प्रा. ए. डी. जोशी
आपल्या देशात सारे काही आहे. रम्य वनश्री आहे. खळखळ वाहणार्या नद्या आहेत. धीरगंभीर आणि खवळणारे अथांग सागर आहेत. रम्य सागर किनारे आहेत. घनदाट जंगल आहेत. त्यात फिरणारे प्राणी आहेत. आकाशात विहार करणारे अनेक प्रकारचे पक्षी आहेत. हिमाच्छादित डोंगर आहेत. राजस्थानात वाळूचे डोंगर आहेत. ऐतिहासिक वास्तु आहेत. राजवाडे आहेत. डोळे दिपवणारा ताजमहाल आहे. पौराणिक स्थळे आहेत. सर्व देव देवतांचे वास्तव्य सिध्द करणारी भक्तीमय तीर्थस्थळे आहेत. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ पुरवून आपल्या जिभेचे लाड पुरवणारा आणि आपल्याला तृप्त करणारा देश कोणता असेल तर तो म्हणजे आपला भारत. म्हणूनच आपण अभिमानाने म्हणतो ‘सारे जहॉं से अच्छा हिंदोस्ता हमारा’ मला या निसर्गरम्य देशाचा अभिमान आहे. निसर्गाचा आपल्यावर वरदहस्त आहे.
माणसाला काहीतरी छंद असावा असे म्हणतात. त्या छंदात त्याचा वेळ चांगला जातो. प्रत्येकाला काही ना काही छंद असतोच लिहणे, वाचणे, चित्र काढणे, वाद्य वाजवणे, गाणे, सिनेमा पाहणे, हल्ली दूरदर्शन मालिका पाहण्याचा छंद अनेकांना आहे. पान तंबाखु, गुटखा खाणे, सिगारेट ओढणे, दारु पिणे हे पण छंदच आहेत. काही छंदांचा नाद लागतो आणि पुढे त्याचे व्यसन जडते. तो छंद पूर्ण केल्याशिवाय चैनच पडत नाही. व्यसने जीवनाचा नाश करतात म्हणून काही छंदांपासून आपण सावध राहिले पाहिजे. काही छंद चांगले असतात. त्यातून खूप आनंद मिळतो. पर्यटन करणे ही एक असाच चांगला छंद. मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो आपण पर्यटन करा. सहलीला जा. निसर्गात फिरण्याचा आनंद फार वेगळा आहे. निसर्गात खूप काही पाहण्यासारखे आहे. ही सृष्टी फार सुंदर आहे. देवाने ती आपल्यासाठीच निर्माण केली आहे. सर्व जग पाहण्यासारखे आहे. पण आपण तेवढा खर्च करू शकत नसू त भारतात फिरा. भारत पहा. आपल्या भारतासारखा सुंदर आणि विविधतेने नटलेला दुसरा देश या जगात नाही.
आपल्या देशात सारे काही आहे. रम्य वनश्री आहे. खळखळ वाहणार्या नद्या आहेत. धीरगंभीर आणि खवळणारे अथांग सागर आहेत. रम्य सागर किनारे आहेत. घनदाट जंगल आहेत. त्यात फिरणारे प्राणी आहेत. आकाशात विहार करणारे अनेक प्रकारचे पक्षी आहेत. हिमाच्छादित डोंगर आहेत. राजस्थानात वाळूचे डोंगर आहेत. अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत. राजवाडे आहेत. डोळे दिपवणारा ताजमहाल आहे. पौराणिक स्थळे आहेत. सर्व देव देवतांचे वास्तव्य सिध्द करणारी भक्तीमय तीर्थस्थळे आहेत. डोळ्याचे पारणे फेडणारी नयनरम्य दृश्ये दाखवणारी अनेक ठिकाणे आहेत. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ पुरवून आपल्या जिभेचे लाड पुरवणारा आणि आपल्याला तृप्त करणारा देश कोणता असेल तर तो म्हणजे आपला भारत. म्हणूनच आपण अभिमानाने म्हणतो ‘सारे जहॉं से अच्छा हिंदोस्ता हमारा’ मला या निसर्गरम्य देशाचा अभिमान आहे. निसर्गाचा आपल्यावर वरदहस्त आहे.
आपल्या भारताच्या तुलनेने अन्य देशात निसर्गाचा कोप फार आढळतो. आपल्याकडे उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही ऋतुंचा समतोल पहायला मिळतो. पाश्चात्य देशात असा समतोल कधीच दिसत नाही. त्याचे रौद्ररुप व असमतोलता अनेक वेळा तेथील लोकांना अनुभवावी लागते. खाण्याच्या बाबतीत तर परदेशात फारच वाणवा आहे. बटाटे, बे्रडचे विविध प्रकार आणि कोणत्याही प्राण्याचे मांस हाच आहार बहुतांशी दिसतो. खाद्य पदार्थांना कशी चव असावी ते आपल्या देशात चाखावी आणि चवहीन पदार्थ म्हणजे काय हे पहायचे असेल तर पाश्चात्य देशात खा. चवीने खाणार त्याला भारत देणार. म्हणूनच ‘ओ हाऊ मच स्पायसी’ असे म्हणत परदेशी लोक त्यांच्या शहरात असलेल्या भारतीयांच्या हॉटेलमध्ये भारतीय पदार्थ आवडीने खातात.
आपल्या देशात निसर्ग शिस्तीने राहतो पण माणसे बेशिस्त झाली आहेत. आपलेच लोक आपल्या देशाचे वैभव घालवत आहेत. ऐतिहासिक वास्तु खराब करतात. स्वतःच्या स्वार्थासाठी झाडे तोडून निसर्गाचे वैभव लुटतात. आपण प्रत्येकजण जर प्रथम देशाचा विचार करू लागलो तर आपला देश एक नंबर देश होईल. पण आपल्याकडे आपलाच विचार केला जातो. देशाचा विचार कोणीच करत नाही.
मला पर्यटनाची अत्यंत आवड आहे. मी सारा भारत पाहिला आहे. परदेशातील बहुसंख्य ठिकाणे पाहिली आहेत म्हणून मी हे सारे लिहित आहे. प्रत्येकाने जमेल तेवढी तीर्थयात्रा करावी. या देवाच्या चरणी, नियतीच्या चरणी नतमस्तक व्हावे. आपण या नियतीचा एक भाग आहोत. आपण येथेच निर्माण झालो आणि या निसर्गातच विलीन होणार आहोत हे लक्षात ठेवावे.
अष्टविनायक यात्रा, बारा ज्योर्तिलिंगे, वैष्णवी देवी, काशी, रामेश्वर, सोरटी सोमनाथ, द्वारका, चारधाम ही ठिकाणे पाहिली. यांची यात्रा झाली. आणि मला कैलास मानसरोवर पहावे अशी इच्छा तीव्रतेने झाली. ही यात्रा फार कठीण आहे. त्याला शारिरीक व मानसिक तयारी फार दांडगी असावी लागते. आपल्याला कोणताही आजार असता कामा नये. शारिरीक तपासणी करूनच या यात्रेला जाऊ देतात असे समजले होते. सरकारतर्फे या योजनेची सोय केली आहे. तेथे खर्चही कमी आहे. पण तेथे शारीरीक तपासणीबाबत फार कडक नियम आहे. यात्रेमध्ये तुमची प्रकृती थोडी जर बिघडली, रक्तदाब वाढला, नाडीचे ठोके वाढले तर अर्ध्या यात्रेतून परत पाठवतात. पण खाजगी यात्रा कंपनीतर्फे गेलो तर कंपनीचे लोक वैयक्तिक काळजी जास्त घेतात. त्यामुळे यात्रा सुलभ होते असे काही लोकांनी मला सांगितले होते. त्यामुळे मी खाजगी प्रवास संस्थेतर्फे जायचे ठरवले.
मुंबई-दिल्ली-काठमांडू असा आमचा पहिला प्रवास होता. तो विमानाने होता आणि नंतर कैलास यात्रा सुरु होणार होती. मुंबई वरुन विमान वेळेवर सुटले. दोन तासांत दिल्लीच्या जवळ आले, आता लवकरच आपण दिल्ली विमानतळावर उतरु असा संदेश आला पण विमान काही उतरेना मी खिडकीतून खाली पाहीले. दिल्ली दिसत होती पण विमान मात्र फिरत होते. तेवढ्यात सुचना आली. ‘अती महत्वाच्या लोकांच्या विमानाच्या उड्डाणामुळे धावपट्टी उपलब्ध नाही. त्यामुळे आपले विमान विमानतळावर उतरण्यास आणखी वेळ लागेल देरी के लिये हमे खेद है’
एखादा मंत्री गाडीत येत आहे असे कळले की, रस्त्यावरचा सामान्य जनतेचा ट्रॅफिक थांबवला जातो. आपल्याला गाडीतच बसून रहावे लागते. तो मंत्री जाईपर्यंत आपण मनात चरफडत राहतो. ‘.... पण हे मंत्री म्हणजे राजे झाले आहेत.’ सर्व रहदारी जाम होते. हा अनुभव मी बर्याच वेळा घेतला.
स्टेशनवर प्लॅटफॉर्म रिकामा नसल्याने रेल्वे बराच वेळ लांब अंतरावर उभी करावी लागते. आपण प्रवासाने थकलेले असतो. कधी एकदा स्टेशनवर उतरुन घरी जातो असे झालेले असते. अशा वेळी कधी कधी अर्धा पाऊण तास तेथेच त्या गाडीत बसून रहावे लागते. याचाही अनुभव मी बर्याच वेळा घेतला.
धावपट्टी मिळत नसल्याने विमान फिरत राहिल्याचा अनुभव प्रथमच घेत होतो. माझ्या मनात विचार आला हे विमान आता असे किती वेळ फिरत राहणार. हे व्हि.आय.पी. लोक कधी जाणार आणि समजा मध्येच या विमानाचे इंधन संपले तर. माझ्या मनात वाईट विचार आला. मंत्र्यांना थांबवून जवळ आलेले विमान प्रथम उतरवले असते तर काय बिघडले असते. अशा विमानाच्या फिरण्याने किती इंधन वाया गेले. मध्येच विमानात बिघाड झाला असता अन् ते कोसळले असते तर कोण जबाबदार. व्हीआयपी लोकांची वेळ महत्वाची, सामान्य जनतेचा जीव महत्वाचा नाही. देश थांबला तर चालेल पण मंत्र्यांना कसे थांबवणार. हीच आपल्या देशाची शोकांतिका आहे. पस्तीस मिनिटे हवेत फिरल्यानंतर आमच्या विमानाला धावपट्टी मिळाली व आमचे विमान उतरले. पण या वेळ जाण्यामुळे आमच्या दिल्ली ते काठमांडू या विमानाची सुटण्याची वेळ झाली. त्यामुळे आम्हा सर्वांना ते विमान गाठण्यासाठी सामान घेऊन पळत जावे लागले आणि पाच मिनीटे आधी आम्ही त्या विमानात जाऊन बसलो. पाऊण तासातच काठमांडू आले. हिमालयाच्या रांगांच्या कुशीत वसलेला हा नेपाळ देश. काठमांडू त्याची राजधानी विमानाच्या खिडकीतून घरांची कल्पना येत होती. डोंगरांवर बांधलेली घरे त्यामुळे कुठेही उत्तुंग इमारती नाहीत. बसकी घरे, उतरती कौले, डोंगरांच्या चढावर टप्प्या टप्प्याने बसलेली घरे पण कोठेही झोपडपट्टी दिसली नाही. विमानतळावरुन आम्ही शहरातून हॉटेलकडे निघालो.
काठमांडू शहरातून जाताना आपल्या भारतातल्या एखाद्या शहरातून गेल्यासारखे वाटत होते. तशीच वाहने, तसेच रस्ते, रस्त्यावरील खड्डे, ट्रॅफिक हवालदार, वाहनांची वर्दळ, रस्त्याच्या कडेचा कचरा, दोन्ही बाजूला फुटपाथ, दुकाने तशाच प्रकारची रचना. तेथील लोक पहिल्या तेथील लोक पाहिल्यानंतर हे तर आमच्या देशातीलच लोक असे वाटत होते. बसके नाक, मिचमिचे डोळे, गोल चेहरा, फटी असलेले दात असे नेपाळी लोक पहायला मिळतील असे वाटत होते पण असे लोक कमीच दिसत होते. मी हॉटेलच्या दरबानास तसे विचारले पण तो म्हणाला, ‘साब ये तो बडा शहर आहे आपको नेपाळी लोग गावमे मिलेंगे.’ तेवढ्यात एक बहादूर आला त्याने मला सलाम ठोकला, ‘चलो शाब आपको रुम दिखाता है’ त्याचे बोलणे ऐकून मला नेपाळला आल्यासारखे वाटले.
संध्याकाळी पशुपतीनाथ मंदीरात गेलो. एक मोठे देवस्थान, मंदिराला चार दरवाजे महादेवाचे दर्शन चारी दरवाज्यातून घेता येते. मंदिराच्या गाभार्यात कोणालाही प्रवेश नाही. मंदिरात बंदोबस्त चोख आहे. पूर्णपणे तपासणी करून आत सोडले जाते. भक्तांची गर्दी भरपूर होती. दर्शनासाठी रांगा होती. आणि रांग म्हटले की, ढकला ढकली आलीच. पुढच्याला ढकलण्या शिवाय दर्शन नीट होत नाही. ही भावना रांगेत उभा असलेल्या प्रत्येकाची असते. मी दर्शन घेतले. मागणे काही नव्हतेच. कारण सारे काही मिळाले आहे. माझ्या हातून चुकूनही कोणावरही अन्याय होऊ नये जे काही राहिलेले आयुष्य आहे ते उत्तम आरोग्याचे जावो आणि जाताना कोणालाही त्रास न देता जावे हीच इच्छा. दर्शन घेऊन पुढे सरकलो. समोर बोर्ड होता - ‘जेब कतरों से सावधान’ माझा हात पटकन माझ्या पँटच्या मागच्या खिशावर गेला आणि मला एकदम धक्का बसला, रांगेत माझ्या मागे असणार्याने माझ्या खिशावर असलेले पाकीटाचे ओझे कमी केले होते. पैसे फारसे नव्हते. जेमतेम ६०० ते ७०० रुपये असतील. पण ड्रायव्हींग लायसन्स व काही महत्वाचे कागद होते. ते गेल्याचे वाईट वाटले. पण पाकीटमाराला नेपाळी एक हजार रुपयाची लॉटरी लागली. माझ्या मनात विचार आला त्या पाकीट माराने शंकरास काय मागितले असेल. ‘महादेवा, पुढच्याचे पाकीट गच्च भरलेले असू दे, तुला अभिषेक करेन’ असेच म्हणाला असेल. एकाचा फायदा म्हणजे दुसर्याचे नुकसान हा नियमच आहे. देव त्याच्यावर सुध्दा प्रसन्न झाला. देवाला सगळे भक्त सारखेच. मी मनात म्हटले आपण त्याचे काही देणे असू. ते त्याने आपल्याला न मागताच घेतले. दिवसाचा शेवट चांगला झाला नाही.
दुसर्या दिवशी सकाळी, छोट्या विमानाने हिमालय पर्वताच्या रांगा, एव्हरेस्ट शिखर पाहण्याचा कार्यक्रम होता. सहा हजार रुपये तिकीट होते पण ढग नसतील तरच. पर्वत रांगा नीट पाहता येतात. आम्ही नशीबवान होतो. आकाश निरभ्र होते. हिमालय पर्वताच्या रांगा व्यवस्थित दिसत होत्या. ढगांच्यावर आमचे विमान होते. खाली सर्वत्र पसरलेले कापसासारखे वाटणारे पांढरे शुभ्र ढग, वर निरभ्र, निळे, स्वच्छ आकाश आणि बाजूला पर्वतांच्या रांगा. काही पर्वतावर बर्फ होते तर बरेच पर्वत स्वच्छ होते. विमानातील कर्मचारी आम्हाला सर्व शिखरांची माहिती देत होता. गौरीशंकर आणि एव्हरेस्ट ही दोन महत्वाची शिखरे. एव्हरेस्ट पर्वत अगदी जवळून पहायला मिळाला. गिर्यारोहक त्याच्यावर चालत चढून जातात. ते शिखर काबीज करतात. गिर्यारोहणाचा आनंद लुटतात. हे शिखर विमानातून पाहताना आपल्याला एवढा आनंद होतो तर गिर्यारोहकांना तो पर्वत चढताना किती आनंद होत असेल. पण तेथे राहणे व पर्वत चढणे किती अवघड काम आहे. अगदी कमी ऑक्सिजन असलेल्या हवेत राहणे, तेथील वातावरणाचा त्रास सहन करणे आणि शिखरावर जाणे किती कठीण काम असेल. मी त्या गिर्यारोहकांना नमस्कार केला.
नेपाळ मधील अन्य ठिकाणे पाहून घेतली. येथे पर्यटक भरपूर येतात. त्यातल्या त्यात हिमालयाच्या ट्रेकींगसाठी परदेशी पर्यटक भरपूर येतात. नेपाळ निसर्गरम्य ठिकाण आहे. त्यात पोखारा हे दरीमध्ये वसलेले गाव. नितांत सुंदर आणि हवेशीर पर्यटन स्थळ. खरेदीसाठी येथे विशेष असे काही नाही. परंतु रमणीय स्थळ म्हणून येथे खूप गर्दी असते. आर्थिक दृष्ट्या अजून संपन्न नाही. मध्यमवर्गीय लोक आणि मजुरवर्ग जास्त दिसतो. कामाच्या निमित्ताने तिबेटमधील लोक भरपूर येतात. ट्रेकींगसाठी आवश्यक असणार्या सामानांच्या दुकानांची मोठी बाजारपेठ आहे. हाच मोठा व्यवहार येथे चालत असतो. हिमालयात पर्यटन करताना आवश्यक असणार्या सर्व वस्तु घ्याव्याच लागतात. अगदी ऑक्सिजनने भरलेला एक छोटा सिलेंडर सुध्दा जवळ ठेवावा लागातो. गरम कपडे, आतील थर्मल वेअर्स, उलनचे हातमोजे व पायमोजे, स्वेटर, जॅकेट, रेनकोट, काठी, चष्मा, मफलर, कानटोपी, सार्या वस्तु बरोबर घ्याव्या लागतात. कारण वातावरण कधी बदलेले कधी कडक उन पडेल आणि कधी पाऊस येईल काही सांगता येत नाही. थंडी तर सततच असणार त्यामुळे या बदलत्या वातावरणाशी सामना करायचा असेल तर ही आयुधे आपल्याकडे हवीतच. आम्ही त्या सार्या वस्तु बरोबर घेतल्या. आमच्या गाईडने येथून पुढचे बारा दिवस कसे असतील याची आम्हाला कल्पना दिली. ते ऐकून आम्ही बरेच अस्वस्थ झालो. पण आयुष्यातले मोठे काम करायचेच आहे. कैलास दर्शन आणि परिक्रमा करायचीच आहे असा मनोनिग्रह सगळ्यांचा होता.
सकाळी नऊ वाजता आम्ही बसमध्ये बसलो आणि काठमांडू सोडले. आता आमच्या कैलास यात्रेला सुरवात झाली. काठमांडू ते कैलास अंतर १२०० किलोमीटर आणि समुद्रसपाटीपासून उंची साधारण १८०० फुट एवढे अंतर कापून एवढ्या उंचीवर एकदम जाणे शक्य नाही आणि एकदम वातवरणातील बदल आपल्याला सहन होणे शक्य नाही. तेथे ऑक्सिजन वायुचे प्रमाण अतिशय कमी असते. आपण जसजसे उंच जाऊ तसतशी हवा विरळ होत जाते आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. आपल्याला वातावरणाची सवय व्हावी म्हणून काठमांडू ते कैलास पर्वत हा प्रवास पाच दिवसांचा असतो. दररोज साधारण २५० किमी. अंतर पार करून मुक्काम करायचा. तेथील वातावरणात काही काळ रहायचे आणि मग पुढचा टप्पा सुरु करायचा असा प्रवास ठरवलेला होता.
काठमांडू पासून चीनची हद्द येईपर्यंत साधारण ८० कि.मी. अंतर कोदारी बॉर्डर येथे जावे लागते. हा रस्ता संपूर्णपणे घाटाचा, कच्चे रस्ते, बर्याच ठिकाणी कडे कोसळल्याने दगड माती पडून दरड कोसळून रस्ता अरुंद झालेला. दरीतून वाहणारी ब्रह्मपुत्रा नदी. डोंगरावर असणारे घनदाट वृक्ष हा सारा रमणीय प्रवास निसर्गाचा आनंद घेत सुरु झाला. एवढे अंतर पार करण्यासाठी चार तास लागले. कोदारी बॉर्डरवर आल्यानंतर तेथून चीनच्या हद्दीत प्रवेश करावा लागतो. वास्तविक हा सर्व प्रदेश भारताचा होता पण १९६२ च्या युध्दात चीनने तो बळकावला. तिबेटचा बराच भाग चीनने व्याप्त केला आहे. कोदारी येथे बसमधून उतरून आम्ही चालत गेलो. तेथे नदीवर एक मोठा पूल आहे. त्याला फ्रेंडशीप ब्रीज असे म्हणतात. तो क्रॉस करून चीनच्या क्षेत्रात प्रवेश करावा लागतो. तेथे आमच्या सामानाची कसून तपासणी झाली.
चीन वरुन आलेला माल हमालामार्फत नेपाळमध्ये आणला जातो. तेथे हमालाचे काम करणारे तिबेटी लोक ज्या पध्दतीने काम करतात ते पाहुन फारच आश्चर्य वाटले. एकेक हमाल अगदी स्त्री हमाल सुध्दा जे ओझे पाठीवरुन नेत होते ते पाहून फारच वाईट वाटत होते. माणसाला प्राण्यासारखे अवजड ओझे वाहून न्यावे लागते. पोटासाठी माणसाला पाठीला किती त्रास द्यावा लागतो याची जाणीव झाली. प्रत्येकाला पोट भरायचे असेल तर पाठीला ताण द्यावाच लागतो. चीनने जगातील सर्वच देशात आपले मार्केट तयार केले आहे.
जगातील बहुसंख्य देशात चायना मार्केट पाहिले आहे. भारतातसुध्दा चीनचा माल जास्त खपतो. सर्व वस्तु बनवणे, विकणे यात चीन आघाडीवर आहे. आपल्याकडे तेवढेच मनुष्यबळ असून आपण उत्पादन क्षेत्रात मागे का आहोत? आपल्याकडे मनुष्यबळ आहे पण मनुष्यामध्ये काम करण्याचे बळ नाही. किंबहुना इच्छा नाही. हे आपल्या देशाचे दर्दैव आहे.
चीनच्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर आमचा पुढील प्रवास टोयोटा कंपनीच्या लँड क्रुझर गाड्यातून होता. प्रत्येक गाडीत फक्त तीन प्रवासी. आमचा प्रवास हिमालयाच्या डोंगरातून सुरु झाला आणि त्या डोंगरातून घाटामधून तयार केलेला डांबरी रस्ता पाहून मी फारच आश्चर्यचकीत झालो. या रस्त्यावरुन फक्त कैलास मानसरोवर यात्रा करणार्या गाड्या जातात. अन्य कोणतीही वाहतुक या रस्त्याने होत नाही. हा रस्ता वर्षातून फक्त चारच महिने वापरता येतो. यात्रा फक्त त्याच काळात असते. तरी देखील आपल्या देशातील नॅशनल हायवे सुध्दा एवढा चांगला नसेल. अशा रस्त्यामुळे आमच्या गाड्या ९० ते १०० किमी प्रति तास इतक्या वेगाने जात होत्या. प्रवासात पोटातील पाणीसुध्दा हलत नव्हते. आजुबाजूला फक्त डोंगर, मध्येच एखादा तलाव. सप्टेंबर महिना असल्याने डोंगरावरील बर्फ वितळून गेला होता. त्यामुळे डोंगरांच्या रांगा बोडक्या दिसत होत्या. डोंगरांच्या रांगांवर एकही झाड नव्हते. त्यामुळे सगळा प्रदेश रखरखीत दिसत होता. उन्हाच्या झळा जाणवत होत्या. दुपारची वेळ असल्याने प्रखरता आणखी जाणवत होती. निर्मनुष्य नागमोडी वळणाचे रस्ते, कोणतीही वस्ती नाही, घरे नाहीत, झाडी नाहीत. सारे कसे सुन्न सुन्न वाटत होते. अडीच तासाच्या प्रवासानंतर आम्ही न्यालम नावाच्या गावी पोहोचलो.
न्यालम समुद्रसपाटी पासून ३५०० मीटर म्हणजेच जवळ जवळ ११००० फुट उंचीवरील गाव. येथे बर्यापैकी वस्ती होती. चिनी आणि तिबेटीयन लोक दिसत होते. आमचे हॉटेल दुमजली होते. लाकडाचा भरपूर वापर केलेला दिसत होता. एकेका खोलीत सहा लोकांची व्यवस्था होती. संडास-बाथरुमची व्यवस्था सामाईक होती. जसजशी संध्याकाळ होत चालली थंडी वाढू लागली. सर्वजण स्वेटर, जॅकेट, मफलर, मास्क असे बसले होते. ग्रुपमध्ये गप्पा सुरु होत्या. मला एकदम फिरल्यासारखे झाले. मला वाटले मला चक्कर येत आहे. तेवढ्यात समोरचा ओरडला सर बिल्डींग थरथरतेय भूकंप आहे. आम्ही सारे पळत पळत बिल्डींग सोडून रस्त्यावर आलो. सगळे घाबरले होते. ‘अहो भूकंप दिसतोय.’ जो तो म्हणत होता. थोड्या वेळाने सारे शांत झाले. आमच्या यात्रेची सुरुवात म्हणून धरणी मातेने शंख फुंकला होता आणि यात्रा सुरु झाल्याची घोषणा केली.
कडाक्याची थंडी, भूकंपाची भिती त्यामुळे रात्रीच्या जेवणाकडे कोणाचेही लक्ष नव्हते. सगळ्यांनी कसे बसे चार घास खाल्ले. आणि दोन दोन रजया घेऊन पलंगावर आडवे झाले. येथे हवा विरळ आहे. हवेत ऑक्सिजन कमी आहे. त्यामुळे श्वास घेताना त्रास होतो. शरीरात ऑक्सीजन कमी आला की आणखी त्रास वाढतो. जर तुम्हाला डोके जड झाल्यासारखे वाटले, डोके दुखू लागले, चक्कर येत आहे असे वाटले तर या ‘डायमॉक्स’ गोळ्या घ्या याने बरे वाटेल पण या गोळ्यांचे दुष्परीणाम आहेत. तुम्हाला जळजळ, पायांना मुंग्या आल्यासारखे वाटेल. नाकात जळजळ होईल. नाक लाल होईल पण शरीरात ऑक्सीजनचे संतुलन राहण्यासाठी या गोळ्या दोन वेळा घेणे आवश्यक आहे. आमच्या टूर लिडरने सुचना दिली. बर्याच जणांनी त्या टूरमध्ये दररोज दोन गोळ्या घेतल्या. सुदैवाने मला मात्र एकदाही गोळी घ्यावी लागली नाही. आज टूरच्या चौथा दिवस. आज दिवसभर न्यालम येथेच वास्तव्य होते. आज सर्व प्रवाशांची चाचणी होती. येथून पुढील वातावरणात आपण कसे राहू, कैलास परिक्रमा जमेल की नाही यासाठी टेकडी चढून उतरण्याची चाचणी होती. एक ८०० फुट उंचीची टेकडी निवडली होती. त्याला पायर्या अगर पायवाट काही नव्हते. टेकडी दगड, वाळू, माती, छोटी छोटी रोपे यांनी भरली होती. काही ठिकाणी काटेरी झुडपे होती. सर्वांनी ही टेकडी चढून त्याच्या शिखरावर थोडा वेळ बसून मग खाली यायचे अशी सूचना आली. आमच्यातील तरुण मंडळी भराभर डोंगर चढून गेली. आम्ही बरेचजण हळू हळू, थांबत थांबत, दम घेत शिखरावर जाऊन पोहोचलो. तीस पस्तीस वयाचे पाच सहा तरुण होते. या लहान वयात त्यांना कैलास सहल करावी वाटली याचे मला आश्चर्य वाटले. मी त्यांना विचारले, ‘तुम्ही कैलास दर्शन करण्यासाठी आलात का गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी आला?’ त्यांनी उत्तर दिले, ‘दोन्हीही. आम्हाला मान सरोवरात स्नान करायचे आहे. कैलासची पूजा करायची आहे आणि ४२ किमीची परिक्रमा पायी करून गिर्यारोहणाचा आनंद घ्यायचा आहे.
आम्ही काठमांडूला पशुपतीनाथाला अभिषेकही केला आणि रात्री कॅसीनो मध्ये जाऊन जुगार पण खेळलो. आणि नृत्यांगनाचे नृत्य पाहून त्यात सहभागही घेतला.’ मला आश्चर्य वाटले. आजचा तरुण वर्ग अशा दोन्ही विरुद्ध गोष्टींचा आनंद घेतो हे चांगलेच आहे. सर्वांनी टेकडी चढण्याची परीक्षा व्यवस्थीत पार पाडली सारे जण पास झाले. सगळ्यांच्या चेहर्यावर आनंद होता. पण आपण कैलास दर्शन घेणार, परिक्रमा करणार, यमद्वाराला भेट देणार, सर्वांनी दुपारची वेळ आनंदात घालवली. काही जण बाजारात खरेदीसाठी गेले. खड्यांचे विविध रंगांचे, विविध प्रकारचे गळ्यात घालण्याचे हार, ब्रेसलेट, अंगठी, रुद्राक्षाच्या माळा, जुन्या ऐतिहासीक वस्तु विकायला ठेवल्या होत्या. ज्यांना अशा वस्तुंची आवड आहे अशा लोकांनी बरीच खरेदी केली. रात्री पुन्हा कडाक्याची थंडी पडली. गारठ्यामुळे पोटातही गारठा झाला. पोटात अग्नी पेटला नाही तर भूक कशी लागणार. बाहेर थंडी, पोटात थंडी त्यामुळे जेवणावरची वासनाच उडाली. दोन दिवसांत हे हाल आहेत तर पुढचे दहा दिवस कसे जाणार.
सकाळी आठ वाजता उठलो. अजूूनही थंडी होतीच. गरम पाण्याने कसे बसे तोंड धुतले. अंघोळ करणे शक्यच नव्हते. गरम उप्पीटाचा नाष्टा झाला. आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. २५० किमी. प्रवास न्यालम ते सागा. वाटेत जेवण झाले. जेवणात फक्त भात, सॅलेड, काही तरी गोड पदार्थ. चपाती, भाकरी, पुरी असे पदार्थ तेथे बनवून देणे शक्य नव्हते. कधी मसाले भात, पुलाव, बिरयाणी, खिचडी, जिरा राईस, साखरभात असे भाताचे वेगळे प्रकार दररोज मिळाले. दुपारी चार वाजता सागा येथे पोहोचलो. येथे हवेचे प्रमाण आणखी कमी. हॉटेलच्या चार पायर्या चढल्या तरी सगळ्यांना दम लागला. हे गाव थोडे मोठे आहे. हॉटेल चांगले आहे. मुख्य म्हणजे ऍटॅचड टॉयलेट होते, गरम पाण्याची सोय होती. सर्वांना खूप आनंद झाला. संंध्याकाळी कडत पाण्याने स्नान केले तेव्हा थोडे बरे वाटले. रात्री कडाक्याची थंडी पडली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. एका बाईला अचानक जोरात धाप लागली, उलट्या झाल्या, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ताबडतोब डॉक्टरांना बोलवावे लागले. त्यांनी सलाईन लावले. ऑक्सीजन द्यायला सुरुवात केली. त्या बाईंना रात्रभर त्रास झाला. ते पाहून बाकीचे प्रवासी घाबरले.अजून कितीतरी प्रवास करायचा आहे. कसे होणार? सगळ्यांनी डायमॉक्स गोळ्या घेतल्या.
दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता सागा सोडले. आता आंघोळीला गरम पाणी यापुढे मिळणार नाही. दहा दिवसांनी पुन्हा याच हॉटेलमध्ये येऊ तेव्हा मिळेल. आमच्या लीडरने सुचना दिली. पुढचा प्रवास आणखी कठीण आहे. सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. औषधे वेळच्या वेळी घ्या. सकाळी दहा वाजता सागा सोडले आणि पयांगकाडे निघालो. २४० किमी अंतर. उंची ४२०० मीटर म्हणजे १३५०० फुट आता हवा आणखी विरळ होणार. आता प्रवासात ब्रम्हपुत्रा नदी, डोंगर आणि आता वाळूचे ढिग दिसू लागले. उन्हाची तीव्रता वाढली. एवढ्या उंचीवर ओझोन वायूचे प्रमाण कमी असल्याने सूर्य किरणातील अल्ट्राव्हायोलेट किरणे आपल्या शरीरावर पडतात. त्याची दाहकता फार असते ते जास्त काळ पडले तर त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने आपले शरीर जास्तीत जास्त झाकून घेतले होते. आमच्या बरोबर एक ट्रक होता. ज्यात अन्न बनवण्यासाठी लागणारे पदार्थ होते. तो ट्रक व स्वयंपाकी पुढे जायचे एखाद्या ठिकाणी थांबवून भोजन बनवले जायचे. वाटेत भोजन आणि पुढे प्रवास सुरु असा रोजचा कार्यक्रम.
आज वारा जोरात सुटला होता. वाळूचे डोंगर एका ठिकाणाहून नाहीसे होऊन दुसरीकडे तयार होऊ लागले. वाळूचे बारीक कण डोळ्यात जाऊ नयेत म्हणून सगळ्यांनी गॉगल लावले. उन आणि वाळूचा एक वेगळाच अनुभव सर्वांना आला. साडेतीन वाजता आम्ही पयांग येथे पोहचलो. अतिशय छोटे गाव. आमची राहण्याची जागा म्हणजे मातीची घरे वर पत्रे. खोलीला एकच खिडकी बाकी सगळा अंधार. एका खोलीत सहा बेड. प्रत्येकाला दोन रजया पांघरण्यासाठी. खोलीत सामान ठेवले तर उठून बाहेर यायला पण जागा रहात नव्हती. एवढ्या लहान खोल्या. पण खोल्या मर्यादीत असल्याने इलाज नव्हता. संडास बाथरुमची काहीच सोय नाही. प्रत्येक खोलीत एकच बल्ब. विद्युत पुरवठा जनरेटरवर. संध्याकाळी ७ वाजता जनरेटर सुरु व्हायचा. रात्री १२ पर्यंत खोलीतील दिवा चालू रहायचा नंतर जनरेटर बंद आणि बल्बही बंद. सगळीकडे अंधार बाहेर चांदण्याचा प्रकाश पण खोलीतून बाहेर यायचे म्हणजे उशाला बॅटरी पाहीजे. बाहेर कुत्री फार त्यामुळे रात्री लघुशंकेला जायचे म्हटले तरी बॅटरी व काठी घेऊन बाहेर जावे लागे. अन् बाहेर जाऊन लघुशंक करून आले की एवढी थंडी वाजायची कि विचारता सोय नाही. त्यात श्वास घ्यायला त्रास बर्याच वेहा तोंडाने पण श्वास घ्यावा लागेे. हृदयाचे ठोके एवढे वाढायचे आणि एवढ्या जोरात व्हायचे की आपल्याला स्पष्टपणे ऐकू येत असे. थंडी जास्त वाजते म्हणून तोंडावरुन पांघरुण घ्यावे म्हटले तर गुदमरायचे म्हणून तसेच तोंड उघडे ठेवून झोपावे लागायचे.
त्या रात्री माझ्या छातीत फारच धडधडू लागले, दम लागला. बाहेर जाऊन आल्याने व चालल्याने थकवा आला व एकदम पांघरुण घेतल्याने थोड्याच वेळात घाम आला. मी घाबरलो. एवढी थंडी असताना घाम कसा आला. बापरे! म्हणजे आपल्याला ऍटेक वगैरे आला काय? विचारानेच माझा घाम वाढला. काय करावे सुचेना. शेजारच्या बेडवर हालचाल दिसली. मी पटकन विचारले, ‘काय हो, तुम्हाला झोप येत नाही का? दम लागलाय का?’
शेजारचा प्रवासी एकदम म्हणाला, ‘मघाशी, बाहेर जाऊन आलो आणि तेव्हापासून फारच त्रास होत आहे बघा.’ मला एकदम बर वाटले. माणसाचे कसे असते पहा, आपल्या सारखाच त्रास, दुःख, कष्ट दुसर्याला पण आहेत असे कळले की किती बरे वाटते. आपले दुःख हलके होते. समदुःखी पाहिला की बरे वाटते.
‘अहो, येथे एवढा त्रास आहे, उद्या तर आणखी उंच जायचे आहे, तेथे काय होईल’ शेजारचा म्हणाला ‘आपण, उद्या मानस सरोवरला जातोय एक महत्वाचा टप्पा पूर्ण होतोय. तेथे तलाव आहे. छान वातावरण असेल’ मी म्हणालो.
माझी धडधड कमी झाली. थोड्याच वेळात दोघेही झोपलो. सकाळी स्नान करू शकलो नाही. तसेच नाष्टा करून आम्ही १० वा. गाडीत जाऊन बसलो आणि पुढचा प्रवास सुरु झाला. आता एवढा चांगला रस्ता आला आणि वाहने उपलब्ध आहेत म्हणून प्रवास एवढा सुखकर झाला. याआधी कैलास यात्रा करणारे कशी यात्रा करत असतील. त्या काळी माणुस आपली सांसारिक कामे संपली, सर्व जबाबदार्या पार पाडल्या की अशा यात्रेला जायचे. उद्देश हा की अशाच खडतर यात्रेत परमेश्वराच्या चरणी विलीन व्हावे. त्याने दिलेला देह व आत्मा त्याच्या चरणी अर्पण करावा आणि परमात्म्यात विलीन व्हावे. यात्रेला जाताना घरी सांगून जायचे परत येण्याची वाट पाहू नका. आलो तर ठीक नाही तर तिकडेच गेलो असे समजा. यात्रा करून जर पूर्णपणे सुरक्षित घरी यात्रेकरू आला तर तो मी यात्रेवरुन जिवंत परत आलो म्हणून गाव जेवण द्यायचा. आजची परिस्थिती वेगळी आहे. आज प्रवासाची भरपूर सोई व साधने उपलब्ध झाली आहेत म्हणून प्रवास सुखरुप आणि आनंददायक झाला आहे. म्हणून सर्वांनी प्रवासाचा आनंद घ्यावा.
दुपारी ३.३० वाजता आम्ही मानस सरोवर येथे पोहोचलो. दुपारची वेळ असल्याने सुर्याची किरणे तलावावर पडलेली दिसत होती. एका बाजूला बर्फाच्छादीत उत्तुंग कैलास पर्वत आणि जमिनीवर निळ्या रंगाच्या विविध छटा असलेले आणि अथांग पसरलेले मानस सरोवर पाहीले तेव्हा सर्वांनी आनंदाने उड्या मारल्या. ते दृश्य एवढे मनोहर होते की सर्वजण आपला झालेला प्रवासाचा शीण, थकवा, कंटाळा सारे काही विसरुन निसर्गाच्या अगाध महिमा पाहण्यात व्यग्र झाले. काय पाहू अन् काय नको असे होत होते. कोणत्याही प्रकारची वनश्री नसताना एवढे निसर्गरम्य दृश्य दिसू शकते यावर विश्वासच बसत नव्हता. परमेश्वराची अगाध लिला म्हणतात ती हीच का? त्या परमात्म्याच्या अस्तित्वाने ही जागा एवढी रमणीय झाली असेल का? आम्ही आमच्या उतरण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी आलो. कापडी अगर पत्र्याचे तंबू तयार केले होते. एका तंबूत आठ ते दहा पलंग होते. पत्र्याचा तंबू रात्रीच्या वेळी फारच गार पडतो म्हणून तो पुरुषांना दिला होता. स्त्रियांना कापडी तंबू व मातीचे घर होते. येथेही तीच अडचण जागा लहान असल्याने सामान ठेवले की फिरायला जागाच रहात नव्हती. आम्ही चहा घेऊन स्नानासाठी मानस सरोवराकडे गेलो. पाण्यात शिरताच अंगावर काटे आले. पाणी फारच गार होते. पाण्यात तीन डुबक्या मारल्या कैलास पर्वताला हात जोडले आणि सर्वांनी मनसोक्त स्नान केले. असे म्हणतात या सरोवरात स्नान केल्याने केलेल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते. (म्हणजे पुन्हा पाप करायला मोकळे असा गोड समज करून घेऊ नये.)
माझ्या बरोबरच्या तरुणांनी पुजेचे सर्व सामान आणले होते. कारण तेथे ना मंदीर ना कोणती मूर्ती त्यामुळे तेथे पुजेचे सामान मिळत नाही हे त्यांना माहित होते. म्हणून त्यांनी घरून येतानाच सर्व सामान व्यवस्थित आणले होते. आम्ही त्या सरोवराजवळ बसून महादेवाची पिंड तयार केली. यथासांग पूजा केली. विशेष म्हणजे त्या तरुणांना पुजेची सर्व माहिती होती. त्यांनी बेलाची पाने पण आणली होती. शिवसहस्त्र नाम म्हणत त्यांनी बेलाची एक हजार पाने महादेवाला वाहिली. आमच्या बरोबर असलेल्या एका महिलेने रुद्राची पोथी आणली होती. त्यांनी रुद्र आवर्तन केले. नंतर महादेवास नैवेद्य दाखवला सगळ्यांनी आरती केली. प्रसाद ग्रहण केला. सर्व पूजा व्यवस्थीत झाल्यावर भजनाचा कार्यक्रम झाला आणि नंतर महादेवाची पिंड सरोवरात विसर्जन केली. सर्वांच्या चेहर्यावर समाधान होते. एक भाग पूर्ण केल्याचा आनंद होता. जसजशी रात्र होत गेली थंडी वाढत गेली. आमचा तंबू पत्र्याचा असल्याने पत्रा गार पडून तो तंबू म्हणजे शीतपेटी झाल्यासारखा वाटत होता. गारठा जास्त जाणवत होता. त्या रात्री जेवणात खिचडी कढी व सूप होते. सर्वांनी पलंगावरच जेवण केले.
थंडीमुळे आणि जागेच्या अडचणीमुळे त्यात रात्री लाईट नाही. सोय व्यवस्थीत झाली नाही. पहाटे ३.३० वाजता आम्ही चारजण पुन्हा सरोवराच्या किनार्यापाशी जाऊन बसलो. रात्रीची निरव शांतता, घोंघावणारा वारा, तलावाच्या पाण्यातून येणारे आवाज सारे काही पहात बसलो. पहाटेच्या वेळी देव, किन्नर, यक्ष, नक्षत्रे आदी देवलोकातील मंडळी या सरोवरात स्नानास येतात अशी दंतकथा ऐकली होती. ते दिसत नाहीत परंतु स्नान करताना होणारा पाण्याचा आवाज त्या काळात जास्त ऐकू येतो. असे मी पण ऐकले होते. आम्ही त्या धूसर प्रकाशात तलावाकडे पहात होतो. थंडीने अंगात थरकाप होत होता. तरीपण सगळीकडे पहात होतो. ऐकण्याचा प्रयत्न करत होतो. आम्हाला दिसले काही नाही पण पाण्यात आवाज ऐकू येत होते. येथे समुद्रासारख्या लाटा दिसत नव्हत्या पण आवाज मात्र ऐकू येत होता. लाटा नसताना पाण्यात आवाज का येत होता? वारा जोरात वहात असला तरी तो वरुन वहात होता. पाण्यामधून आवाज का येत होता? सारे काही कल्पनेच्या पलीकडचे होते. तेथे एक तास बसून आम्ही परत तंबूकडे फिरलो. पांघरुण घेऊन थोडा वेळ झोपलो.
येथे पण शौचालय नव्हते. त्यामुळे मोकळ्या हवेत कोठेही जा. लहानपणची आठवण झाली. आम्ही रहात होतो त्या गल्लीत शौचालये कमी असल्यामुळे लहान मुले रस्त्याच्या कडेला बसायची. आजही शहरातूनसुध्दा हीच दृश्ये दिसतात. आपण सर्वांसाठी शौचालयेसुध्दा बांधू शकत नाही. स्वातंत्र्योत्तर ६५ वर्षांत आपण काय केले.
मानस सरोवराचा मुक्काम संपला. आम्ही दारचेतकडे निघालो. सर्वात उंच ठिकाण ५२११ मीटर म्हणजे जवळ जवळ १६००० फुट या गावात बर्यापैकी हॉटेल होते. वस्ती बरीच होती. येथे विश्रांती घेऊन जेवण करून आम्ही अष्टपदीकडे निघालो. हा रस्ता मात्र अतिशय खराब होता. दोन तीन डोंगर ओलांडून खळकाळ भागातून प्रवास करून आम्ही एका डोंगराजवळ पोहोचलो. तेथून जे दृश्य आम्हाला दिसले ते अविस्मरणीय होते. समोरच उंच आणि बर्फाच्छादीत कैलास पर्वत दिमाखात उभा असलेला दिसला. एक दरी पार करून गेलो की कैलासाच्या पायथ्याशी पोहोचू इतका जवळ कैलास दिसत होता. पण आजपर्यंत कोणीही कैलास पर्वत चढू शकला नाही असे म्हणतात. एका साधूने तसा प्रयत्न केला तो सात पावले चालला आणि आठवे पाऊल टाकताच तो दिसेनासा झाला. तो कोठे गेला काय झाले काहीच कळले नाही. त्याचा देहसुध्दा मिळाला नाही म्हणून या पर्वताला अष्टपदी नाव पडले. आम्ही तो पर्वत चढून बराच वेळ कैलासाचे दर्शन घेत बसलो. एक तास सर्वांनी ध्यान केले. महादेवाचे नामस्मरण केले. कैलास पर्वतावर त्रिनेत्र स्पष्टपणे दिसत होते. एक ज्योत अखंड जळत असल्याचा भास होत होता. सारेजण भक्तीमय वातावरणात तल्लीन झाले होते. ‘ॐ नमः शिवाय’चा जप करत होते. एक वेगळी अनुभूती सर्वांना जाणवत होती. प्रवासाने सगळेजण थकले होते. बर्याच जणांचे चेहरे काळवंडले होते. ओठ फुटले होते. सगळ्यांची दाढी वाढली होती. सगळे योगी पुरुष वाटत होते. उद्यापासून कैलास परिक्रमा सुरु होणार होती. हा तीन दिवसांचा कार्यक्रम. पहिल्या दिवशी १२ किमी., दुसर्या दिवशी २२ किमी आणि तिसर्या दिवशी १० किमी असे एकूण ४४ किमी. अंतर पार केल्यावर कैलास पर्वतास प्रदक्षिणा पूर्ण होणार होती. ही परीक्रमा बरेचजण घोड्यावरुन करणार होते तर तरुण मंडळी चालत जाणार होते. संध्याकाळी एका यात्रेकरूला खूप त्रास झाला. त्याच्या तोंडातून फेस येवू लागला. नाकातून रक्त आले. डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि परीक्रमा न करण्याचा सल्ला दिला. तो माणूस चांगला धडधाकट, चाचणीचे वेळी डोंगर चढण्यात पहिला नंबर मिळवणारा, पण अचानक असे घडले आणि त्याला परिक्रमा करता आली नाही. शेवटी नशीबात असेल तरच ते घडते नाही तर तेथपर्यंत जाऊनही घडले नाही.
दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता आम्ही परीक्रमा करण्यासाठी निघालो. दारचेन वरून मोटारीने यमद्वाराकडे निघालो. एक दारासारखी रचना केलेली दगडी वास्तु, फुलांनी व पताकांनी सजवलेली. त्या दारातून एका बाजूने आत जायचे आणि दुसर्या बाजूने बाहेर पडायचे तो रस्ता कैलास पर्वताकडे जातो म्हणून असे मानले जाते की ते यमाचे द्वार आहे, त्या दारातून आत गेले की कैलासात म्हणजेच स्वर्गात जाता येते. असा समज आहे. तेथूनच कैलास परीक्रमेची सुरुवात होते.
आमच्यापैकी चारजण तब्येतीच्या कारणामुळे परिक्रम करण्यास येऊ शकले नाहीत. दहा यात्रेकरू चालत निघाले. बाकीचे सारे घोड्यावरुन निघाले. तीन दिवसांसाठी घोडेवाला १२०० रु. घेतो. आणि त्याच्या बरोबर एक पोर्टर घ्यावा लागतो त्याला तीन हजार द्यावे लागतात. तो आपले सामान घेऊन आपल्या बरोबर असतो. चालत जाणारे लोक फक्त सामान घेण्यासाठी एक पोर्टर घेतात. अशा प्रकारे आम्ही परीक्रमेला सुरुवात केला. सर्व रस्ता डोंगरातून. एक डोंगर चढायचा आणि दुसर्या बाजूला उतरायचा. पुन्हा काही भाग दरीतून जाणारा त्यात वाहणारे झरे, पण बर्याच ठिकाणी थंडीमुळे झर्यातील पाण्यात बर्फ तयार झाला होता. त्यामुळे वाटेत कोठेही चिखल होऊन निसरडे झाले नव्हते. जर जुलै, ऑगस्टमध्ये यात्रा केली तर पाऊस असल्याने आपल्याला चालणे अवघड होऊन बसते. आणि घोड्याचे पाय घसरतात. फार त्रास होतो. मे, जूनमध्ये यात्रा केली तर बर्याच ठिकाणी बर्फ साठलेले असते. त्यामुळे चालण्याच्या रस्त्याचा अंदाज घेता येत नाही. हातातील काठी मारत मारत बर्फ किती आहे. याचा अंदाज घ्यावा लागतो आणि नंतरच पाय पुढं टाकावा लागतो. त्यामुळे यात्रेकरीता सप्टेंबर महिना सर्वात चांगला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये बर्फ पडायला सुरुवात होते आणि यात्रेचा रस्ता बंद होतो.
आमची वरात काही घोड्यावर, काही चालत अशी डेरापुककडे निघाली. आमचा रात्रीचा मुक्काम तेथेच होता. प्रवास छान वाटत होता. एक अनामिक ओढ होती. आयुष्यातील मोठे पुण्यकर्म आपल्या हातून घडत आहे. याचा आनंद होता. मी दोन किलोमीटर चालत गेलो. पण नंतर दम जास्त लागू लागला. थोडे चालून पुन्हा थोडे थांबा विश्रांती घेऊन पुन्हा चालण्यास सुरवात. पण नंतर मात्र चालणे शक्य होईना म्हणून मी घोड्यावर बसलो. घोडेवाला तिबेटचा होता. त्याला तोडके मोडके हिंदी येत होते. हे सारे घोडेवाले चार महिने हा व्यवसाय करतात व नंतर आपल्या गावी जातात. त्यांच्यात आपसात भांडणे होऊ नयेत म्हणून त्यांनी चिठ्ठी पध्दत ठेवली होती. सगळ्या घोडेवाल्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या करून एका टोपलीत ठेवल्या होत्या. ज्याला घोडा हवा आहे. त्यांनी त्या टोपलीतील एक चिठ्ठी उचलायची, ज्याचे नाव असेल त्याचा घोड करून त्याच्या बरोबर जायचे अशी पध्दत. पोर्टर निवडीतसुध्दा हीच पध्दत. स्त्रिया, मुलीसुध्दा पोर्टर म्हणून काम करतात. एक बाई, जिच्याजवळ दोन महिन्यांचे बाळ होते ती सुध्दा कमरेला झोळी बांधून त्यात बाळ ठेवून पैशासाठी तीन दिवस ४४ किमी. चालत जाणार होती. बाळंतपणानंतर बाईने तीन महिने विश्रांती घ्यायला हवी पण पोटासाठी त्या बाईला पाठीवर ओझे आणि पोटाशी बाळ घेऊन तीन दिवस चालणार होती. पोटाची खळगी भरण्यासाठी माणसाला काय करावे लागते. कैलासावर बसलेला शंकर आणि त्याच्या शेजारी असलेली पार्वती हे पहात नाही कां? माझ्या मनात शंका आली.
आमच्या बरोबर एक पन्नास वर्षाच्या महिला होत्या. त्यांच्या पतीचे अँजीओप्लास्टी झाली होती. त्यांना ही यात्रा करणे शक्य नाही पण या बाईंची मनोमन खूप इच्छा होती. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता. थोडे चालले की त्यांना दम लागायचा. मी त्यांना म्हणालो, ‘मॅडम, तुम्ही धोका पत्करु नका, परिक्रमा करू नका.’ त्या म्हणाल्या सर मी तेवढ्यासाठी तर येथे आले आहे. मी परीक्रमा करणारच हळू हळू करेन पण करणार. त्यांची जिद्द पाहून मला कौतुक वाटले.
यमद्वार ते डेरायुक अंतर १० कि.मी. घोड्यावरुन जाण्यास पाच तास लागले. चालत जाणार्यांना पण तेवढाच वेळ लागला. एक डोंगर चढून उतरला की मध्ये दरी त्यातून वाहणारे झरे. सप्टेंबर महिना असल्याने त्या झर्यातून वाहणारे पाणी कमी होते. डोंगरातून वाट काढीत आमची यात्रा निघाली होती. याक हा प्राणी या भागात भरपूर दिसतो. त्याचा पाठीचा भाग फारच रुंद असतो. त्यामुळे त्यांच्या पाठीवर भरपूर सामान बसू शकते. आमच्या खाण्यापिण्यासाठी आवश्यक असणारे सामान त्यांच्या पाठीवरुन चालले होते. आम्ही वाटेत एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो. तेथे चहा फराळाचे, थंड पेय व अन्य साहित्य असलेले तीन चार तंबूची दुकाने होती. तेथे आम्ही चहा घेतला. घोड्यांची पण विश्रांती झाली आणि नंतर आम्ही पुढे निघालो. पाच वाजता डेरायुक येथे पोहोचलो. तेथे मातीची घरे बांधलेली होती. एका खोलीत सहा ते आठ जण. सामान गरजेपुरतेच घेतले होते. वातावरण रम्य होते. समोरच कैलास पर्वत दिसत होता. यमद्वारापाशी कैलासाचा जो भाग दिसत होता त्याच्या विरुध्द बाजूस आम्ही आलो होतो. मध्ये एक मोठी दरी आणि नंतर कैलास पर्वत. त्या पर्वताच्या आजूबाजूला पर्वत होते. पण त्यावर बर्फाचा कणही नव्हता. पण कैलास पर्वत मात्र बर्फाने भरलेला होता. त्याच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत पायर्या असल्यासारखा दिसत होत्या. असे म्हणतात शंकर भगवान या पायर्यावरुन शिखरावर जातात आणि तेथे तप करतात. त्या पर्वतावर त्रिनेत्र म्हणजे शंकराचे तीन डोळे असल्याचे दिसत होते.
आम्ही सारेजण ते दृश्य पहात किती वेळ बसलो याचे भान राहिले नाही असे वाटत होते या परमात्म्यात आपण विलीन झालो आहोत. थंडी वाढत होती. अंधार पडत होता पण कैलास पर्वत बर्फामुळे आणि चांदण्याच्या प्रकाशामुळे दारचेतकडे येतात. ही परीक्रमा अर्धी परिक्रमा समजली जाते. असा समज आहे कि शंकराच्या पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा करावयाची नसते अर्धी प्रदक्षिणा करून परत फिरायचे असते. त्यामुळे यात्रेकरू तेवढीच परिक्रमा करून परत फिरतात. पण काही ठिकाणी असा उल्लेख आहे की जरी महादेवाच्या पिंडीला अर्धी प्रदक्षिणा घालतात तरी कैलास पर्वत त्याला अपवाद आहे. कैलास पर्वताला पूर्ण प्रदक्षिणा घालावयास हरकत नाही. किंबहुना तरच परिक्रमा पूर्ण केल्याचे पुण्य मिळते. काही यात्रेकरू परत दारचेतकडे निघाले व उरलेले सर्वजण परिक्रमा पूर्ण करण्यासाठी निघाले. काही अंतरानंतर ‘डोलमा पास’ नावाचे ठिकाण लागते. येथे एक मोठी गुहा आहे. या गुहेत पार्वतीने गणेशाला जन्म दिला असे सांगितले जाते. गणेश जन्माचे हे ठिकाण फार पवित्र मानले जाते. येथे दर्शन घेऊन जर आपण तसेच पुढे गेलो तर कैलास पर्वताच्या पायथ्याशी पोहोचतो. पण आजपर्यंत कोणीही त्या पर्वतावर चढू शकले नाही. काही जणांनी प्रयत्न केला पण ते पुढे कोठे गेले कळलेच नाही. ते परत काही आले नाहीत. त्यामुळे त्या पर्वतावर जायचा कोणी विचारही करत नाही.
डोंगरावरून उतरताना तरुण मंडळी वेगाने गेली परंतु चाळीशीच्या वरचे सर्वजण हळू हळू आले. काही ठिकाणी तर बसत यावे लागले कारण एवढा उतार होता जरा तोल गेला तर गडगडत खाली येणार. उतार वयाच्या लोकांना गुडघ्यावर ताण येतो आणि गुडघे दुखू लागतात. केवळ वातावरण चांगले असल्याने फारसा त्रास झाला नाही. जर पर्वतावर बर्फ साठले असेल किंवा पाऊस पडत असेल तर चालणे फारच कठीण होते. बारा तासाच्या खडतर प्रवासानंतर झुटूलयुक आले. येथील वातावरण व व्यवस्था अगदी डेरायुक सारखी होती. दिवसभराच्या प्रवासाचा शीण आतापर्यंतचा खडतर प्रवास आणि उद्या यात्रा पूर्ण होणार या कल्पनेने सगळेजण थोडेफार खाऊन झोपी गेले.
आजचा यात्रेचा शेवटचा टप्पा. फक्त दहा किमी. अंतर पार करून पुन्हा यमद्वारापाशी परत गेलो की यात्र सफल, संपूर्ण झाली. सार्या जणांना ती उत्सुकता. त्यामुळे सकाळ होताच सर्वजण परतीच्या प्रवासाला लागले. हर हर महादेव, कैलाशपती की जय अशा घोषणा देत परतीचा प्रवास सुरु झाला. हा प्रवास त्यामानाने सहज सुलभ होता. कधी एकदा यमद्वारापाशी जातो असे सगळ्यांना झाले होते. चार तासातच हा प्रवास पूर्ण झाला घोड्यावर बसलेल्यांना एवढा वेळ घोड्यावर बसून कंबर व मांड्या दुखु लागल्या होत्या. यमद्वाराजवळ येताच सर्वांनी निश्वास सोडला. यात्रा पूर्ण झाली स्वर्गाचे दर्शन करून परत पृथ्वीवर आल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्यावर दिसत होता. आता परतीचा प्रवास परत पाच दिवसांचा प्रवास परत तीच ठिकाणे, तेच वातावरण पण येताना कैलास दर्शनाचे ध्येय होते पण आता परत जाताना कधी एकदा काठमांडू येथे पोहोचतो असे सर्वांना झाले होते. हा १२०० किमी चा प्रवास दोन दिवसांत करून काठमांडूला जाऊ असे सगळ्यांना वाटत होते. पण कोणतीही गाडी एका दिवसात २५० ते ३०० किमी च्या वर धावू शकणार नाही. असा तेथे कायदा आहे. त्यामुळे कमीत कमी चार दिवस लागणारच हे निश्चित. त्याला काही इलाज नव्हता.
दारचेन पासून परतीच्या प्रवास सुरु झाला. पुन्हा मानसरोवर येथे मुक्काम होता. वाटेत जाताना राक्षसताल पहायला मिळाला. रावणाने तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न केले. शंकराने त्याला वर दिला आणि शंकराला प्रसन्न केले. शंकराने त्याला वर दिला आणि एक पिंड दिली. रावणाला त्याची प्रतिष्ठापना लंकेत करावयाची होती. रावण महादेव भक्त होता. तो पिंड घेऊन लंकेकडे निघाला. देवतांना मात्र हे आवडले नव्हते. एका दानवाने महादेवाची पिंड लंकेत स्थापन करावी हे पटत नव्हते. त्यांना काहीही करून ती पिंड लंकेत जाऊ द्यावयाची नव्हती. शंकराने रावणास एक अट घातली होती ही पिंड तो प्रवासात असताना जमिनीवर ठेवायची नाही. जर तू ती तशी ठेवलीस तर तिची प्रतिष्ठापना तेथेच होईल. ती पिंड तुला तेथून उचलता येणार नाही. रावण पिंड घेऊन निघाला परंतु वाटेत त्याला लघुशंका करावयाची तीव्र गरज भासली. पण पिंड खाली कशी ठेवणार. तेवढ्यात त्याला एक मुलगा दिसला. वास्तविक तो मुलगा म्हणजे देवांनी पाठविलेला गवळ्याच्या रुपातील गणपती होता. रावणाने पिंड त्यांच्या हातात ठेवली व लघुशंका करण्यास बसला. गणपती बराच वेळ वाट पाहून ती पिंड घेऊन पळून जाऊ लागला. रावणाने ज्या जागी लघुशंका केली तेथेच एक तलाव होता. त्याच्या लघुशंकेने तो तलाव अपवित्र झाला. त्यातील पाणी दुषित झाले. त्याला राक्षसताळ हे नाव पडले. त्या तलावाचे पाणी कोणीच पित नाही. पक्षीसुध्दा त्या पाण्याला तोंड लावत नाहीत. एक डोंगर ज्यावर आम्ही उभे होतो. एका बाजूला राक्षसताल आणि दुसर्या बाजूला थोड्या अंतरावर मानसरोवर. या मानसरोवरात राजहंस फिरत असतात. पक्षी पाणी पित असतात. आणि राक्षसतलावावर कोणीही नसते. हे दृश्य पाहिल्यावर परमेश्वराचे अस्तित्व आहे. यासाठी वेगळा पुरावा काय करायचाय. दोन्ही तलावांत पाणी आहे. रंगही निळाच दिसतो. पण एकात राजहंस असतात आणि दुसर्यात साधा पक्षीही नसतो असे का? माझ्या सारख्या शास्त्र पदवीधराला हे कोडे उलगडत नाही. त्यारात्री मान सरोवरात तारे निखळताना पाहीले. संथ जलाशयातून येणारा आवाज ऐकला. काहीतरी अद्भुत शक्तीची जाणीव आम्हाला झाली. आमचे सारे आयुष्य विसरून एका वेगळ्या विश्वात आम्ही रममाण झालो.
हे सारे पाहिल्यावर माझ्या मनात विचार आला. आपले या जीवनातील सर्व कार्य संपले आहे. सांसारिक जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सामाजिक ऋण अल्प प्रमाणात फेडले आहे. आता आपली ईहलोकाची यात्रा संपावी आणि आपण येथेच या वातावरणात विलीन व्हावे. आपल्याला मुक्ती मिळावी. मी हा विचार माझ्या सहप्रवाशाला बोलून दाखवला. तो दरवर्षी चार महिने येथे राहून यात्रेकरूंची कामे करतो आणि नंतर आपल्या गावी जातो. त्याने माझे बोलणे ऐकले. तो माझ्याशी हिंदीत बोलला, ‘साब यहॉं बहोतसे लोग इसी ख्वाईशसे आते है. लेकीन वक्तसे पहले किसीको बुलावा नही आता. मैने एक आदमीको देखा है. जो लगातार तीन साल इस यात्राको आता रहा, जो यही चाहता था की, उसकी मौत यही पर हो. दो साल कुछ नही हुआ. लेकीन तिसरे साल उसकी मौत यही पर हुई. शंकर भगवानने उसकी सुनली, लेकीन मौत वक्तपरही आई.’
त्याच्या या बोलण्याने मी गारच झालो. अशी इच्छा ठेवून येणारे भक्त आहेत. दुसर्या दिवशी पुढचा प्रवास सुरु झाला. सागा येथे मुक्कामाला आलो आणि आम्हाला एक बातमी समजली काठमांडू येथे ज्या विमानाने आम्ही एव्हरेस्ट दर्शन केले होते ते विमान बरोबर चार दिवसानंतर असेच प्रवासी घेऊन एव्हरेस्टवर फिरत असताना अचानक इंजिनमध्ये बिघाड झाला आणि ते विमान कोसळले. आतील सर्व प्रवासी ठार झाले. माझ्या मनात विचार आला त्या प्रवाशांनी विमानात असताना असा विचार तरी केला असेल का? की हा आपला शेवटचा प्रवास आहे. उलट ते किती आनंदात असतील जसे एव्हरेस्ट पाहताना आपण आनंदी होतो. दुसर्याच क्षणी त्यांची जीवनयात्रा संपली. ते अनंतात विलीन झाले. त्यांना इच्छा नसताना न मागता मृत्यू आला. मी काल मृत्यू मागत होतो पण मला आला नाही यालाच नियती म्हणतात.
सागाचा मुक्काम अविस्मरणीय ठरला. सागा येथे ऑक्सीजनचे प्रमाण फारच कमी आहे. जिन्याच्या चार पायर्या चढल्या तरी दम लागत होता. सगळेजण प्रवासाने थकले होते. त्या रात्री एका महिलेला श्वासाचा फारच त्रास होऊ लागला. डॉक्टर भेटू शकले नाहीत. आमच्या टूर लिडरने ऑक्सीजन सिलेंडरची व्यवस्था केली. त्यांना ऑक्सिजन लावला. डॉक्टर आले त्यांनी त्या बाईंची तपासणी केली. त्यांना फार अशक्तपणा आला आहे. सलाईन लावावे लागेल म्हणाले. त्या बाई व त्यांचे मिस्टर दोघेही घाबरले होते. रात्रीचे बारा वाजले होते. मी माझ्या खोलीत झोपलो होतो. पण झोप लागत नव्हती. माझ्या बरोबर एक जोडपे होते. त्यातील बाईना गेले चार दिवस शौचास झाली नव्हती. खाणे कमी आणि थंडीमुळे पोटात गारठा साठलेला. शौचास होणार कशी. त्यांना काळजी वाटत होती. प्रत्येकाला प्रकृतीचा काही ना काही त्रास होत होता. कैलास यात्रा खडतर का म्हणतात ते आता समजले होते.
रात्री एक वाजता माझे सहकारी मला म्हणाले, ‘सर, मला पण श्वास घ्यायला त्रास होत आहे. छातीवर दाब आल्यासारखा वाटतो आहे, थोडा घाम पण येत आहे.’ त्याच्या चेहर्यावर भिती दिसत होती. ‘अहो, इतका वेळ तुम्ही त्या बाईंना ऑक्सीजन व सलाईन लावताना पाहीले ना! त्यामुळे तुम्हाला टेन्शन आले आहे. म्हणून घाबरल्यासारखे होते.’ मी म्हणालो. ‘नाही हो सर, खरच मला त्रास होत आहे.’ मी पटकन उठून खाली गेलो. हॉटेल मॅनेजरला व आमच्या लीडरला उठवले. ते दुसरा ऑक्सीजन सिलेंडर घेऊन आले व त्यांनापण ऑक्सीजन लावला. मी तीन वाजेपर्यंत जागा होतो. त्या रात्री तीन प्रवाशांना ऑक्सीजन द्यावा लागला. ते पाहून अन्य प्रवाशीपण घाबरले. कधी एकदा काठमांडू येथे पोहचतो असे सगळ्यांना झाले. दुसर्या दिवशी आम्ही न्यालमकडे निघालो. हा प्रवास चांगला झाला. आता आम्ही खाली खाली येत होतो. त्यामुळे ऑक्सीजनचा त्रास जाणवत नव्हता. परत येताना स्नो फॉल सुरु झाला होता. रस्त्यात बर्याच ठिकाणी बर्फ पसरले होते. डोंगरावर पांढर्या शुभ्र बर्फाची चादर टाकल्यासारखे वाटत होते. सगळीकडे पांढरे पांढरे दिसत होते. आम्ही एका ठिकाणी थांबलो. तेथे चहाचा कार्यक्रम झाला आणि एकदम हिमवृष्टी सुरु झाली. वातावरण दाट धुक्याने भरून गेले. हिम अंगावर पडत होते. सर्व प्रवाशी एकदम आनंदले, बर्फात खेळायला मिळाले. बर्फाचे गोळे करून एकमेकांच्या अंगावर फेकू लागले. आजूबाजूला बर्फ, पायाखाली बर्फ, हातात बर्फ, डोक्यावर पडणारा बर्फ, सारे काही बर्फमय झाले होते. सर्वांनी बर्फाच्या राशीवर खेळण्याचा आनंद लुटला. धार्मिक वातावरण बदलून ऐहिक वातावरण तयार झाले. त्याग जाऊन भोग आला. निसर्गाचा आनंद लुटला. हिमवर्षाव होऊ लागला तसे सर्वजण आपापल्या वाहनाकडे पळाले. न्यालम येथे पोहोचलो. ती संध्याकाळ सर्वांनी आनंदात साजरी केली. आता सर्वांना बरे वाटत होते.
रात्री छान झोप आली. नाष्टा करून आम्ही न्यालम सोडले. आता वनराई सुरु झाली. घनदाट वृक्षांनी भरलेले पर्वत दिसू लागले. दरीतून वाहणारी नदी, उंच उंच वृक्ष, उडणारे पक्षी सारे पाहिल्यावर पृथ्वीवर परत आल्याचा आनंद झाला. नुकत्याच झालेल्या भुकंपामुळे बर्याच डोंगरांच्या कडा कोसळल्या होत्या. रस्त्यावर मातीचे ढिगारे साठले होते. त्यामुळे रस्ता अरुंद झाला होता. वाहनांची गर्दी जास्त होती. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. काही ठिकाणी रस्तेे दुभंगल्याचे दिसत होते. सगळा भूकंपाचा परिणाम. प्रवास फार धिम्या गतीने चालला होता. बर्याच गाड्या थांबून राहील्या होत्या. अचानक पाऊस सुरु झाला. त्यामुळे रहदारी अजून थांबून राहिली. कोदारी बॉर्डर दोन किलोमीटरवर होती. डोंगराळ रस्ता होता. घाटात बरीच वहाने थांबली होती. रस्ता बंद झाला होता. वाट पहात बसलो तर बराच वेळ लागणार म्हणून सर्वांनी तो घाटातील रस्ता चालत पार करायचे ठरवले. सर्व जण वाहनातून उतरले व चालत निघाले. घाटातील निसर्ग सौंदर्य पहात त्या नागमोडी रस्त्यावरुन आमची यात्रा निघाली. पाऊस पडत असल्याने रस्त्यावरून पाणी वहात होते. निसरडे झाले होते. त्यामुळे चालणे अवघड झाले होते. तरी पण आम्ही मजेत निघालो. चाळीस मिनिटे चालल्यावर कोदारी बॉर्डर आली. तेथे आमचे चेकींग झाले आणि पुन्हा फे्रंडशीप ब्रीज पार करून आम्ही चीनच्या हद्दीतून नेपाळमध्ये आलो. तेथे आमची बस उभी होती. जेवण करून आम्ही काठमांडूकडे निघालो. सत्तर कि.मी. चा प्रवास पण रस्ता एकदम खराब झालेला. त्यामुळे काठमांडूस पोहोचण्यास चार तास लागले. संध्याकाळी सर्वांचे संमेलन झाले. बर्याच जणांनी आपली मनोगते व्यक्त केली. एक खडतर यात्रा सुखरूपपणे पार पडली याचा आनंद सार्यांना झाला. दुसर्या दिवशी काठमांडू सोडले मुंबईला आलो आणि यात्रा सफल झाली.
(तरुण भारत)

हिमालयाच्या पायथ्याशी उभे असलेले प्रा. ए.डी. जोशी |