कार्यकर्ता कसा असतो? काय करू शकतो?

नरेंद्र मोदी हे नाव ऐकले, मग आपल्याला फ़क्त दंगल, जाळपोळ, रक्तपात, हिंसाचार, मुस्लिमांची कत्तल, धर्मांधता एवढ्याच गोष्टी आठवतात. कारण गेल्या दहा वर्षात आपल्या समोर मोदी यांचे असेच चित्र माध्यमातून रंगवण्यात आलेले आहे. हा कुणीतरी माथेफ़िरू हिंदू सत्ताधीश आहे आणि त्याने दंगली माजवून गुजरात या राज्यात रक्ताचे पाट वाहिले, महात्मा गांधींचे रामराज्य पार उद्ध्वस्त करून टाकले, असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. पण मोदी म्हणजे फ़क्त दंगल व रक्तपातच आहे काय? या माणसाची दुसरी ओळख काहीच नाही काय? दंगल फ़क्त गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असतानाच झाली काय? तत्पुर्वी देशात कुठेच दंगली झाल्या नव्हत्या काय? आणि झाल्या असतील तर एकट्या मोदीच्याच नावावर दंगलीचे खापर फ़ोडण्याचे कारण काय? त्याचा सैतानी चेहरा सतत लोकांसमोर आणतानाच, त्याचा दुसरा उत्कृष्ठ कार्यकर्ता हा चेहरा लपवण्याचा तर त्यामागे दुष्ट हेतू नसावा काय? कोण आहे हा नरेंद्र मोदी?

2001 सालात त्याला भाजपाने गुजरातचा मुख्यमंत्री बनवले. त्याआधी तब्बल तीस वर्षे, त्याने त्या पक्षात राहून कसलीही अपेक्षा न बाळगता काम केले. कधी त्याने कुठली उमेदवारी मागितली नाही, की निवडणूक लढवली नाही. मिळेल ते पद स्वीकारून पक्षाचे काम केले. जेव्हा मुख्यमंत्री झाला, त्यानंतरच आयुष्यात पहिली निवडणूक लढवली. जेव्हा सत्ता मिळाली आणि ती राबवण्याचा अधिकार हाती आला, तेव्हा त्याच माणसाने जनतेची सत्ता जनतेच्या हितासाठी किती काटेकोर वापरली जाऊ शकते, याचा अपुर्व धडा निर्माण करून ठेवला आहे. एका बाजूला पक्षातील सत्तालंपटांनी केलेली अडवणूक, दुसरीकडे विरोधकांचे डावपेच, तिसरीकडे माध्यमांनी त्यांची बदनामी करण्याची मोहिमच चालवली. पण खरा कार्यकर्त्याचा पिंड असल्याने मोदी सर्वांना पुरून उरले. त्यांनी गुजरात दहा वर्षात देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवून दाखवले. कुठल्याही राज्यातला मुख्यमंत्री, मंत्री सतत अडचणींचा पाढा वाचत असतो. पण मोदी यांनी जी सत्ता, अधिकार व साधने हाताशी होती; त्यांचा चतुराईने वापर करून विकासाचा नवा आदर्श देशासमोर मांडला. त्यामुळेच त्यांची बदनामी करणार्‍यांना आता त्याच मोदीच्या यशस्वी विकासाचा अनिच्छेने का होईना पाढा वाचावा लागतो आहे.

पहिली गोष्ट म्हणजे मोदी यांनी पक्ष, आमदार किंवा आणखी कोणापेक्षा सामान्य जनतेच्या विश्वासाला प्राधान्य दिले. तिच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले. विकासातून ज्या जनतेच्या आकांक्षा पुर्ण करायच्या असतात, तिलाच विकासकामात सहभागी करून घेतले. स्वत: दिर्घकाळ सत्तेपासून दुर राहून काम केलेले असल्याने, त्यांना इच्छाशक्तीची ताकद चांगलीच ठाऊक होती. मग त्यांनी प्रथम विकासाचे स्वप्न जनतेला दाखवून, त्यासाठी तिच्यात कार्यासक्ती उत्पन्न केली. विकास ही कोणी कोणाला घातलेली भिक नसते. ते कोणी कोणावर करायचे उपकार नसतात. ज्यांचा विकास, प्रगती करायची असते, त्यांचा आधी अशा कल्पनेवर विश्वास असायला हवा. त्यात त्यांचाच सहभाग असायला हवा. तरच अशा विकासाला गती येत असते. ती सफ़ल होऊ शकत असते. सामजिक पुरूषार्थ त्यात महत्वाची कामगिरी बजावत असतो. ज्यांनी थेट नेतागिरी केली व जनतेच्या भावनाच जाणून घेतल्या नाहीत, त्यांना हे कधीच कळू शकत नाही. मग ते प्रेषित, उद्धारकर्ता होऊन जनतेसमोर येत असतात. पण ते जनतेला सोबत घेऊन काम करू शकत नाहीत. तिला सहभागी करून घेऊ शकत नाही. पर्यायाने विकास ही सरकारी योजना होते आणि जनता त्यापासून अलिप्त रहाते.

मोदी हा मुळातच कार्यकर्ता असल्याने, त्यानी थेट जनतेला सरकारी विकासात सामावून घेण्याची पावले उचलली. प्रशासनाला त्या पद्धतीने काम करायला भाग पाडले. योजना, विकासाचे प्रकल्प हे सरकारच्या समाधानासाठी, नेत्याच्या महत्वाकांक्षेसाठी नसतात, तर जनतेच्या गरजा पुर्ण करण्यासाठी व तिच्या समस्या सोडवण्यासाठी असतात. म्हणुनच प्रत्येक पातळीवर त्याच जनतेला सोबत घेणे व विश्वासात घेणे अगत्याचे असते. त्याचे दुहेरी फ़ायदे असतात. एक म्हणजे त्यातून योजनेचा लोकांना कुठला त्रास होऊ शकतो, त्याची पुर्वकल्पना येते आणि त्यांचा विरोध होण्याआधीच त्यांच्या तक्रारी दुर केल्या जाऊ शकतात. दुसरीकडे अशा सहभागामुळे लोकाचे सहकार्य योजनेला वेग आणू शकते. ती योजना त्यांची व त्यांच्याच भल्यासाठी असल्याची खात्री असल्याने, सामंजस्याने काम सुरू होते व चालते. त्यात म्हणुनच मोदी यांनी स्थानिक कार्यकर्त्याला सामावून घेण्यात पुढाकार घेतला. कसलाही प्रशासकिय अनुभव गाठीशी नसताना मोदी जे काम अवघ्या दहा वर्षात जे करू शकले, तेच प्रदिर्घ प्रशासकिय अनुभव पाठीशी असताना, शरद पवार महाराष्ट्रात वीस पंचवीस वर्षात का करू शकले नाहीत, याचे उत्तर कार्यकर्ता या एकाच शब्दात सामावले आहे. पवार आरंभी काही काळ कार्यकर्ता होते. पण त्यांना कोवळ्य़ा वयात नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यावर आपले कार्यकर्तापण ते साफ़ विसरून गेले. सत्तेवर मांड ठोकण्याच्या नादात ते सत्तेचे गुलाम बनून गेले. ज्या जनतेचे प्रतिनिधीत्व करत होते, तिला विसरून सत्ता व प्रशासनावर विसंबून कारभार करत गेले. आपण लोकांचे भवितव्य घडवतो-बिघडवतो अशा मस्तीत वागू लागले. त्यांनीच स्वत:मधला कार्यकर्ता मारून टाकला. उलट मोदी यांनी सर्वंकष सत्ता हातात आल्यावर देखील स्वत:मधला कार्यकर्ता जीवापाड जपला जोपासला आहे. तिथेच सगळा फ़रक पडतो. सत्तेने पवारांचे कर्तृत्व झाकोळून टाकले तर सत्तेने मोदीमधल्या कार्यकर्त्याला नवी झळाळी आणली.

पवार दिर्घकाळ देशाच्या पंतप्रधान पदावर डोळा ठेऊन आहेत. त्यासाठी अनेक राजकीय कसरती करत आहेत. पण महाराष्ट्रात देखील त्यांना आपली निर्विवाद नेतृत्व, लोकप्रियता प्रस्थापित करणे शक्य झाले नाही. राज्याबाहेर त्यांना आपला प्रभाव पाडता आलेला नाही. उलट एकाच राज्यात यशस्वी काम करताना आणि देशभर बदनामीच्या मोहिमा राबवल्या जात असताना, मोदी यांनी आपल्या कर्तृत्व व कामाच्या भांडवलावर, देशात स्वत:ची लोकप्रियता संपादन केली आहे. उद्योगपतींच्या मागे धावताना पवार आपला लोकनेता हा चेहरा गमावून बसले. तर लोकांच्या मागे धावताना मोदी यांनी लोकनेता बनून उद्योगपतींचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. मुकेश अंबानी, रतन टाटा यांच्यासारखे नामवंत मोदींचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवू लागले आहेत. ही किमया मोदी नावाच्या नेत्याची, मुख्यमंत्र्याची नसून, त्याने उरात जपलेल्या कार्यकर्त्याची आहे. फ़रक समजून घेण्यासारखा आहे. आपल्यातला कार्यकर्ता पवारांनी मारून टाकल्यामुळे आज त्यांना निवडुन येणारे उमेदवार शोधावे लागतात. उलट मोदींची कहाणी आहे. जे मोदींसोबत असतात ते निवडून येणार हे ठाऊक असल्याने, ज्यांना निवडून यायचे आहे, त्यांना मोदींच्या सोबत रहावे लागते.

सांगायचा मुद्दा इतकाच, की जिथे कार्यकर्ता संस्कृती प्रभावी आहे, तिथे विकास होतो आहे व भ्रष्टाचाराची प्रकरणे वेसण घातल्यासारखी मर्यादेत राहिली आहेत. जनजीवन सुसह्य झालेले आहे. सेक्युलॅरिझम, जातियवाद असल्या गोष्टीचे पाखंड त्यावर कुरघोडी करू शकलेले नाही. नितीशकुमार यांना भाजपाची सोबत केल्याने निवडणुका जिंकण्यात अडचण आली नाही. मोदींवर दंगलीचे आरोप असूनही त्यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घेताना कोणाला अपराधी भावनेने पछाडलेले नाही. जरात विकासाच्या मार्गावर धोडदौड करतो आहे. आणि नेमकी उलट स्थिती इतर राज्यात आहे, तिथे कार्यकर्ता संस्कृतीचा र्‍हास झाला आहे. महाराष्ट्रासारखे दिर्घकाळ प्रगत असलेले राज्य, कार्यकर्ता प्रभावहीन झाल्यामुळे व दलाल, ठेकेदारांचे साम्राज्य पसरल्याने रसातळाला चाललेले आहे. हे आजचे दाखले आहेत. म्हणुनच पुन्हा कार्यकर्ता संस्कृतीची जोपासना आवश्यक झाली आहे. फ़क्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातच नव्याने कार्यकर्ता घडवण्याची गरज निर्माण झाली आहे. आपले दुर्दैव असे की कार्यकर्त्याची व्याख्या आज सैतानाकडून समजून घेण्याची वेळ आपल्यावर आली आहे. कसा असतो कार्यकर्ता? तो कसा बिघडवला जाऊ शकतो?

0 comments:

Post a Comment