This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
जलवायू परिवर्तन व भारताची भूमिका
•अमर पुराणिक
जगाच्या किंवा देशाच्या विकासाचा संबंध हा प्रामुख्याने औद्योगीकरणाशी घातला जातो आणि जीवनमा सुधारणे याचा अर्थ जीवनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे असा घेतला जातो. या सगळ्या गोष्टींना विकास असे म्हणण्याची प्रथा पडून गेली आहे. या विकासापोटी अनेक नैसर्गिक स्त्रोतांवर कुर्‍हाड कोसळली आहे. शेती, पाणी, जंगल या सगळ्यांना विकासाने गिळंकृत केले आहे. विकासाच्या मार्गावर चालत असताना पर्यावरणात होत असलेल्या या बदलाचे परिणामही दिसू लागले असून, निसर्ग आता या बदलांच्या रूपाने आपल्यावर सूड उगवीत आहे. विकासाच्या मार्गावर धावायचे असेल तर औद्योगीकरण हवे. या औद्योगीकरणासाठी इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सिमेंटची जंगले उभारण्यासाठी नैसर्गिक जंगलांची कत्तल केली जाते. या सगळ्यातून व्यय होणार्‍या वायूने मात्र आता अवघ्या जगाला कवेत घेतले आहे. जगाचे तापमान त्यामुळेच वाढतेय. शेती आणि ग्रामीण विकासावरही याचा मोठा परिणाम होतो आहे, हे आत्ताच लक्षात घेतले पाहिजे. निसर्गाचे चक्र त्यामुळेच बदलते आहे.
भारत सरकार कोपनहेगनच्या शिखर परिषदेत सामील झाले आहे.  ग्रीन हाऊस गॅसच्या उत्सर्जनाशी संबंधित नियमावली जारी केली आहे, त्या आधारावर देशात सन २०३१ पर्यंत ग्रीन हाऊस गॅसचे प्रतिव्यक्ती उत्सर्जन २.७७ तेे ५ टनाच्या दरम्यान राहील असे म्हटले आहे, तर दुसर्‍या बाजूला शुक्रवार दि. ४ डिसेंबर रोजी लोकसभेत झालेल्या चर्चेत पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी भारत २००५ सालच्या कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात २० ते २५ टक्के घट करण्यासाठी स्वेच्छेने तयार आहे, त्याची योजनाही तयार आहे. सर्वच देशांनी अशाच धोरणांची अंमलबजावणी करावी. यासाठी कोपनहेगन येथे होणार्‍या ‘ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज’च्या शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या चर्चेत नेहमीप्रमाणे कॉंगे्रेसच्या संदिग्ध व कूटनीतिपूर्ण शैलीत संागितले. आतापर्यंत कॉंग्रेसची ही कूटनीती देशवासीयांची माती करण्यासाठीच वापरली गेली आहे, पण परराष्ट्रांसमोर मात्र ही कॉंग्रेसची कूटनीती नांगी टाकते, हे आजपर्यंतचा इतिहास संागतो. यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी सडेतोड भूमिका मंाडताना म्हणाले की, पृथ्वीच्या पर्यावरण संतुलनाचा नाश ज्या प्रमुख कारणांनी उद्भवला, त्याचे निर्माते अमेरिकेसारखे विकसित देशच आहेत. ग्लोबल वॉर्मिंगसारख्या संवेदनशील विषयावर कोपनहेगनच्या शिखर परिषदेत ग्रीन गॅसेस व कार्बन उत्सर्जनाबाबत भारताने विकसित देशांच्या दबावाखाली येता कामा नये. भारताच्या भूमिकेशी कोणताही समझोता भाजपाला मान्य नाही, अन्यथा  सरकारच्या अशा घातक भूमिकेचे भाजपा समर्थन करणार नाही.तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा १७ टक्के प्रदूषण कमी करण्याच्या वल्गना करीत आहेत, जी टक्केवारी अमेरिकेच्या प्रदूषणाच्या तुलनेत अतिशय नगण्य आहे. यात चिंतेची बाब ही आहे की,  भारत त्यांच्या या घोषणेकडे कसे पाहतो, की नेहमीप्रमाणे लेच्यापेच्या परराष्ट्र धोरणामुळे भारतीयांची दिशाभूल करीत अमेरिकेच्या दबावाला बळी पडतो, हे लवकरच कळेल.
यात दुसरी तथ्यपूर्ण गोष्ट ही आहे की, कोपनहेगनची बैठक म्हणजे नवे काहीतरी आहे, किंवा पहिल्यांदाच घडणारी घटना, असे समजण्याचे कारण नाही.कारण जलवायू परिवर्तनासाठी पूर्वीपासूनच प्रयत्न सुरू आहेत. जलवायू परिवर्तनावर सन १९९० पासून संयुक्त राष्ट्राचे ़फ्रेमवर्ककन्वेंशन (यूएन-एफ़सीसीसी) अस्तित्वात आहे. पूर्वी फक्त १० टक्के  प्रदूषण कमी करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते, पण आता सध्याच्या काळातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यूएन-एफ़सीसीसीचे हे लक्ष्य १० टक्क्यांवरून वाढविणेे अत्यावश्यक आहेे, पण सध्या ़फ्रेमवर्क कन्वेंशनला प्रगतिपथावर नेण्याऐवजी मागे ढकलले जात आहे.
भारत सरकारने कोपनहेगन येथे होणार्‍या ‘ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज’च्या शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर ही नियमावली सार्वजनिक केली आहे. विकसित देश सुरुवातीपासूनच या मानसिकतेने ग्रस्त आहेत की भारत, चीन आदींसारखे विकासशील देश विकसित बनण्यासाठी पर्यावरणाला अत्याधिक  नुकसान पोहोचवीत आहेत, पण सत्य हे आहे की, एकूण जगभर होणार्‍या कार्बन उत्सर्जनापैकी भारतात केवळ चार टक्के उत्सर्जन होते. याचा अर्थ असा की, जगाच्या कार्बन उत्सर्जनाला भारत केवळ ४ टक्केच जबाबदार आहे, तर तिकडे अमेरिका २० टक्के कार्बन उत्सर्जन करीत आहे. या दृष्टीने पाहिल्यास विकसित देशांनी आपल्या  सुख-सुविधांचा बळी जास्त प्रमाणात द्यायला हवा, पण ते विकसनशील देशांवरच दोषारोपण करण्यात धन्यता मानत आहेत.
जगातील फक्त २५ टक्केच लोकसंख्या विकसित देशांत राहाते, पण जगातील एकूण कर्बवायू उत्सर्जनात या लोकसंख्येचा वाटा तब्बल ७० टक्के आहे. शिवाय जगातील साधनसंपत्तीचा तब्बल ७५ ते ८० टक्के इतका बेसुमार वापर हेच देश करतात. कर्बवायूचे उत्सर्जन प्रतिमाणशी काढायचे म्हटले तरी याच विकसित देशांतील लोकांचे योगदान मोठे असल्याचे दिसून येईल. प्रत्येक भारतीय व्यक्ती जेमतेम ०.२५ टन कर्बवायूचे उत्सर्जन प्रतिवर्षी करते, पण अमेरिकेतील व्यक्तीच्या बाबतीत हेच प्रमाण तब्बल ५.५ टन इतके आहे.
हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे ग्लोबल वॉर्मिंगचे एक प्रमुख कारण आहे. या हरितगृह वायूंमध्ये कार्बन-डाय-ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि ओझेन यासह इतर अनेक वायूंचा समावेश होतो. सूर्यापासून निघणार्‍या अतिनील किरणांपासून पृथ्वीच्या वातावरणावर असलेला ओझेन वायूचा थर आपले रक्षण करीत असतो. ते किरण थेट आपल्यापर्यंत पोहोचले तर आपले जगणे अशक्य होऊन जाईल, पण या वायूंमुळे ओझेनचा हा थर विरळ होत चालला आहे आणि त्यामुळे पृथ्वीवरचे तापमान वाढत चालले आहे. ग्रीनहाऊस गॅसेस अर्थात हरितगृह वायू म्हणजे वातावरणातील असे वायू जे अदृश्य किरण (इन्फ्रारेड रेडिएशन) शोषून घेत त्यांचे उत्सर्जनही करू शकतात. पृथ्वीचा पृष्ठभाग तप्त करण्यासाठी हे वायू कारणीभूत ठरतात. पृथ्वीच्या वातावरणात असलेले असे वायू म्हणजे पाण्याचे बाष्पीभवन, कार्बन-डाय-ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि ओझेन. आपल्या सौरमंडळात शुक्र, मंगळ या ग्रहांमध्ये हे वायू मोठ्या प्रमाणावर आहेत. पृथ्वीच्या वातावरणातही हे वायू असल्याने त्याचा मोठा परिणाम पर्यावरणावर होतो आहे. हे वायू नसते तर पृथ्वीचा पृष्ठभाग किमान ३३ अंश सेल्सियसने थंड असता. जगभरात औद्योगीकरणाला सुरुवात झाल्यानंतर या वायूंचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली. साधारणपणे औद्योगिक क्रांतीचा काळ म्हणजे साधारणपणे १७५० च्या आसपासचा काळ. हा हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढीला लागण्याचा काळ समजायला हरकत नाही. या हरितगृह वायूंशिवाय इतरही काही वायू या प्रकारात मोडले जातात. त्यात सल्फर हेक्झाफ्लोराईड, हायड्रोफ्ल्युरोकार्बन्स आणि पर्फ्ल्युरोकार्बन्स हे काही वायू आहेत. नायट्रोजन ट्रायफ्ल्युरोगाईड हा वायू जागतिक तापमानवाढीला सर्वाधिक कारणीभूत ठरू शकतो, पण त्याचे प्रमाण मुळातच वातावरणात कमी असल्याने तो तितका ‘तापदायक’ ठरत नाही.
ग्रीन हाऊस गॅसमुळे पृथ्वीचे तापमान सतत वाढतच आहेत, ज्यामुळे समुद्राचा जलस्तर वाढतोय आणि ओला दुष्काळ किंवा सुका दुष्काळ अशा प्राकृतिक समस्यांत दिवसेंदिवस वृद्धी होत आहे. बर्फाळ प्रदेशातील बर्फ वितळत चाललंय आणि वाळवंटांचा विस्तार झपाट्याने होत आहे. कोठे अतिवृष्टी होतेय तर कोठे अवेळी पाऊस होतोय. वैज्ञानिकांचे म्हणणे तर असे आहे की, सध्या समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे ही ग्लोबल वॉर्मिंगचीच देणगी आहे. इंटर गव्हर्मेर्ंेंेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आईपीसीसी) ने २००७ च्या आपल्या अहवालात स्वच्छ संकेत दिले होते की, जलवायू परिवर्तनामुळे चालत्या वादळांची विक्राळता मोठ्या प्रमाणात वाढेल. आकडेवारीकडे पाहिल्यास लक्षात येईल की, असेही होऊ शकते. १९७० नंतर उत्तर अटलांटिकामध्ये ट्रॉपिकल वादळात वाढ झाली आहे आणि समुद्राच्या  तापमानात वाढ होत आहे. याचा अंदाज या गोष्टीद्वारे लावला जाऊ शकतो, की १०० फुटावरचं तापमान पूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत अधिक गरम झाले आहे. ग्रीन हाऊस गॅसला ‘सीएफसी’ किंवा ‘क्लोरो फ्लोरो कार्बन’ असे देखील म्हणतात. यात कार्बन-डाय-ऑक्साईड, मिथेन, नायट्रेट ऑक्साईड व बाष्प असते आणि असे गॅस मोठ्या प्रमाणात वातावरणात वाढत आहेत.  याचा परिणाम हा होतोय की, ओझेनच्या थराला छेदणारी पोकळी वाढतच चालली आहे. ओझेेनचा थरच सूर्य आणि पृथ्वीच्या मध्येे एका संरक्षक कवचाचे काम करतोय. हा थर कमी झाल्याने पृथ्वीला सूर्याचा ताप सहन करावा लागत आहे. पृथ्वीवरील तापमानात याचमुळे वृद्धी होत आहे. गेल्या काही काळापासून थंड हवेची ठिकाणे म्हणवणारी स्थळेही उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झाली आहेत.  ज्या भागात जोरदार पाऊस व्हायचा तेथे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.
थोडक्यात विकासाची मोठी किंमत मोजून कर्बवायू उत्सर्जन करावे लागणार आहे हे नक्की, पण त्यासाठी योग्य ते उद्दिष्ट डोळ्यांसमोर हवे. विकसित देश सर्वच बाबतीत विकसनशील देशांपेक्षा आघाडीवर आहेत, पण त्यांना मात्र उद्दिष्ट कमी देऊन चालणार नाही. ज्यांच्याकडून उत्सर्जन जास्त होते, त्यांच्यावरची जबाबदारीही वाढवायला हवी. शिवाय क्योटो करारात ठरल्याप्रमाणे, विकसनशील देशांना दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करण्यासाठी त्यांना निधी उपलब्ध करून देणे हीही विकसित देशांची जबाबदारी आहे.
आशिया खंडातील जवळपास १ अब्ज लोक पाण्यासाठी हिमालयातील हिमनद्यांवर अवलंबून आहेत, पण या सगळ्यांसाठी धोक्याचा इशारा आहे. या हिमनद्या वितळत असून, त्यांचा वेगही वाढला आहे. अर्थात, जागतिक तापमानवाढीमुळेच हे घडतेय. त्यामुळे आगामी काळात या नद्यांवर अवलंबून असणार्‍या प्रदेशात दुष्काळ पडल्यास आश्‍चर्य वाटायला नको. याचा सर्वात जास्त धोका भारताला आहे. गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या पात्रांच्या आरंभाशी असलेल्या बर्फाच्छादित प्रदेशातील बर्फ वितळेल. या दोन्ही नद्यांतील सुमारे सत्तर टक्के पाणी हे एरवी बर्फ वितळूनच येत असते. ते एकाच वेळी वितळल्याने बर्फाखालचे डोंगर उघडे पडतील आणि या नद्यांचे पाणी एकत्रितरीत्या वाहून जाऊन समुद्राची पातळी वाढेल. परिणामी समुद्रकिनारी दाट वस्ती असलेल्या देशांना मोठा फटका बसेल. त्यामुळे मुख्य भूमीवर पाण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होईल. यासाठी देशाने मोठे प्रयत्न करायला हवेत, अन्यथा आपला भविष्यकाळ आपल्या हातातून निसटून जाईल. हिमालयातील हिमनद्यांचा परिसर जवळपास २४०० कि.मी.चा आहे. या क्षेत्रात पाकिस्तान, भारत, चीन, नेपाळ आणि भूतान हे देश मोडतात. आशियातील ९ नद्यांना या हिमनद्यांतून पाणी पुरवले जाते, त्यामुळे या नद्यांच्या पात्रात राहणार्‍या १ अब्जाहून अधिक लोकांचे जीवन यावर अवलंबून आहे, पण गेल्या ३० वर्षांत दर दशकाला हिमालयातील प्रदेशाचे तापमान ०.१५ ते ०.६ डिग्री सेल्सियसने (एकूण ०.२७ डिग्री) वाढल्यामुळे या नद्यांच्या वितळण्यात वाढ झाली आहे. साहजिकच त्या आटत चालल्या आहेत. पर्यावरणतज्ज्ञांनी या गंभीर मुद्द्याकडे ‘कोपनहेगन’ परिषदेच्या निमित्ताने जमणार्‍या नेतेमंडळींचे लक्ष वेधले आहे. पर्यावरण बदलासंदर्भातील आंतरसरकारी समितीने हिमालयातील हिमनद्या २०३५ पर्यंत गायब होणार असल्याचे भाकित वर्तवले आहे. या बदलाची प्रक्रिया सध्या सुरू झाल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पर्यावरणाच्या या असंतुलनाला वेगाने वाढणारे औद्योगीकरण व सतत सुरू असलेली जंगलतोडही जबाबदार आहे. तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या धुरांमुळे होणारे प्रदूषण, फ्रीज, एअरकंडिशनर आदी सुख-सुविधांच्या वाढत्या वापरानेच ग्लोबल वार्मिंगला आमंत्रण दिले आहे. आता जर  तुलनात्मक अभ्यास केला तर आपोआपच या गोष्टी स्पष्ट होतील की, सीएफसी गॅसचे उत्सर्जन करणार्‍या उपकरणांचा वापर कोठे होतो? फ्रीज, एअरकंडिशनर आणि इतर कुलिंग मशनरी आदींचा वापर भारताच्या तुलनेत अमेरिकादी देशांत फार मोठ्या प्रमाणात होतोय. आपल्या देशात आजही एकूण लोकसंख्येचा खूप मोठा हिस्सा दारिद्र्यरेषेखाली राहतोय. १० टक्के लोकही आर्थिक संपन्नतेच्या त्या स्तरावर पोहोचलेले नाहीत. अमेरिका अशी मुक्ताफळे उधळते आहे की, भारतासारखे देशविकसित बनण्याच्या प्रयत्नात अंदाधुंद पद्धतीने पर्यावरणाला नुकसान पोहोचवीत आहेत. अमेरिकेचे हे विचार काही काळ खरे मानले तरीही अमेरिकेसारख्या महासत्तेने हे समजून घेण्याचा प्रयत्न करणेे आवश्यक आहे की, भारतासारखा शेतीप्रधान व समजुतदार देश विकसित बनण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेत पर्यावरणाचा बळी चढवणार नाही. भारतातील हिंदू संस्कृती निसर्गोपासना व जीवदया शिकवते. या  मुद्द्यावर अमेरिकेने वायफळ दोषारोपण करण्यापेक्षा चर्चा करून असे काहीतरी ठोस नियम करून त्यावर सहमतीने कार्य करणे अपेक्षित आहे आणि अमेरिका आपल्या बळाचा वापर करून जर विकसनशील देशांवर दबाव आणेल, तर कोणताच देश शंभर टक्के मनापासून असे प्रयत्न करणार नाही. जेथे भारताचा प्रश्‍न आहे, तेथे भारतानेही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्यायोगे भारताला मानणारे देशही आपले अनुकरण करतील आणि पृथ्वीच्या पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करून येणार्‍या धोक्यापासून वाचतील. भारताला उद्योग व विशेषत: रासायनिक प्रक्रियेतून निघणारा कचरा पुन्हा उपयोगात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच झाडे व जंगलतोडही थांबवणे आवश्यक आहे. या सर्वांपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत वाढविणे फक्त अत्यावश्यकच नसून, येत्या काळात त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कोळशाचा वापर थांबवून पवनऊर्जा, सौरऊर्जा आदी स्रेात वाढवले तर पर्यावरणाचे संतुलन राखण्यात थोडेबहुत यश मिळवू शकू.
 कोपनहेगनच्या बैठकीत प्रभावी व परिणामकारक निर्णय होणे आवश्यक आहे आणि जर फक्त राजकीय निर्णयच झाले तर मात्र या बैठकीला ‘एक निव्वळ फार्स’च म्हणावे लागेल.

दै. तरुण भारत, सोलापूर.
•अमर पुराणिक
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर खरे तर जातिव्यवस्था मोडून काढण्याच्या दृष्टीने स्वातंत्रवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप प्रयत्न केले होते. स्वा. सावरकरांना ब्राह्मण समाजाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा स्वा. सावरकरांनी त्यांच्या भाषणात ‘ज्या घटना अखंड हिंदुस्थानाला आणि हिंदुत्वात बाधा निर्माण करु शकतील अशा कोणत्याही संघटनांच्या पाठीशी मी उभारणार नाही’, असे सांगून, ‘तुमच्या जातीच्या संघटनेचा लवकरच तेरावा होवो’ अशी आशा स्वा. सावरकरांनी व्यक्त केली होेती.
 १९३१ सालच्या जनगणनेत जात या घटकाबद्दल माहिती जमा केली होती व त्यानंतर हा घटक बाद करण्यात आला. जात या घटकाची बिनचूक माहिती मिळवणे कठीण असल्याचा अभिप्राय तत्कालिन जनगणना आयुक्तांनी दिला होता व याबाबतची परिस्थिती अजूनही बदललेली नाही. सध्या सरकारने जात्याधारीत जणगणनेचा घाट घातला, त्यामुळे पुन्हा हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. स्वातंत्रप्राप्तीनंतर आणि विशेषत: गेल्या दोन दशकांत जातींच्या राजकारणाने वेग घेतला आणि राजकीय चित्रही बदलत गेले. जातीनिहाय जनगणनेचा नेमका परिणाम काय होईल? जाती-जातींमधल्या भिंती त्यामुळे मोडून पडतील की अधिकच वाढतील. मागासांचे खरे हित त्यातून साधले जाईल की केवळ राजकीय लाभापोटी हा निर्णय झालाय? स्वा. सावरकरांच्या शब्दात सांगायचे तर जात्यूच्छेदाचा लढा यामुळे यशस्वी होईल काय? असे अनेक प्रश्‍न उभे रहातात.
जातवार जनगणेचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून आधीच जातीभेदाने बरबटलेल्या, बुरसटलेल्या देशाला हजारो वर्षं मागे घेऊन जाणारा आहे. मावनजातीला कलंक असलेली जन्माधिष्ठित जातीव्यवस्था मुळातूनच उखडून टाकण्याऐवजी ती आणखी मजबूत करण्याचा राजकिय डाव कॉंग्रेसने गेली साठ वर्षे सतत चालू ठेवला आहे. या सत्तांध राजकारण्यांचा डाव समस्त हिंदूंनीच नव्हे, तर इतर धमीर्यांनीही ओळखला पाहिजे. उद्या जातीनिहाय जनगणेनचा दुरुपयोग अनेक जातींवर अन्याय करण्यासाठी होऊ शकतो. जातीभेद नष्ट करण्याऐवजी पुष्ट करणारा सरकारचा हा निर्णय वेळीच हाणून पाडला नाही तर केवळ एवढ्या एका गोष्टीवर धर्माचीच नव्हे तर सबंध देशाचीच शकले होऊ शकतात. जातीनिहाय जनगणना हा एक सामाजिक अपमान आहे आणि म्हणून या निर्णयाचा समाजाच्या सर्व थरांमधून जाहीर निषेध करण्याची गरज आहे.
कॉंग्रेस, समाजवादी, कम्यूनिस्टांनी जातीयवादी नसणार्‍या भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसारख्या पक्षांना उठसूठ जातीयवादी शक्ती म्हणून हिणवायचे, स्वत: कॉंग्रेसने मुस्लिम, ओबीसी यांना आरक्षण मागून जातीय राजकारण करायचे हा तर निव्वळ दुटप्पीपणा आहे. भाजपा आणि शिवसेना या हिंदूत्ववादी आहेत. व्यापक हिंदूत्ववादाची व्याख्या स्वा. सावरकरांपासून आजपर्यंतच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, अभ्यासकांनी मांडली आहे. भाजपा-शिवसेनेच्या हिंदूत्ववादाला जातीयवादी ठरवणे हे केवळ सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारे आहे. एकवेळ भाजपा-शिवसेनेला धर्मवादी म्हटले असते तर एकवेळ चालले असते पण जातियवादी म्हणने म्हणजे केवळ लोकांची दिशाभूल करणे आहे.  यांना जातियवादी म्हणणार्‍यांनी हे विसरु नये की, महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेची सत्ता असताना मंत्रीमंडळात सर्वात जास्त मागासवर्गीयांचा समावेश होता, याकडे मात्र जाणिवपुर्वक डोळे झाक केली जाते.
पूर्वीच्या काळी ‘उच्च’ वलय/प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी आपण तथाकथित उच्च जातीतील आहोत असे सांगण्याचा कल समाजशास्त्रज्ञांनी नोंदविला आहे. वर्तमानकाळात आरक्षणाचे लाभ मिळावेत या अपेक्षेने स्वत:ला उच्च जातीतील असूनही मागास वर्गात समाविष्ट करवण्याचे प्रयत्न काही नागरिकांकडून झाले आहेत. कर्नाटकातील जंगम समाज, तमिळनाडूमधील अय्यर, प. बंगालमधील कायस्थ अशी अनेक उच्च जातींची उदाहरणे देता येतील. मुळात या पुर्वाश्रमीच्या ब्राह्मणांच्या पोटशाखाच आहेत.
जातींच्या आधारे आरक्षण देण्याचे धोरण भारतात गेल्या साठ वर्षात ज्या प्रकारे राबवले गेले आहे, त्या पार्श्‍वभूमीवर जातवार जनगणनेतून फारसे निष्पन्न होणार नाही. भारतातील राज्यसंस्थेने नेहमीच सामाजिक न्यायाचे धोरण निव्वळ आरक्षणाच्या मुद्द्याभोवती फिरवत ठेवले आहे. इतर मागास म्हणजे नक्की कोण हे ठरवण्याची संधी त्यातून राज्यकर्त्यावर्गाला प्राप्त झाल्यामुळे ही वर्गवारी संपूर्णपणे पोकळ बनवण्याचे काम गेल्या वीस वर्षांत केले गेले. राजकीय दबावाखाली एकीकडे जाट, लिंगायत समाजातील काही जाती, अय्यर अशा त्या त्या राज्यातील वर्चस्वशाली जातींचा समावेश ओबीसींमध्ये केला गेला, तर दुसरीकडे निव्वळ कागदोपत्री उल्लेख नाही म्हणून अनेक लहान मागास जातींना आरक्षणाच्या लाभांपासून वंचित राहावे लागले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आरक्षण धोरणाची आणि त्यामागच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांची खर्‍या अर्थाने कधीच अमलबजावणी न झाल्याने मूळ तत्त्व बाजूला पडून या धोरणाने तुटपुंज्या लाभांसाठी जाती-जातींमध्ये झगडा लावून देण्याचे काम केले. त्याचा परिणाम म्हणून प्रत्येक वर्गवारी अंतर्गत आमच्या जातीला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी कित्येक जातींनी सुरू केली. पूर्वाश्रमीच्या महार जातीलाच आरक्षणाचे लाभ मुख्यत: मिळाले, असे मानून मातंगांनी स्वतंत्र कोट्याची केलेली मागणी या संदर्भात ताजी आहे. परंतु ही मागणी केवळ मातंगांपुरती मर्यादित नाही. धनगरांनीही आम्ही धनगर नसून ‘धनगड’ असल्याने सांगतात. मराठे कुणबी आहोत असा दावा करतात, लिंगायत आपण ’लिंगडेर’ आहोत, असे सांगत या सर्व जाती आरक्षणाची मागणी रेटत आहेत.
 जातीनिहाय जनगणनेमुळे जातीजातींमधील भिंती मोडून पडण्याऐवजी, आपापसातील दुरावा अधिकच वाढण्याचा धोका संभवतो. देशात अमूक अमूक इतक्यासंख्येने मागासवर्गीय आहेत, हे एकदा कळल्यानंतर मागासवर्गीयांंचा फायदा करून देण्यापेक्षा आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचीच ही चाल आहे. त्यानुसार समाजात विषमता निर्माण होण्याचा अधिक धोका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणामुळे अथवा त्याबाबतच्या मागण्यांमुळे देशातील सामाजिक व्यवस्थेची घडी विस्कटलेलीच आहे, आणि त्यातच जातीनुसार जनगणना म्हणजे जाती-जातीमधील दरी अधिकच वाढत जाणार, म्हणजे हे आगीत तेल ओतण्यासारखेच आहे.
जातीनिहाय जनगणना व्हावी हा राजकीय नेत्यांचा आग्रह हा ओबीसींना न्याय देण्यासाठी नसून केवळ राजकीय लाभ उपटण्यासाठीच आहे. त्यात त्यांना महत्त्वाचे लाभ होणार आहेत. प्रत्येक विभागात विशिष्ठ जातीचे प्राबल्य असलेल्या जातीचाच उमेदवार उभा करून व्होट बँक तयार करणे हा आहे. गोपीनाथ मुंडे, छगन भूजबळांचा यात ओबीसींना न्याय देण्याचा हेतू आहे, असे गृहीत धरले तरी याचा फायदा मुंडे-भुजबळ आदी ओबीसी नेत्यांना मिळणार नाही. याचा सर्वात जास्त फायदा कुटनितीत प्रविण असलेली कॉंग्रेसच घेईल. जातीच्या आधारावर माणसामाणसात फरक करीत राहाणे मुळात अत्यंत अयोग्य आहे. स्वतंत्र भारताचा इतिहास पहाता याचा उपयोग जातीपातीचे आणि व्होटबँकेचे राजकारण करणार्‍या संधिसाधू नेत्यांनाच होईल अशीच शक्यता जास्त आहे.
सर्वसामान्य नागरिकांत जतीनिहाय जनगणनेबाबत दोन मते आहेत. एकवर्ग म्हणतो की, जात हे या देशातील वास्तव आहे, त्यामुळे जातीनिहाय जनगणना होणे योग्य आहे. तर जातींची प्रगणना होऊ नये असे वाटणारा दुसरा वर्ग आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास देशातील मागास जाती-जमातीचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे आणि त्यामुळे ओबीसींची संख्या नेमकी कळणार आहे! या संख्येच्या आधारावर ओबीसी नेते त्यांच्यासाठी आरक्षणाची मागणी रेटू शकतात. त्यामुळे इतर पक्षांत स्थिरावलेला ओबीसी स्वत:ची चळवळ समर्थपणे संघटित होऊन चालवू शकतील! त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांची मिरासदारी संपुष्टात येऊ शकते, असा विचारवंतांचा कयास आहे. तर देशाची सामाजिक व्यवस्था कोलमडेल व सहोदर भाव नष्ट होवून अराजक माजेल, हा भविष्यातील धोका असल्यामुळेच काही राजकीय नेते या जातीनिहाय जनगणनेला विरोध करत आहेत.
जातीचे जनगणनेत प्रतिबिंब उमटले तर काय मोठे संकट कोसळणार आहे? कोंबडा झाकून ठेवला, तरी तो आरवतोच ना? देशातील इतर मागास जातींचा सर्व क्षेत्रांत संचार झाला तर देशाचेही हित साधले जाईल. ओबीसीनी राष्ट्रीय प्रवाहात सामील होऊन देशाचे कुशल नेतृत्व करावे, म्हणून जातीनिहाय जनगणना त्यांना प्रेरणा देईल. ‘जात’ नाही तिलाच जात म्हटले जाते हे वास्तव नाकारून कसे चालेल? असाही विचार मांडणारे राजनीतीच्या दृष्टीने भोळीभाबडी असणारी मंडळी मांडत आहेत. आजपर्यंत ज्यांच्यासाठी योजना राबवल्या त्या योजनांचा फायदा त्या समाजाच्या लोकांना लोकांना किती मिळाला, अशा योजनांवर राजकीय धुर्तांनीच डल्ला मारला, आणि लाभधारक मात्र या योजनांच्या लाभांपासून वंचितच राहीला, याचा या विचारवंतांना विसर पडलेला असावा.
आजही माळी, कोळी, साळी, सोनार, सुतार, लोहार, गुजर, भंडारी हा समाज दुर्लक्षितच आहेे. त्यामुळेच आजच्या महाभारतात मुंडे, कल्याणसिंग, उमाभारती यांना सतत अपमानीत करण्याची स्पर्धा लागली आहे. मागास समाजाला न्याय मिळायचा असेल तर त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला पाहिजे, पण सन्मान किंवा ओबीसींची प्रगती साधायचा जात्याधारीत जणगणना हा मार्ग नव्हे. नाही तर आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते असा प्रकार व्हायचा.
कॉंग्रेसने गेली साठ वर्षे भारतीय समाजात विघटनाच्या किती संधी उपलब्ध आहेत याचाच सतत विचार करत असतात. जातीयतेची विषारी बीजे दूर सारून एकंदर सर्व भारतीय समाज संघटित करावा असा जाणीवपूर्वक अथवा विवेकपूर्वक प्रयत्न करताना कुणी दिसत नाही, हे आजचे दुर्दैव आहे. जर या देशातील जातीयता पूर्णपणे नष्ट करायची असेल तर केंद सरकारने असा कायदा करावा की १ जानेवारी २०११ पासून या देशात जन्माला येणार्‍या प्रत्येकाची नोंद करताना फक्त त्याचा धर्मच लिहावा. त्यात कोणत्याही जातीचा-पोटजातीचा, पंथाचा उल्लेख असु नये.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दहा-पंधरावर्षांपुर्वीच अशी मागणी केली होती. अनेक मुस्लिम किंवा ख्रिस्ती व्यक्ती हिंदू होऊ इच्छिताना विचारतात, आम्हाला हिंदू झाल्यावर कोणत्या जातीमध्ये घेणार? तरी जातींचा उल्लेख ताबडतोब बंद होणे जरूर आहे.
जर सरकारला जातीनिहाय जनगणना करायचीच असेल तर त्यांनी आधी १९४७ सालापासून भारतात पाकिस्तान आणि बांगलादेशातून किती लोंढे आले त्याची प्रथम आकडेवारी जाहीर करावी. जे आले ते परत का गेले नाहीत? त्याला जबाबदार कोण? ते शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करावी. त्यातून जे उरतील त्यांची जनगणनेत नोंद करावी. थोडक्यात, जातीचा एकमेव निकष मानून आरक्षण लागू करण्याच्या धोरणाचा परिणाम म्हणून आणि या धोरणाच्या राजकीय वापराचा परिणाम म्हणून हे धोरण आज सर्वस्वी पोकळ वर्गवार्‍यांच्या राजकारणात अडकलेले आहे. शिवाय, या धोरणात सामाजिक न्यायाचे तत्त्व बाजूला पडून त्याचे रूपांतर जाती-जातींमधील कृतक संघर्षात झालेले दिसते. वस्तूत: भारतातील जातीनिहाय आरक्षणे बंद करुन फक्त आथिर्कदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षणे दिली पाहिजेत. यामुळे जाती-जातीतील भिंती नष्ट होतील व सारे भारतीय गर्वाने म्हणतील आम्ही सारे भारतीय आहोत. 
दै. तरुण भारत, सोलापूर.
चीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे
•अमर पुराणिक
सीमानिश्‍चितीचे स्पष्ट निर्धारण नसल्याने आपल्या देशावर काय संकटे येऊ शकतात, याचा सध्या सुरु असलेल्या चीनी घुसखोरीचा छोटासा नमुना आहे. सध्याचे सरकार अशा घटना घडतच असतात(?) असे सांगत वेळ मारून नेत आहे. हा प्रकार संपुआ सरकारने गंभीरपणे घेतलेला दिसत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली. या साठ वर्षांत ७ ते ८ वर्षांचा काळ सोडला तर कॉंग्रेसच सत्तेत आहे. परराष्ट्र धोरणांच्याबाबतीत या सत्ता कालावधीत भारताची भूमिका, कार्य व प्रयत्न निराशाजनक आहेत. १९६२ च्या युद्धात चीनने भारताचा मानहानीकारक पराभव करत भारताला दणका दिलेला होता. नेहरु व तत्कालिन कॉंग्रेसच्या धोरणांमुळे भारताला हा मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. तरीही नेहरु ‘हिंदी-चीनी भाई-भाई’चे गुणगाण गात मुख्य प्रश्‍नांना बगल देत होते. १९६२ च्या अनुभवानंतरही आजतागयात या सरकारने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. या सरकारची परराष्ट्र धोरणे आणि राजकीय मुत्सद्देगिरीबाबत वनवाच होती व आहे. भाजपा सरकारच्या काळात मात्र परराष्ट्र धोरणे अतिशय प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न झाला होता. पाच वर्षांच्या अल्प कालावधितही सीमारेषांच्या निश्‍चितीसाठी मोठे प्रयत्न त्या काळात झाले होते, पण इतर सहयोगी पक्षांनी आणि विरोधकांनी या धोरणाला खो घातला होता. त्यानंतर झालेल्या सत्तांतरणामुळे हा प्रश्‍न गेली ५ वर्षे अडगळीत पडला आहे. त्यावेळच्या भाजपा सरकारचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सीमानिश्‍चितीच्या प्रश्‍नाचे गांभीर्य ओळखून चांगला प्रयत्न झाला होता. रालोआ सरकारातील परराष्ट्रमंत्री भाजपाचे माजी ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांनी लिहिलेल्या ‘ए कॉल टू ऑनर’ या पुस्तकात याचा सविस्तर उहापोह केला आहे. जॉर्ज फर्नांडिसही चीनी धोक्याबद्दल सतत सावध करत आले आहेत. मात्र, आताचे सरकार चीनी व पाकिस्तानी घुसखोरी संदर्भात सारवा सारवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहेत आणि सीमेवरील वास्तव मात्र भिन्न आहे.
भारताच्या संपूर्ण उत्तर सीमेला चीन वेळोवेळी वादग्रस्त ठरवीत आला आहे. काश्मिर सीमेवर पाकिस्तान गेल्या ५०-६० वर्षांत सतत धुडगूस घालत आहे. बांग्लादेश सीमेबाबतही अशीच दयनीय परिस्थिती आहे. उत्तर पश्‍चिमेकडील अक्साई चीनच्या ३६ हजार चौरस कि.मी. विस्तृत क्षेत्रात  १९६२ सालीच चिनी सैन्य घुसले होते आणि आजपर्यंत या भागावरचा ताबा चीनेने सोडलेला नाही. १९६२ च्या युद्धानंतर चीनने या वादग्रस्त क्षेत्राचा समावेश सरळ आपल्या अधिकृत नकाशात केला असून, या भागात चीन इतका मजबूत झाला आहे, की त्याला मागे सारणे आता आपल्याला केवळ अशक्य आहे. अरुणाचल प्रदेशावरही चीन आपला हक्क रेटून सांगतोय.
अरुणाचल प्रदेशात १९६२ च्या युद्धात चीनी सैन्यदल बर्‍याच आतपर्यंत शिरले होते. युद्ध संपल्यावर मात्र ते चीनी सैन्य स्वत:हून मागे फिरले होते. तरीही ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेशच्या सर्व ९० हजार चौरस कि.मी. क्षेत्रावर चीन आजही आपला हक्क सांगतो. अरुणाचल प्रदेश स्वायत्त तिबेटचा हिस्सा आहे आणि तिबेट चीनचे अविभाज्य अंग असल्याने, या प्रदेशावर आपला हक्क आहे, असा चीन युक्तीवाद करत आहे. इतकेच नव्हे, तर भारत आणि चीनच्या दरम्यान ४ हजार कि.मी.च्या सीमारेषेलाही वादग्रस्त ठरवत, लगतच्या अनेक भागांत चीनने वारंवार घुसखोरी केल्याचा आजवरचा इतिहास आहे. ब्रिटिश राजवटीत भारत आणि चीन दरम्यानच्या सीमेचे निर्धारण करताना, १९१४ साली झालेल्या सिमला समझोत्यानुसार जी ‘मॅकमोहन रेषा’ आखली गेली होती, ती मानायला चीन तयार नाही. ‘ब्रिटिश साम्राज्याने चीनच्या अखेरच्या छिंग राजाच्या कमकुवततेचा फायदा घेत, आपल्या मनाजोग्या करारावर छिंग राजाच्या स्वाक्षर्‍या घेतल्या आणि त्यात ब्रिटिशांनी चीनची फसवणूक केली म्हणून मॅकमोहन रेखा आम्हाला मान्य नाही’, असे स्पष्टीकरण चीन देत आहे. 
 वायव्य सीमेवर अक्साई चीन भागात भारताने चीनचे हक्क मान्य केले, तर ईशान्येला अरुणाचल प्रदेशात चीन भारताच्या लाभात आपले हक्क सोडायला तयार आहे, अशा प्रकारचा तोडगा चीनच्या मनात असल्याचे यावेळी ध्वनित झाले. दिलेला शब्द फिरवणे हा चीनचा स्वभाव आणि आजवरचा इतिहास आहे.
एका बाजुला असा पेच असताना, दुसर्‍या बाजुला पाकिस्तानची कारस्थाने सतत सुरूच आहेत. पश्‍चिम भागात पाकिस्तानकडून चीनला अनेक लाभ झाले आहेत. किंबहुना पाकला चीन्यांची फुस आहे, असे भारतीय राजकीय तत्वज्ञान्यांचे ठाम मत आहे. १९४७ साली भारताकडून हिसकावून मिळवलेला १३०० चौरस कि.मी.चा भूभाग पाकिस्तानने सरळ चीनच्या हवाली केला आहे. त्याचे काराकोरम मार्गात चीनने रूपांतर केले. तिबेटच्या पर्वतरांगांमधून सुरू होणारा हा मार्ग पाकव्याप्त काश्मीर मार्गे थेट पाकिस्तानात जातो. काश्मिर प्रश्‍न पाकिस्तान याचसाठी चिघळवतो आहे आणि तेही चीनच्या सल्ल्याने या मार्गावरून एकाच वेळी कित्येक रणगाडे जाऊ शकतात. भारताच्या विरोधात युद्धकाळात हा मार्ग सामरिक निर्णय केंद्र (स्टॅटॅजिक पॉईंट) ठरू शकतो.
 चीनचा सीमेबाबत वाद एकट्या भारताशी नसून, लगतच्या २२ देशांशी आहे; विशेषत: रालोआच्या काळात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व तेव्हाचे महामहिम राष्ट्रपती मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या कणखर नेतृत्वाने केलेल्या अणुचाचण्यांमुळे भारत अणुशक्ती संपन्न झाला आणि भारताचे अमेरिकेशी संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत, या घटना चीनने सर्वाधिक गांभीर्याने घेतल्या आहेत. त्यामुळे या कारवाया चीनने वाढवल्या आहेत. मात्र, या कारवायांचा कडक भाषेत समाचार घेण्यास भारताचे परराष्ट्र मंत्रालय का कचरते, त्याचा बोध आजवर होऊ शकला नाही आणि त्यामुळे आपले पराराष्ट्र धोरण ही उघडे पडते.
भारताच्या शेजारी राष्ट्रांच्या सरकारांना भारताच्या विरोधात भडकवण्याचा चीनी रणनीतीचा भाग बनला आहे. नेपाळ याचे ताजे उदाहरण आहे. वस्तुत: नेपाळ कालपरवापर्यंत स्वत:ला अभिमानाने जगातले एकमेव हिंदू राष्ट्र म्हणवत होते. नेपाळचे भारताशी संबंध अत्यंत सलोख्याचे होते. कारण दोन देशांमध्येे समान संस्कृती आणि धर्माशी निगडित पुरातन परंपरेचा समान धागा आहे. तथापि, चीनला आपला प्रेरणास्त्रोत मानणारे माओवादी या अतूट नातेसंबंधांची नाळ तोडू पहात आहेत. नेपाळच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेश आणि एका मर्यादेपर्यंत श्रीलंकेलाही भारताविरुद्ध भडकवण्यात, चीनला गेल्या काही वर्षांत बर्‍यापैकी यश मिळाले आहे. भारत-पाकिस्तान संबंधात चीनचा हस्तक्षेप, तिबेटमध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप आणि उभय देशातील अद्यापही न मिटलेला सीमाप्रश्‍न आदी प्रश्‍नांमुळे भारत-चीन शीतयुद्ध सुरु आहे आणि सामरिक संघर्षाची शक्यताही आहे.
भारत-पाक युद्ध झाल्यास चीन यात हस्तक्षेप करेल हे उघड आहे. कारण, दक्षिण आशियात भारत आणि पाक असा सत्तेचा समतोल राखणे हे चीनचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच पाकचे पारडे कमी पडतेय, हे लक्षात आले की त्याला आधार द्यायचे चीनी धोरण आहे. भारतीय परराष्ट्रधोरण पाकिस्तान भोवतीच घुटमळत राहिल्याने भारताची शक्तीही मर्यादीत झाली आहे. किंबहूना भारताला दक्षिण आशियापुरताच मर्यादीत ठेवण्याचा चीनचा मनसुबाही यशस्वी ठरला आहे. जागतिक पातळीवर बलवान प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येण्याचे भारताचे मनसुबे चीनने पाकिस्तानला उचकावत हाणून पाडले आहेत. चीनला आशियातील चीन हीच एकमेव शक्ती म्हणून पुढे रहायचे आहे, त्यामुळे येनकेन प्रकारे भारताला सर्वबाबतीत चाप बसवण्याचा प्रयत्न चीन करत आहे. भारताला महासत्ता होऊ द्यायचे नाही हा मनसुबा बाळगत चीनने कायम पाकिस्तानला मोठे करण्याचा मार्ग अंगिकारला आहे. पाकच्या लष्करी विकासाला आणि अण्वस्त्रसज्ज होण्याला चीनचेच जास्त सहकार्य राहिले आहे. भारताने अणू चाचणी केल्यानंतर चीननेच पाकला प्रेरीत करत अण्वस्त्रचाचण्यासाठी लागणारी सर्व मदत पुरवली. आता भारताबरोबर पाकही अण्वस्त्रसज्ज देश बनला आहे. त्यामुळे चीनला दक्षिण आशियातील सत्तासमतोलही साधला गेला आहे. हा सत्ता समतोल साधल्याने चीनला आशियात सर्वश्रेष्ठ राहणे शक्य झाले आहे.
 १९६२ च्या चीनबरोबरच्या युद्धात झालेला पराभव भारताला अतिशय जिव्हारी लागला. हा प्रसंग स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मानहानीकारक प्रसंग होता. इतकी वर्षे झाली तरी आपण ते दुःख विसरू शकलेलो नाही. भारताच्या अब्रुला लागलेला हा डाग अजूनही निघालेला नाही.
चीन भारतासारखाच समाजवादी असल्याने आपल्यावर हल्ला करणार नाही, अशा भ्रमात त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू होते, शिवाय पंतप्रधानपदाची आणि सत्तेचीही धुंदी होतीच. त्यांनी देशाच्या प्रगती आणि संरक्षणव्यवस्थेची तसेच सीमानिश्‍चितीच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केले नाहीत, पण १९४९ मध्ये स्वतंत्र झालेल्या चीनने लगेचच आपल्या सीमांची पुनर्रचना करायला सुरुवात केली. त्यासाठी पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार आणि भारताशी बोलणीही सुरू केली. ही बोलणी म्हणजे केवळ सीमाप्रश्‍न नव्हता, तर आपला गेलेला परिसर परत मिळविण्याचा हेतू होता. वारंवार युरोप दौर्‍यापलीकडे नेहरूंच्या परराष्ट्र धोरणात विशेष काही नव्हते. याच धुंदीत चीनची धोरणे आणि लष्करी क्षमता नेहरूंच्या कधी लक्षातच आली नाही. परराष्ट्र धोरणांबाबत व राजनैतिक पातळीवर मुत्सद्देगिरीची उणीव राहिली. यामुळेच नेहरू चीनला कमी लेखत राहिले आणि ज्यावेळी चीन युद्धासाठी उभा ठाकला तेव्हा नेहरुंच्या पाचावर धारण बसली आणि जगासमोर आपल्या क्षमतेचे धिंडवडे निघाले, ही झालेली अब्रुनुकसानी वेगळीच. आपले सैनिकांचे जाज्वल्य देशप्रेम आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ते त्वेषाने चीन्यांशी लढले, पण भारताची समरीकक्षमताच नगण्य असल्याने त्यांना मागे फिरावे लागले. किंबहुना तेव्हाच्या भारतीय नेतृत्वाला आपली जमीन सोडून मागे फिरण्याची नामुष्की पत्कारावी लागली. खरेतर भारताच्या नमतेपणाची सुरुवात ही नेहरूंनी १९५१ मध्येच केली होती आणि त्याला नेहरुंची कचखाऊ धोरणेच जबाबदार होती. चीनने तिबेट बळकावले आणि तिबेटच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या भारतीय नेतृत्वाने मात्र षंढपणे आपले हात वर केले. चीनला विरोध करण्याऐवजी दलाई लामांना त्यांनी भारतीय भूमीवर आश्रय दिला हेच तेवढे तिबेटी लोकांवर काय ते उपकार. १९५९ मध्ये चीनने तिबेटमधले बंडही अतिशय कठोरपणे मोडून काढले, त्यावेळीही नेहरू शांत बसले. नेहरूंनी तिबेटप्रश्‍नी चीनच्या पायी लोटांगण घालून १९५४ मध्ये करार केला पण हा करार म्हणजे भारताचा दुबळेपणा, अशी व्याख्या चीनने केली.
सीमाप्रश्‍न उकरून चीनने भारतालाही हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या दुर्देवाने नेहरूंना माओ आणि पर्यायाने चीनचा डाव समजलाच नाही, पण नेहरुंना चीनचा हा डाव समजलाच नाही, असे म्हणणे म्हणजे नेहरुंच्या राजकीय मुत्सद्देगिरीची उणीव उघडी पडते, व परराष्ट्र धोरणांच्या धोरणात्मक आणि क्रियात्मक क्षमतेची दिवाळखोरीही जाहीर होते. नेहरुंच्या याच गोष्टींमुळे भारताचा हा मानहानीकारक पराभव भारतीयांच्या काळजात कायम घर करून राहिला. या पराभवाने शहाणे होईल ती कॉंग्रेस कसली. नेहरुंपासून सोनियांपर्यतच्या कॉंग्रेसच्या नेतृत्वाने देशाची सामरिक, तांत्रिक व आर्थिक सक्षमता साधण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. चीन आपल्याला वाकुल्या दाखवत आहे, पण आज घडीला तरी भारतात चीनशी लढण्याची किंवा त्यांचा माज उतरविण्याची क्षमता नाही. तसेच राजकीय मुत्सद्देगिरीची आजच्या सरकारात किती वणवा आहे,  हे आता चीनच्या सुरू असलेल्या आगळीकीला भारतीय नेतृत्वाने दिलेली लाचारीची उत्तरे व सारवासारवीवरून दिसून येते. भारताची एकुण क्षमता चीनच्या फक्त एक तृतीयांशापेक्षाही कमीच आहे. चीनच्या सामर्थ्याची बरोबरी साधणे भारताला सध्यातरी केवळ अशक्य आहे. पण ‘पडले तरी नाक वर’ अशा पद्धतीचा प्रचार प्रसारमाध्यमांना हताशी धरुन सतत करत आहेत. इतर प्रगतीच्याबाबतीत कॉंग्रेस पुढे नसली तरी, स्वत:चा आणि कॉंग्रेसचा उदोउदो करुन घेण्यात मात्र आघाडीवर आहेत.
 तिकडे चीन मात्र त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यापासून हळूहळू पण सतत प्रयत्न करत या दमदार स्थितीत पोहोचला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासुनच चीन स्वतःचे नेतृत्व अशियात पुढे आणत होता. त्याचवेळी चीनने भारताला कमकुवत करण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले. चीनने पाकिस्तानला आर्थिक, लष्करी सर्व मदत करून भारताविरोधात भडकावले. त्यामुळेच फाळणीनंतर पाकिस्तानबरोबर भारताची तीन युद्धे झाली. यासाठी पाकला शस्त्रपुरवठा अमेरिकेप्रमाणेच चीननेही केला, किंबहुना अमेरिकेपेक्षाही जास्त पुरवठा केला होता. शिवाय, पाकबरोबरच्या या तणावने भारताला आपले लाखो सैनिक सीमेवर सतत तैनात ठेवत एवढ्या प्रचंड सैनिकीशक्तीचा अपव्यय करावा लागला.
नेपाळ आणि म्यानमार यांना चीनने आपल्या बाजूने वळविले, आता भूतान आपल्या घशात घालण्याचा त्यांचा डाव आहे. नेपाळ आणि म्यानमानरला चीनने सर्व ती मदत केली. नेपाळमध्ये झालेली सर्व पायाभूत कामे चीनी मदतीने होत आहेत. पाकिस्तान हा तर चीनचा दोस्त आहेच. भारताच्या सर्व शेजार्‍यांना आपल्या हाताशी धरून चीनने भारताला अशांत कसे करता येईल, याचे चोख नियोजन केले आणि त्यावर अंमलबजावणी करत भारताला सतत अशांत ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
तात्विक, आर्थिक आणि राजकीय, कुठल्याही दृष्टिकोनातून विचार केल्यास आज चीनने भारतावर मात केल्याचे दिसून येते. चीनची उद्दिष्ट्ये स्पष्ट होती. त्यांना ताकदवान महासत्ता देश बनायचे होते. ते उद्दिष्ट त्यांनी सतत व कठोर परिश्रम करत व धोरणी नेतृत्वाच्या सहाय्याने साध्य केले. पुरेपूर संधीसाधूपणाही चीनच्या अंगी आहेच. जागतिक पातळीवर परिस्थितीनुरूप कधी रशिया तर कधी अमेरिकेचा हात धरण्यातही चीन्यांनी कमीपणा मानला नाही. आर्थिक विकासाबाबत त्यांनी शक्य ते सर्वकाही केले आहे. अशा मुरब्बी राष्ट्राशी टक्कर देण्यासाठी भारताला सतत व फारच कठोर प्रयत्न करावे लागतील. भारत व चीनचा तौलनिक अभ्यास केल्यास भारताला कसे लोखंडाचे चणे चावावे लागतील याचा हा छोटासा नमुना आहे. खाली केलेल्या तुलनेत फक्त दोन्ही देशांच्या प्रगतीचे ठळक व काहीच मुद्यांचा उहापोह केला आहे.
भारत-चीन तुलना -  चीन आणि भारत हे दोन्हीही देश क्षेत्रफळाने अवाढव्य आहेत. आशियातल्या दोन मोठ्या शक्तीही आहेत. उद्याच्या महासत्तांमध्ये त्यांची गणनाही होत असून, दोघे परस्परांचे स्पर्धकही आहेत.
दोन्ही देशांत लोकसंख्येचा स्फोट झाला आहे, पण ती नियंत्रणात आणण्यासाठी चीनने काय केले आणि आपण काय करतोय? चीनमध्ये कुटुंब नियोजनाचा अवलंब १९७० पासून झाला, तर भारतात १९५२ पासून सुरू झाला, पण २००१ मध्ये भारताचा जनन दर चीनच्या तिप्पट होता. भारतात दरवर्षी १ कोटी ८० लाख लोक जन्माला येतात, चीनमध्ये फक्त ९० लाख. भारताचे प्रति माणशी वार्षिक उत्पन्न ४४० डॉलर्स आहे, चीनमध्ये तेच ९९० डॉलर्स आहे. जागतिक बँकेने निश्‍चित केलेल्या मानकानुसार भारतात २६ ते २९ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात. चीनमध्ये हेच प्रमाण अवघे ३ टक्के आहे.
चीनमध्ये दरवर्षी ८ कोटी ७० लाख पर्यटक बाहेरच्या देशातून येतात. भारतात हेच प्रमाण जेमतेम २५ लाख आहे. पर्यटनाचा व्यवसाय आपल्याकडे असलेल्या आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्राच्या सातपट मोठा आहे. हा उद्योग चीनमध्ये ३७०० अब्ज डॉलरची उलाढाल करतो, पण मोठा इतिहास असणारा, वैविध्यपूर्ण संस्कृती, भाषा असणार्‍या आणि पहाण्यासारखे खूप काही असलेल्या भारतात मात्र हा व्यवसाय अजूनही नीट जम बसवू शकलेला नाही. परिणामी या बाबतीत आपण चीनच्या बर्‍याच मागे आहोत.
परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत चीन २००२ मध्ये १०६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली. भारतात हे प्रमाण अवघे ३.६ अब्ज डॉलर्स आहे. चीनची ही गुंतवणूक भारताच्या ७०० पट आहे. चीनची निर्यात भारताच्या १००० टक्क्यांहून जास्त आहे. चीनच्या एकुण उत्पन्नातील ५० टक्के उत्पन्न उत्पादन क्षेत्रातून येतो. भारतात हे प्रमाण फक्त २२ टक्के आहे.
शेतीच्या बाबतीतही चीन भारताच्या पुढे आहे. चीनचे कृषि उत्पादन ४१५ दशलक्ष टन प्रतिवर्ष आहे. भारताचा हाच आकडा २०८ दशलक्ष टन प्रतिवर्ष असा आहे. वास्तविक कृषि उत्पन्नात भारताला चीनपेक्षा जास्त संधी आहे. कारण सूर्यप्रकाश, पाऊस, नद्या आणि कष्टाळू भारतीय नागरिक यांच्या सहाय्याने हे उत्पादन भरपूर वाढायला संधी आहे, पण आपल्या शासनाच्या ढीसाळ व नियोजनशुन्य धोरणांमुळे हे अशक्य आहे.
 ही आकडेवारी २००२ ची असली तरी भारताच्या बाजूने यात फार वाढ झालेली नाही. आपल्याकडचे सरकार व प्रशासन या विकासात कमी पडतात व बहुतांशी अडथळाच ठरतात. या सर्वांवर कहर म्हणजे बौध्दिक दिवाळखोर असलेले आणि निष्क्रीय व भ्रष्टाचारी सत्ताधीश नेते मंडळी, शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांत बोकाळलेला भ्रष्टाचार म्हणजे आपल्या देशाला लागलेली कीड आहे. अशा कीडक्या व्यवस्थेकडून अशा दैदीप्यमान प्रगतीची अपेक्षा करणे म्हणजे दगडाला पाझर फोडण्यासारखे आहे. भ्रष्टाचाराचे हे पीक भारतातच मोठ्‌याप्रमाणात वाढते आहे.
परिणामी, भारताला अनेक क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य असूनही प्रत्यक्ष कामगिरीत मात्र आपण कमी पडतो. भारतीय नागरिक अतिशय सक्षम असूनही अशी परिस्थिती आहे. हीच भारतीय विद्वत्ता आणि भारतीय लोक भारताबाहेर गेल्यानंतर मात्र चांगली कामगिरी करून दाखवतात हा याचा पुरावा आहे.
दै. तरुण भारत, सोलापूर.
दरिद्रयाच्या खाईत रुततोय देश
•अमर पुराणिक
जगातील कोणताही देश ठाम धोरणे, देशाच्या प्रगतीप्रती तीव्र आस्था व वर्षानुवर्षे अखंड प्रयत्न केल्याशिवाय मोठा होत नसतो.  सर्व मोठी राष्ट्रे ही अशाच अथक व प्रामाणिक प्रयत्नातूनच मोठी झाल्याचे दिसून येते. भारताला नैसर्गिक व ऐतिहासिक देणगी असतानाही गेल्या काही काळापासून भारत दिवसेंदिवस मागे पडतोय याची कारणे काय असावीत? अर्थात याला अनेक कारणे आहेत. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे, धोरणी नेतृत्वाचा अभाव हे महत्वाचे कारण आहे. तसेच प्रगतीचा ध्यास असणारे, भ्रष्टाचार विरहीत राजकीय पक्ष लाभणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. दुदैवाने आपल्या भारताला या पैकी कोणत्याही गुणवत्तेत न बसणारे नेतृत्व लाभले आहे. कॉंग्रेस सरकार सर्वसाधारणपणे दहा वर्षांचा कालावधी वगळता सतत सत्तेवर आहे. कॉंग्रेसने कोणतेही प्रभावी कार्य इतक्या वर्षांच्या कालावधीत केलेले नाही. या पृथ्वीतलावरील कोणत्याही सजिवाच्या होणार्‍या नैसर्गिक वाढीला जसे प्रगती म्हणता येत नाही, त्या प्रमाणे देशाच्या  नैसर्गिक वाढीला हे दळभद्री कॉंग्रेस सरकार प्रगती म्हणत सर्वसामान्य व भोळ्या भाबड्‌या जनतेला(तथाकथीत सुशिक्षितांनही) फसवत आहे. नोकरदार, व्यापार्‍यांना लाच व आमिषे दाखवत, सतत खोटी आश्‍वासने देत सत्तेवर आली आहे. आता जीडीपी या फसव्या व गोंडस शब्दाचा सतत प्रचार व वापर करत खोट्‌या प्रगतीचा ढोल बडवतेय.
मागील लेखात भारताला महासत्ता बनविण्याच्या प्रयत्नाबाबत व राष्ट्रीय प्रश्‍नाबाबत घाणेरडे राजकारण खेळत कॉंग्रेस सरकार प्रगतीच्या कर्तव्यापासून कसे परावृत्त होत आहे,याचा उहापोह केला. आता या लेखात देशाच्या आर्थिक,  सामाजिक व मुख्यत्व नागरिकांच्या सर्वसामान्य गरजापैकी फक्त अन्नधान्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास वास्तव आणि विपर्यास्त लक्षात येईल. साठ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही या देशाचे नेतृत्व या देशाच्या नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजाही पुरवू शकत नसेल तर, या पेक्षा मोठे दुदर्र्ैव ते कोणते?
सहा कोटी भारतीय मुले कुपोषित
कुपोषणाच्या बाबतीत भारत देश आपल्या शेजारी पाकिस्तान व बांगलादेशाच्याही पुढे आहे. युनिसेफच्या ताज्या अहवालामध्ये सांगितले आहे की, जगातील अधिकांश कुपोषित मुले दक्षिण अशियात आहेत. या अहवालानुसार दक्षिण अशियामध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुपोषित मुलांची संख्या जवळजवळ ८ कोटी ३० लाखांच्या दरम्यान आहे. भारतासाठी ही बाब चिंताजनक यासाठी आहे की, अशा कुपोषित मुलांची टक्केवारी पाकिस्तान व बांगलादेशापेक्षाही भारतात जास्त आहे. केवळ भारतात या मुलांची संख्या ६.१ कोटीच्या दरम्यान आहे. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुपोषित मुलांची टक्केवारी ४८ टक्के आहे. हीच टक्केवारी पाकिस्तानात ४२ टक्के तर बांगलादेशात ४३ टक्के आहे.
भारतापेक्षा कुपोषित मुलांची संख्या जास्त असलेले देश अफगाणिस्तान व नेपाळ आहेत. अफगाणिस्तानात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुपोषित मुलांची संख्या ५९ टक्के आहे तर नेपाळमध्ये ही संख्या ४९ टक्के आहे, पण सांख्यिक हिशेबाने ही संख्या भारतात सर्वांत जास्त आहे. या अहवालात हेही नमूद केले आहे की, जगातील एकूण कुपोषित मुलांची सर्वार्ंत जास्त संख्या २४ देशांत आहे. यातील पाच देश असे आहेत, जेथे  कुपोषित बालकांची संख्या ४० टक्के पेक्षा जास्त आहे.
युनिसेफने या अहवालातील प्रकाशित तथ्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे, दक्षिण आशियातील काही देशांत आर्थिक प्रगती बरी आहे, पण कुपोषित बालकांच्या संख्या प्रचंड वेगाने वाढतेय ही बाब चिंताजनक असल्याचे म्हटले आहेे. दक्षिण अशियाई देशांना हा अहवाल म्हणजे धोक्याची घंटा आहे.
भारतातील प्रत्येक चौथी व्यक्ती उपाशी
भारत एका बाजूला जागतिक महासत्ता बनण्याचा दावा करत असताना, देशातील प्रत्येक चौथी व्यक्ती उपाशी आहे. भूक व अन्न या आधारावरील उपलब्ध ताज्या अहवालात असा दावा केलेला आहे. भारतातील एका एनजीओने केलेल्या सर्वेक्षणानुसार लोकसंख्येच्यादृष्टीने जगातील सर्वांत मोठ्‌या अशा भारत देशात जवळजवळ २१ कोटींपेक्षा अधिक लोकंाना पोटभरून जेवण मिळत नाही. संख्यात्मक प्रमाणाच्या तुलनेत आफ्रिका खंडातील सगळ्यात गरीब देशांपेक्षाही  ही संख्या खूप जास्त आहे. हा अहवाल नवदान्य ट्रस्टने सादर केला आहे.
या अहवालात म्हटले आहे की, वाढती महागाई व सरकारच्या वतीने चालवली जाणार्‍या सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सध्या पसरलेली अव्यवस्था व भ्रष्टाचारामुळे स्थिती आणखन वाईट झाली आहे. भलेही सत्ताधारी जीडीपीची सरासरी वाढवण्यालाच महत्त्व देत आहेत, पण सत्य हे आहे की, एका  ‘आम आदमी’ला प्रतिवर्षी मिळणारे अन्नधान्य मागील काही वर्षांत ३४ किलोने कमी झालेली आहे. पूर्वी दरडोई वार्षिक १८६ किलो धान्य लागत होते, पण गेल्या काही वर्षार्ंत हा १८६ किलोचा आकडा १५२ किलोवर पोहोचला आहे. देशात आर्थिक उदारीकरणाचे धोरण ९० च्या दशकात सुरू झाले होते. तेव्हा केंद्रात कॉंग्रेसचे सरकार होते. मागील पाच वर्षांत या अहवालानुसार गरिबांना मिळणार्‍या अन्नधान्याचे प्रमाण मोठ्‌या प्रमाणात घसरले आहे.
या अहवालानुसार खाद्यपदार्थाच्या वाढत्या किमतींची सत्यता झाकण्यासाठी सरकारने खाद्यपदार्थांना लोखंड व धातूंच्या वर्गात घातले आहे. ज्या धातूंच्या किंमती गेल्या काही वर्षार्ंत मोठ्‌या घसरल्या आहेत. तसेच  खाद्यपदार्थांच्या ठोक किंमतीतही घसरण झाली आहे, पण ही भावाची घसरण झाली तरीही वास्तवात खाद्यपदार्थांच्या किमती वाढतच आहेत. वार्षिक महागाई ज्या सूत्राने मोजली जातेय त्यात अत्यावश्यक सामानांचा वेगळा वेगळा वर्ग तयार करण्यात आला आहे. ज्यात सध्याच्या किमतींच्या तुलनेच्या आधारावर महागाईचा आकडा काढला जातो.
अन्नधान्य व खाण्यापिण्याच्या वस्तुंवर सरकारकडून दिली जाणारी सूट म्हणजे सबसीडी मध्ये वाढही झालेली आहे. पण या सबसीडीचा फायदा या कॉंग्रेसाला निवडून दिलेल्या कॉंग्रेसच्या प्रिय ‘आम आदमी’ला मिळतच नाही. मग या सगळ्या सबसीड्‌या जातात कोठे? पुढील वर्षी खाद्यसामुग्रीवर दिली जाणारी सूट एकूण ५०,००० कोटी रुपये असेल असे सरकारने जाहीर केले आहे.
आर्थिक उदारीकरणानंतर सरकारने ‘खर्‍या गरजुंनाच सूटच्या नावावर फक्त अतिगरीब वर्गालाच सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे स्वस्त धान्य देण्याची व्यवस्था सरू ठेवली आहे. आता हा अतिगरीबवर्ग कोणता हे तुम्हा आम्हा सर्वांता माहीत आहे. जो खराखुरा गरीब वर्ग आहे तो अक्षरश: उपाशी मरतोय. पूर्वी स्वस्त धान्याची सुविधा सर्व नागरिकांसाठी, पण आता ही सुविधा केवळ लोकसंख्येतील अत्यल्प लोकांनाच आहे.
या अहवालात आणखी एक असा दावा केला आहे की, अनेक वर्षांपासून धान्य उत्पादन करणार्‍या ८० लाख हेक्टर जमिनीवर निर्यात केली जाणारी साधने उत्पादित केली जात आहेत. एक कोटी हेक्टर पेक्षा अधिक जमिनीवर जैविक इंधनाचे उत्पादन करणार्‍या झाडांची लागवड केली जात आहे. तसेच विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (एसईझेड) दिल्या जाणार्‍या जमिनीमुळे कृषी क्षेत्रावर दबाव वाढणार आहेत. त्यामुळे धान्य उत्पादनाला पोषक अशी कृषी व्यवस्था विकसित करण्याशिवाय पर्याय नाही.
दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या संख्येत झपाट्‌याने वाढ
भारत सरकारच्याच एका समितीच्या अहवालानुसार भारतातील दारिद्ररेषेखालील लोकांच्या संख्येत तब्बल दहा टक्क्याने वाढ झाली आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी दारिद्ररेषेखालील लोकांची संख्या ३८ टक्के आहे. ही आकडेवारी  सुरेश डी. तेंडूलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दिली आहे. या समितीच्या मते दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येत नव्याने ११ कोटी लोक समाविष्ट झाले आहेत. म्हणजे पूर्वीचा कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय लोकांमधील  ११ कोटी लोकांना आता दारिद्र्य पत्करावे लागले आहे. भारतात ३८ टक्क्यांपेक्षा जास्त लोक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत. या अहवालातील आकडेवारींचा उपयोग खाद्य सुरक्षा विधेयक तयार करण्याच्या पार्श्‍वभूमीवर तयार केलेले दस्तावेज बनविताना केला आहे. या नव्या अहवालासाठी तेंडूलकर समितीने नव्या प्रणालीचा वापर केला आहे. यात शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता आदींचाही वापर अहवाल तयार करण्यासाठी केला आहे. या अहवालानुसार शहरी भागातील गरिबीची टक्केवारी २८ टक्के आहे तर, ग्रामीण भागातील गरिबीत वाढ होऊन ती ३० टक्क्यांवरुन ४६ टक्के झाली आहे. गरिबी मोेजण्याच्या एककानुसार शहरातील प्रत्येक कु टुंबाचे मासिक उत्पन्न २१०० रुपयांपेक्षाही कमी आहे. तर खेेडेगावातील कुटुंबाचे मासिक उत्पन्न १८०० रुपयांपेक्षा कमी आहे. या गरिबी मोजण्याच्या एककात पाच व्यक्तींचे एक कुटुंब असे मानले आहे. या गुणोत्तराच्या हिशोबाने दरडोई उत्त्पन्न शहरी भागात १४ रुपये तर, ग्रामीण भागातील दरडोई उत्पन्न १२ रुपये होते.
हा अहवाल पाहिल्यावर हा प्रश्‍न निर्माण होतो की, सरकार काय करतेय? सरकारने केलेल्या भारताच्या प्रगतीच्या भारुडाबाबत संभ्रम निर्माण होतो. देशाच्या विकासाचा दर वाढतोय(जीडीपी)  या प्रचाराच्या विश्‍वासार्हतेवरही प्रश्‍न चिन्ह उभे राहाते. तर मग विकासाची ही गणिते पुर्नपरिभाषेत करणे आवश्यक ठरते. वास्तवात भारतातील गरिबीचे निर्धारण प्रामाणिक व वास्तविकतेवर आधारित होत नाही. प्रत्यक्षात भारतीय नागरिकांची स्थिती या आकडेवारी पेक्षाही जास्त गंभीर आहे. याच वास्तवाचे भान ठेऊन अभ्यास केला तर, भारतीय नागरिकांच्या उत्पनाची आकडेवारी वरील सर्व अहवालांच्या आकडेवारीहून निम्मीच निघेल, तसेच दरडोई उत्पन्नही निम्म्याहून कमी असावे.
वाढती महागाई आणि नागरिकांचे घटते उत्पन्न याच्या गुणोत्तराचा विचार केला तर भारतातील गरिबीशी झुंजणार्‍या नागरिकांची स्थिती लक्षात येईल. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, तेेंडूलकर समिती, अर्जुन सेनगुप्त आणि एन.सी. सक्सेना समिती या तिन्ही समित्या केंद्र सरकारनेच स्थापन केल्या आहेत. या तीनही समित्यांच्या अहवालातील तफावत लक्षात घेता या सर्व समित्यांच्या अहवाल तयार करण्यातील पद्धतीच्या अभ्यासाच्या त्रुटी कोणाच्याही लक्षात येतील.
सन २००७ मध्ये तयार करण्यात आलेल्या सेनगुप्त समितीच्या अहवालाप्रमाणे तर भारतातील ७७ टक्के लोक दारिद्ररेषेखाली राहातात, याच कालावधीत  तयार करण्यात आलेल्या ग्रामविकास मंत्रालयाच्या  सक्सेना समितीच्या अहवालानुसार मात्र ही संख्या ५० टक्के आहे, पण एकंदर भारतातली परिस्थिती पाहाता व थोडा शोध घेतल्यास, भारतात ७७ टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली राहतात. सेनगुप्त समिताचाच अहवाल जास्त खरा व वास्तववादी निघण्याची शक्यता वाटते.
भारतातील दारिद्र्य रेषेखालील जनतेची संख्या वाढणे हे देशावरील आर्थिक संकट असले तरीही हे आर्थिक संकट कधीही मानवी संकटाचे रुप धारण करू शकते. जागतिक समुदायानेही यासाठी प्रयत्न सरू केले आहेत, पण आपले सरकार मात्र या बाबत गंभीर दिसत नाही, जागतिक बँकेनेही या बाबत आपल्याला चेतावणी दिलेली आहे. र्बॅकेच्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, विकसनसील देशांचा आर्थिक विकासाचा दर या वर्षी १.६ टक्क्यांपर्यत घसरु शकतो. नव्हे एकंदर परिस्थिती पाहाता हा आकडा मोठ्‌या प्रमाणात फुगण्याची शक्यता आहे. आणि याचा अर्थ कोट्‌यवधी लोक आणखीन गरिबीच्या खाईत लोटले जाण्याची मोठी शक्यता आहे. जागतिक मंदीचाही प्रभाव याहीवर्षी राहणार असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. या शिवाय गुंतवणुकीच्या वाढीत जबरदस्त कमतरता येण्याची शक्यता आहे.
जागतिक बँकेचे म्हणणे आहे की, विकसनसील देशांना जाणारा पैसा कमी कमी होत जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हा आकडा जवळजवळ ८०० अब्ज डॉलर कमी होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की, मागील वर्षाच्या तुलनेत ७० टक्क्यांनी कमी होणार आहे. बहुसंख्य देश वैयक्तिक उत्पन्नाच्या स्रोतांवर अवलंबून आहेत. हे देश अडचणीत आल्यामुळे विकसनसील देशांना आर्थिक मदत देणार्‍या बँकाही यामुळे मंदीच्या तडाख्यात सापडल्या आहेत.
आपले योजना आयोग सतत आर्थिक कमतरतेचा राग आळवत गरिबांसाठी हितकर अशा योजना राबण्यात टाळाटाळ करत असताना दिसतेय आणि याचे परिणाम अतिशय घातक ठरणार आहेत. शिवाय भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे ही समस्या आणखी गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. देशातील या गरिबीशी लढण्यासाठी कॉंग्रेस सरकारमध्ये राजकीय इच्छा शक्ती अभाव तर आहेच, शिवाय प्रत्येक व्यवहारात मला काय मिळते ही विघातक व स्वार्थी भावना दिसून येते.  कॉंग्रेस व सत्ताधारी नेते मंडळी फक्त स्वत:चा टक्का पक्का करण्यातच गुंतली आहेत. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव बदलून महात्मा गांधींचे नाव दिल्याने स्थिती सुधारणार नाही. दिखाव्याच्या सुधारणांचा सतत प्रचार करून सत्ता काबीज करता येत असली तरी सत्य परिस्थिती सुधारता येत नसते. या सर्व भंपकपणाचे परिणाम देशाला दशकानुदशके भोगावे लागतात.

दै. तरुण भारत, सोलापूर.
हेल्दी(?) नेत्यांची वेल्थ गेम
देशाच्या अबू्रचे धिंडवडे काढणारा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धातील भ्रष्टाचार
•अमर पुराणिक
कॉमनवेल्थ गेम्स अर्थात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरु व्हायला केवळ ६० दिवस राहिले असताना यातील प्रचंड मोठी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. कोण म्हणतेय, कॉमनवल्थ गेम्स म्हणजे, हा पैशाचा अपव्यय आहे, तर कोण म्हणतो की नेते व सरकारी अधिकारी कर्मचार्‍यांना अतिरिक्त कमाईसाठीच या खेळांचे आयोजन केले गेले आहे. सेंट्रल व्हिजिलंस कमीशनने केलेल्या तपासात असे आढळुन आले आहे की, या खेळाच्या आयोजकांनी आपले खिसे भरण्यासाठी या खेळांच्या नियोजनांतर्गत अनेक सोयी करुन घेतल्या आहेत.  काही लोक म्हणतात की, ज्या देशातील कोट्‌यवधी लोक आजही दारिद्र्य रेषेखाली रहातात त्या देशात असा पाण्यासारखा पैसा खर्च करुन इतक्या मोठ्‌या स्पर्धांचे आयोजन करण्यात कोणतेही औचित्य नाही. एकंदर कॉमनवेल्थ गेम्स म्हणजे गरिब भारतीय नागरिकांची ‘हेल्थ’ बिघडवून नेतेमंडळी स्वत:ची ‘वेल्थ’ वाढवत आहेत, असेच म्हणावे लागेल.
आपले खेळाडू भलेही आपली प्रतिभा दाखवतील किंवा दाखवणार नाहीत पण, समस्त नेतेमंडळी, कंत्राटदार, इंजिनीअर्स, अधिकारी यांनी आपली असामान्य(?) प्रतिभा दाखवला सुरुवात केली आहे.  प्राथमिक चौकशीत असे अढळून आले आहे की, यात हजारो कोटींचा घोटाळा झालेला आहे. या स्पर्धेच्या नावाखाली कर देणार्‍या सामान्य जनतेच्या पैशाची अक्षरश: लूट सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. यात केवळ सुरेश कलमाडी दोषी नसून भारत सरकार कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रधानमंत्री मनमोहन सिंह हे जास्त जबाबदार आहेत. कारण जगासमोर आपले नाक कापले जाऊ नये म्हणून भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडी झाल्यानंतर सरकारी तिजोर्‍या उघड्‌या केल्या आहेत. पण वास्तविक यांना देशाच्या नाकापेक्षा स्वत:च्या नाकाची व सत्तेची काळजी आहे. स्पर्धेच्या निर्धारित आकडेवारीपेक्षा अनेक पटीने अधिकबजेट यावर खर्च झाले आहे आणि होणार आहे. शेवटी या खेळात कोट्‌यवधी रुपयांची मातेरे होणार आहे हे निश्‍चित.कदाचित सरकार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना बळीचा बकरा करुन आम्ही सगळे स्वच्छ आहोत असे निर्लजपणे सांगत पुन्हा नव्या भानगडी करायला मोकळे होतील.
३ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत राजधानी दिल्लीत होऊ घातलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. राष्ट्रकुल क्रीडा आयोजन समितीचे कोषाध्यक्ष अनिल खन्ना यांचा चिरंजीव आदित्य खन्ना कार्यरत असलेल्या रीबाऊंड ऐस या कंपनीला आर. के. खन्ना टेनिस स्टेडियममध्ये १४ सिंथेटिक कोर्ट तयार करण्याचे कंत्राट मिळाले होते. आपल्या पदाचा गैरवापर करून खन्ना यांनी रीबाऊंड ऐस कंपनीला हे कंत्राट मिळवून दिल्याच्या आरोपानंतर अनिल खन्ना यांनी राजीनामा दिला आहे. रीबाऊड ऐस ही ऑस्ट्रेलियन कंपनी असून, आदित्य हा या कंपनीच्या भारतातील शाखेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. यात खन्ना हे अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सचिव देखील आहेत, हे  येथे उल्लेखनीय आहे.
लंडनच्या एएम कंपनीसोबत केलेल्या संशयास्पद कराराप्रकरणी भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या चौकशी समितीने राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन समितीचे संयुक्त संचालक टी. एस. दरबारी आणि उपमहासंचालक संजय महिंद्रू यांची हकालपट्टी केली आहे. क्वीन्स बॅटन रिलेच्या लंडन येथील कार्यक्रमासाठी सर्व सोयीसुविधा पुरविण्याच्या नावाखाली लाखो पाऊंडस देण्यात आल्यासंदर्भात भारताच्या ब्रिटनमधील उच्चायोगाचा ई-मेल एका पत्रकारपरिषदेत दाखवण्यात आला होता. ब्रिटनमधील एका कंपनीला देण्यात आलेल्या रकमेबद्दलचा खोटेपणा एका वृत्तवाहिनीने उघड केला होता.  ई-मेल फेरफार केलेला असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केल्यापासूनच भ्रष्टाचार करणार्‍यांची गोची झाली आहे. ‘या योजनांवर प्रत्यक्ष झालेला खर्च ११ हजार ५०० कोटी इतका असून ५० हजार किंवा १ लाख कोटींचा जो आकडा विरोधी पक्षांकडून सांगितला जात आहे तो पूर्णपणे खोटा आहे’, अशी सारवासारव शहरी विकासमंत्री एस. जयपाल रेड्डी  करतात. घोटाळ्यासंदर्भात विरोधी पक्ष आकडे फुगवून सांगत असल्याचे सरकारही म्हणत असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची तयारी दर्शविली आहे. सीबीआयला तोंड देण्याचे सरकारचे किती धारिष्ट आहे पहा. सीबीआय ही कॉंग्रेस सरकारच्या दावणीला बाधलेली आहे, हे आता सर्वांनाच माहित आहे. भाजपाने वारंवार तसा आरोप केलेलाही आहे. सोनिया गांधी कॉंग्रेसच्या व स्वत:च्या फायद्‌‌‌यासाठी सतत सीबीआयचा गैरवापर करत असताना राष्ट्रकूलाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआय काय दिवे लावणार हे स्पष्टच आहे. या प्रकरणातील सर्व भ्रष्ट मंडळी ‘बा इज्जत बरी’ होतीलच इतका आत्मविश्‍वास सोनियांना आहे, म्हणूनच कोणत्याची प्रकरणात कॉंग्रेसनेते सीबीआय चौकशीला तयार होतात.
ही सर्व प्रकरणे उघड झाली आहेत तो फक्त नमुना आहे. यापेक्षा आणखी अनेक प्रचंड मोठे गैरव्यवहार यात झालेले असावेत. ही भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होतील किंवा होणारही नाहीत. या विषयावर सोनिया गांधी, पंतप्रधान, क्रीडा मंत्रालयसारेच गप्प का आहेत? यांचे हात यात गुंंतलेले तर नसावेत.अनेक सत्ताधारी नेते ‘कॉमन वेल्थ’ सारख्या देशातील सर्वच उपक्रमांच्यामाध्यमातून वैयक्तिक संपत्ती जमविण्यात गुंतले आहेत हेच सिद्ध होते. इतका प्रचंड पैसा खर्च करुन पुन्हा सत्तेवर आले, हा पैसा परत मिळवण्यासाठी भ्रष्टाचाराची अशी अनेक प्रकरणे होत आहेत, होत रहातील.  जनतेच्या खिशा हात घालून ओरबडून पैसा घेणारी ही कॉंग्रेस आणि त्याची पिल्लावळी अशा प्रकाराला सोकावली आहेत. स्वत: डोळ्यातील मुसळ काढायचे सोडून विरोधकांच्या डोळ्यातील कूसळ दाखवण्याचा हा प्रकार सतत होत आहे.
वास्तविक राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन हे जगासमोर भारताला चांगल्या पद्धतीने सादर करण्याची एक नामी संधी आहे. जगाने भारताकडे आदराने पाहावे यादृष्टीने राष्ट्रकुलच्या यशस्वी आयोजनाने मोठी भूमिका बजावता आली असती. पण भारतासारख्या विकसनशिल देशाला इतक्या महागड्‌या स्पर्धा भरवणे परवडणारे नाही. सर्वसामान्य नागरिक गरीबी आणि महागाईने होरपळत असताना ते भारतीय म्हणून गर्व अनुभवत नाहीत. जर भारताने राष्ट्रकूल स्पर्धेचे यजमानपद स्चिकारले नसते तर भारताचे कोणतेही नुकसान झाले नसते. या स्पर्धातून भारताताची जगभरात आब्रनुकसानी होण्यापलिकडे उपलब्धी काहीही नसणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक म्हणतो की अशा खर्चीक  स्पर्धांची गरजच काय?
राष्ट्रकुल स्पर्धेच्याआयोजनावर ३५ हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. इतका पैसा खर्च करण्याची मुळातच गरज काय? इतक्या रकमेत एक वर्षाची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना चालवली जाऊ शकते.  कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्‌घाटन समारंभावर १०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या स्पर्धेच्या दरम्यान दिल्लीत एक मोठा फुगा उडवण्यावर ४० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या फुग्यात भरला जाणारा गॅस देखिल परदेशातून इंपोर्ट केला जात आहे. सध्या स्पर्धांचे बजेट वाढलेलेच आहे शिवाय भ्रष्टाचारामुळे ते आणखी फुगले आहे. स्पर्धेला जवळपास दोन महिने बाकी आहेत. याकाळात ते आणखीनच वाढणार आहे.
प्रत्येकाला आपापली मते असतात आणि प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा हक्क आहे. काहीजण म्हणतात की, जर कॉमनवेल्थ गेम्स यशस्वी ठरल्या तर जगातिक स्थरावर भारतीय ब्रँड विकसित होईल. भारताचे जगभर उत्तम मार्केटींग होईल, त्यामुळे या स्पर्धेवर केला जाणार खर्च व्यर्थ जाणार नाही. अशा प्रकारे केलेल्या खर्चाचे फायदे तत्काळ लक्षात येत नाहीत. ही विचारवंत मंडळी याचे उत्तम उदाहरण म्हणून चीन, सिडनी ऑलंपिक चे उदाहरण सांगतात. नंतर चीनला याचा अप्रत्यक्ष फायदा खूप झाला. चीनमध्ये या स्पर्धानंतर गंतवणूकदारांची रांग लागली आणि चीन आता आथिर्र्क महासत्ता झाला असल्याचे ही विद्वान मंडळी सांगतात. ऑस्ट्रेलियाचाही स्पर्धामुळे असाच फायदा झाल्याचे सांगतात.
या विचारवंतांच्या मताप्रमाणे चीन व ऑस्ट्रेलियाची प्रगती फक्त या खेळाच्या आयोजनामुळेच झाली असे म्हणायचे काय? त्यांच्या श्रमाचे व इतर प्रयत्नाचे त्यांच्या प्रगतीत काहीही योगदान नाही. याउपर काहीजण म्हणतात की, योग्यपद्धतीने खर्च केला तर फायदा होतो. पण भारतात कोणत्याही उपक्रमाचे आयोजन भ्रष्टाचाराविना आणि शिस्तबद्धरितीने झालेले वानगी दाखल देखिल सापडत नाही. भारतीय नेते, अधिकारी मंडळी अशा कार्यक्रमांकडे देशहितापेक्षा फक्कड अर्थार्जनाची संधी आणि भ्रष्टाचाराचे कूरण मानतात, मीत्रांनो हे आपण विसरलात की काय? आता ज्या प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या येऊ लागल्या आहेत, त्या पाहिल्यावर राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीवर कमी आणि आपले खिसे भरण्यावर आपल्या भारतीय नेते मंडळी व अधिकार्‍यांनी लक्ष केंंद्रीत करत असतात आणि या आधीदेखील हेच झालेले आहे, ही वस्तूस्थिती तथाकथीत विद्वान मंडळी सोयिस्कररित्या विसरतात की काय?
आता इतके सगळे घडल्यानंतर पंतप्रधानांच्या कार्यालयाची प्रतिक्रिया अशी आहे की, या स्पर्धा दिल्ली, भारतात होणार नसून कोठेतरी अन्य ठिकाणी होणार आहेत. प्रसारमाध्यमांनी यावर राळ  उठवली आहे, पण कॉंग्रेस श्रेष्ठी व पंतप्रधान कार्यालय झोपेचे सोंग घेत आहे. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे प्रमुख मायकल फेनेल यांनी तयारीला  उशिर होत असल्याने चिंतीत होऊ आयोजन समितिला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे.

दै. तरुण भारत, सोलापूर.
एंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण?
•अमर पुराणिक
भोपाळ येथे २६ वर्षांपुर्वी युनियन कार्बाईडची गॅस दुर्घटना भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण औद्योगिक दुर्घटना आहे. या घटनेला ज्या व्यक्ती जबाबदार आहेत त्यांना शिक्षाही तितकीच मोठी होणे अपेक्षित होते. स्वाभाविकच भोपाळच्यामुख्य न्यायाधीशांकडून सुनावलेल्या निकालानंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला गेला, आणि न्यायव्यवस्था व राजकिय यंत्रणेवरील जनतेचा विश्‍वास उडल्याने भारतीय नागरिक हताश झाला आहे. न्यायपालिकेवर भारतीयांचा विश्‍वास होता म्हणूनच त्यांनी या निकालाचा २६ वर्षे इतका दिर्घ कालावधी देखील स्विकारला, पण निकाल ऐकल्यावर मात्र त्यांचा न्यायपालिकेवरील विश्‍वास पुर्णपणे उडाला आहे. यात आश्‍चर्य काहीच नाही की, या निकालावर देशात आणि देशाबाहेर आश्‍चर्य आणि संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांच्या या संतापाचा सामना करण्याऐवजी कॉंग्रेसचे केंद्र सरकार व सोनिया गांधी स्वत:च्याच मस्तीत धूंद आहेत. या प्रकारणात राजीव गांधी यांचे नाव आले आहे. र्कॉगे्रस नेते तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांना वाचवण्याच्या अभियानात गुंतले आहेत, आणि त्यामुळे या घटनेत मध्यप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री अर्जुनसिंह व न्यायमुर्ती अहमदी यांना गुन्हेगार ठरवून मोकळे झाले आहेत.
या दुर्घटनेत युनियन कार्बाईडच्या परिसरात राहणारे तीन-चार हजारजण मिथाईल आयसोसायनाईटच्या तडाख्याने पहिल्या फटक्यातच मृत्युमुखी पडले. नंतर मृतांचा हा आकडा फुगत पंधरा-वीस हजारांवर पोहोचला. भोपाळच्याच नव्हे तर तेथे त्या काळात रहाणार्‍या परंतु नंतर स्थलांतर केलेल्यांनाही अनेक दुर्धर विकारांनी ग्रासले. त्यांची पुढली पिढीही व्यंग घेऊनच जन्माला आली. ही विकलांग बालके या दुर्घटनेचे सर्व दुष्परिणाम अंगावर झेलत पुढे नोकरी-उद्योगधंद्यांनाही अपात्र ठरली, आणि अन्नालाही महाग झाली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी वॉरेन अँडरसन अद्याप फरारीच असल्याने भोपाळ वायूपीडितांना अद्यापही न्याय न मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. युनियन कार्बाईड कार्पोरेशनचे तेव्हाचे अध्यक्ष ८९ वर्ष वयाचे वॉरेन अँडरसन यांना न्यायालयाने सध्यातरी मोेकळे सोडलेले दिसून येत आहे. अँडरसन यांना फरार घोषित केलेले असल्याने त्यांना खटल्यासाठी पात्र धरलेले नाही. या प्रदीर्घ काळ चाललेल्या खटल्याचा निकाल देताना मुख्य न्यायदंडाधिकारी मोहन पी. तिवारी यांनी आपल्या निकालपत्रात वॉरेन अँण्डरसन यांच्या नावाचा उल्लेखही केलेला नाही. पोलीसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करताना सुद्धा असे गुन्हे दाखल केले की यातील आरोपींना जास्त शिक्षा होणार नाही. म्हणजे पोलीसांनी हे काम देखील दबाबाखाली किंवा तत्कालिन शासनाच्या आदेशाप्रमाणे केले आहे. त्यांच्या गुन्ह्यांना लावण्यात आलेली कलमेच तशी होती, की तो आज किरकोळ शिक्षेवर सुटल्यात जमा आहे. आता निकालानंतर लोकांनी न्यायमुर्ती अहमदी यांच्याकडे संशयाने पाहून भुवया उंचावणे सहाजिकच आहे.
कायदा मंत्री वीरप्पा मोईली सुद्धा या प्रश्‍नावर इतके दिवस गप्पच होते. आता ते सहा महिन्यांत घटनादुरुस्तीद्वारे म्हणे अशा प्रकरणांमध्ये अगदी कडक कलमांचा वापर व्हावा असा प्रयत्न करणार आहेत. अहमदी यांनी म्हटले, की कायद्यात यासाठी जी तरतूद आहे, ती लक्षात घेऊनच आपण तेव्हा तो निकाल दिला होता. अशास्थितीत सरकारला ही कलमे निरुपयोगी आहेत, असे वाटत होते तर त्यांनी त्यात बदल का नाही करून घेतला? कॉंग्रेस सरकारने स्वत:च्या सोयीसाठी अनेक कायद्यात बदल केले, मग या कायद्यात बदल का नको? पण मग सरकार नावाची व्यवस्था करते तरी काय, असा प्रश्‍न निर्माण होतो.
ज्या समितीकडे या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली होती, तिनेच या गुन्ह्याचे गांभीर्य कमी करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. जबाबदारी न ठरवता प्रकल्प उभारले आणि त्यामुळे त्यास धोका निर्माण झाला, तर त्यास कोणी जबाबदार राहणार की नाही, असा हा प्रश्‍न आहे. रशियातील चेर्नोबिल आणि दक्षिण कोरियाच्या समुद्रात घडलेल्या दुर्घटना या ऊर्जेच्या गरजेपोटी घडल्या, तर भोपाळची दुर्घटना कीटकनाशके बनवणार्‍या बहुराष्ट्रीय कंपनीच्या बेपर्वाईमुळे घडली. न्यायालयानेही ही वायुदुर्घटना म्हणजे पूर्ण निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे, पण तो तसा आहे हे ठरवायला इतकी वर्षे लागावीत हा न्यायव्यवस्थेचा आणि सरकारच्या इच्छाशक्तीचा पराभव आहे.
भोपाळ गॅस दुर्घटना झाली तेव्हा मध्य प्रदेशात अर्जुन सिंह यांचे सरकार होते, आणि केंद्रात पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेस सरकार होते. केंद्रात व राज्यात दोन्ही सरकारे कॉंग्रेसची असल्याने कॉंग्रेस नेत्यांनीच तोंड उघडून युनियन कार्बाईडचे अध्यक्ष वॉरेन अँडरसन यांना गुपचुपपणे देशाबाहेर का जाऊ दिले याचा खुलासा करणे आवश्यक आहे. त्यांची अटक जितकी आश्‍चर्यजनक होती त्याही पेक्षा सुटका धक्का देणारी होती. अँडरसन यांना गुपचुप सोडलेले नव्हते, तर सरकारी  अधिकार्‍यांच्या मर्जीने, त्यांच्या संरक्षणात आणि तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी व त्यांचे कॉंग्रेस सरकार यांच्या संरक्षित छत्राखाली राजकीय विमानाने दिल्लीला पाठवले गेले होते. आणि तेथून तो अमेरिकेत गेला. अँडरसन अमेरिकेत गेल्यानंतर त्याला भारतात पुन्हा परतायचे नव्हतेच आणि तो परतलाही नाही. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे मुख्य सचिव पी. सी. अलेक्झांडर यांनी देखील राजीव गांधी यांच्या भूमीकेवर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.अलेक्झांडर आता भाजपा-शिवसेनेत सामील झाल्यानेच राजीव गांधी यांच्यावर आरोप करत आहेत, असे मखलाशी  मोईली यांनी केली आहे.ऍण्डरसनला मोकळे सोडण्याचा निर्णय अर्जुनसिंग यांनीच घेतला होता आणि त्यानंतर या निर्णयाची माहिती केंद्रसरकारला दिली होती. ही बाब त्यांनी ७ डिसेंबर १९८४ ला अर्जुनसिंग यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत स्पष्ट केली होती. त्यावेळी अर्जुनसिंग राज्याचे प्रमुख होते आणि हा निर्णय त्यांचाच असल्याने राजीव गांधी यांना या वादात गोवणे योग्य होणार नाही, असे साळसुद उत्तर राजीव गांधी यांचे स्नेही व कॉंग्रेस नेते अरुण नेहरू देतात.
अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने २६ वर्षापूर्वीची गोपनीय कागदपत्रे जानेवारी २००२ मध्ये सार्वजनिक केली होती. या कागदपत्रात उल्लेख आहे की, मध्य प्रदेश पोलिसांच्या अटकेतून यूनियन कार्बाइडचे प्रमुख वॉरेन अँडरसन यांना दिल्लीतील कॉंग्रेस सरकारच्या दबावामुळे दि. ८ डिसेंबर १९८४ रोजी सोडून दिले होते. याचे कारण हे सांगीतले गेले की, तेव्हाचे केंद्र सरकार असे समजत होती की, वॉरेन अँडरसन यांच्या अटकेचा मध्य प्रदेश सरकार राजनैतिक फायद्यासाठी वापर करत आहे. तर दुसर्‍या बाजुला मध्य प्रदेश सरकारची कागदपत्रे सांगतात की, तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांनी वॉरेन अँडरसन यांना विशेष विमानाने भोपाळ मधून पळून जाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. अशा या दुतोंडी कॉंग्रेस नेत्यांना काय म्हणावे? आता कॉंग्रेस अर्जुन सिंह यांच्यावर सर्व प्रकरण ढकलून, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना मात्र निर्दोष ठरवण्याची पराकाष्ठा करत आहे. जेेथेअमेरिकेच्या गुप्तचर संस्थेनेे संकेत दिले आहेत की राजीव गांधी यांच्या सांगण्यावरुनच अर्जुन सिंह यांनी अँडरसन यांची सुटका केली. गांधी घराण्याची ही वंशवादीनीति देशाला घातक ठरली आहे. अर्जुन सिंह आणि राजीव गांधी हे दोघेही कॉंग्रेसचे नेते आहेत, फरक फक्त इतकाच आहे की, एक गांधी-नेहरु घराण्याचा आहे तर दुसरा बाहेरचा आहे. अर्जुन सिंह यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींची मर्जी संभाळण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही, या घराण्याच्या चरणसेवेसाठी त्यांनी नको नको ते उपद्य्वाप केले आहेत, पण तो वेगळ्या लेखाचा विषय आहे. आता अर्जुनसिंह यांचे वय झाले आहे आणि राजकारणातून जवळजवळ निवृत झाले आहे. अशा वेळी आताच्या कॉंग्रेस नेत्यांनी त्यांना पक्षाच्या दृष्टीने त्याज्य ठरवून राजीव गांधींना मात्र वाचवण्याची कसरत करत आहेत. अर्जुनसिंह यांच्यावर दोषारोपणाचा कॉंग्रेस नेते पुरेपूर आनंद घेत आहेत. आणि या दुर्घटनेत राजीव गांधी यांचे नाव येताच वंशवादी राजकारण खेळत सर्व कॉंग्रेसजन एकाच सुरात राजीव निर्दोष आहेत असे वारंवार सांगताना थकत नाहीत.
युनियन काबॉईडच्या दुर्घटनेला जबाबदार असणारी जी गुन्हेगांरांंंची यादी न्यायालयीन निवेदनात जाहीर झाली आहे त्याशिवाय इतरही अनेक सुप्त किंवा पडद्‌यामागचे कलाकार आहेत. ते कोण? तर तेव्हाचे केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी म्हणजेच कॉंग्रेस. आता यांना काय सजा होणार आहे. सत्तेचा वापर करत सोनिया गांधी राजीव गांधींना निर्दोष ठरवतील ही, कायद्याने गुन्हेगारांना शिक्षा देता येत नसेल, पण या घटनेतील बळींची हाय देखिल यांना लागणार नाही की काय?

दै. तरुण भारत, सोलापूर.
अणू दुर्घटना : नुकसानभरपाई विधेयक आणि तथ्य
·अमर पुराणिक
कॉंग्रेस सरकारने अणू दुर्घटना नुकसानभरपाई विधेयकाबाबत आश्‍चर्यचकित करणारी भूमिका घेतली आहे; त्यामुळे संपुआ सरकार कोणत्या तंद्रीत आहे, हेच समजत नाही. अशी भूमिका घेतल्याने लोकशाहीच्या निरोगी तत्त्वांच्या विकासाला बाधा पोहोचते. याला भारतीय राजकारणाचा विकृत पैलू मानला जाईल. निवडणूक जिंकणार्‍यांचा अहंकार वाढतो. त्यातच दुसर्‍यांदा निवडणूक जिंकली म्हटल्यावर एकदमच हा अहंकार द्विगुणित होऊन आणखीनच वाढल्यास, त्यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. कॉंग्रेसच्या संपुआ सरकारचीही सध्या अशीच अवस्था झाली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या कॉंग्रेसच्या संपुआ सरकारची आणि त्यातील नेत्यांची अशीच भावना झाली आहे की, त्यांच्याइतके बुद्धिमान कोणीच नाही. बुद्धिमत्ता फक्त त्यांच्याकडेच आहे, बाकी सर्वजण मूर्ख आहेत. दुसर्‍यांदा निवडून आल्याने कॉंग्रेस असे मानू लागले आहे की, जनतेसमोर दुसरा कोणताच पर्याय नाही. या मग्रुरीचे परिणाम पुढे पुढे कॉंग्रेसलाच भोगावे लागणार आहेत आणि याची चिंता करण्याची मानसिकता कोणत्याच कॉंग्रेस नेत्यात दिसत नाही.
मुळात कॉंग्रेस दुसर्‍यांदा सत्तेत आली, ते भाजपाच्या रालोआ सरकारच्या काळात राबविलेल्या आणि कार्यान्वित झालेल्या दमदार योजनांच्या जिवावर. गेल्या चार वर्षांत या योजना पूर्णत्वास आल्या. या योजनांवर मात्र सफाईदाररीत्या ‘डल्ला’ मारत कॉंग्रेस सरकार दुसर्‍यांदा सत्तेत आले. येत्या काळात मात्र कॉंग्रेस मतदारांना वेड्यात काढू शकणार नाही, कारण गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात कॉंग्रेस सरकारने कोणतीही नवी योजना राबवलेली नाही, त्यामुळे आता डल्ला मारायला काहीही शिल्लक राहिलेले नाही आणि फक्त पैसे खाण्याच्या नादात किंवा निवडणुकीत खर्च केलेले पैसे परत कमावण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेस नेते आहेत. शिवाय सरकारजवळ कोणत्याही ठोस योजना नाहीत.
आता अणू दुर्घटना नुकसान भरपाई विधेयकाबाबतचेच घ्या. ही सर्वांनाच चक्रावून टाकणारी गोष्ट आहे की, सरकारने अशातर्‍हेचा विचार केलाच कसा? तज्ज्ञांच्या मते यात तीन-चार मोठे धोके स्वच्छपणे दिसतात. सर्वात प्रथम हा प्रस्तावच अविश्‍वसनीय वाटतो. कारण की, अणू संयंत्रनिर्मिती अथवा संचालन करणार्‍या कंपनीची नागरी नुकसान भरपाईची जबाबदारी अधिकाधिक ३०० कोटी असेल. जर नुकसान भरपाईची रक्कम यापेक्षा जास्त होत असेल, तर ती भारत सरकारची जबाबदारी असेल आणि तीही २१-२२ कोटी रुपयांपर्यंतच. हा आकडा जसा काही जादूनेच प्राप्त झाल्यासारखा झाला आहे. ही नुकसान भरपाईची रक्कम कोणत्या आधारावर ठरवली, याचाही काही मागमूस लागत नाही. यासाठी  भोपाळच्या युनियन कार्बाईडच्या दुर्घटनेचेे मोठे उदाहरण आपल्यासमोर आहेच.
२५ वर्षांपूर्वी घडलेल्या जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक दुर्घटनेत तीन हजारांपेक्षा अधिक लोक मारले गेले होते आणि त्याहीपेक्षा कित्येकपटीने जास्त लोक कायमचे रोगी व अपंग झाले आहेत. या एका दुर्घटनेसाठी अमेरिकेतील न्यायालयात जो दंड निर्धारित केला होता, ती रक्कम १५०० कोटी रुपयांदरम्यान होती. अर्थात २५ वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेच्या भरपाईची रक्कम एका विदेशी न्यायालयात ठरवली गेली होती. आज २५ वर्षांनंतरही भारत सरकार नुकसान भरपाईची जबाबदारी यापेक्षा जास्त घ्यायला तयार नाही. याचा अर्थ असा होतो की, २५ वर्षांत भारतातील भारतीयांची कॉंग्रेसच्या भाषेत ‘आम आदमी’ची किंमत वाढण्याऐवजी घटली आहे.
ही गोष्ट महत्त्वाची आहे की, भारत आपली आण्विक क्षमता विकसित करण्यासाठी उत्कंठित आहे. या पाठीमागे वैश्‍विक राजकारणाचे जे दुष्चक्र काम करीत आहे. तो विषय आपण तूर्त सोडून देऊ, पण हे तथ्य महत्त्वाचे आहे की,भारत येत्या काही वर्षांत आपली आण्विक ऊर्जानिर्मितीची क्षमता २० हजार मेगावॅटपर्यंत नेऊ इच्छितो. आता हे उघड आहे की, यासाठी देशातीलविभिन्न क्षेत्रांत नवे अणुऊर्जा उत्पादन प्रकल्प सुरू केले जातील. कमीतकमी डझनभर तरी प्रकल्प सुरू होतील. दुर्दैवाने पुढील काळात जर भोपाळमध्ये झालेल्या युनियन कार्बाईडसारख्या दुर्घटना होण्याच्या शक्यतेची पाल प्रत्येकाच्याच मनात चुकचुकल्या शिवाय राहणार नाही. हे सारे प्रकल्प दुर्घटनामुक्त असतील याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. प्रकल्प सुरू करणार म्हटल्यावर धोके हे आलेच, त्याची दखल घेऊन नागरी संरक्षणाचा विचार करून हे विधेयक आणणे आवश्यक आहे आणि ते आणलेही जात आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण अणू दुर्घटना नुकसानभरपाई विधेयकात २५ वर्षांपूर्वी ठरलेली रक्कम देण्यात कोणतेही औचित्य सिद्ध होत नाही. शिवाय युनियन कार्बाईडची दुर्घटना आणि अणू उत्सर्जनासारख्या दुर्घटनेत आकाश-पाताळाइतका फरक आहे. अणू उत्सर्जन किंवा तत्सम दुर्घटनेची अक्राळविक्राळता ही युनियन कार्बाईडपेक्षाही प्रचंड मोठी असणार आहे.
येथे आणखी एक मुद्दा समोर येतो. आतापर्यंत सामान्य जनता हेच मानून चालली होती की, अणुऊर्जा प्रकल्प बहुतेक सार्वजनिक उपक्रम म्हणून उभे केले जातील, पण वस्तुस्थिती आणि समजूत यात खूपच तफावत आहे. कारण आता एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो आहे की, परदेशातील खाजगी कंपन्या या क्षेत्रात उतरू पहात आहेत. मुळातच या परदेशी खाजगी कंपन्यांचे भारतात प्रकल्प उभे करण्यासाठी येणे त्याचदिवशी पक्के झाले होते, जेव्हा म्हणजे दोन-तीन वर्षांपूर्वी भारत आणि अमेरिका या दोन्ही सरकारांमध्ये अणुकरार करण्यासाठी कॉंग्रेस सरकारने प्रचंड आटापिटा केला होता. त्याचवेळी संपुआच्या कॉंग्रेस सरकारमधील काही मंडळी या खाजगी कंपन्यांशी संधान बांधून असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जर अणुऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी परदेशी खाजगी कंपन्या भारतात येतील तेव्हा त्यांचा नागरी सुरक्षेचा स्तर काय असेल? हा गहन चिंतनाचा मुद्दा आहे. सोविएत रशियात जेव्हा ‘चेर्नोबिल’चा अणुप्रकल्प सार्वजनिक क्षेत्रात होता, तेथे जी भीषण दुर्घटना झाली होती, त्याचे दुष्परिणाम तेथील नागरिकांना आणि सोविएत सरकारला भोगावे लागले होते, याचा कदाचित सर्वांनाच विसर पडला असावा. अमेरिका आणि जापानमधील अणुप्रकल्पात छोट्या-मोठ्या दुर्घटना गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. या दुर्घटना विसरून आपल्याला चालणार नाही. तेथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिका व जापान सरकारने चोख व ठोस उपाययोजना केलेल्या आहेत. त्यांच्या सरकारने अणुदुर्घटना नुकसान भरपाई म्हणून प्रचंड मोठ्या रकमेची तरतूद व ठोस यंत्रणा तयार ठेवली आहे.आता प्रश्‍न हा उठतो की, भारतातील अणुऊर्जानिर्मिती प्रकल्पात खाजगी कंपन्या उतरत असतील तर सुरक्षा, बचाव आणि नुकसान भरपाईबाबतची जबाबदारीही त्या खाजगी कंपन्यांचीच असणे अनिवार्य आहे, पण ही जबाबदारी फक्त या खाजगी कंपन्यांवर सोपवून चालणार नाही. यासाठी भारत सरकारनेही यात मोठी जबाबदारी स्वीकारणे अत्यावश्यक ठरते. परकीय चलन मिळवण्याच्या हव्यासापोटी आटापिटा करून जर हे अणू दुर्घटना नुकसानभरपाई विधेयक  घाईगडबडीत, कोणताही सारासार विचार न करता केवळ राजकीय व काही नेत्यांच्या आर्थिक स्वार्थापोटी हे कसेही मंजूर करून घेणे धोक्याचे ठरेल. आपल्या भारतवासीयांच्या जीवनसुरक्षेला धोका निर्माण होत असेल तर परकीय चलन मिळवण्याचा हव्यास काय कामाचा?
या अणू दुर्घटना नुकसानभरपाई विधेयकात २५ वर्षांपूर्वीच्याच रकमेची तरतूद केलेली आहे. यावरून या विधेयकात काहीतरी काळेबेरे असण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही अणुसंयंत्रातील अणुउत्सर्जनामुळे जर कोणी कर्मचारी किंवा आसपासच्या नागरिकांना या ‘स्लो पॉयझनिंग’च्या धोक्याला सामोरे जावे  लागले आणि आयुष्यभर हे भयानक दुखणे बाळगावे लागले तर काय? काही तज्ज्ञांनी अशा घटना भारतातच पाहिल्या आहेत. उदा. जादुगुडा येथील युरेनियम स्टोअर, ट्रॉम्बे येथील ‘अप्सरा’ अणुप्रकल्प आणि पोखरणमधील अणुपरीक्षण केंद्राजवळील गावात अशा घटना तज्ज्ञ संशोधकांनी व अभ्यासकांनी पाहिल्या आहेत. जर छोट्या दुर्घटनांऐवजी आतापर्यंत न घडलेल्या किंवा अन्य अपरिचित कारणांनी नागरिकांचे जीवन धोक्यात आले तर त्याचे निराकरण आपण कसे करणार आहोत? याचे उत्तर संपुआ सरकार, विशेषत: कॉंग्रेसकडे आहे काय? 
जर अशा दुर्घटना घडल्या तर या प्रकल्पांचेे मालक व संचालकत्या व्यक्तींवर किंवा नागरिकांवरच आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी ढकलून मोकळे होतील.  या अणू दुर्घटना नुकसानभरपाई विधेयकात अशी तरतूद आहे की, नुकसान भरपाईचे कोणतेही प्रकरण तीन वर्षांत दाखल करणे अनिवार्य आहे. जर अणुउत्सर्जनाचे दुष्परिणाम उशिरा दिसायला लागले तर, किंवा यात जर कोणत्याही गर्भावस्थेतील बालकाला जर अणुउत्सर्जनामुळे कर्करोग झाला किंवा कोणत्याही व्यक्तीला किरणोत्सर्गामुळे हळूहळू  विकलांगता आली आणि जर तीन वर्षांचा क़ालावधी निघून गेला तर काय होणार?
एकंदर असे वाटते की, अणू दुर्घटना नुकसानभरपाई विधेयक  केवळ राजकीय स्वार्थापोटी आणिविदेशी आणि खास करून अमेरिकन कंपन्या आणि विकसित देशाच्या पारड्यात माप टाकून कॉंग्रेस पुन्हा एकदा बोफोर्स घडविण्याच्या प्रयत्नात दिसते आहे. देशाच्या भल्याची, नागरिकांच्या जिवाची काळजी कॉंग्रेसला नक्कीच नाही. देशाच्या भल्याच्या दृष्टीने यावर योग्य चर्चा, विचारविनिमय करून आणि नागरी संरक्षणाच्या दृष्टीने जर असे प्रकल्प घातक ठरत असतील, तर याचा स्वीकार न करणे यात देशाची भलाई आहे.

दै. तरुण भारत, सोलापूर.
‘कातळमनीचा ठाव’ : हृदयाचा ठाव घेणारे लिखाण
·अमर पुराणिक
 
आनंद देशपांडे एक शिवरायभक्त, उदयोन्मुख लेखक, ज्यांचे लेखन त्यांच्या वयापेक्षा २० वर्षांनी प्रगल्भ आहे. ज्यांच्यावर गो.नी. दांडेकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अशा दिग्गजांचे संस्कार झाले आहेत. १ जून २००९ रोजी गो.नी. दांडेकरांच्या पुण्यतिथीदिनी आनंद देशापांडे यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन गोनीदांच्या कन्या व जावयांच्या हस्ते झाले होते. प्रकाशक पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी त्याचदिवशी ‘कातळमनीचा ठाव’ या दुसर्‍या पुस्तकाच्या प्रकाशनाची घोषणाही केली होती. पहिल्या पुस्तकाच्या यशस्वी प्रकाशनानंतर केवळ चारच महिन्यांत ‘कातळमनीचा ठाव’ हे दुसरे पुस्तक ३ ऑक्टोबर रोजी प्रकाशित होत आहे. दै.तरुण भारतचे माजी संपादक व विद्यमान अध्यक्ष विवेक घळसासी यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
 ‘कातळमनीचा ठाव’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील किल्ले, विशेषत: रायगडाच्या पर्यटनाचा आनंद स्वत: आनंद देशपांडे यांनी अनुभवला आणि तेच अनुभव दै. सोलापूर तरुण भारतमधून पर्यटन व भटकंती विषयक लेखमालिकेच्या माध्यमातून प्रकाशित केले. आता महाराष्ट्रातील दुर्गप्रेमी वाचकांना हे लेखन पुस्तक स्वरूपात वाचता येणार आहे. शिवरायप्रेमींना ही एक अद्वितीय पर्वणीच आहे!
आनंद देशपांडे हे गाढे शिवभक्त, शिवरायांचा वावर जेथे जेथे झाला, तेथे तेथे प्रत्यक्ष अनेकवेळा जाऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली किल्ले पर्यटन करून आपले चित्तथरारक व अंतर्मुख करणारे अनुभव ‘कातळमनीचा ठाव’ या पुस्तकातून नेमक्या व प्रभावी शब्दांत टिपले आहेत. या पुस्तकावर बाबासाहेब पुरंदरे व गो.नी. दांडेकरांच्या लेखनाचा प्रभाव जाणवतो. ते या दोन्ही दिग्गजांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिष्यच असल्याने असे होणे स्वाभाविकच आहे, पण स्वत: आनंद देशपांडेही त्यात प्रभावीपणे प्रकट होतात. ‘कातळमनीचा ठाव’ वाचल्यानंतर एक गोष्ट ध्यानात येते, ती म्हणजे आनंद देशपांडे हे निसर्गाशी संवाद साधणारे आणि निसर्गाच्या गूढ अंतरंगात डोकावून आपले कल्पक विचार अतिशय प्रभावीपणे मंाडणारे लेखक असल्याची प्रचिती वाचकांना आल्याशिवाय राहात नाही. या पुस्तकातील बरेचसे अनुभव व प्रसंग थेट वाचकांच्या काळजाला हात  घालतात. आनंद देशपांडे स्वत: मी कोणी मोठा लेखक नसल्याचे म्हणतात, पण त्यांचेच लिखाण त्यांचे हे विधान खोडून टाकते. कदाचित त्यांच्यातला हा विनय असावा.
३० प्रकरणांतून केलेले किल्लेवर्णन वाचताना प्रत्येक वाचकाच्या अंगात वीरश्री संचारेल यात शंकाच नाही! मला हे पुस्तक वाचताना सर्वात भावली ती ‘गढ मे गढ रायगढ’ व ‘आता सुखाने मरेन’ ही दोन प्रकरणे आणि त्यातील ७३ वर्षीय बंगाली ग्रहस्थ सोमदत्त चट्टोपाध्याय हे व्यक्तिमत्त्व. पोक्त, वैचारिक बैठक असणारे, हिंदूंच्या व विशेषत: मराठी माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे हे दादा व्यक्तिमत्त्व आनंद देशपांडे यांनी फारच प्रभावीपणे उभे केले आहे.
भिषोण सुंदर - अशी खास बंगाली ढंगात सोमदत्त चट्‌टोपाध्याय यांनी दिलेली गडाच्या सौंदर्यावर अर्थपूर्ण प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब असणारे सोमदत्तदां ‘मुझे कुछ नही होगा’ असे म्हणत कोलकात्याहून शिवप्रेम, हिंदुत्वप्रेमापायी रायगड पाहायला आले होते. ७३ वर्षीय बंगाली सोमदत्तदांची जिद्द व श्रद्धाभाव विलक्षण वाटतो आणि आपण मराठी माणसे मात्र येथल्या येथे रायगडही पाहत नाही, हा आपल्या वागण्यातला विरोधाभास आनंद देशपांडेंनी अगदी पोटतिडकीने मांडलाय. शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर सोमदत्तदांचे ध्यान लागणे शिवरायांचे योगीत्व स्पष्ट करते आणि ‘आज मेरा जीवन सफल हो गया, रायगढ देख लिया, अब चैनसे मरूंगा’ चा  त्यांचा सार्थक भाव वैराग्य व तृप्ती दर्शवितो. शिवरायांना ‘योद्धा योगी’ का म्हटले जाते, त्याचे उत्तर देशपांडे यांनी येथे दाखवून दिले आहे.
‘उत्तर का इतिहास समझौतोंका इतिहास है| दख्खन का इतिहास जो इतिहास शिवछत्रपतीने निर्माण किया, वह संघर्षोंका इतिहास है’ याचे नेमक्या शब्दांत सोमदत्तदांद्वारे केलेल हे वर्णन आनंद देशपांडेंनी प्रभावीपणे व्यक्त करीत नेमकी भेदकता साधली आहे.
‘सुनो आनंद, मेरी एक बात ध्यान मे रख्खो, सही मायने मे अगर जीवन का अर्थ समझना चाहते हो, तो बेचैनी में जिओ और चैनसे मरो|’ हा सोमदत्तदांचा अनुभवाचा सल्ला आपणा वाचकांनाही जगण्याची नवी ऊर्मी व दिशा दाखवतो. इतिहास संरक्षण ऐतिहासिक स्थळ संरक्षणाबाबत आनंद देशपांडे यांनी सणसणीत ताशेरेच ओढले आहेत व महाराष्ट्रीयांची शिवाजी महाराजांबद्दल असलेली बेगडी आस्था, मान खाली घालायला लावणारी असल्याचे त्यांनी आत्मपरीक्षणाच्या दृष्टीने योग्यरीतीने मांडली आहे.
‘रायगडावरील धुकेजलेला पाऊस’ या पहिल्या प्रकरणात पावसाळ्यातील रायगडाचे निसर्गवर्णन सृष्टिदेवतेच्या दिव्य स्वरूपाची प्रचिती देते आणि तेथील चित्तथरारक अनुभवांचे वर्णन शिवरायांच्या काळातील प्रतिकूल परिस्थितीची चुणूक दाखविते. दर्‍या, खोरे, घाट आदी रायगड परिसराचे आनंद देशपांडे यांनी केलेले लालित्यपूर्ण सुंदर वर्णन आपल्यात एकदातरी गड पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण करते.
‘शिवथरघळीची निसरडी वाट’मध्ये समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिलेल्या स्थानाचे यथोचित वर्णन, वैराग्यसंपन्न वातावरणनिर्मिती झाल्याचा अनुभव वाचकांना देते.
तिसर्‍या लेखांकातील प्रतापगडाचे वर्णन आणि लेखकाच्या बहिणीवर पडलेला शिवचरित्राचा प्रभाव व श्रद्धा यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेबद्दलचा प्रचंड आत्मविश्‍वास, आपल्यातही आत्मविश्‍वास निर्माण करतो. ‘हिरवा हिरवा घाट’ हे प्रकरण आपल्याला निसर्गाविषयी जागृत करते, तसेच ‘वृक्षायन’मधील निसर्गसंगोपन व वृक्षमहिमा वाचकांत पर्यावरणाच्या असंतुलनाच्या परिणामांची नव्याने जाणीव करून देते. ‘भग्न भुलेश्‍वर’मध्ये सोलापूर-पुणे मार्गावरील महादेेवाचे भव्य व प्राचिन मंदिर, सुंदर कोरीवकामांचा उत्कृष्ट नमुना असल्याचे देशपांडे म्हणतात आणि भग्नावस्थेतील या मंदिरातील अवशेष पाहून मुस्लिम धमार्ंध राजवटीची क्रूर कृत्ये पाहून लेखकाच्या मनात काय त्वेष निर्माण झाला असेल, याची कल्पना येते.
शिवकालीन किंवा एकूणच सर्व इतिहासकालीन संपत्ती जपण्याबाबत शासन उदासीन आहे. शिवरायांच्या दिग्विजयी पुरुषार्थाला वाट चुकलेला देशभक्त म्हणणारे नपुंसक सर्वधर्मवादी राजकीय नेत्यांच्यावरही लेखकाने आसूड ओढले आहेत. छत्रपती शंभुराजांचे जन्मस्थान पुरंदर गडाची अतिशय दुरवस्था पाहूनही हेच जाणवते. नेत्यांची घरे राष्ट्रीय स्मारकाच्या नावाखाली जपण्यात व्यर्थ पैसा खर्च करतात, पण या प्राचीन इतिहासाकडे कोणालाही बघायला वेळ नाही, याची आनंद देशपांडे यांना वाटणारी खंत वाचकांनाही चिंता करायला लावते.
आयुर्वेदिक वनौषधी, शतकानुशतके निसर्गाकडे दुर्लक्षाचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. झाडे तोडताना तिशीतला लाकूडतोड्या आणि साठीची वसंताची आई दोन भिन्न प्रवृत्तीची माणसे एकाच ठिकाणी, एकाच वेळी पाहिल्यावर लेखकाच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता जाणवते.
‘किल्ले भ्रमंतीबरोबरच निसर्गाचं संतुलन राखा, निसर्ग वाचवा!’ हाच संदेश लेखक आनंद देशपांडे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून दिला आहे. आनंद देशपांडे यांचे सकस लिखाण आपल्याला काहीतरी वेगळे आणि चांगले वाचल्याचे समाधान नक्कीच देईल, यात शंका नाही!
दै. तरुण भारत, सोलापूर.
छाया-प्रकाशाचा खेळिया...

एखाद्या छायाचित्रकाराला देखील ग्लॅमर मिळावे आणि तो सेलिब्रिटी ठरावा हे कर्तृत्व राजाध्यक्षांनीच पहिल्यांदा करून दाखविले होते. प्रत्यक्षाहूनही प्रतिमांची नवी, रेखीव आणि सुंदर अशी सृष्टी निर्माण करणारा अन् छायाचित्रणाला कलेचा दर्जा मिळवून देणारा एक सौम्य, मंदमंद पाझरणारा अन् निशिगंधाच्या सुगंधासारखा बहरणारा एक कलावंत थांबला आहे. त्याने गाजविलेल्या काळाचे एक स्थिरचित्र कायमचे मार्गदर्शक ठरावे असेच आहे. आपल्या छायाचित्रांना आणि छायाचित्रांच्या विषयांना देखील कुठल्याच चौकटीत अडकू न देता क्षितिजापल्याडची संवेदना देणारा गौतम राजाध्यक्ष नावाचा एक कलावंत छायाचित्रकार आज असा अचानक ‘आऊट ऑफ फोकस’ झाला. आजच्या घडीला काळ आणि संस्कृतीच नव्हे, तर जीवनातील सर्वच अंगांत करीअरच्या नावाखाली तांत्रिकता हीच गुणवत्ता ठरत आहे. त्यामुळे सगळ्याच क्षेत्रांचे सुमारीकरण होते आहे. ‘क्वालिटी’ आणि ‘एलिजिबिलिटी’ यातला फरकच आम्ही सगळेच कसे सोपे करण्याच्या नादात पुसून टाकला आहे. करीअर म्हणून एखादे कौशल्याचे क्षेत्र निवडण्यापेक्षा ‘पॅशन’ने काम करत गेले तर पैसा, प्रसिद्धी सगळेच मिळत जाते. मात्र, त्यासाठी ते काम करायचे नसते, या अंगाने नव्या पिढीला संस्कारित करण्याची गरज आहे आणि त्यासाठी त्यांच्यासमोर ‘आयकॉन’ म्हणून काही व्यक्तींचे आदर्श मांडायचे असतील, तर उरलेल्या थोडक्या लोकांत गौतम राजाध्यक्ष होते. ऐन भरात असलेल्या कलावंतासाठी कोवळेच म्हटले पाहिजे अशा साठाव्या वर्षीच या चतुरस्र माणसाने एक्झिट घेतली. नव्या पिढीचे रोबोटीकरण थांबविण्यासाठी काही गुरूंची आवश्यकता आहे, त्यातला एक गुरू आज थांबला आहे. राजाध्यक्ष म्हटले की क्षणात संदर्भ लागतो तो त्यांनी केलेल्या चित्रपटसृष्टीतील कलावंतांच्या छायाचित्रांचा. लिण्टास या विख्यात जाहिरात कंपनीतील त्यांनी केलेल्या अनेक जाहिरातींच्या स्थिरचित्रांचा, देशात आणि विदेशात रसिकातुडुंब झालेल्या त्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनांचा, ‘फोकस’ नामक त्यांच्या कॉफी टेबल बुकचा... त्याही पलीकडे जाऊन राजाध्यक्ष नावाचा हा बहुगुणी कलावंत कलेच्या क्षेत्रात विविध अंगांनी व्यक्त होत होता. माणसाच्या जगण्याशी थेट भिडण्यासाठी आणि जगण्याच्या खोल तळाशी जाऊन सगळे नीट समजून ते व्यक्त करण्यासाठी वाचन दांडगे हवे. अनुभवातून माणूस शिकतो, पण पुस्तकात प्रज्ञावंतांचे गोळीबंद अनुभव असतात आणि त्यात शिरता आले, तर शिकण्याचा हा कालावधी कमी होतो. राजाध्यक्षांचे वाचनही तसेच दांडगे होते. चौकस आणि चौफेर वाचन हा त्यांचा गुण होता. त्यामुळे उदंड यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवरच होते आणि वाचनामुळेच शब्दातून व्यक्त होण्याचे कसबही त्यांच्या ठायी होते. त्यांनी जाहिरातपटांसाठी लेखन केलेच, शिवाय काही चित्रपटांसाठी देखील लेखन केले. काजोलचा पहिला चित्रपट बेखुदी असो की मग माधुरी दीक्षितचा ‘अंजाम’ असो, अगदी अलीकडे आलेला २००७ चा सखी असो. अनेक नियतकालिकांसाठी त्यांनी लेखन केले. चंदेरी नावाच्या चित्रपटसृष्टीवरील मासिकाचे ते संपादक देखील होते. तसे छायाचित्रण करणे म्हणजे काय? कॅमेर्याची कळ दाबता येते, तो फोटो काढतच असतो. मात्र छाया-प्रकाशाच्या माध्यमातून छायाचित्रणाच्या विषयाचा आत्माच उजागर करणे म्हणजे त्यातला कलात्मक भाग झाला. कॅमेरा हे यंत्र असते. कळ दाबली की समोरच्या दृश्याचे स्थिरचित्र गोठवणे ही त्या यंत्राची तांत्रिक अगतिकता झाली. त्या अगतिकतेला जिवंत जाणिवांचा मोरपंखी मुलायम स्पर्श कसा करायचा असतो, हे राजाध्यक्षांनी प्रत्यक्षात घडवून दाखविले. भारतीय सॉफ्ट लाइट फोटोग्राफीचे ते प्रणेते होते. त्यांच्या व्यक्तिचित्रणात लैंगिक उन्मादकतेपेक्षा पवित्र, महन्मंगल असे काही जाणवायचे. म्हणूनच अनेक चित्रपटतारे, तारका, गायक- गायिका, लेखक, उद्योगपतींची त्यांनी केलेली छायाचित्रे म्हणजे त्या व्यक्तींच्या सकल अस्तित्वाचा बोलका पुरावाच वाटत होता. रंग किंवा कुंचल्यात चित्र नसते, चित्रकाराच्या बोटात देखील चित्र नसते, चित्र असते ते त्याच्या डोक्यात, हृदयात. तसे छायाचित्र देखील कॅमेर्याच्या मागे उभ्या असणार्‌या छायाचित्रकाराच्या डोक्यात असते. चेहरा नव्हे तर आत्म्याचे प्रकटीकरण करायचे असेल, तर समोरच्याच्या सकल अस्तित्वाचीच जाणीव एका साध्या क्लिकच्या आधी व्हायला लागते. तंत्राने ते साध्य होत नाही. त्यासाठी अथांग कलात्मक मनच असावे लागते आणि राजाध्यक्षांकडे ते होते. राजाध्यक्षांसारखे छायाचित्र खेचायचे असेल, तर त्यासाठी तसले वातावरण तयार करावे लागते. नेमक्या त्याच वातावरणात राजाध्यक्ष सतत राहत होते. ते राहत त्या तीन मजली घराच्या वरच्या मजल्यावर त्यांचे घर म्हणतात ते होते. मात्र, पायर्‌या चढायला सुरुवात केल्यापासूनच आपण एका वेगळ्या विश्‍वात प्रवेश करतो आहोत याची जाणीव मन सुगंधी करून जात होती. म्हणूनच त्यांनी काढलेल्या व्यक्तींच्या छायाचित्रांचे सौंदर्य वास्तवापेक्षाही कित्येक पटींनी जास्त असायचे. त्यांनी पहिले छायाचित्र शबाना आझमी आणि जॅकी श्रॉफचे काढले होते. राजाध्यक्ष घरात राहतच नव्हते, तर स्टुडिओतच त्यांचे घर होते. कुठलाही विषय समजून घेण्यासाठी जी आंतरिक समज असावी लागते ती त्यांच्याकडे होती. ‘फेसेस’ नावाचे कॉफी टेबल बुक त्यांनी प्रकाशित केले. त्याच्या मुखपृष्ठावरील माधुरी दीक्षितचे छायाचित्र अनेक फोटोग्राफर्ससाठी ड्रीम फोटो असू शकतो. आपल्या आजूबाजूला वावरणार्‌या व्यक्तींचा देखील संवेदनशील व्यक्तींवर चांगला परिणाम होत असतो. गौतम राजाध्यक्षांच्या बाबतही त्यांची चुलत बहीण सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या सहअस्तित्वाचा परिणाम झाला. ग्लॅमर फोटोग्राफर म्हणून त्यांच्या आयुष्याला लागलेले वळण त्याचमुळे आले. शोभा डे यांच्या ‘सेलिब्रिटी’ या नियकालिकासाठी त्यांना लेखन करायला सांगितले. त्यासाठी छायाचित्रण देखील तेच करायचे. त्यानंतर त्यांच्यासाठी इलस्ट्रेटेड विकली, स्टारडस्ट, सिनेब्लीट्‌झ, फिल्मफेअर या सारख्या ग्लॅमर मॅगझीन्सचा मार्ग खुला झाला. टीना मुनीम, सलमान खानसारखे चहेरे या जगताला देण्याचा मानही त्यांच्या खात्यात जातो. राजकपूर सारख्या पारखी माणसाने त्यांना ‘हिना’चे स्टील्स करायला दिले. सलमान हा त्यांचा आवडता चेहरा असल्याने अगदी सहज न्यायाने त्याचा पहिला चित्रपट ‘हम आपके है कौन’चे स्थिरचित्रण त्यांनी केले. त्यांनी केलेले चित्रपटांसाठीचे स्थिरचित्रण हे त्या चित्रपटाचे सिग्नेचर मार्क झाले होते. ‘कुछ कुछ होता है’ किंवा ‘कभी खुशी कभी गम’ चे पोस्टर्स आठवून बघा. त्यांना संशोधक व्हायचे होते, पण नंतर ते फोटोग्राफीकडे वळले आणि त्यात त्यांची संशोधक वृत्ती कायम दिसून आली. त्याचमुळे त्यांनी भारतीय छायाचित्रणाला एक नवी दिशा दिली. आज सारेच कसे देखाव्यांचे झाले आहे. चकचकित, पॉश यांचे अवडंबर माजले आहे. गायकाच्या गायकीपेक्षा त्याचे अंगविक्षेप, त्याची केशभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना, स्टेज, त्याच्या कसरती हेच महत्त्वाचे ठरते. सगळेच कसे ‘रॉक’ करायचे असते. त्या पार्श्‍वभूमीवर लतादीदींचे गाणे सहजसुंदर वाटते. कारण भपका नसतो, साधेपणा असतो. तसेच आजच्या छायाचित्रणाचे देखील झाले आहे. पार्श्‍वभूमी अतिभव्य, चमकदार उभी करण्यात येते. राजाध्यक्षांची छायाचित्रे म्हणून वेगळी वाटतात. कारण त्यात नेमक्या विषयाला प्राधान्य दिले असते. सौम्य, साधेपणाने ते विषय पेश करतात. एखादा गायक आपल्या एक एक चिजा रसिकांना सादर करत जातो, तसेच राजाध्यक्ष देखील प्रत्यक छायाचित्रागणिक काही वेगळे दर्शविण्यात यशस्वी होत होते. ते आता आणखी काय नवे करणार, असा प्रश्‍न रसिक, समीक्षकांना पडत होता आणि त्यांची नंतरची कलाकृती ही सगळ्यांना स्तंभित करणारे काही अनोखे, नवे असे देऊन जात होती. आता ते सगळेच थांबले आहे. एखाद्या छायाचित्रकाराला देखील ग्लॅमर मिळावे आणि तो सेलिब्रिटी ठरावा हे कर्तृत्व राजाध्यक्षांनीच पहिल्यांदा करून दाखविले होते. प्रत्यक्षाहूनही प्रतिमांची नवी, रेखीव आणि सुंदर अशी सृष्टी निर्माण करणारा अन् छायाचित्रणाला कलेचा दर्जा मिळवून देणारा एक सौम्य, मंदमंद पाझरणारा अन् निशिगंधाच्या सुगंधासारखा बहरणारा एक कलावंत थांबला आहे. त्याने गाजविलेल्या काळाचे एक स्थिरचित्र कायमचे मार्गदर्शक ठरावे असेच आहे.
तरुण भारत, सोलापूर,   रविवार, दि. १९ सप्टेंबर २०११