स्वा. सावरकरांचे समुद्रसाहस: शोध आणि बोध

 •विक्रम श्रीराम एडके -
हे योग्य नाही मित्रहो! आपल्याकडील सर्वच महापुरुषांच्या चरित्रात सहस्रावधी पे्ररणास्रोत आहेत. द्वेष करण्या, बोलण्या, पाहण्यापेक्षा उठा, जागे व्हा आणि त्या प्रेरणास्रोतांचा शोध घ्या. आचरणात आणा. स्वत: तर सामर्थ्यशाली व्हाच, पण देशालाही शक्तीशाली बनवा. स्वा. सावरकरांच्या रोमहर्षक चरित्रातला एक पैलू मी आज तुमच्यासमोर उलगडला. तुम्हीही असे पैलू शोधा. आता सावरकर जयंतीच्या मुहूर्तावर संकल्प करा. सावरकरांचा आदर्श अंगी बाणवा आणि त्यांच्यासारखेच भरतभूमीचे नाव त्रिखंडात गाजवा! तुम्ही हे करु शकता!! तुम्हीच हे करु शकता!!!

लंडनमध्ये ‘अभिनव भारत’च्या सदस्यांची धरपकड सुरु असताना स्वत: स्वा. सावरकर पॅरिसला होते. अर्थातच ब्रिटीश साम्राज्याला जो ‘भूतो न भविष्यति’ असा धोका निर्माण झाला होता. त्याचे मूळ हा अवघे २७ वय असलेला तरुणच असल्याचे ब्रिटीशांना माहिती होते; परंतु सावरकर ब्रिटीश भूमीवर नसल्याने त्यांना पकडणे इंग्रजांच्या आवाक्याबाहेरचे काम होते. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर, या स्थितीत त्यांना पकडणे इंग्रजांना कधीच शक्य होणार नव्हते. आंतरराष्ट्रीय निर्बंधांनुसार सावरकरांना फ्रान्समध्ये आश्रय घेण्याचा पूर्णत: अधिकार होता व इग्लंड आणि फ्रान्स यांच्यात अपराध्यांच्या हस्तांतरणाचा करारही नव्हता. एकीकडे सावरकरांच्या सहकार्‍यांचा अतोनात छळ सुरु होता. तर दुसरीकडे फ्रान्समधील सहकारी सावरकरांना इंग्लंडला परत न जाण्यासाठी विनवत होते. सावरकरांवर बिनबुडाचा आरोप करत सावरकरद्वेष करणार्‍यांनी याप्रसंगी सावरकरांनी काढलेले उद्गार लक्षात ठेवावेत -‘‘माझ्या सहकार्‍यांचा नि अनुयायांचा छळ मला पाहवणार नाही. ओढवलेल्या संकटाला नेता म्हणून मी स्वत:च तोंड दिले पाहिजे’’ (वीर सावरकर-धनंजय कीर, अनु.-द.पां. खांबेटे, आ.२००८, पृ.८३). सावरकर दि.१३ मार्च १९१० रोजी लंडनला आले. त्यांना तत्काळ अटकही करण्यात आली.
आता यात वैधानिक (कायद्याची) मेख अशी की, सावरकरांना या जॅक्सनच्या खूनप्रकरणात अटक करण्यात आली होती, त्याचा खून झाला होता भारतात. त्यावेळी सावरकर होते इंग्लंडमध्ये. नियमानुसार खटला इंग्लंडमध्येच चालायला हवा होता, पण तसे न करता सावरकरांना भारतात पाठवावयाचे ठरले. असे का केले असेल बरे? याचे उत्तर मिळते श्री. डेव्हिड गार्नेट यांच्या आत्मचरित्रात. श्री. गार्नेट लिहीतात की, ‘जर इथे (इंग्लंडमध्ये) खटला चालला असता तर नियमाप्रमाणे सावरकरांना फार-फार तर २-३ वषार्र्ची शिक्षा झाली असती. परंतू भारतात खटला चालवला तर गोष्ट वेगळी’ (द गोल्डन एको – डेव्हिड गार्नेट; हरकोर्ट, ब्रास आणि कंपनी, न्युयॉर्क, १९५४, पृ. १५३). ब्रिटीश सरकार सावरकरांना इतके घाबरुन असे की, त्यांच्यापायी नियमही वाकवायला मागे-पुढे पाहत नसे, हेच यावरुन सिध्द होते. ब्रिटीशांच्या मनातील हीच धास्ती नियम डावलून सावरकरांना दोन स्वतंत्र जन्मठेपी देण्याच्या निर्णयातही दिसते!
त्यानुसार सावरकरांना भारतात पाठविण्यासाठी दि.१ जुलै १९१० रोजी ‘आर. एम. एस. मोरिया’ या नौकेवर चढविण्यात आले (स्वा. सावरकर चरित्र – शि.ल. करंदीकर, वरदा प्रकाशन, आ.२०११, पृ.२७९). हीच ती मोरिया नौका जिच्या पोर्टहोलमधून सावरकरांनी ती त्रिखंडात गाजलेली उडी मारली.
अमेरिकास्थित भारतीय वंशाच्या संशोधिका श्रीमती अनुरुपा सिनार यांनी अथक परिश्रम आणि उद्बोधक संशोधन करुन या उडीची हकीकत जगासमोर आणली आहे. ८ जुलै १९१० रोजी मोरिया जहाज फ्रान्समधील मार्सेल्स बंदरात उभे होते. सकाळी ६:१५ चा सुमार. सावरकरांनी शौचास जाण्याची परवानगी मागितली. त्याप्रमाणे त्यांना शौचालयात नेण्यात आले. पार्कर नावाचा पहारेकरी बाहेर थांबला. सावरकरांनी आत प्रवेश करताच अजिबात आवाज न होऊ देता कडी लावून टाकली. अंगातील बाथरोब दरवाज्याला असलेल्या काचेच्या झरोक्यावर टाकला. जहाजाला हवा आणि प्रकाश येण्यासाठी अनेक गोलाकृती खिडक्या असतात. त्यांना पोर्टहोल असे म्हणतात. असे एक पोर्टहोल शौचकुपाच्यावर होते सावरकरांनी चष्मा इ. गोष्टी काढून बाजूला ठेवून दिल्या. यज्ञोपविताने अंदाज घेतला आणि त्या सुमारे १३ इंच परिघ असलेल्या पोर्टहोलमधून कसेबसे शरीर झोकून दिले. तोपर्यत इकडे पहार्‍यावर अमरसिंह नावाचा शिपाई आलेला होता. आतील हालचालीमुळे त्याने डोकावून पाहिले. तर सावरकर अर्धे आत आणि अर्धे पोर्टहोलमधून बाहेर! तो घाबरला. तसाच वरिष्ठांना बोलवायला धावला. तोवर सावरकरांनी स्वत:ला खाली झोकून दिले होते.
विचार करा. जहाज ते धक्क्याची भिंत यामधील अंतर जेमतेम ७ फुटच होते. सावरकर जरा वेडेवाकडे पडले असते तर भिंतीला आपटून कपाळमोक्ष तरी झाला असता अथवा हातपाय तरी मोडले असते. बरं, पोर्टहोल ते पाणी ही उंची सुमारे ३० फुट. पाणी किती खोल, सावरकरांना ठाउकही नव्हते. पाणी उथळ असले तर?  शिवाय ३० फुटांवरुन पडल्यानंतर पाण्याचा, त्यातही समुद्राच्या पाण्याचा फटका किती जोरात बसणार होता, याची कल्पना पट्टीचे पोहणारेच करु शकतात. त्या फटक्याने सावरकर पुन्हा त्या धक्याच्या  भिंतीला अथवा जहाजाला आदळले असते तर? हा सारा विचार केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की, सावरकरद्वेष्टे काहीही म्हणोत, पण ती उडी अत्यंत भयानक होती. सिंहाचे काळीज असलेला माणूसच हे साहस करु जाणे. सावरकर तर साक्षात नरसिंहच होते!
पाण्यात पडल्यावर सावरकर पोहत-पोहत धक्क्याच्या भिंतीपाशी गेले. धक्क्याची भिंतही सुमारे ९ फुट उंच होती. शिवाय सतत पाण्याशी संपर्क येऊन ती निसरडीही झाली असणार. त्याही परिस्थितीत सावरकर वर चढले, हे त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीकच नव्हे काय?
वर येताच सावरकर पळत निघाले. प्रेन्स्की नामक फे्रंच पोलिस अधिकारीही बंदरावरच होता. सावरकरांनी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण सावरकरांची भाषा त्याला समजलीच नाही. तोपर्यत बंदरावर पोहोचलेल्या इंग्रज पहारेकर्‍यांनी सावरकरांना पकडून पुन्हा एकवार नौकेवर नेले. हे सारे वाचून सावरकरांची उडी म्हणजे एक फसलेले साहस होते, असा तुमचा समज होणे साहजिकच आहे. परंतू याचा खोलवर विचार करुयात.
पळून जाणे एवढाच सावरकरांचा उद्देेश असेल असे वाटत नाही, कारण तसे असते तर सावरकर मुळात फ्रान्सहून इंग्लंडला अटक करुन घेण्यासाठी आलेच नसते. त्यामुळे सुटका होऊ शकली तर गाजावाजा होऊन भारतीय स्वातंत्र्यलढा सबंध जगाला कळणार होता, पण न झाल्यास सावरकरांकडे ‘प्लॅन बी’ तयारच होता. आणि तो इतका अप्रतिम होता की, इंग्रजांच्या नाकीनऊ येणार होते. त्याचे परिणाम दुसर्‍याच दिवशीपासून दिसू लागले.
मी आधीच सांगितल्याप्रमाणे, सावरकरांना फ्रान्समध्ये आश्रय घेण्याचा पूर्ण अधिकार होता व फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात अपराध्यांच्या हस्तांतरणाचा करारही नव्हता. जरी तसा करार असता, तरीही आंतरराष्ट्रीय निर्बंधांनुसार याचक देशाने विनंती केल्याशिवाय असे हस्तांरतण करताही येत नाही. याचाच दुसरा अर्थ असा की, इंग्रज पहारेकर्‍यांनी फ्रान्सच्या किनार्‍यावरुन सावरकरांना पकडून नेणे ही गोष्ट ढळढळीत बेकायदेशीर होती! दुसर्‍याच दिवसापासून युरोपभरातल्या वृत्तपत्रांत बातम्या झळकू लागल्या. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, बेल्जियम सगळीकडच्या वृत्तपत्रांनी ब्रिटीश सरकारच्या अब्रूचे धिंडवडे काढायला सुरुवात केली. युरोपच नव्हे तर अल्पावधीतच हे लोण सार्‍या जगात पसरले. भाग्यनगर (हैद्राबाद) येथील प्राध्यापक श्री.प्र.ह. हयातनगरकर यांनी या सार्‍या बातम्या व्यवस्थित नोंदविल्या असून त्या ‘वीर सावरकर-चावट की वात्रट’ (ले.-डॉ.प.वि. वर्तक, वर्तक प्रकाशन) या ग्रंथात पृ.५० ते ५५ येथे उपलब्ध आहेत. जागेअभावी त्यातील तीनच मुद्दे येथे देतो, म्हणजे वाचकांना कल्पना येईल की, वृत्तपत्रांनी ब्रिटीशांची कशी बिनपाण्याने चालवली होती -
१)‘‘ब्रिटीश पोलिसांच्या कृतीने ‘असायलम’च्या कायदयाची थट्टाच मंाडली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवून त्यांची टवाळीच केली आहे.’’
-द डेली न्यूज, इंग्लंड (२२ जुलै १९१०)
२)‘‘इंग्लंड आजवर जगाला नीती शिकवत असे. परंतु आता त्यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे.’’
-बलिर्र्न पोस्ट, जर्मनी (१२ जुलै १९१०)
३)फ्रान्सच्या ‘ल ह्‌युमनाईत’ने तर थेट ‘हा फ्रान्सच्या रायक्रांतीशी दगा आहे’ असा मथळाच दि. १२ जुलै १९१० रोजी दिला होता. (आकृती क्र.३)
ब्रिटनमध्ये असलेल्या स्पेन, पॅराग्वे, पोर्तुगाल इ. देशांच्या राजदुतांनी तीव्र विरोध नोंदवला. पार रशिया, जपान इ. देशांतही सावरकरांची सुटका झालीच पाहिजे अशा अर्थाचे ठराव मांडले गेले. इंग्लंड आणि फ्रान्सचे राजनैतिक संबंधही ताणले गेले. तेही दोन्हीपैकी एकाही देशाचे नागरिक नसलेल्या स्वा. सावरकरांमुळे! सुमारे दोन महिने आंतरराष्ट्रीय राजकारणात असा गोंधळ चालू होता. जे इंग्लंड सावरकरांना भारतात पाठवून मनमानी करु इच्छित होते, त्याच इंग्लंडला अखेरीस हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला लढवणारा एक पक्ष होणे भाग पडले. पुढे जरी इंग्लंडच्या क्लृप्त्यांमुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल सावरकरांच्या विरोधात गेला असला तरी जनमताचा रेटाच एवढा जबरदस्त होता की, निकालानंतर अवघ्या तीनच दिवसांत फ्रान्सचे पंतप्रधान श्री. बियॉं यांना त्यागपत्र देणे भाग पडले!
थोडक्यात कायद्याची बारीक जाण असलेल्या सावरकरांनी विचारपूर्वक केलेल्या एका खेळीमुळे इंग्लंडची जगभर नाचक्की झाली. सावरकर सर्वांचे हिरो झाले आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे इतिहासात पहिल्यादांच भारतीय स्वातंत्र्यलढयाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. नंतरही सावरकरांचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील सन्माननीय स्थान अढळच राहिले. पहिल्या महायुध्दाच्या काळात सावरकर अंदमानात असताना जर्मनांनी आपली एम्डेन ही युध्दनौका सावरकरादींच्या सुटकेसाठी धाडली होती (करंदीकर, पृ.३९०). सावरकरांच्या या स्थानाचा उपयोग भविष्यात सुभाषबाबूंनाही झालेला दिसतो.
२८मे रोजी स्वा.सावरकरांची जयंती जगभर साजरी केली जात आहे. पण आपली अवस्था काय आहे? फारसा उज्वल इतिहास नसलेले पाश्‍चात्य देश, त्यांच्याकडे आहे तो ठेवाही किती उत्साहाने जतन करतात. ‘हा पहा अमक्या राजाच्या तेराव्या राणीच्या पाचव्या दासीच्या गळयातील हार’ वगैरे म्हणतानाही त्यांचा उत्साह कसा ओसंडून वाहात असतो. परंतु आपण मात्र आपल्याच महापुरुषांना खुजे ठरविण्याचा प्रयत्न करीत असतो की काय न कळे! त्यातही काही तथाकथित पुरोगामी संघटनाच या महापुरुषांना जाती-पातीची लेबले लावतात तेव्हा तर अक्षरश: किळस येते! आज केवळ सावरकरांच्या द्वेषावरच याची दुकाने चालतात, असाही एक वर्ग आहेच की भारतात! सावरकरांनी ही सारे जग दुमदुमून सोडणारी उडी काय केवळ त्यांच्या जातीसाठीच मारली होती का हो? नाही ना? देशासाठीच केले ना त्यांनी हे जीवघेणे साहस? मोठया खेदाने म्हणावेसे वाटते, आपल्याला एवढी मोठी परंपरा आहे की, अखेरीस किंमतच राहिली नाहीये तिची आपल्याला.
हे योग्य नाही मित्रहो! आपल्याकडील सर्वच महापुरुषांच्या चरित्रात सहस्रावधी पे्ररणास्रोत आहेत. द्वेष करण्या, बोलण्या, पाहण्यापेक्षा उठा, जागे व्हा आणि त्या प्रेरणास्रोतांचा शोध घ्या. आचरणात आणा. स्वत: तर सामर्थ्यशाली व्हाच, पण देशालाही शक्तीशाली बनवा. स्वा. सावरकरांच्या रोमहर्षक चरित्रातला एक पैलू मी आज तुमच्यासमोर उलगडला. तुम्हीही असे पैलू शोधा. आता सावरकर जयंतीच्या मुहूर्तावर संकल्प करा. सावरकरांचा आदर्श अंगी बाणवा आणि त्यांच्यासारखेच भरतभूमीचे नाव त्रिखंडात गाजवा! तुम्ही हे करु शकता!! तुम्हीच हे करु शकता!!!

0 comments:

Post a Comment