This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
शैक्षणिक धोरणांनींच (बी)घडवला देश
•अमर पुराणिक•
शिक्षणाने शहाणपण येते हे त्रिकालाबाधित सत्य लक्षात घेऊन स्वातंत्र्योत्तर काळात अनेक समाजसुधारकांनी शिक्षणसंस्थांची स्थापना केली. मानवी जीवनातील अन्न, वस्त्र, निवारा आदी मूलभूत गरजांप्रमाणेच संस्कार व शिक्षणालाही अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहेत. १०० वर्षापूर्वी शालेय  शिक्षणाचा प्रसार कमी असला तरी, मुल्यशिक्षण, संस्कार परंपरा अतिशय समृद्ध होती. दुष्काळ, रोगराई ही संकटे त्याकाळी येत असली तरी मानवी मुल्ये जपणारी संस्कृती समाज जीवन स्थिर राखण्यास मदत करीत असे.
पण आज या शिक्षणाची पुरती वाट लागली आहे त्यामुळे शैक्षणिकतत्वांचा आणि धोरणांचा पुर्नविचार करुन पुन्हा एकदा नव्याने शिक्षणाची घडी बसवण्याची वेळ आली आहे. आज शिक्षणसंस्थांचे जणू पीकच पीक उगवले आहे. शिक्षणसंस्थांच्या अशा कबाडखान्यांमधुन बाहेर पडलेल्या पदवीधर बेरोजगारांना काम देण्यात सरकार जसे अपयशी ठरले आहे तसेच तांत्रिक व वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या इंजिनिअर व डॉक्टरांचीही दयनिय अवस्था झाली आहे. काही विचारवंत  म्हणतात की, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ व सामाजिक प्रांताचे भान असणार्‍या व्यक्तींनी महाराष्ट्राचे शैक्षणिक धोरण ठरवले आहे. हे धोरण पुरोगामी व रोजगाराभिमुख आहे. जर असे असेल तर मग आपल्या शैक्षणिक धोरणांची अशी दुर्दशा का झाली? आजची शिक्षणप्रणाली तरुणाईला योग्य वळण देण्याऐवजी शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांचे फार मोठे आर्थिक शोषण करीत आहे. शिक्षणसाठी विविध जाती-प्रजातीना आरक्षण असले तरी शिक्षणक्षेत्र खाजगी(राजकीय) सम्राटांच्या हाती गेल्याने शिक्षणाचा खर्च व देणग्या(डोनेशन) सामान्य माणसांच्या आवाक्या बाहेर गेल्या आहेत. लाखो तरुण शिक्षण सोडून घरी बसले आहेत किंवा कुठे तरी खाजगी ठिकाणी नोकर्‍या करीत आहेत. मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीच्या शिक्षणातून बोकाळलेली तथाकथित उच्च अभिरुची व (अ)सुसंस्कृतपणामुळे सुजाण समाज घडण्याऐवजी सामाजिक विषमता, गरीबी, श्रीमंतीची दरी वाढून आजच्या या गहन सामाजिक समस्या उभ्या ठाकल्या आहेत.
ब्रिटिश राजवटीमध्ये प्रशासन यंत्रणा चालविण्यासाठी कारकुनी शिक्षणपध्दतीचा(मेकॉलेची शिक्षण पद्धती) विस्तार करण्यात आला. तेव्हापासून रोजगारभिमुख शिक्षण बंद झाले. शिक्षणाचे मेकॉलेकरण झाल्याने श्रमप्रतिष्ठा नष्ट होऊन पदव्यांचा अहंकार निर्माण झाला. स्वांतत्रपुर्व काळात ब्रिटीश, मोगल, फ्रेंच आदींनी भारतीय नागरिकांच्या आडाणीपणाचा फायदा घेत या देशावर शेकडो वर्षे राज्य केले. या स्थितीचा विचार करून काही समाजसुधारकांनी अडाणी जनतेला साक्षर करण्यासाठी शाळा सुरू केल्या. धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतीबा फुले, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे या थोर समाजसुधारकांनी सर्वांना शिक्षणाची दारे खुली करून सामन्य जनतेला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. या विभुतींनी शिक्षणाची व्यापकता इतकी मोठा ठेवली की, या शिक्षणाद्वारे नागरिकांची मानसिक व बौद्धीक क्षमता सामाजिक, राष्ट्रीय वैचारिकतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या समाजसुधारकांनी केला. त्यातूनच ब्रिटिशांची जुलूमी सत्ता हटविण्याची क्रांती घडली. १९५० च्या काळात शिक्षण संस्था चालविणे हे अवघड, कष्टाचे, सामाजिक कार्य समजले जायचे, या विभूती पदरमोड करुन व अनंत अडचणींना तोंड देऊन शाळा चालविल्या त्यांच्या शाळांना कालांतराने ब्रिटिशांनाही मान्यता देणे भाग पडले.
स्वातंत्र्यानंतर सरकारने जनतेला शिक्षणाचा हक्क बहाल(?) केला. एवढेच काय प्राथमिक सक्तीचे केले आणि शिक्षण प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणात सुरु केला. १९६०च्या दरम्यान खाजगी शिक्षण संस्थाही सुरु झाल्या. विशेषतः माध्यमिक शिक्षण व्यवस्थेची व उच्च शिक्षण व्यवस्थेत या संस्थानी प्रगती साधली. शैक्षणिक गेल्या १५-२० वर्षात शिक्षण संस्थांची संस्थाने झाली आणि वाढत्या लोकसंख्येनुसार उपलब्ध शिक्षण व्यवस्था विस्तारणे अपरीहार्य ठरले. आणि येथेच शिक्षणाचे बाजारीकरण सुरु झाले. अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेच्या शिक्षणाचे महत्व आहेच पण, ९० टक्के विद्यार्थी कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेच्या शिक्षणातून शिकत असताना कोणतेही विशेष वैशिष्ठ्‌य किंवा बौद्धीक कौशल्य नसलेल्या या कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेच्या शिक्षणामुळे श्रमप्रतिष्ठा कमी होऊन पदवीचा अहंकार निर्माण झाला व पर्यायाने सुशिक्षीत बेरोजगारांच्या संख्येत बेसुमार वाढ होऊन बेकारीचा प्रश्‍न निर्माण झाला. दरवर्षी कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेतून पदवी घेऊन लाखो विद्यार्थी बाहेर पडत असताना त्यांना उच्च पदस्थ आणि मोठ्या नोकरीची व पगाराची अपेक्षा निर्माण झाल्याने पदवीधारकांना शेती किंवा व्यवसायत करण्याची लाज वाटू लागली. श्रमाच्या कामाऐवजी कार्पोरेट आणि सुखवस्तू नोकर्‍यांची अपेक्षा वाढली. वस्तूस्थीती मात्र एकूण संस्थेच्या ५ टक्के पदवीधरांनाही सरकारी नोकर्‍या मिळणे शक्य झालेले नाही. नोकरी ही सरकारी, मोठ्या पगाराची व सुखवस्तू असली पाहिजे या अवास्तव अपेक्षेने लाखो व्यक्ती नोकरीपासून, श्रमापासून व उत्पन्नापासून उपेक्षित राहील्या व त्यामुळे फार मोठे सामाजिक नुकसान झाले.
सन १९९१ नंतर जागतिकीकरणामुळे खुले अर्थधोरण स्विकारल्यानंतर कुटुंबसंस्था, शिक्षणसंस्थामधील सात्वीक नवी पिढी घडविण्यासाठी भावना नष्ट होऊन नफ्या तोट्याचा बाजार सुरु झाला. चंगळवादालाच सुख समजून त्यासाठी अधिकाधिक अर्थार्जन करण्यासाठी सदैव पळणार्‍या पती-पत्नी आपल्या बालकांना पाळणा घरात ठेवतात तर वडीलधार्‍यांना वृद्धाश्रमात पाठविताना शिक्षणाचे सामाजिक अधःपतन झाल्याचेच दिसते. सरकारची शिक्षणाची जबाबदारी व त्यासाठीची प्रचंड खर्च टाळण्यासाठी खाजगी शिक्षणसंस्थांना धडाधड मान्यता देऊन सरकारने आणि संबंधीत अधिकारी व मंत्र्यांनी भ्रष्ट मार्गाने प्रचंड पैसा जमा केला, अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवी व पदविकांच्या प्रवेशांच्या देणग्यांचे आकडे ऐकल्यानंतर खरोखर अतिशय बुद्धीवान परंतु सामान्य कुटुंबातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे बंद झालेली दिसतील.
प्रवेशासाठी देणगी, वर्षाचा खर्च लाखात, परीक्षा फी अशी खर्चाची मलिका पाहील तर सामान्य पालकांनी मुलांना कसे शिक्षण द्यावे या प्रश्‍नांचे उत्तर सरकारकडे नाही. राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री किंवा शिक्षणतज्ज्ञ आज डोळे बंद करुन शिक्षणाची होत असलेली वताहत पहात आहेत, फक्त पहातच नाहीत तर त्यात तेल ओतत आहेत. काहीही असले तरी या चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून तमाम तरुणवर्ग उध्वस्त होताना दिसत आहे.
गुण वाढवून दिल्याने निकालाची टक्केवारी वाढली तरी अशा गुणवत्तेला अर्थ काय? गुणवत्तेशिवाय मिळालेले गुण म्हणजे विद्यार्थ्यांची व पालकांची घोर फसवणूक असून त्यास सरकारचे चुकीचे शैक्षणिक धोरणच कारणीभूत आहे. भरकटलेली तरुणाई सामाजिक स्वास्थ कधीही टिकू देणार नाही. खून, दरोडे, व्यसनाधिनता, चोरी, दंगल आणि निवडणुका यामध्ये तरुणाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु झाला तर दोष कुणाचा. राष्ट्राची संपत्ती, सामाजिक आधार असलेली तरुणाई उध्वस्त होत असतानाही आत्मसंतुष्ट व संकुचीत विचारांचा समाज ग्लोबलायझेशनच्या भपक्यातून पारतंत्र्यात जात आहे.
सामाजिक व शैक्षणिक अधःपतन सहन करणारा समाज हे षंढत्त्वाचे लक्षण आहे. शिक्षणाचा बाजार मांडणारे शिक्षणसम्राटच सत्तेत असल्याने हजारो कोटी रुपये मिळवून हा जनतेचा पैस सत्तासंपादनासाठी वापरणारे सत्ताधीश झाल्याचे दिसत आहे. शिक्षण प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचे, पालकांचे आर्थिक शोषण हे  कॉंग्रेस व संपुआ सरकारलात व शिक्षणसम्राटांना मान्य असल्याने त्यांना रोखणारी मनगटे दुबळी झाली, तर मते लाचार ठरली आहेत. शिक्षणातील व सरकारमधील बेबंदशाही संपविण्यासाठी बळ देण्याचे भान दुबळ्या मनगटांना व लाचार मनांना न राहील्याने मुजोर सत्ताधारी कोट्यवधींचे भ्रष्टाचार सहज पचवतात.
शिक्षणापासून वंचीत राहणार्‍या तरुणाईने, भ्रष्टाचाराने पोळलेल्या जनतेने सारासार विचार करुन या भ्रष्ट सरकारला अद्दल घडवली तरच तरुणाईचे शोषण कमी होईल. तत्ववादी जनता, संघटीत तरुणाई व भ्रष्टाचारामुक्त सरकार निर्माण झाले, तरच राष्ट्र बलवान बनेल. महासत्ता बनेल.  आजच्याक्षणी ८० टक्के पदवीधर किंवा सुशिक्षित तरुण-तरुणी सामाजिक, कौटुंबिक भान विसरले असून फक्त भरपूर पैसे व चंगळवादी जीवन हेच ध्येय स्विकारुन धडपडताना पाहीले की मातृप्रेम, राष्ट्रप्रेम, भूतदया, राष्ट्रीय प्रश्‍नांसाठी संघटन, संघर्ष या तरुणांना कोण शिकविणार? आजच्या शिक्षणपद्धतीत तत्व व नितिमत्तेला कोठे ही स्थान दिसत नाही. त्यामुळे तरुणाईकडे अशा आशेने पहावे की नाही असा प्रश्‍न अनेक तत्वज्ञानी व विचारवंत ज्येष्ठंाना पडतो.
 
फक्त कायदे करुन काय होणार?
 •अमर पुराणिक•
 शिक्षण हे आपल्या देशातील बालकांचा अधिकार आहे. नुकत्याच झालेल्या कायद्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी मोठे बळ प्राप्त होईल. आता आपल्या देशात सहा ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे झाले आहे. ही मुले जेव्हा आता अधिकाराने आणि कायद्याने आपल्या शिक्षणाचा हक्क मागु शकतील. सरकारला या बालकांच्या शिक्षणाची योग्य सोय करावीच लागेल. येत्या पाच वर्षात दर वर्षी  ३४ हजार कोटी रूपये खर्च हातील. या बालकांची शिक्षण सुविधा पुरवण्यासाठी १२ लाख शिक्षकांची गरज आहे.या कायदा लागु केल्याने  भारत देश त्या १३५ देशांच्या रांगे उभा झाला आहे, ज्या देशात शिक्षणाचा अधिकार हा कायदा आहे. काही देशात ६ वर्षे मोफत व अनिवार्य शिक्षणाचे प्रावधान आहे तर काही देशात १० वर्षांच्या  मोफत व अनिवार्य शिक्षणाचा नियम आहे.  घरालगतच्या शाळेत प्रवेश मिळण्याचा हक्कही या निर्णयामुळे मुलांना मिळाला आहे. पण घरालगतच्या शाळांनी प्रवेश दिला नाही तर..? आणि महानगरे वा मोठ्या गावांचे सोडा, खेड्यापाड्यांत आणि दुर्गम भागांतल्या मुलांच्या शिक्षणाचे काय? सरकारच्या एका चांगल्या निर्णयाची अमलबजावणी व्हावी म्हणून पुढे काय पाऊले उचलायला हवीत? की आतापर्यंत झालेल्या कायद्यांचे जे झाले तेच याही कायद्याचे होणार? आदी प्रश्‍नाची उत्तरे सध्यातरी अनुत्तरीतच आहे. कारण भारतात कायदा नंतर होतो त्याआधी त्याच्या पळवाटा काढल्या जातात. त्यामुळे फक्त सत्ताधारी नेत्यांना चरायला कुरणे निर्माण करणे हेच साध्य नेहमीप्रमाणे कॉंग्रेस सरकार साधणार आहे.
हे सर्व ऐकायला खुप चांगले वाटते, आपल्याही देशात साक्षरतेचे प्रमाण वाढेल, सर्वच मुलांच्या नशिबी शाळेत जाणे असेल आणि याचा विचार केल्यावर आपल्याल गर्व वाटेल. पण जर खरेच असे झाले तर भारत देश लवकरच विकसित देशांच्या रांगेत उभा राहील आणि जागतिक महासत्ताही होईल.
गरीबी कमी होईल, गरीब-श्रीमंतातील दरी कमी होईल, उद्योग क्षेत्राला सक्षम लोकांची कमतरता रहाणार नाही, आपली अर्थव्यवस्थाही प्रचंड मोठया वेगाने विकासाचा दर गाठेल. अशी आश्‍वासने ऐकून यूपीए सरकार ची घोडदौड कौतूकास्पद वाटेल. आणि अशा प्रगतीच्या बातम्या खोट्‌या आकडेवार्‍यांच्या कंड्‌या आपल्या भाटांद्वारे व प्रसारमाध्यमाद्वारे पिकवून सुशिक्षित व अशिक्षित जनतेला गोल करण्याची संपुआची शैली खरीच कौतुकास्पद आहे.
पण आता सर्वात मोठा प्रश्‍न हा आहे की, याची अंमलबजावणी होणार कशी? कायदे या ही अधी खूप झाले आहेत. २४ वर्षांपुर्वी १९८६ मध्ये हा कायदा झाला होता की,१४ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले धोकादायक ठिकाणी काम करणार नाहीत.  बाल कामगारांना न्याय देण्यासाठी हा कायदा झाला होता पण, आपण सर्वच हे जाणतो की खाणीत, फटाक्यांच्या कारखान्यात आजुनही लाखो बालके काम करत आहेत. या बालकांच्या शिक्षणाची पालनपोषणाची जबाबदारी सरकारने या कायद्याद्वारे  साधली काय? हा कायदा झाल्यानंतर वीस वर्षांनी म्हणजे २००६ मध्ये असाच आणखीन एक कायदा आला. या वेळी असे म्हटले होते की हॉटेल किंवा घरात १४ वर्षा खालील मुलांना कामाला घेणे कायद्याने गुन्हा आहे. कायदा आपल्या जागी योग्य आणि श्रेष्ठ आहेच पण या कायद्यांची पायमल्ली करणार्‍यांवर कोणती कारवाई झाली याचे कोडे सर्वच भारतीय नागरिकांना पडले आहे.  काही संस्थांच्या अहवालप्रमाणे१४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कष्टकरी मुलांची संख्या जवळजवळ  १ कोटी दहा लाख इतकी आहे. म्हणजे काम करणार्‍या प्रत्येक १०० कामगारापैकी  ४ कामगार १४ वर्षाखालील आहेत. भारतातील ही बालके आपल्या हीताच्या या शिक्षणाच्या कायद्यांबद्दल अनभिज्ञ आहेत. प्रत्येक कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करणे, त्याचप्रमाणे कायद्यांची होणारी पायमल्ली थांबवून अशांवर ठोस कारवाई करण्याचा कोणताच पर्याय आजपर्यत शोधला गेलेला नाही. मग सर्व बालकांना शिक्षण देण्याच्या कायद्याची अंमलबजावणी होईल याची कोणतीही खात्री देता येत नाही. मुळात देशातील सर्व ठिकाणी चांगल्या शाळा असाव्यात, उच्चशिक्षीत व कार्यक्षम शिक्षक असावेत, येथे शाळा नाहीत तेथ�4�ी देता येत नाही. मुळात देशातील सर्व ठिकाण�े जावे की अशा बालकांना प्रवेश मिळावा व  शिक्षणाची सोय व्हावी. या बदल्यात खाजगी शिक्षण संस्थांना शासकिय मदत दिली पाहिजे. देशातील जवळजवळ २० टक्के शाळा या खाजगी संस्थांद्वारे चालवल्या जातात. पण एवढ्‌याने काय होणार? शासकिय शाळा तर तर जवळजवळ बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, शाळेत प्रवेश मिळवून दिले की भागत नाही. आकड़वारी सांगते की पहीलीच्या वर्गात प्रवेश घेणार्‍या प्रत्येक १०० मुलांपैकी केवळ ३२ मुले पाचवीच्या इयत्तेत पोहोचण्या आधीच शाळा सोडतात. आणि फक्त ५० विद्यार्थीच आठवी पर्यंतच शिक्षण पुर्ण करु शकतात. २२ कोटी शाळाकरी मुलांपैकी फक्त १ कोटी ८० लाख विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचतात. आता हा कायदा संमत झाल्यानंतर म्हणजेच शिक्षणाचा अधिकार मिळाल्यावर ही मुले शाळेत टिकतील? देशाच्या साठ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर अजुनही सरकार मुलांच्या शालेय शिक्षणाच्या  प्राथमिक गरजा पुरवु शकलेले नाही, यापेक्षा मोठे दुदैव ते काय? या मुलांना चांगले शिक्षण देण्याची मनिषा तेव्हाच पुर्ण होवू शकते जेव्हा अशा बालकांच्या दोन वेळच्या अन्नाची आणि किमान सुरक्षिततेची गरज सरकार भागवू शकेल. जेव्हा हे घडेल तेथून पुढे ही मुळे आपले शिक्षण पुर्ण करु शकतील.
या विद्यार्थ्यांना शिक्षण देताना त्याला उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणेही आवश्यक आहे. या पदवी पर्यंतच्या शिक्षणाच्या सोयीवर नोकर्‍यांची शाश्‍वती काय? हा नवा प्रश्‍न उभा रहातो. शिक्षण पूर्ण केल्यांनतर सर्वात मोठा अडथळा येतो तो दोनवेळच्या अन्नासाठी रोजगार मिळवण्याचा. आजच्या काळातरी फक्त पदवीच्या आधारावर नोकर्‍या मिळण्याचे दिवस तर नाहीत. पदवी बरोबर विशेष प्राविण्याचे कोर्सेस किंवा विशेष तांत्रिक शिक्षणाशिवाय या पदवीला कोणीही विचारत नाही. ज्या देशात ३५ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत अशा देशात लाखों बालकांना शाळेत जाण्यापुर्वी दररोज आपल्या पोटपुजेची सामुग्री जमवण्याची मोठी चिंता असते, त्याचे सर्व लक्ष तेथेच केंद्रीत झालेले असते मग शाळेत जाऊन बाराखडी कशी शिकणार. पोटाची खळगी रिकामी ठेवून कोणताही उच्चशिक्षीतदेखील काम करु शकत नाही, मग या छोट्‌या बालकांची काय कथा. अशा मुलांना शाळेत जाण्यात आनंद वाटतच नाही आणि शिक्षण तर राक्षसच वाटतो. अशा स्थितीत  विद्यार्थ्यांनी शाळेत टिकण्यासाठी वेगळे वेगळे प्रयोग करावे लागतील. या बालकांना आणि पालकांना योग्य समुपदेशन देखिल करावे लागेल. पण हे सर्व पोटाची खळगी भरल्यानंतर. देशातील चांगल्या मानल्या गेलेेल्या २० टक्के खाजगी शाळांमध्ये  देशातील ७० - ८० टक्के मुलांना प्रवेश मिळणे अशक्य आहे. सरकारला त्यांच्या शासकिय शाळा नीट चालवता आल्या नाहीत आणि आता या खाजगी शाळावर डोळा ठेवून आहेत. सरकार खाजगी शाळामध्ये आशा विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाच्या गप्पा मारत आहे. पण येवढी मुले खाजगी शाळा कशी सामावून घेणार हा प्रश्‍न निर्माण होतो.
आता कायदा केल्याने सर्वांना शिक्षण मिळाणार याचा प्रचार मात्र सरकार जोरादर पणे करत आहे. शिक्षणावर काही कोटी खर्च करतील आणि हजारो कोटी रुपये मात्रा याचा प्रचार करण्यावर उडवतील. केवळ अशा प्रचार बाजीने कहीही होत नसते त्यासाठी हवी दूरदृष्टी. कॉंग्रेस सरकारकडे कायमच अशा दूरदृष्टी आभाव आहे. कायदे करणे सोपे असते पण कायद्यांची अंमलबजावणी करणे अवघड असते.  सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न उभा रहातो की समाजाला सुशिक्षीत कराल पण सुसंस्कृत कसे करणार, त्यांना मुल्यशिक्षण कसे देणार याचे उत्तर, दृष्टी, आणि इच्छाशक्ती या तीन्हीही गोष्टींचा अभाव गेल्या साठ वर्षांपासून कॉंग्रेस सरकारकडे आहे. या सर्व न्यूनावर फक्त भारतीय प्राचीन संस्कृती आणि शास्त्रच मात करु शकते. तत्वज्ञान, निष्ठ, सांस्कृतिक मुल्ये याशिवाय शिक्षण क्षेत्राचे काहीही चांगले होणे शक्य नाही.
२४ नोव्हेंबर : गुरु तेग बहादुर सिंह बलिदान दिन
•अमर पुराणिक•
शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादुर सिंह यांचा आज बलिदान दिन. हिंदू धर्म, मानवी मूल्ये व तत्त्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती गुरु तेगबहादूर सिंह यांनी दिली.
धरम हेत साका जिनि कीआ
सीस दीआ पर सिरड न दीआ|
धर्मरक्षणासाठी, शीलासाठी आपले शिर तोडून देऊ, पण धर्म भ्रष्ट होऊ देणार नाही, असाच काहीसा या काव्याचा अर्थ आहे. गुरु तेगबहादुर यांचे बलिदान केवळ धर्म पालनासाठीच नसून समस्त मानवाच्या सांस्कृतिक तत्त्वांसाठी होते. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान हे साहसिक आणि संपूर्ण मानवजातीला अंतर्मुख करणारे होते.
गुरु तेग बहादूर सिंहजी धार्मिक प्रचारासाठी आपल्या अनुयायांसह विविध ठिकाणी यात्रा करत असत. त्या काळात काश्मिरी पंडितांना औरंगजेबाच्या जुलमी सत्तेने हैराण करुन सोडले होते. छळ-कपटाची परिसीमा गाठली होती. ते काश्मिरी पंडित गुरु तेगबहादूर यांना शरण गेले. गुरु तेगबहादुरांनी औरंगजेबाला निरोप पाठवून ‘आधी तेगबहादूरांना मुसलमान कर, मग सगळे काश्मिरी पंडित मुसलमान होतील’, असे कळविले. यानंतर औरंगजेबाच्या फौजेने गुरु तेगबहादूरांना अटक केली आणि दगलबाजीने त्यांचा दिल्लीतील चांदणी चौकात जाहीर शिरच्छेद करविला. ह्या घटनेला उद्देशून गुरु तेगबहादुरांचे चिरंजीव आणि शीख धर्माचे संवर्धक गुरु गोविंदसिंह यांनी ‘सीस दिया पर सिर्र न दिया’ असे उद्गार काढले. धर्मासाठी या थोर वीरपुरुषाने बलिदान केले आणि शीख संप्रदायात नवचैतन्य निर्माण झाले.
आततायी मोघल शासकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याचे दमन करु पाहणार्‍या नितीविरुद्ध गुरु तेगबहादुरजी यांचे बलिदान ही एक अभूतपूर्व ऐतिहासिक घटना होती. तेग बहादुरांच्या निर्भय आचरण, धार्मिक निष्ठा आणि नैतिक उदारतेचे हे उच्चतम उदाहरण आहे. हिंदू धर्म व वैचारिक स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे ते एक क्रांतिकारी युगपुरुष होते. अशा हुतात्मा गुरुस विनम्र अभिवादन!
शीतयुद्धाचा नवा पवित्रा : सायबरकावा
•अमर पुराणिक•
जरी भारताचा सूचना, प्रसारण, औद्योगिक आणि अंतरिक्ष विज्ञानाच्या क्षेत्रांत जगभर बर्‍यापैकी दबदबा असला, तरीही आपला देश माहिती-तंत्रज्ञान व इंटरनेटच्या क्षेत्रात चीनच्या क्षमतेपेक्षा खूपच मागे आहे. याहीपेक्षा मोठी समस्या ही आहे की, भारत वेगाने वाढणार्‍या हॅकिंगच्या धोक्यामुळे सायबर प्रणालीच्या सुरक्षेच्या दृष्टीनेे प्रभावी उपाययोजना शोधू शकलेला नाही. प्रतिस्पर्धी संस्थांची गुप्त माहिती आणि भारत सरकार व भारतीय संस्थांची गोपनीय माहिती पळवण्यासाठी आणि इंटरनेटच्या हॅकिंगद्वारे चकवण्यासाठी सायबर हल्ल्यांना सुरुवात झाली आहे. वारंवार सायबर हल्ले करून चीन भारताला भयक्रांत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या जोडीनेच हिमालयीन सीमाक्षेत्रात सैन्यदबावही वाढवीत आहे. संघर्षाच्या स्थितीत सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून चीन भारतीय तंत्रज्ञानाला हळूहळू पंगू बनवण्याच्या प्रयत्नात आहे. भारत सरकार, संरक्षण आणि व्यावसायिक लक्ष्यांच्या विरुद्ध सायबर घुसखोरी सन२००७ पासून सतत वाढतच आहे. संवेदनशील कंप्युटर नेटवर्कचे संरक्षण करणे आता राष्ट्रीय सुरक्षिततेची प्राथमिकता बनली असून, सायबर युद्धापासून संरक्षण मिळवण्यासाठी संवेदनशील कंप्युटर नेटवर्कला विशेष संरक्षणाचा दर्जा देणे ही आता काळाची गरज बनली आहे.
भारताला सायबर धोका दोन स्तरांवर आहे. पहिला आहे राष्ट्रीयस्तर. यापूर्वीही नॅशनल इंफार्मेटिक्स सेंटर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व परराष्ट्र मंत्रालयाच्याकार्यालयांवर असा सायबर हल्ला झालेला आहे. भारत सरकारची प्रमुख मंत्रालये आणि सरकारी कार्यालयांच्या संगणकांवर घुसखोरी करून चीनने गोपनीय माहिती व दस्तऐवज मिळवण्याची क्षमता सिद्ध करून दाखवलेली आहे. सायबर हल्ल्यांचे दुसरे लक्ष्य आहे काही विशिष्ट व्यक्ती आणि संस्था. भारतात या प्रकारात मोडणार्‍यांमध्ये अनेक संस्था या हॅकर्सचे लक्ष्य आहेत. तिबेटच्या निर्वासित सरकारबरोबरच काही भारतीय लेखक आणि चीनचे काही टीकाकारदेखील या लक्ष्यात मोडतात. सामान्यत: सायबर घुसखोरी ही ई-मेल अकाऊंट हॅक करून केली जाते. याशिवाय ट्रोजन हॉर्स नामक व्हायरस पाठवून आपल्या कंप्युटरमधील काही फाईल उडविल्या जातात किंवा या फाईलमधील मजकूर सायबर हल्लेखोर स्वत:कडे स्थलांतरित करून घेतो. या हॅकिंंगच्या प्रकारात जर ‘सायबर गनिमीकाव्या’चा वापर केला असेल तर हा हल्ला कोणी केला व कोणत्या देशातून झाला, याचा पत्ता लावणे केवळ अशक्य आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून असे हल्ले दुसर्‍या देशांच्या नावाने किंवा दुसर्‍या देशाच्या माध्यमातून करता येऊ शकतात. जसे चीनने आफ्रिकेत ‘मेड इन इंडिया’ची लेबल वापरून औषधे विकली आहेत. त्याचप्रकारे सायबर घुसखोरांनी रशिया, इराण, क्युबा आणि अन्य देशांच्या माध्यमातूनही अशी कृत्ये केलेली आहेत.
सायबर हल्लेखोर कितीही चाणाक्ष असले तरीही संशोधकांसाठी कोणता न कोणता पुरावा किंवा संकेत सोडतच असतात, ज्याद्वारे अवघड असले तरीही कोणी हल्ला केला, याचा पत्ता लागू शकतो. याच द्वारे संशोधकांनी हा हल्ला चीनने केल्याचे शोधून काढले आहे. याच तत्वाच्या जोरावर शोधलेले अनुमान असे आहे की, भारताच्या  सरकारी कार्यालयांवर झालेले अधिकांश सायबर हल्ले चीनने केलेले आहेत. गूगलसुद्धा याच निष्कर्षावर पोहोचली आहे. हे सायबर हल्ले चीन कशाप्रकारे अन्य देशाचा घात करीत आहे, याचा हा पुरावाच आहे. सायबर हल्ल्यांशिवाय चीनने आपले चलन युआनचे मूल्य जबरदस्तीने किंवा अनैसर्गिकरीत्या पाडून आणि स्वस्त (पण हीनदर्जाच्या) वस्तू जगातील तमाम देशात विक्री करूनही मोठे नुकसान केले आहे. अशा हरकतीमुळे चीनच्या शांतीपूर्ण उदयाच्या दाव्यातील तथ्ये उघडी पडत आहेत. जर चीन अतिशय कौशल्याने अमेरिकेच्या कमीतकमी  ३४ कंपन्यांवर सायबर हल्ले करून महत्त्वपूर्ण व गोपनीय बौद्धिक संपदा चोरण्याचा प्रयत्न करू शकत असेल, तर निश्‍चितपणे त्यांच्यात भारतातील अधिकांश संगणकांमध्येे सुरुंग लावण्याची क्षमता आहे आणि भारतात संगणक संरक्षण आणि निगराणीचे उपाय अतिशय साधारण व प्राथमिक स्तरावर आहेत. आज गूगल ओरडत आहे की, चीन त्यांच्यावर सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण हाच चीन सूचना व प्रसारणाच्या मुक्त प्रवाहाला घाबरतो. चीनच्या इंटरनेटवर ऑनलाईन सेन्सॉरशिप लादण्यात याच गूगलने योगदान दिलेले आहे. गूगलने चीनसाठी एक असे सर्च इंजिन बनवले आहे, जे अशा वेबसाईटना प्रतिबंधित करते. आता खुद्द गूगलच चीनच्या वाढत्या सायबर क्षमतेची शिकार झाली आहे. स्वत:ला झळ बसल्यावरच गूगलने चीनविरुद्ध तोंड उघडले आहे.
सुपरसिक्युअर्ड डिजिटल कोड तोडणार्‍या हॅकर्सना कायदेही कसे तोडायचे, ते चांगले ठावूक आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे जगभरातल्या कित्येक वेबसाईट्‌स, माहिती चीनमधून हॅक होत आहे. या हॅकिंगला कंटाळून गूगलने चीनमधील आपला बाडबिस्तारा गुंडाळण्याचा इशारा दिल्याचे प्रकरण ताजेच आहे.
अवघ्या काही मिनिटांत, कोणत्याही युद्धाची खर्चिक तयारी न करता की-बोर्डवरील काही बटणे दाबत सायबर जग हादरवून टाकणारे हे हॅकर्स आता सर्वांसाठीच नवी डोकेदुखी ठरले आहेत. ज्या साईट्‌स हॅक होतात किंवा ज्यांची माहिती चोरली जातेय, त्यांना त्याचा थांगपत्ताही नसतो. तसेच हे कोठून घडतेय, कसे घडतेय, हे सारे गुप्त असल्याने तेथपर्यंत पोहोचणे जवळपास अशक्यच असते.
चीनमधील बरीच हॅकर्स मंडळी स्वत:ला राष्ट्रप्रेमी हॅकर्स म्हणवून घेतात. ते हॅकिंग देशासाठी करतात, अशी त्यांची भावना आहे. चीनची शत्रुराष्टे्र असणार्‍या विविध देशांतील साईट्‌स, तेथील माहिती हॅक करून ती योग्य ठिकाणी पोहोचविण्याचे काम  हॅकर्सनी स्वत:हून स्वीकारले आहे. त्यातील काही तर थेट सरकारी संस्थांशी जोडलेली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. चीन सरकार मात्र या हॅकर्सशी आमचा काहीही संबंध नाही, असे म्हणून हात वर करीत आहे. दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललेले हॅकिंग एक गहन, क्लिष्ट विषय असून, भारतासारख्या राष्ट्रांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. कॉम्प्युटर हॅकिंग हा हळूहळू राष्ट्रीय खेळ बनत चालला आहे.
चीनमधले हॅकर एकएकटे काम करतात. त्यातील अनेकजण कॉर्पोरेट्‌स, लष्कर तसेच सरकारसाठी काम करतात. मायक्रोसॉफ्टनेही आपली व्हिस्टा ही नवी ऑॅपरेटिंग सिस्टिम बाजारात आणण्यापूर्वी अशा हॅकर्सकडे आपले सॉफ्टवेअर हॅक होवू शकते का? हे तपासायला दिली होती. तसेच आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीच्या डेटाबेसमधून हवी असलेली माहिती काढून घेण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या या हॅकर्सवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. येथे सारे फायद्याचे गणित असल्याने या हॅकर्सची माहिती शोधून काढण्याची उचापत करायला आजपर्यंत कोणी गेलेले नाही. मोठमोठ्या कंपन्या हॅकर्सचा उपयोग त्यांची उत्पादने हॅक-प्रूफ करण्यासाठी प्रयत्न करतात.
या हॅकर्सची तीन प्रकारात विभागणी करता येते. हॉबी हॅकर, ऍकॅडमिक हॅकर आणि सिक्युरिटी हॅकर. हॉबी हॅकरचा हा व्यवसाय नसतो, फक्त गंमत म्हणून ते हॅकिंग करीत असतात. ऍकॅडमिक हॅकर सॉफ्टवेअर, वेबसाईटस हॅक-प्रूफ करण्यासाठी झगडतात. तर सार्‍या जगाचे खलनायक असणारे तिसर्‍या प्रकारचे हॅकर म्हणजे सिक्युरिटी हॅकर. हे कोणाच्याही कॉम्प्युटरमध्ये शिरून वाट्टेल ते करू शकतात. चीनमध्ये हॅकर्सना सॉफ्टवेअर प्रोग्राममधील कमतरता दूर करण्याचे कायदेशीर प्रशिक्षण दिले जात आहे.
उदाहरणादाखल हॅकर्सनी एक अशी प्रणाली शोधून काढली आहे की, कोणत्याही फाईल्सना ऍक्रोबेट रीडर फॉरमेटमध्ये बदलून टाकले जाते. अशा प्रकारच्या मजकुराच्या फाईल्स उघडून पाहून ही हॅकर मंडळी त्या फाईल्स स्कॅन करून चीनच्या डिजिटल स्टोअरमध्ये एकत्र जमा करतात, जी एका विशाल स्टोरेज अँड मेंटेनन्स टेक्नॉलॉजीचे महत्त्वाचे अंग आहे. अशा तंत्राला कॅनडाच्या संशोधकांनी ‘घोस्टनेट’ असे नाव दिले आहे. मागील वर्षी धर्मशाला येथील निर्वासित तिबेटी सरकारची गोपनीय कागदपत्रे चीनने अशाचप्रकारे हस्तगत केली होती. जर्मनी, इंग्लंड आणि अमेरिका या तिन्ही देशांच्या सरकारनेही कबूल केले आहे की, चिनी हॅकर्सनी त्यांच्या सरकारी आणि सैन्याची संगणक प्रणाली व नेटवर्क हॅक केले आहे. या हॅकर्सचा चीनच्या सरकारशी कोणताही संबंध नाही असे वाटत असले तरीही, चीन यात गळ्यापर्यंत गुंतला आहे, यात शंका नाही. किंबहुना अधिक संभवना हीच आहे की, या हॅकर्सचा संबंध पीपल्स लिबरेशन आर्मीशी असावा, असा संशय अनेक अभ्यासक विद्वानांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिटंन यांनी इंटरनेट सेंसॉरशिपच्या मुद्द्य़ावरून चीनला इशारा दिला होता की, जगातील खूप मोठ्या भागाला इंटरनेटच्या माध्यमातून झाकोळण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिलरींच्या या वक्तव्यात शीतयुद्धासारखाच संदेश होता. या वक्तव्यावरून हेही दिसून येते की, १९९० नंतरच्या चीनच्या आर्थिक उदयातील राजनैतिक खुलेेपणाचा, पारदर्शकतेचा आभाव असल्याचे दिसून आल्याने हिलरी यांनी अमेरिकेच्या अपेक्षा चीनने पूर्ण केलेल्या नाहीत, असा आरोप केला आहे. अतिशय तंग अशा राजकीय व्यवस्थेच्या उत्कर्षासाठी व्यापारिक शक्ती व इंटरनेटचा वापर करण्याची चीनची नीती योग्य नाही. सत्य हे आहे की, चीन एका बाजूला आर्थिक ताकद वाढवीत असताना दुसर्‍या बाजूला सायबर स्पेसच्या नियमांना सुरुंग लावत आहे.
भारत एकतर अशा शीतयुद्धांचा आणि आतंकवाद्यांचे टार्गेट आहे. प्रभावी प्रतिक्रिया, आक्रमक परराष्ट्र विषयक भूमिका व चीन किंवा पाकिस्तानला दमदार विरोध करण्याच्या अभावामुळेे आपला देश म्हणजे ‘कोणीही यावे आणि टपली मारून जावे!’ असा झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गनिमीकाव्यात आता खूप बदल झाला आहे. सायबर हल्ल्याचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. हा नवा युद्धप्रकार हे अधोरेखित करतो की, पारंपरिक युद्धप्रकाराचा वापर करून या नव्या सायबर युद्धाचा सामना करता येणे शक्य नाही.अनेक देश आता स्वत:ची हॅकिंग ब्रिगेड तयार करीत असून, या सायबरयुद्धाला तोंड देण्यासाठी सज्ज होत आहेत. या धोकादायक हॅकिंगला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘इथिकल हॅकिंग’ ही संकल्पना दिवसेंदिवस अधिकाधिक विस्तारत जात आहे. कारण पुढच्या काळातील युद्धे बंदुका आणि तोफांनी नाहीत, तर की-बोर्ड आणि माऊसने खेळली जातील. सायबर युद्धाला तोंड देण्यासाठी आता आपल्यालाही माहिती-तंत्रज्ञान आणि येत्या काळातील युद्धज्ञानात संशोधन करून, त्याचा वापर करून, नवी सामरिक नीती आखणे ही काळाची गरज बनली आहे.
संधी हुडकल्यास यशाचे शिखर पादाक्रांत करणे शक्य : रिचवुडचे संचालक ऋषीकेश बदामीकर
रिचवुड फर्निचर : ग्राहकांच्या घरात आणि मनात
• उद्योग भरारी : अमर पुराणिक
‘‘फर्निचर निर्मिती आणि विक्रीबरोबरच ‘रिचफिल क्रॅक फिलर’ व ‘रिचफिल वुड बुट्टी’ या लाकडातील खड्‌डे व भेगा बुजवणार्‍या अद्‌भुत व अनुपम उत्पादनाच्या आधारे फर्निचर उद्योगाच्या क्षेत्रात देशभर आपला नावलौकिक करणार्‍या व त्या अनुषंगाने सोलापूरचे नाव देशभर गाजवणारे उद्योजक आपल्या सोलापुरात आहेत. अशा उद्योजकात सोलापुरातील सुप्रसिध्द उद्योजक ‘रिचवुड’चे ऋषीकेश बदामीकर यांचा समावेश होतो. भारतभरातील उद्योग क्षेत्रात सोलापूरचा दबदबा निर्माण करण्यात रिचवुडच्या ऋषीकेश बदामीकरांचाही मोठा वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांच्या मनात आणि घरात स्थान पटकावणारे ‘रिचवुड’ हे ग्राहकांना मोठे विश्‍वासाचे स्थान वाटते, पण त्यापाठीमागे मोठी तपश्‍चर्या आहे. हे श्रम काय आहेत आणि यशाचे गमक काय आहे? याबद्दल तरुण भारतशी ऋषीकेश बदामीकर यांनी दिलखुलास बातचित केली.’’.....................................................................................................
जग बदतंय, विचार बलताहेत आणि त्याबरोबरच माणसाची जीवनशैली देखील बदलत चाललीय. बदलत्या काळाबरोबर प्रत्येकजण आपली जीवनशैली अधिकाधिक उंचावण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाला वाटतंय की आपलं घर, कार्यालय आधुनिक आणि सुंदर असावं. हे करीत असताना सर्वप्रथम गरज पडते ती अद्ययावत फर्निचरची. कारण आजच्या काळात व्यक्तीच्या राहणीमानाचा दर्जा हा त्याचे घर आणि विशेषत: घरातील फर्निचरवर ठरवला जातोय आणि समाजमनाची ही गरज पूर्ण करण्यात सोलापुरातील अग्रेसर नाव म्हणजे आहे, बदामीकर यांचे ‘रिचवुड’ फर्निचर.
फर्निचर निर्मिती आणि विक्रीबरोबरच ‘रिचफिल क्रॅक फिलर’ व ‘रिचफिल वुड बुट्टी’ या लाकडातील खड्‌डे व भेगा बुजवणार्‍या अद्‌भुत व अनुपम उत्पादनाच्या आधारे फर्निचर उद्योगाच्या क्षेत्रात देशभर आपला नावलौकिक करणार्‍या व त्या अनुषंगाने सोलापूरचे नाव देशभर गाजवणारे उद्योजक आपल्या सोलापुरात आहेत. अशा उद्योजकांत सोलापुरातील सुप्रसिध्द उद्योजक ‘रिचवुड’चे ऋषीकेश बदामीकर यांचा समावेश होतो. भारतभरातील उद्योगक्षेत्रात सोलापूरचा दबदबा निर्माण करण्यात रिचवुडच्या ऋषीकेश बदामीकरांचाही मोठा वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजच्या बदलत्या काळात जनसामान्यांची सुबत्ता जशी वाढतेय, तशी सौदर्यदृष्टीही वाढत आहे. आपलं घर सुंदर असावं असं प्रत्येकालाच वाटू लागलं आहे. त्यामुळे प्रत्येकजणच आता फर्निचर खरेदीबाबत जागरूक झालेला आहे. आशा जागरूक ग्राहकाला तितक्याच जागरूकतेने आणि सचोटीने अत्याधुनिक व दर्जेदार फर्निचर पुरवण्यात बदामीकरांचा हातखंडा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांच्या मनात आणि घरात स्थान पटकावणारे ‘रिचवुड’ हे ग्राहकांना मोठ विश्‍वासाचे स्थान वाटते, पण त्या पाठीमागे मोठी तपश्‍चर्या आहे. हे श्रम काय आहेत आणि यशाचे गमक काय आहे? याबद्दल तरुण भारतशी ऋषीकेश बदामीकर यांनी दिलखुलास बातचित केली.
ऋषीकेश राघवेंद्र बदामीकर यांचे बी.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे आपल्या वडिलांना त्यांच्या फर्निचर व्यवसायात मदत करीत असताना केवळ जिद्द, आत्मविश्‍वास, कल्पकता, निरीक्षण व अभ्यास या जोरावर फर्निचर व्यवसाय वाढीबरोबरच अथक परिश्रम करून व संशोधन करून लाकडातील खड्‌डे व भेगा बुजवणारे ‘रिचफिल क्रॅक फिलर’ हे आज भारतभर प्रसिद्ध असणारे दर्जेदार उत्पादन तयार केले व त्यांनी त्यांच्या या उत्पादनाला संशोधनाचे पेटंट देखील मिळवले. त्यानंतर त्या उत्पादनातील गुण व दोषांचा अभ्यास करून लाकडासाठी लागणारी, सर्वांना उपयुक्त होईल अशी ‘लांबी’ तयार केली, जी लाकडांच्या भेगांमध्ये भरल्यावर लाकडासारखी मजबूत होते व त्या लांबीवर लाकडाप्रमाणे सर्व कामे करता येतात. त्या लांबीचे नाव आहे ‘रिचफिल वुड पुट्‌टी’ ही भारतातील पहिली इको फें्रंडली लांबी आहे. या उत्पादनाच्या पेटंटसाठी नोेंदणी केलेली आहे. सध्या हे उत्पादन भारतातील सर्वच राज्यांत पाठवले जात असून, या उत्पादनाला भारतभरातून जोरदार मागणी आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात ‘रिचफिल प्लायवुड प्लस’ नावाचे उत्पादन बाजारात आणले असून, याही उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ऋषीकेश बदामीकर यांनी सांगितले.
व्यवसाय सुरू केला तेव्हा एकाच प्रकारचे उत्पादन होते, पण ग्राहकांची वाढती मागणी पाहून वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी ५ वेगवेगळी उत्पादने बनवली जातात. सन २००४-२००५ साली या उत्पादनाच्या विक्रीसाठी सोलापूर, लातूर, कोल्हापूर अशा ठिकाणी प्रयत्न केला होता, पण यश मिळाले नाही परंतु अपयश आले म्हणून न थांबता सतत प्रयत्न सुरू ठेवल्याचे सांगून ऋषीकेश बदामीकर पुढे म्हणाले की, सन २००५-०६ साली बंगळुरू येथे ‘इंडियन वुड’ नावाचे प्रदर्शन पाहायला गेलो होतो. तेथे फर्निचरसाठी लागणारी मशिनरी व कच्चा माल पुरवठा करणार्‍या कंपन्यांचे स्टॉल्स होते. त्या स्टॉल्समध्ये ऑस्ट्रेलिया येथील ‘टिंबरमेट’ या कंपनीचा पण स्टॉल होता. ही कंपनी फक्त लाकडाची लांबी विकत होती. या कंपनीचा स्टॉल पाहिल्यानंतर जाणवायला लागले की, आपणसुद्धा आपल्या कंपनीचा स्टॉल या प्रदर्शनात लावला पाहिजे. कारण त्या प्रदर्शनाला भारतातील सर्व राज्यांतून फर्निचर व्यावसायिक व लाकूडकामाशी संबंधित व्यक्ती भेट देत होत्या आणि व्यवसाय वाढीचा तो सर्वात चांगला मार्ग होता. मधल्या काळात मी आमच्या फर्निचर व्यवसायाची अद्ययावत व्यवस्थापनाच्या आधारे घडी नव्याने बसवली. ही घडी बसल्यानंतर २००७-०८ च्या प्रदर्शनात सहभाग घेतला. या प्रदर्शनात  रिचवुडच्या उत्पादनांना उदंड प्रतिसाद मिळल्याचे बदामीकरांनी सांगितले.
उमेदवारीच्या काळात आमच्या बदामीकर ऍन्ड सन्स या दुकानात केलेल्या कामाचा व अनुभवाचा मला हे उत्पादन विकताना खूप फायदा झाला. व्यवसायात पुढच्या पिढीनेही आपल्या पायावर उभे राहावे म्हणून धाकट्या भावाची पत्नी सौ. पूनम हिला देखील आमच्या या व्यवसायात गुंतवले. सुरुवातीला मी व्यवसाय करताना व्यवसाय माझ्याभोवतीच फिरायचा. व्यवसायाची तंत्रं, उधारी, देणी-घेणी फक्त मलाच माहीत असायची, पण सौ. पूनम बदामीकर या व्यवसायात आल्यानंतर मात्र व्यवसायाचे विकेंंद्रीकरण सुरू केले. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात मला लक्ष घालावे लागत नाही. संपूर्ण व्यवहार पूनम बदामीकर याच पाहतात. त्यामुळे मला व्यावसायवृध्दी व संशोधनावर पूर्ण लक्ष देता येऊ लागल्याचे ऋषीकेश बदामीकर म्हणाले.
आम्ही ग्राहकांना चांगल्या प्रतीचे फर्निचर योग्य किमतीत देत असल्याने ग्राहक पूर्ण समाधानी असल्याचे सांगून बदामीकर पुढे म्हणाले की, त्यामुळे आमचा व्यवसाय वाढण्यासाठी हा समाधानी ग्राहकच मोठी मदत व प्रयत्न करतो. रिचवुड फर्निचर हे आमचे दुकान मुख्य रस्त्यावर नसून, होटगी रोड येथे किनारा हॉटेलच्या पाठीमागे आहे. ग्राहकाला आमच्या दुकानापर्यंत येण्यासाठी शोधाशोध करावी लागते. त्यामुळे मलासुद्धा सुरुवातीला वाटायचं की आपला व्यवसाय कितपत चालेल. कधी कधी दैनिकांमधून जाहिरात करीत होतो, पण नुसतीच जाहिरात करून ग्राहक दुकानापर्यंत येत नाही. कारण ती जाहिरात वाचून ग्राहकाला या दुकानातून एखादी वस्तू घेतल्यास आपल्याला फायदा होईल असे वाटावे लागते, तेव्हाच तो दुकानापर्यंत येत असल्याचे व्यावसायिक मर्म बदामीकर यांनी सांगितले. असे असताना वाजवी किंमत व उत्तम दर्जाचे फर्निचर आम्ही ग्राहकाला देत असल्यामुळे ग्राहकाचा आमच्यावरचा विश्‍वास वाढत गेला. आमच्याकडे नुसती भेट द्यायला येणारा ग्राहक सुद्धा आमच्याकडून कोणती ना कोणती वस्तू आज ना उद्या खरेदी करायचा निश्‍चय करतो. आम्ही काही चांगल्या यंत्रणा कार्यान्वित केल्यामुळे आणि पूनम बदामीकर यांनी पूर्ण जबाबदारी यशस्वीरीत्या पेलल्यामुळे तसेच मिलिंद चक्रदेव सर, राजू, राकेश, श्रीकांत हे सर्वजण आपापली जबाबदारी उत्तमरीतीने पार पडत असल्यामुळे व्यवसायात वृद्धी होत राहिली.
बंगळुरूच्या इंडिया वुड या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मी आमच्या रिचफिल क्रॅक फिलर हे उत्पादन भारतभराच्या बाजारपेठेत  पोहोचवण्यासाठी भाग घेतला. तेथे भारतातील सर्व भागातून फर्निचर उत्पादक, प्लायवुड उत्पादक, खेळणी व खेळाच्या साहित्यांचे उत्पादक, पॅकिंग बॉक्स निर्माते असे लाकूड व्यवसायातील लोक आले होते. तेथून आम्हाला काही चांगले ग्राहक मिळाले. रिचफिल क्रॅक फिलर हे आमचे पहिले प्रॉडक्ट ‘रेडी टू मिक्स’ प्रकारातले होते.  त्यामुळे फेविकॉलसारखे ऍडेसिव्ह वेगळे घालावे लागायचे. आमच्या ग्राहकांची अशी मागणी होती की, आम्हाला पूर्ण तयार व परिपूर्ण उत्पादन द्या. त्याआधी पाच ते सहा वर्षे परिपूर्ण उत्पादन देण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. मोठ्या ग्राहकांची ही मागणी लक्षात घेऊन आणखी जोमाने प्रयत्न केल्यानंतर सन २००८-०९ मध्ये मी एक परिपूर्ण असे इको फ्रेंडली प्रॉडक्ट तयार केले आणि त्याला नाव दिले, ‘रिचफिल वुड बुट्टी.’ त्यावर्षी दिल्लीमध्ये प्रगती मैदान येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेतला. तेथे आमच्या या नव्या उत्पादनाने ‘रिचफिल वुड बुट्टी’ने ग्राहकांची मने जिंकली, अनेक मोठ्या ग्राहकांना हे उत्पादन आवडले. त्यानंतर लाकूड व प्लायवुडशी संबंधित मासिकांमध्ये आमच्या या नवीन उत्पादनाबद्दल माहिती येऊ लागली. त्यामुळे भारतभरातून विचारणा होऊ लागली. आमचे हे उत्पादन इको फ्रेंडली असल्यामुळे तसेच एकदा लाकडाच्या भेगांमध्ये, खड्ड्यांमध्ये भरल्यानंतर परत लाकडाला भेगा जाऊ देत नाही. लाकडात भरल्यानंतर त्याची मजबुती लाकडाप्रमाणेच होते. लाकडासारखे कोरीव काम त्यावरही करता येते, अशा अनेक बहुगुणी वैशिष्ट्यांमुळे मागणी वाढली. भारतातील अग्रगण्य कंपन्या हे उत्पादन आवर्जून घेतात.
बदामीकरांच्या एका पश्‍चिम बंगालमधील ग्राहकाने ‘रिचवुड’च्या उत्पादनांवर कविता करून पाठवली आहे. ती कविता वाचून मी तर भारावूनच गेलो! असे उद्गार ऋषीकेश बदामीकर यांनी काढले. गेल्यावर्षी आमचेे ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यात्रेतील नंदीध्वजाच्या काठ्यांमध्येही माझ्या उत्पादनांचा वापर केला, त्यावेळी मला खूपच अभिमान वाटला व श्री शिवयोगी सिद्धेश्‍वरांनी हा आपल्याला आशीर्वादच दिला आहे असे वाटले, हे ऋषीकेश बदामीकर यांनी अतिशय श्रद्धापूर्वक भावनेने सांगितले. मार्च महिन्यात डेहराडून येथील ‘फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटने वुड सबस्टिट्यूट ऍन्ड ऍडव्हान्सेस इन वुड सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी’ या विषयावर परिषद भरवली होती. तेथे भारतातील वुड सायन्समध्ये काम करणारे ५० ते ६० वैज्ञानिक आले होते. मी केलेल्या कामाबद्दल त्यांनी सुद्धा प्रशंसा केली. तेव्हाचा अनुभव देखील खूप चांगला होता, असे प्रतिपादन बदामीकर यांनी केले.
बदामीकरांचा ग्राहक दिल्लीपासून केरळपर्यंत आहे. वुड इंडस्ट्रीतील बहुसंख्या कंपन्या आमच्या ग्राहक आहेत. जयपूर, जोधपूर येथील हँडिक्राफ्ट बनवणारे व विशेषत: परदेशी निर्यात करणारे उद्योजक ग्राहकांचा ‘रिचफिल’ वापरण्याचा आग्रह असतो, हेच रिचवुडच्या उत्पादनांचे मोठे यश म्हणाले लागेल!
रिचवुडच्या उत्पादनांचे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करीत असताना मी प्रो. श्रीकांत लोणीकर, प्रो. शेडजाळ सर यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. त्यांनी न कंटाळता मला योग्य मार्गदर्शन केले, त्यामुळे मी येथपर्यंत पोहोचू शकलो, असे नम्रपणे नमूद करून बदामीकर पुढे म्हणाले की, तत्पूर्वी माझ्या विचारांना खरी दिशा मिळाली ती आमचे गुरुजी संगीत शिक्षक गुरुवर्य श्री. रामाचार्य बागेवाडीकर यांच्यामुळे. ते सांगायचे की, कोणत्याही गोष्टीत वाहत जाऊ नका, जे काम हाती घेतले ते आधी करा आणि मग इतर छंद जोपासा. त्यांच्याकडे मला तबला वादनाच्या शिक्षणाबरोबरच जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यांच्याकडून शिकायला मिळाले, हे माझे परमभाग्य!
भविष्यातील आपल्या योजनांबद्दल सांगताना ऋषीकेश बदामीकर म्हणाले की, येत्या काळात पार्टीकल बोर्ड मशिनरी येणार असून, त्यामुळे पार्टीकल बोर्डपासून फर्निचरचे उत्पादन करता येणार आहे. याबरोबरच ‘फुल कुशन सोपा’ हे नवे उत्पादन देखील आम्ही बाजारात आणत आहोत. या सोफ्याचे संपूर्ण कुशन डिटॅचेबल व वॉशेबल म्हणजे काढून धुता येते, हा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. हे उत्पादन आम्ही ग्राहकांच्या गरजा व मागणी लक्षात घेऊन तयार केले आहे. त्याचप्रमाणे ‘फ्रेन्डली मेटल फ्रेम सोफा’ सुद्धा उत्पादित करीत आहोत. हा सोफा लोखंडी फ्रेमचा असून, पूर्णपणे वेगळा करता येतो. याशिवाय अनेक नवी उत्पादने बाजारात आणण्याचा प्रयत्न असून, त्यावर संशोधन व अभ्यास सुरू असल्याचे बदामीकर यांनी सांगितले.
पुरस्कार - रिचवुडच्या माध्यमातून ऋषीकेश बदामीकर यांनी केलेल्या संशोधनाची दखल घेऊन रोटरी क्लबच्या ‘व्यवसाय सेवा पुरस्काराने’ त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रसिद्ध असलेले कोट्टायम (केरळ) येथील ‘रबर बोर्ड इन्स्टिट्यूट’ या संस्थेने ‘रिचफिल वुड पुट्टी’ या उत्पादनास मानांकन दिले असून, हे मानांकन लाकूड उद्योगाच्या क्षेत्रात अतिशय मानाचे समजले जाते. याशिवाय अनेक छोटे-मोठे सन्मान रिचवुडला मिळाले आहेत.
.................................................................................................
•सोलापूरचा औद्योगिक विकास : ऋषीकेश बदामीकर
ऋषीकेश बदामीकर
टेक्स्टाईल डेव्हपमेंटमुळे सोलापूरचे उद्योगक्षेत्रात नाव झाले, पुढेही खूप प्रगती होईल असे वाटत होते. याच विचाराने माझे आजोबा शामराव बदामीकर सोलापुरात आले. परिवार मोठा असल्याने त्यांनी काही काळ नोकरीही केली, पण सोलापूरची उद्योगवाढ १५, २० वर्षांपूर्वी थांबली आणि नंतर सोलापूर अधोगतीला लागल्याची खंत ऋषीकेश बदामीकर यांनी व्यक्त केली. औद्योगिक शहर म्हणून सोलापूरचे नाव विस्मृतीत गेले असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, पण आता पुन्हा सोलापूरच्या उद्योगांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासनाने मदत करणे गरजेचे आहे. शासनाच्या मदतीशिवाय उद्योगांना लागणारी पायाभूत सुविधा देणे अशक्य आहे आणि या पायाभूत सुविधा मिळाल्या तर सोलापूरचा पुन्हा नव्या जोमाने औद्योगिक विकास होईल. सोलापुरातील उद्योजकांना प्रोत्साहीत करण्याबरोबरच बाहेरील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी योजना झाल्या पाहिजेत. सोलापूरकरांना नोकरी, उद्योग न मिळाल्यामुळे ते सोलापूर सोडून जात आहेत. कारण त्यांना येथे नोकर्‍या मिळत नाहीत किंवा समाधानकारक पगार दिला जात नाही. कमी पैशात त्यांच्याकडून काम करवून घेतले जाते. या दोषाचे निराकारण केले तर सोलापूरकर सोलापुरातच राहतील आणि कुशल, अकुशल कामगार व अधिकारी दर्जाच्या उच्चशिक्षित मंडळींची चणचण भासणार नाही, असा विश्‍वास बदामीकर यांनी व्यक्त केला.
सर्वसामान्य व्यवसाय करण्यासाठी कदाचित जास्त शालेय शिक्षणांची गरज नसेलही, परंतु व्यावहारिक ज्ञान, वेगळे काही करण्यासाठी डोळे उघडे ठेवून संधी हुडकल्यास तसेच आपल्या कल्पनाशक्तीला ताण दिल्यास कोणीही यशाचे शिखर पादाक्रांत करू शकतो, असा अनुभवाचा संदेश ऋषीकेश बदामीकर यांनी नव्याने उद्योग क्षेत्रात येऊ पाहणार्‍यांना दिला आहे.
तरुण भारत, सोलापूर, सोमवार, दि. ०२ मे २०११
रोटरी अन्नपूर्णा योजना : वयोवृद्धांना सन्मानाने जेवण मिळावे म्हणून ही योजना
मातृ-पितृसेवेचा रोटरी क्लबचा पुण्यप्रद उपक्रम
  •भरारी : अमर पुराणिक
"आपल्या तथाकथित सुसंस्कृत समजल्या जाणार्‍या भारतीय समाजात अनेक संस्कृतिहीन घटना घडत आहेत. आज एकविसाव्या शतकात आपण मोठी प्रगती साधलेली असली तरी सांस्कृतिक मूल्यं मात्र गमावली आहेत. आजच्या समाजाने भौतिक प्रगती केलेली असली तरी सांस्कृतिक नीतिमूल्यांबाबत मात्र रसातळाला गेला आहे. ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव, अतिथी देवो भव’, अशी संस्कृृती व संस्कार सांगणार्‍या आपल्या हिंदू संस्कृतीची भौतिक सुखाच्या मागे लागून मोठी हानी झाली आहे. आज समाजात ज्येष्ठांची मोठी कुचंबणा होत आहे. काहीजण तर दोनवेळच्या अन्नाला महाग झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक सुज्ञाला प्रश्‍न पडतो की, जर मुले पाहात नसतील तर यांच्याकडे कोण पाहणार? याला उत्तर दिलं ते रोटरी क्लब ऑफ सोलापूूरनं, ‘रोटरी अन्नपूर्णा योजना’ सुरू करून. अशा योजना अनुकरणीय असून इतर संस्थांनीदेखील असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे."............................................................................................

आपल्या तथाकथित सुसंस्कृत समजल्या जाणार्‍या भारतीय समाजात अनेक संस्कृतिहीन घटना घडत आहेत. आज एकविसाव्या शतकात आपण मोठी प्रगती साधलेली असली तरी सांस्कृतिक मूल्यं मात्र गमावली आहेत. आजच्या समाजाने भौतिक प्रगती केलेली असली तरी सांस्कृतिक नीतिमूल्यांबाबत मात्र रसातळाला गेला आहे. यात सर्वात मोठी समस्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची होत असलेली अवहेलना. ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव, अतिथी देवो भव’, अशी संस्कृृती व संस्कार सांगणार्‍या आपल्या हिंदू संस्कृतीची भौतिक सुखाच्या मागे लागून मोठी हानी झाली आहे. आज समाजात ज्येष्ठांची मोठी कुचंबणा होत आहे. काहीजण तर दोनवेळच्या अन्नाला महाग झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक सुज्ञाला प्रश्‍न पडतो की, जर मुले पाहात नसतील तर यांच्याकडे कोण पाहणार? याला उत्तर दिलं ते रोटरी क्लब ऑफ सोलापूूरनं, ‘रोटरी अन्नपूर्णा योजना’ सुरू करून.
 आचार्य गिरिराज किशोरजी व्यास यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने रोटरी क्लब सोलापूरच्या वतीने अन्नपूर्णा योजनेला प्रारंभ केला. आळंदीत आचार्यजी ज्ञानेश्‍वरीचे अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी डब्यांची सोय करतात. तेव्हाचे रोटरी अध्यक्ष राज मिणीयार हे आचार्यांचे शिष्य असल्याने त्यांचे आळंदीला जाणे-येणे होते. राज मिणीयार यांनी हा उपक्रम पाहिला व आपणही अशी एखादी योजना सुरू करावी अशा भावनेने त्यांच्या मनात घर केले व तेव्हाचे रोटरी सचिव किशोर चंडक व इतर रोटेरियन सहकार्‍यांशी चर्चा करून वृद्धांसाठी ‘रोटरी अन्नपूर्णा योजना’ सुरू करण्याचा मानस पक्का केला.
आजच्या सामाजिक स्थितीबद्दल बोलताना रोटरीचे सध्याचे अध्यक्ष प्रा.डॉ. नागेश धायगुडे म्हणाले की, आज समाजात ज्येष्ठ नागरिकांची मोठी अवहेलना होते. प्रत्येकाची वेगवेगळी कारणे आहेत. काहींची आर्थिक परिस्थिती नाही, तर काहींचे हात-पाय उतारवयामुळे काम करत नाहीत. काहींची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, मुले मोठ्या हुद्द्यावर आहेत, तर काहींची मुले परदेशात आहेत. ही मुले कृतघ्नपणा करतात व त्यांच्या पालकांना पाहत नाहीत. आर्थिक सुबत्ता असलेली ही मुलेे आपल्या आई-वडिलांना टाकून देतात. ही स्थिती घृणास्पद असली तरी हे आजच्या समाजाचे वास्तव आहे. आपल्या समाजाची नीतिमूल्ये अशी रसातळाला गेलेली आहेत आणि ही स्थिती सामाजिक संतुलनाच्या दृष्टीने भयावह ठरणारी आहे.
आयुष्यभर खस्ता खावून आपल्या मुलांना मोठे करणार्‍या पालकांना मुलांच्या स्वयंंकेद्रित व स्वार्थी वृत्तीमुळे म्हातारपणी अन्नान्न दशा होते. अशा दुर्दशेत जगणार्‍या पालकांना जेवणाचा डबा देण्याची योजना म्हणजे आई-वडिलांच्या सेवेचे पुण्यप्रद काम होय. हिंदुधर्मशास्त्रात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आजची सामाजिक स्थिती व गरज लक्षात घेऊन वयोवृद्धांना सन्मानाने जेवण मिळावे म्हणून तात्काळ ही योजना राबवण्याचे काम हाती घेतल्याचे माजी अध्यक्ष राज मिणीयार व माजी अध्यक्ष किशोर चंडक यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. अतिशय अवघड असली तरी रोटरीने ही योजना सुरू केली व गेली चार वर्षे हा उपक्रम शिस्तबद्धपणे व अव्याहतपणे सुरू आहे.
या योजनेसाठी रोटरीने अन्नपूर्णा योजना समिती नेमली व काही विशिष्ट निकष ठरवले. ज्यांनी आयुष्यभर नोकरी किंवा व्यवसाय केला, भीक न मागता आयुष्यभर कष्ट करून कुटुंब जोपासले, काहींची पूर्वी आर्थिक स्थिती उत्तम होती, पण आयुष्याच्या अंतिम टप्प्यात विपन्नावस्था आली. मुलांची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही काही पालकांची मुले त्यांच्याकडे पाहत नाहीत, अशा वयोवृद्ध पालकांसाठी रोटरी अन्नपूर्णा योजनेचा लाभ दिला जातो.
वालचंद महाविद्यालयाच्या प्रा. विलास बेत यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांकडून यावर सर्वेक्षण करून गरजू ३०० लाभार्थी निवडले व त्यातूनही अतिगरजू असे १०० लाभार्थी निवडले आणि दि. ४ ऑगस्ट २००७ रोजी या योजनेचा शुभारंभ आचार्य गिरिराज किशोरजी व्यास व डी.जी. विनय कुलकर्णी यांच्या हस्ते, तेव्हाचे अध्यक्ष राज मिणीयार व सचिव किशोर चंडक, रोटरीचे पदाधिकारी, सदस्यांच्या उपस्थितीत केला.
 या योजनेसाठी अनेकांनी सढळ हाताने व निर्मळ मनाने मदत केली व तो मदतीचा ओघ वाढतच आहे. सर्वप्रथम स्टील मर्चंट्‌स असोसिएशनने यासाठी लागणारे डबे दिले. तसेच हे डबे गरम पाण्यात धुण्याची सोय नॅशनल लॉंड्रीचे भोसले यांनी करून दिली. पहिल्यावर्षी सुग्रास व परिपूर्ण जेवण पुरवण्याचे काम ‘सुगरण’च्या मीनाबेन शहा यांनी आनंदाने स्वीकारले व ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर केवळ ११ रुपयांत डबा देण्यास सुरुवात केली. रोटेरियन कुशाल डेढिया यांच्या सर्वोदय भांडार येथे यातील डबे तपासले जातात, त्यांचे वजन केले जाते व वेळेवर गरम गरम जेवणाचे डबे लाभार्थ्यांना घरपोच दिले जातात. नंतर दुसर्‍या वर्षापासून चंद्रिका चौहान व शुभांगी बुवा यांच्या ‘उद्योगवर्धिनी’ या संस्थेद्वारे सकस व संपूर्ण आहार असलेले डबे देण्यास प्रारंभ केला व आजतागयात विनाखंड देत आहेत. सुरुवातीला हे डबे लाभार्थ्यांना सायकलवर घरपोच दिले जात होते, पण १०० डबे देण्यास वेळ जाऊ लागला, त्यामुळे गरम डबे खायला मिळावेत या उद्देशाने नंतर रिक्षामधून डबे देण्यास सुरुवात केली. श्री. कुमार पाटील या प्रामाणिक, जबाबदार व शिस्तबद्ध व्यक्तीने कोणतीही अपेक्षा न ठेवता रिक्षातून डबे देण्याची जबाबदारी स्वीकारली. आजपर्यंतच्या चवळजवळ चार वर्षांच्या कालावधीत कुमार पाटील यांनी एकही दिवस चुकवला नाही किंवा सुट्‌टी घेतली नाही. अविरतपणे व अतिशय निष्ठेने ते हे काम करतात, हे कौतुकास्पदच नव्हे तर अनुकरणीय म्हणाले लागेल. शिवाय रोटेरियन कुशाल डेढिया व रोटेरियन केतन व्होरा हे मुख्यत्वे सर्व जबाबदारी समर्थपणे सांभाळतात, नव्हे तर झपाटल्यासारखे काम करतात. अतिशय तळमळीने व आत्मीयतेने एखाद्या व्रतस्थासारखे कार्य हे दोघे रोटेरियन करतात. रोटरीच्या सर्व महत्त्वाच्या उपक्रमात माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. एम.जी. प्रधान, सुप्रसिद्ध सी.ए. द.ना. तुळपुळे, डॉ. राजीव प्रधान व जुबीन अमारिआ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते.
योजना राबवताना अनेक अडचणी आल्या, पण ज्येष्ठांच्या आशीर्वादाने यावर मात केली. कर्फ्यूमध्ये सुद्धा पोलिसांच्या सहकार्यामुळे एकही दिवस चुकवला नाही. आरटीओने देखील यासाठी परवानगी देऊन पूर्ण सहकार्य केले. सर्वात अवघड काम म्हणजे या योजनेसाठी पैसा उभा करणे. पहिल्या वर्षी या योजनेला ५ लाख रुपये खर्च आला, पण आज वाढलेल्या प्रचंड महागाईमुळे हा खर्च वाढला असून, यावर्षी या योजनेला वर्षाला ९ लाख रुपये खर्च येतो.
या योजनेची समाजाभिमुखता व पारदर्शकता पाहून अनेकांनी हातभार लावला. साधारणपणे ६० टक्के खर्च समाजातील अशा दानशूर व्यक्तींकडून केला जातो. बाकीचा ४० टक्के खर्च रोटेरियन मंडळी करतात. हे करीत असताना कोणी डबा दिला व कोणाला दिला? ही माहिती गुप्त ठेवली जाते. डॉ. रायखेलकर यांनी हा उपक्रम पाहून आपल्या आई-वडिलांच्या नावे डबे दिले. माजी महापौर विठ्ठल करबसु जाधव यांनी महापौर असताना या उपक्रमाची दखल घेऊन मोठी मदत केली व आजपर्यंत ते दरवर्षी या उपक्रमासाठी १० हजार रुपये देतात. या योजनेमुळे बर्‍याच लोकांमध्ये आपल्या पालकांबद्दल जागरुकता निर्माण झाली व आपल्या पालकांची काळजी ते घेऊ लागले, हे देखील या योजनेचे यशच म्हणावे लागेल. हे करताना समाजातील अनेक बरे-वाईट पैलू पाहायला मिळाल्याचे किशोर चंडक व राज मिणीयार यांनी सांगितले.
राष्ट्रीय, धार्मिक सणांना गोड जेवणाचा डबा दिला जातो. तसेच नवरात्रीत उपवासाचे डबे दिले जातात. या शिवाय या ज्येष्ठांना वर्षातून एकदा कपडे दिले जातात. ब्लँकेट व जेवण्याच्या भांड्यांचा सेट देखील दिला जातो. उतरवयात मुख्यत्वे ज्येष्ठांना गरज असते ती वैद्यकीय तपासणीची, त्यासाठी त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते. सुरुवातीला अश्‍विनी रुग्णालयात ही तपासणी केली, नंतर डॉ. श्रीकांत पागे व डॉ. सौ. पागे यांच्या ‘मेडिसिटी’ या रुग्णालयात ही वैद्यकीय तपासणी केली जाते व त्यांना लागणारी औषधे पुरवली जातात. तसेच दरवर्षी देवदर्शनाची सहल देखील काढली जाते व जवळच्या धार्मिक स्थळांना दर्शनासाठी नेण्याची सोय केली आहे. यासाठी प्रा. ए.डी. जोशी व अमोल जोशी यांच्या इंडियन मॉडेल स्कूलच्या वतीने प्रवासाची सोय केली जाते.
नेहमीप्रमाणेच शासनाला कोणत्याही सत्कार्याचे सोयरसुतक नाही. शासनाने या योजनेचीही दखल घेतलेली नाही. मात्र रोटरी इंटरनॅशनलने याची दखल घेऊन सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून ‘रोटरी आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरविले आहे, पण अशा कोणत्याही पुरस्काराची किंवा दखलीची वाट न पाहता रोटरीने हा उपक्रम नेटाने सुरू ठेवला आहे. शासन नसले तरीही समाज व ज्येष्ठांचे आशीर्वाद या उपक्रमाच्या पाठीशी आहेत.
तरुण भारत, सोलापूर, रविवार, दि. ०८ मे २०११
नव्या पिढीने एककल्ली न होता सर्वच क्षेत्रांत संचार करावा : बंग उद्योग समूहाचे रंगनाथ बंग
बंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा
 • उद्योग भरारी : अमर पुराणिक
‘‘पाणी, अखंड वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधांबाबत सोलापूर मागे असल्याने ‘फॉरीन बायर्स’ सोलापूरमध्ये यावयास इच्छुक नाहीत. आजचे बहुसंख्य उद्योग हे निर्यातीवर आधारित आहेत. साधारणपणे ६० टक्क़े उत्पादने निर्यात होतात. नवे उद्योजक व खरेदीदाराला जर मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, तर तो सोलापुरात यायला तयार होणार नाही. त्यामुळे सोलापुरातील उद्योजक  हे परदेशी व देशातील इतर ग्राहकांना मुकतात. हे टाळायचे असेल तर प्रथम मूलभूत सुविधा उपलब्ध करणे महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन रंगनाथ बंग यांनी केले. पाणी आणि विजेचा प्रवाह सुरळीत नसल्यामुळे वेस्टेज वाढते, त्यामुळे नुकसान वाढते आणि हे उद्योजकांवर गंडांतर यायला कारणीभूत ठरू शकते. कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज महाग आहे आणि वीज पुरवठाही सुरळीत नाही. हे विजेचे दर कमी होणे गरजेचे आहे. त्यामुळेच बरेच उद्योजक कर्नाटक, आंध्रकडे वळले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात सोलापूर, मुंबई, गुलबर्गा, बंगळूर, हैदराबाद शहरात आपल्या उद्योगांची व्याप्ती पसरवणार्‍या रंगनाथ बंग यांच्या बंग उद्योग समुहाला बहुराज्यिय उद्योग समुह असे नामाभिधान देणे योग्य ठरेल. सोलापुरात अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे सन १९८९ साली रंगनाथ बंग यांनी डेटा फॉर्म प्रा.लि. ची स्थापना करून सोलापूरात आपल्या उद्योगांची मुहुर्तमेढ रोवली. येथे कॉम्प्युटर स्टेशनरीचे उत्पादन सुरु केले. दुसरे युनिट १९९६ साली चिंचोळी एमआयडीसीत सुरु केले. १९९६ साली बंग पॉलिपॅक्स प्रा.लि. ची स्थापना करून सीमेंट, खते आदींसाठी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक पोत्यांच्या उत्पादनास प्रांरभ केला. याचा एक विभाग गुलबर्गा येथे तर दुसरा विभाग हैदराबाद येथेही सुरू आहे. २००१ मध्ये सुप्रीम पॉलिविव्ह प्रा.लि. ला सुरुवात झाली. तर बंग ओव्हरसीज लि. याद्वारे ‘थॉमस स्कॉट’ नावाने ओळखली जाणारी प्रिमियम दर्जाची गारमेंट्‌स बनविली जातात.
...............................................................................................
रंगनाथजी बंग म्हणजे सोलापूरच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रांतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. भारतीय परंपरा, संस्कार रक्तारक्तात भिनलेले रंगनाथजी अतिशय साधकवृत्तीचे असून, परिवारात आणि समाजात ते ‘बाबुजी’ म्हणून ओळले जातात. त्यांचे उद्योगक्षेत्राबरोबरच सामाजिक, धार्मिक, आध्यत्मिक क्षेत्रांतील कार्य मोठे आहे. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक आहेत. संघसंस्कारांना ते आयुष्यातील मोठी पुंजी मानतात. उद्योगातील सचोटी आणि निष्ठेमुळे रंगनाथजी बंग हे सोलापूरच्या औद्योगिक, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रांतील अग्रगण्य नाव ठरले आहे.
रंगनाथजी बंग यांच्या पूर्वजांचा म्हणजे आजोबा, वडील यांचा पारंपरिक सोन्याचा व्यापार. खरेदी-विक्री ही पारंपरिक व्यवसायपद्धती होती. त्यांचे वडील शिवनारायण बंग यांचा आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे सोन्याचा व्यवसाय होता. सन १९५६ साली सोन्याच्या व्यवसायाबरोबरच कागद उद्योगात त्यांनी प्रवेश केला. त्या काळात कागद उत्पादनाच्या व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व होते, ते आजही तितकेच आहे. याशिवाय बंग परिवाराने अन्नधान्य, ज्यूट आदी व्यवसाय देखील केले आहेत. बंग कुटुंब म्हणजे उद्योगातील एक आदर्श भारतीय कुटुंब आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचे आदर्श म्हणून बंग परिवाराकडे पाहता येईल.
५ भावांच्या या एकत्र कुटुंबात ७० लोक आहेत. रंगनाथजी बंग यांचे एक बंधू कै. संपतकुमार बंग व दुसरे बंधू कै. रामकुमार बंग यांनी राजमहेंद्री येथे व्यवसाय संवर्धित केला. आंध्र प्रदेशातील विजयवाडा, राजमहेंद्री, हैदराबाद, विशाखापट्टणम् आदी ठिकाणी कागद वितरणाचा व्यवसाय ते करीत होते. बंग कुटुंबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कुटुंबात सर्व क्षेत्रांतील उच्चशिक्षित तज्ज्ञ व्यक्ती आहेत. रंगनाथ बंग यांच्या कुटुंबात मुले व पुतणे मिळून ८ इंजिनीअर्स, ४ सी.ए., ५ एम.बी.ए. पदवीप्राप्त व्यक्ती आहेत.
रंगनाथ बंग यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन १९८२ साली राजमहेंद्री आणि त्यानंतर मुंबई येथे व्यवसायाला सुरुवात केली. सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे सन १९८९ साली रंगनाथ बंग यांनी डेटा फॉर्म प्रा.लि.ची स्थापना करून येथे सन १९९० पासून कॉम्प्युटर स्टेशनरीच्या उत्पादनास सुरुवात केली. दुसरे युनिट सन १९९६ साली चिंचोळी एमआयडीसी, सोलापूर येथे सुरू केले. या दोन्ही ठिकाणी सिक्युरिटी प्रिंटिंग परमिशन उत्पादने, जसे की बँकांचे चेक्स, डिमांड ड्राफ्ट, रेल्वे तिकिटे आदींची निर्मिती व छपाई केली जाते. त्यानंतर आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावत रंगनाथ बंग यांनी १९९६ साली बंग पॉलिपॅक्स प्रा.लि.ची स्थापना करून सीमेंट, खते आदींसाठी वापरली जाणार्‍या प्लास्टिक पोत्यांच्या उत्पादनाला प्रारंभ केला. सुरुवातीला एक मशीन होती, नंतर वाढवत आज ५ मशीन आहेत. सुरुवातील ८० टनापासून उत्पादनास प्रारंभ केला. आज महिना ६०० टन उत्पादन केले जाते. यासाठी संपूर्ण उत्पादन एकाच छताखाली करणारा अद्ययावत असा या प्रकल्पाचा एक विभाग गुलबर्गा येथे सुरू केला आहे. असाच प्रकल्प हैदराबाद येथेही सुरू केला आहे. येत्या वर्षात १ हजार टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. गेल्यावर्षी म्हणजे २००९-१० या आर्थिक वर्षातील उलाढाल १०३ कोटी होती. येत्या वर्षात ही उलाढाल ११० कोटींपर्यंत अपेक्षित आहे. एकूण उत्पादनांपैकी ३०० टन उत्पादन युरोप, अमेरिका, लॅटीन अमेरिका, युनायटेड अरब अमिराती आदी देशांत निर्यात केले जाते.
यानंतर बंग उद्योग समूहाने मोठी गरुडझेप घेत सन २००१ मध्ये सुप्रीम पॉलिविव्ह प्रा.लि. या नव्या प्रकल्पाची सुरुवात चिंचोळी एमआयडीसी येथे केली. रंगनाथजी बंग यांना दोन मुले असून, ज्येष्ठ चिंरजीव वरदराज रंगनाथ बंग यांचे शिक्षण बी.ई (इलेक्ट्रॉनिक्स) असून, ते डेटा फॉर्म प्रा.लि.ची जबाबदारी सांभाळतात, तर कनिष्ठ चिरंजीव वासुदेव रंगनाथ बंग यांचे शिक्षण बी.ई.(पॉलिमर्स) असून, ते बंग पॉलिमर्स व सुप्रीम पॉलिविव्हची धुरा वाहतात. बंग उद्योग समूहाचा मुंबईत टेक्स्टाईल उद्योग देखील आहे. तेथे गारमेंट्‌सचे उत्पादन केले जाते. ‘थॉमस-स्कॉट’ हा सुप्रसिद्ध बॅ्रंड बंग ओव्हरसीज लिमिटेडचा आहे. थॉमस-स्कॉटच्या शर्टस, ऍपरल्सच्या उत्पादनांबरोबरच त्याची भारतातील ४५ शहरात रिटेल आऊटलेटस आहेत. याचे दुसरे युनिट बंगळुरू व तिसरे युनिट विशाखापट्टणम येथे आहे. बंग ओव्हरसीज लि.ची चालू वर्षाची उलाढाल ३०० कोटी असून, मुंबई स्टॉक एक्सचेंजला या कंपनीची नोंद सन २००७ ला झाली आहे.
सामाजिक कार्य :-
रंगनाथजी बंग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून म्हणजे १९५३ पासून स्वयंसेवक आहेत. जनकल्याण समितीचे ते सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत. माहेश्‍वरी समाजाच्या माहेश्‍वरी भवनचे अध्यक्ष आहेत. यमगरवाडी प्रकल्पाच्या विकासासाठी ते कार्यरत आहेत. हरी सत्संग समिती, मुंबई या संस्थेचे कार्य सोलापुरात रुजविण्याचे काम सुरू आहे.
भारतीय समाज पाश्‍चिमात्यांचे अंधानुकरण करीत असल्याने त्यांच्यात भारतीय संस्कृतीची बीजे पुन्हा रुजविण्यासाठी सोलापुरात हिंदू नववर्ष साजरे करण्याची अभिनव प्रथा सुरू केली.
हिंदूंनी पाश्‍चिमात्यांचे नूतन वर्ष असलेले ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दिवस साजरे न करता हिंदू नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करावे म्हणून प्रयत्न केले, त्यासाठी त्यांनी हिंदू नववर्ष समितीची सोलापुरात स्थापना केली व गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्ष सोलापुरात मोठ्या प्रमाणात साजरे केले जाऊ लागले. याचे श्रेय रंगनाथजी बंग यांना जाते. तेच सोलापूरच्या हिंदू नववर्ष समितीचे उद्गाते आहेत.
........................................................
•सोलापूरचा औद्योगिक विकास
उद्योजक रंगनाथजी बंग
सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक आहेत त्या मूलभूत सुविधा. मूलभूत सुविधा पुरविल्याशिवाय सोलापूरचा विकास कसा होणार? असा प्रश्‍न सोलापुरातील ज्येष्ठ व प्रसिद्ध उद्योजक रंगनाथजी बंग यांनी तरुण भारतशी बोलताना उपस्थित केला. उद्योजकांच्या उद्योगवाढीसाठी लागते पाणी, अखंड वीज, रस्ते (दळणवळण) आणि जागा. यातील सर्वच बाबतीत सोलापूर मागे असल्याने ‘फॉरीन बायर्स’ सोलापूरमध्ये यावयास इच्छुक नाहीत. आजचे बहुसंख्य उद्योग हे निर्यातीवर आधारित आहेत. साधारणपणे ६० टक्क़े उत्पादने निर्यात होत असतात. खरेदीदाराला जर मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, तर तो सोलापुरात यायला तयार होत नाही. त्यामुळे सोलापुरातील उद्योजक  हे परदेशी व देशातील इतर ग्राहकांना मुकतात आणि ग्राहक नाही म्हणून मग पुढे उद्योगांवर गंडांतर येते. हे टाळायचे असेल तर प्रथम मूलभूत सुविधा उपलब्ध करणे महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन रंगनाथ बंग यांनी केले. पाणी आणि विजेचा प्रवाह सुरळीत नसल्यामुळे उत्पादनातील वेस्टेज वाढते आणि उत्पादनांच्या दर्जावर देखील परिणाम होतो. जितके वेस्टेज वाढेल तेवढे नुकसान वाढण्याचा धोका बळावतो आणि हेच नुकसान उद्योजकांवर गंडांतर यायला कारणीभूत ठरू शकते. सोलापुरात आता शिक्षित कर्मचारी वर्ग मिळतो आहे, पण हेल्पर आदींसारखे अर्धशिक्षित किंवा अकुशल कामगार कमी आहेत. शिक्षणाच्या प्रगतीमुळेही असेल कदाचित की आज अकुशल कामगार मिळत नाहीत.
 पॉलिमर्स विव्हिंग उद्योग हा टेक्स्टाईल्स उद्योगातच मोडतो. हे केंद्र शासन मान्य करते आणि त्याप्रमाणे सुविधा देते, पण राज्य सरकार मात्र पॉलिमर विव्हिंग उद्योगाला टेक्स्टाईल उद्योगवर्गामध्ये वर्गीकृत असल्याचे मानायला तयार नाही. राज्य सरकारच्या या आडमुठ्या धोरणांमुळे टेक्स्टाईल उद्योगांना मिळणार्‍या सुविधांपासून हा उद्योग वंचित राहिला आहे. ‘टफ’ अर्थात ’टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड’ उपलब्ध न झाल्याने या क्षेत्रातील बरेच उद्योग अडचणीत आले आहेत.
कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज महाग आहे आणि वीज पुरवठाही सुरळीत नाही. हे विजेचे दर कमी होणे गरजेचे आहे. त्यामुळेच बरेच उद्योजक कर्नाटक, आंध्रकडे वळले आहेत. येत्या काळात ट्रेड कमी होत आहे. मध्यस्थ, दलाल आदी प्रणाली संपवण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे ट्रेडला भविष्य नाही. नवउद्योजक होऊ पाहणार्‍यांना आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा सल्ला देताना रंगनाथ बंग म्हणतात की, उत्पादन आणि विशेषत: मोनोपॉली उत्पादन करणार्‍यांना येत्या काळात विशेष महत्त्व राहील. सध्या सगळाच तरुणवर्ग आयटी क्षेत्राकडे वळत आहे, त्यामुळे इतर क्षेत्रांतील संधी वाढल्या आहेत. आयटीच्या तुलनेत इतर क्षेत्रांतील कौशल्य असलेला तरुणवर्ग आज मिळत नाही. आयटी क्षेत्रात काम करणार्‍यांचे देशाच्या प्रगतीतील योगदान हे इतर क्षेत्रातील विशेषत: इंजिनीअरिंग क्षेत्रातील लोकांंच्या तुलनेत कमी आहे. नव्या पिढीने एककल्ली न होता सर्वच क्षेत्रांत संचार करणे गरजेचे आहे.
तरुण भारत, सोलापूर, रविवार, दि. ३१ ऑक्टोबर २०१०
सोलापूरकर मातीचे सोने करतो : हिमालया टेक्स्टाईल्सचे सत्यराम म्याकल
हिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर
• उद्योग भरारी : अमर पुराणिक
‘‘सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने सोलापूरचा वस्त्रोद्योग हा सोलापूरच्या प्रगतीचा कणा असल्याने वस्त्रोद्योगाला पुन्हा बळ मिळणे आवश्यक आहे. जगभरात लोक सोने आणून सोन्याचे दागिने करतात, पण सोलापूरकर मातीचे सोने करतो. सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चादर किंवा टेरीटॉवेल उत्पादनांच्या सर्वच प्रक्रिया ‘इन हाऊस’ म्हणजे एकाच ठिकाणी व एकाच छताखाली केली जाते. म्हणजे प्रत्येक चादर व टॉवेल उत्पादक सूत खरेदी केल्यानंतर डाईंग, प्रोसेसिंगपासून विक्रीसाठी माल तयार होईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया स्वत:च करतो, हे सोलापूरच्या वस्त्रोद्योगाचे खास असे वैशिष्ट्य आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या नगरीत वस्त्रोद्योग रुजला आणि फोफावला, पण आता अडचणीत असलेला हा उद्योग सिद्धेश्‍वरांच्या आशीर्वादानेच पुन्हा वाढत राहील! असा विश्‍वासही सत्यराम म्याकल यांनी व्यक्त केला.
--------------------------------------------------------
गेल्या अनेक शतकांपासून सोलापूर शहराचा वस्त्रोद्योगाला वरदहस्त लाभला. वस्त्रोद्योग आणि विशेषत: सोलापूरची चादर व टेरीटॉवेल जगप्रसिद्ध झाले. किंबहुना सोलापुरी चादर ही सोलापूरची ओळखच झाली. सोलापूरच्या विकासात वस्त्रोद्योगाने अनन्यसाधारण भूमिका निभावलेली आहे. शून्यातून विश्‍व निर्माण करणार्‍या वस्त्रोद्योग क्षेत्रातील काही नामवंत उद्योजकांमध्ये ‘हिमालया टेक्स्टाईल्स’चे सत्यराम म्याकल यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. हिमालया टेक्स्टाईल्सचे सत्यराम म्याकल यांचा जन्म सोलापुरात झाला. आजोबा श्रीराम रामय्या म्याकल हे रझाकार चळवळीच्या वेळी आंध्र प्रदेश सोडून सोलापुरात आले. वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात अतिशय तज्ज्ञ असलेले श्रीराम म्याकल यांनी सोलापुरात हँडलूमचा उद्योग सुरू करून वस्त्रोद्योगात मोठी झेप घेतली. अतिशय सचोटी, शिस्त, सच्चेपणा आदी पारंपरिक संस्कारांवर त्यांची मोठी श्रद्धा होती. आयुष्यभर श्रीराम म्याकल यांनी आपली तत्त्ववादी भूमिका कोणत्याही परिस्थितीत सोडली नाही. हेच संस्कार त्यांनी त्यांच्या पुढील पिढीत देखील रुजविले. ‘‘आज मी जी काही प्रगती साधली आहे, त्याला आमच्या आजोबांचे संस्कार, माझी आई रामबाई म्याकल यांची प्रेरणा आणि पत्नी गीतांजली म्याकल यांची समर्थ साथ कारणीभूत आहेत’’ असे आदरयुक्त प्रतिपादन सत्यराम म्याकल यांनी तरुण भारतच्या उद्योग भरारीसाठी घेतलेल्या मुलाखतप्रसंगी केले.
सोलापूरच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला सर्वात मोठा पहिला फटका बसला तो सी.डी. देशमुख अर्थमंत्री असताना. त्यावेळी सरकारची धोरणे उद्योगानुकूल तर नव्हतीच, पण उद्योगवाढीला चाप लावणारी होती. तेव्हाचे शासनाचे निर्णय उद्योगांची पीछेहाट करणारे होते. यात अनेक वस्त्रोद्योजक देशोधडीला लागले. या फटक्यातून आम्ही देखील सुटलो नाही, असे सत्यराम म्याकल यांनी सांगितले. सत्याराम म्याकल यांचे वडील तुकाराम म्याकल यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीत उपजीविकेसाठी डॉ. कल्याणी यांच्याकडे मिश्रक (कंपौंडर) म्हणून नोकरीला प्रारंभ करीत आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली. पुढे ते आरएमपी डॉक्टर (रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर) म्हणून काम करीत कुटुंबाचा चरितार्थ चालवू लागले. अशाही प्रतिकूल परिस्थितीत आमच्या शिक्षणाकडे आई, वडील व आजोबांनी विशेष लक्ष दिले. त्याच काळात आम्हाला माझे आजोळ चाटला म्हणजे चाटला टेक्स्टाईल्स परिवाराने मोठा आधार दिला. माझी आई रामबाई तुकाराम म्याकल या चाटलांसारख्या नामवंत कुटुंबातील असून देखील तेव्हा आमच्या शिक्षणासाठी विड्या वळून अर्थाजन करीत होत्या. कारण आम्ही तिघे भाऊ व एक बहीण इतक्यांचा चरितार्थ आमच्या आई-वडिलांना चालवायचा होता. आई रामबाई म्याकल यांनीच म्याकल कुटुंबाने पुन्हा उद्योगक्षेत्रात मोठी भरारी घ्यावी यासाठी प्रचंड प्रेरणा दिली. तर माझी पत्नी सौ. गीतांजली यांनी तितकीच समर्थ साथ दिली. आजोबा श्रीराम म्याकल यांनी अशाही परिस्थितीत उद्योगक्षेत्रात बळावलेल्या अनेक वाईट कृती व प्रवृत्तीला आळा घातला, त्यासाठी त्यांनी उपोषणाचा देखील मार्ग अवलंबला.
याच काळात कुटुंबाला वाईट परिस्थितीतून बाहेर काढून पुन्हा गतवैभव प्राप्त करण्याची इच्छा मनात रुजली असल्याचे सत्यराम म्याकल यांनी सांगितले. शालेय शिक्षणासह महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले. शिक्षण संपल्याबरोबर आई म्हणाली की, पुढे काय? तर मी म्हणालो, परीक्षेचा निकाल येऊ दे, त्यानंतर मी सी.ए. होणार असल्याचा मानस पालकांसमोर व्यक्त केला, पण मी उद्योगक्षेत्रात यश मिळवावे अशी त्यांची इच्छा होती. बी.कॉम. झाल्यानंतर आई-वडिलांच्या इच्छेप्रमाणे चाटला टेक्स्टाईल्समध्ये काम सुरू करीतच उद्योगक्षेत्राची बाराखडी गिरवायला सुरुवात केली. १९७६ ते ८६ या १० वर्षांत उत्पादन, मार्केटिंग व वितरणातील सूक्ष्मता आत्मसात केली.
इतक्या प्रदीर्घ अनुभवानंतर १९८६ साली स्वत:च्या चादर उत्पादन उद्योगाला सुरुवात केली. नवा उद्योग सुरू करण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँक  व डीआयसीने कर्जसहाय्य दिले. तेव्हा सोलापूर जनता बँकेचे पालक संचालक माजी खासदार लिंगराज वल्याळ, रंगण्णा क्षीरसागर, पुलगम टेक्स्टाईल्सचे पुलगम यांचे सहकार्यं लाभले. तेव्हा पावणेचार लाख रुपये कर्जावर ८ लूमद्वारे उत्पादनाला सुरुवात केली. यातले वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच आम्ही स्वतंत्र मार्केटिंग सुरू केले. सन १९८९-९० मध्ये टॉवेल उत्पादनाला सुरुवात केली. सुरुवातीला ८लूम होत्या. आता ६० आहेत. या व्यवसायात माझे दोघे धाकटे बंधू रवींद्र आणि श्रीधर व मुले योगेश आणि ऋषीकेश हे देखील कार्यरत आहेत. धाकटे चिरंजीव अनुदीप याचे बीडीएसचे वैद्यकीय शिक्षण सुरू आहे. व्यवसाय वृद्धीसाठी श्रीनिवास सोनी, धायफुले आदींचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सत्यराम म्याकल यांनी आवर्जून नमूद केले.
बदलत्या काळाबरोबर अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे महत्त्वाचे होते. त्यादृष्टीने १९९६ साली टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने दक्षिण भारताचा अभ्यासदौरा केला. तेथील उत्पादन पद्धती आणि डाईंगच्या नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपल्या उत्पादन तंत्रात तसा बदल केला. तेव्हापासून आमची डाईंग पद्धती आणि रंगसंगती सर्वांत दर्जेदार ठरू लागली. नंतर त्यामुळे मार्केट वाढले, मागणी वाढली. उद्योगाच्या यशाचे गमक सांगताना सत्यराम म्याकल म्हणाले की, कोणत्याही उद्योगात मालाचा पुरवठा वेळेवर करणे अतिशय महत्त्वाचे असते. आज मी जे काही यश मिळविले आहे, ते सर्व अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत केलेले आहे. कच्चा माल, रंग खरेदी करताना योग्य दर्जाची समज असणे व योग्य ठिकाण निवडणे महत्त्वाचे ठरते. आलेला माल उत्तम दर्जाने प्रोसेस करून ठराविक कालावधीत हा माल बाजारात उतरवणे अपरिहार्य असते. बाजाराच्या व ग्राहकांच्या मागणीप्रमाणे उत्पादन असणे, हे व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. मालाचे योग्य माकेर्र्टिंग आणि त्याहूनही अतिमहत्त्वाचे म्हणजे विकलेल्या मालाची वेळेवर वसुली होणे हे महत्त्वाचे असते. हीच चतु:सूत्री उद्योगवाढीस पूरक ठरते. व्यवसाय करताना तत्त्वे सोडता कामा नये, असा मोलाचा सल्ला देत सत्यराम म्याकल म्हणाले की, आमच्या उत्पादनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, आमच्या उत्पादनांचा भारतभर एकच भाव असतो.
हिमालया टेक्स्टाईल्सचे ‘हिमटेक्स’ आणि ‘रामांजली’ हे बॅ्रंड संपूर्ण भारतीय बाजारपेठेत अतिशय लोकप्रिय आहेत. उद्योगातील अद्ययावत तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी आजपर्यंत युरोप, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, दुबई आदी ठिकाणी दौरे केेले. हिमालया टेक्स्टाईल्सने गेल्यावर्षी ९ कोटी रुपयांची उलाढाल केली. चालू आर्थिक वर्षात उलाढालीचे लक्ष्य १५ कोटींचे आहे, पण मंदीचा विचार करता ही उलाढाल ११ कोटींपर्यंत जाणे अपेक्षित आहे. चिंचोळी एमआयडीसीत नव्या प्रकल्पासाठी जागा घेतलेली असून, लवकरच तेथे नवा उद्योग सुरू करणार असल्याचे सत्यराम म्याकल यांनी सांगितले.
सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने सोलापूरचा वस्त्रोद्योग हा सोलापूरच्या प्रगतीचा कणा असल्याने वस्त्रोद्योगाला पुन्हा बळ मिळणे आवश्यक आहे. जगभरात लोक सोने आणून सोन्याचे दागिने करतात, पण सोलापूरकर मातीचे सोने करतो. सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चादर किंवा टेरीटॉवेल उत्पादनांच्या सर्व प्रक्रिया ‘इन हाऊस’ म्हणजे एकाच ठिकाणी केली जाते. म्हणजे प्रत्येक चादर व टॉवेल उत्पादक सूत खरेदी केल्यानंतर डाईंग, प्रोसेसिंगपासून विक्रीसाठी माल तयार होईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया स्वत:च करतो, हे सोलापूरच्या वस्त्रोद्योगाचे खास असे वैशिष्ट्य आहे.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या नगरीत वस्त्रोद्योग रुजला आणि फोफावला, पण आता अडचणीत असलेला हा उद्योग सिद्धेश्‍वरांच्या आशीर्वादानेच पुन्हा वाढत राहील! असा विश्‍वासही सत्यराम म्याकल यांनी व्यक्त केला.
-------------------------------------------------
•सोलापूरचा औद्योगिक विकास
सत्यराम म्याकल
सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी काही काळ प्रयत्न करून चालणार नाही तर त्याचा सतत पाठपुरावा करणे गरजेचे आहे. कारण सोलापूरला बसलेल्या ‘सेटबॅक’मधून इतक्या सहजतेने बाहेर काढणे शक्य नाही, त्यासाठी तितकेच प्रबळ प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन, सत्यराम म्याकल यांनी केले. या उद्योगात आता दिवसेंदिवस टेक्स्टाईल कामगारांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो. जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या वाढत्या मागणीचा विचार करता, टेक्स्टाईल उद्योगाचे मोठ्या प्रमाणात ‘ऑटोमेशन’ होणे ही काळाची गरज आहे. कच्च्या मालावर महापालिकेकडून घेतली जाणारी २ टक्के जकात खूपच झाली. ती कमी होणे आवश्यक आहे. शिवाय महापालिकेकडून कोणत्याच बाबतीत सुविधा व सहकार्य मिळत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात कर घेऊनही किमान पाण्याची सुविधा देखील दिली जात नाही. रस्ते, पाणी, ड्रेनेज आदी सुविधांसाठी टीसीआयडीएसकडून १५ कोटी रुपये मिळाले होते. टीसीआयपीएस (टेक्स्टाईल क्लस्टर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम) योजनेखाली साडेचौदा कोटी रुपये मिळाले. एफ्लुएंट ट्रीटमेंंट प्लांटसाठी केंद्राचे १०० टक्के अनुदान असून देखील महापालिका अजूनही याचे काम सुरू करीत नाही. असे असताना सोलापूर महापालिका स्वत:च्या चुका झाकून उद्योजकांवरच आरोप करते, हे सोलापूरच्या उद्योगवाढीला घातक आहे. मनपाकडे उद्योगवाढीसाठी कोणताही उपक्रम नाही, हे खेदाने सांगावे लागते. भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने मनपाने सकारात्मक भूमिका घेतल्यास, सोलापूरच्या उद्योगाला चांगले दिवस येतील. शिवाय सोलापूरच्या उद्योजकांना औद्योगिक वृद्धी आणि अद्ययावत ज्ञानाच्या दृष्टीने मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे.
तरुण भारत, सोलापूर, रविवार, दि. १७ ऑक्टोबर २०१०
सोलापूरला नैसर्गिकदृष्ट्याच पर्यटन विकासाला संधी : इंडियन मॉडेल स्कूलचे अध्यक्ष ए.डी. जोशी
इंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान व संस्कारांचा समन्वय
शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक
 ‘‘सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने येथील शैक्षणिक संस्थांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. सुसंस्कारित विद्वानांच्या पिढ्याच आपल्या गावचे भविष्य घडवणार आहेत. त्यासाठी सोलापुरात आणखीन शैक्षणिक संस्था असणे अपरिहार्य असून शैक्षणिक संस्थांनी अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरुन विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने ज्ञानदान करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ए.डी. जोशी यांनी केले. सोलापूर शहराची व्याप्ती, विद्यार्थ्यांची संख्या पाहता इतर शहरांच्या तुलनेत शिक्षण संस्थांची संख्या कमी आहे. शिवाय असलेल्या शिक्षण संस्थांचा दर्जा देखील इतर शहरांच्या मानाने कमीच असल्याचे मत इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी यांनी व्यक्त केले. चांगल्या किंवा अद्ययावत संस्था सोलापूर शहरात उशिरा आल्या, किंबहुना उच्च शिक्षणासाठी मुंबई, बंगळूर सारख्या शहरातील संस्था सोलापूरात येणे अपेक्षित आहे................................................................................................................
काळ बदलतोय, परिस्थिती बदलतेय आणि त्याप्रमाणे मानवाच्या गरजाही बदलताहेत. जर सोयीचे बदल मनुष्य पटकन स्वीकारतो. पण गैरसोयीचे असतील तर ते बदल स्वीकारण्याची मानसिकताच आजचा सुशिक्षित वर्ग हरवून बसला आहे. इंग्रजांची कारकून निर्माण करण्याची म्हणजेच मॅकॉलेची शिक्षण पद्धती भारतीयांच्या इतकी अंगवळणी पडली आहे की, तो त्यापलीकडे विचारच करू शकत नाही. गेल्या साठ वर्षात पारंपरिक ठरलेल्या या शिक्षण पद्धतीने व्यापक शिक्षणाची आणि आपल्या प्राचीन शिक्षणपद्धतीतील ‘ज्ञानासाठी ज्ञान’ हेे मूळतत्त्व तर कोसो दूर फेकले जाऊन ‘पैशासाठी ज्ञान’ ही संकल्पना रुजली आहे. यात आपण स्वत:च व्यापक ज्ञानार्जनाचे मार्ग बंद करुन टाकले आहेत. पण, अशा प्रतिकूल स्थितीत प्रवाहाच्या विरुद्ध जात व्यापक शिक्षण पद्धतीचा प्रयोग सोलापूरच्या ए.डी. जोशी सरांनी इंडियन मॉडेल स्कूलच्या माध्यमातून केला.  तेव्हा अशक्यप्राय  वाटणारा हा प्रयोग ए.डी. जोशींनी यशस्वी करून दाखवला, दै. तरुण भारतने याविषयी श्री शिक्षण प्रतिष्ठानच्या इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक व अध्यक्ष ए.डी. जोशी, सचिव अमोल जोशी व कार्यकारी संचालिका सायली जोशी यांच्याशी संवाद साधला.
महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करताना आणि नंतर कोचिंग क्लास चालवत असताना मला एक गोष्ट लक्षात आली. की शाळा, शिकवणी आणि घरचा अभ्यास यामध्ये आजचा विद्यार्थी भरडला जाऊन त्याचे बालपण हिरावून घेतले जात आहे, याची जाणीव झाली. यावर काहीतरी उपाय शोधून काढला पाहिजे या विचाराने माझ्या मनात तेव्हापासून रुंजी घालण्यास सुरुवात केली. तेव्हा अमेरिकेत शिक्षण घेऊन भारतात परत आलेले माझे चिरंजीव अमोल यांनी शाळेची संकल्पना मांडली. आम्ही यावर विचार करुन विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीचे शिक्षण देणारी शाळा काढण्याचे ठरवले. त्याकाळात आमचे कोचिंग क्लासेस जोमात चालले होते आणि विद्यार्थ्यांची संख्या व आर्थिक उलाढाल उत्तम होती. चांगले उत्पन्न देणारे क्लास बंद करून शाळा काढण्याच्या संकल्पनेवर काही शिक्षण तज्ज्ञ, शिक्षणाधिकारी सुद्धा उपहासाने हसले. ते म्हणाले, ‘‘सर,  शाळा चालवून तुमचे आर्थिक नुकसान होईल, कशाला शाळा काढण्याच्या फंदात पडता?’’ पण आपण या समाजाचे काहीतरी ऋण देणे लागतो, ही सामाजिक ऋणाची जबाबदारी लक्षात घेऊन हा नवा उपक्रम चालू करण्याचा संकल्प केल्याचे ए.डी. जोशी यांनी सांगितले. सन २००२ साली जागा घेऊन मोठे बांधकाम उभे केले. तेेव्हा अद्ययावत व्यवस्था पुरवण्याइतके आर्थिक पाठबळ नव्हते. त्यामुळे तीन वर्ग, पाच-सहा शिक्षक आणि वाहतुकीसाठी एक बस इतक्या तुटपुंज्या बळावर जुळे सोलापूर सारख्या तेव्हाच्या ओसाड भागात शाळा सुरू केली. इंग्रजी माध्यम, पण मराठी संस्कार असे मूळ सूत्र पाळत बाहेरचा कोणताही आधार न घेता विद्यादानाच्या ज्ञानयागाचा श्री गणेशा केला. माझ्या शाळेच्या विद्यार्थ्याने शिकवणी अगर पालकांचा आधार न घेता स्वत: अभ्यास करुन यश मिळवले पाहिजे हा उद्देश आहे आणि पालकांनी माझ्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिल्याचे ए.डी. जोशी यांनी अतिशय नम्रतापूर्वक सांगितले.
सायली जोशी,  कार्यकारी संचालिका, इंडियन मॉडेल स्कूल
उत्तम दर्जाचे शिक्षण, नाष्टा, जेवण, वाहतूक व्यवस्था, येता जाता दफ्तराचे ओझे नाही, शाळेतच संपूर्ण अभ्यास, शिकवणीची गरजच नाही, यासर्व गोष्टी पालकांच्या लक्षात आल्या आणि पुढे याच गोष्टी संस्थेच्या यशोवृद्धीचे बलस्थान ठरल्या असल्याचे अमोल जोशी यांनी सांगितले. ए.डी. जोशी पुढे बोलताना म्हणाले की, ‘‘माझ्या शाळेचे विद्यार्थी अभ्यासाबरोबरच खेळ आणि कला क्षेत्रात देखील चमकत आहेत, त्यांच्या अष्टपैलू यशाकडे पाहून आमचा आगळावेगळा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून येते.’’ या शिक्षण पद्धतीमुळे माझ्या विद्यार्थ्याचा आत्मविश्‍वास  दुणावला आणि त्यांच्या यशाचे गुणोत्तर अनेक पटीने वाढले. पहिली दहावीची बॅच शंभर टक्के यश घेऊन बाहेर पडली. त्यामुळे पालकांचा आमच्या संस्थेवर विश्‍वास आणि श्रद्धा वाढली. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली. पालकांनी आग्रह केला आणि कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. त्यावर्षी नव्या महाविद्यालयांना परवानगी द्यायची नाही असे सरकारचे धोरण असतानाही पालकांनी पुढाकार घेऊन परवानगी आणली. पालक संस्थेची परवानगी आणतात असे हे एकमेव उदाहरण असावे.
आमच्या कल्पना, शिक्षकांचे मनापासून सहकार्य आणि पालकांचा विश्‍वास यामुळे आमचे यश वाढत गेले. बारावी शास्त्र विभागाचे विद्यार्थी कोणतीही शिकवणी न लावता केवळ महाविद्यालयातील शिक्षण आणि स्वत:च्या अभ्यासाच्या जोरावर उत्तम यश मिळवू शकतात हे इंडियन मॉडेल स्कूलने सिद्ध करुन दाखवले आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. आज शाळेत तीन इमारती आहेत. ३००० विद्यार्थी आणि १०० शिक्षक आहेत.
ग्रामीण विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने अक्कलकोट येथे शाळा सुरू केली. तेथे सुद्धा चांगला प्रतिसाद लाभला आहे. २००९ मध्ये पोलीस खात्याने शाळा सुरू करण्याचे ठरवले आणि ती चालवण्याचे संस्थांना आवाहन केले. तेव्हा पोलीसखात्याने त्यांच्याकडे आलेल्या पंधरा संस्थांच्या प्रस्तावातून आमची निवड केली. यावरुन आमच्या शिक्षण प्रणालीवर किती विश्‍वास आहे हे दिसून आल्याचे  जोशी यांनी अभिमानाने सांगितले.
 विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासात यश न मिळवता खेळ आणि कलेच्या क्षेत्रातही नाव मिळवले पाहिजे हे लक्षात ठेवून आम्ही विशेष मार्गदर्शन करतो आणि त्याचे यश मिळत आहे. आमचे विद्यार्थी सर्व खेळात व कलेत सर्वस्थरावर यश मिळवत आहेत. आमच्या शाळेतील ४० टक्के विद्यार्थी हे ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवतात हा एक विक्रमच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विद्यार्थी हा हुशार असतो, फक्त त्यांना प्रेरणा देणे गरजेचे आहे. आम्ही तेच करतो, त्यांच्यातील आत्मविश्‍वास जागृत केल्यास विद्यार्थी मोठे कर्तृत्व गाजवू शकतात हे सिद्ध झालेले असल्याचे जोशी म्हणालेे.
१६ ते १८ हे वय मुलांच्या दृष्टीने अतिशय नाजूक व महत्त्वाचे आहे.  या वयात होणार्‍या चुकांचे परिणाम पुढे आयुष्यभर विद्यार्थ्यांना भोगावे लागतात, त्यामुळे याकाळात मुलांवर विशेष लक्ष पुरवणे अपरिहार्य ठरते, त्यासाठी ११ वी व १२ वी या दोन्ही इयत्ता कॉलेजमध्ये न राहता हे वर्ग शाळांशीच जोडले जाणे आवश्यक असल्याचे ए.डी. जोशी यांनी आवर्जुन सांगून या योगे या वयातील विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देता येऊ शकत असल्याचे म्हणाले. सर्वच क्षेत्रात खाजगीकरण झाल्यास चांगले बदल होतील. यापूर्वी झालेल्या  खाजगीकरणामुळे हे सिद्ध झाले आहे. आज काळाबरोबर धावत असताना विद्यार्थ्यांना भारतीय संस्कार देणे व ते टिकवणे ही आता काळाची गरज बनली आहे. संस्कारहीन विद्वान असून काहीही उपयोग नाही त्यामुळे संस्काराचे विशेष महत्त्व आहे. विद्यार्थ्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले पाहीजेत, त्यामुळे डोक्यात यशाची हवा न शिरता प्रगतीचा आलेख सतत चढता राहतो.
सामाजिक कार्य - शैक्षणिक कार्याबरोबरच आम्ही सामाजिक कार्यात कार्यरत असल्याचे सांगून जोशी म्हणाले की,  या परिसरात अष्टविनायकाचे मंदिर बांधले आहे, येेथे धार्मिक कार्यक्रम होतात. तसेच अरुणोदय नागरी सहकारी पतसंस्थद्वारे विद्यार्थी व पालकांना आर्थिक सहाय्य देत विविध योजना राबवल्या जातात. ‘साई महिला प्रतिष्ठान’च्या माध्यमातून महिलांना उद्योग व्यवसायासाठी प्रयत्न केले जातात. ‘अलकनंदा जोशी महिला गौरव पुरस्कार’ कर्तृत्ववान महिलांना दिला जातो. हा पुरस्कार सुरू करण्यामागचा हाच दृष्टिकोन आहे.
भविष्यातील उपक्रम - पुढील वर्षी आम्ही ‘योगविद्या वर्ग’ सुरू करत असल्याचे सांगून जोशी म्हणाले की, नाशिक येथील योगविद्याधाम तर्फे योगाचे शास्त्रशुद्ध शिक्षण व परीक्षा घेऊन प्रमाणपत्र दिले जाईल. यामुळे उत्तम आरोग्य व तणावमुक्तीसाठी मदत होणार आहे. लवकरच ‘अलकनंदा जोशी वाचनालय’ देखील सुरू करत आहोत. आज वाचनसंस्कृती हळूहळू लोप पावण्याच्या मार्गावर आहे. म्हणून पालक विद्यार्थी व नागरिकांत वाचनाची गोडी वृद्धिंगत करण्याच्या हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी या वाचनालयात वृत्तपत्र विभाग ठेवणार आहोत.
भविष्यात अनेक योजना साकारण्याचा विचार आहे. सोलापुरातील जनतेचे सहकार्य आहेच व असेच राहिल, अशी अपेक्षा आहे.
................................................................................
•सोलापूरचा सर्वांगीण विकास : ए.डी. जोशी
प्रा. ए. डी. जोशी,  इंडियन मॉडेल स्कूलचे अध्यक्ष
   सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने येथील शैक्षणिक संस्थांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. सुसंस्कारित विद्वानांच्या पिढ्याच आपल्या गावचे भविष्य घडवणार आहेत. त्यासाठी सोलापुरात आणखीन शैक्षणिक संस्था असणे अपरिहार्य असून शैक्षणिक संस्थांनी अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरुन विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने ज्ञानदान करणे आवश्यक आहे. यात सर्वात महत्त्वाचा घटक आहे शिक्षक. शिक्षकांची निवड करताना अतिशय जागरुक राहणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक तितका अभ्यासू असला पाहिजे. विद्यार्थ्यांना शिकवण्यात शिक्षकांची इनव्हॉल्वमेंट असली पाहिजे. हा शिक्षकवर्ग स्वत: अभ्यासू, कामसू व जिज्ञासू असला पाहिजे तरच तो उत्तमोत्तम विद्यार्थ्यी घडवू शकतो. पण दुर्दैंवाने हडाचा शिक्षक ही संकल्पना आता लोप पावत आहे. ज्ञानासाठी ज्ञान अशी भूमिका न ठेवता प्रत्येकजण पैशासाठी ज्ञान अशी मानसिकता बाळगून आहे आणि ती या देशाला घातक ठरणार आहे.
सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने वैद्यकीय आणि पर्यटन व्यवसाय ही बलस्थाने ठरु शकतात. कारण, पर्यटनाच्या दृष्टीने येथे मोठी संधी आहे. सोलापूरमध्ये काय नाही? येथे सर्वच अनुकूलता आहे. असे असताना सोलापूर मागे का आहे तर, सरकारच्या प्रयत्नांच्या कमतरतेमुळे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने मार्केटिंग, वेबसाईटस आणि हॉटेल्स होणे गरजेचे आहे, बाकी सर्व प्रेक्षणीय स्थळे सोलापूर परिसरात आहेत फक्त ते मेंटेन करणे गरजेचे आहे. श्री सिद्धेश्‍वर देवस्थान, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, पंढरीचा विठूराया, तुळजापूरची भवानी, गाणगापूरचे श्री दत्त शिवाय विजापूरचा गोलघुमट आदींच्या सहवासामुळे सोलापूरला नैसर्गिकदृष्ट्याच पर्यटन विकासाला संधी आहे. सोलापूर हे चांगले वैद्यकीय केंद्र होत आहे याला पूरकता निर्माण करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे. याचबरोबर सोलापूरकरांनी मार्केटिंगचे तंत्र शिकणे ही गरजेचे आहे. कारण आपल्याकडे सर्व काही असून त्याचा योग्य प्रचार होत नाही हे देखील सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला घातक ठरत आहे.
पुणे, कोल्हापूर, नाशिक आदी सारखी शेतीच्या दृष्टीने सधन क्षेत्रे बंद करुन तेथे उद्योग धंदे उभारले जात आहेत आणि सोलापूर सारखे माळरान तसेच सोडले जात आहे ही शासनाची भूमिका विसंगत आहे. असे करुन शेती उत्पादनाचे नुकसान करुन घेत आहोत. चांगले शेती उत्पन्न देणारी पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक आदी भागात शेती उत्पादनाला आणखी पूरक करुन सोलापूर सारखे माळरान उद्योग क्षेत्रासाठी वापरले जाणे आवश्यक आहे त्यामुळे राज्याचा समातोल विकास साधणे शक्य होईल. विद्यापीठ आणि उद्योगक्षेत्र यांच्यात समन्वय आवश्यक असून त्यामुळे रोजगाराभिमुख किंवा उद्योगांना लागणारे नेमके शिक्षण विद्यार्थ्यांना मिळू शकेल. शासनाची करप्रणाली अतिशय चुकीची असून, त्या उद्योगाला पूरक असे बदल होणे अपरिहार्य आहे.
...................................................................................
•सोलापूरचा शैक्षणिक विकास : अमोल जोशी
अमोल जोशी,  सचिव,  इंडियन मॉडेल स्कूल 
सोलापूर शहराची व्याप्ती, विद्यार्थ्यांची संख्या पाहता इतर शहरांच्या तुलनेत शिक्षण संस्थांची संख्या कमी आहे. शिवाय असलेल्या शिक्षण संस्थांचा दर्जा देखील इतर शहरांच्या मानाने कमीच असल्याचे मत इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी यांनी व्यक्त केले. चांगल्या किंवा अद्ययावत संस्था सोलापूर शहरात उशिरा आल्या असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात नव्या तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक असताना आपल्या शहरातील संस्था या तंत्रज्ञानाबाबत अद्याप जागरुक झालेल्या दिसत नाहीत. इंटरनेटद्वारे मिळणारे माहिती व ज्ञानाचे भांडार प्रचंड मोठे आहे. याचा वापर आपल्या शालेय विद्यार्थ्यांना झाला पाहिजे त्यासाठी इंडियन मॉडेल स्कूलने शहरात पहिल्यांदा हा उपक्रम राबवला. त्यासाठी अद्ययावत संगणक कक्ष उभा केला आहे. इंटरनेट आणि संगणक शिक्षणाबाबत आम्ही आग्रही असतो. आता इंडियन मॉडेल स्कूलमध्ये सोलापुरात सर्वप्रथम ऑडिओ व्हीजुअल टेक्नॉलॉजीचा वापर सुरु केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कोणतेही क्लीष्ट विषय समजायला सोपे जातात. त्यामुळे सर्वच शैक्षणिक संस्थांनी या अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरणे अपरिहार्य आहे. सोलापुरातील नव्या संस्थांबरोबरच जुन्या संस्थांनीही आता प्रवाह ओळखून प्रवाहाबरोबर गेले पाहिजे. आपल्या सोलापूरच्या संस्थांमध्ये निकोप स्पर्धा असणे आवश्यक आहे. कारण स्पर्धेशिवाय प्रगतीचा वेग वाढत नाही. शहरातील सर्व संस्थांची प्रगती किंवा वाढ समान असणे ही तितकेच महत्त्वाचे असून त्यामुळे संपूर्ण शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठे बळ येईल. शैक्षणिक क्षेत्रात नवनवे प्रयोग करणे ही महत्त्वाचे असून इंडियन मॉडेल स्कूलने हे सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही केलेल्या प्रयोगामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे निदर्शनाला आले आहे. याचबरोबर अभ्यासात नेमकेपणा व स्पेशलायझेशन देखील तितकेच आवश्यक आहे. शिवाय त्यांंच्या प्रगतीची असेसमेंट होणे ही तितके गरजेचे आहे. विद्याथ्यार्ंना कला, क्रीडा, भाषा आदी सर्व विषयात ज्ञान मिळाल्यास या विद्यार्थ्यांत अष्टपैलूत्व निर्माण होताना दिसते.
आजपर्यंत महाराष्ट्र राज्य बोर्डाचा अभ्यासक्रम होता, आता केंद्रिय बोर्डाचा(सीबीएसई) अभ्यासक्रम आमच्या संस्थेत सुरु केलेला आहे. सन २०१३ पर्यंत संपूर्ण भारतभर एकच म्हणजे सीबीएससी अभ्यासक्रमाच्या शाळा असणार आहेत. त्यामुळे सोलापुरातील सर्वच शिक्षण संस्थांनी सीबीएससीचा अभ्यासक्रम अंमलात आणणे महत्त्वाचे आहे.  सध्या कोल्हापुरात १२ सीबीएससी बोर्डाच्या संस्था आहेत. तर सोलापुरात या वर्षी फक्त ३ संस्था आहेत. तसेच इंडियन मॉडेल स्कूलचा सीईटीची इंटरनेटद्वारे तयारीचा उपक्रमही गेल्या दोन वर्षांपासून यशस्वीरित्या सुरू आहे.
तरुण भारत, सोलापूर, रविवार, दि. २६ डिसेंबर २०१०
सतत प्रगती साधायची असेल तर विकास कामात सातत्य महत्त्वाचे : ‘मैंदर्गीरत्न’ ए.जी. पाटील
उद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी 
• उद्योग भरारी : अमर पुराणिक

‘‘सतत प्रगतीसाठी विकास कामात सातत्य असणे महत्त्वाचे असते, असे ‘मैंदर्गीरत्न’ ए.जी. पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. सोलापूर शहराच्या वाढीमुळे जागेची मागणी देखील वाढली आहे. शासन नवे बिगरशेती परवाने देत नसल्याने जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जागेसाठी अवास्तव किंमत मोजावी लागत आहे, त्यामुळे शासनाने बिगरशेती परवाने देणे सुरू करणे आवश्यक आहे. मूलभूत सुविधांच्या बाबतीतही शासन उदासीन आहे. सोलापूरची गृहनिर्माण उद्योगात प्रगती चांगली आहे, पण शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती मात्र निराशजनक आहे. सोलापुरात आणखी शैक्षणिक संस्था निर्माण होणे गरजेचे आहे, शिवाय या संस्थांमधून दर्जेदार शिक्षण मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सोलापूरचा प्रत्येक बाबतीतच दर्जा उत्तम आहे. त्या दर्जाचे संंवर्धन करणेही अत्यावश्यक असून, प्रगतीचा समतोल साधला गेला पाहिजे, असे पाटील यांनी आवर्जून सांगितले. ..................................................
           अण्णाराव गुरुलिंगप्पा पाटील अर्थात ए.जी. पाटील हे एक शालीन, नम्र व धार्मिक व्यक्तिमत्त्व. सोलापूर शहरातील जुळे सोलापुरात नंदनवन निर्माण करणारे ए.जी. पाटील म्हणजे अध्वर्यूच आहेत. बहुसंख्य सोलापूरकर त्यांना ‘काका’ म्हणून ओळखतात. तडफदार शिवसेना नेते व माजी आमदार शिवशरणअण्णा पाटील यांचे ते काका आहेत. बांधकाम आणि शैक्षणिक क्षेत्रांत ए.जी. पाटील यांचे कार्य उल्लेखनीय आहे. बांधकाम व्यवसाय करताना ए.जी. पाटील यांनी फक्त व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक भान देखील राखले आहे. कित्येकांना त्यांनी व्यावसायिकता सोडून अत्यल्प दरात घरे दिली आहेत. या स्वभावातील अनेक उत्तम पैलूंमुळे सोलापूरच्या सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांत ए.जी. पाटीलकाकांचे नाव आदराने घेतले जाते.
ग्रामदैवत शिवचलेश्‍वराच्या वास्तव्याने पुनित झालेल्या मैंदर्गी येथे शेतकरी कुटुंबात ए.जी. पाटील यांचा जन्म झाला. ए.जी. पाटील यांचे वडील गुरुलिंगप्पा यांना ए.जी. पाटील यांच्याबाबत लहानपणापासूनच एक विश्‍वास होता की, अण्णाराव पाटील कुळाचे नाव उज्वल करतील. ए.जी. पाटील यांचे प्राथमिक शिक्षण मैदर्गी येथील श्री इंग्लिश स्कूलमध्ये झाले. माध्यमिक शिक्षणासाठी ते सोलापुरात आले. काडादी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. १० वीपर्यंतचे शिक्षण काडादी हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर ऍग्रिकल्चर डिप्लोमा पूर्ण केला आणि सन १९६० मध्ये शासकीय दूध डेअरीमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरीला सुरुवात केली. १९६१ साली शांताताई पाटील यांच्याशी ए.जी. पाटील यांचा विवाह झाला. ए.जी. पाटील यांनी त्यानंतर केलेली प्रगती पाहता शांताताई या साक्षात लक्ष्मीच्या रूपाने ए.जी. पाटील यांच्या जीवनात आल्या, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ए.जी. पाटीलकाकांना दोेन मुली व दोन मुले अशी चार अपत्यं असून, ज्येष्ठ चिरंजीव सिद्धेश्‍वर अण्णाराव पाटील हे ए.जी. पाटलांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक संस्थांचा कार्यभार पाहतात, तर संतोष अण्णाराव पाटील हे कनिष्ठ चिरंजीव बांधकाम व्यवसायाची धुरा वाहतात.
आपली जन्मभूमी मैदर्गी येथील ज्या शाळेत आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला, त्या शाळेचे ए.जी. पाटीलकाकांनी पुनरुज्जीवन केले. त्या श्री इंग्लिश मीडियम स्कूलचे ते गेली १८ वर्षे अध्यक्ष देखील आहेत. ग्रामीण भाग असून देखील ए.जी. पाटीलकाकांनी कोट्यवधी रुपये खर्चून या शाळेत, शाळेची अत्याधुनिक इमारत, विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जन्मगावाचे ऋण आणि सामाजिक जाणिवेतून ए.जी. पाटील काका यांनी मैंदर्गीतील विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधा देण्याचा सतत प्रयत्न केला आहे. न्यू इंग्लिश स्कूलमध्येच कनिष्ठ महाविद्यालयाचीही सुरुवात ए.जी. पाटील यांनी केली. कनिष्ठ महाविद्यालयामुळे मैंदर्गीचा नावलौकिक वाढला. मैंदर्गीग्रामाच्या शैक्षणिक गरजांबरोबरच सामाजिक क्षेत्रातही मोठे काम केले आहेे. ए.जी. पाटीलकाका यांची वृत्तीच मुळी धार्मिक व सालस असल्याने त्यांची आपल्या जन्मगावचे ग्रामदैवत ‘श्री शिवचलेश्‍वरा’वर प्रचंड श्रद्धा आहे. त्यांच्या यशाचे श्रेय म्हणजे श्री शिवचलेश्‍वराचाच आशीर्वाद आहे असे ते मानतात. त्यांनी १९८२ मध्ये मैंदर्गीचे ग्रामदैवत श्री शिवचलेश्‍वर देवस्थान ट्रस्टची नोंदणी केली. देवस्थानचा जीर्णोद्धार केला. त्या ट्रस्टचे देखील ए.जी. पाटीलकाकाच अध्यक्ष आहेत. ए.जी. पाटीलकाकांनी मैंदर्गीत केलेल्या कार्याची दखल घेत मैंदर्गी ग्रामस्थांनी त्यांना ‘मैंदर्गीरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
ए.जी. पाटील यांनी १९७३  साली बांधकाम व्यवसायाचा श्रीगणेशा केला. सर्वप्रथम जुळे सोलापुरातील विजयनगरचा प्रकल्प सुरू केला. त्यानंतर १९७५ साली जुने संतोषनगर, १९८४ मध्ये नवीन संतोषनगर, शांती अपार्टमेंटचा प्रकल्प साकारला. तत्पश्‍चात  शिवगंगानगरचा प्रकल्प पूर्ण केला. ए.जी. पाटील यांच्या धार्मिक व सात्विक वृत्तीचे प्रतीक म्हणजे या प्रत्येक प्रकल्पात त्यांनी एकेक मंदिर बांधले आहे. जुन्या संतोषनगरामध्ये गणपती मंदिर आहे, तर नव्या संतोषनगरामध्ये लक्ष्मी मंदिर आहे आणि शिवगंगानगरमध्ये संतोषीमातेचे मंदिर बांधले आहे.
सन १९९८ साली शांती एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून, शांती इंग्लिश स्कूल सुरू करून शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी उडी घेतली. शैक्षणिक क्षेत्रात ए.जी. पाटील यांनी भव्य यश संपादन केले. संतोषनगरमधील शांती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरी ते १२ वीपर्यंतच्या शिक्षणसुविधा दिल्या जातात. शांती इंग्लिश मीडियम स्कूलचा गेल्या तीन वर्षांपासून १०० टक्के निकाल लागत आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणणार्‍या ए.जी. पाटीलकाकांनी आपल्या सर्वच शिक्षणसंस्थांत शैक्षणिक दर्जाला विशेष महत्त्व दिले आहे. उच्चतम दर्जाकडे पाटील काकांचा नेहमीच कटाक्ष असतो. शांती इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरातच शांती डी.एड. कॉलेजही सुरू केले आहे. शिवगंगानगर येथे आजच्या युगातील तंत्रशिक्षणाचे महत्त्व जाणून ए.जी. पाटीलकाकांनी शांती आयटीआयची स्थापना केली. त्यानंतर ए.जी. पाटीलकाकांचे ज्येष्ठ चिरंजीव सिद्धेश्‍वर पाटील यांनी ए.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला, तो म्हणजे इंजिनीअरिंग कॉलेजचा. सिद्धेश्‍वर पाटील यांनी २००७ मध्ये ‘ए.जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ची स्थापना केली. आज ही संस्था अल्पावधीतच नावारूपाला आली आहे. ए.जी. पाटीलकाकांचा स्वभावच मुळी अलिप्त राहण्याचा.  राजकारण, प्रसिद्धीपासून ते लांब राहणेच पसंत करतात. ए.जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या उद्‌घाटनासाठी कोणताही राजकीय किंवा प्रसिद्धीचा प्रपोगंडा न करता इंजिनीअरिंग कॉलेजचे उद्‌घाटन प्रथम प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याच्या हस्ते केले.
ए.जी. पाटील यांना मोलाची साथ देणारी व्यक्ती म्हणजे शिवसेना नेते, माजी आमदार शिवशरणअण्णा पाटील.  खरे तर ए.जी. पाटीलकाका आणि शिवशरणअण्णा पाटील हे एकमेकांना पूरक अशी साथ देत असतात. शिवशरण पाटील यांच्या सर्वच्या सर्व निवडणुकांची धुरा ए.जी. पाटीलकाकांनी वाहिली आहे. शिवशरण पाटील हे आपल्याला आमदार बनवणारे शिल्पकार म्हणून ए.जी. पाटीलकाकांना मोठ्या आदराने संबोधतात. आपल्या यशात सिंहाचा वाटा ते पाटीलकाकांना देतात. ए.जी. पाटीलकाकांचे आपल्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम शिवशरणअण्णांवर आहे. शिवशरणअण्णा जेव्हा आमदार झाले, तेव्हा ए.जी. पाटीलकाकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते, हे अनेकांनी पाहिले आहे. शिवशरणअण्णा आमदार झाल्याचा आनंद शिवशरणअण्णांपेक्षाही ए.जी. पाटीलकाकांना अधिक झाला होता. शहरातील आपल्या कार्याचा व्याप सांभाळत असातानाही मैंदर्गीकडे दुर्लक्ष कधीच झाले नाही. सतत ते मैंदर्गीला जात असतात, तेथील कामांकडे स्वत: लक्ष देतात.
इतकं मोठं यश संपादन करूनही ए.जी. पाटीलकाकांना गर्वाची बाधा नाही. त्यांनी विनयशीलता कधी सोडली नाही. विनयशीलता ही काकांच्या रक्तातच भिनली असून, विनयशीलता हा एक त्यांचा दागिना आहे. काका सतत प्रसिद्धीपासून लांबच राहिले. स्वत:च्या कार्याचा कधीही गवगवा त्यांनी केला नाही, किंबहुना जाणीवपूर्वक ते प्रसिद्धी टाळत राहिले असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही, पण असे असले तरीही त्यांच्या कार्याची दखल सुजाण सोलापूरकरांनी घेतली. मैंदर्गीच्या ग्रामस्थांनी त्यांना ‘मैंदर्गीरत्न’ पुरस्कार बहाल केला. सोलापुरातील बसवभक्तांनी त्यांना ‘बसवश्री’ पुरस्काराने सन्मानित केले, तर जानेवारी २०१० मध्ये नवी दिल्लीच्या सिटिझन्स इंटिग्रेशन पीस सोसायटी या ख्यातनाम संस्थेच्या वतीने ‘उद्योगरत्न’ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. आपल्या सर्वसमावेशक स्वभावामुळे काका सार्‍यांनाच आपलं मानतात, आपल्यात सामावून घेतात. इतरांचे अश्रू पुसतात, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होतात. आज सर्व सुखं काकांच्या दारात हात जोडून उभी असली तरीही ए.जी. पाटीलकाका दु:खी, कष्टी माणसांना विसरत नाहीत. येवढं सगळं कर्तृत्व गाजवूनही ए.जी. पाटीलकाका म्हणतात की, ‘‘ही सर्व श्री सिद्धरामेश्‍वर आणि श्री शिवचलेश्‍वरांचीच कृपा आहे!’’ येत्या मे महिन्यात म्हणजे ८ मे २०११ रोजी ए.जी. पाटीलकाकांचा भव्य असा ‘अमृतमहोत्सव’ त्यांच्या समर्थकांकडून साजरा केला जात आहे.
ए.जी. पाटील यांनी अनेक दशकं श्रम करीत कोणाच्याही पाठिंब्याविना स्वकष्टातून जे भव्य यश संपादित केले आहे, त्याला उपमा नाहीच! त्यांच्या या यशात ए.जी. पाटीलकाका सर्व आप्त, सहकारी, मित्रांना समावून घेतात. त्यांना सर्व लोकांचे खूप सहकार्य लाभल्याचेही ते नम्रपणे नमूद करतात. त्यांच्या या यशाला, या दैवी आशीर्वादाबरोबरच त्यांनी जपलेली काही मूलतत्त्वे देखील कारणीभूत आहेत. ए.जी. पाटीलकाका नीतिमत्तेला खूप महत्त्व देतात आणि कसोशीने नीतिमत्ता जपतात. याशिवाय कामाप्रती असलेली निष्ठा देखील त्यांच्या यशाला तितकीच कारणीभूत आहे. काकांचे दुसरे तत्त्व आहे, ‘‘कोणालाही कमी लेखू नका, तिसरे तत्त्व म्हणजे कोणावरही अन्याय करू नका! आणि कोणी अन्याय केलाच तर सहनही करू नका! काकांच्या यशाला ही तत्त्वे खरेच समर्पक, समर्थक आणि सामर्थ्यवान ठरली आहेत.
-------------------------------------------------------------------
•सोलापूरचा औद्योगिक विकास  : ‘मैंदर्गीरत्न’ ए.जी. पाटील
‘मैंदर्गीरत्न’ ए.जी. पाटील
सोलापूरची औद्योगिक प्रगती चांगली आहे, पण ती स्थिर नाही. सतत प्रगती साधायची असेल तर विकास कामात सातत्य असणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ‘मैंदर्गीरत्न’ ए.जी. पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना केले.
सोलापूर शहराच्या वाढीमुळे जागेची मागणी देखील वाढली आहे. शासन नवे बिगरशेती परवाने देत नसल्याने जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जागेसाठी अवास्तव किंमत मोजावी लागत आहे. सोलापूरची वाढ लक्षात घेऊन शासनाने बिगरशेती परवाने देणे सुुरू करणे आवश्यक असल्याचे मत ए.जी. पाटील यांनी व्यक्त केले. शिवाय मूलभूत सुविधांच्या बाबतीतही शासन उदासीन आहे. सोलापूरची गृहनिर्माण उद्योगात प्रगती चांगली आहे, पण शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती मात्र निराशजनक आहे. सोलापुरातील विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांच्या भवितव्याचा विचार केल्यास सोलापुरात आणखी शैक्षणिक संस्था निर्माण होणे गरजेचे आहे, शिवाय या संस्थांमधून दर्जेदार शिक्षण मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे पाटील म्हणाले.
सोलापूरचा प्रत्येक बाबतीतच दर्जा उत्तम आहे. त्या दर्जाचे संंवर्धन करणेही अत्यावश्यक असल्याचे पाटील यांनी आवर्जून सांगितले. सोलापूरची जरी नैसर्गिकरीत्या प्रगती होत असली तरी सामाजिक, राजकीय, औद्योगिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रांत प्रगतीचा वेग वाढणे व त्याचा समतोल साधला गेला पाहिजे, असा आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा सल्लाही ए.जी. पाटील यांनी दिला.
तरुण भारत, सोलापूर, रविवार, दि. २१ नोव्हेंबर २०१०