. पाकिस्तानच्या पुढाकाराने गेल्या अनेक दशकांपासून पाकव्याप्त काश्मिरच्या खोर्‍यात जे दहशतवादाने थैमान घातले आहे त्यापासून लोकांना सुटका हवी आहे. पाकने येथील साधनांचा वापर दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी केला, तेथील नागरिकांना जिहादच्या नावावर भडकवून त्यांच्या आयुष्याचे वाटोळे पाकिस्तानने केल्याची जाणिव विकासापासून कोसो दूर असलेल्या पाकव्याप्त काश्मिरमधल्या नागरिकांना झाली आहे. त्यामुळे नवाज शरीफ विरुद्ध हा संताप तेथील जनतेने व्यक्त केला. एकीकडे भारतभरातील राज्यात पंतप्रधान मोदी विशेष पॅकेज देऊन वेगवान विकास साधत आहेत तर पाकव्याप्त काश्मिरकडे पाक विकासाबाबतीत ढूंकुनही पहात नाही.
भारतासाठी पाकव्याप्त काश्मिरचे विशेष रणनीतिक महत्त्व आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून पाकव्याप्त काश्मिरबाबत खूप सक्रीय झाला आहे. जर पाकव्याप्त काश्मिरमधील लोकांना अधिक जवळीकीने आणि सक्रिय दृष्टीकोनाने आपलेसे केले तर नरेंद्र मोदी मोठा इतिहास घडवू शकतील. कारण तेथील नागरिक स्वत:ला भारतीय म्हणवून घेऊ इच्छितात आणि मोदी सरकारच्या गुड गव्हर्ननंसने आणि वेगवान विकासकामांमुळे ते प्रभावित झाले आहेत. भाजपा काश्मिर केंद्रीत दृष्टीकोन पहिल्यापासून ठेऊन आहेच पण आता सत्ता हातात असल्यामुळे त्याला आकार देणे शक्य होणार आहे. मोदींनी अमेरिकादौर्‍यात याची सुरुवात केलीच आहे. आंतरराष्ट्रीय कुटनितीत मोदींनी पाकिस्तानला चारीमुंड्‌या चीत केले आहे. आता येत्या काळात पाकव्याप्त काश्मिरबाबत निर्णायक कृती घडेल अशी आशा आहे.

0 comments:

Post a Comment