छाया गेली, शीतलता राहिली

• रमेश पतंगे
‘मेरा मुझ में कुछ नही, जो कुछ है सब तेरा|
तेरा तुझको सोप दे, क्या लागे है मेरा|’
अशी मनोवृत्ती बनवावी लागते. खरं म्हणजे बनवावी लागते हे म्हणणेही बरोबर नाही. सरसंघचालक हे या भावनेचे मूर्तिमंत रूप असते. सुदर्शनजी असे होते. ते समष्टिरूप झाले होते. म्हणूनच त्यांच्या वागण्या-बोलण्या-चालण्यात-रोजच्या व्यवहारात अगदी सहजता असे. त्यांची भेट घेत असताना आदरयुक्त  भीती असे. परंतु, त्यांच्यापासून दूर जावे असे कुणाला वाटत नसे. खर्‍या अर्थाने ते आधारवड होते. सर्वांवर शीतल छाया धरणारे होते. ही छाया आता गेली आहे. परंतु, शीतलता मात्र तशीच कायम राहणार आहे. अशा प्रज्ञाचक्षू सुदर्शनजींना ही आदरांजली...


सुदर्शनजी गेल्याची बातमी शनिवारी सकाळी समजली आणि मन सुन्न झाले. डोक्यावरील कृपाछत्र गेल्याची तीव्रपणे जाणीव झाली. एकामागोमाग एक प्रसंग डोळ्यापुढे उभे राहू लागले. संघाची ऐकीव आणि पुरोगामी माहिती असणार्‍या मंडळींना संघातील सरसंघचालक पद हे गूढ वलय असलेले पद वाटते. प्रत्येक जण आपापल्या कल्पना रंगवून त्याचे वर्णन करतो. कुणी सरसंघचालकांना संघाचे गुरू म्हणतात, तर दुसरा कुणी त्यांना संघपरिवारातील महान शक्तिमान व्यक्ती म्हणतात. त्यांच्या आदेशाशिवाय संघ आणि संघसंस्थाजीवनाचे पान हालत नाही, असा एक गोडसमज अनेकांचा असतो. काही लोकांना तर सरसंघचालक म्हणजे संघाचे हुकूमशहा वाटतात. मा. सुदर्शनजी २००९ पर्यंत सरसंघचालक होते. ते कसे होते? म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते?
‘सा. विवेक’तर्फे आम्ही ‘अमृतपथ’ या नावाचा, महाराष्ट्रातील संघकार्याचा इतिहास मांडणारा एक ग्रंथ तयार केला. अशा प्रकारचे काम हे पहिल्यांदा होत होते. संघाची पद्धती, प्रसिद्धीच्या झोतात न राहण्याची आहे. त्यामुळे कार्यकर्ते आपल्या कामाचा डांगोरा पिटत नाहीत. परंतु, आपल्या मागच्या पिढीने कोणत्या परिस्थितीत संघकाम केले? त्यांच्या पुढील आव्हाने कोणती होती? हे नव्या पिढीला समजणे फार आवश्यक आहे. म्हणून ‘अमृतपथ’ ग्रंथ करण्याचे काम विवेकने हातात घेतले.
ग्रंथाचे प्रकाशन मा. सुदर्शनजींच्या हातून व्हावे असे ठरले. तेव्हाचे संघाचे प्रांतप्रचारक मुकुंदराव पणशीकर यांना तसे मी सांगितले. त्यांचे सुदर्शनजींशी बोलणे झाले. परंतु, काहीतरी समजुतीत घोटाळा झाला आणि सुदर्शनजी येणार नाहीत, असा निरोप आमच्याकडे आला. त्यानंतर मी तेव्हाचे सरकार्यवाह मोहनजी भागवत यांच्याशी बोललो आणि त्यांची तारीख नक्की केली. तशा पत्रिका छापल्या आणि एके दिवशी विमल केडिया यांचा मला फोन आला. ते म्हणाले, ‘‘मी आजच दिल्लीहून आलो आहे आणि मा. सुदर्शनजी म्हणत होते की, ‘अमृतपथ’ ग्रंथ प्रकाशनासाठी मी मुंबईला येणार आहे.’’ विमलजींचे बोलणे ऐकून मी हादरलोच. मोठी गडबड झाल्याचे माझ्या लक्षात आले. मी सुदर्शनजींना फोन केला तेव्हा ते दिल्लीच्या संघकार्यालयात होते. (सरसंघचालकांशी थेट दूरध्वनीवरून संवाद करता येतो.) त्यांना सर्व परिस्थिती सांगितली आणि काहीतरी घोटाळा झाल्याचे त्यांना सांगितले. ते हसले आणि म्हणाले, ‘‘अरे! चिंता करू नकोस, कार्यक्रमात बदल करू नकोस. मोहनजी येत आहेत ना? मग त्यांच्याच हस्ते प्रकाशन करून घे.’’ आणि हा विषय संपला. कसली खळखळ नाही, रागावणे नाही, नियोजन नीट करता येत नाही का? असले बोल नाहीत. असे होते सुदर्शनजी.
त्यांची माझी शेवटची भेट ऑगस्ट महिन्यात बंगळूरला झाली. मी बंगळूरला जाण्यापूर्वीच दोन दिवस अगोदर ‘सुदर्शनजी गायब झाले आहेत,’ अशा ब्रेकिंग न्यूज सकाळच्या वार्तापत्रात झळकत होत्या. दोन तासांनंतर समजले की, त्यांचे अपहरण झाले नसून, सकाळी फिरायला गेले असता ते वाट चुकले आणि खूप थकून एका घरात विश्रांती घेत होते. बंगळूरच्या संघकार्यालयात त्यांची माझी भेट झाली. नेहमीच्या आपुलकीने त्यांनी विचारले- ‘‘कधी आलास? कोणता कार्यक्रम होता?’’ माझ्या येण्याचे प्रयोजन मी त्यांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘कृष्णप्पा आजारी आहेत. (संघाचे ज्येष्ठ प्रचारक) त्यांना भेटून ये.’’ कृष्णप्पांशी गप्पा मारत असताना निरोप आला, सुदर्शनजी जेवायला थांबले आहेत. जेवायला बोलावले आहे.
त्यांच्या शेजारीच माझे पान मांडले होते. त्यांच्याबरोबर जेवण्याचा हा शेवटचा प्रसंग असेल, असे तेव्हा मला वाटले नाही. पानात सर्व तांदळाचे पदार्थ होते. सुदर्शनजी म्हणाले, ‘‘अरे, त्याला पोळी, पुरी वाढा. तो काय भातखाऊ नाही.’’ सरसंघचालक घरातील वडीलधार्‍या माणसाप्रमाणे असतात. सर्वांची सहजपणे काळजी घेतात. आल्यागेल्याची वास्तपुस्त करतात. त्यांच्या गरजांकडे लक्ष देतात. म्हणून कार्यकर्त्यांना सरसंघचालक कधीही महान नेते, त्यांच्याविषयी भीती वाटावी असे वाटत नाहीत. ते श्रद्धेचे स्थान असते. आपुलकीचे स्थान असते.
सुदर्शनजी विद्वान होते. त्यांचे वाचन अफाट होते. बारीकसारीक विषयांचे संदर्भ ते गोळा करीत. विवेकच्या एका दिवाळी अंकात ‘तथागत आणि श्रीगुरुजी’ यांच्यावर मी एक लेख लिहिला होता आणि या लेखासाठी धर्मानंद कोसंबी यांचे समाधिपाद हे पुस्तक संदर्भासाठी घेतले होते. लेखात त्यांचा उल्लेख आहे. सुदर्शनजींनी लेख वाचला. त्यांना तो खूप आवडला आणि लगेच त्यांनी समाधिपाद हे पुस्तक मागवून त्याचे वाचन करून  टाकले. वेगवेगळ्या राष्ट्रीय समस्यांवरील त्यांचे बौद्धिक वर्ग म्हणजे समस्या जाणून घेण्याच्या ज्ञानाचा खजिना असे. पंजाबची समस्या, आसामची समस्या, मिशनर्‍यांचे प्रश्‍न अशा बहुविध विषयांवरील त्यांचे बौद्धिक वर्ग एक एक समस्या मुळापासून उलगडून दाखविणार्‍या असत. तसे ते ज्ञानसागर होते.
ज्ञानामुळे व्यक्ती अहंकारी होते. श्रेष्ठ बौद्धिक क्षमतेमुळेदेखील अहंकार आणखी वाढतो. आपला जन्म दुसर्‍याला ज्ञान देण्यासाठीच झाला आहे, कुणाचे ऐकण्यासारखे काही नाही, अशी विद्वान माणसांची धारणा होते. यांचे अनुभव मी भरपूर घेतले आहेत. परंतु, सुदर्शनजी त्याला अपवाद होते. ‘फळभाराने वृक्ष वाकतो, म्हणजे नम्र होतो.’ म्हणून तुकोबाराय म्हणाले की, ‘नम्र झाला भूतां, त्याने कोंडिले अनंता|’ सुदर्शनजींची नम्रता थक्क करणारी आहे.
पुण्याला दामूअण्णा दाते यांच्या ‘स्मरणशिल्पे’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. मा.  सुदर्शनजींच्या हस्ते प्रकाशन होते. पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात होता. पहिल्या रांगेत माजी सरसंघचालक रज्जुभय्या बसले होते. सुदर्शनजी मला म्हणाले, ‘‘पुस्तकाची पहिली प्रत रज्जुभय्यांना नेऊन दे.’’ मी तसे केले. याच कार्यक्रमात त्यांनी एक विषय मांडला की, ज्येष्ठ संघस्वयंसेवकांनी आपल्या आठवणी लिहाव्यात. भावी पिढीसाठी त्या आवश्यक आहेत आणि भाषणाच्या ओघात त्यांनी  ‘मी, मनु आणि संघ’ या पुस्तकाच्या संदर्भातला करुणानिधींचा किस्सा सांगितला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांना भाजपाचे तेथील कार्यकर्ते गोपालन यांनी पुस्तकाची तामीळ प्रत दिली. करुणानिधींनी ते पुस्तक वाचून काढले. पुन्हा भेट झाली असता गोपालन यांनी करुणानिधींना  विचारले, ‘‘तुम्हाला ‘मी, मनु आणि संघ’ पुस्तक कसे वाटले?’’ करुणानिधी म्हणाले, ‘‘या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे संघ जर आहे, तर संघावर टीका करण्यात आयुष्याची चाळीस वर्षे आम्ही वाया घालविली, असे म्हणावे लागेल.’’ असे कौतुक करायला मनाचा फार मोठेपणा लागतो. खरं म्हणजे आमच्यासारखे कार्यकर्ते सुदर्शनजींसारख्यांच्या जीवनातून संघ समजून घेत असतात. असे म्हणतात की, एखाद्या मोठ्या वृक्षाखाली अन्य झाडं वाढू शकत नाहीत, परंतु सुदर्शनजी असे वृक्ष होते की, ज्यांच्या शीतल छायेखाली सामान्य कुवतीचे कार्यकर्तेही मोठे होत गेले.
मनाची निर्मळता हा सुदर्शनजींच्या व्यक्तिमत्त्वाचा विलोभनीय पैलू होता. त्यांचे मन गंगाजलासारखे निर्मळ आणि पवित्र होते. त्यात एक बालसदृश निर्मळता होती. लहान मूल जसे सदा आनंदी, सदा प्रसन्न असते, तशी प्रसन्नता सुदर्शनजींकडे होती. दोन वर्षांपूर्वी भोपाळच्या संघकार्यालयात मी त्यांना भेटायला गेलो. त्यांच्याबरोबर जेवण झाले आणि नंतर ते  मला घेऊन बसले. ऊर्जेचे विविध स्रोत या विषयाच्या त्यांनी काही फाइल्स तयार केल्या होत्या. त्या मला दाखवीत बसले. पर्यायी ऊर्जा मिळविण्याचे कुठे कुठे कसे प्रयत्न चालू आहेत, त्याची माहिती त्यांनी मला दिली. ती सर्वच माहिती मला खूप नवीन होती. आपले  ज्ञान प्रकट करण्यासाठी सुदर्शनजी हे मला सांगत नव्हते, तर ऊर्जेचे संकट कसे दूर करता येईल, हा त्यांच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होता.
अगदी छोट्याशा जागेतदेखील (जमिनीत) भाजीपाल्याचे भरपूर उत्पादन कसे घेता येईल, त्यासाठी प्लांटिंग कसे करावे, जैविक खते कोणती वापरावी, गोविज्ञानाचा उपयोग कसा करावा याची सचित्र माहिती त्यांनी मला दिली. ती ऐकून  मी अचंबित झालोच, पण आणखी अचंबित करणारी गोष्ट मला पाहायची होती. सुदर्शनजी मला कार्यालयाच्या गच्चीवर घेऊन गेले. या गच्चीवर कारली, दुधी, पालक, वांगी अशा विविध भाज्यांची लागवड केलेली होती आणि सुदर्शनजी मोठ्या अभिमानाने सांगत होते की, गेले सहा महिने आम्ही याच भाज्या खात आहेत. एका विश्‍वव्यापी संघटनेचे प्रमुख राहिलेले सुदर्शनजी, मर्यादित जागेत भाजीपाल्याची लागवड कशी करावी, स्वयंपूर्ण कसे व्हावे, ऊर्जा कशी निर्माण करावी, याचे व्यावहारिक प्रात्यक्षिक मला दाखवीत होते. वेगळ्या भाषेत हिंदू राष्ट्र म्हणजे काय आणि त्याच्या किती अंगांचा आपण विचार केला पाहिजे, हे न बोलता, कोणतेही भाषण न देता ते करून दाखवीत होते. सगळ्या वागण्या-बोलण्यामध्ये निर्व्याज सहजता होती. आपुलकी होती.
चार-पाच वर्षांपूर्वी राष्ट्रजीवनातील विविध विषयांच्या अभ्यासबैठकांची सत्रे सुरू होती. समरसता या विषयाची अशीच महत्त्वपूर्ण बैठक नागपुरात होती. चिंतनासाठी मोजकेच कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. एका सत्रात समरसता या विषयावरील बीजभाषण मला करायचे होते. भाषण मी लिहून काढले होते. त्यातील एक मुद्दा असा होता की, राष्ट्रीय स्तरावर सामाजिक क्षेत्रात अनेक कळीचे विषय निर्माण होतात. संघाची भूमिका अशा वेळी स्पष्ट असावी लागते. ही भूमिका सरसंघचालक किंवा सरकार्यवाह यांनी  मांडणे आवश्यक असते. माझ्यापुढे प्रश्‍न होता की, सुदर्शनजींच्या उपस्थितीत हा विषय मांडावा की मांडू नये? ते काय म्हणतील? मी श्रीपती शास्त्रींना माझी अडचण सांगितली. ते म्हणाले, ‘‘ही बैठक मोकळेपणाने विचार मांडण्यासाठी आहे. तेव्हा तू जरूर विचार            
मांड.’’ मी टिपणातील विषय मांडला. सुदर्शनजी मला नंतर खाजगीत असे म्हणाले नाहीत की, ‘‘काय रे तू सरसंघचालकांनादेखील अक्कल शिकवितोस का?’’ त्यानंतर  महू येथे  पू. डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमात त्यांचे, बाबासाहेबांवर अप्रतिम भाषण झाले आणि त्यात त्यांनी अनेक सामाजिक प्रश्‍नांचा ऊहापोह केला. योग्य व्यासपीठावर योग्य वेळी त्यांनी आपले विचार मांडले.
सरसंघचालक संघाचे सर्वोच्च प्रमुख असतात. याचा अर्थ ते मन मानेल तसा संघ चालवू शकत नाहीत. ते संघमनाचे प्रतिनिधित्व करतात आणि संघमन आपल्या भाषणातून प्रकट करतात. सरसंघचालक होण्यासाठी संघमनाशी एकरूप व्हावे लागते आणि त्यासाठी स्वत:च्या अहंकाराचा संघात विलोप करावा लागतो. यालाच आत्मविलोप असे म्हणतात. ‘मेरा मुझ में कुछ नही, जो कुछ है सब तेरा| तेरा तुझको सोप दे, क्या लागे है मेरा|’ अशी मनोवृत्ती बनवावी लागते.  खरं म्हणजे बनवावी लागते हे म्हणणेही बरोबर नाही. सरसंघचालक हे या भावनेचे मूर्तिमंत रूप असते. सुदर्शनजी असे होते. ते समष्टिरूप झाले होते. म्हणूनच त्यांच्या वागण्या-बोलण्या-चालण्यात-रोजच्या व्यवहारात अगदी सहजता असे. त्यांची भेट घेत असताना आदरयुक्त  भीती असे. परंतु, त्यांच्यापासून दूर जावे असे कुणाला वाटत नसे. खर्‍या अर्थाने ते आधारवड होते. सर्वांवर शीतल छाया धरणारे होते. ही छाया आता गेली आहे. परंतु, शीतलता मात्र तशीच कायम राहणार आहे...
---------------------------
दिव्य ध्येयासाठी समर्पित
•दिलीप धारूरकर
केंद्रात आणि अनेक राज्यात हिंदुत्त्वाचा विचार मानणारा राजकीय पक्ष सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झालेला असताना आणि हिंदुत्त्वाचा विचार देशातील वैचारिक चर्चेत केंद्रस्थानी असताना ते सरसंघचालक झाले होते. अशा काळात संघटनेला जी दिशा दिली पाहिजे त्यासाठी त्यांनी सतत चिंतन आणि मार्गदर्शन केले. सत्ता हे अंतिम साध्य नसून समाजपरिवर्तन आणि देशाला परमवैभवाप्रत घेऊन जाणे हे अंतिम साध्य आहे याची जाणीव सतत सर्वांना राहील याबाबत ते सतर्क होते. वैचारिक संघर्ष हा आता महत्त्वाचा आहे असे सांगून  वैचारिक संघर्षासाठी सर्वांनी तयार असले पाहिजे असे ते सांगत असत. प्रसारमाध्यमांच्या भूमिकेची समीक्षा त्यांच्या बोलण्यातून अत्यंत प्रखरपणे आणि देशहिताचा संदर्भ देऊन सतत घडत असे. गुजरातमधील दंगलीत एका ठिकाणी आग लागली तर दिवसभर तोच तो धूर दाखवत टीव्ही वाहिन्यांनी भयावह चित्र कसे उभे केले, भारतीयत्वाचा विचार देणारे प्रसंग, घटना यांना माध्यमांनी कसे महत्त्व दिले पाहिजे हे सांगताना ते अतिशय आग्रही होत असत. 

जीवनासाठी उच्च ध्येय आणि उच्च ध्येयासाठी संपूर्ण जीवनाचे समर्पण हे कसे असते ते जगून दाखविणारे अधुनिक युगातील कर्तव्यकठोर तपस्वी म्हणजे कुपहळ्ळी सीतारामय्या सुदर्शनजी! वयाच्या नवव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचे स्वयंसेवक झाल्यानंतर हळूहळू ध्येय साकारत गेले. हा देश परमवैभवाला घेऊन जाण्याचे संघाचे ध्येय हेच आपल्या जीवनाचे ध्येय मानून त्यासाठी सर्वस्व समर्पणाचा संकल्प त्यांनी केला. १९५४ साली वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी संघासाठी सर्वस्व समर्पणाचा विचार करून संघाचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम सुरू केले. वास्तविक त्या काळात टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या तरुणांना चांगले करिअर करण्याची संधी होती. आपले भवितव्य आणि देशाचे भवितव्य हे वेगळे असूच शकत नाही असे मानून आपल्या करिअरपेक्षा राष्ट्रीय चारित्र्यनिर्मितीला प्राधान्य देण्याची आणि त्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची उत्कटता त्यांच्याकडे होती. राष्ट्रकार्याला प्राधान्य देऊन तेच जीवनाचे ध्येय ठरलेले असल्याने त्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याचा निग्रह त्यांनी केला. मग जिल्हा प्रचारक, विभाग प्रचारक अशा जबाबदार्‍या पार पाडत दहा वर्षांत ते प्रान्तप्रचारक या पदापर्यंत पोहोचले. नंतर पूर्वांचलातही क्षेत्र प्रचारक म्हणून त्यांना जबाबदारी दिली गेली. हा सगळा सुदर्शनजींचा जीवनपट सर्वांना माहिती आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता, स्वतःची विश्‍लेषणात्मक दृष्टी, प्रचंड वाचन, जबरदस्त स्मरणशक्ती, अमोघ वक्तृत्त्व अशा अनेक गुणांचा समुच्चय त्यांच्या  व्यक्तिमत्त्वात होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शारीरिक विभाग आणि बौद्धिक विभाग असे दोन विभाग शाखेच्या कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी यासाठी काम करत असतात. या दोन्ही विभागात गती असणारे स्वयंसेवक फारच दुर्मिळ असतात. सुदर्शनजी हे अशा दुर्मिळ स्वयंसेवकांपैकी होते. शारीरिक कार्यक्रमातील सर्व विषयात ते पारंगत होते आणि बौद्धिक विषयातही त्यांची मोठी तयारी आणि व्यासंग होता. त्यामुळे संघाच्या इतिहासात अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख आणि अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख अशा दोन्ही पदांवर राहिलेले आणि सक्षमपणे दोन्ही जबाबदार्‍या पार पाडणारे ते एकमेव कार्यकर्ते होते. त्यानंतर सहसरकार्यवाह झाले आणि रज्जूभैय्या यांनी आपल्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्यानंतर सरसंघचालकपदाची जबाबदारी सुदर्शनजी यांच्याकडे सोपविली.
सुदर्शनजी यांचे व्यक्तिमत्त्व एखाद्या तपस्वीसारखे होते. त्यांच्या असंख्य आठवणी आज मनात दाटल्या आहेत. ते जेव्हा अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते तेव्हा मी एका जिल्ह्याचा बौद्धिक प्रमुख होतो. जिल्हा बौद्धिक प्रमुखांची मुंबईत बैठक होती. संघात बौद्धिक कार्यक्रम म्हणजे शाखेतील पद्य, बोधकथा, सुविचार, सुभाषित, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे बौद्धिक वर्ग इतकेच असे आमचा समज होता.  या बैठकीत सुदर्शनजी यांचे सत्र झाले. त्यांनी संघाच्या शाखेत स्वयंसेवकांची संख्या कशी वाढेल हे सांगताना आठवी, नववी, दहावी या वर्गातील वयोगट असलेल्या मुलांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि या वयोगटातील स्वयंसेवकांसाठी त्यांना आकर्षित करतील, त्यांच्या भावविश्‍वाला आवाहन करतील असे कार्यक्रम आयोजित करावेत असे सांगितले. या प्रकारचे कार्यक्रम कसे असावेत याची दहापेक्षा अधिक उदाहरणे अगदी बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात तशा गतीने त्यांनी सांगितली. अखंड भारताचा नकाशा मैदानावर आखावा, एकेका स्वयंसेवकाने भारताच्या इतिहासातील वैभवशाली कार्य करणार्‍या एकेका महापुरुषाच्या  ठिकाणावर उभे राहून हातात मशाल घेऊन जावे. त्या महापुरुषाची थोडक्यात माहिती द्यावी, असे करत करत एकेका प्रान्तातील एक-दोन महापुरुषांची माहिती देत संपूर्ण देशाचा नकाशा भरून जावा. नंतर सर्वांनी भारताच्या नकाशाच्या सीमेवर उभे राहून भारत मातेचा जयजयकार करावा. असे कितीतरी उपक्रम त्यांनी सुचविले. आम्ही थक्क झालो. याच बैठकीत थक्क होण्याची वेळ पुन्हा लगेच आली. दोन सत्रांच्या मधल्या वेळेत कोणाला तरी शोधत मी चाललो होतो. स्नानगृहातून कपडे धुण्याचा आवाज आला. सहज डोकावले तर तेथे सुदर्शनजी आपले कपडे धुण्यात मग्न झालेले होते. संघातील शब्देविण संवादे ही व्यक्तिमत्त्व विकासाची जी प्रक्रिया असते तिचे असे अनुभव मनावर कोरले जात असतात. सुदर्शनजी सहसरकार्यवाह असताना मी काही कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. झंडेवाला कार्यालयात गेलो. अटलजी सरकारने केलेल्या पोखरणच्या अणुचाचणीबाबत मी दिवाळी अंकासाठी मुलाखती घेण्यासाठी तेथे गेलो होतो. सुदर्शनजी यांची भेट घेतली. ते म्हणाले, उद्या जेएनयूमध्ये याच विषयावर माझे आणि डॉ. मुरलीमनोहर जोशी यांचे भाषण आहे. तिथे चल. आमची भाषणे टेप करून घे. मध्ये मध्ये तुझे प्रश्‍न टाक म्हणजे झाली मुलाखत. तुझ्या काही प्रश्‍नांची उत्तरे भाषणातून मिळाली नाही तर नंतर चहापान आहे तेव्हा तेवढेच विचारून घे. मी जेएनयूमध्ये येतो असे म्हणताच विनाविलंब ते म्हणाले तिकडे कशाला जातोस. इकडेच ये. येथून माझ्याबरोबरच चल. माझी म्हणजे आपल्या तरुण भारतच्या एका आवृत्तीच्या संपादकाची ते कशी काळजी करतात हे त्यातून डोकावत होते. त्यांची ही आत्मीयता मनाला
 उभारी देणारी होती. आमचे हे संभाषण चालू होते तेव्हा माझ्याशी बोलत बोलत त्यांनी आपला स्वतःचा गणवेश अतिशय काळजीपूर्वक बाहेर काढला. त्यातल्या पट्ट्याला पॉलिश केले. पदवेश म्हणजे काळे बूट बाहेर काढून त्यावर पॉलिश केले. मी कुतूहल म्हणून विचारले. सुदर्शनजी गणवेशाची तयारी कशाकरिता करत आहात? ते शांतपणे म्हणाले, अरे, या झंडेवालामध्ये एक शाखा लागते. तिचा आज गणवेश दिन आहे. मग गणवेश तयार करायला नको? संघात कितीही मोठ्या पदावर असलो तरी आपण ज्या शाखेत जातो तिथे स्वयंसेवकच असतो, त्यामुळे तिथल्या सगळ्या आज्ञा, नियम, कार्यक्रम यांचे अनुसरण एक स्वयंसेवक म्हणून काटेकोरपणे केले पाहिजे याचा हा  वस्तुपाठ कधीही विसरता येणार नाही असा होता.
सुदर्शनजी सरसंघचालक झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा मराठवाड्यात नांदेड येेथे खालसा पंथाच्या त्रिशताब्दीनिमित्त प्रवास होता. देवगिरी तरुण भारतसाठी त्यांची मी मुलाखत घ्यावी असे ठरले. मी नांदेडला पोहोचलो. तेथे विभाग कार्यवाह यांच्याशी बोलणे झाले. वारंगा फाटा येथे त्यांचे स्वागत होणार आहे. तेथे मी जावे आणि तेथून नांदेडपर्यंत त्यांच्या गाडीतच बसून यावे. येताना त्यांची मुलाखत गाडीतच पूर्ण करावी असे ठरले. मी टेपरेकॉर्डर वगैरे तयारी करून वारंगा फाटा येथे गेलो. स्वागत, परिचय, चहा पान झाले. सुदर्शनजी यांनी गाडीत बसताना मला पाहिले. चल बैस असे म्हणताच मी गाडीत बसलो. आता मुलाखत नक्की असे मला वाटले. मी त्यांना गाडीत बसताच त्याबाबत बोललो तेव्हा ते म्हणाले, हे बघ, माझा हा प्रवास शाखेच्या कामासाठी आहे. यात मुलाखत, पत्रकार परिषद काही नाही. तुला माहिती आहे ना? असे म्हणून ते पुढे लगेच म्हणाले -
वृत्तपत्र में नाम छपेगा, पहनेंगे  स्वागत समुहार
छोड चलो यह क्षूद्र भावना, हिंदू राष्ट्र के तारणहार॥
माझे बोलणेच खुंटले. अन्य खूप गप्पा झाल्या. तरुण भारतची त्यांनी बारकाईने चौकशी केली. मुलाखत अर्थातच झाली नाही.
संभाजीनगरमध्ये तीन दिवसांची बैठक होती. सुदर्शनजी मार्गदर्शन करणार होते. त्या दरम्यान तीन दिवसात केव्हातरी त्यांची वेळ घेऊन मी सविस्तर मुलाखत तरुण भारतच्या दिवाळी अंकासाठी घ्यायची असा प्रयत्न चालू होता. प्रान्त प्रचारकांनी मला सांगितले की तुम्हाला वेळ दिली आहे. त्यांचा निवास डॉ. तुपकरी यांच्या घरी आहे. आज रात्रीच्या जेवणानंतर मुलाखतीसाठी तेथे तुम्हाला सुदर्शनजी मुलाखत देतील. मी ठरलेल्या वेळेपेक्षा थोडे आधीच डॉ. तुपकरी यांच्या घरी पोहोचलो. सुदर्शनजी यांचे जेवण संपत आले होते. गप्पा मारत जेवण चालू होते. डॉ. अश्‍विनीकुमार, डॉ. जयंत तुपकरी , दोघांच्याही डॉक्टर पत्नी, तुपकरींच्या भगिनी डॉ. मधुश्री सावजी व मेव्हणे डॉ. संजीव सावजी असे सहा डॉक्टर्स तेथे जेवता जेवता गप्पांत सहभागी झालेले. मीही गप्पा ऐकण्यात सहभागी झालो. विषय चालला होता हृदयरोग! सुदर्शनजी त्यांच्या वाचण्यात देशी, विदेशी लेखकांच्या लेखनात हृदयरोगावरचे उपचार, वेगवेगळे घरगुती उपाय, अनुभव असे जे त्यांच्या वाचनात होते ते सुदर्शनजी सांगत होते. कुठे कोणाला तिखट खाल्ल्याने कसा फायदा झाला, कोठे भोपळ्याचा रस सेवन करून हृदयविकारावर कसा फायदा झाला असे वेगवेगळे विषय त्या सांगण्यात होते. जेवण संपून हात वाळून गेले तरी त्यांचे सांगणे चालूच होते आणि सर्व डॉक्टर्स आणि मी ऐकण्यात रंगून गेलो होतो. चौफेर वाचन, भारतीय उपचार पद्धती, भारतीय आयुर्वेद यातील उपायांबाबत विश्‍वास असे अनेक विषय त्यात डोकावत होते. जेवणापेक्षाही या श्रवणभक्तीने तृप्त करणारा तो अनुभव होता.
डेहराडून येथे देशभरातील हिंदुस्थान समाचारच्या प्रतिनिधींची दोन दिवस बैठक होती. सुदर्शनजी बैठकीत पूर्णवेळ उपस्थित होते. बातमी लेखनावर चर्चा चालू होती. शीर्षकामध्ये संक्षिप्त रूपे वापरून वाचकांना कोड्यात टाकू नये असे सांगत असताना माझ्याकडून उदाहरण म्हणून एक इंग्रजी शब्द उच्चारताच सुदर्शनजींनी लगेचच त्याचा हिंदी प्रतिशब्द सांगितला आणि शीर्षकात इंग्रजी शब्दही असता कामा नयेत असे तात्काळ सांगितले. इंडिया मानसिकता आणि भारत मानसिकता असे ते नेहमी आपल्या विवेचनात फरक सांगत. स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कृती याबाबत अत्यंत अग्रही भूमिका ते मांडत असत. गोपाल, भारतीय तंत्रज्ञान आणि भारतीय विज्ञान या संदर्भात त्यांचा गाढा अभ्यास होता. त्याबाबत ते अत्यंत आग्रहाने उदाहरणांसह विवेचन करत. बौद्धिकामध्ये कवितांच्या ओळी,  जोशपूर्ण समारोप अशी वैशिष्ट्ये असत. भलेही राजकीय पक्ष, भारतीय जनता पक्ष यांच्या चुकलेल्या भूमिकेविषयी ते कठोरपणे टीका करत, मात्र आपल्या भाषणात अटलजींच्या कवितेतील ओळींचा वापर करून आत्मीयतेचा एक धागा कसा आहे ते नकळत सांगून जात.
दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवनभर अविचल चलता है|
अशा एका संघगीताच्या ओळी आहेत. सुदर्शनजींचे जीवन या ओळींचे जणू प्रात्यक्षिकच होते. ते शेवटपर्यंत  दिव्य ध्येयाकडे अविचल राहून सतत त्यासाठी चालत राहिले. ज्या रायपूरमध्ये त्यांचा जन्म झाला त्याच रायपूरमध्ये नित्यनेमाप्रमाणे फिरायला जाऊन आल्यानंतर प्राणायाम करत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. रायपूर ते रायपूर असा हा ध्येयनिष्ठेचा अविचल प्रवास प्रत्येकाला हे राष्ट्र परमवैभवाला नेण्याच्या दिव्य ध्येयासाठी काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. त्याच्या स्मृती जागवत हत्तीचे बळ अंगी घेऊन लाख संकटांना सामोरे जात लवकरात लवकर हे दिव्य ध्येय गाठण्यासाठी सर्वजण कृतीबद्ध होतील यात शंका नाही ! तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!

0 comments:

Post a Comment