हेलिकॉप्टर घोटाळ्याचे ‘गांधी’कनेक्शन!

•चौफेर : अमर पुराणिक•
मागे हिवाळी अधिवेशनात नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिल्यावरून गोंधळ घालून संसदेचे कामकाज चालू दिले नाही. आता ऑगस्टा वेस्टलँड व्हिव्हिआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन गोंधळ घालून उन्हाळी अधिवेशनाचे दुसरे सत्र वाया घालवणार हे निश्‍चित. या जोडीला इरशत जहां प्रकरण, एअरसेल मॅक्सीस सौदा प्रकरण आदी प्रकरणेही आहेतच. एकंदर सध्या कॉंग्रेसची स्थिती अशी आहे की, प्रचंड भ्रष्टाचार करुन वर पुन्हा साजुक असल्याचा आव आणून देशाचे पुन्हा नुकसान करणार. ‘पडले तरी नाक वर’ या म्हणीप्रमाणे कॉंग्रेसची सध्याची राजकीय भूमिका आहे.  पण यावेळी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरचा पंखा सोनिया गांधींचा व कॉंग्रेसचा गळा कापणार हे निश्‍चित.
ज्येष्ठ भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची नुकतीच राज्यसभेवर निवड झाली. त्याच दरम्यान इटलीतील न्यायालयाच्या निर्णयामुळे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याला नवे वळण लागले. हा केवळ योगायोगच म्हणायचा. २०१० साली कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकारने १२ ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा सौदा केला होता. हा सौदा ३,६०० कोटी रुपयांचा होता. या वादग्रस्त सौद्यात १० टक्के रक्कम लाच म्हणून दिली गेल्याचे समोर आले होते. त्यावेळी एअर चिफ मार्शल एस पी त्यागी यांच्यासह १३ लोकांवर गुन्हे दाखल झाले होते.
आतापयर्र्त कॉंग्रेस नेत्यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आली आहेत. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा, आदर्श घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा, सिंचन घोटाळा, टाट्रा ट्रक घोटाळा, नॅशनल हॅराल्ड घोटाळा अशी भली मोठी घोटाळ्यांची यादीच आहे. जोपर्यंत घोटाळे उघड होत नाहीत, तोपर्यंत कॉंग्रेस नेते स्वत प्रामाणिक असल्याचे दाखवत मिरवत असतात. पण जेव्हा घोटाळे उघडकीस येतात तेव्हा संबंधित मंत्री भ्रष्ट असल्याचे दाखवले जाते. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी मात्र कायमच स्वत:ला धुतल्या तांदळाचे असल्याचे ठरवून मोकळे झाले आहेत. खरे तर कॉंग्रेसच्या संपुआ सरकार काळात जितकेही भ्रष्टाचार झाले त्यापैकी बहुसंख्य घोटाळ्यांचे मुख्य सुत्रधार सोनिया, राहुल आहेत. पण ‘सापडला तो चोर’ या उक्तीप्रमाणे जर घोटाळे उघडकीस आले तर संबंधित कॉंग्रेस नेते गुन्हेगार ठरले पण कॉंग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी आणि सेक्यूलर माध्यमांनी मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना त्याची झळ लागु दिली नाही. याचा अर्थ मलई खायला सोनिया आणि राहुल आहेत आणि सापडल्यानंतर मात्र बळीचे बकरे सुरेश कलमाडी पासून पी. चिदंबरम, मनमोहन सिंग पर्यंत अनेक नेते आहेत.
डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आजपर्यंत अनेक प्रकरणात सोनिया, राहुल आणि गांधी कुटुंबियांनची भ्रष्ट लख्तरं बाहेर काढली आहेत. दोन महिन्यांपुर्वीच नॅशनल हॅराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. तर सोनिया, राहुल आणि कॉंग्रेस नेत्यांनी प्रचंड थयथयाट करुन गोंधळ घातला, संसद ठप्प केली. न्यायालयीन निर्णयाला राजकीय सुड म्हणत भाजपाला धारेवर धरत संसदच वेठीस धरली होती. आता ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यावरुन कॉंग्रेस नेत्यांचा गोंधळ सुरु झाला आहे.
इटलीतील न्यायालयाने ऑगस्ट वेस्टलँडचा प्रमुख गुइसेपे ओरसी याने भारतातील नेत्यांना आणि अधिकार्‍यांना लाच दिल्याने दोषी अढळला आणि त्याला न्यायालयाने साडे चार वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. इटलीतील या न्यायालयाच्या दस्तावेजात ‘सिनगोरा’ गांधी अर्थात सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पाच नेत्यांचा उल्लेख केला आहे. इटलीच्या भाषेत सिनगोरा हा शब्द ‘श्रीमती’ अशा अर्थाने वापरला जातो. न्यायालयाने हे मान्य केले आहे की, या घोटाळ्यात दलाली केलेल्या भारतीय नेते  व अधिकार्‍यांना १२० ते १२५ कोटी रुपयांची लाच दिली गेली आहे.
भारतीय वायुसेनेसाठी भारताने १२ हेलिकॉप्टर खरेदीचा व्यवहार ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर बनविणार्‍या कंपनीशी केला. या कंपनीचे नाव फिनमेक्कानिक असे आहे. या व्यवहारात घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर १२ एडबल्यू-१०१ व्हिव्हिआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीचा करार भारत सरकारकडून फेब्रुवारी २०१३ मध्ये थांबवला गेला. जेव्हा करार थांबवण्याचा आदेश जारी केला होता तेव्हा भारत सरकारने ३० टक्के रक्कम खरेदी पोटी दिली होती आणि आणखीन ३ हेलिकॉप्टरसाठी रक्कम भरण्याची प्रक्रिया सुरु होती. तिकडे इटलीत न्यायालयात ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर विक्रीत भ्रष्टाचार करुन चूकीचे अकांऊटीग सादर केल्याबद्दल फिनमेक्कनिकाचे माजी प्रमुख गुईसेपे ओर्सी आणि ऑगस्ट वेस्टलँडचे माजी सीईआ बुर्नो स्पागनोलीनी यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले. त्याचाच निकाल देत इटलीच्या मिलान न्यायालयाने साडे चार वर्षांची कैदेची शिक्षा ठोठावली. या दोघांवर आंतरराष्ट्रीय भ्र्रष्टाचार आणि भारताच्या नेत्यांना आणि अधिकार्‍यांना जवळजवळ ४,२५० कोटी रुपयांची लाच देऊन बनावट बिलं बनवण्याचा आरोप होता.
या व्हिव्हीआयपी हेलिकॉप्टर ऑगस्टा वेस्टलँडच्या खरेदीची निविदा मंजूर करण्यासाठी, ५३ कोटी डॉलरचा ठेका मिळवण्यासाठी साधारणपणे १२५ कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपात ऑगस्ट वेस्टलँडच्या दोन अधिकार्‍यांना शिक्षा झाली आहे. अनेक आंतरराष्टीय वृत्तपत्रात निकालाची माहितीही प्रसिद्ध झाली आहे. इटलीतील मिलान येथील न्यायालयाच्या दस्तवेजात म्हंटले आहे की लाच दिल्याचे ठोस पुरावे आहेत. भारताच्या माजी वायुसेनाप्रमुख एस पी त्यागी यांना पैसे मिळाल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. न्यायालयाने सांगितले आहे की कशा पद्धतीने कंपनीने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या निकटवर्ती सहकार्‍यांशी लॉबिईग केले. या शिवाय कंपनीने एम के नारायण, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशीही लॉबिईंग केले. न्यायाधिशांनी या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यापाठीमागे मुख्य व्यक्ती सोनिया गांधी असल्याचे म्हंटले आहे. इटली कोर्टाच्या दस्तावेजात सिगनोरा(श्रीमती) सोनिया गांधी यांचे नाव ४ वेळा आले आहे तर २ वेळा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे शिवाय ऑस्कर फर्नांडिस व एम के नारायणन यांचेही नाव आहे.
आता इतकं सगळं झाल्यानंतर भारतात गदारोळ होणे सहाजिकच आहे. भाजपाने संसदेत या मुद्द्यावर कॉंग्रेसला घेरणेही स्वाभाविक आहे. भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी राज्यसभेत नुसते सोनिया गांधी यांचे नाव इटलीतील कोर्टाच्या दस्तावेजात असल्याचे सांगितले तर लगेच कॉंग्रेस खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घालायला सुुरुवात केली. त्यामुळे राज्यसभा १२ वाजेपर्यंत तहकुब केली गेली. नंतर भाजपा खासदार मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की कॉंग्रेस अराजकता पसरवते आहे, ‘घुस देनेवाले जेल मे है और घुस लेनेवाले वेल मे है’ असा टोला लगावला. येत्या आठवड्‌यात संसदेचे कामकाज या मुद्द्यावरून ठप्प होणार हे स्पष्टच आहे. यालाच म्हणतात ‘चोराच्या उलट्‌या बोंबा’. या प्रकरणात कदाचित कॉंग्रेसकडून सर्व आरोप माजी वायुसेनाप्रमुख त्यागी यांच्या माथी मारुन सोनिया गांधी स्वच्छ असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागे हिवाळी अधिवेशनात नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिल्यावरून गोंधळ घालून संसदेचे कामकाज चालू दिले नाही. आता ऑगस्टा वेस्टलँड व्हिव्हिआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन गोंधळ घालून उन्हाळी अधिवेशनाचे दुसरे सत्र वाया घालवणार हे निश्‍चित. या जोडीला इरशत जहां प्रकरण, एअरसेल मॅक्सीस सौदा प्रकरण आदी प्रकरणेही आहेतच. एकंदर सध्या कॉंग्रेसची स्थिती अशी आहे की, प्रचंड भ्रष्टाचार करुन वर पुन्हा साजुक असल्याचा आव आणून देशाचे पुन्हा नुकसान करणार. ‘पडले तरी नाक वर’ या म्हणीप्रमाणे कॉंग्रेसची सध्याची राजकीय भूमिका आहे. पण यावेळी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरचा पंखा सोनिया गांधींचा व कॉंग्रेसचा गळा कापणार हे निश्‍चित.

0 comments:

Post a Comment