राहुल गांधी यांचं अपरिपक्व राजकारण!

•चौफेर : अमर पुराणिक•
कॉंग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या कोल्हेकुईचं खरं कारण हे आहे की, कॉंग्रेसला जे जमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी दणक्यात करुन दाखवत आहेत. त्यांच्या प्रत्येक परदेश दौर्‍यात सार्‍या जगाच लक्ष भारताकडे केंद्रित झालं आहे, ही खरी कॉंग्रेसची पोटदूखी आहे. मोदी यांनी या परदेश दौर्‍यात किती मोठ यश मिळवलं हे महत्त्वाच आहे, पण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची कॉंग्रेसची इच्छा नाही.
जवळ-जवळ ६ महिन्यांनंतर राहुल गांधी आपला मतदार संघ अमेठीत पोहोचले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी तक्रारीच्या स्वरात सांगितले की, जगभर फिरणारे मोदी शेतकर्‍यांना का भेटत नाहीत? पहिली गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौरे सुट्‌टी घालवायला किंवा ट्रीपला जात नाहीत. ते देशहितासाठी परदेश दौरे करतात. जसे या आधीचे पंतप्रधान करत होते. दुसरी गोष्ट ही की शेतकर्‍यांना भेटण्याचा आव आणणार्‍या राहुल गांधी यांनी शेतकर्‍यांचे काय भले केले? किंवा सोनिया गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनी शेतकर्‍यांचे किती भले केले? जवळजवळ ५० वर्षे सत्ता उपभोगूनही कॉंग्रेस शेतकर्‍यांचे भले का करु शकला नाही? राहुल गांधी तर त्या गरिबांचेही भले करु शकले नाहीत ज्यांच्या घरच अन्न त्यांनी खाल्लं, ज्यांच्या घरी ते जेवले.
पंतप्रधान मोदींवर टीका करणार्‍या राहुल गांधी आणि त्यांचे कॉंग्रेस नेते यांना माहित असायला हवं की, मोदी यांनी गेल्या वर्षभरात ५३ दिवस परदेश दौरे केले तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ४७ दिवस विदेश दौरे केले. राहुल गांधीच्या दृष्टीनेे ४७ दिवस परदेश दौरे करणे योग्य आहे आणि ५३ दिवस दौरे करणे मात्र अयोग्य आहे काय? कोणत्याही जबाबदार राजकीय नेत्याला अशी बेजबाबदार विधानं किंवा टीका करणे शोभणारे नाही. राहुल गांधी दोन महिन्यापुर्वी ५८ दिवस सुट्‌टी उपभोगायला, एन्जॉय करायला परदेशात जाऊन आले आहेत. निदान त्यांनी तरी असली स्वत:वर उलटणारी विधानं करु नये. ते कोणतं राष्ट्रहित साधायला परदेशात गेले होते. ते सुट्‌टी घालवायला गेले होते हे एव्हाना जगाला माहित आहे. पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौर्‍यांना टीकेच साधन बनवणं म्हणजे निव्वळ अपरिपक्व राजकारणाचा खेळ आहे.
नि:संदेह राजकीय पक्ष एक-दुसर्‍याविरुद्ध टीका करायला स्वतंत्र आहेत, पण त्याचा अर्थ असा नव्हे की काहीही बीनबुडाचे आरोप आणि वाह्यात टीका करावी. अशीही परिस्थिती नाही की, पंतप्रधानांच्या परदेश दौर्‍यांमुळे त्यांच्या कार्यालयात कामांच्या फाईली लटकल्या आहेत, विकास कामं ठप्प झाली आहेत, महत्त्वाच्या कामांचा निपटारा होत नाहीये. कॉंग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या कोल्हेकुईचं खरं कारण हे आहे की, कॉंग्रेसला जे जमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी दणक्यात करुन दाखवत आहेत. त्यांच्या प्रत्येक परदेश दौर्‍यात सार्‍या जगाच लक्ष भारताकडे केंद्रित झालं आहे, ही खरी कॉंग्रेसची पोटदूखी आहे. मोदी यांनी या परदेश दौर्‍यात किती मोठ यश मिळवलं हे महत्त्वाच आहे, पण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची कॉंग्रेसची इच्छा नाही.
५८ दिवस परदेशात मजा करुन आल्यापासून राहुल गांधी अशा अनेक टीका करत सुटले आहेत. मनमोहन सरकारने तयार केलेला हा कायदा विकास कामांत किती बाधक बनलाय, हे ठाऊक असुन ही भूमी अधिग्रहण विधेयकाबाबतीत राहुल गांधी यांनी भाजपा आणि मोदी यांना शेतकरीविरोधी सिद्ध करण्यासाठी सगळी ताकत पणाला लावून आकाश-पाताळ एक केलं. एवढेच नव्हे तर अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानीलाही पंतप्रधान मोदी आणि भाजपाला जबाबदार ठरवून मोकळे झाले. हे ही स्पष्ट दिसत आहे की राहूल गांधी पंतप्रधान मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका करत आहेत, अक्षरश: बालिश टीका करत आहेत. वारंवार सूट-बूटातील सरकार असल्याचाही कंठशोष करत आहेत. राहुल गांधी वास्तविकता विसरले की, सुट-बुटात रुबाबात फिरणारे त्यांचे पुर्वज आणि ते स्वत: आहेत. या टीकेवर मोदी यांनी राहुल गांधी यांना ‘सुटकेस घेणार्‍यांपेक्षा सुटाबुटातले सरकार बरं’ असा सणसणीत टोला लगावला होता.
मोदी सरकार लोकशाही मुल्यांची पायमल्ली करत आहेत यावर राहुल गांधी यांच्या टीकेचा रोख आहे. हे हास्यास्पद आहे की, शासन संचालनाच्या लोकशाहीतत्वांबाबत राहुल गांधी मोठमोठ्‌या गप्पा मारताहेत, त्यांनी स्वत: डागाळलेल्या कॉंग्रेसच्या संसद सदस्यांचे सदस्यत्व वाचवण्यासाठी अध्यादेश फाडून केराच्या टोपलीत टाकण्याची करामत वृत्तवाहिन्यांच्या कॅमेर्‍यासमोर केली होती.
नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना आठवण करुन दिली की, लोकशाही मुल्यांची पायमल्ली कॉंग्रेसनेच केली आहे. कॉंग्रेसने संविधानाचा अवमान करत सत्ता संसदेतून नव्हे तर १०, जनपथवरुन चालवली होती. मोदींच्या या सडेतोड उत्तराने कॉंग्रेसचा तीळपापड झाला. अंबिका सोनी आणि इतर कॉंग्रेस नेत्यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. कॉंग्रेस नेत्यांकडून होणारी गांधी परिवाराची खुशामत हाही याचा सज्जड पुरावा आहे. संसदेपेक्षा गांधी परिवाराची धुणी धुण्यातच आजपर्यंत कॉंग्रेस नेत्यांनी धन्यता मानली आहे. कॉंग्रेसच्या मंत्रीसमुहामुळे त्यांच्या पंतप्रधानांची ताकत सीमीत झाली होती त्यामुळे निर्णय होत नव्हते. संपुआ सरकारच्या काळात ६८ मंत्री समुह आणि ४० पेक्षा जास्त उच्चाधिकार प्राप्त असलेले मंत्री समुह गठीत करण्यात आले होते. ही संख्या काही थोडकी नव्हे. शिवाय बाकी राहिलेली कसर सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखालची राष्ट्रीय सल्लागार समिती पुर्ण करत होती. येथे लोकशाही मुल्यांची परवड झालेली राहुल गांधी यांना दिसली नव्हतीका?
सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन त्यांना पंतप्रधान होता आले नाही तर त्यागाची उदात्त झालर लावून त्याचा प्रचार करण्यात आला. शेवटी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पदावर बसवून त्यांचा कळसुत्री बाहूलीप्रमाणे वापर करत सत्तेची सुत्रे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी १० जनपथवरुन हलवत होत्या. महत्त्वाच्या फाईल्स मंजूरीसाठी सोनिया गांधींच्या घरी म्हणजे १० जनपथला जात होत्या. हे कोणत्या लोकशाही मुल्यात बसते, हे आधी राहूल गांधी आणि त्यांच्या तोंडपुज्यांनी सांगावे आणि नंतर दुसर्‍यावर आरोप करावा. हे मुद्दे संपुआ सरकारच्या काळात महत्त्वाच्या पदावर काम केलेल्यांनी पुस्तक लिहून प्रसिद्धीच्या झोतात आणले आहेत. कॉंग्रेस सरकारच्या काळातील या दोन सत्ताकेंद्रामुळंच देशाची दुर्गती झाली. त्याचेच फळ देशवासियांंनी कॉंग्रेसला गेल्या निवडणूकीत दिले. मतदारांनी कॉंग्रेसला विरोधी पक्ष नेते पद मिळवण्याच्या लायकीचेही ठेवले नाही.
विरोधक या नात्याने कॉंग्रेसला अधिकार आहे की त्यांनी मोदी सरकारच्या तृटीचा विरोध करावा, पण हा विरोध तार्किक असावा. पण सध्या कॉंग्रेस अतर्किक आणि तथ्यहीन विधाने करत जगासमोर स्वत:चे हसे करुन घेत आहेत. मजबूत विरोधी पक्ष असणं हे निरोगी लोकशाहीचं लक्षण आहे, पण कॉंग्रेसला विरोध कोणत्या मुद्यावर करावा याचा काही थांगपत्ता लागताना दिसत नाही. मोदी सरकारवर आरोप करण्याआधी कॉंग्रेसने इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या शासन काळातील एकहाती सत्तेची आठवण ठेवावी.
एक मात्र खरे की राहुल गांधी यांचा राजकीय, सामाजिकबाबतीत बौद्धिक विकास होताना दिसत नाही. दुसरी वस्तूस्थिती नजरेआड करता येत नाही की, एक वर्ष झाले तरी कॉंग्रेस अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेली नाही. आधीच रसातळाला गेलेल्या कॉंग्रेसच्या हे लक्षात येत नाही की, मोदी सरकारवर टीका करत असताना विरोध करण्याच्या उत्साहात ते पक्षाला आणखी कमकुवत करत आहेत. कॉंग्रेस आपले हरवलेले जनमत परत मिळवण्यासाठी ज्या रस्त्यावरुन चालली आहे, त्या रस्त्यावर ते आणखीनच रसातळाला जाणार आहेत. र्कॉग्रेस आणि राहुल गांधी यांनी आता सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे. जर असे झाले नाही तर मग नरेंद्र मोदी यांची ‘कॉंग्रेस मुक्त भारत’ ही घोषणा कॉंग्रेस स्वहस्तेच पुर्णत्वास नेईल.

0 comments:

Post a Comment