This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
अस्थिर धोरणांचा उद्योगांवर विपरित परिणाम : किशोर कटारे
कटारे उद्योगसमूह : सोलापूरच्या उद्योगातील महामेरू
 • उद्योग भरारी : अमर पुराणिक
सतत धोरणे बदलल्याने देशातील उद्योगांना अवकळा आली आहे. पतधोरणे ठरताना त्यात सातत्य आणि स्थिरता असणे बंधनकारक असल्याचे सांगून किशोर कटारे यांनी ‘अस्थिर धोरणांचा विपरित परिणाम गुंतवणूकदारांवर होतो’’ हे विधान अधोरेखित केले. ‘केवळ सवलती दिल्याने उद्योग वाढेल ही संकल्पना चुकीची आहे. मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती होणे कदापी शक्य नाही, भारतात सर्वात जास्त जकात सोलापूर महानगरपालिका आकारते. जकात रद्द केली तर मनपाला फारसा फरक पडणार नाही. महानगरपालिकेने तज्ज्ञांची समितीच अर्थसंकल्पासाठी नेमावी. त्यामुळे मनपाचा महसूल सर्वसामान्य सोलापूरकरांच्या खिशाला चटका न देता, उद्योजकांच्या उद्योगाला धक्का न देता वाढवता येणे सहज शक्य आहे. कोणत्याही प्रगतीत यंत्रणा काम करीत असते, योजना नव्हे. त्यामुळे नुसत्याच योजना करून काहीही होणार नाही, तर त्या राबविण्यासाठी कुशल यंत्रणा असणे अत्यावश्यक असते.
......................................................................................................
अर्थ आणि परमार्थ, व्यवसाय आणि अध्यात्म, कार्यप्रवणता आणि ध्यानधारणा असा समतोल साधणार्‍या कटारे कुटुंबाचे सोलापूरच्या औद्योगिक विकासाला मोठे योगदान लाभले आहे. कटारे उद्योगसमूहाने उद्योगाच्या संहिता पाळत विस्तृत व व्यापक दृष्टिकोन ठेवून विकास साधला. सोलापूरवासीयांना रोजगार उपलब्ध करून दिला. आज शहरात कटारे उद्योगसमूहाचा विभाग असलेल्या जगन्मातेच्या नावाने परिचित असलेले ‘हॉटेल त्रिपुरसुंदरी’ मोठ्या दिमाखात उभे आहे. अशा उद्यमशील कटारे परिवारातील कटारे उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक किशोर कटारे यांनी दै. ‘तरुण भारत’च्या ‘उद्योग भरारी’शी संवाद साधला. 
कटारे टेक्स्टाईल्सची स्थापना कटारे उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक किशोर कटारे यांचे वडील तिप्पण्णा तुळशीराम कटारे यांनी सन १९४९ साली करून आपल्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. ६१ वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सध्या कटारे उद्योगसमूहाची धुरा विजय तिप्पण्णा कटारे, सुभाष तिप्पण्णा कटारे आणि किशोर तिप्पण्णा कटारे बंधुत्रयी वाहतात. यापैकी विजय कटारे हे अध्यक्ष आहेत, तर किशोर कटारे हे व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा संभाळतात आणि सुभाष कटारे हे संचालक आहेत. कटारे कुटुबीयांची तिसरी पिढी देखील आता व्यवसायात उतरली असून, राकेश कटारे व सचिन कटारे हे देखील कटारे उद्योगाच्या संवर्धनात कार्यरत आहेत. 
विजय कटारे
अध्यक्ष
सुरुवातीला तिप्पण्णा कटारे यांनी ‘कटारे टेक्स्टाईल्स’ या नावाने साड्यांचा कारखाना सुरू केला. सुरुवातीला साखरपेठेत ४ लूम्सवर हा व्यवसाय सुरू केल्याचे सांगून किशोर कटारे म्हणाले की, नंतर त्यांनी साड्यांबरोबरच चादरींचेही उत्पादन सुरू केले. त्यानंतर १९६२ साली अशोक चौक येथे उद्योगाचे विस्तारीकरण केले. सन १९७४ साली तुळशीदास कटारे यांनी अक्कलकोट रोड एमआयडीसीत सूत उत्पादनाचा (स्पिनिंग मिल) प्रकल्प सुरू केला. त्यानंतर तामलवाडी येथे सन १९७९ साली २५ हजार स्पिंडल आणि १० हजार डब्लिंग अशी एकूण ३५ हजार क्षमतेची सूतगिरणी उभी केली आणि १९८२ साली या सूतगिरणीत सुताचे उत्पादन सुरू झाले.१९९२ साली कटारे स्पिनिंग मिलच्या दुसर्‍या युनिटची सुरुवात करण्यात आली. तामलवाडीतील कमलानगर येथे सुरू केलेल्या या युनिटमध्ये १२ हजार ५०० स्पिंडलची सूतगिरणी सुरू केली. सूत उत्पादन उद्योगवृद्धीच्या एकेक पायर्‍या पादाक्रांत करणार्‍या कटारे उद्योगाच्या या यशस्वी वाटचाली बरोबरच कटारेबंधूंनी नव्या क्षेत्रात उडी घेतली आणि २० मार्च १९९७ साली सोलापूर शहराचे वैभव ठरलेल्या ‘हॉटेल त्रिपुरसुंदरी’ची सुरुवात केली. आज सोलापूरच्या प्रगतीत आघाडी घेतलेले त्रिपुरसुंदरी हॉटेल सोलापूरचे नामांकित हॉटेल ठरले आहे. 
सुभाष कटारे 
संचालक
त्यानंतर २००० साली नव्या शतकात कटारे उद्योग समूहाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. कटारे उद्योगसमूहाने ऊर्जानिमिर्तीच्या क्षेत्रात प्रवेश केला. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात व्यंकुसावाडी येथे ३.५ मेगावॅट क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प सुरू केला असल्याचे सांगून, आता आणखीन २.५ मेगावॅट क्षमतेच्या वीजनिमिर्तीचे विस्तारीकरण लवकरच करणार असल्याचा मानस किशोर कटारे यांनी व्यक्त केला. तसेच तुळजापूर मार्गावर नवीन पंचतारांकित हॉटेल येत्या दोन वर्षांत सुरू करणार असल्याचा संकल्प किशोर कटारे यांनी बोलून दाखवला. या पंचतारांकित हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
 कटारे उद्योगसमूहांतर्गत कटारे स्पिनिंग मिल्स, कटारे कॉटन वेस्ट स्पिनिंग मिल, कमल मार्केटिंग प्रा. लि., श्री कमला साखर उद्योग लि., कटारे पॉवर्स लि. आणि कमला शैक्षणिक आणि वैद्यकीय संशोधन केंद्र आदी प्रकल्प चालविले जातात. कटारे उद्योगसमूहाची मागील वर्षाची उलाढाल ३०० कोटी रुपयांची होती. तर येत्या वर्षात ३६० कोटी रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट आहे. कटारे उद्योगसमूहाला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी उद्योगश्री, उद्योगरत्न, विजयरत्न असे काही सन्माननीय पुरस्कार लाभलेले आहेत. भारतातील बहुसंख्य मोठे उद्योजक, औद्योगिक घराणी ही टेक्स्टाईल्स उद्योगातूनच पुढे आलेली असल्याचे किशोर कटारे यांनी सांगितले. त्यापैकी, रिलायन्सचे धीरूभाई अंबानी (विमल), मफतलाल, रतन टाटा, बिर्ला आदींसारख्या काही उद्योजकांकडे किशोर कटारे यांनी लक्ष वेधले. कटारे परिवाराबद्दल व उद्योगांविषयी लिहीत असताना कटारे कुटुंबीयांच्या आध्यात्मिक व धार्मिक कार्याचा उल्लेख टाळता येणार नाही. जगन्माता त्रिपुरसुंदरी महालक्ष्मीचे कटारे कुटुंबीय भक्त आहेत, तसेच साधक देखील आहेत. रोजची संध्यासाधना नियमित होत असल्याचे किशोर कटारे यांनी सांगितले. कटारे यांनी कमलानगर (तामलवाडी) येथे महालक्ष्मीचे भव्य मंदिर बांधले आहे. अतिशय प्रसन्न वातावरण लाभलेले हे मंदिर म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराची प्रतिकृती आहे. येथे अनेक धार्मिक सेवा चालवल्या जातात. अशाप्रकारे कटारे परिवाराने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साधले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!
....................................................................................................
•सोलापूरचा औद्योगिक विकास - व्यवस्थापकीय संचालक किशोर कटारे
किशोर कटारे
व्यवस्थापकीय संचालक
शासनाकडे अखंड प्रगतीसाठी योग्य दिशेच्या आणि लांब पल्ल्याच्या योजना असणे नितांत गरजेचे असल्याचे किशोर कटारे म्हणाले. दर ५ वर्षाला सरकारने योजना बदलणे हे उद्योगवाढीला घातक आहे. दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. कारण आज उद्योगात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. अशा वातावरणात सतत धोरणे बदलल्याने देशातील उद्योगांना अवकळा आली आहे. शासनाने लघूद्योग, मध्यमोद्योग आणि मोठ्या उद्योगांसाठी पतधोरणे ठरताना त्यात सातत्य आणि स्थिरता असणे बंधनकारक असल्याचे सांगून किशोर कटारे यांनी ‘अस्थिर धोरणांचा विपरित परिणाम गुंतवणूकदारांवर होतो’ हे विधान अधोरेखित केले. केवळ सवलती दिल्याने उद्योग वाढेल ही संकल्पना चुकीची आहे. त्यामुळे मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती होणे शक्य नाही, असे ठाम प्रतिपादन किशोर कटारे यांनी केले. सोलापूर महापालिकेने जकात हटवावी किंवा ती माफक ठेवावी. कारण आज भारतात सर्वात जास्त जकात सोलापूर महापालिकाच आकारते. जर जकात उठवली गेली तर मनपा बजेटमध्ये फारसा फरक पडणार नाही. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात अर्थतज्ज्ञ, अभ्यासक, उद्योजकांचे मार्गदर्शन मनपाने घ्यावे किंवा अर्थतज्ज्ञांची समितीच अर्थसंकल्पासाठी नेमावी. त्यामुळे मनपाचा महसूल सर्वसामान्य सोलापूरकरांच्या खिशाला चटका न देता, उद्योजकांच्या उद्योगाला धक्का न देता आणि सर्वसामान्य सोलापूरकरांवर अवास्तव कर न लादता वाढवता येणे सहज शक्य आहे. अर्थसंकल्पावर अभ्यास, पृथ्थकरण आणि समीक्षण होणे आवश्यक आहे. मनपाने सोलापूरकरांवर जकात न लादता, ती मोकळी करावी. त्यामुळे चोर्‍या कमी होतील. सोलापूरच्या उद्योगवाढीबाबत बोलताना किशोर कटारे म्हणाले की, सोलापूर शहरात लेेबर ओरिएंटेड उद्योग उभारणे आवश्यक आहे. कॉमन इंडस्ट्री सिस्टिम (सीकेटी) असलेल्या उद्योगांमुळे शहराची वेगात प्रगती होते. रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. सोलापुरात रोजगार नसल्याने सोलापूरकर सोलापूर सोडून जात आहेत. जगात लोकसंख्या कमी होणारे सोलापूर हे एकमेव शहर असल्याचे नमूद करून किशोर कटारे म्हणाले की, कोणत्याही प्रगतीत यंत्रणा काम करीत असते, योजना नव्हे! त्यामुळे नुसत्याच योजना करून काहीही होणार नाही, तर त्या राबविण्यासाठी कुशल यंत्रणा असणे अत्यावश्यक असते. महानगरपालिकेने एक बिझनेस कमिटी नेमावी. यात अर्थतज्ञ, उद्योजक, व्यवस्थापनतज्ज्ञ असावेत. मनपाच्या अर्थसंकल्पाचे प्रेझेंटेशन या बिझनेस कमिटीकडून घ्यावे. त्यामुळे विकासयोजनेचा आराखडा तयार करून त्या नियोजनाप्रमाणे काम केल्यास शहरविकास, उद्योगविकास होईल. त्यामुळे मनपाचा महसूल वाढण्यासही मोठी मदत होणार आहे. राज्य व केंद्र सरकारची अनुदाने सोलापूर प्रशासन, मनपाने उपयोगात आणावीत. प्रगतीची काही सूत्रे सांगताना कटारे म्हणाले की, प्रत्येकाच्या कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे. कडकपणे धोरणे राबविली पाहिजेत. घर स्वच्छ ठेवले नाही तर पाहुण्यांना कसे बोलावणार? त्यासाठी शहर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यातून अनेक स्रोत निर्माण होतील. कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्प, पवनऊर्जा प्रकल्प राबविल्यास ‘बँकिंग ऍन्ड विलिंग’ पद्धतीने मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होऊ शकते व वीज वापरता येऊ शकते. जर मनपाला असले प्रकल्प करता येणार नसतील, तर असे प्रकल्प किंवा छोट्या छोट्या गोष्टी जसे, शहरातील दिवाबत्ती आदीचे मेंटेनन्स शहरातील इच्छुक कंपन्यांना द्यावे, त्यामुळे सोलापूरकरांना सोयी उपलब्ध करून देता येऊ शकतील.
.......................................................................................................
दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी, रविवार, दि. २४ ऑक्टोबर २०१०
शासनाचा उद्योगाप्रती ‘प्रो-ऍक्टिव्ह ऍप्रोच’ असावा : काशीनाथ ढोले 
क्रॉस इंटरनॅशनलच्या ऑईल सील्सवर धावते जग
 • उद्योग भरारी : अमर पुराणिक
‘‘क्रॉस इंटरनॅशनल सोलापूर शहराला आंतरराष्ट्रीय कीर्ती देणारे नाव. भारतातल्या ऑटोमोबाईल उद्योगातील ऑईलसील उत्पादनात सीलिंग रिंगसारख्या मोनोपॉली असलेल्या उत्पादनात अग्रमानांकित कंपनी आहे. शून्यातून विश्‍व निर्माण करणारे क्रॉस इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काशीनाथ ढोले यांनी आपल्या कंपनीची कलेकलेने, कल्पकतेने आणि अनेक अडचणींना खंबीरपणे तोंड देत प्रगती साधली. त्यांनी कंपनीच्या प्रगतीबरोबरच सोलापूरचे नाव ऑटोमोबाईल क्षेत्राच्या जागतिक पटलावर सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.’’
...............................................................................................................................
आशीष ढोले
मुख्य संचालन अधिकारी, क्रॉस इंटरनॅशनल, सोलापूर.
क्रॉस इंटरनॅशनल सोलापूर शहराला आंतरराष्ट्रीय कीर्ती देणारे नाव. भारतातल्या ऑटोमोबाईल उद्योगातील ऑईलसील उत्पादनात सीलिंग रिंगसारख्या मोनोपॉली असलेल्या उत्पादनात अग्रमानांकित कंपनी आहे. शून्यातून विश्‍व निर्माण करणारे क्रॉस इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काशीनाथ ढोले यांनी आपल्या कंपनीची कलेकलेने, कल्पकतेने आणि अनेक अडचणींना खंबीरपणे तोंड देत प्रगती साधली. त्यांनी कंपनीच्या प्रगतीबरोबरच सोलापूरचे नाव ऑटोमोबाईल क्षेत्राच्या जागतिक पटलावर सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. आज क्रॉस इंटरनॅशनल जगद्विख्यात झाली असताना, आपल्या वडिलांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवीत क्रॉस इंटरनॅशनलची धुरा समर्थपणे वाहणारे नव्या पिढीचे उद्योजक आणि क्रॉस इंटरनॅशनलचे मुख्य संचालन अधिकारी (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) आशीष काशीनाथ ढोले सोलापुरातील तरुण उद्योजकांत अग्रस्थानी आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.१२ वर्षे नोकरी केल्यानंतर काशीनाथ रेवप्पा ढोले यांनी १९८७ साली क्रॉस इंटरनॅशनलची स्थापना केली. सुरुवातीला सीलिंग रिंग आणि फ्रिक्शन पॅड या दोन उत्पादनांची सुरुवात करून आज अनेक उत्पादनांत क्रॉस इंटरनॅशनलने आघाडी घेतली आहे. त्या काळात टाटा मोटर्स ‘सीलिंग रिंग’ व ‘फ्रिक्शन पॅड’ ही दोन उत्पादने जर्मनीतून आयात करीत होती. सन १९८७ पर्यंत याचे उत्पादन भारतात कोणीही करीत नव्हते. आंतरराष्ट्रीय दर्जा आणि मानांकनाप्रमाणे ही दोन उत्पादने सुरू करून क्रॉस इंटरनॅशनलने या उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा टाटा मोटर्सला सुरू केला. हळूहळू क्रॉस इंटरनॅशनलचा पसारा वाढू लागला. टाटा मोटर्सनंतर क्रॉस इंटरनॅशनल भारतीय बाजारपेठेत उतरली आणि पाहता पाहता आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्पादनांच्या बळावर भारतीय बाजारपेठही काबीज केली. आज भारतातील सीलिंग रिंगची एकूण ९२ टक्के बाजारपेठ क्रॉस इंटरनॅशनलच्या ताब्यात असून, आजही ही उत्पादने आम्ही एकटेच बनवीत असल्याने आमची मोनोपॉली कायम असल्याचे आशीष ढोले यांनी अभिमानाने सांगितले. टाटा मोटर्सनंतर महिंद्रा ऍन्ड महिंद्रा, यामाहा, फोर्स मोटार्स, सिमसन ऍन्ड कंपनी(इंग्लंडमधील ट्रॅक्टर इंजिन बनविणारी कंपनी), क्रॉम्पटन ग्रीव्हज, बजाज ऑटो, किर्लोस्कर आदी कंपन्यांना या उत्पादनांची निर्यात अखंडपणे सुरू आहे.चार वर्षांनंतर काशीनाथ ढोले यांनी उद्योगातील यशस्वी पदार्पणानंतर १९९१ साली सनबर्ड प्लास्टिक इंडस्ट्रीज या प्लास्टिक पॅकिंग डिव्हिजची सुरुवात केली. हा उद्योग काशीनाथ ढोले यांच्या सुविद्य पत्नी आणि आशीष ढोले यांच्या मातोश्री सौ. सुनिता ढोले या चालवितात. या उद्योगाचे वैशिष्ट्य म्हणजे या उद्योगात १०० टक्के महिलाच काम करतात. महिलांना रोजगाराभिमुख करून महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने हा उद्योग सुरू केला असल्याचे आशीष ढोले यांनी सांगितले.
१९९८ मध्ये क्रॉस पॉलिमर्स हा रबर बेस्ड ऑईलसील उत्पादनाचा तिसरा प्रकल्प सुरू केला. येथे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून ऑईलसील्स बनवली जातात. येत्यावर्षी चिंचोळी एमआयडीसी येथे नवा प्रकल्प सुरू करीत असल्याचे सांगून अशीष ढोले म्हणाले की, या प्रकल्पातून एप्रिल २०११ पासून उत्पादनाला सुरुवात होईल. येथे ‘पीटीएफई’ अर्थात पॉलिटेट्रा फ्लोरो इथिलीन हे आधुनिक पद्धतीचे ऑईलसील उत्पादित केले जाणार आहे. या प्रकल्पात वापरले जाणारे तंत्रज्ञान हे २१ व्या शतकातील जगातील सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान असेल. तसेच आणखी काही मोनोपॉली असलेली उत्पादने काही मोठ्या कंपन्यांच्या सहकार्याने सुरू करण्याचाही विचार असल्याचे ढोले यांनी सांगितले. क्रॉस इंटरनॅशनलमधून ऑटोमोबाईल क्षेत्रातील जागतिक दर्जाची एकूण सात उत्पादने घेतली जातात. यात क्रँकशाफ्ट सील, ऑईलसील, ओ-रिंग, स्पेशल पीटीएफई सील्स, कॅसेट टाईप सील्स, वॉल्व्ह स्टॅम्प सील्स आणि गॅसकेट आदी उत्पादनांचा समावेश आहे. महिन्याला साधारणपणे साडेपाच लाख ऑईल सील्सची विक्रमी विक्री होतेे. क्रॉस इंटरनॅशनलची उत्पादने युरोप, दक्षिणपूर्व अशिया, लॅटीन अमेरिका आणि आफ्रिका आदी देशांत निर्यात केली जातात.कंपनीची मागील वर्षाची उलाढाल २५ कोटी रुपये होती, तर यावर्षी ३५ कोटींपर्यंत उलाढाल अपेक्षित आहे. क्रॉस इंटरनॅशनल लवकरच हेड गॅसकेटचे उत्पादन देखील सुरू करणार आहे. ‘इंजिन बेस्ड सीलिंग मटेरियल’ हे अतिशय नाजूक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे याला ‘व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट’ म्हटले जाते. क्रॉस इंटरनॅशनलच्या ‘ड्रिव्हन बाय इनोव्हेशन’ या घोषवाक्याला साजेशा टेक्नॉलॉजी ओरिएंटेड उत्पादने देण्यावर भर राहिला आहे, त्यामुळे पर्यायाने संशोधनावर विशेष भर दिला जातो. आमचा संशोधन आणि विकास (आर. ऍन्ड डी.) विभाग अतिशय प्रबळ असून, या विभागात उत्पादनाची गुणवत्ता, दर्जा, कमी किंमत आणि उत्पादन क्षमतेवर लक्ष केंद्रित केले जाते.सध्या सर्व जगाचे लक्ष भारताकडे असल्याचे सांगून आशीष ढोले म्हणाले की, ऑटोमोबाईल उत्पादनांच्या क्षेत्रात भारताला प्रचंड संधी आहेत. सर्व साधनांची उपलब्धता भारतातच आहे, केवळ १० ते १५ टक्के कच्चा माल आयात करावा लागतो. त्यामुळेच भविष्यात भारताशी अन्य कोणीही स्पर्धक देश निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. उद्योगात भारतीयांना दिलेले वचन, नियम पाळण्याची सवय नाही. परदेशी कंपन्या आपल्या भारतात येऊ लागल्या व आपल्याशीच स्पर्धा करू लागल्या. आपल्या भारतातील पैसा त्यांच्या देशात नेऊ लागल्या आहेत. त्यामुळे भारतीय पैसा परदेशाकडे वळत आहे. केवळ या दोषांमुळे मागे पडण्याची भीती होती, पण परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेमुळे आता भारतीय लोक आणि भारतीय कंपन्यादेखील हळूहळू ही तत्त्वे पाळू लागल्या आहेत. कमिटमेंंट म्हणजे दिलेला शब्द पाळणे आणि ओव्हर कमिटमेंट, जसे अवास्तव किंवा आपल्या क्षमतेबाहेर शब्द देणे हे प्रकार कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे आता यात चांगली सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे, पण हा सुधारणेचा वेग वाढणे आवश्यक आहे.
क्रॉस इंटरनॅशनलला आयएओ/ टीएस : १६९४९-२००२ चे मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच हॉलंड येथील बीव्हीक्यूआयचे मानांकन देखील प्राप्त झाले आहे. लवकरच आयएसओ : १४००१ चे मानांकन देखील मिळेल. कंपनीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे ‘झीरो पीपीएम’ रिजेक्शन म्हणजे ‘पार्टस् पर मिलियन’ रिजेक्शन आहे. तसेच कंपनीने आणखी एक विक्रम केलेला आहे, तो म्हणजे गेल्या १० वर्षांत ग्राहकांची तक्रारही शून्य आहे. क्रॉस इंटरनॅशनलला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, कंपनीच्या नव्या संशोधनांची, उत्पादनांची दखल अनेकदा घेतली आहे.
..............................................................................................................................
•सोलापूरचा औद्योगिक विकास : काशीनाथ ढोले
काशीनाथ ढोले
व्यवस्थापकीय संचालक, क्रॉस इंटरनॅशनल, सोलापूर.
मुंबई, पुण्याच्या तुलनेत सोलापूरचा कामगार अतिशय हुशार व उत्तम आहे. कामगार हा उद्योगाच्या भरभराटीचा कणा असल्याचे सांगून क्रॉस इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक काशीनाथ ढोले म्हणाले की, मी कामगारांच्या वैयक्तिक समस्या जाणून घेऊन त्यांना सहकार्य करतो. त्यांचे चरित्र, कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रयत्न आणि तसे उपक्रम सतत सुरू असतात. त्यातून खूप काही चांगले निष्पन्न झाले असून, शिस्त, स्वच्छता, कामाप्रति निष्ठा, आत्मसंयमन आणि प्रत्यक्ष कार्यक्षमता वाढली असल्याचे काशीनाथ ढोले यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.सोलापूरच्या विकासाबद्दल बोलताना काशीनाथ ढोले म्हणाले की, सोलापूर खूप अनुकूल आहे. सोलापुरात जमिनीच्या किमती कमी आहेत. एमआयडीसीत पाण्याची सोय चांगली आहे. ऍफ्लुएंट ट्रीटमेंट प्लँटची सोय असल्याने पर्यावरणाच्या सुरक्षिततेची हमी मिळते. कामगार चांगला आणि सोलापूरकर सोशिक व समजुतदार आहे, पण याबरोबरच सरकार, एमआयडीसी आणि महानगरपालिका यांचे पाठबळ व सहकार्य उद्योजकांना मिळत नाही. प्रशासकीय यंत्रणा अतिशय सावकाश चालते, दिरंगाई टाळून प्रशासकीय कामांचा वेग वाढणे आवश्यक आहे. शासनाकडून सहा सहा महिने पत्रांना उत्तरे देखील मिळत नाहीत, हे उद्योग आणि प्रगतीला घातक आहे! यावर यांना जाब विचारणारे कोणीच नाही का, असा प्रश्‍न ढोले यांनी उपस्थित केला. जकात नाक्यावर विनाकारण अडवणूक होते. तेथे तज्ज्ञ व्यक्ती असणे आवश्यक आहे. महापालिकेमुळे सहकार्याऐवजी अडथळाच निर्माण केला जातो. उद्योजकांच्या किमान गरजा देखील पुरवल्या जात नाहीत. भ्रष्टाचार प्रचंड आहे. पैसे घेऊन देखील कामे करीत नाहीत आणि हे अधोगतीला निमंत्रण आहे! उद्योग वाढल्याने सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल वाढणार आहे. असा महसूल मिळणार असतानासुद्धा उद्योजकांना एमआयडीसी व सरकारकडून मूलभूत सुविधा देखील दिल्या जात नाहीत. एमआयडीसीतील लँड डिस्ट्रिब्यूशन करताना सध्या असलेल्या उद्योजकांना एक्स्पान्शनसाठी सहकार्य मिळणे गरजेचे आहे. शासनाचा, मनपाचा आणि एमआयडीसीचा ‘प्रो-ऍक्टिव्ह ऍप्रोच’ असणे आवश्यक आहे. कामगारांना मार्गदर्शन, प्रशिक्षण, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, कायदेविषयक मार्गदर्शन, कार्यक्षमता वाढविण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे एमआयडीसी व चेंबर ऑफ कॉमर्सने घ्यावीत. आपल्या राजकीय नेत्यांत इच्छाशक्तीच नाही, केवळ एकमेकांत भांडत बसतात ! नव्याने उद्योग क्षेत्रात उतरू इच्छिणार्‍यांना आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा सल्ला देताना काशीनाथ ढोले म्हणतात की, इनोव्हेटीव्ह व टेक्नॉलॉजी बेस्ड प्रॉडक्ट्‌स असणे अपरिहार्य असून, नवख्यांना याद्वारे लवकर प्रस्थापित होता येणे शक्य आहे. अन्यथा आजच्या स्पर्धेच्या काळात उद्योग स्थिर होण्याला खूप वेळ लागतो.राजकीय सुधारणा झाली तरच देशाची प्रगती वेगात होईल. भारत चीनपेक्षाही सक्षम आहे, उत्पादनांचा दर्जा चीनपेक्षा चांगला आहे. चीनला शह देण्यासाठी हीच योग्य संधी व वेळ आहे, पण भारतीयांबद्दल आंतरराष्ट्रीय जगतात ही तक्रार आहे की, भारतीय दिलेला शब्द पाळत नाही. हे थांबले तरच आपण २०२० पर्यंत महासत्ता होऊ शकू!
........................................................................................................................................
महिला जास्त सक्षम : सुनिता ढोले
महिला सक्षमीकरणाविषयी सुनिता ढोले म्हणतात की, क्रॉसच्या सनबर्ड प्लास्टिक इंडस्ट्रीत काम करणार्‍या महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य, विशेष प्रशिक्षण, समुपदेशन करतो आणि मनोरंजनासाठी सहली देखील काढतो. महिला पुरुषांपेक्षा जास्त सक्षम असल्याचे सांगून सुनिता ढोले म्हणाल्या की, महिला अतिशय कामसू, जास्त सुपिरिअर आणि सहकाराच्या भावनेने काम करतात. त्यांच्या कामात उत्पादनक्षमता जास्त असते. आमच्या येथे काम करणार्‍या महिला कौटुंबिक वातावरणामुळे अतिशय समाधानी आहेत. त्यांंच्या अडचणी सोडवल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहण्याचे समाधान वेगळेच असल्याचे सुनिता ढोले म्हणाल्या. नव्या महिला उद्योजिकांना पुढे येण्याच्या दृष्टीने घरातून पाठबळ हवे. महिला बदल लवकर स्वीकारत असल्याने बदल तत्काळ अमलात आणता येऊ शकतात.
..........................................................................................................................
दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी, दि.० ऑक्टोबर २०१०
इच्छाशक्तीच्या जोरावर सोलापूरला सोन्याचे दिवस येतील : माजी खा. सुभाष देशमुख
लोकमंगल बायोटेक : कृषकांचा सखा, वसुंधरेचा दास
 • उद्योग भरारी : अमर पुराणिक
सोलापूरच्या प्रगतीसाठी ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले, त्यात माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी १ हजार उद्योजक निर्माण करण्याचे सुभाषबापूंचे स्वप्न आहे. सोलापूर शहराच्या प्रगतीला प्रचंड वाव असताना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सोलापूर खूप मागे पडले असल्याची खंत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. यासाठी सोलापुरात सर्वप्रथम एमआयडीसीचे विभागीय कार्यालय सुरू होणे अत्यावश्यक आहे. कारण सोलापुरात येऊ पाहणार्‍या उद्योजकाला राजकीय नेतेमंडळी आपापल्या गावाकडे नेतात किंवा न्यायला प्रवृत्त करतात; त्यामुळे सोलापुरात येणारे उद्योजक अन्य शहरांकडे जातात. ‘‘जकातीमुळे उद्योजकांची गळचेपी होत असल्याने जकात तत्काळ हटवून एकच करप्रणाली स्वीकारणे आवश्यक आहे. करेरा उद्योग सोलापुरात आलाच नाही, पण १० वर्षे त्यामुळे एमआयडीसीची जागा अडवून ठेवली गेली. आता ही जागा मोकळी झाली आहे. त्या जागा गरजूंना तत्काळ द्याव्यात. शहराचा विकास खूप अगोदर होणे आवश्यक होते, पण सर्वांचे पोट भरल्यानंतर उरले तर सोलापूरला देऊ, अशी दुजाभावाची वागणूक शासनाने सोलापूरला दिली. त्यामुळे सोलापूरकर नाईलाजाने सोलापूर सोडून जातोय आणि हे सर्व हे थांबले पाहिजे !‘‘
.....................................................................................................
लोकमंगल बायोटेक प्रा. लि.ला पाहता पाहता आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या चार वर्षांत लोकमंगल बायोटेकने मारलेली ही उद्योग भरारी केवळ स्पृहणीयच नव्हे तर स्तिमित करणारीच म्हणावी लागेल! सोलापूरच्या औद्योगिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांच्या उद्योगकुशलतेचे हे आणखी एक उदाहरण. लोकमंगल उद्योग समूहाचे सर्वच प्रकल्प सुभाषबापूंच्या ब्रीदाप्रमाणे ‘अखंड गतीतून सार्थकता’ याची मूर्तिमंत रूपं आहेत, पण या ब्रीदाला काहींसा फाटा देत केवळ चारच वर्षांत मारलेली ही उत्तुंग भरारी म्हणजे लोकमंगलच्या कासवाने घेतलेली उल्लेखनीय गरुडझेपच होय!लोकमंगल बायोटेकच्या या प्रगतीत सुभाष बापूंच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करणारे लोकमंगल बायोटेक प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख म्हणजे कामसू वृत्तीचे जिवंत उदाहरण आहेत. 
अखंड कामात गुंतलेले आणि लोकमंगल म्हणजे सर्वस्व मानणार्‍या गणेश देशमुखांच्या कौशल्याचा लोकमंगलच्या या देदीप्यमान प्रगतीत सिंहाचा वाटा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लोकमंगल बायोटेकला योग्य दिशा देणार्‍या कार्यकुशल व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी ‘तरुण भारत’शी मनमोकळा संवाद साधला.लोकमंगल बायोटेकचा २००६ साली सेंद्रीय खतउत्पादनाने उद्योगाचा श्रीगणेशा केला. लोकमंगल बायोटेकने ८५ उत्पादने विकसित केली आहेत. सोलापूर, अकोला, जळगाव, वडोदरा, उदयपूर आदी ठिकाणी उत्पादन होत असून, लोकमंगल बायोटेकच्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या ७ राज्यांत शाखा आहेत. विदर्भ, मराठवाड्यात लोकमंगलच्या उत्पादनांची विक्रमी विक्री होत असल्याचे गणेश देशमुख म्हणाले.
सुभाषबापूंची दूरदृष्टी, दमदार उत्पादने, नेटके वितरण, विनम्र व तत्पर सेवेच्या बळावरच लोकमंगलने ही भरारी घेतली आहे.नावाप्रमाणेच ‘मॅग्नेट’ असलेल्या दुय्यम अन्नघटकांचा समावेश असणार्‍या खतांची निर्मिती केली. या उत्पादनांवर कृषकवर्ग संतुष्ट असून, त्यांना ‘मॅग्नेट’ने आपल्याकडे खेचून घेतले आहे. भरघोस व दर्जेदार उत्पादनांसाठी मॅग्नेट, सरदार, स्पार्क, फास्टर, परफेक्ट आणि लान्सर ही शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरलेली उत्पादने आहेत. या खतांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. पाण्यात विरघळणारी खते, फवारणीद्वारे दिली जाणारी खते, मुख्य अन्नघटक खते आदी सर्वच वर्गवार्‍यांची उत्पादने लोकमंगलने विकसित केली आहेत. जोमदार पिकांसाठी सशक्त बियाणांची गरज लक्षात घेऊन लोकमंगल बायोटेकने हीरो नं. १ ही तांदळाची नवी जात संशोधित केली. मका - विराट ५५५, सूर्यफूल - भास्कर ९९, बाजरी - विश्‍वास, सोयाबीन - जेएस ३३५, संकरित ज्वारी - भागिरथी याशिवाय बसंती ११, देवा ८१, भीमा १०८, विपुल गोल्ड, शिव, श्रुती, आर्या, कामिनी, मेघदूत, विशाखा, द्रोण, नेत्र, रॅम्बो, हर्षदा, नंदिनी, इंद्रायणी, लोकमंगल आणि शंभू आदींसह विविध फळभाज्यांची बियाणे देिीखल संशोधित केली आहेत. शेतकर्‍यांना मिळणारी बियाणे १०० टक्के उगवणूक असणारी, सशक्त, निरोगी, किटाणू व रोगमुक्त पीक मिळावे म्हणूनलोकमंगल बायोटेक नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आवर्जून गणेश देशुमख यांनी सांगितले. बियाणांबरोबरच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, शेतातील काडीकचरा व शेण यांचा विनियोग करून त्यापासून सेंद्रीय खत बनवण्यासाठी कुजवणारे रसायन तयार केले आहे.पिकांचे विविध रोगांपासून व किडीपासून संरक्षण करून रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी लोकमंगल बायेटेकने अनेक औषधेतयार केली आहेत. निसर्गाला कोणतीही हानी न पोचविता किडींचा व रोगांचा नायनाट करण्यासाठी प्रभावी जैविक कीड व बुरशीनाशकेही निर्माण केली आहेत. तसेच यावर्षी लोकमंगल बायोटेकने नवीन जैविक कीटकनाशके संशोधित केली असल्याचे सांगून देशमुख म्हणाले की, सर्व प्रकारच्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी ‘ऍक्शन’ हे जैविक कीटकनाशक तर मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांसारख्या रस शोषणार्‍या किडींच्या नायनाटासाठी ‘बेन - १०’ ही दोन प्रभावी जैविक कीटकनाशके विकसित केली असून, ती शेतकर्‍यांच्या विश्‍वासास पात्र ठरत असल्याचे समाधान गणेश देशमुख यांनी व्यक्त केले. लोकमंगलने या संशोधन कार्यासाठी अद्यावत प्रयोगशाळा उभी केली आहे. नव्या तंत्रज्ञानाची कास धरीत नवनवी उत्पादने विकसित करण्यासाठी तज्ज्ञ अभ्यासक लोकमंगलकडे उपलब्ध आहेत.बाजाराची स्थिती कशीही असली तरीही लोकमंगल बायोटेकचे भाव स्थिरच असतात व कोणाकडूनही, कोणत्याही उत्पादनांची काळ्या बाजारात विक्री होणार नाही, याची विशेष काळजी घेत असल्याचे गणेश देशमुख यांनी सांगितले. स्वत:चा फायदा किती, यापेक्षा शेतकर्‍याला किती फायदा झाला? याकडे सुभाष देशमुख यांचा कटाक्ष असतो.
पहिल्याच वर्षी म्हणजे सन २००६ साली लोकमंगलने २ कोटी रुपयांची उलाढाल केली. तर मागील वर्ष सन २००९-१० ला लोकमंगल बायोटेकने उद्योगविकासाची मोठी गरुड भरारी घेत ही उलाढाल २२ कोटींवर पोहोचवली आहे. या वर्षात ४५ ते ५० कोटींचे उद्दिष्ट असून, २०१५ पर्यंत आम्ही ५०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करू असा आत्मविश्‍वास गणेश देशमुख यांनी व्यक्त केला. लोकमंगल बायोटेकमध्ये ४०० लोक काम करतात. शिवाय लोकमंगल बायोटेकमुळे निर्माण होणारा अप्रत्यक्ष रोजगार देखील मोठाच आहे. लवकरच कीटकनाशके आणि ठिबक सिंचनातून दिली जाणारी खते विकसित करीत असून, ही उत्पादने लवकरच ती शेतकर्‍यांच्या सेवेत आणली जात आहेत.लोकमंगल बायोटेक आता शेअर बाजारात आयपीओ रजिस्ट्रेशन करणार आहे. तसेच ऍक्शन व बेन १० ही उत्पादने निर्यात करण्याचा मानस असून, तो लवकरच पूर्ण हाईल, अशी आशा देशमुख यांनी व्यक्त केली. जागतिक स्तरावर लोकमंगलचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, आमची उत्पादने आता जागतिक कृषिप्रदर्शनात दाखल झालेली आहेत. फ्रान्स, चीन, सॅनफ्रान्सिस्को आदी ठिकाणी झालेल्या कृषिप्रदर्शनात आम्ही सहभाग नोंदवला आहे. तेथील तज्ञांनी आमच्या उत्पादनांची वाखाणणी केल्यामुळे आता जागतिक स्तरावर लोकमंगल नक्कीच आपले स्थान निर्माण करेल. शेतकर्‍यांना प्रेरित करून या वसुंधरेची कृतज्ञता व्यक्त करीत तिला सृष्टीसौंदर्याने नटवण्यासाठी, हिरवळ वाढवण्यासाठी लोकमंगल परिवार प्रयत्नशील आहे. सृष्टिदेवतेच्या ऋणातून आपण मुक्त होणे शक्य नाही, पण या प्रदूषित झालेल्या सृष्टीवर थोडा जरी बहर आणण्यात आम्ही यशस्वी झालो तरी धन्य होऊ! असा आशावादही देशमुख यांनी व्यक्त केला.
..................................................................................................................................
 •सोलापूरचा औद्योगिक विकास  - माजी खासदार सुभाष देशमुख

माजी खासदार सुभाष देशमुख, 
संस्थापक अध्यक्ष, लोकमंगल समूह, सोलापूर

सोलापूरच्या प्रगतीसाठी ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले, त्यात माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी १ हजार उद्योजक निर्माण करण्याचे सुभाषबापूंचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने ते सतत प्रयत्न करीत आहेत. अशा उद्यमशील माजी खासदार व लोकमंगल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुभाषबापू देशमुख यांनी दै. तरुण भारतशी संवाद साधला. सोलापूरच्या विकासाबद्दल पोटतिडकीने बोलताना सुभाषबापू म्हणतात, ‘‘जर माझ्या स्वप्नाप्रमाणे सोलापुरात तयार होणारे १ हजार सोलापूरकर उद्योजक आणि त्याबरोबरच बाहेरील उद्योजक आले आणि स्थिरावले तर मुंबई-पुण्याकडे जाणारे तरुणांचे लोंढे थांबतील. कारण ही तरुण पिढी सोलापूरचे भविष्य आहे आणि हीच तरुण पिढी जर सोलापूर सोडू लागली तर या शहराचे भवितव्य काय राहील, याचा सर्वच सोलापूरकरांनी विशेषत: राजकीय नेत्यांनी गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. यासाठी सोलापूर विद्यापीठाचा दर्जा सुधारणे, जे विषय इतरत्र नाहीत असे अभ्यासक्रम सुरू होणे आवश्यक आहे. विद्यापीठे शहराचे भविष्य घडवतात. हा मंत्र लक्षात घेऊन विषयातील वेगळेपण, दर्जा सुधारण्याला प्राधान्य देण्याशिवाय पर्याय नाही. सोलापूरच्या प्रगतीला प्रचंड वाव असताना राजकीय इच्छाशक्तीच्या आभावामुळे सोलापूर खूप मागे पडले असल्याची खंत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. उद्योजकांना मूलभूत सुविधा जसे की, बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरू करणे, मुंबई-चेन्नई, मुंबई-बंगळूर, मुंबई-हैदराबाद आदी रेल्वेमार्गांची डबल लाईन आणि विद्युतीकरण करणे, पाणी, वीज, अंतर्गत रस्ते या सुविधा उद्योजकांना अग्रक्रमाने देणे क्रमप्राप्त आहे. सोलापुरात येऊ इच्छिणार्‍या उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी सोलापुरात सर्वप्रथम एमआयडीसीचे विभागीय कार्यालय सुरू होणे अत्यावश्यक आहे. कारण सोलापुरात येऊ पाहणार्‍या उद्योजकांना राजकीय नेतेमंडळी आपापल्या गावाकडे नेतात किंवा न्यायला प्रवृत्त करतात; त्यामुळे सोलापुरात येणारे उद्योजक अन्य शहरांकडे जातात. करेरा उद्योग तर सोलापुरात आलाच नाही, पण गेली १० वर्षे त्यामुळे एमआयडीसीची जागा अडवून ठेवली गेली, आता ही जागा मोकळी झाली आहे, पण त्या जागेचे वितरण गरजू उद्योजकांना तात्काळ होणे आवश्यक आहे. सोलापूर व जवळच्या परिसरात श्री सिद्धेश्‍वर, अक्कलकोट स्वामी समर्थ, संत दामाजी, संत सावता माळी, वडवळचे नागनाथ मंदिर, करमाळ्याची कमलादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अशी ९ तीर्थक्षेत्रे आहेत. ज्यावर अनेक पूरक उद्योग चालतात. इतर उद्योजकांना चालना मिळते, त्यामुळे पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही तीर्थक्षेत्रे विकसिक करणे अत्यावश्यक आहे. चारपदरी रस्ते व इतर अनेक विकासकामे खूप अगोदर होणे आवश्यक होते, पण सर्वांचे पोट भरल्यानंतर उरले सुरले तर सोलापूरला देऊ, तेही मिळेल तेव्हा मिळेल, अशी दुजाभावाची वागणूक शासनकर्त्यांनी सोलापूरला दिली आहे. सकारात्मक भूमिका घेत सोलापूरचा अपप्रचार थांबवून शहराचा व सोलापूरकरांचा विधायक प्रचार करणे अत्यंत आवश्यक आहे. सोलापूरकर असुविधांमुळे इच्छा नसतानाही नाईलाजाने सोलापूर सोडून पुण्या, मुंबईला जात आहेत, हे थांबले पाहिजे. चांगली चाललेली असतानाही शताब्दी एक्स्प्रेस का बंद केली? तर डीआरएम म्हणतात की, जागा नाही. तर मग जेव्हा चालू होती तेव्हा जागा होती का? असा प्रश्‍न उपस्थित होतो. तर यावर रेल्वे प्रशासनाने तात्काळ तोडगा काढून शताब्दी पुन्हा सुरू करावी. सोलापूर हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. बहुधा भ्रष्टाचारात सोलापूर अग्रक्रमावर असावे. अशी शासनाची वाईट स्थिती असताना भ्रष्ट वातावरणात सोलापूरची प्रगती कशी होणार? उद्योगाबाबत सोलापुरात सर्वात जास्त पूरकता आहे ती कृषी क्षेत्राला. कृषीच नव्हे तर सर्वच बाबतीत सोलापूर पूरक आहे. प्रगतीला प्रचंड वाव आहे, पण हे सर्व होईल फक्त कृतीतूनच. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरच सोलापूरला सोन्याचे दिवस येतील, असा आशावाद सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.
........................................................................................................................................
दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी, दि.०३ ऑक्टोबर २०१०
पायाभूत सुविधा हा औद्योगिक प्रगतीचा प्राण : शरदकृष्ण ठाकरे
एलएचपी : एकविसाव्या शतकातील भगिरथ
 • उद्योग भरारी : अमर पुराणिक
रदकृष्ण ठाकरे यांच्या मेहनत, सातत्य, संयम आणि संशोधकवृत्तीवर वरदहस्त ठेवीत साक्षात् ‘लक्ष्मी’च प्रकट झाली आणि आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा. लि. सोलापूरच्या उद्योगक्षेत्रातील मानबिंदू ठरणारी उद्यमशील संस्था म्हणून नावारूपाला आली. आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स सोलापूरच्या अनेकांना रोजगार देते. सोलापूरचा नावलौकिक जगभर पसरवणारी एलएचपी म्हणजे भारतातील प्रत्येक शेतकरी आणि उद्योजकाच्या हृदयात मानाचे स्थान पटकावणारी संस्था आहे. भगिरथाने ज्याप्रमाणे गंगा पृथ्वीवर आणली, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याला, विशेषत: शेतकर्‍याना पाण्याची गंगा भूगर्भातून बाहेर काढून जलतृष्णा भागवणारी कंपनी लक्ष्मी हायड्रॉलिक्स आणि या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शरदकृष्ण ठाकरे म्हणजे आजच्या युगातील भगिरथच होय!
......................................................................................................
लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा.लि. अर्थात एलएचपीची सुरुवात केवळ १५ हजार रुपयांच्या भांडवलावर १५०० चौरस मीटरच्या भाड्याने घेतलेल्या एक पत्र्याच्या शेडमध्ये झाली. तेव्हा पहिले उत्पादन होते मोनोब्लॉक पंप. शरदकृष्ण ठाकरे यांच्या मेहनत, सातत्य, संयम आणि संशोधक वृत्तीवर वरदहस्त ठेवीत साक्षात ‘लक्ष्मी’च प्रकट झाली आणि आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा.लि. सोलापूरच्या उद्योग क्षेत्रातील मानबिंदू ठरणारी उद्यमशील संस्था म्हणून नावारूपाला आली. आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स सोलापूरच्या अनेकांना रोजगार देते. सोलापूरचा नावलौकिक जगभर पसरविणारी एलएचपी म्हणजे भारतातील प्रत्येक शेतकरी आणि उद्योजकाच्या हृदयात मानाचे स्थान पटकावणारी संस्था आहे. भगिरथाने ज्याप्रमाणे गंगा पृथ्वीवर आणली, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याला, विशेषत: शेतकर्‍यांना पाण्याची गंगा भूगर्भातून बाहेर काढून जलतृष्णा भागविणारी कंपनी लक्ष्मी हायड्रॉलिक्स आणि या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शरदकृष्ण ठाकरे म्हणजे आजच्या युगातील भगिरथच होय!
लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शरदकृष्ण ठाकरे यांनी ‘दै. तरुण भारत’शी दिलखुलास संवाद साधताना सांगितले की, आजची एलएचपी तिच्या जन्मापूर्वीच माझ्या स्वप्नात होती. ती कालांतराने कष्ट आणि ध्यासातून प्रकट झाली. पहिल्यांदा पत्र्यांचे शेड, त्यानंतर होटगी मार्गावरील औद्योगिक वसाहत, अशी मार्गक्रमणा करीत २००२ साली चिंचोळी एमआयडीसी स्थलांतरित झाली आणि आज जगद्‌विख्यात मानांकन प्राप्त अशा भव्य प्रकल्पात साकारली गेली.धुळे जिल्ह्यातील ‘मोराणे’सारख्या छोट्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले शरदकृष्ण ठाकरे यांचे वडील प्रयोगशील, जिज्ञासू शेतकरी व व्यायामप्रिय सद्‌गृहस्थ होते. त्यांनी नापीक जमिनीचे नंदनवन करून पिके काढली; त्याची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली. १९५२ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या हरितक्रांतीला प्रत्यक्ष भेट देऊन प्रशंसा केली होती. शरदकृष्ण ठाकरे यांच्या मातोश्री तर वात्सल्यमूर्तीच होत्या. त्यांनी माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांवरही तितकेच प्रेम केले. आई-वडिलांना माणसांची जाण होती. त्यांनी जोडलेली माणसे कधीच तोडली नाहीत.
शरदकृष्ण ठाकरे यांचे चार ज्येष्ठ बंधू उच्चविद्याविभूषित आहेत. बालपणापासून शरदकृष्ण ठाकरे यांना इंजिनीअर होण्याची प्रबळ इच्छा होती. नांगरापासून शेतीपंपांपर्यंत सर्व शेती अवजारे बिघडली की, दुरुस्तीची धडपड सुरू असायची. योगायोगाने पुढे मी प्रॉडक्ट निवडले तो पंपच. बालपणाच्या शेतीमैत्रीची ही परतफेडच म्हणायला हरकत नाही! हे शरदकृष्ण ठाकरे कृतज्ञतापूर्वक सांगतात.आर. अँड डी. व प्रॉडक्ट डिझायनिंगचे महत्त्व पुरेपूर जाणून असल्याने एलएचपीने सर्वात जास्त भर दिला तो ‘संशोधन व विकास कार्यावर.’ याच जोरावर आज आम्ही जवळ जवळ साडेचार हजार उत्पादने संशोधित करू शकलो आणि हेच एलएचपीच्या यशाचे मूळ कारण असल्याचे शरदकृष्ण ठाकरे यांनी सांगितले. एलएचपीचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब पाटील यांनी उत्तम विक्रीपश्‍चात सेवेच्या बळावर ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अण्णासाहेबांच्या सोबत शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या गरजा व अडचणी समजावून घेतल्याने त्याचा संशोधनात खूप उपयोग झाल्याचे ठाकरे म्हणाले. शासकीय निविदांतर्गत पुरविलेले पंप गरीब शेतकर्‍यांना आणि विशेषत: अदिवासींना दिले जात असल्याने केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जबाबदारीचे भान ठेवीत ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर, कधीकधी आर्थिक झळ सोसूनही एलएचपीने या माध्यमातूनही सामाजिक कार्य केल्याचे शरदकृष्ण ठाकरे यांनी नम्रपूर्वक सांगितले. आजचे जग हे स्वयंचलित यंत्रांचे. त्यामुळे मोटारशिवाय स्वयंचलित यंत्र नाही आणि यंत्राविना उद्योग नाही, हे मर्म जाणून १९८८ मध्ये ‘इंडक्शन मोटार’ उत्पादनाकडे वळलो. ध्येयावर नजर ठेवीत आत्मविश्‍वासपूर्वक वाटचाल सुरू केली.‘ड्रिव्हन बाय एक्सलन्स’ हे ब्रीद स्वीकारलेल्या एलएचपीची सर्वच उत्पादने ग्राहकांच्या मागण्यांना केंद्रबिंदू मानून दर्जा नियंत्रणाच्या कसोटीतून तावून -सुलाखून काढलेली आहेत. नवतंत्राच्या अभ्यासासाठी अनेक देशांत जाऊन अभ्यास केल्याचे सांगून शरदकृष्ण ठाकरे म्हणाले की, अशा परदेश दौर्‍यात नवनवीन व्यवस्थापकीय तंत्रे, जसे की सिक्स सिग्मा, टीपीएम, फाईव्ह एस, एसक्यूसी, कानबान यांचा अभ्यास केल्यानंतर अशरश: परिस सापडल्याचा आनंद झाला. या संकल्पना व तंत्रज्ञानाचा वापर करीत या पद्धती एलएचपीमध्ये रुजविल्या. त्यामुळे आयएसओ ९००० आयएसओ ९००१ हे मानांकन प्राप्त झाले.
या प्रगतीत कंपनीच्या सर्व लहान-मोठ्या कर्मचार्‍यांचे मोठे योगदान आहे. सान्निध्यात येणार्‍या प्रत्येकाला आपल्यात सामावून घेण्याचे तत्त्व काळजीपूर्वकरीत्या जपले आहे. कामगारांच्या योगदानाबरोबरच सोलापुरातील नामवंत घराणे लक्ष्मी उद्योग समूहाचेे पाटील कुटुंबीय, अण्णासाहेब पाटील, डॉ. राजाभाऊ होशिंग, मोहन गांधी आदी वडीलधारी मंडळी, सोलापूर जनता सह. बँकने दिलेले अर्थसहाय्य, आर्किटेक्ट दिलीप पागे, अर्जुन घोडके, लक्ष्मीनारायण शेराल, कामगार नेते बोरोटीकर मास्तर आदी अनेक सहकार्य करणार्‍यांचा शरदजी अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. आज महिन्याला १२ हजार उत्पादने उत्पादित करण्याची क्षमता एलएचपीने गाठली आहे. पहिल्यावर्षी ७ लाखांची उलाढाल करणारी एलएचपी आज १३० कोटींवर पोहोचली आहे. ४५०० अमूल्य असे ग्राहक असलेल्या या कंपनीकडे ५००० च्यावर वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने आहेत. एलएचपीचा वर्षिक विकासदर ५० टक्के असल्याचे सांगून शरदकृष्ण ठाकरे यांनी २०१२ पर्यंत २५० कोटींचे उद्दिष्ट पार करून २०१५ पर्यंत ५०० कोटींपर्यंतची मजल मारू! असा विश्‍वास व्यक्त केला. एलएचपीला १९८५ साली महाराष्ट्र शासनाने लघुउद्योगातील सर्वोत्तम म्हणून गौरविले, तर १९९७ ला भारत सरकारच्या राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कारानेसन्मानित केले होते. १९९५ साली आयएसओ ९०००, ९००१ हे मानांकन प्राप्त झाले. सन २००२ साली केंद्र सरकारने पुन्हा एकदा गुणवत्ता पुरस्कार एलएचपीला बहाल केला. बर्‍याच बहुराष्ट्रीय कंपन्यांनी एलएचपीने आपली उत्पादने त्यांच्या ब्रँडनेमने बनवावीत, असा प्रस्ताव ठेवला होता, पण जागतिक दर्जावर आपले नाव कोरण्याचा ध्यास बाळगला असल्याने त्यास नकार दिला असल्याचे ठाकरे म्हणाले.ंसोलापूरच्या उद्योग विकासाचा कानमंत्र देताना शरदकृष्ण ठाकरे म्हणतात, ग्राहकांचे महत्त्व कायम ध्यानात ठेवा. अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा, कारण त्याने गुणवत्ता वाढते. जगातिकीकरणाचा फायदा घेत निर्यातीवर भर द्या. सचोटी, शिस्त, संशोधन आणि निष्ठेची कास धरा आणि पहा यश आपलेच आहे. शरदकृष्ण ठाकरे यांनी सांगितलेला हा कानमंत्र सोलापूरच्या प्रत्येक उदयोन्मुख उद्योजकाला मार्गदर्शक ठरेल याबद्दल दुमत नाही.
..............................................................................................
•सोलापूरचा औद्योगिक विकास - शरदकृष्ण ठाकरे
शरदकृष्ण ठाकरे 
व्यवस्थापकीय संचालक, लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा.लि.
येती ५ वर्षे सोलापूरच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. भारतातीलच नव्हे तर, परदेशातील उद्योजक सोलापुरात येण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी येत्या ६ महिन्यांत मूलभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. ज्यामुळे सोलापुरात येऊ इच्छिणार्‍या उद्योजकांसाठी आश्‍वासक वातावरण निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन शरदकृष्ण ठाकरे यांनी केले. मोठ्या उद्योगांची वाहतूक देखील मोठीच असते, त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गाचे सहापदरीकरण ६ महिन्यांत होणे नितांत गरजेचे आहे. बंद पडलेली हवाई वाहतूकसेवा सुरू केली जावी. तसेच शताब्दी एक्स्प्रेस ही रेल्वे पुन्हा सुरू होणे महत्त्वाचे ठरते. कारण शताब्दी एक्स्प्रेस जेव्हा सुरू होती, तेव्हा मोठमोठ्या कंपन्यांचे लोक सोलापूरला येऊ लागले होते, पण शताब्दी बंद झाल्याने या लोकांचा सोलापूरला येण्याचा ओघ थांबला आहे आणि हे सोलापूरच्या विकासाला खीळ बसणारे असल्याचे शरदकृष्ण ठाकरे यांनी अधोरेखित केले आहे. पायाभूत सुविधा हा औद्योगिक प्रगतीचा प्राण आहे! शहरात मूलभूत सोयी-सुविधां जसे की, शुद्ध पाणी, स्वच्छता, चांगले रस्ते, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, शिस्तबद्ध वाहतूक आदींची पूर्तता झाली तर, मॅनेजमेंट किंवा प्रथम दर्जाचा अधिकारीवर्ग ज्याला आपण ‘स्किल्ड मॅन पॉवर’ म्हणतो, तो वर्ग येणे सुरू होईल. त्यामुळे स्किल्ड मॅन पॉवरचा प्रश्‍न सुटेल, शिवाय यामुळे सोलापूरच्या उत्पादनांचा दर्जा व क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. सोलापूरच्या मूलभूत सोयी-सुविधांची वानवा असल्याने आज हा वर्ग येथे येण्यास उत्सुक नाही. राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे सोलापूरकर विकासापासून वर्षानुवर्षे वंचित राहिले आहेत. अनेक वर्षांपासून जकातीचा प्रश्‍न सतावत आहे. घेतलेल्या जकातीचा ९० टक्के परतावा देखील महापालिकेकडून मिळत नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात स्पर्धात्मक किमती ठेवण्यात जकातीचा मोठा अडसर असल्याचे सांगून शरदकृष्ण ठाकरे म्हणाले की, ‘जकात रद्द केली जावी म्हणून मी अनेक प्रयत्न केले आहेत. शासन, लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदने दिली, तरीही जकात हटलेली नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करून एलएचपीचा प्रकल्प १४ डिसेंबर २००५ रोजी चिंचोळी एमआयडीसी येथे हलविणे भाग पडले, पण हे सर्वच उद्योजकांना करणे शक्य नाही, त्यामुळे सोलापूरच्या उद्योगवाढीला जकातीमुळे खीळ बसत असल्याने शासनकर्त्यांनी याचा गंभीरपणे विचार करावा. सोलापूरचा कामगारवर्ग हा अतिशय पापभीरू असून, कार्यक्षम, संयमी आहे, पण सोलापूरच्या कामगारांबद्दल सतत चुकीचा प्रचार केला गेला आहे. वस्तुत: मालक किंवा व्यवस्थापनाच्या चुकांचे खापर कामगारवर्गावर फोडले गेले. सोलापुरात जर दर्जेदार वाहतूक व्यवस्था, रुंद रस्ते, स्वच्छ, मुबलक व किफायतशीर दरात पाणी आणि वीज पुरवली, तर सोलापूर हे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून बिरूद मिरवेल, यात शंकाच नाही!.
...............................................................................................
उद्योगातील नवी पिढी : आदित्य शरदकृष्ण ठाकरे
आदित्य शरदकृष्ण ठाकरे
‘जगतिक दर्जाच्या दृष्टीने फॅक्टरी ऍटोमेशन करणे अपरिहार्य आहे’, हे मत आहे शरदकृष्ण ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य शरदकृष्ण ठाकरे यांचे. आदित्य शरदकृष्ण ठाकरे हे उद्योगक्षेत्रात उतरलेले असून, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून एलएचपीच्या विकासाला वेग देण्यात गुंतलेले आहेत. त्यांनी ‘गिअरबेस्ड् मोटार्स, पीएमबीसी मोटार्सचे उत्पादन सुरू केलेले आहे. नव्या पिढीतील उद्योजक आदित्य म्हणतात की, माहिती -तंत्रज्ञानाच्या काळात दर्जेदार उत्पादनांबरोबरच व्यावसायिकताही महत्त्वाची आहे. उत्पादनक्षमता सुधारणे आणि पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. उत्पादनाचा दर्जा व क्षमता वाढविण्यासाठी नवनव्या सॉफ्टवेअर्सचा वापर ही काळाची गरज आहे. एलएचपीमध्ये ‘सॅप’ प्रोग्रामिंगचा वापर सुरू केल्याचे सांगून आदित्य म्हणाले की, यामुळे प्रॉडक्टीव्हिटी व दर्जा सुधारला व रिजेक्शन प्रमाण ०.४ टक्क्यांपेक्षाही कमी झाले.
....................................................................................................................................
दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी. रविवार, दि. २६ सप्टेंबर २०१०
पुढील पाच वर्षांत सोलापूरचा विकास तीव्र गतीने होणार :  डी. राम रेड्डी
बालाजी अमाईन्सची विक्रमी गरुडभरारी
• उद्योग भरारी : अमर पुराणिक
 स्वदेशी तंत्रज्ञानाने अमाईन्स उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही एकमेव आणि जगातील पहिली कंपनी आहे. रेड्डी बंधूंनी १९८८ मध्ये एका प्लांटपासून सुरुवात करून आज १० प्लांट उभे करीत मोठी भरारी घेतली आहे. बालाजी अमाईन्सने सुरुवातीपासून संशोधन व विकासावर जोर दिलेला असून, त्यांचे प्रत्येक नवीन उत्पादन हे स्वत:च्या संशोधन व विकास विभागामधून बाहेर पडलेले आहे. यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ‘रेकग्नायझेशन ऍन्ड इन-हाऊस आर ऍन्ड डी’ चा दर्जा देण्यात आलेला आहे. साधारणपणे जी कंपनी एखादे स्वतंत्र नवे उत्पादन देशात पहिल्यांदा करते, त्याच कंपनीला हा दर्जा दिला जातो. दर्जेदार व संशोधित उत्पादनांमुळे जागतिक स्थरावर बालाजी अमाईन्सला मोठा दर्जा लाभला आहे. बालाजी अमाईन्सच्या या योगदानामुळे भारताबरोबच सोलापूरच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता बालाजी अमाईन्स ‘बालाजी सरोवर पोर्टिको’ नावाचे पंचतारांकित हॉटेल सुरू करीत हॉटेल उद्योगात पदार्पण करीत आहे.
.................................................................................................................................
ए. प्रताप रेड्डी
कार्यकारी संचालक
डी. राम रेड्डी
संचालक
एन. राजेश्‍वर रेड्डी
संचालक
सोलापूर शहर एकेकाळचे उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य शहर. जुने जाणकार म्हणतात की, सोलापूरच्या गिरण्यांमधून सोन्याचा धूर निघत होता, पण गेल्या २०-३० वर्षांत सोलापूर रसातळाला गेले. आपल्या सोलापूरच्या उद्योगनगरीला अशाही प्रतिकूल परिस्थितीत काही उद्योग व उद्योजकांनी तारून नेले. फक्त तारूनच नेले नाही, तर राखेतून उठणार्‍या फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उंच उद्योगभरारी घेतली. या यशस्वी भरारीत अनेक उद्योजकांचा सिंहाचा वाटा आहे. काही उद्योजकांनी तर सोलापूरची मान जागतिक स्थरावर उंचावली आहे. यात अग्रगण्य नाव म्हणजे ‘बालाजी अमाईन्स. ’बालाजी अमाईन्सच्या रेड्डी बंधूंनी १९८५ साली उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आणि पाहता पाहता बालाजी अमाईन्सने उत्तुंग गरुडझेप घेत आपल्या कक्षा रुंदावल्या. या देदीप्यमान भरारीने, वैशिष्टपूर्ण व एकमेवाद्वितीय उत्पादनांमुळे बालाजी अमाईन्सचे आणि सोलापूरचेही नाव जगभर आदराने घेतले जाते.बालाजी अमाईन्सचे संस्थापक, संचालक आणि संवर्धक म्हणजे ए. प्रताप रेड्डी, एन. राजेश्‍वर रेड्डी आणि डी. राम रेड्डी ही त्रिमूर्ती बंधुत्रयी होत. कार्यकारी संचालक ए. प्रताप रेड्डी हे असून, एन. राजेश्‍वर रेड्डी आणि डी. राम रेड्डी हे संचालक आहेत. रेड्डी घराण्यातील उद्योगक्षेत्रात उतरणारी ही पहिलीच पिढी. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रेड्डी बंधूंनी १९८५ मध्ये सिमेंट पाईप उत्पादनाचा पहिला लघुउद्योग प्रकल्प सुरू केला. पुढे १९८८ मध्ये ‘बालाजी अमाईन्स’ हा प्रकल्प धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी येथे सुरू केला. कठोर परिश्रम, चिकाटी, व्यावसायिक सचोटी, सतत संशोधन आणि कामाप्रती निष्ठा जपत रेड्डी बंधूंनी बालाजी अमाईन्सला जगद्विख्यात केले. 
स्वदेशी तंत्रज्ञान : अमाईन्स हे रासायनिक उत्पादन तयार करणार्‍या जगात दोनच कंपन्या अमेरिका व जर्मनी येथे आहेत. अमाईन्ससारख्या गुंतागुंतीच्या रसायन उत्पादनासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणारी बालाजी अमाईन्स ही एकमेव व जगातील पहिली कंपनी आहे. १९८८ मध्ये एका प्लांटपासून सुरुवात करणार्‍या बालाजी अमाईन्सचे आज १० प्लांट सोलापूर परिसर व आंध्र प्रदेशात कार्यरत आहेत. बालाजी अमाईन्सला सन २००२ साली आयएसओ ९००१ : २००० चे मानांकन प्राप्त झाले. आयएसओ १४००० : १८००० मानांकन प्रमाणपत्र लवकरच मिळेल, असा विश्‍वास बालाजी अमाईन्सचे संचालक डी. राम रेड्डी यांनी ‘तरुण भारत’शी खास बातचित करताना व्यक्त केला.
उत्पादने : जीवनावश्यक औषधे, शेती फवारणी औषधे, जलशुद्धीकरण, रबर रासायनिक शुद्धीकरण आदी उत्पादने तयार करण्यासाठी लागणारी मूल रसायने म्हणजे कच्चा माल बालाजी अमाईन्स तयार करते. औषधांपैकी मधुमेहाच्या रुग्णांना दिल्या जाणार्‍या औषधांत वापरल्या जाणार्‍या रसायनाचे उत्पादन बालाजी अमाईन्स करते. हे उत्पादन जगभर वितरित होत असून, त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्याची क्षमता असलेली ही एकमेव कंपनी आहे. बालाजी अमाईन्समध्ये बरीच विशेष रासायनिक उत्पादने उत्पादित केली जातात. त्यातील ‘एनएमपी, मोरफोलिन’ ही उत्पादने अशी आहेत की, जी भारतात फक्त बालाजी अमाईन्स येथेच उत्पादित केली जातात. ही उत्पादने मागील वर्षापर्यंत भारतात आयात केली जात होती, पण आता बालाजी अमाईन्सने याचे उत्पादन सुरू केल्यापासून याची आयात जवळजवळ बंद झालेली आहे. ही आयात केवळ बंदच झालेली नसून, मागील वर्षापासून परदेशात निर्यात होऊ लागली आहेत, ही भारताच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे! तर सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे. २००३ साली बोल्लारम, हैदराबाद येथे नैसर्गिक उत्पादनांचा प्रकल्प सुरू झाला. तेथे तंबाखूपासून ‘सीओ-क्यू १०’ उत्पादित केले जाते. एड्‌स, मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांना दिल्या जाणार्‍या औषधात याचा वापर केला जातो.
संशोधन आणि विकास : बालाजी अमाईन्सने आरंभापासून संशोधन व विकासावर जोर दिलेला असल्याचे सांगून डी. राम रेड्डी पुढे म्हणाले की, बालाजी अमाईन्सचे प्रत्येक उत्पादन हे स्वत:च्या संशोधन केंद्रामध्ये विकसित झालेले आहे. तसेच जगातील अत्याधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. प्रबळ संशोधन आणि विकास यंत्रणा व अद्ययावत तंत्रज्ञान हीच बालाजी अमाईन्सच्या जोमदार प्रगतीची बलस्थाने आहेत. संशोधनासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ‘रेकग्नायझेशन ऍन्ड इन-हाऊस आर ऍन्ड डी’ चा दर्जा बालाजी अमाईन्सला मिळालेला आहे. जी कंपनी एखादे स्वतंत्र नवे उत्पादन देशात पहिल्यांदा करते, त्याच कंपनीला हा दर्जा दिला जातो.
निर्यात : आज बालाजी अमाईन्स आपल्या एकूण उत्पादनांपैकी ३० टक्के उत्पादने जगातील ४० ते ४५ देशांत निर्यात करते. त्यामुळे भारत सरकारच्या वाणिज्य संचालनालयाकडून ‘स्टार एक्स्पोर्ट हाऊस’ चा दर्जा देण्यात आला आहे.
विस्तारीकरण : चिंचाळी औद्योगिक वसाहतीत तिसरा प्रकल्प सुरू केला असून, तेथे जीवनावश्यक औषधे व सौदर्यप्रसाधनांच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे ‘पीव्हीपीके-३०’ हे उत्पादन डिसेंबर २००९ पासून सुरू केले आहे. या उत्पादनात बालाजी अमाईन्स भारतामध्ये एकमेव असून, जागतिक स्थरावर चीन वगळता तिसर्‍या क्रमांकावर आहे. आतापर्यंत भारतात हे उत्पादन जर्मनी व अमेरिकेतून आयात केले जात होते. बालाजी अमाईन्सने हे उत्पादन सुरू केल्याने आयात करणे बंद तर झालेच, शिवाय येत्या काळात भारतातून निर्यात केले जाईल. चिंचोळी एमआयडीसी येथे वर्ष २०१० करिता ६० कोटींची गुंतवणूक करीत असून, विस्तारीकरणाचे काम ऑक्टोबर २०१० पर्यंत पूर्ण होईल. पुढील दोन वर्षांत कंपनीची संकल्पित उलाढाल ही ५०० कोटींची असेल.आज या कंपनीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १००० कुटुंबे अवलंबून आहेत. तसेच रेड्डी बंधूंच्या सोलापूर व परिसरातील ४ लघुउद्योग प्रकल्पांवर ४०० कुटुंंबांना रोजगार मिळतो. कंपनीची मागील वर्षाची उलाढाल २४० कोटी असून, चालू वर्षाचे उद्दिष्ट हे ३०० कोटींचे आहे. 
वीजनिर्मिती प्रकल्प : तामलवाडी येथे स्वत:च्या वीजनिर्मिती प्रकल्पातून (कॅपटिव्ह पॉवर प्लांट) प्रत्यक्ष वीजनिर्मिती नोव्हेंबर २००९ पासून सुरू केली आहे. या प्रकल्पात एकूण गुंतवणूक १४.५० कोटी रुपयांची केली गेली आहे.
पवनऊर्जा प्रकल्प :- उपलब्ध ऊर्जास्रोत आणि ऊर्जेची गरज लक्षात घेऊन सातारा व सांगली जिल्ह्यांत बालाजी अमाईन्सने दोन पवनऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले असून, प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात देखील झाली आहे.
सीएफएल लॅम्प उत्पादन :- बालाजी अमाईन्सने ग्रीनटेक प्रॉडक्टस् लि.च्या संयुक्त विद्यमाने सीएफएल लॅम्पचे उत्पादन आंध्र प्रदेशातील सदाशिव पेठ येथे होत आहे. ही उत्पादने ‘झोरा’ व ‘बालाजी’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
बालाजी अमाईन्सचे सामाजिक कार्य
सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत बालाजी अमाईन्सने ‘बालाजी फाऊंडेशन व रिसर्च सेंटर’ ही ट्रस्ट सुरू करून त्याच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके, शालेय साहित्य दिले जाते. तसेच उच्च शिक्षणासाठी मदत केली जाते. बर्‍याच शाळांना विज्ञान प्रयोगशाळा साहित्य आणि खेळाचे साहित्य पुरविले जाते. बालाजी अमाईन्स व संचालकांच्या नफ्यातील काही हिस्सा सामाजिक कार्यासाठी या ट्रस्टकडे वर्ग केला जातो.
पुरस्कार आणि सन्मान
बालाजी अमाईन्सला भारत सरकारच्या वाणिज्य संचालनालयाकडून ‘फर्स्ट ऍवॉर्ड फॉर एक्स्पोर्ट परफॉरमन्स फॉर द ईयर ऑफ २००७-०८’ पुरस्कार जाहीर झाला. ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन’ तसेच सन २००८-०९ करिता ‘निर्यात श्री’ हे पुरस्कार जाहीर झाले असून, पुढील महिन्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. बालाजी अमाईन्सच्या या प्रगतीला सोलापूरकरांच्या आणि दै. तरुण भारतच्या हार्दिक शुभेच्छा!
........................................................................................................
•हॉटेल उद्योगात पदार्पण
‘बालाजी सरोवर पोर्टिको’ नावाचे पंचतारांकित हॉटेल सुरू करीत असल्याचे डी. राम रेड्डी यांनी सांगितले. होटगी मार्गावर १५० खोल्या, २००० क्षमतेचे बॅकेट हॉल, हेल्थ क्लब, जलतरणाची सोय असणार आहे. या प्रकल्पात सुमारे ४० कोटींची गुंतवणूक केली जात आहे. हॉटेलचे व्यवस्थापन सरोवर हॉटेल प्रा. लि.ही करणार आहे. हा हॉटेल प्रकल्प ‘ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट’नुसार असून, ‘इको फ्रेंडली’ प्रकल्प म्हणून ओळखला जाईल.
...............................................................................................................
•सोलापूरचा विकास
सद्यस्थितीत सोलापूर हे उद्योगधंद्यांसाठी अनुकूल असून, पुढील ५ वर्षांत सोलापूरचा विकास अतिशय तीव्रगतीने होणार आहे यात शंका नाही! असा आत्मविश्‍वास डी. राम रेड्डी यांनी व्यक्त केला. त्यासाठी सोलापूरकरांचे सहकार्य आणि अधिकारी व नेते मंडळींनी उद्योगवाढीसाठी सोयी-सुविधांवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योगवाढीमुळे सोलापुरात कुशल कामगारांची उणीव भासण्याची शक्यता असल्याचे राम रेड्डी म्हणाले.
......................................................................................................................
दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी, रविवार, दि. १९ सप्टेंबर २०१०
संस्कृतीची जपणूक, संवर्धन गरजेचे : पं. नयन घोष
नयन घोष यांच्या बहारदार तबलावादनाने सोलापूरकर मंत्रमुग्ध
•अमर पुराणिक
सोलापूर, :- आपण भारतीय संस्कृती विसरत चाललो असून, आपण आपल्या संस्कृतीची जपणूक व संवर्धन करणे आता गरजेचे झाले आहे. कारण, भविष्यात आपल्याला आपलेच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व संस्कृती शिकण्यासाठी युरोप किंवा अमेरिकेत जायची वेळ येऊ नये, यासाठी आपण प्रत्येक भारतीयांनी आणि विशेषत: प्रसारमाध्यमांनी आपल्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी योगदान देणे अत्यंत गरजेचे आहे, अशी नम्र विनंती ज्येष्ठ तबला व सतारवादक पंडित नयन घोष यांनी सर्व भारतीयांना व सोलापूरकर रसिकांना केली. जागतिक किर्तीचे तबलावादक पंडित नयन घोष यांच्या अप्रतिम तबलावादनाने आजच्या कार्यक्रमात सोलापूरकरांना मोहवून टाकले. कै. दिगंबरबुवा कुलकर्णी व दत्तात्रय कुलकर्णी यांच्या स्मृत्यर्थ व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या वतीने सरस्वती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या संगीत सभेत पं. नयन घोष यांचे तबला वादन झाले. यावेळी पंडित नयन घोष यांचा सत्कार व्यंकटेश संगीत विद्यालयाचे संचालक बाळासाहेब कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना पंडित नयन घोष बोलत होते. पंडित नयन घोष यांनी आपल्या तबला वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.पं. नयन घोष हे भारतातील श्रेष्ठ तबलावादकांपैकी एक असून, त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते जितके अप्रतिम तबला वाजवतात तितक्याच प्रभावीपणे सितारदेखील वाजवतात. तबला आणि सितार अशी दोन्हीही वाद्यं अप्रतिम कौशल्याने वाजवणारे भारतातील ते एकमेव कलावंत आहेत. पं. नयन घोष हे सुप्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण पंडित निखिल घोष यांचे चिरंजीव असून, सुप्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांचे पुतणे आहेत. अशी समृद्ध परंपरा लाभलेल्या पं. नयन घोष यांनी आजच्या कार्यक्रमात तबल्याचे अभिनव रंग भरले. त्यांनी कार्यक्रमात ‘तीनताल’ सादर केला. त्यांनी सादर केलेल्या तीनतालात पेशकार, मिश्र जातीतील गती व तुकडे पेश केले. तसेच उस्ताद अमीर हुसेन खॉंसाहेब व पंडित ज्ञानप्रकाश घोष यांच्या बंदिशी दमदाररित्या सादर केल्या. पं. घोष यांच्या कसदार, मुलायम व चपळ हाताने सोलापूरकर रसिकांवर अक्षरश: जादू केली. पंडित नयन घोष यांना सारंगीवर संगीत मिश्र यांनी तर संवादिनीवर मुकुंद पंडित यांनी साथ केली...
दै. तरुण भारत, सोलापूर. दि. १० जानेवारी २०११
महाराष्ट्राची संवादिनी झाली अबोल
संवादिनीशी स्वरसंवाद साधणारे अप्पा जळगांवकर
•अमर पुराणिक
स्वर आणि स्वरसंवादाचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अनन्य साधारण महत्त्व आहे. संवादिनी अर्थात हार्मोनियम हे ख्याल, ठुमरी, दादरा आदी गायनशैलींच्या साथीचे वाद्य. अशा संवादिनीशी स्वरसंवाद साधणारी व्यक्ती म्हणजे कै. अप्पा जळगांवकर. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हा स्वरसंवाद संपल्यासारखे वाटते. अप्पांनी अनेक दिग्गज गायकांना संवादिनीवर साथ करीत त्या गायकांच्या गाण्याला चार चॉंद लावले. अशा या स्वरांच्या गाढ्या अभ्यासकाच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.अप्पा जळगांवकरांचा जन्म जालन्यातील जळगाव या गावी ४ एप्रिल १९२२ रोजी झाला. त्यांचे बालपणही जालन्यातच गेले. ६२ वर्षांपूर्वी ते पुण्यात आले आणि पुण्यातच स्थाईक झालेे. मुंबई आणि पुणे ही अप्पांच्या आवडीची गावं. संगीत क्षेत्राला अनुकूल अशीच ही दोन्ही गावं असल्याने अप्पांचा जीव येथेच रमला, सात स्वरांची साथ, संगत आणि अभ्यास याशिवाय अप्पांना कधी करमलेच नाही!पुण्यात आल्यावर आप्पांची ओळख संगीत क्षेत्रातील दिग्गजांशी झाली. अप्पा जळगांवकरांनी उस्ताद बडे गुलाम अली खॉं, पंडित कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, जसराज, रोशनआरा बेगम, माणिक वर्मा, किशोरी आमोणकर, गंगुबाई हनगळपासून ते आताच्या पिढीतील पं. मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ, राहुल देशपांडे अशा दिग्गज गायकांना अप्पांनी संवादिनीची सुरेल साथ केली होती. पंडित भीमसेन जोशींच्या बहुतांशी मैफलीत ते आपल्या बहारदार हार्मोनियम वादनाने सप्तरंग भरतहोते. किंबहुना अप्पा जळगांवकरांनी भीमसेन जोशींच्या मैफली रंगविल्या म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही. गायन, वादन आणि नृत्याच्या कार्यक्रमात साथसंगत करण्याबरोबरच सोलोवादन हेही त्यांच्या वादनाचे खास वैशिष्ट्य होते.मुळात अप्पांची आवड म्हणजे धृपद गायकी. धृपद गायकीच्या मैफलीमध्ये त्यांचे मन रमायचे, पण कर्मधर्म संयोगाने अप्पा संवादिनीवादन करू लागले. त्यांनी बाळकृष्ण चिखलेकर आणि उस्ताद छब्बू खॉं यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले, पण संवादिनी वादनाचे कोणाकडून प्रशिक्षण घेतले नाही. एकलव्याप्रमाणे कठोर रियाज करीत संवादिनी वादनात त्यांनी प्राविण्य प्राप्त केले. अशा स्थितीतच अप्पांनी संवादिनीवादनात स्वतःचे असे अढळ स्थान प्रस्थापित केले. संवादिनी वादनाचे क्षेत्र म्हटल्यानंतर सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल ते संवादिनी वादनाचे अध्वर्यु गोविंदराव टेबे यांचे. गोविंदरावांच्या पश्‍चात या क्षेत्रात काही मोजक्या कलावंतांनीच आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले. यात गोविंदराव पटवर्धन, अप्पा जळगांवकर, तुळशीदास बोरकर, पं. ज्ञानप्रकाश घोष, पुरुषोत्तम वालावलकर, महंमद ढोलपुरी, संजय चक्रवर्ती, ज्योती गुहा अशी काही थोडीच नावे नजरेसमोर येतात.
संवादिनीवादन हे मुळात गायनाला साथ करणारे वाद्य असल्याने संवादिनी वादकालाही अर्थातच दुय्यम स्थान आहे. त्यामुळे संवादिनी वादकांच्या वादनकौशल्याकडे पाहिले जात नाही. किंबहुना साथसंगत करण्याचा पहिला नियम हा की, साथ करताना आपण ज्या गायक, वादकाला साथ करीत असतो, त्याला ओव्हरटेक करता कामा नये, हाच यातला कायदा आहे. गायक, वादकांना साथ करीत स्वत: संवादिनीने स्वत:च आनंदाने कायम दुय्यमत्व स्वीकारले. जसे संवादिनीने दुय्यमत्व स्वीकारले तसेच संवादिनी वादकांनीही स्वीकारले आणि तेही आनंदाने. अप्पा जळगांवकरांनीही आपल्या वादनात साथसंगतीचा हा उसूल कटाक्षाने पाळला. किंबहुना अप्पांनी साथ संगत करता करताच आपले वेगळेपण व वैशिष्ट्य सिद्ध केले. साथसंगत करीतच आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविणे तसे अवघडच, पण अप्पांनी हे लीलया करून दाखविले. अप्पा जसे स्वभावाने शांत व संयमी, तसे त्यांचे वादनही संथ व संयमी होते.प्रत्येक घराण्याच्या गायकीची पद्धत वेगळी, प्रत्येक गायकाची गायनशैली वेगळी. कोणत्याही कलाकाराच्या व घराण्याच्या शैलीच्या अनुषंगाने अप्पा साथ करीत असत. आपली जोड त्यात ते कधीही देत नव्हते. कुमार गंधर्वांच्या चपल, परिपूर्ण गायकीला पोषक अशी साथ अप्पा करीत. कुमारांची गायकी म्हणजे विजेसारखी होती. उसळत आरोहण करणार्‍या व कोसळल्याप्रमाणे अवरोहण करणार्‍या कुमारांच्या तानांना अप्पा साजेशी साथ करीत असत. जसराजांच्या सौम्य गायकीला तशीच सौम्य साथ करीत. पं. प्रभुदेव सरदारांच्या जयपूर घराण्याच्या बलपेचांच्या आक्रमक, वक्र व अवघड गायकीलाही ते सुंदर साथ करीत. जयपूर घराण्याचे वैशिष्ट्य असलेल्या पं. प्रभुदेव सरदारांच्या गमकयुक्त तानांनाही ते तशीच साथ करीत होते. त्याचप्रमाणे पं. वसंतराव देशपांडे यांच्या भेंडीबाजार घराण्याच्या खंडमेरू पद्धतीच्या गायकीलाही अप्पा त्याच ताकदीने साथ करायचे. पं. भीमसेन जोशींच्या गायकीलाही त्यांच्या किराना गायकीला अनुसरूनच साथ करीत होते. प्रसिद्ध शास्त्रीय नर्तिका रोहिणी भाटे यांच्याही बर्‍याच कार्यक्रमांत अप्पांनी साथ केली. अप्पा कदाचित याचमुळे गायक, वादकांना प्रिय होते. अप्पांचा लेहर्‍याचा हात ही अप्रतिम होता आणि लयीवरहीप्रभुत्व होते, परंतु सोलोवादनात मात्र ते आपल्या वादनाचे कौशल्य दाखवीत असत. शुद्ध स्वर, कोमल, तीव्र स्वरांप्रमाणेच मींड, सुत, गमक आदी प्रकार स्वच्छ व स्पष्टपणे अप्पाच्या संवादिनीतून निघत होते. प्रत्येक रागाच्या रागांगाचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकटीकरण हे ही अप्पांच्या वादनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अप्पा कलाकार म्हणून जेवढे मोठे होते, तेवढेच माणूस म्हणूनही मोठे होते. प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रवर्ग फार मोठा होता. अप्पांच्या मित्रवर्गाप्रमाणेच त्यांचा शिष्यवर्गही फार मोठा आहे. त्यांनी अनेक संवादिनीवादक तयार केले. तसेच नव्या ख्याल गायकांपैकी बर्‍याच जणांना अप्पांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मोठ्या शिष्यगणांत मुकुंद फडकरी, राहुल देशपांडे ही काही नावाजलेली नावे आहेत. पं. कुमार गंधर्व यांचे चिरंजीव, गुणी व सुप्रसिद्ध गायक पंं. मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ हे अप्पा जळगांवकरांचे जावई होत. अप्पांच्या पत्नी शालिनीताई जळगांवकर यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते.
गेली ४० ते ५० वर्षे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी, आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमी यांसारख्या ख्यातनाम संस्थांनी पुरस्कार देऊन अप्पा जळगांवकर यांचा यथोचित गौरव केला आहे. तसेच ‘स्वरविभूषण’ आणि ’स्वर-लय-ताल रत्न पुरस्कारा’नेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शासनाने मात्र अप्पा जळगांवकरांसारख्या दिग्गजाकडे दुर्लक्ष केले आहे. अप्पांनी भारतात जवळ जवळ सर्व ठिकाणी आपली कला सादर केली आहे, तसेच अमेरिका, युरोप, श्रीलंका, बांगला देश असे अनेक परदेश दौरेही त्यांनी केले होते. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफिती, कॉम्पॅक्ट डिस्क देखील प्रकाशित झालेल्या आहेत. अप्पा जळगांवकरांसारख्या ज्ञानी व गुणी कलावंताच्या जाण्याने हिंदुस्थानी संगीताचे अतोनात नुकसान झाले आहे! अप्पांसारख्या कलावंतांनी आपल्या प्रतिभेने, अभ्यासाने व कष्टाने संगीत क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. आता अप्पांच्या जाण्याने ही पोकळी भरून येेणे अशक्य आहे. आता ‘तानसेनां’ना अप्पांची साथ मिळणार नाही, ‘कानसेनां’ना अप्पांची साथही ऐकता येणार नाही अन् लेहराही ऐकता येणार नाही!
दै. तरुण भारत, सोलापूर. २० सप्टेंबर ०९
क्रांतीची बीजे पेरणारे ज्येष्ठ कवि नारायण सुर्वे कालवश
कष्टकर्‍यांच्या भावना झाल्या मुक्या
•अमर पुराणिक
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे | सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे
अशा शब्दांत श्रमिक, कष्टकरी आणि कामगारांच्या वेदना कवितेतून मांडत शब्दाशब्दांतून क्रांतीची बीजे पेरणारे ज्येष्ठ कविवयर्र् नारायण सुर्वे यांनी गोड, गुलाबी भावभावना आणि शृंगार आदी परंपरागत पठडीतून मराठी काव्याला मुक्त करीत रोजच्या जगण्यातील जिते-जागते संघर्षमय वास्तव साध्या आणि थेट शब्दांत मांडणार्‍या वास्तववादी काव्यरचना करण्याची अजरामर कामगिरी बजावली. कामगार, कष्टकरी, वंचित वर्गांच्या व्यथा आणि वेदनांना धारदार शब्दरूप देणार्‍या नारायण सुर्वे या थोर कवीच्या जाण्याने कवितेचे ‘ब्रह्म’ लोपल्याची शोकसंवेदना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. 
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दु:खात गेले| हिशेब करतो आहे, आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे ॥
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली| भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली ॥
हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले | कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले ॥
हरघडी अश्रू वाळविले नाही, पण असेही क्षण आले | तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले ॥
सर्वसामान्यांच्या आयुष्याचे यापेक्षा प्रभावी आणि वास्तववादी वर्णन काय असू शकणार? नारायण सुर्वे स्वत: जे आयुष्य जगले, तेच त्यांच्या काव्यातून प्रगट झाले. कामगार वस्तीत, कामगारांच्या सान्निध्यात, कामगाराचा मुलगा म्हणून आणि कामगार म्हणून जगलेले जीवन अतिशय दाहकपणे मांडणारे असे एकमेवाद्वितीय कवी म्हणजेच फक्त आणि फक्त नारायण सुर्वेच होय!
अपमान, अवहेलना आणि आत्मवंचना यांचीच त्यांना जीवनप्रवासात सोबत. असा माणूस आत्मानुभवातून जे साहित्य प्रसवतो, त्यात ह्या दु:खाचे विदारक दर्शन असणारच असणार! पण त्यांचं वेगळेपण आणि थोरपणही हेच की, त्यांनी या कटुतेचा मळ आपल्या साहित्यात येऊ दिला नाही, उलट आपली आत्मपरता ही कामगारांच्या ‘आम्ही’ या समूहात विलीन करून टाकली आणि समष्टीची वेदना स्वत:ची म्हणून मांडली. कष्ट आणि जगण्यासाठी केलेल्या संघर्षातून सुर्वे यांनी मराठी काव्याला नवा सूर मिळवून दिला. त्यांनी कवितेतून, आपल्या काव्यातून जाती-पातीचा कधीही पुरस्कार केला नाही. मराठी कवितेला सामाजिक भान आणले. झोपडपट्टीपासून विद्यापीठापर्यंत, बुद्धिजीवींपासून ते रसिकांपर्यंत आणि शिक्षितांपासून ते अशिक्षित कामकर्‍यांपर्यंत त्यांना मान्यता मिळाली. त्यांच्या असंख्य कविता वाचकांच्या मनात नेहमीच घर करून राहतील; कारण त्यांचे काव्य पदोपदी जीवनाचे वास्तव सांगणार्‍या आहेत आणि या वास्तवाला प्रत्येकाला सामोरे जावेच लागते!नारायण सुर्वे हे स्वत:ला सूर्यकुळातले कवी म्हणायचे. शोषित-कष्टकर्‍यांचे जग साहित्यात प्रस्थापित करताना त्यांनी सूर्याची प्रतिमा सतत वापरली. या प्रतिमेची नुसती द्वाहीच फिरवली नाही, तर ती प्रस्थापित करण्याचा जिवंत प्रयत्न केला. हे सूर्यतेज साहित्यात आता अधिक प्रखर झाले आहे. सोलापूरचे प्रसिद्ध शाहीर अमर शेख यांनी डफावर कष्टकर्‍यांच्या भावना प्रभावीपणे प्रकट करीत नारायण सुर्वेंच्या कविता अनेक ठिकाणी सादर केल्या आहेत. कामगार चळवळीतील तुटलेला, फाटलेला माणूस त्यांच्या कवितेमध्ये आला. तो नुसताच कवितेत आला नाही, तर त्या कवितांचा तो नायक होता; त्यामुळे प्रत्येकालाच या कविता आपल्याशा वाटू लागल्या.जन्मत:च ‘अनाथ’ झालेला हा मुलगा गंगाराम कुशाजी सुर्वे यांना सापडला. हे गंगाराम सुर्वे मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये साचेवाले म्हणून काम करीत आणि त्यांच्या पत्नी काशीबाई या कमला मिलमध्ये काम करीत. या दाम्पत्याने हे सापडलेले मूल घरी आणले आणि सुर्व्यांना नवा जन्म व नारायण हे नाव दिले. सुर्वे यांनी आपल्या या अनाथपणाची नाळ थेट संत कबिरांशी जोडून घेतली होती. कबीरही त्यांच्या मातापित्याला टाकून दिलेल्या अवस्थेत सापडले होते. एका विणकरानेच त्यांचाही प्रतिपाळ केला आणि ‘कबिरा खडा बाजार में लिए लूकाठी हाथ’ असे म्हणत आपले भणंगपण साजरे करीत एक युगविधान करणार्‍या कवीमध्ये ते परावर्तित झाले. सुर्वे देखील नेहमी आपल्या भाषणात संत कबिरांची साक्ष काढत, पुरावा देत आणि त्यांच्या व आपल्या अनाथपणाचा एकत्रित उल्लेख करीत साम्यभाव प्रकट करीत. नारायण सुर्वे यांनी संतकवीच्या भाषेत साम्यवादी विचारांची कविता लिहिली. आपले क्रांतिकारी विचार त्यांनी तुकाराम आणि सावता माळी यांच्याप्रमाणे सोप्या व बोलीभाषेत प्रभावीपणे मांडले. जीवनभर अनुभवलेले दु:ख आणि आसपासची परिस्थिती त्यांनी

‘ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती| 
दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती ॥ 
अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची उठबस करता करता|
टोपलीखाली माझ्यासह जग झाकीत दररोज अंधार येत जात होता॥
अशा धाटणीच्या कवितांमधून मांडली आणि ती मराठी मनाला भिडली आणि असे विदारक सत्य मांडत असताना जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी त्यांनी सोडली नाही, हे या पुढच्या ओळीतून प्रखरपणे जाणवते.
त्याच दिवशी मनाच्या एका कोर्‍या पानावर लिहले, हे नारायणा| 
अशा नंग्याच्या दुनियेत चालायची वाट; लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा ॥
भेटला हरेक रंगात माणूस, पिता, मित्र, कधी नागवणारा होईन | 
रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत पायाचे तळवे होरपळवून ॥
तरी का कोण जाणे! माणसा इतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही | 
आयुष्य पोथीची उलटली सदतीस पाने; वाटते, अजून काही पाहिलेच नाही ॥
नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेत विद्रोह अत्यंत साधेपणाने, संयतपणे मांडला. त्याचा उद्रेक किंवा विद्वेष होऊ दिला नाही.मराठी कवितेला स्वप्नरंजनातून सोडवण्याचे मोठे काम मर्ढेकरांनी केले. त्यांच्या आधी केशवसुतांनी ते केले. आधुनिक मराठी कवितेची सुरुवात त्यांच्यापासून होते. त्यांनी मानवी मूल्यांना तात्त्विक बैठक दिली, हे नाकारता येणार नाही. सौंदर्यवादी आणि जीवनवादी असे प्रवाह तेव्हाही साहित्यात होते. जीवनवादी लोक प्रतिभेला दैवी देणगी मानत नाहीत. प्रतिभा ही खडतर जीवनातून अधिक परिपक्व होते, स्वत:कडे आणि समाजसंबंधाकडे डोळसपणे पाहिले तर द्विगुणित होते, ‘ऐसा गा मी ब्रह्मा’ मधल्या त्यांच्या कविता अप्रतिम आहेत. कामगार जाणिवेने भारलेल्या आहेत. साम्यवादी राजकीय बांधिलकी मानणार्‍या या कवीने शब्दांचा हत्यारासारखा वापर केलेला दिसतो. ‘इथून शब्दांच्या हाती खड्‌ग मी ठेवीत आलो’, असे ते म्हणतात.
सुर्वे मार्क्सवादी चळवळीतून पुढे आले होते. तरीही कोणतेही लेबल लावून सुर्वेंचा विचार करणे अन्यायकारक ठरेल. लेबलच्या पलीकडचा हा कवी होता. सर्जनशील कलावंताने कोणत्याही विचारसरणीने बांधून घेऊ नये, असेे म्हणतात. त्याप्रमाणे सुर्वेंच्या लेखनाच्या आड ती विचारसरणी आली नाही. तुमची कलाकृती ताकदीची असेल तर ती रसिकप्रिय होते. सुर्वेंची कलाकृती अशीच सशक्त होती. अनुभवातून आलेली ‘लोकमानसा’ची भाषाशैली व व्याकूळ काव्यांच्या बळावर सुर्वे यांनी मराठी काव्याला फार उंचीवर नेऊन ठेवले. मराठी कवितेवर असा अवीट ठसा उमटवणारा सुर्वेंसारखा महान माणूस पुन:पुन्हा जन्म घेत नाही. काव्याची स्वत:ची अशी भाषा असणारा हा कवी व त्यांच्या कविता जिवंत व काळजाला भिडणार्‍या ठरल्या. सुर्वेंच्या कवितेत प्रचंड प्रतिभा आणि ऋजुता होती. खडबडीत डोहातले पाणी जसे स्पष्ट दिसते, तसे सुर्वेंचे मन काव्यातून दिसते. 
कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते| 
निदान देणेकर्‍यांचे तगादे तरी चुकविता आले असते॥
असे झाले नाही; आम्ही शब्दांतच इतके नादावलो; बहकलो, 
असे झाले नसते तर कदाचित इमलेही बांधले असते॥
 त्यांनी स्वत: आयुष्यात इतके चटके खाल्ले, याचा नमुना दाखवणार्‍या या ओळी आहेत. इतका त्रास सोसला तरी आजुबाजूच्या परिस्थितीविषयी तक्रार केली नाही आणि माणसांचा दुस्वासही केला नाही. विद्रोहींचे साहित्य संमेलन असो वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो, शांत स्वभावाचे सुर्वे सार्‍यांच्याच मांडीला मांडी लावून बसू शकत. कोणत्याही विचारांची त्यांना ऍलर्जी नव्हती; त्यामुळेच तथाकथित बंडखोर साहित्यिकांना ते ‘ब्राह्मणाळलेले’ वाटायचे, पण सुर्वेंना त्याची पर्वा नव्हती. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच सर्वसमावेशकता असल्याने त्यांनी सर्वांना आणि सर्वांनी त्यांना स्वीकारले होते. कामगारांच्या समस्यांत गुंतलेले सुर्वे यांना स्वत:विषयी विचार करायला वेळच मिळाला नसेल, असे नाही. त्यांच्या ‘ऐसा गा मी ब्रह्मा’ कवितेत ‘गलबलून जातो तेव्हा तुझ्याच कुशीत शिरतो’ यासारख्या भावनांना हात घालणार्‍या ओळी आहेत. त्यांनी स्वत:बद्दलही वारंवार विचार केल्याचे त्यांच्या कवितेतून दिसते, पण हा स्वत:चा विचार त्यांनी एक व्यापक पट समोर ठेवून केल्याचे दिसून येते.गेली जवळपास ५ दशके शब्दांतच नादावलेल्या नारायण सुर्वे नावाच्या फाटक्या इसमाविषयी लिहिण्याची लेखक, पत्रकार मंडळींची ही पहिलीच वेळ नाही, पण त्यामुळेच ते लिहिणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. कारण सुर्वे हे नाव आता मराठी माणसाला तर अनोळखी राहिलेले नाहीच, शिवाय देश-परदेशांतील अनेकांनाही या ‘उठवळ’ आयुष्य जगलेल्या कवीविषयी नको तितके माहीत होऊन गेले आहे.

‘माझ्या पहिल्या संपातच, मार्क्स मला असा भेटला, 
निवडणुकीच्या मध्यभागी, माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता’॥
अशा आठवणीत दंग होऊन गेलेला हा विद्रोही कवी पुढे यथावकाश मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊन प्रस्थापितांच्या मांदियाळीत रुळला आणि त्यानंतर कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी स्वीकारले. पुरस्कारांनी त्यांची पाठ सोडली नाही. ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच’ बरबाद झालेल्या सुर्व्यांच्या जिंदगानीची अचूक ओळख महाराष्ट्राबाहेरही पटली होती आणि मध्य प्रदेश सरकारनेही ‘कबीर पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला होता. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने दिलेल्या ‘जनस्थान पुरस्कारा’मुळे सुर्वे यांच्या उत्तुंग क्षमतेची अधिकच ओळख गडद झाली. कुसुमाग्रजांशी त्यांचे संबंध अगदीच वेगळे आहेत. सुर्व्यांच्या कविता इंग्रजीत अनुवादित होऊन प्रकाशित झाल्या. त्या संग्रहास कुसुमाग्रजांचीच प्रस्तावना होती आणि मुख्य म्हणजे सुर्व्यांच्या प्रतिभेचे सामर्थ्य ज्या अगदी मोजक्याच लोकांनी ही पुरस्कारांची व अध्यक्षपदांची मालिका सुरू होण्यापूर्वीच ओळखले, त्यात कुसुमाग्रज अग्रस्थानी होते. त्यांच्या जाण्याने कामकरी काव्याची उणीव भरून काढणे शक्य नाही. त्यांच्या जाण्याने कामगार, कष्टकरी, साहित्यक्षेत्राचेच नव्हे तर देशाचेही नुकसान झाले आहे. वाचक, चाहते यांच्याप्रमाणेच वयाची ८० वर्षे पार केलेल्या नारायण सुर्वे यांनाही आपल्या कवितेचा रास्त अभिमान होता, म्हणूनच ते म्हणू शकले : 
आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र, तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते | 
बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते? ॥
जन्म-मरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते| 
चला, बरे झाले! आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते ॥
दै. तरुण भारत, सोलापूर. २२ ऑगस्ट २०१०
मन्नादांना २००७ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
चित्रपटगीतसृष्टीच्या नभांगणातील तळपणारा तारा : मन्ना डे
•अमर पुराणिक
पद्मभूषण मन्ना डे हे हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. चित्रपट व संगीत क्षेत्रांतील ज्येष्ठ गायक. ज्यांनी हिंदी चित्रपटगीतांना शास्त्रीय गाण्याची बैठक दिली. त्यांच्या भावपूर्ण व शुद्ध गायकीने हिंदुस्थानासह सर्व जगभरातील गानरसिकांना भुरळ घातली. अशा मन्नादांना २००७ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. या आधी पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या मन्ना डे यांना आता चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. हा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ पार्श्‍वगायकांचा सन्मानच आहे! खरे तर यापूर्वीच त्यांना हा पुरस्कार द्यायला हवा होता! माता महामायादेवी व पिता पूर्णचंद्र डे यांच्या पोटी १ मे १९१९ रोजी कोलकात्यात मन्ना डे यांचा जन्म झाला. मन्ना हे त्यांचे टोपणनाव. मन्ना डे यांचे खरे नाव प्रबोधचंद्र डे. त्यांचे शालेय शिक्षण इंदू बाबूर पाठशाळेत झाले. माध्यमिक शिक्षण स्कॉटिश चर्च स्कूल मध्ये झाले, तर विद्यासागर महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. मन्ना डे यांना कुस्ती व बॉक्सिंग या खेळांचीही आवड होती. धार्मिक व एकत्र कुटुंबात जन्मलेल्या मन्नादांच्या घरातच संगीतपरंपरा होती. मन्ना डे यांचे काका संगीताचार्य कृष्णचंद्र डे (ख्यातकीर्त संगीतकार के.सी. डे) यांच्याकडे शालेय जीवनापासूनच शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला सुरुवात केली. शाळेत आपल्या मित्रांसमोर मन्नादा गाणे गात असत. शाळेत, महाविद्यालयात ते चांगले ‘गवैया’ म्हणून लोकप्रिय झाले होते. काका के. सी. डे यांच्याबरोबरच मन्ना डे यांची उस्ताद डबीर खॉं यांच्याकडेही संगीताची तालीम सुरू होती. १९४१ मध्ये त्यांनी कला शाखेतील पदवीही पूर्ण केली. नंतर के.सी. डे मुंबईला आले व संगीतकार म्हणून नाव कमावले. १९४२ साली मन्ना डे मुंबईला आले व के. सी. डे यांचा सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हिंदी चित्रसृष्टीचे गौरीशंकर सचिनदेव बर्मन यांचेही सहाय्यक म्हणून मन्नादांनी काम करायला सुरुवात केली. त्यावेळी मुंबईत मन्ना डे यांनी भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खॉं व उस्ताद अब्दुल रहमान खॉं यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण चालू ठेवले. १९४२ मध्ये काका के.सी. डे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘तमन्ना‘ या चित्रपटात मन्ना डे यांना सर्वप्रथम गायची संधी मिळाली. हे युगलगीत मन्नादांनी सुरैय्यासोबत गायिले. १९४३ मध्ये ‘रामराज्य’ या चित्रपटातही मन्नादा गायिले. ही गीते बर्‍यापैकी गाजलीही, पण १९५० साली सचिनदेव बर्मनदांनी संगीतबद्ध केलेल्या ‘मशाल’ सिनेमात ‘उपर गगन विशाल’ हे गाणे गायची संधी मिळाली आणि बर्मनदांच्या या गाण्याने मन्ना डे नावाच्या गुणी गायकाची ओळख श्रोत्यांना झाली. हे गाणे प्रचंड गाजले! त्यानंतर प्रसिद्धीसाठी मन्नादांना मागे वळून पाहावेच लागले नाही. १९५२ साली ‘अमर भूपाळी’ हा मराठी व बंगाली भाषेत चित्रपट निघाला, हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला! या चित्रपटात मराठी व बंगालीत सर्वप्रथम मन्ना डे यांनी पार्श्‍वगायन केले. यातील गाणीही खूप गाजली. त्यांचे बंगाली पार्श्‍वगायक म्हणून मोठे नाव झाले.दि. १८ डिसेंबर १९५३ रोजी मन्नादांचा विवाह केरळच्या सुलोचना कुमारन यांच्याशी झाला. त्यांना १९ ऑक्टोबर १९५६ साली सुरोमा व २० जून १९५८ साली सुमिता अशी दोन कन्यारत्ने झाली.अतिशय वैविध्यपूर्ण गाणी गाणार्‍या मन्ना डे यांची ‘रवींद्र’ संगीतावरही चांगली पकड होती. मन्नादांचे शास्त्रीय संगीताबरोबरच पाश्‍चात्य व लोकसंगीतावरही चांगलेच प्रभुत्व होते. त्यांनी भारतीय व पाश्‍चात्य संगीतात अनेक नवनवे प्रयोग केले. त्यांनी साडेतीन हजारांहून अधिक गाणी गायिली आहेत. सचिनदांपासून पंचमदांपर्यंत सर्वच संगीतकारांबरोबर मन्ना डे यांनी काम केले. सचिनदा स्वत: धृपद-धमार गायकीच्या परंपरेतले, त्यामुळे शास्त्रीय अंगाची गाणी मन्नादांकडून खूपच सुंदर गाऊन घेतली व जवळ जवळ सर्वच गाणी लोकप्रिय ठरली. सर्वसामान्य रसिक श्रोत्यांना राग दरबारी कान्हडा मन्नादांमुळे कळायला लागला, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही. मन्नादांनी बरीच गाणी या रागात गायिली आहेत. सचिनदेव बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनातली मन्नादांची साधारणपणे सर्व गीते गाजली. ज्यात तलाश, मंजिल, जिंदगी जिंदगी, ज्वारभाटा अशी काही उदाहरणे देता येतील. मन्नादांनी सलील चौधरींसाठी वेगळी गाणी गायिली. अवघड व वक्र चालींची गाणी हे सलीलदांचे वैशिष्ट्य होते. अशी गाणी मन्नादांसारख्या कसलेल्या गायकाच्या आवाजात खूपच शोभतात! जसे ‘‘आनंद, गुड्डी, परिणिता, काबुलीवाला’’ आदी अनेक उदाहरणे सांगता येतील. हेमंतकुमार यांनीही मन्नादांना वैशिष्ट्यपूर्ण गाणी दिली. राहुलदेव बर्मन यांनी मन्नादांकडून खूप वेगळी गाणी गाऊन घेतली. विशेषत: शास्त्रीय संगीत गाणार्‍या मन्नादांकडून शास्त्रीय संगीताबरोबरच पाश्‍चात्य ढंगातील गाणी अप्रतिमरीत्या गा ऊन घेतली. हे पंचमदांचे वेगळेपण होते; ज्यात भूतबंगलामधील ‘आवो ट्विस्ट करे’, ‘प्यार करता जा’, पडोसनमधील,‘ एक चतुर नार’, ‘तू क्या जाने पिया सावरिया ’, अब्दुल्लामधील ‘लल्ला अल्ला तेरा’, अधिकारमधील ‘फॅशन की दिवानी’, बहारोंके सपनेमधील ‘चुनरी संभाल गोरी’, बुढ्ढा मिल गयामधील ‘आयो कहॉंसे घन:श्याम नंदलाल’, शोलेमधील ‘ये दोस्ती’, जुर्माना ‘ये सखी राधिके’ तसेच ‘प्यार किये जा, मेहबुबा, सीता और गीता, जाने अन्जाने’ अशी अनेक अवीट गोडीची गाणी मन्नादांनी पंचमदांसाठी गायिली. राज कपूरसाठी मन्ना डे यांनी मेरा नाम जोकर मधील ‘ए भाय, जरा देख के चलो’, सत्यम् शिवम् सुंदरम्‌मधील ‘यशोमती मैंयासे बोले नंदलाला’ आदी गीते प्रचंड लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर ‘‘चोरी चोरी, अनाडी, श्री ४२०, बूट पॉलिश’’ आदी चित्रपटांसाठी गीते गायिली. मन्नादांनी या संगीतकारांशिवाय जवळ जवळ त्या काळातील सर्वच संगीतकारांबरोबर काम केले. ज्यामध्ये ‘‘उपकार, वक्त, तीसरी कसम, मेरे हुजूर, नीलकमल, लाल पत्थर, शोर, आविष्कार, क्रांती, लावारिस’’ आदी चित्रपटांचा समावेश होतो. मन्नादांची शास्त्रीय, उपशास्त्रीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली! किंबहुना त्यांच्यावर फक्त शास्त्रीय गाणी गाणारा गायक असाच शिक्का पडला होता, पण पंचमदांनी मन्नादांकडून वेगवेगळ्या ढंगांतील गाणी गाऊन घेऊन हा शिक्का पुसला. मन्नादांची बसंत बहारमधील ‘भय भंजना वंंदना’, सूर ना सजे क्या गाऊँ मैं, जाने अन्जानेमधील ‘छम छम बाजे रे पायलिया’, तलाशमधील ‘तेरे नैना तलाश करे’, बूट पॉलिशमधील ‘लपक झपक तू आरे बादरवा’, मेरे हुजूरचे ‘झनक झनक तोरे बाजे पायलिया’ ही शास्त्रीय गाणी आजही लोकप्रिय आहेत. मन्नादांनी नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटासाठी शेवटचे गीत गायिले आणि चित्रपट गीतगायनातून संन्यास घेतला. आजच्या काळात विशेषत: १९९० नंतर मन्नादांनी चित्रपटगीत गायिलेच नाही. त्यांची यावरील प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. त्या दर्जाचे संगीतकार न राहिल्यानेच मन्नादांना संन्यास घ्यावा लागला, पण शास्त्रीय संगीतसाधना आणि जाहीर कार्यक्रम मन्नादांनी अजूनही सुरूच ठेवले आहेत. जवळपास ५० वर्षे मुंबईत घालविल्यानंतर आता मन्नादा सध्या बंगळुरूमधील कल्याणनगरमध्ये राहतात, पण त्यांनी कोलकात्यातील त्यांची जुनी वास्तू तशीच ठेवली आहे. मन्ना डे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात १९७० साली ‘निशिपद्म’ या बंगाली चित्रपटासाठी राष्टृीय पुरस्कार मिळाला आहे. तर १९७१ साली मेरा नाम जोकरसाठी राष्ट्रीय पुरस्कार, १९७१ साली भारत सरकारचा पद्मश्री, १९८५ साली मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, १९८८ साली संस्कृत परिषद, ढाक्का येथील पुरस्कार, १९९० साली मिथुन चक्रवर्ती असोसिएशन, कोलकाता यांचा ‘श्यामल मित्रा’ पुरस्कार, १९९१ ला संगीत स्वर्णांचूर पुरस्कार, १९९३ साली पी.सी. चंद्र पुरस्कार, कमलादेवी राय पुरस्कार, २००१ साली आनंद बाजार पत्रिका यांचा आनंदलोक पुरस्कार, पश्‍चिम बंगाल सरकारचा उस्ताद अल्लाउद्दिन खॉं पुरस्कार, २००४ साली केरळ सरकारचा पुरस्कार, २००४ सालीच रवींद्रभारती विद्यापीठाची डी.लिट., २००५ साली महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार, २००५ साली बुर्धवन विद्यापीठाची डी.लिट व २००५ साली भारत सरकारचा पद्मविभूषण असे अनेक पुरस्कार व गौरव मन्ना डे यांना प्राप्त झाले आहेत. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव केल्याने, चित्रपट व संगीत क्षेत्राचीच मान उंचावली आहे!
दै. तरुण भारत, सोलापूर. ४ ऑक्टोबर २००९