सेलिब्रिटींच्या स्वैराचाराचे बळी, रविंद्र पाटील!

•चौफेर : अमर पुराणिक•
सलमान खानच्या बिईंग ह्युमनची, अमिर खानच्या सत्यमेव जयतेची तारिफ करताना प्रसार माध्यमे थकत नाहीत. माध्यमांनी यांच्या शुल्लक गोष्टींना देमार प्रसिद्धी दिली. पण रविंद्र पाटील यांची दखल कोणी घेतली नाही. आज भारतात रविंद्र पाटील यांच्यासारखे अनेक लोक आहेत. पण त्यांना आणि सत्याला वाली कोणी राहिला नाही. आपली व्यवस्था सत्याची कास पकडणार्‍यांच्या जीवनाचे मातेरे करते. सलमान खानला झालेल्या शिक्षेमुळे जनतेत अजुनही न्याय शिल्लक आहे अशी भावना निर्माण झाली ही जमेची बाजू आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी अभिनेता सलमान खानच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणात न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवले आहे. हा निर्णय आल्यानंतर सलमान खान सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पण या चर्चेत त्यांचा आवाज दबला गेला आहे जे या प्रकरणाशी संबंधित होते आणि त्यांच्या आयुष्याची माती झाली. बहूदा असे होते की, मोठी व्यक्ती किंवा सेलीब्रिटी व्यक्तीचा संबध अशा गुन्ह्यासंदर्भात येतो तेव्हा सामान्य माणसाचा आवाज दबला आणि दाबला जातो. अशा व्यक्तींसमोर जेव्हा सामान्य माणूस प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने उभा राहतो तेव्हा असल्या तथाकथित प्रतिष्ठित लोकांच्या पायाखाली चिरडला जातो. याचे उदाहरण आहेत पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र पाटील!
या प्रकरणात न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवल्यानंतर सलमान खानचे चाहते खूप नाराज झाले त्यांनी सोशल मिडीयातून आपला राग आणि नाराजी व्यक्त करत सलमान खानने केलेल्या सामाजिक कार्याचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. बिईंग ह्यूमनच्या माध्यमातून सलमान खानने चांगले काम केलेलेही असेल पण, जे जीव सलमान खानच्या बेपर्वा आणि बेजबाबदार वागण्यामूळे गेले ते परत येणार नाहीत. सलमानला या घटनेनंतर उपरती झाली आणि त्याने आपले पाप धूण्यासाठी अनेक सत्कर्मे केली आणि त्या सत्कर्मांचे माध्यमानी जोरदार मार्केटींग केले. या घटनेशी साधर्म्य असणारी एक पोस्ट माझ्या एका फेसबुक फ्रेंडने टाकली होती. ‘आज गल्लीतला एक दारुडा देवळासमोर गरजुंना वडापाव वाटताना दिसला. मी आश्‍चर्याने पहातेय हे पाहून म्हणाला की, ‘मी ही कधी कधी पिऊन सायकल चालवतो नं ताई...!’ गल्लीतल्या दारुड्‌याला ही अशी उपरती होत असते. आपल्या हातून आधी काही पापे घडलेली असतील व भविष्यात असं काही घडू शकत म्हणून आपली पापे धुवायला तोही सत्कर्मे करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे यातून काही पुण्यकर्म केली की पाप करायला मोकळे, अशी मानसिकता दिसून येते. असे चित्र समाजात आपल्याला जागो जागी पहायला मिळते. तेच अतिशय मार्मिकपणे, उपरोधितपणे आणि प्रसंगावधान राखुन या फेसबुक पोस्टमधून प्रकट केले आहे.
सलमान खानने अनेक सामाजिक कामे केली आहेत, गरजुंना मदत केली आहे यात दूमत नसेलही. पण हीच संवेदनशीलता त्याने या घटनेपुर्वी ठेवली नाही आणि स्वैरपणे वागत एकाचा अपघातात बळी घेतला तर एकाच्या आयुष्याचे नंतर वाटोळे केले. केवळ सलमान खानच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी असे स्वैरपणे वागत समाजाला उपद्रव दिला आहे. सलमान बिईंग ह्यूमनच्या माध्यमातून समाजसेवा करतो तर अमिर खान कोट्‌यवधी रुपये घेऊन ‘सत्यमेव जयते’सारखे कार्यक्रम करुन लोकांना उपदेशाचे डोस पाजतो. हा देखिल पश्‍चातापाचा किंवा उपरतीचाच प्रकार आहे. याशिवाय अनेक गुन्हेगारीवृत्तीचे व्हाईट कॉलर्ड लोक, सेलिब्रिटीजचा हा खरा चेहरा आहे. केवळ संजय दत्त, सलमानच्या माध्यमातून तो समाजासमोर आला आहे इतकेच.
सलमानच्या या प्रकरणातील मुख्य साक्षीदार पोलिस कॉन्स्टेबल कै. रविंद्र पाटील यांच्याबाबतीत असेच झाले आहे. ते अशा मोठ्‌या व्यक्तीच्या दबावाचे बळी ठरले आहेत. रविंद्र पाटील तेव्हा सलमान खानचे अंगरक्षक होते आणि या घटनेच्यावेळी ते सलमान खानच्या कारमध्ये होते. या घटनेत सलमान खानवर आरोप आहे की, त्याने सप्टेंबर २००२ मध्ये मद्यपान करुन कार चालवत फुटफाथवर घातली आणि एका दूकानाला धडकली. यात फुटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अन्य चार लोक जखमी झाले. यात सलमान खानने न्यायालयात आपली बाजु मांडली. नुकताच या प्रकरणाचा निकाल लागला आहे. यात सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड झाला आहे.
ही घटना १३ वर्षे जुनी आहे. या संपुर्ण प्रकरणात चार साक्षीदार आहेत. ज्यांनी वेळोवेळी या घटनेसंदर्भात साक्ष नोंदवली आहे. यातील पहिले साक्षीदार होते पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र पाटील. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अपघातानंतर त्यांनी सलमान खान विरुद्ध एफआयआर दाखल केली होती. त्यांनी सलमानवर दारु पिऊन गाडी चालवल्याचा आरोप लावला होता. नोंदीप्रमाणे रविंद्र पाटील या घटनेच्यावेळी सलमान खान याच्या सोबत गाडीत मागच्या सीटवर बसले होते. दुसरा साक्षीदार आहे कमाल खान, जो सलमान खानचा चांगला मित्र आहे. कमाल खानही या अपघाताच्यावेळी गाडीत होता आणि कमाल खान याने जबाब दिला आहे की, गाडी सलमान खानच चालवत होता. अशोक सिंह या पुर्ण प्रकरणातील असे साक्षीदार आहेत की, जे सन २०१५ मध्ये न्यायालयासमोर आले. त्यांनी साक्ष दिलीय की, गाडी सलमान खान चालवत नव्हते तर ते स्वत: चालवत होते. अशोक सिंह यांनी आपल्या साक्षीत म्हटले आहे की, ‘मी ड्रायव्हिंग करत होतो आणि हा अपघात गाडीचे टायर फुटल्यामुळे झाला’. चौथे साक्षीदार आहेत, रामआसरे पांडे, हे या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचे साक्षीदार मानले जात होते पण ऐनवेळी त्यांनी आपली साक्ष बदलली. जेव्हा अपघात झाला तेव्हा पांडे बेकरीसमोर झोपले होते. त्यांनी पहिल्यांदा साक्ष दिली होती की अपघात झाल्यानंतर ड्रायव्हिंग सीटकडून सलमान खान बाहेर आला. पण नंतर त्यांनी सलमान खानला गाडी चालवताना पाहिले नाही अशी साक्ष दिली.
यातील सर्वच साक्षीदारांवर मोठा दबाव होता. विशेषत: पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र पाटील यांच्यावर तर सर्वात जास्त दबाव होता. या दबावामुळे त्यांची साथ पोलिस विभागाने सोडली. पहा कसा दैवदूर्विलास आहे, जेथे आरोपी तुरुंगामध्ये असायला हवा तेथे तक्रारकर्ता रविंद्र पाटील यांनाच तुरुंगात डांबण्यात आले. त्यांना यामुळे नोकरीही सोडावी लागली. रविंद्र पाटील यांना अनेक त्रासातून जावे लागले, टॉर्चर आणि डिप्रेशनचा सामना करावा लागला पण त्यांनी आपली साक्ष बदलली नाही. पाटील यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागले, प्रचंड तणाव आणि दारिद्र्याचा सामना करावा लागला. काही लोकांनी पाहिले आहे की, रविंद्र पाटील आपल्या शेवटच्या काळात मुंबई स्टेशनवर भीख मागत होते, अपघातानंतर ५ वर्षानंतर २००७ मध्ये रविंद्र पाटील यांचे टीबीने निधन झाले. ही अतिशय धक्कादायक बातमी होती की ज्या व्यक्तीने सलमान खान विरुद्ध न्यायालयात साक्ष दिली त्याच्या विरुद्धच पोलिसांनी वॉरंट काढले होते. कारण ते न्यायालयात सुनवाईला हजर नव्हते. दबक्या आवाजात लोक बोलतात की एक निडर सामान्य पोलिस बॉलीवुडच्या बड्‌या व्यक्तीविरुद्ध उभे राहिल्याने असेच होते.
सलमान खानच्या बिईंग ह्युमनची, अमिर खानच्या सत्यमेव जयतेची तारीफ करताना प्रसार माध्यमे थकत नाहीत. माध्यमांनी यांच्या शुल्लक गोष्टींनाचा देमार प्रसिद्धी दिली. पण रविंद्र पाटील यांची दखल कोणी घेतली नाही. आज भारतात रविंद्र पाटील यांच्यासारखे अनेक लोक आहेत. पण त्यांना आणि सत्याला वाली कोणी राहिला नाही. आपली व्यवस्था सत्याची कास पकडणार्‍यांच्या जीवनाचे मातेरे करते. सलमान खानला झालेल्या शिक्षेमुळे जनतेत अजुनही न्याय शिल्लक आहे अशी भावना निर्माण झाली ही जमेची बाजू आहे. पण सामान्यांत विशेषत: सोशल मिडीयावर सलमानला उच्च न्यायालयात तात्काळ मिळालेल्या जामीनीमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अशा व्हाईट कॉलर्ड गुन्हेगारांना सर्वोच्च न्यायालय योग्य शिक्षा देईलच पण समाजात हा विचार रुजणे गरजेचे आहे की गुन्हेगार तो गुन्हेगारच असतो मग तो कितीही मोठा व्यक्ती असुद्यात. मग तो नेता असु दे किंवा अभिनेता असु दे, न्याय सर्वांसाठी सारखाच आहे हा विश्‍वास समाजात निर्माण होणे आवश्यक आहे.

0 comments:

Post a Comment