गेले वर्ष संक्रमणाचे, चालू वर्ष संकल्पपुर्तीचे!

•चौफेर : अमर पुराणिक•

या वर्षात जितक्या योजनांची वेगवान उभारणी केली जाईल तितकी ती येत्या तीन वर्षात पुर्ण करणे सोपे जाणार आहे. तेव्हा सन २०१५ हे वर्ष भाजपाचे भवितव्य ठरवणारे वर्ष ठरणार आहे. एकंदर मोदी सरकारच्या कामांचा धडाका आणि वेग पाहता हे इप्सित भाजपा सरकार साध्य करेल यात शंका नाही.

सन २०१४ ने अनेक घटना इतिहासजमा करत निरोप घेतला. देशाच्या दृष्टीने हे वर्ष अतिशय महत्त्वपुर्ण ठरले. जोरदार राजकीय संक्रमणाचे वर्ष म्हणून सन २०१४ ओळखले जाईल. तर नवे वर्ष २०१५ हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला संकल्पपुर्तीच्या वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  २०१४ सालात पंतप्रधानपदी आरुढ झाले. त्यांनी गेल्या सहा महिन्यात अनेक महत्त्वपुर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जनतेच्या आशा-अकांक्षा खुपच उंचावल्या आहेत. म्हणून नवे २०१५ हे वर्ष भाजपा आणि मोदींसाठी तसेच जनतेसाठीसुद्धा महत्त्वपुर्ण आणि आव्हानात्मक असणार आहे.
गेल्या वर्षी २०१४ साल उजाडले ते लोकसभेच्या निवडणूकीचा धूराळा उडवत. हे वर्ष भाजपा आणि नरेंद्र मोदी यांची संघर्षदायक यशाची गाथा ठरेल. जनतेने अनेक वषार्र्ची कॉंग्रेसची भ्रष्ट राजवट उखडून फेकत भाजपाला स्पष्ट बहूमत देऊन निवडुन दिले आणि हे वर्ष इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले, याचे कर्ते करवीते ठरले ते भारतीय जनमानस. निवडणूकीत जनतेसमोर सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाने अनेक खोट्‌या अश्‍वासनांची खैरात केली. आणि याही वेळी जनता वेड्‌यात निघेल या भ्रमात राहिली. पण काळाबरोबर जनताही खूप सुज्ञ झाली आहे. गेल्या दहा वर्षातील कॉंग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून गेली होती. दहा वर्षे अतोनात सोसलेल्या हालअपेष्टाचा बदला जनतेने मतपेटीतून घेतला. आणि नरेंद्र मोदींनी घातलेल्या ‘कॉंग्रेसमुक्त भारत’च्या सादाला जोरदार प्रतिसाद दिला आणि कॉंग्रेस सरकार नेस्तोनाबूत केले. नरेंद्र मोदींच्या झंझावातासमोर कॉंग्रेस आणि इतर सर्व विरोधक अक्षरश: पालापाचोळयाप्रमाणे उडून गेले. लोकसभेत विरोधीपक्षनेतेपदही मिळू नये अशी दयनीय अवस्था कॉंग्रेसची झाली. लोकशाहीची ताकत काय असते याची प्रचितीच गेल्या २०१४ या वर्षाने दिली.
काही प्रसारमाध्यमांनी आणि विरोधकांनी जनतेने चूकीचा निर्णय घेतल्याची कोल्हेकुई केली आणि अजूनही सुरुच आहे. याचे  वाईट परिणाम जनतेनेच भोगायचे आहेत अशी भीती ते जनतेला दाखवत आहेत. गेल्या सहा महिन्यातील मोदींची वाटचाल पाहता प्रसारमाध्यम आणि विरोधकांची कोल्हेकुई ही उठवळ असल्याचे जनता समजून चूकली आहे. जनहितार्थ काम करणारे सरकार कसे असते याची चूणूक जनतेने या सहा महिन्यात अनुभवली आहे. राष्ट्रहित काय असते, राष्ट्राचा आत्मसन्मान काय असतो, जनतेचा आत्मसन्मान काय असतो, विकासकामे काय असतात, परराष्ट्र धोरण काय असते याची प्रचिती दहा वर्षांनंतर पुन्हा जनतेला येऊ लागली आहे. या २०१४ वर्षात विरोधक आणि प्रसारमाध्यमे हा विजय मोदींमुळे झाला की भाजपामुळे झाला की संघामुळे झाला याचा काथ्याकुट करण्यापलिकडे काही करु शकले नाहीत. जबरदस्त पराभवाच्या धक्क्यातून विरोधक अजुनही सावरले नसल्याचे हे द्योतक आहे. सन २०१४ हे वर्ष भारतीय लोकशाहीतील सर्वात महत्त्वपुर्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले आहे.
पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी अनेक पारंपरिक गोष्टींना फाटा दिला. आणि तेव्हापासून एका वेगळ्या आणि प्रभावी सत्ताकर्त्यांचा अनुभव जनतेला येऊ लागला. अनेक महत्त्वाचे उपक्रम आणि योजना या वर्षात जाहीर केल्या गेल्या आहेत. मोदी सरकारची खरी कसोटी या योजनांची नेमक्या वेळेत अंमलबजावणी करणे ही आहे. त्यामुळे नवे २०१५ हे वर्ष मोदी आणि भाजपा सरकारच्यादृष्टीने आव्हानात्मक असणार आहे. दमदार अंमलबजावणी हे भाजपाचे बलस्थान असल्यामुळे जनतेच्या आशा प्रचंड उंचावल्या आहेत.
यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जगभरात उंचावलेली भारताची मान! आंतरराष्ट्रीय स्थरावर भारत कायमच नगण्य म्हणून गणला गेला होता. मोदींनी जगभर झंझावाती दौरे करत ही प्रतिमा पुसून टाकत महासत्तेच्या स्पर्धेत भारत आघाडीवर असल्याचे दाखवून दिले. जगभर भारताबद्दलची भूमिका बदलण्यास मोदी यांनी दमदार योजना आणि सकारात्मक सादरीकरणाच्या जोरावर संपुर्ण जगाला भाग पाडले. आंतरराष्ट्रीय नीती आणि कुटनिती खेळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड माहीर असल्याची ही छोटीशी चूणूकच आहे.
नरेंद्र मोदींची पंतप्रधान होण्यापुर्वीची राजकीय भाषा आणि कृती व पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची भाषा आणि संसदीय व्यवहार हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मोदींनी दाखवलेली ही परिपक्वता अनेक वर्षात सत्ताधार्‍यांकडून पहायला मिळालेले नव्हती. हा मुद्दा केवळ राजकीय अभ्यासकांनीच हेरला नसून जनतेनेसुद्धा  ओळखले आहे. राजकीय डावपेच समजण्याच्यादृष्टीने जनतेला अज्ञानी समजले जाते. पण जनतेने आपली सुज्ञता दर्शवत असे समजणार्‍यांच्या मुस्काटात मारली आहे. 
दिल्लीच्या दिग्विजयानंतर भाजपा आणि मोदी यांनी एकापाठोपाठ एक अशी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मु-काश्मिर विधानसभा काबिज केली. या २०१४ वर्षात भाजपाने चार राज्यात भगवा फडकावत सत्ता हस्तगत केली. पुढील महिन्यात होणारी दिल्ली विधानसभाही भाजपा काबीज करण्याची शक्यताही एग्झिट पोलनी वर्तवली आहे. नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘कॉंगे्रसमुक्त भारत’ या घोषणेची अक्षरश: अंमलबजावणी जनतेने या चारही राज्यात केली आहे. आता दिल्लीही दूर नाही. राजकीयदृष्ट्या विचार करता भाजपाने मोठे यश मिळवले आहे. संघटनात्मकदृष्ट्याही भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मोठी प्रगती साधली आहे आणि संघटनात्मक बळ हेच भाजपाला भविष्यात उपयोगी ठरणार आहे. हे ओळखूनच भाजपा आणि मोदी यांनी अमित शहा यांच्यासारखा चाणाख नेता भाजपाध्यक्षपदी निवडला. अटलजींच्या नेतृत्वातील रालोआच्या काळात भाजपाकडून हीच चूक झाली होती. त्यामुळे सत्ताकाळात पक्ष दूबळा झाला होता, त्याचा फटका तेव्हा पुढील निवडणूकीत बसला होता. पण ही चूक आता भाजपाने सुधारली आहे. भाजपासदस्य नोंदणी अभियानही जोरदार राबवले गेले आहे. शिवाय भाजपाला जगातील सर्वात मोठा पक्ष बनवण्याची मनिषा नरेंद्र मोदी आणि अमित शहा या द्वयींनी व्यक्त केली आहे.
इतक्या सगळ्या यावर्षातील भाजपाच्या जमेच्या बाजू असल्यातरीही खरी कसोटी आहे ती या नव्या २०१५ या वर्षात. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे  योजना गतीमान पद्धतीने राबवणे. रालोआ सरकारच्या काळात अटलजींच्या नेतृत्वाखालीही अनेक चांगल्या योजना राबल्या गेल्या होत्या. पण त्यातील बहूसंख्य योजना त्या पाच वर्षातील सत्ताकाळात पुर्ण झाल्या नव्हत्या. सत्ता गेल्यानंतर त्यापुर्ण झाल्या आणि त्या योजनांची उद्घाटनं मात्र कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारने केली. काहीही न करता आयत्या पीठावर रेघोट्‌या ओढण्यात कॉंग्रेस चलाख आहे. त्यामुळे ती चूक आता मोदी सरकारने टाळणे आवश्यक आहे. मोदी सरकारने जाहीर केलेले सर्व मोठे प्रकल्प चार वर्षांत पुर्ण होणे महत्त्वाचे आहे. यातून एक फायदा भाजपाला पुढील निवडणूकीत होणार आहे. तर दूसरा फायदा हा जनतेला आणि देशाला होणार आहे. हा दूसरा फायदा म्हणजे या प्रकल्पांचा खर्च नियोजित तरतूदी होईल आणि प्रकल्प पुर्णत्वास येऊन त्याचे लाभ जनतेला मिळू लागतील त्यामुळे दिरंगाई मोदी सरकारला परवडणार नाही. हे साध्य करण्यासाठी सन २०१५ हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षात जितक्या योजनांची वेगवान उभारणी केली जाईल तितकी ती येत्या तीन वर्षात पुर्ण करणे सोपे जाणार आहे. तेव्हा सन २०१५ हे वर्ष भाजपाचे भवितव्य ठरवणारे वर्ष ठरणार आहे. एकंदर मोदी सरकारच्या कामांचा धडाका आणि वेग पाहता हे शिवधनुष्य भाजपा सरकार उचलेल यात शंका नाही.

0 comments:

Post a Comment