शत्रूराष्ट्राची तरफदारी करणारी कॉंग्रेस!

•चौफेर : अमर पुराणिक•
आपले दुर्दैव हे आहे की आपल्याच देशातील विरोधी पक्षाला आणि काही तथाकथित विद्वानांना म्यानमारमधील सेनेची कारवाई अयोग्य वाटली. पाकिस्तानसारख्या शत्रुदेशाबद्दल नक्राश्रू वाहणार्‍या कॉंग्रेसची लायकी आणि त्यांचा खरा चेहरा देशवासियांनी पुन्हा पाहिला आहे. माध्यमं आणि कॉंग्रेस म्यानमारमधील सेनेच्या कारवाईच यश झाकोळण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. ललीत मोदीच्या प्रकरणावरुन सुषमा स्वराज यांच्या राजिनाम्याचा घोषा लावला आहे. दम नसलेली खोटी प्रकरण काढण्यापेक्षा भारतात अनेक समस्या आहेत त्याचा पाठपुरावा कॉंग्रेसने करावा. राष्ट्रीय प्रश्‍न आणि राष्ट्रहितात कॉंग्रेसने आता असली हीन राजनीती खेळण्याची जुनी रित बदलावी. अन्यथा येत्या निवडणूकीत भारत देश कॉंग्रेस मुक्त होईल.
भारतीय सेनेने म्यानमारमध्ये दहशतवादाविरुद्ध विशेष अभियानांतर्गत आपली सुनियोजित योजना यशस्वी केली. भारतीय सेनेच्या २१ पॅरा बटालियनच्या दोन तुकड्‌यांनी सोमवार दिनांक ८ जुन रोजी मध्यरात्री भारत म्यानमार सीमेवर आपले अभियान सुरु केले. म्यानमार सीमेत ६ किलोमीटर आत घुसुन दहशतवाद्यांचा निपात केला. यात जवळजवळ ३८ दहशतवादी ठार झाले तर ११ जखमी झाले. देशाच्या पुर्वोत्तर भागात आतंकवाद निष्प्रभ करण्यासाठी अशा कारवाईची गरज होती. भारताच्या या कारवाईचे देशभरातून कौतूक झाले. भारताच्या शत्रुंसाठी हा एक संदेश आहे. दहशतवादाविरुद्धच्या या कारवाईबद्दल सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे आणि प्रत्यक्ष कारवाई करणार्‍या भारतीय जवानांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे.
एक अशी मान्यता आहे की गांधीजींच्या शांतीप्रियतेने भारतात एक प्रकारची पापभीरुता निर्माण झाली. काही जण या मताशी सहमत आहेत तर काहीची मतं वेगळी आहेत. पण भारतीय सेनेच्या जवानांच्या या धडाकेबाज कारवाईनंतर मात्र भारत ही ‘आरे ला कारे’ म्हणण्याची भूमिका ठेवतो हे आता जगाला दिसू लागले आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानसह भारतविरोधी भूमिका बाळगणार्‍यांना योग्य संदेश मिळाला आहे. पण काही लोकांचे विशेषत: कॉंग्रेस आणि प्रसारमाध्यमांना मात्र या कारवाईमुळे पोटशूळ उठला आहे. त्यांच्या मते या कारवाईमुळे पाकिस्तानला चूकीचा संदेश गेला आहे. ते भारत सरकारवर आरोप ठेवत आहेत की, मोदी सरकार अशा कारवाया करुन उन्माद पसरवत आहे. प्रत्यक्ष कारवाई ९ जून रोजी पहाटे सुरु झाली. दुपारनंतर संरक्षण मंत्रालय आणि सेनेच्या हलचालींवर लक्ष ठेऊन असलेल्या पत्रकारांना याची भनक लागली. संध्याकाळपासून सोशल मिडियावर या अभियानाची चर्चा सुरु झाली. संध्याकाळीच संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने भारतीय सेनेने म्यानमार सरकारच्या सहयोगाने पूर्वोत्तर क्षेत्रातील दहशतवाद्यांविरुद्ध यशस्वी अभियान राबवले असल्याचे सांगितले. माध्यमांनी ही बातमी मसालेदार बनवून लोकांसमोर मांडायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर वृत्तवाहिन्यांत जणू स्पर्धाच लागली. त्यांनी हिंदी आणि हॉलिवुड चित्रपटातील दृष्यांच्या सहाय्याने मसाला लावून बातम्या दिल्या. या सैन्य अभियानाबाबत सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी एक ट्वीट केले. त्यांनी या ट्वीटच्या माध्यमातून हेच सांगितले की, जे भारताचे नुकसान करु इच्छितात त्यांनी या अभियानापासून धडा घेतला पाहिजे. पण राज्यवर्धन राठोड यांच्या या वक्तव्याचा विपर्यास्त करुन त्यांचे हे वक्तव्य आक्रमक आणि उन्माद पसरवणारे होते अशी ओरड करण्याचा प्रयत्न केला. ऑलिंपिक पदक विजेता राज्यवर्धन राठोड सेनेत कर्नल होते.
आपले तथाकथित आणि स्वयंघोषित तज्ज्ञ आणि विरोधी पक्षांचे प्रवक्ते हे सांगू इच्छित होते की भारतीय सेनेने किरकोळ कारवाई केली आहे आणि राज्यवर्धन राठोड त्याचे अनावश्यक कौतूक करत आहेत. त्यांना असे म्हणायचे आहे काय की, कोणालाही विशेषत: पाकिस्तानला याची चिंता करण्याची गरज नाही. काही लोक हे ही ज्ञान पाजळत होते की, भारतीय सेना आणि मोदी सरकारने या अभियानाबाबत मौन बाळगायला हवे होते. कशासाठी भारताने मौन बाळगावे? भारताने का गप्प बसावे? कॉंग्रेसची इच्छा अशी आहे का, की पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. सैन्याच्या या अभियानाबाबत विनाकारण प्रश्‍न उभे करणारे लोक म्यानमार सरकारच्या ‘भारतीय सेनेने आपल्या सीमेत ही कारवाई केली आहे’ या वक्तव्याने खूष झाले होते. हा कसला विकृत आनंद कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांना होतोय? मुळात कोणताही देश हे सांगू शकत नसतो की अन्य देशाने आपल्या देशात घुसुन कारवाई केली. आंतरराष्ट्रीय संहीतेचा विचार करुनच म्यानमारने अधिकृतरित्या भारताने आपल्या सीमेअंतर्गत ही कारवाई केली आहे, असे सांगितले. म्यानमार सरकारच्या या वक्तव्याच्या आधारावर भारतीय सैन्याची कारवाई खोटी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. असा प्रयत्न करण्यात कॉंग्रेस नेते आघाडीवर होते. काहींनी सोशल मिडियावर बडबडायला सुरुवात केली की, मोदीनी पुन्हा खोटी अफवा पसरवली. काही लोकांनी सैन्याच्या कारवाईचे पुरावे मागितले. पण पुरावे मिळाल्यानंतरही मोदी सरकारवर उन्माद पसरवण्याचा आरोप सुरुच ठेवला. अशा लोकांची चिंता करण्याची गरज नाही. पण पाकिस्तानला त्रास होईल याची ज्यांना चिंता आहे त्यांचा मात्र समाचार घेणे आवश्यक आहे.
पाकिस्तानी सेना आणि त्यांच्या गुप्तहेर संस्था ज्या पद्धतीने भारतीय हितांचे आणि भारताचे सतत नुकसान करु पहात आली आहे, त्याचा विचार करता जर भारताने म्यानमारमध्ये केलेल्या कारवाईने पाकिस्तान घाबरला तर त्यात वाईट काय झाले? पाकिस्तान घाबरला म्हणून आपल्या देशातील विरोधी पक्ष असलेला कॉंग्रेस पक्ष घाबरला तर याला केवळ षंढपणाच म्हंटले जाऊ शकते. भारतीय सैन्याच्या या कारवाईमुळे पाकिस्तानची अवस्था मुंडके कापलेल्या कोंबड्‌यासारखी झाली आहे आणि यामुळे सर्वात जास्त कोण त्रस्त झाले आहे तर देशातील सर्वात जुना पक्ष असलेला अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष! राष्ट्रद्रोही भूमिका म्हणतात ती हिच ना? असल्या दळभद्री कॉंग्रेसवाल्यांनी या देशावर ५० वर्ष या देशावर राज्य केले हे या देशातील जनतेचे दूर्दैव म्हणावे लागेल. कॉंग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा  यांनी वक्तव्य केले की, त्यांना भारतीय सैन्याने केलेली ही कारवाई आवडली नाही आणि पाकिस्तानला भयभीत करणे ही आवडलेले नाही. त्यांनी नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी आपल्या मंत्र्यांना नियंत्रणात ठेवावे. मोदी सरकारमधील मंत्र्यांनी काय बोलावे आणि किती बोलावे हे र्कॉग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा ठरवणार आहेत काय? कॉंग्रेस, कॉंग्रेसचे नेते म्यानमारमधील सैन्य अभियानावरुन मोदी सरकारबाबत असे बरळत आहेत की जसे इस्लामाबादमधील कोणी पाकिस्तानी प्रवक्ता भारताला दम भरतोय.
पाकिस्तानकडून पोसल्या जाणार्‍या आतंकवादी संघटनांच्या आणि त्यांच्या म्होरक्यांच्या डोक्यातून हा भ्रम निघून गेला पाहिजे की, कितीही आंतकवादी कारवाया केल्या तरी भारत सरकार काही करण्याचे धाडस करणार नाही. पाकिस्तानच्या गोळ्यांना गोळ्यांनी उत्तर दिलं तर बिघडलं कुठं? आंतकवादाचे पोषण करणारा पाकिस्तान जर भारताला घाबरला तर हे भारताच्या हिताचे नाही काय? यापेक्षा चांगली घटना कुठली नाही की भारतीय सेनेच्या म्यानमारमधील कारवाईनंतर पाकिस्तानने स्वत:हून ही गोष्ट ग्रहण केली की आता आपण भारताची कुरापत काढली तर आपली काही खैर नाही. आपले दुर्दैव हे आहे की आपल्याच देशातील विरोधी पक्षाला आणि काही तथाकथित विद्वानांना ही कारवाई अयोग्य वाटली. पाकिस्तानसारख्या शत्रुदेशाबद्दल नक्राश्रू वाहणार्‍या कॉंग्रेसची लायकी आणि त्यांचा खरा चेहरा देशवासियांनी पुन्हा पाहिला आहे. माध्यमं आणि कॉंग्रेस म्यानमारमधील सेनेच्या कारवाईच यश झाकोळण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. ललीत मोदीच्या प्रकरणावरुन सुषमा स्वराज यांच्या राजिनाम्याचा घोषा लावला आहे. दम नसलेली खोटी प्रकरण काढण्यापेक्षा भारतात अनेक समस्या आहेत त्याचा पाठपुरावा कॉंग्रेसने करावा. राष्ट्रीय प्रश्‍न आणि राष्ट्रहितात कॉंग्रेसने आता असली हीन राजनीती खेळण्याची जुनी रित बदलावी. अन्यथा येत्या निवडणूकीत भारत देश कॉंग्रेस मुक्त होईल.

0 comments:

Post a Comment