पाकिस्तानची दूरावस्था!

•चौफेर : अमर पुराणिक•
पाकिस्तानमध्ये येऊ घालणार्‍या भयानक स्थितीची जाणीव बहुदा पाकिस्तानी माध्यमांना झाली आहे. काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाकडे पाकिस्तानी माध्यमं अतिशय गंभीरपणे पहात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गेल्या काही महिन्यात केलेली विधाने आणि कृती पाहता देशवासियांना खात्री झाली आहे की, आता पाकिस्तानची खैर नाही.
पाकिस्तानची स्थिती गेल्या काही दिवसांपासून खूपच वाईट झाली आहे. भारताशी वैरभाव पोसता पोसता आता पाकिस्तानला देशांतर्गत स्थिती सांभाळणे अशक्य होऊन बसले आहे. पाकिस्तानने आजपर्यत भारताशी तीन युद्धं केली. पण प्रत्येकवेळी पाकिस्तानला दारुन पराभव स्विकारावा लागला. तरीही भारतद्वेशाचा कंडू काही कमी होताना दिसत नाही. काश्मीर मिळवण्यासाठी पाकिस्तान भारताशी सतत युद्धाच्या पवित्र्यातच राहीला. काश्मीर मिळणे तर लांबच पण आता पाकिस्तानला देशांतर्गत स्थिती सांभाळणे अशक्य झाले आहे. पाकिस्तानच्या जन्मापासूनच पाकने काश्मीरचा राग आळवणे सुरु केले. तशात तेव्हाचे भारताचे निष्क्रीय परराष्ट्र धोरण पाकच्या पथ्यावर पडले. आज अर्धशतक उलटले तरीही पाकिस्तानची काश्मीर मिळवण्याची मनिषा काही पुर्ण होताना दिसत नाहिये. उलट केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भारताच्या प्रभावी परराष्ट्र धोरणामुळे पाकिस्तानची त्रेधातिरपीट उडाली आहे. अक्षरश: पाकिस्तानवर ‘भीक नको पण कुत्रे आवर’ म्हणण्याची वेळ येणार आहे. कारण गेल्या वर्षापासून पाकिस्तानची अंतर्गत व्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. पाकिस्तानला एकाचवेळी अनेक आघाड्‌या सांभाळणे अशक्य झाले आहे.
भारताशी तीन युद्धं करुन पाकिस्तानने हे जाणले की थेट युद्धात आपण भारताशी टक्कर देऊ शकत नाही. तेव्हापासून पाकिस्तानने दहशतवादाचा आश्रय घेतला. भारतात अतिरेकी पाठवून सतत भारतात दहशतवादी कारस्थाने सुरु ठेवली. गेल्या २५ वर्षांत भारताला या दहशतवादी कारवायांचा सामना करावा लागला. पाकिस्तानला जे युद्ध करुन साध्य करता आले नाही ते पाकिस्तानने जिहादच्या नावाखाली भारतभर इस्लामिक दहशतवाद पसरवून साध्य करण्याचा प्रयत्न केला. भारताचे यात खूप नुकसान झाले, अनेक नागरिकांचे जीव गेले. पण तत्कालिन सरकारने निषेध करण्यापलिकडे कोणतीही ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे पाकिस्तानला आणखी चेव चढला. पण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या वर्षभरात पाकिस्तानला विपरित परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आजपर्यंतच्या भारताच्या निष्क्रीय परराष्ट्रधोरणामुळेे पाकिस्तानला आपण बलवान असल्याचा भास होत होता. पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पाकिस्तानला वस्तुस्थितीची जाणीव होऊ लागली आहे. काश्मीर मागणे तर सोडाच पण बलूचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, पंजाब(पाक) सांभाळणे मुश्किल झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर याचना करावी लागत आहे. युनोमध्ये पाकिस्तानला आपले तोंड काळे करण्याची पाळी आली आहे.
हे सर्व घडतेय ते आजपर्यंत पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेमुळे. पाकिस्तानने  अतिरेकी संघटनांच्या माध्यमातून भारताशी छेडलेले छुपे युद्ध आता पाकिस्तानच्या अंगाशी आले आहे. अल कायदा, लष्कर ए तोयबासारख्या अनेक दहशतवादी संघटना आता पाकिस्तानलाच जड जात आहेत. काश्मीरमध्ये सतत हल्ले करुन  काश्मीरतर बळकावता आला नाही पण आता काश्मीरमधले नागरिकच पाकिस्तानविरोधात उघड उघड आंदोलने करु लागले आहेत. आजपर्यंत धर्माच्या नावाखाली, जिहादच्या नावाखाली तेथील नागरिकांच्या जीवनाची राखरांगोळी केल्याचे तेथील नागरिकांनी जाणले आहेच. हा झाला सामान्य नागरिकांचा क्षोभ. पण पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादी संघटना पाकिस्तानातच अराजक माजवू लागले आहेत. गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले झाले. हजारो नागरिकांचे प्राण गेले आहेत. एका बाजूला पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात राहण्याची मागणी होत आहे, तर दुसर्‍याबाजूला बलूचिस्तान पेटला आहे. सध्या पाकिस्तानची अवस्था पाकव्याप्त काश्मीर सांभाळू की बलूचीस्तान सांभाळू अशी झाली आहे.
आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायात कोणतीही सहानुभूती मिळणे अशक्य आहे. कारण आता पाकिस्तानची विकृत नीती पुरती उघडी पडली आहे. दोन दिवसांपुर्वीच पाकिस्तानचे माजी हुकुमशहा परवेज मुशर्रफ यांनी पाकमधील ‘दुनिया’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताविरुद्ध गरळ ओकण्याच्या नादात पाकिस्तानची आजवरची नीती उघडी पाडली आहे. त्यांनी जम्मु-काश्मीरात आमचेच अतिरेकी आहेत. लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना आम्हीच जन्माला घातली आहे, अशी जाहीर कबूली दिली आहे. हाफिज सईद, झकिउर रहमान लखवी आदींसारखे दहशतवादी त्यांनी पाकसाठी दहशतवादी नसून स्वातंत्रसैनिक आहेत अशी मुक्ताफळे उधळली. मुलाखत घेणार्‍या पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हे लोक स्वातंत्र सैनिक कसे ठरु शकतात असा सवाल उपस्थित केला, पण मुशर्रफ त्यांना स्वातंत्र सैनिक ठरवण्यात दंग होते. याचा अर्थ असाच होतो की, पाकिस्तानच्या एका माजी राष्ट्रप्रमुखाने पाकिस्तान दहशतवादी कारवाया करतो हे कबूल केले आहे त्यामुळे त्यामुळे पाकिस्तानने आजवर केलेल्या  कुकृत्यांवर शंका घेण्याचे कारण नाही.
पाकिस्तानमध्ये येऊ घालणार्‍या भयानक स्थितीची जाणीव बहुदा पाकिस्तानी माध्यमांना झाली आहे. काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाकडे पाकिस्तानी माध्यमं अतिशय गंभीरपणे पहात आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गेल्या काही महिन्यात केलेली विधाने आणि कृती पाहता देशवासियांना खात्री झाली आहे की, आता पाकिस्तानची खैर नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची रणनीती हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. लवकरच पाकव्याप काश्मीर पुन्हा भारताचा भाग होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

0 comments:

Post a Comment