सुदर्शनजी

भाष्य - मा. गो. वैद्य
गेल्या शनिवारी म्हणजे दि. १५ सप्टेंबर २०१२ ला माजी सरसंघचालक श्री सुदर्शनजी यांचे रायपूरला निधन झाले. कुप्पहळ्ळी सीतारामय्या सुदर्शन असे त्यांचे पूर्ण नाव. ते जन्माने मराठी भाषी असते, तर हेच नाव सुदर्शन सीतारामय्या कुप्पहळ्ळीकर असे झाले असते. त्यांचे मूळ गाव कर्नाटकातील कुपहळ्ळी. सीतारामय्या हे त्यांचे वडील.
सार्थकता आणि धन्यता
दिनांक १८ जून १९३१ हा त्यांचा जन्मदिन आणि १५ सप्टेंबर २०१२ हा त्यांचा मृत्युदिन. म्हणजे वयाची ८१ वर्षे त्यांनी पूर्ण केली होती. त्यामुळे, त्यांचे अकाली निधन झाले असे म्हणता यावयाचे नाही. पण कोण किती जगला, यापेक्षा कसा जगला, हे महत्त्वाचे असते. अनेक महापुरुषांनी फारच लवकर आपली जीवनयात्रा संपविलेली आहे. आद्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्‍वर, स्वामी विवेकानंद ही त्यातली लक्षणीय नावे. एक जुनी लोकोक्ती आहे. जीवनाचे मर्म ती सांगते. ती आहे- ‘‘विना दैन्येन जीवनम्, अनायासेन मरणम्’’ लाचारी न पत्करता जगणे आणि कुणालाही त्रास न देता, अगदी स्वत:ही त्रास न सोसता, मृत्यूला कवटाळणे, यात जीवनाची सार्थकता आहे अणि मृत्यूचीही धन्यता आहे. सुदर्शनजींचे जीवन या जीवनसार्थकतेचे आणि मरणधन्यतेचे उदाहरण आहे.
स्पृहणीय मरण
लाचारी न पत्करता जीवन जगणे, हे बरेचसे आपल्या हाती आहे. आपण ठरवू शकतो की, मी असेच ताठ मानेने जगणार. मग संकटांचे पहाड कोसळले तरी पर्वा नाही. अनेकांनी असे ठरवून जीवन व्यतीत केले आहे. पण मरण? ते थोडेच आपल्या हाती असते? सुदर्शजींनी मात्र असे मरण स्वीकारले की जणू काही त्याला त्यांनी विशिष्ट वेळेला आमंत्रित केले होते! सकाळी पाच-साडेपाचला उठून फिरायला जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता. सुमारे तासभर फिरून आल्यावर ते प्राणायामादि आसने करीत. दिनांक १५ सप्टेंबरलाही ते असेच फिरायला गेले होते. बहुधा ६.३० च्या सुमारास त्यांनी प्राणायामाला आरंभ केला असणार; आणि ६.४० ला त्यांनी मृत्यूला कवटाळले. खरेच, कुणीही अशा मरणाचा हेवा करावा, असे ते अक्षरश: स्पृहणीय होते.
संघशरण जीवन
सुदर्शनजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. ‘प्रचारक’ शब्दाचा अर्थ, इतरांना उलगडून सांगणे कठीण असते, असा माझा अनुभव आहे. मी संघाचा प्रवक्ता असताना, अनेक विदेशी पत्रकार मला त्या शब्दाचा नेमका अर्थ विचारीत. मी तो सांगू शकत नसे. मी वर्णन करी. तो पूर्णकालिक असतो. अविवाहित असतो. त्याला कुठलेच मानधन मिळत नाही; आणि जेथे सांगितले व जे सांगितले, तेथे, ते काम त्याला करावे लागते. असा अर्थ मी सांगीत असे. खरेच ‘प्रचारक’ शब्दाचे एवढे अर्थायाम आहेत. सुदर्शनजी प्रचारक होते. ते सुविद्य होते. सुमारे ५७-५८ वर्षांपूर्वी त्यांनी बी. ई.ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तीही त्या काळी नवीन असलेल्या ‘टेलिकम्युनिकेशन्स’ म्हणजे दूरसंचार या विषयात. चांगल्या पगाराची, चांगल्या सन्मानाची नोकरी, त्यांच्या समोर हात जोडून उभी राहिली असती. पण सुदर्शनजी त्या वाटेने जाणारे नव्हते. ती वाट पकडायची नाही आणि आपले संपूर्ण जीवन संघसमर्पित करावयाचे, हे त्यांनी पूर्वीच ठरविलेले असणार. म्हणून ते ‘प्रचारक’ बनले. संघाच्या दृष्टीने यात काही अप्रूप नाही. आजही संघाचे अनेक प्रचारक उच्च पदवीविभूषित आहेत. अनेक प्रचारक पीएच. डी. आहेत. एक माझ्या माहितीतल्या प्रचारकाचे संशोधन आण्विक रसायनशास्त्राशी संबंधित आहे. एम. बी. ए. आहेत. एमबीबीएस आहेत. बी. ई. व एम्. ई. ही आहेत. मजेची गोष्ट ही आहे की, एवढी महान् अर्हता प्राप्त केलेल्या या मंडळींना आपण काही अद्वितीय अथवा अभूतपूर्व करीत आहोत, असे वाटतही नाही; आणि कुणी सांगितले नाही तर इतरांना ते कळावयाचेही नाही. प्रचारक बनून सुदर्शनजींनी आपल्या जीवनाचा एक मार्ग पत्करला. हा संघशरण जीवनाचा म्हणजेच, समाजशरण जीवनाचा म्हणजेच, राष्ट्रशरण जीवनाचा मार्ग होता. तो जो त्यांनी एका क्षणी स्वीकारला, त्या मार्गावर ते शेवटच्या श्‍वासापर्यंत चालत राहिले.
‘प्रज्ञाप्रवाहा’चे जनक
संघाच्या कार्यपद्धतीची जी काही वैशिष्ट्ये आहेत, त्यात शारीरिक व बौद्धिक या दोन विधांचा अंतर्भाव आहे. सुदर्शनजी दोन्ही विधांमध्ये पारंगत होते. अनेक वर्षेपर्यंत, तृतीय वर्षाच्या संघ शिक्षावर्गांमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. ते अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुखही झाले होते. सरसंघचालक झाल्यानंतरही, ते जेव्हा संघ शिक्षावर्गाच्या मैदानावर उपस्थित राहात, तेव्हा विशिष्ट अवघड प्रयोग स्वत: करून दाखविण्याचा त्यांना संकोच नसे. नव्हे, ते त्याचा आनंदही घेत. थोड्या वेळासाठी का होईना, आपण सरसंघचालक आहोत, हे ते विसरून जात आणि एक गणशिक्षक बनून जात. जसे शारीरिक विधेत तसेच बौद्धिक विधेतही. ते अखिल भारतीय बौद्धिक प्रमुखही झाले. त्याच काळात, ‘प्रज्ञाप्रवाह’च्या क्रियाकलापांना आकार आला व शिस्तही लागली. निरनिराळ्या प्रांतांमध्ये मौलिक बौद्धिक चिंतनाचे काम निरनिराळ्या नावांनी चालत असे. आताही चालत असावे. प्रतिदिनच्या शाखेशी याचा संबंध नसे. पण, राष्ट्र, राज्य, धर्म, संस्कृती, साम्यवाद, समाजवाद, राष्ट्रवाद, इत्यादी मौलिक अवधारणांच्या संबंधात जे प्रचलित विचार आहेत, त्यांचा मूलगामी परामर्श घेऊन, या संकल्पानांचा खरा अर्थ प्रतिपादन करणे, हे या बौद्धिक क्रियाकलापांचे उद्दिष्ट असे. त्याचप्रमाणे, तात्कालिक प्रचलित विषयांचाही परामर्श या कार्यक्रमांतून घेतला जाई. ‘प्रज्ञाप्रवाह’ही या सर्वांना आश्रय देणारी, त्यांच्यावर सावली धरणारी, एक विशेष छत्री होती आणि या छत्रीचे मार्गदर्शक होते सुदर्शनजी.
सरसंघचालकाची नियुक्ती
प्रथम छत्तीसगडमध्ये, नंतर मध्य भारतात प्रांतप्रचारक या नात्याने, त्यानंतर आसाम, बंगाल या भागात क्षेत्रप्रचारक या नात्याने, अनुभवांची समृद्धी लाभलेले ते, पुढे संघाचे सहसरकार्यवाह बनले; आणि इ. स. २००० मध्ये ते सरसंघचालक या सर्वोच्च पदावर अधिष्ठित झाले.
संघाच्या घटनेप्रमाणे, सरसंघचालकांची नियुक्ती होते. ती नियुक्ती पूर्व सरसंघचालक करतात. त्या नियुक्तीच्या पूर्वी, काही ज्येष्ठ सहकार्‍यांशी ते विचारविनिमय करीत असतात. आद्य सरसंघचालक डॉ. के. ब. हेडगेवार यांनी श्री मा. स. गोळवलकर उपाख्य गुरुजी यांची नियुक्ती केली होती. डॉक्टरांचे एक जुने सहकारी श्री आप्पाजी जोशी, यांनी आपल्या एका लेखात, या संबंधी डॉक्टरांनी त्यांना विचारले होते, असे लिहिले आहे. १९३९ साली, संघाच्या कार्यपद्धतीचा पुनर्विचार करण्यासाठी, वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथे, तत्कालीन प्रमुख संघ कार्यकर्त्यांची जी बैठक झाली होती, त्यावेळी डॉक्टरांनी आप्पाजींना विचारले होते. श्रीगुरुजींनी आपला उत्तराधिकारी ठरविताना कुणाशी विचारविनिमय केला होता हे मला माहीत नाही. पण श्री बाळासाहेब देवरस यांची नियुक्ती करण्याचे पत्र त्यांनी लिहून ठेवले होते; व ते तत्कालीन महाराष्ट्र प्रांत संघचालक श्री ब. ना. भिडे यांनी वाचून दाखविले होते. माझे भाग्य हे की, त्यानंतरच्या तिन्ही सरसंघचालकांनी म्हणजे श्री बाळासाहेब देवरस, प्रो. राजेंद्रसिंह आणि श्री सुदर्शनजी यांनी या नियुक्तीच्या संदर्भात माझेही मत जाणून घेतले होते. अर्थात्, एकट्या माझे नाही. अनेकांचे. सुदर्शनजींनी तर निदान २०-२५ जणांशी परामर्श केला असावा. डॉक्टरांच्या मृत्यूनंतर गुरुजींची घोषणा झाली. गुरुजींच्या मृत्यूनंतर बाळासाहेबांच्या नियुक्तीचे पत्र वाचण्यात आले. पण नंतरच्या तिन्ही सरसंघचालकांनी आपल्या हयातीतच आपल्या उत्तराधिकार्‍याची नियुक्ती घोषित केली. १९४० पासून म्हणजे जवळजवळ पाऊणशे वर्षांपासून हा क्रम अगदी सुरळीत चालू आहे. ना कुठे वाद ना मतभेद. हेच संघाचे संघत्व आहे. याचा अर्थ विशिष्ट पदासाठी एकच व्यक्ती योग्य असते, असा करण्याचे कारण नाही. अखेरीस, कोणतीही नियुक्ती हा व्यवस्थेचाच भाग असतो. पण पदासाठी योग्यता असावीच लागते. १९७२ साली श्रीगुरुजींवर कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली असताना, एका विदेशी महिला पत्रकाराने, मला विचारले होते (त्यावेळी मी तरुण भारताचा मुख्य संपादक होतो) Who after Golwalkar? मी म्हणालो, असे अर्धा डझन तरी लोक असतील! तिला आश्‍चर्य वाटले. ती म्हणाली, ‘‘आम्हाला ती नावे माहीत नाहीत.’’ मी म्हणालो, ‘‘तुम्हाला माहीत असण्याचे कारण नाही. आम्हाला माहीत आहेत.’’
निर्मळ व निर्भय
सन २००० मध्ये तत्कालीन सरसंघचालक प्रो. राजेंद्रसिंहजी यांनी सुदर्शनजींची सरसंघचालकपदी नियुक्ती केली. नऊ वर्षे ते त्या पदावर राहिले; आणि आपल्या हयातीतच तो पदभार श्री मोहनजी भागवत यांच्यावर सोपवून ते मोकळे झाले. सुदर्शनजी स्वभावाने निर्मळ होते. थोडे भोळे म्हटले तरी चालेल. आपल्या मनात जे आहे, ते प्रकट करण्याचा त्यांना संकोच नव्हता. जणू काही त्यांचे अंत:करण तळहातावर ठेवल्यासारखे सर्वांसाठी खुले होते. कुणाच्याही सांगण्याने ते प्रभावित होत असत. काही प्रसारमाध्यमे याचा गैरफायदाही घेत असत. पण त्याची त्यांना पर्वा नसे. ते जसे निर्मळ होते, तसेच निर्भयही होते. कुणाशीही चर्चा करण्याची त्यांची तयारी असे; आणि मानापमानाचाही ते विचार करीत नसत.
अल्पसंख्य आयोगापुढे
एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. २००१ मध्ये संघाने एक व्यापक जनसंपर्काचे अभियान निश्‍चित केले होते. मी त्यावेळी दिल्लीत संघाचा प्रवक्ता होतो. काही लोकांशी दिल्लीच्या संघ कार्यकर्त्यांनी माझ्या भेटी ठरविल्या होत्या. त्यात, सध्याचे प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंग, दक्षता आयुक्त एल. विठ्ठल, मुख्य निवडणूक आयुक्त एम. एस. गिल, नावाजलेल्या पत्रकार तवलीनसिंग, आऊटलुकचे संपादक, (बहुधा विनोद मेहता हे त्यांचे नाव असावे) आणि अल्पसंख्य आयोगाचे उपाध्यक्ष सरदार तरलोचनसिंग (त्रिलोचनसिंग) यांच्या भेटी मला आठवतात. एक गिलसाहेब सोडले, तर बाकी सर्व भेटी, त्या त्या व्यक्तींच्या कार्यालयात न होता, घरी झाल्या होत्या. तरलोचनसिंगांनी शीख आणि हिंदू यांच्या संबंधात खोदून खोदून मला विचारले. माझ्याबरोबर बहुतेक सर्व ठिकाणी त्यावेळचे दिल्ली प्रांताचे संघचालक श्री सत्यनारायण बंसल असत. माझ्या बोलण्याने तरलोचनसिंगांचे समाधान झाले असावे, असे दिसले. ते म्हणाले, ‘‘हे जे तुम्ही माझ्या घरात बोलत आहात, ते अल्पसंख्य आयोगापुढे बोलाल काय?’’ मी म्हणालो, ‘‘आमची हरकत नाही.’’ त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला वेळ दिली. आम्हीही इंग्रजी भाषेत एक लेखी निवेदन तयार केले व ते आयोगाला दिले. काही प्रश्‍नोत्तरे झाली. बाहेर पत्रकारांचा तांडा उभा होता. त्यांनीही आडवेतिडवे प्रश्‍न विचारायला सुरवात केली. तरलोचनसिंग म्हणाले, ‘‘यांच्या निवेदनाने माझे समाधान झाले आहे. तुम्ही का उगाच अकांडतांडव करता?’’
कॅथॉलिकांशी संवाद
या अल्पसंख्य आयोगात जॉन जोसेफ (की जोसेफ जॉन) या नावाचे ख्रिस्ती सदस्य होते. ते केरळीय होते. ते म्हणाले, ‘‘तुम्ही ख्रिस्ती धर्मगुरूंशी बोलाल काय?’’ मी होकार दिला. त्यांनी या बाबीचा पाठपुरावा केला. ते संघाच्या झंडेवाला कार्यालयात मला दोनदा भेटायला आले. त्याप्रमाणे रोमन कॅथॉलिक चर्चच्या प्रमुखांशी बोलण्याचे निश्‍चित झाले. त्यांच्या दोन अटी होत्या. (१) त्यांच्याबरोबर प्रॉटेस्टंट ख्रिश्‍चन असणार नाहीत (२) आणि त्यांचे बिशप, प्रवक्त्याशी वगैरे बोलणार नाही. संघाच्या सर्वोच्च नेत्यांशीच बोलतील. मी सुदर्शनजींशी संपर्क साधला. ते तयार झाले. दोघांच्या सोयीने दिनांक व वेळ ठरली. अन् बैठकीला दोन-तीन दिवस उरले असताना चर्चकडून निरोप आला की, संघाच्या अधिकार्‍याला आमच्या चर्चमध्येच चर्चेसाठी यावे लागेल. चर्च नाही, संघाचे कार्यालयही नाही, अशा तटस्थ ठिकाणी भेट व्हावी, असे जॉन जोसेफ यांच्याशी बोलण्यात ठरले होते. मला कॅथॉलिक चर्चच्या या अटीचा राग आला आणि मी म्हणालो, बैठक रद्द झाली असे समजा. सुदर्शनजी केरळमध्ये प्रवासावर होते. दुसरे दिवशी दिल्लीला यावयाचे होते. मी त्यांच्या कानावर झालेला प्रसंग सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘जाऊ की आपण त्यांच्या चर्चमध्ये!’’ मीच चकित झालो. लगेच मी जॉन जोसेफ यांना सांगितले. त्याप्रमाणे सुदर्शनजी, मी आणि महाराष्ट्र प्रांताचे तत्कालीन कार्यवाह डॉ. श्रीपती शास्त्री असे आम्ही तिघे कॅथॉलिक चर्चमध्ये गेलो. आमचे चांगले औपचारिक स्वागत झाले. तेथे झालेल्या चर्चेसंबंधी येथे सांगणे अप्रस्तुत आहे. तो वेगळा विषय आहे. सुदर्शनजी चर्चेला भीत नसत, हे मला येथे अधोरेखित करावयाचे आहे.
नंतर प्रॉटेस्टंट पंथीय धर्मगुरूंशी बैठक झाली. ती नागपुरातील संघ कार्यालयात, डॉ. हेडगेवार भवनामध्ये झाली. प्रॉटेस्टंटांच्या चार-पाच उपपंथांचीच नावे मला माहीत होती. पण या बैठकीला २७ उपपंथांचे २९ प्रतिनिधी आले होते. दीड तास त्यांच्याशी खेळीमेळीत चर्चा झाली. सर्वांनी संघ कार्यालयात भोजनही केले.
मुस्लिम राष्ट्रीय मंच
मुसलमानांशीही त्यांचे अनेकदा बोलणे झाल्याचे माझ्या कानावर होते. पण त्या बोलण्यात मी त्यांच्याबरोबर नव्हतो. या संपर्कातूनच ‘मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या’ स्थापनेचा जन्म झाला. या मंचाच्या संघटनेचे श्रेय संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जम्मू-काश्मीर प्रांताचे माजी प्रांतप्रचारक आणि विद्यमान संघाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य इंद्रेशकुमार यांचे आहे. पण सुदर्शनजी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. ‘मुस्लिम राष्ट्रीय मंचाची’ जेवढी म्हणून अखिल भारतीय शिबिरे किंवा अभ्यासवर्ग आयोजित असत, त्यांना सुदर्शनजी आवर्जून उपस्थित राहात. मुसलमानांना त्यांचे सांगणे असे की, ‘‘तुम्ही बाहेरून हिंदुस्थानात आलेले नाहीत. इथलेच आहात. तुमची उपासनापद्धती तेवढी वेगळी आहे. तुमचे पूर्वज हिंदूच आहेत. त्यांचा अभिमान बाळगा. या देशाला मातृभूमी माना. हिंदूंप्रमाणे आपणही येथील राष्ट्रीय जीवनाचे अभिन्न घटक आहोत, असे तुम्हाला वाटू लागेल.’’ या मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमांमुळे मुसलमानांच्या मध्येही हिंमत आली. देवबंदच्या पीठाने ‘वंदे मातरम्’ न म्हणण्याचा फतवा काढला, तर या मंचाने अनेक ठिकाणी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले. सर्व प्रकारचे धोके पत्करून जम्मू-काश्मीरच्या राजधानीत श्रीनगरमध्ये मंचाने तिरंगा फडकविला आणि वंदे मातरम्चे गायन केले. एवढेच नव्हे, तर १० लाख मुसलमानांच्या सह्यांचे एक निवेदन राष्ट्रपतींना सादर करून संपूर्ण देशात गोहत्याबंदी व्हावी अशी मागणी केली. अलीकडेच म्हणजे गेल्या जून महिन्यात राजस्थानातील पुष्कर या तीर्थक्षेत्री या मुस्लिम मंचाचे तीन दिवसांचे राष्ट्रीय शिबिर संपन्न झाले होते. सुदर्शनजी त्या शिबिरात उपस्थित होते. सुदर्शनजींना, त्यांच्या मृत्यूनंतर जे अनेक मुस्लिम नेते श्रद्धांजली अर्पण करायला आले होते, त्याचे हे कारण आहे.
तृतीय सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांनी काही नव्या चांगल्या प्रथा संघात पाडल्या. त्यातली एक म्हणजे रेशीमबागेला सरसंघचालकांची स्मशानभूमी बनू दिले नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर- म्हणजे आम जनतेसाठी असलेल्या घाटावर, झाला होता. सुदर्शनजींचाही अंत्यसंस्कार तेथेच झाला. तो दिवस होता रविवार १६ सप्टेंबर २०१२. एक संघसमर्पित जीवन त्या दिवशी संपले. खरेच ते संपले म्हणावयाचे? नाही. फक्त शरीर संपले. ते अग्नीने भस्मसात् केले. पण असंख्य आठवणी व प्रेरणाप्रसंग कायम ठेवून.
श्री सुदर्शनजींच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली.

0 comments:

Post a Comment