तडाखेबंद स्मृती!

•चौफेर : अमर पुराणिक•
विरोधकांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोही घोषणांच्या मुद्द्यावरुन केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांना लक्ष्य करुन गदारोळ केला. पण स्मृती इराणी यांनी विरोधकांच्या प्रश्‍नांना सडेतोड उत्तरं दिली. विरोधकांच्या प्रश्‍नांना म्हणण्यापेक्षा गोंधळाला म्हणाव लागेल. स्मृती इराणी यांनी अक्षरश: विरोधकांची पळता भुई थोडी केली, बहुसंख्य विरोधकांनी पळच काढला. सोशल मिडीयतून स्मृती इराणी यांचा लोकसभेतील भाषणाच्या त्या व्हिडीओचा अक्षरश: पाऊसच पडला.
बुधवारचा दिवस भारतीय संसदेच्या इतिहासात संस्मरणीय असाच ठरला. केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत ऐतिहासिक कामगिरी केली. संसदेच्या अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली. लोकसभेत आणि राज्यसभेतही विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. विरोधकांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोही घोषणांच्या मुद्द्यावरुन केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांना लक्ष्य करुन गदारोळ केला. पण स्मृती इराणी यांनी विरोधकांच्या प्रश्‍नांना सडेतोड उत्तरं दिली. विरोधकांच्या प्रश्‍नांना म्हणण्यापेक्षा गोंधळाला म्हणाव लागेल. स्मृती इराणी यांनी अक्षरश: विरोधकांची पळता भुई थोडी केली, बहुसंख्य विरोधकांनी पळच काढला. सोशल मिडीयतून स्मृती इराणी यांचा लोकसभेतील भाषणाच्या त्या व्हिडीओचा अक्षरश: पाऊसच पडला. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोशल मिडीयातील शेअर आणि लाईक केलेल्या व्हिडीओचा विक्रम मागे टाकला.  हजारो लोकांनी ते भाषण पाहून समर्पक प्रतिक्रिया देत स्मृती इराणी यांना आणि देशभक्तीला पाठींबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्मृती इराणी यांच्या लोकसभेतील भाषणावर ‘सत्यमेव जयते’ असा ट्वीट करुन अभिनंदन केले. दोन दिवस झाले तरीही सोशल मिडीयावर अजुनही स्मृती इराणीच व्यापल्या आहेत.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात कम्यूनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमात जो देशविरोधी घोषणा देण्याच्या अश्‍लघ्य प्रकार घडला त्यावरुन विरोधकांनी संसदेत गदारोळ घातला. विरोधकांनीच लोकसभेत या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली, चर्चेचा आग्रह धरला आणि जेव्हा स्मृती इराणी यांनी विरोधकांच्या प्रश्‍नाला तडाखेबंद उत्तरं द्यायला सुुरुवात केली तेव्हा त्यांना कॉंग्रेस सदस्य बोलू देत नव्हते. पहिल्यांदा गोंधळ घातला नंतर सभापतींकडे त्यांना बोलू देऊ नये असा घोषा लावला. पण सभापती सुमीत्रा महाजन यांनी ‘अब आप लोगोने छेडा है, तो आपको सुननाही पडेगा’ या शब्दात सुनावले. सभापतींच्या विनंतीकडे कानाडोळा करत विरोधकांनी स्मृती इराणींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पलायन केले. स्मृती इराणी यांनी अक्षरश: दुर्गेचं रुप धारण केलं. एकदा तर त्या इतक्या भावुक झाल्या की त्यांना रडु कोसळलं.
स्मृती इराणी यांनी जेव्हापासून केंद्रीय मानव संसाधन मंत्री म्हणून सुत्रं हाती घेतली तेव्हापासूनच त्यांना विरोधकांनी लक्ष्य बनवले आहे. त्यांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या कार्यक्षमतेपर्यंत अनेक आरोप त्यांच्यावर झाले आणि त्यांनी विरोधकांच्या आरोपावर जे आजपर्यंत खुलासे दिले त्यांना माध्यमांनी जनतेसमोर पोहोचू दिले नाही. शेवटी बुधवारी लोकसभेत विरोधकांनीच मागणी केल्यामुळे जनतेसमोर या आरोपांची उत्तर मांडण्याची सुवर्णसंधी स्मृती इराणी यांनी सोडली नाही. त्यांनी दोन वर्षांचा हिशेब चूकता करत सर्वच आरोपांचा समाचार घेत विरोधकांची बोलती बंद केली.
कॉंग्रेसच्यावतीने या वादाची सुरुवात ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली. पण जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील देशद्रोहींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जाऊन त्यांच्या देशद्रोहाचे समर्थन करणारे त्यांचे नेते राहूल गांधी यांची पाठराखण करण्याच्या नादात ज्योतिरादित्य शिंदे थेट म्हणाले की देशाविरोधात घोषणा देणे देशद्रोहाच्या श्रेणीत येत नाही. असे म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांनी आरोपी देशद्रोहींनाच क्लीनचीट दिली. त्यामुळेच स्मृती इराणी यांची तोफ धडाडू लागली. स्मृती इराणी म्हणाल्या की, सत्ता गेल्यामुळे कॉंग्रेस नेते सैरभैर झाले आहेत. त्यांना काय बोलावे, कशाचे समर्थन करावे याचे भान राहिले नाही. त्यांना देशप्रेम आणि देशद्रोह यातील फरकही समजेनासा झाला आहे. याच हडबडीतून असले वाह्यात युक्तीवाद कॉंग्रेसजन करत आहेत. स्मृती म्हणाल्या की, सत्ता तर इंदिरा गांधी यांच्या हातूनही गेली होती पण त्यांच्या मुलांनी कधी देशाच्या बर्बादीच्या घोषणांचे समर्थन केले नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या या प्रश्‍नावरून अक्षरश: स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसची पिसं काढली. विरोधकांनी केलेल्या चर्चेच्या आग्रहामुळे कॉंग्रेसची पापं बाहेर आली.
मुळात स्मृती इराणी यांना ज्या मुद्द्यांवरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला ती पाप कॉंग्रेसच्या कार्यकाळातच झाली आहेत. त्याचेच फलित म्हणजे जेएनयु प्रकरण आणि रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आहे. कॉंग्रेस नेते सोनिया गांधी, युवराज राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे यांना याचं भान राहू नये हे आश्‍चर्य म्हणावे लागेल. कारण हे प्रश्‍न संसदेत उपस्थित करुन कॉंग्रेसने राजकीय आत्महत्या केली आहे. कारण स्मृती इराणी ढीगभर पुरावे हातात घेऊनच बोलत होत्या. प्रत्येक आरोपांवर पुरावा सादर करुन त्या पापाचे धनी कॉंग्रेसच आहे हे त्यांनी सिद्ध केले. कॉंग्रेसने केलेली पापं भाजपाच्या माथी मारण्याचा डाव हाणून पाडत स्मृती इराणी यांनी स्वत:चे संसदपटुत्वही पुन्हा सिद्ध केले. विरोधकांनी १२  वी पास, ठुमका लगानेवाली अशी जी खालच्या पातळीची टीका केली, त्यांचा आजपर्यंत जो अवमान विरोधकांनी केला आहे त्याचा बदलाच घेण्याची संधी स्मृतींना मिळाली पण त्यांनी आपली पातळी न सोडता, अतिशय आक्रमक पण अतिशय संयंमीत भाषेत आपला प्रतिवाद केला हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
राहुल गांधी राजकीय संधी नसेल तर असल्या ठिकाणी जात नाही. राहुल गांधी कोठे तरी दोन वेळा गेले आहेत काय? असा सवाल उपस्थित करुन स्मृतींनी राहुल गांधी यांनी राजकीय संधीसाधूपणाही उघड केला. स्मृती इराणी संघाचा अजेंडा राबवत आहेत, शिक्षणाचे भगवेकरण करत आहेत या ही आरोपाला स्मृतींनी बिनतोड उत्तरं पुराव्या सह दिली. शिवाय ४ थी आणि ६ वीच्या विद्यार्थ्यांना काय शिकवले जातेय याचेही पुरावे सादर केले. कोवळ्या वयातील मुलांच्या मानवर काश्मिर हा भारताचा भाग नाही हे ठसवलं जातयं यावरही स्मृती यांनी खंत व्यक्त केली. तिस्त सेटलवाडसारख्या सेक्यूलर म्हणुन मिरवणार्‍या छुप्या देशद्रोही व्यक्तीने लिहीलेले धडे या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत यापेक्षा दु:खद गोष्ट काय असु शकते? खरे तर स्मृती इराणी यांनी असल्या आरोपांना न जुमानता शैक्षणिक पद्धतीत आणि अभ्यासक्रमात बदल करवेत.
व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर अनिर्बंध स्वातंत्र्य उपभोगणार्‍यांना किमान देशहिताचे भान असणे आवश्यक आहे. ९ फेब्रुवारी रोजी एका संस्थेत ‘महिषासुर शहिद दिन’ साजरा केला गेला. खरे तर हा दुर्गामातेचा अपमान आहे. स्मृती इराणी यांनी इतका प्रश्‍न उपस्थित केला की ‘महिषासुर शहिद दिन’ म्हणजे काय? तर कॉंग्रेसने स्मृती इराणी यांनी संसदेत दुर्गामातेचा उल्लेख करुन दुर्गेचा अपमान केला आहे आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. काय या देशाचे दुर्दैव पहा की, महिषासुराचा वध करणार्‍या दुर्गेचा संसदेत सन्मानपुर्वक उल्लेख करणे अपमान होतो आणि महिषासुराचा शहिद दिन साजरा करणे राष्ट्रप्रेम होते! अशी विक्षिप्त भुमिका घेणार्‍या कॉंग्रेस आणि डाव्यांना जनताच योग्य उत्तर देईल. खरे तर जनतेने त्याच राष्ट्रद्रोहीवृत्तीचे उत्तर म्हणून कॉंग्रेसला सत्ताच्यूत केले आहे पण अजूनही कॉंग्रेसच्या हे लक्षात येत नाही. बुडत्याचा पाय खोलात अशीच स्थिती कॉंग्रेसची झाली आहे. असल्या देशद्रोही कृत्याचे समर्थन करणे कॉंग्रेसला महागात पडणार आहे हे मात्र नक्की. येत्या निवडणुकीत कॉंगेसला याहून मोठी किंमत मोजावी लागेल.

0 comments:

Post a Comment