छाया-प्रकाशाचा खेळिया...

छाया-प्रकाशाचा खेळिया...

एखाद्या छायाचित्रकाराला देखील ग्लॅमर मिळावे आणि तो सेलिब्रिटी ठरावा हे कर्तृत्व राजाध्यक्षांनीच पहिल्यांदा करून दाखविले होते. प्रत्यक्षाहूनही प्रतिमांची नवी, रेखीव आणि सुंदर अशी सृष्टी निर्माण करणारा अन् छायाचित्रणाला कलेचा दर्जा मिळवून देणारा एक सौम्य, मंदमंद पाझरणारा अन् निशिगंधाच्या सुगंधासारखा बहरणारा एक कलावंत थांबला आहे. त्याने गाजविलेल्या काळाचे एक स्थिरचित्र कायमचे मार्गदर्शक ठरावे असेच आहे. आपल्या छायाचित्रांना आणि छायाचित्रांच्या विषयांना देखील कुठल्याच चौकटीत अडकू न देता क्षितिजापल्याडची संवेदना देणारा गौतम राजाध्यक्ष नावाचा एक कलावंत छायाचित्रकार आज असा अचानक ‘आऊट ऑफ फोकस’ झाला. आजच्या घडीला काळ आणि संस्कृतीच नव्हे, तर जीवनातील सर्वच अंगांत करीअरच्या नावाखाली तांत्रिकता हीच गुणवत्ता ठरत आहे. त्यामुळे सगळ्याच क्षेत्रांचे सुमारीकरण होते आहे. ‘क्वालिटी’ आणि ‘एलिजिबिलिटी’ यातला फरकच आम्ही सगळेच कसे सोपे करण्याच्या नादात पुसून टाकला आहे. करीअर म्हणून एखादे कौशल्याचे क्षेत्र निवडण्यापेक्षा ‘पॅशन’ने काम करत गेले तर पैसा, प्रसिद्धी सगळेच मिळत जाते. मात्र, त्यासाठी ते काम करायचे नसते, या अंगाने नव्या पिढीला संस्कारित करण्याची गरज आहे आणि त्यासाठी त्यांच्यासमोर ‘आयकॉन’ म्हणून काही व्यक्तींचे आदर्श मांडायचे असतील, तर उरलेल्या थोडक्या लोकांत गौतम राजाध्यक्ष होते. ऐन भरात असलेल्या कलावंतासाठी कोवळेच म्हटले पाहिजे अशा साठाव्या वर्षीच या चतुरस्र माणसाने एक्झिट घेतली. नव्या पिढीचे रोबोटीकरण थांबविण्यासाठी काही गुरूंची आवश्यकता आहे, त्यातला एक गुरू आज थांबला आहे. राजाध्यक्ष म्हटले की क्षणात संदर्भ लागतो तो त्यांनी केलेल्या चित्रपटसृष्टीतील कलावंतांच्या छायाचित्रांचा. लिण्टास या विख्यात जाहिरात कंपनीतील त्यांनी केलेल्या अनेक जाहिरातींच्या स्थिरचित्रांचा, देशात आणि विदेशात रसिकातुडुंब झालेल्या त्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनांचा, ‘फोकस’ नामक त्यांच्या कॉफी टेबल बुकचा... त्याही पलीकडे जाऊन राजाध्यक्ष नावाचा हा बहुगुणी कलावंत कलेच्या क्षेत्रात विविध अंगांनी व्यक्त होत होता. माणसाच्या जगण्याशी थेट भिडण्यासाठी आणि जगण्याच्या खोल तळाशी जाऊन सगळे नीट समजून ते व्यक्त करण्यासाठी वाचन दांडगे हवे. अनुभवातून माणूस शिकतो, पण पुस्तकात प्रज्ञावंतांचे गोळीबंद अनुभव असतात आणि त्यात शिरता आले, तर शिकण्याचा हा कालावधी कमी होतो. राजाध्यक्षांचे वाचनही तसेच दांडगे होते. चौकस आणि चौफेर वाचन हा त्यांचा गुण होता. त्यामुळे उदंड यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवरच होते आणि वाचनामुळेच शब्दातून व्यक्त होण्याचे कसबही त्यांच्या ठायी होते. त्यांनी जाहिरातपटांसाठी लेखन केलेच, शिवाय काही चित्रपटांसाठी देखील लेखन केले. काजोलचा पहिला चित्रपट बेखुदी असो की मग माधुरी दीक्षितचा ‘अंजाम’ असो, अगदी अलीकडे आलेला २००७ चा सखी असो. अनेक नियतकालिकांसाठी त्यांनी लेखन केले. चंदेरी नावाच्या चित्रपटसृष्टीवरील मासिकाचे ते संपादक देखील होते. तसे छायाचित्रण करणे म्हणजे काय? कॅमेर्याची कळ दाबता येते, तो फोटो काढतच असतो. मात्र छाया-प्रकाशाच्या माध्यमातून छायाचित्रणाच्या विषयाचा आत्माच उजागर करणे म्हणजे त्यातला कलात्मक भाग झाला. कॅमेरा हे यंत्र असते. कळ दाबली की समोरच्या दृश्याचे स्थिरचित्र गोठवणे ही त्या यंत्राची तांत्रिक अगतिकता झाली. त्या अगतिकतेला जिवंत जाणिवांचा मोरपंखी मुलायम स्पर्श कसा करायचा असतो, हे राजाध्यक्षांनी प्रत्यक्षात घडवून दाखविले. भारतीय सॉफ्ट लाइट फोटोग्राफीचे ते प्रणेते होते. त्यांच्या व्यक्तिचित्रणात लैंगिक उन्मादकतेपेक्षा पवित्र, महन्मंगल असे काही जाणवायचे. म्हणूनच अनेक चित्रपटतारे, तारका, गायक- गायिका, लेखक, उद्योगपतींची त्यांनी केलेली छायाचित्रे म्हणजे त्या व्यक्तींच्या सकल अस्तित्वाचा बोलका पुरावाच वाटत होता. रंग किंवा कुंचल्यात चित्र नसते, चित्रकाराच्या बोटात देखील चित्र नसते, चित्र असते ते त्याच्या डोक्यात, हृदयात. तसे छायाचित्र देखील कॅमेर्याच्या मागे उभ्या असणार्‌या छायाचित्रकाराच्या डोक्यात असते. चेहरा नव्हे तर आत्म्याचे प्रकटीकरण करायचे असेल, तर समोरच्याच्या सकल अस्तित्वाचीच जाणीव एका साध्या क्लिकच्या आधी व्हायला लागते. तंत्राने ते साध्य होत नाही. त्यासाठी अथांग कलात्मक मनच असावे लागते आणि राजाध्यक्षांकडे ते होते. राजाध्यक्षांसारखे छायाचित्र खेचायचे असेल, तर त्यासाठी तसले वातावरण तयार करावे लागते. नेमक्या त्याच वातावरणात राजाध्यक्ष सतत राहत होते. ते राहत त्या तीन मजली घराच्या वरच्या मजल्यावर त्यांचे घर म्हणतात ते होते. मात्र, पायर्‌या चढायला सुरुवात केल्यापासूनच आपण एका वेगळ्या विश्‍वात प्रवेश करतो आहोत याची जाणीव मन सुगंधी करून जात होती. म्हणूनच त्यांनी काढलेल्या व्यक्तींच्या छायाचित्रांचे सौंदर्य वास्तवापेक्षाही कित्येक पटींनी जास्त असायचे. त्यांनी पहिले छायाचित्र शबाना आझमी आणि जॅकी श्रॉफचे काढले होते. राजाध्यक्ष घरात राहतच नव्हते, तर स्टुडिओतच त्यांचे घर होते. कुठलाही विषय समजून घेण्यासाठी जी आंतरिक समज असावी लागते ती त्यांच्याकडे होती. ‘फेसेस’ नावाचे कॉफी टेबल बुक त्यांनी प्रकाशित केले. त्याच्या मुखपृष्ठावरील माधुरी दीक्षितचे छायाचित्र अनेक फोटोग्राफर्ससाठी ड्रीम फोटो असू शकतो. आपल्या आजूबाजूला वावरणार्‌या व्यक्तींचा देखील संवेदनशील व्यक्तींवर चांगला परिणाम होत असतो. गौतम राजाध्यक्षांच्या बाबतही त्यांची चुलत बहीण सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या सहअस्तित्वाचा परिणाम झाला. ग्लॅमर फोटोग्राफर म्हणून त्यांच्या आयुष्याला लागलेले वळण त्याचमुळे आले. शोभा डे यांच्या ‘सेलिब्रिटी’ या नियकालिकासाठी त्यांना लेखन करायला सांगितले. त्यासाठी छायाचित्रण देखील तेच करायचे. त्यानंतर त्यांच्यासाठी इलस्ट्रेटेड विकली, स्टारडस्ट, सिनेब्लीट्‌झ, फिल्मफेअर या सारख्या ग्लॅमर मॅगझीन्सचा मार्ग खुला झाला. टीना मुनीम, सलमान खानसारखे चहेरे या जगताला देण्याचा मानही त्यांच्या खात्यात जातो. राजकपूर सारख्या पारखी माणसाने त्यांना ‘हिना’चे स्टील्स करायला दिले. सलमान हा त्यांचा आवडता चेहरा असल्याने अगदी सहज न्यायाने त्याचा पहिला चित्रपट ‘हम आपके है कौन’चे स्थिरचित्रण त्यांनी केले. त्यांनी केलेले चित्रपटांसाठीचे स्थिरचित्रण हे त्या चित्रपटाचे सिग्नेचर मार्क झाले होते. ‘कुछ कुछ होता है’ किंवा ‘कभी खुशी कभी गम’ चे पोस्टर्स आठवून बघा. त्यांना संशोधक व्हायचे होते, पण नंतर ते फोटोग्राफीकडे वळले आणि त्यात त्यांची संशोधक वृत्ती कायम दिसून आली. त्याचमुळे त्यांनी भारतीय छायाचित्रणाला एक नवी दिशा दिली. आज सारेच कसे देखाव्यांचे झाले आहे. चकचकित, पॉश यांचे अवडंबर माजले आहे. गायकाच्या गायकीपेक्षा त्याचे अंगविक्षेप, त्याची केशभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना, स्टेज, त्याच्या कसरती हेच महत्त्वाचे ठरते. सगळेच कसे ‘रॉक’ करायचे असते. त्या पार्श्‍वभूमीवर लतादीदींचे गाणे सहजसुंदर वाटते. कारण भपका नसतो, साधेपणा असतो. तसेच आजच्या छायाचित्रणाचे देखील झाले आहे. पार्श्‍वभूमी अतिभव्य, चमकदार उभी करण्यात येते. राजाध्यक्षांची छायाचित्रे म्हणून वेगळी वाटतात. कारण त्यात नेमक्या विषयाला प्राधान्य दिले असते. सौम्य, साधेपणाने ते विषय पेश करतात. एखादा गायक आपल्या एक एक चिजा रसिकांना सादर करत जातो, तसेच राजाध्यक्ष देखील प्रत्यक छायाचित्रागणिक काही वेगळे दर्शविण्यात यशस्वी होत होते. ते आता आणखी काय नवे करणार, असा प्रश्‍न रसिक, समीक्षकांना पडत होता आणि त्यांची नंतरची कलाकृती ही सगळ्यांना स्तंभित करणारे काही अनोखे, नवे असे देऊन जात होती. आता ते सगळेच थांबले आहे. एखाद्या छायाचित्रकाराला देखील ग्लॅमर मिळावे आणि तो सेलिब्रिटी ठरावा हे कर्तृत्व राजाध्यक्षांनीच पहिल्यांदा करून दाखविले होते. प्रत्यक्षाहूनही प्रतिमांची नवी, रेखीव आणि सुंदर अशी सृष्टी निर्माण करणारा अन् छायाचित्रणाला कलेचा दर्जा मिळवून देणारा एक सौम्य, मंदमंद पाझरणारा अन् निशिगंधाच्या सुगंधासारखा बहरणारा एक कलावंत थांबला आहे. त्याने गाजविलेल्या काळाचे एक स्थिरचित्र कायमचे मार्गदर्शक ठरावे असेच आहे.
तरुण भारत, सोलापूर,   रविवार, दि. १९ सप्टेंबर २०११

0 comments:

Post a Comment