अंधश्रद्धा निर्मूलनाचे सेक्यूलर कंत्रादार

•चौफेर : अमर पुराणिक•
भारत स्वातंत्र झाला तेव्हा जवाहरलाल नेहरु यांनी ज्योतिषांच्या सल्ल्यावरुन मध्यरात्रीची वेळ निवडली होती. हे या सेक्यूलर लोकांना चालते पण स्मृती इराणी यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात ज्योतिषाचा सल्ला घेतला तर मात्र इतका मोठा वादाचा मुद्दा होतो. चमत्कारातून मिळालेले संतपद ‘गुडन्यूज’चा विषय होतो; अन्, स्मृती इराणी यांचे ज्योतिषाकडे जाणे बँडन्यूज ठरते. यालाच सेक्युलर दुट्टपीपणा म्हणतात. आज अमेरिका आणि युरोप मध्येच जवळ जवळ १०० च्या आसपास विद्यापीठात संस्कृत अध्ययन आणि त्या अनुषंगाने संशोधन पण चालू आहे. पण भारतात त्याचा उच्चारही चालत नाही.

केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी गेल्या रविवारी राजस्थानातील भिलवाडा येथील कारोई गावातील प्रख्यात ज्योतिषी पं. नाथुलाल व्यास यांची  त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. आणि तथाकथित सेक्यूलर माध्यमांचा थयथयाट सुरु झाला. भूकेल्या माध्यमांना रवंथ करायला एक विषय मिळाला. माध्यमांनी भाजपा नेत्या स्मृती इराणींवर हल्ले सुरु केले. त्यांना दांभिक ठरण्याची चढाओढ सुरु झाली. स्मृती इराणी यांना त्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्याबद्दल बोलू लागले. राजनेत्यांचे राजकीय आणि खाजगी जीवन यात हे सेक्यूलर मिडियावाले नेहमी प्रमाणे गल्लत करु लागले.
अनेकांनी त्यांना त्यांची कर्तव्यं सांगण्यास सुरुवात केली. की त्या देशाच्या मंत्री आहेत. त्यांनी शिक्षणासाठी योग्य वातावरण निर्माण करावे. वैज्ञानिक आणि तार्किक विचारांना गती देणारी शैक्षणिकनीती लागू करुन देशाच्या बालकांना अंधश्रद्धेपासून दूर करण्याचे सोडून स्मृती इराणी या बालकांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटत असल्याचाही आरोप झाला. स्वत:चे भवितव्य सुरक्षित करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तसाच तो स्मृती इराणंी यांनाही आहे. ज्योतीषशास्त्रावर आस्था ठेवणे, आपल्या कुटूंबाच्या कल्याणाकरता, मनशांती करता पूजा अर्चा करणे हे प्रत्येक हिंदूधर्मियांच्या आस्थेचे विषय आहेत. असे असताना सार्वजनिक पदावर असल्याचे सांगून त्या धर्म आणि ज्योतिषाचा आधार घेत असल्याचा आरोप केला गेला.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा या आजच्या मानवी जीवनातील अविभाज्य बाबी  आहेत. हिंदू, मुसलमान, ख्रिश्‍चन, ज्यू आदी सर्वच धर्मांवर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा पगडा आहे. पण विरोध केवळ हिंदूनाच केला जातो. मुळा आजचा बहूसंख्य सुसंस्कृत हिंदू हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक जाणतो. तो विज्ञान आणि धर्म यांची योग्य सांगड घालतो. पण तरीही या सेक्यूलरांच्या पोटात हिंदूद्वेशाची मळमळ सुरु असते. मुस्लिम, ख्रिश्‍चन धर्माविरोधात बोलताना ही सेक्यूलर मंडळी दिसत नाहीत. किंबहूना त्यांच्या विरुध्द बोलण्याची त्यांची हिंमत नाही. यात हिंदू हेच सॉफ्ट टारगेट आहेत. परदेशी कंपन्या, एनजीओंची तळी राखणारी ही मंडळी सेक्यूलर बुरखा पांघरुण हिंदूंना श्रद्धा आणि अंधश्रद्धेचे हितोपदेश देऊ पहात असतात.
मुळात ज्योतिषाशास्त्र हे शास्त्रीय आहे की नाही हा वाद गेले अनेक वर्षांपासून सुरु आहे. अनेक ज्येष्ठ वैज्ञानिक, संशोधक हे ज्योतिषशास्त्र शास्त्रीयअसल्याचे मान्य करतात. असे असतानाही तथाकथिक सेक्यूलर मंडळी मात्र ज्योतिषशास्त्राला अशास्त्रीय ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे का तर, केवळ हिंदूधर्माप्रती असलेली द्वेषाची भावना आणि उतु जाणारे सेक्यूलर प्रेम. यातूनच स्मृती इराणी ज्योतिषाकडे गेल्याचा विनाकारण कांगावा माध्यमांनी केला. आणि तो इतका केला की तो देशापूढील यक्षप्रश्‍नच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच काळात ऑस्ट्रलिया, म्यानमार, नेपाळचा दौरा केला. यात अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. या बातम्या माध्यमांना राष्ट्रहिताच्या न वाटता स्मृती इराणी ज्योतिषाकडे गेल्या ही बातमी महत्त्वाची वाटते. भविष्य पहाणे किंवा न पहाणे हा पुर्णपणे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. असे असताना माध्यमांनी याचे वीट येऊपर्यंत चर्वण केले.
यावर एक महत्त्वाचे उदाहरण देता येईल. हजारो वर्षांपुर्वी भारतीय  ॠषी-मुनींनी नव ग्रहांचा शोध लावला त्यांत त्यांनी संागितले होते की पृथ्वी गोल आहे. त्यांचे अक्षांश, रेखांश, क्षेत्रफळ आदी आपल्या महान ॠषी-मुनींनी सांगितले होते. भरती-ओहोटीचे संशोधन आणि त्याची कारणे देखील जुन्या धर्मग्रंथात विषद केली आहेत. अनेक ज्योतिषशास्त्रांच्या ग्रंथातून याचा उहापोह केला आहे. पण असे असले तरी पाश्‍चिमात्य मानवाने विशेषत: ख्रिश्‍चन, मुस्लिम यांनी पृथ्वी गोल असल्याचे सामान्यपणे मान्य केले नव्हते. अशास्त्रीय असले तरी त्यांचे धर्मग्रंथ जे सांगतात तेच शास्त्रीय असल्याचा त्यांचा दावा होता. पृथ्वी सपाट असल्याचे बॅबिलोनियन, ऱोमन, ग्रीक व हिब्रू लोक मानीत असत. बॅबिलोनियन पृथ्वी सपाट तर ग्रीक ती बशीसारखी असल्याचे मानीत. अनेक पाश्‍चिमात्य संशोधकानीही पृथ्वी गोल असल्याचे नंतरच्या काळात निदर्शनास आणून दिले. सोळाव्या शतकात प्रत्यक्ष पृथ्वी-प्रदक्षिणा केली गेली तरीही हे तेव्हाचे तथाकथित पुढारलेले लोक पृथ्वी गोल असल्याचे मान्य करायला तयार नव्हते. अनेक शतकांपुर्वीपासून पृथ्वी गोल आहे हे सांगणार्‍या हिंदू ॠषी-मुनींना अनेक शतके मुर्ख ठरवले, भारतीयांना मागास ठरवून भारतीयांची टर उडवली गेली होती. १६-१८ व्या शतकात आयझॅक न्यूटन यांनाही मुर्ख ठरणारे हे महाभाग होते. हिंदु संस्कृती, ग्रंथ, संशोधन हे झूठ असल्याचा अनेक वर्षे कांगावा केला गेला. पण सत्य लपून रहात नाही. शेवटी सत्य मान्य करावे लागले.
 मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी या ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य पहातात या मुद्याचे हे समर्थन नव्हे तर तो इराणी यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. भारत स्वातंत्र झाला तेव्हा जवाहरलाल नेहरु यांनी ज्योतिषांच्या सल्ल्यावरुन मध्यरात्रीची वेळ निवडली होती. हे या सेक्यूलर लोकांना चालते पण स्मृती इराणी यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात ज्योतिषाचा सल्ला घेतला तर मात्र इतका मोठा वादाचा मुद्दा होतो. चमत्कारातून मिळालेले संतपद ‘गुडन्यूज’चा विषय होतो; अन्, स्मृती इराणी यांचे ज्योतिषाकडे जाणे बँडन्यूज ठरते. यालाच सेक्युलर दुट्टपीपणा म्हणतात. आज अमेरिका आणि युरोप मध्येच जवळ जवळ १०० च्या आसपास विद्यापीठात संस्कृत अध्ययन आणि त्या अनुषंगाने संशोधन पण चालू आहे. पण भारतात त्याचा उच्चारही चालत नाही. स्मृती इराणी यांनी ख्रिस्ती मिशनरी ज्योतिष्याची भेट घेतली असती तर त्या सेक्युलर ठरल्या असत्या, त्यांचा उदो उदो झाला असता.
जर्मन विषयाऐवजी संस्कृत विषय शिक्षणात अनिवार्य करण्याचा स्मृती इराणी यांच्या निर्णयाचाही असाच विनाकारण गवगवा करण्यात आला. केंद्रीय विद्यालयांमध्ये तिसरी भाषा म्हणून जर्मनऐवजी संस्कृतचा समावेश करण्यावर आपण ठाम आहोत. पण, विदेशी भाषा म्हणून जर्मन यापुढेही शिकता येईल, असे स्मृती इराणी म्हणाल्या होत्या. पण विरोधक स्मृती इराणींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  प्रतिनिधी असल्याचा आणि शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा आरोप करत होते. ते लोक सरकारच्या चांगल्या कामामुळे त्रस्त झाले आहेत आणि जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संस्कृत भाषेची सक्ती करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. संस्कृतसाठी माझा आग्रह आहे, पण सक्ती नाही, असेही स्मृती इराणीनी सांगितले. यावर काही माध्यम सम्राटांनी स्मृती इराणी यांना अनाहूत सल्ले देण्याचा प्रयत्न केला. अमेठी मतदार संघातून निवडणूक हरलेली असतानाही अनुभव नसतानाही मोदी यांनी स्मृतींना मानव संसाधन मंत्रालय दिले. हे मंत्रालय अतिशय जबाबदारीचे काम आहे. त्यांचे शिक्षणही कमी आहे. असे असताना त्यांनी आपल्या कामात लक्ष घालण्याचा सल्ला दिला गेला. माध्यमांनी केवळ टीआरपी वाढण्यासाठीच स्मृती इराणींचा हा विषय ऐरणीवर घेतला. त्याला इतके महत्त्व दिले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रलिया दौर्‍यातील मिळवलेले यश, भारताचे निर्माण झालेले आंतराष्ट्रीय वजन झाकण्याचा प्रयत्न या माध्यमांनी केला आणि इराणी यांना आपल्या मंत्रालयाचे दायित्व आणि शिक्षणासारख्या महत्त्वपुर्ण क्षेत्राकडे लक्ष पुरवण्याचा फुकटचा सल्लाही देऊन टाकला. देशाच्या शिक्षणमंत्री असलेल्या इराणी यांनी विज्ञानावर विश्‍वास ठेवायचा सोडून अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर दांभिकतेचा आरोप केला आणि देशाचे भवितव्य अंधकारमय असल्याचे प्रमाणपत्रही देऊन टाकले.
अशी विकृत माध्यमे असताना देशाची काय गती होणार असा प्रश्‍न पडतो. पण देशवासीय माध्यमांचे हे सर्व विकृतचाळे जाणून आहेत. स्मृती इराणी अनानूभवी असल्यातरीही त्यांचा कामाचा उरक आणि समर्पण त्यांना मोठे यश देईल यात शंका नाही. संस्कृत ही आपली देवभाषा आहे. त्या संस्कृतसाठी स्मृती अग्रही राहिल्या आहेत. हाच त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा आणि विकासरत असल्याचा पुरवा आहे. तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलनाचे सेक्यूलर कंत्रादार कोण कोण आहेत हे जनता ओळखते. त्यामुळे स्मृती इराणींवर कॉंग्रेस व माध्यमांनी केलेला आरोप जनताच उधळून लावेल. यापूढे ही जनता असले खोटे आरोप आणि षडयंत्रांना बळी पडणार नाहीत. जनतेला आता राष्ट्रहीत आणि स्वहीत चांगले कळू लागले आहे.

0 comments:

Post a Comment