बिहारच्या जनतेची सत्वपरिक्षा

•चौफेर : अमर पुराणिक•
बिहारमध्ये केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नीतिश कुमारांचे जनता परिवाराजवळ जाणे, कॉंग्रेस, कम्युनिस्टाशी युती करण्याचा प्रयत्न करणे हे त्यांच्या राजनैतिक उद्देशाला अनुकुल नाही. सकारात्मक राजकारणाची ही लक्षणं नाहीत आणि नकारात्मक राजकारण आता चालण्याची शक्यता कमीच आहे. भाजपाला विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकावी लागणार आहे. भाजपाला बिहारच्या जनतेला अश्‍वस्त करावे लागणार आहे. एकंदर ही निवडणूक म्हणजे बिहारच्या जनतेची खरी सत्वपरिक्षा ठरणार आहे.
बिहार विधानसभा निवडणूका जवळ येत आहेत. निवडणूकीला आणखी काही महिने बाकी असले तरी निवडणूकीची राळ आत्तापासूनच उडायला सुरुवात झाली आहे. खरे तर बिहारच्या राजकारणाला गती दोन वर्षांपुर्वीच आली होती जेव्हा नरेंद्र मोदी यांची भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या अध्यक्षपदी निवड केली होती. त्यांची निवड झाल्यानंतर आठवड्‌याभरातच बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी जदयुची १७ वर्षांची भाजपाशी असलेली युती तोडली होती. तेव्हा अनेक लोकांनानीतिश कुमार यांची मानसिकता कळाली नाही. त्यांच्यासाठी भाजपा आणि मोदी वेगळे वेगळे होते का? नीतिश कुमारांनी जी कारणं सांगितली ती कोणालाही पटली नाहीत. ती कारणे लोकांना बेईमानीची वाटली. त्याची फळे  लोकसभेच्या निवडणूकीत नीतिश कुमारांना भोगावी लागली. जदयुचे केवळ दोनच खासदार निवडून आले. त्यामुळे हताश होऊन त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला आणि त्यांचे विश्‍वासू जितनराम मांझी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते. पण, नंतर ते आपल्या मोहाला मुरड घालू शकले नाहीत, केवळ ९ महिन्यातच त्यांनी जितनराम मांझी यांची उचबांगडी करुन पुन्हा सत्ता आपल्या हाती घेत मुख्यमंत्रीपदी आरुढ झाले. याच महत्त्वाकांक्षेने त्यांनी आपले कट्टर विरोधक आणि चारा घोटाळ्यात झारखंड उच्च न्यायालयाकडून शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी करुन बिहारच्या जनतेला बुचकळ्यात टाकले.
बिहारचे राजकारण अतिशय गुंतागुंतीचे असते. तेथे आत्तापर्यंत जातीच्या राजकारणाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. १९९० पासून २००५ पर्यंत तेथे लालूप्रसाद यादव यांचे आणि राबडीदेवी यांची सत्ता होती आणि २००५ पासून नीतिश कुमार यांची सत्ता आहे. यात मागासवर्गीय राजकारणाचे समीकरण महत्त्वपुर्ण ठरले आहे. मागासवर्गीयांची मते लालू आणि नीतिश कुमार यांना कायमच खुणावत होती पण केवळ त्याजोरावर सत्ता मिळवणे शक्य नव्हते. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांनी मुसलमानांची व्होट बँक आपल्याकडे ठेवली होती. तर नीतिश कुमार यांनी मागासवर्गीयांबरोबरच उच्च जाती आणि इतर मागासवर्गीयांची मतपेटी आपल्या ताब्यात ठेवली होती. पण दोघांचीही भीस्त मागासवर्गीयांच्या मतावरच होती. गेली २५ वर्षे याच सामाजिक ध्रुवीकरणाभोवती बिहारचे राजकारण चालत आले आहे. आता हे दोघेही एकत्र आले आहेत, मग दूसर्‍यांसाठी काय शिल्लक राहिले? याच दृष्टीकोणातून २०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपाच्या ऐतिहासिक विजयाच्या कुतुहलाचा विषय ठरली आहे. आता प्रश्‍न हा पडतो की काय भारतीय जनता पक्ष बिहार विधानसभा निवडणूकीत तशीच यशस्वी घोडदौड करेल काय?
याचे उत्तर शोधताना दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एक म्हणजे, राजद आणि जदयूची राजकीय युती सामाजिक स्थरावरही एकत्रित येईल काय? आणि दूसरी गोष्ट म्हणजे भाजपाला विरोध करण्याच्या आधारावर राजद आणि जदयूची झालेली युती बिहारच्या निवडणूकीच्या रणनीतीत मतदारांवर प्रभाव पाडू शकेल काय? लालू-नीतिश कुमार यांची युती ही कृत्रिम आणि बळजबरीची किंवा नाईलाजाने झालेली युती आहे. लालूप्रसाद यादव यांनी नाईलाजाने हे विष प्यावे लागल्याचे जाहीरपणे म्हंटले आहे. पण त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार हे विष प्यायला तयार होतील काय हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. कायम एकमेकांविरुद्ध लढलेले राजद आणि जदयूचे कार्यकर्ते अचानकच एकत्र येण्यास तयार होणे थोडे अवघडच आहे. कारण निवडणूका या कार्यकत्यांच्या एकीवर आणि बळावरच जिंकता येतात.
यात अजून एक महत्त्वपुर्ण बाब आहे की, आता मागासवर्गीयांवर लालू आणि नीतिश कुमार यांचा एकाधिकार राहिलेला नाही. कारण आता त्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे म्हणजेच भाजपाकडे मोठा हिस्सा गेला आहे. कारण नरेंद्र मोदी हे देखिल मागासवर्गीयच आहेत. शिवाय आता भाजपा केवळ सवर्णांचा पक्ष राहिलेला नाही, तर तो आता मागासवर्गीयांचा पक्ष झाला आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणूकीत बिहारमध्ये भाजपाला मागासवर्गीयांचे प्रचंड मोठ्‌याप्रमाणात समर्थन मिळाले आहे. अर्थातच नीतिश आणि लालू दोघांनाही याचा पुरेपूर अंदाज असणारच आहे आणि ते यामुळे चिंतीतही असतील. पण नीतिश कुमार यांची भाजपाविरोधी रणनीती मतदारांच्या गळी उतरेल की नाही हे आत्ता सांगणे अवघड आहे. पण एक नक्की की पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या एक वर्षातील कार्याचा फायदा नक्कीच भाजपाला मिळेल.
बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव यांच्या जंगलराजपासून मुक्तता मिळवण्यासाठी जदयू-भाजपा युतीच्या हाती सत्ता दिली होती. ती बिहारमधील एका नव्या युगाची सुरुवात ठरली होती. भाजपा-जदयू युतीच्या काळात बिहार वेगाने विकास साधत होता. या विकासाची फळे थोडी का होईना बिहारच्या जनतेने चाखली आहेत. पण मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार नाकारत नीतिश कुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेतला आणि तेथून बिहारचा विकास खुंटला. आता नीतिश कुमारांनी पुन्हा त्याच जंगलराज देणार्‍या लालूंची संगत केली आहे. जनता पुन्हा त्यांच्यावर विश्‍वास ठेवेल का? याचे उत्तर निवडणूकीनंतरच मिळणार आहे. मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून विकासाची जी घोडदौड सुरु केली आहे ती पाहता बिहारच्या जनतेला मोदींकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्यांना विश्‍वासही आहे की मोदीच बिहारचा विकास साधू शकतील. शिवाय लालूंशी युती केल्यानंतर आता जर नीतिश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर त्यांना लालू देतील तितकेच स्वातंत्र असणार आहे. ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकणार नाहीत. यदाकदाचित लालूप्रसाद यादव यांनी आपण पिलेल्या विषाचा हिशेब जर नीतिश कुमार यांना अचानक मागितला तर काय होईल? पुन्हा बिहारमध्ये जंगलराज भाग दोन सुरु होईल याची धास्ती बिहारच्या जनतेला आहे. त्यामुळे आता बिहारची जनता अस्मिता, जातीय राजकारण या पलिकडे जाऊन विकास आणि सुशासनाच्या राजकारणाला साथ देईल अशी शक्यता जास्त आहे. विशेषत: नवी पीढी जातीयवादी राजकारणाला खतपाणी घालण्याची शक्यता नाही.
बिहारमध्ये केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नीतिश कुमारांचे जनता परिवाराजवळ जाणे, कॉंग्रेस, कम्युनिस्टाशी युती करण्याचा प्रयत्न करणे हे त्यांच्या राजनैतिक उद्देशाला अनुकुल नाही. सकारात्मक राजकारणाची ही लक्षणं नाहीत आणि नकारात्मक राजकारण आता चालण्याची शक्यता कमीच आहे. भाजपालाही आता केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकावी लागणार आहे. भाजपाला बिहारच्या जनतेला अश्‍वस्त करावे लागणार आहे की, भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे. केंद्रातही भाजपाचीच सत्ता आहे त्याचा फायदा बिहारला होईल, भाजपा चांगले प्रशासन देईल. या शिवाय भाजपा-जदयू युतीच्या काळातील विकास कामांचे स्मरण बिहारच्या जनतेला करुन दिले आणि एक दिलाने जर भाजपाने ही निवडणूक लढवली तर भाजपाचे पारडे जड होईल यात शंका नाही. शिवाय रामविलास पासवान यांचा लोजपा, उपेंद्र कुशवाह याचा लोकसमता पार्टी आणि जितनराम मांझी यांचा हिंदुस्तान अवाम मोर्चा यांच्याशी युती हा ही एक मजबूत आधार भाजपाला राहील. एकंदर ही निवडणूक म्हणजे बिहारच्या जनतेची खरी सत्वपरिक्षा ठरणार आहे.

0 comments:

Post a Comment