प्रेस्टीट्यूटवृत्ती सिद्ध करण्याची अहमहमिका!

•चौफेर : अमर पुराणिक•
अशा विद्वानांना खरे तर जनरल सिंह यांनी योग्य नामाभिधान दिले आहे. हे देशाला लागलेले जळू आहेत. यांना राष्ट्रहिताशी काहीही देणं-घेणं नाही. फक्त विधानांचा विपर्यास्त करणे इतकच यांना हवं असतं. अशा पत्रकार आणि विद्वानांमध्ये स्वत:मधील प्रेस्टीट्यूट वृत्ती सिद्ध करण्याची जणू अहमहमिकाच लागली आहे. त्यामुळे आता या १० टक्के पत्रकारांनी कसं वागावं याचा धडा नव्याने घालून देण्याची जबाबदारी जनतेवरच येऊन पडली आहे.
युद्धग्रस्त येमेनमधून मागील आठवड्‌यापर्यंत ५६०० भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणले आहे. या शिवाय ४१ देशांच्या ९६० नागरिकांनाही येमेनमधून बाहेर काढले आहे. अमेरिका, फ्रांस आणि श्रीलंकासमावेत २३ देशांनी यासाठी भारताला मदत मागितली होती. २७ मार्च रोजी परराष्ट्र मंत्रालय नौसेना, वायुसेना आणि एअर इंडियाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत युद्धग्रस्त झालेल्या येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचा निर्णय झाला होता, त्यासोबतच परदेशी नागरिकांची मदत करण्याबाबत निर्णय झाला होता. ‘ऑपरेशन राहत’ अंतर्गत हे अभियान चालवले गेले. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन राहतची मोहिम राबवली गेली आणि जनरल सिंह यांनी ही मोहिम अतिशय प्रभावीपणे राबवत यशस्वी करुन दाखवली.
पण माध्यमांनी मात्र याची विशेष दखल घेतली नाही. माध्यमांतील काही तज्ज्ञांच्यामते केवळ ४-५ हजार लोकच अडकले होते. त्यांच्या मते याआधी  २०११ मध्ये लिबीयातून १५ हजार भारतीयांना बाहेर काढले होते तर १९९० मध्ये इराक आणि कुवेत मधून १ लाख ७६ हजार भारतीयांना मायदेशी परत आणले होते. त्यामानाने ४-५ हजार ही संख्या नगण्य आहे असा युक्तीवाद हे तथाकथित माध्यमातील तज्ज्ञ करतात. इकडे प्रत्येक भारतीयाचा जीव महत्त्वाचा आहे यासाठी प्रयत्न सुरु असताना असला भोंगळ युक्तीवाद करणे म्हणजे केवळ विरोधाला विरोध करणे होय.
येमेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्याच्या अभियानात गर्क असलेले जनरल व्ही.के. सिंह यांच्या वक्तव्याचा विपर्यास्त करण्यात काही तथाकथित विचारवंत आणि माध्यमे गर्क आहेत. यावर एका वाहिनीच्या पत्रकाराने चर्चेचे आयोजन केले होते, त्याने टि्‌वटरवर तशी घोषणाही केली होती. पण यामुळे लोक इतके चिडले की त्यांनी चॅनलवरच हल्ला केला. ही घटना शांत होते ना होते तोपर्यंत जनरल सिंह यांचे ‘प्रेस्टीट्यूट’ हे विधान चिघळले. ‘प्रेस्टीट्यूट’ हा तसा नवा शब्द नाही. काही स्वयंघोषित विचारवंत आणि काही पत्रकारांनी हे समजुन घेणे गरजेचे आहे की, प्रॉस्टिट्यूट हा शब्द वेश्या अर्थाचा आहे आणि ‘प्रेस्टीट्यूट’ हा शब्द पक्षपाती आणि पुर्वाग्रहदूषित बातम्या देणारे या अर्थाने हा शब्द वापरला जातो आणि जनरल सिंह यांनी याच अर्थाने हा ‘प्रेस्टीट्यूट’ हा शब्द वापरला आहे.
‘प्रेस्टीट्यूट’ या शब्दाचे जनक अमेरिकन लेखक सेलेंट गेराल्ड हे आहेत. यात आश्‍चर्याची गोष्ट ही आहे की, इंग्रजी पत्रकारही या शब्दाबाबत अनभिज्ञ आहेत. नाही तर मग हे लोक जाणिवपुर्वक जनरल सिंह यांच्या विधानाचा प्रॉस्टिट्यूट या शब्दाशी संदर्भ जोडून वादळ उठवू पाहात आहेत. एक पत्रकार तर इतका अनभिज्ञ निघाला की त्याने जनरल व्ही.के. सिंह याच्या विधानावर वेश्या आणि त्यांच्या हितासाठी काम करणार्‍या संघटनांच्या प्रतिक्रिया प्रकाशित करुन टाकल्या. हे पत्रकार महोदय हे सिद्ध करु पहात होते की, पहा जनरल व्ही.के. सिंह यांचे विधान वेश्यांनापण अयोग्य वाटले. यावर कहर म्हणजे लेखिका शोभा डे यांनी ‘‘प्राउड टू बी अ प्रेस्टीट्युट! बेटर दॅन बिईंग अ जोकर जनरल’’ असा टीवटीवाट केला. नंतर व्ही.के. सिंह यांनी प्रेस्टिट्यूट या विधानाचा अर्थ स्पष्ट करुन माध्यमांची माफी ही मागितली, पण केवळ ९० टक्के पत्रकारांची. ते अशासाठी की त्यांच्या मते १० टक्के पत्रकार असे आहेत की ते प्रेस्टिट्यूटच्या व्याख्येत चपखल बसतात. यात १० टक्के आणि ९० टक्के या प्रमाणावर न जातात त्यांच्या मते काही थोडे पत्रकार असे आहेत इतकाच त्याचा अर्थ होतो. हे जे काही थोडे पत्रकार आहेत ते पुर्वाग्रहदूषित आणि दूराग्रहाने ग्रस्त अशी पत्रकारिता करणारे आहेत. हे असे लोक जनमत चूकीच्या पद्धतीने प्रभावित करतात हाच जनरल व्ही.के. सिंह यांच्या विधानाचा अर्थ होते.
भारतीय माध्यमात जनरल सिंह यांनी सांगितलेल्या प्रेस्टिट्यूट प्रवृत्तीच्या लोकांच्या अस्तित्वाची दोन उदाहरणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या फ्रांस दौर्‍यात दिसली. फ्रांसच्या भूमीवर पाय ठेवताच नरेंद्र मोदी यांनी ‘एनएम’ अक्षर लिहिलेली शाल पांघरलेले पत्रकारांनी आणि लोकांनीही पाहिले. कोणास ठाऊक कोठून पत्रकारांनी शोध लावला की, मोदी यांनी फ्रेंच कंपनी ‘लुई विटन’ची शाल पांघरली आहे. लगेचच पत्रकारांनी रागाच्या भरात मोदी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. कोणी त्याची किंमतीचा अंदाज लावला तर कोणी त्या शालीच्या लिलावाचा सल्ला दिला. तर कोण म्हणाला की मोदी विदेशी कंपनीची शाल पांघरुन ‘मेक इन इंडिया’ अभियान राबवणार आहेत काय? यातील कोणत्याही पत्रकाराने यातील सत्य समजाऊन घेण्याचा प्रयत्न केला नाही, मुळात पत्रकारितेतील मुलभूत सिद्धांत हाच आहे की, कोणतीही विधानं किंवा प्रसंगाची सत्यता पारखून पाहिली पाहिजे. मोदीच्या शाल पांघरण्याबाबतीत हे तत्व विशेषत: पाळणे आवश्यक होते. पण असे न करता मोदींवर आरोप केले जात होते. विशेष म्हणजे यात भारतीय पत्रकार आघाडीवर होते. याची सत्यता तपासून पहाण्याचे काम एका अन्य व्यक्तीने केले. त्यांनी ‘लुई विटल’ कंपनीला मोदी यांचा शाल पांघरलेला फोटो फाठवून पृछा केली की, काय आपली कंपनी असल्या शाली बनवते/विकते का? तर यावर कंपनीने खूलासा करत उत्तर दिले की, आम्हाला खेद आहे की आम्ही असल्या शाली बनवत नाही. ज्या कंपनीचे नाव घेऊन मोदींना आरोपीच्या पिंजर्‍यात माध्यमं उभा करु पाहात होती, दस्तूरखुद्द या कंपनीने हा खूलासा केल्यामुळे हे सगळे प्रेस्टीट्‌‌‌यूट माध्यमवाले तोंडघशी पडले. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हीच शाल जर्मनीतही परिधान केली. कदाचित मोदी यांनी आता ही शाल जाणून-बूजन पांघरली असेल, पाहू अजुन कोण माध्यमवाला खोटेनाटे आरोप करुन तोंडघशी पडतो का? पण एकदा तोंड काळे झाल्यानंतर या प्रेस्टट्यूटवाल्यांनी पुन्हा हिंम्मत केली नाही.
पंतप्रधान मोदी यांचा फ्रांस मधलाच एक फोटो चर्चेत आला. या फोटोत मोदी फ्रांसच्या प्रातिनीधिक मंडळाच्या बैठकीत बसलेले दिसत होते, पण ते बिना हेडफोन घातलेले दिसत होते. बस्स यावरुन एका पत्रकाराने अंदाजावरच ठरवून टाकले की मोदी फ्रेंच भाषा येत असल्याचा दिखावा करत आहेत. मोदी यांची सुपर पीएम म्हणून हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला. पण याच प्रातिनीधिक मंडळाच्या बैठकीतील परराष्ट्र सेवेतील अधिकार्‍याने या दूराग्रही पत्रकाराला सांगितले की, हेडफोन शिवाय कानात लावायचा इयरफोन नावाचा एक प्रकार असतो, तो मोदींनी घातला आहे. तो तुम्ही पलिकडच्या बाजूला जाऊन पाहिलात तर दिसेल. त्यावर या पत्रकाराने, ‘मी चेष्टा करत होतो’ अशी सारवा-सारव केली तर त्या परराष्ट सेवेतील अधिकार्‍याने उत्तर दिले की, जरा सभ्यतेने चेष्टा करायला शिका!
अशा पत्रकारांना जनरल व्ही.के. सिंह यांनी प्रेस्टीट्यूट म्हंटले तर काय बिघडले असा प्रश्‍न निर्माण होतो. या अशा काही पत्रकारांनी ऑपरेशन राहतच्या प्रेस्टीट्यूट प्रकरणात जनरल सिंह यांना मानसिक स्थिती खराब आहे, डिप्रेशनमध्ये आहेत, मुर्ख आहेत असे म्हणत जनरल सिंह यांच्यावर देशाला राग कमी आणि दया अधिक आली असेल अशी असंबद्ध विधाने केली. जनरल व्ही.के. सिंह यांनी यावर बोलताना म्हंटले आहे की, ‘शस्त्रास्त्र दलाल माझ्याविरुद्ध काही पत्रकारांना हाताशी धरुन हल्ले करत आहेत’. याविधानावर अजुन कोणी उत्तर दिलेले नाही. अशा विद्वानांना खरे तर जनरल सिंह यांनी योग्य नामाभिधान दिले आहे. हे देशाला लागलेले जळू आहेत. यांना राष्ट्रहिताशी काहीही देणं-घेणं नाही. फक्त विधानांचा विपर्यास्त करणे इतकच यांना हवं असतं. अशा पत्रकार आणि विद्वानांमध्ये स्वत:मधील प्रेस्टीट्यूट वृत्ती सिद्ध करण्याची जणू अहमहमिकाच लागली आहे. त्यामुळे आता या १० टक्के पत्रकारांनी कसं वागावं याचा धडा नव्याने घालून देण्याची जबाबदारी जनतेवरच येऊन पडली आहे. देशाच्या सुदैवाने जनता असल्या अनिष्ट वृत्ती ओळखून आहे.

0 comments:

Post a Comment