This is an example of a HTML caption with a link.
Recent Post

 जात्युच्छेदक निबंध : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार

प्रस्तुतच्या जातीभेदाचें इष्टानिष्टत्व 

   ‘मला वाटते की, देशाच्या राजकीय, सामाजिकप्रभृती परिस्थितीचें आणि ती सुधारण्यासाठी ठरलेल्या सिद्धान्तप्राय उपायांचें ज्ञान मुलांना लहानपणापासूनच करून देणें अत्यंत आवश्यक झाले आहे. राजकीय सिद्धान्तांचें नि सामाजिक प्रेम यांचें विद्यार्थ्यास लहानपणापासूनच बाळकडू देणें (जसें अवश्य) तद्वतच जातीभेद, जातीद्वेष नि जातीमत्सर यांचे योगाने आमचा देश कसा विभागला जात आहे, कसा भाजून निघत आहे, कसा करपून जात आहे याचेंही ज्ञान राष्ट्रीय शाळेतील मुलांना मिळालें पाहिजे; जातीभेद सोडण्याची आवश्यकता किती आहे हें आमच्या विद्यार्थ्यांना समजलें पाहिजे.’    

- लोकमान्य टिळक (बेळगावचें व्याख्यान, १९०७)

आपल्या हिंदू राष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाशी प्रथम चातुर्वर्ण्य आणि नंतर त्याचेंच विकृत स्वरूप असलेली जातीभेद संस्था ही इतकी निगडित झालेली आहे की, आपल्या हिंदू वा आर्य राष्ट्राच्या वैशिष्ट्याची व्याख्या काही काही स्मृतीकारांनी ‘चातुर्वर्ण्यव्यवस्थानं यस्मिन्देशे न विद्यते । तं म्लेच्छदेशं जानीयात् आर्यावर्तं तत: परम् ।।’ अशीच दिलेली आहे. अर्थात्आपल्या हिंदू राष्ट्राच्या उत्कर्षाचें श्रेय जसे या आपल्या जीवनाच्या तंतूतंतूंशी गुंफून राहिलेल्या जातीभेदास असण्याचा उत्कट संभव आहे; तसाच आपल्या राष्ट्राच्या अपकर्षाचेंही तीच संस्था एक बलवत्तर कारण असण्याचाही तितकाच उत्कट संभव आहे. त्यातही मूळचें चातुर्वर्ण्य जे ‘गुणकर्म विभागश: सृष्टम्’ ते लोपत जाऊन आजच्या जन्मनिष्ठ जातीभेदाचा फैलाव होऊ लागला, त्याच वेळी आणि तसाच आपल्या हिंदूस्थानाचा अध:पातही होत आला; आणि ज्या वेळी बेटीबंद आणि रोटीबंद जातीभेदाने अत्यंत उग्र स्वरूप धारणे केले तोच काळ आपल्या अध:पाताचाही परमावधि करणारा ठरला.

जातीभेद नि अध:पात यांचें समकालीनत्व

या समकालीनतेमुळे तर त्या जातीभेदाचा आणि त्या अध:पाताचा संबंध केवळ काकतालीय योगाचा आहे कीं कार्यकारण भावाचा आहे याची शंका अत्यंत उत्कटतेने न येणें केवळ अशक्य आहे. यामुळे आपल्या राष्ट्राच्या अपकर्षाचीं कारणे  शोधताना इतर महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणेच या जातीभेदाच्या प्रस्तुतच्या स्वरूपाच्या इष्टानिष्टतेची छाननी करणे हें भारतीय राष्ट्रधुरीणांचे आजचें एक अत्यंत त्वर्य (Urgent) आणि अपरिहार्य कर्तव्य झालेलें आहे. एखादें उद्यान खळांपुलांनी डवरलेलें, निकोप वृक्षांच्या विस्तीर्ण प्रौढीने नि निरोगी लतावेलींच्या सलील शोभेने उल्हासित असलेलें पाहून तेथील प्रकाश, पाणी आणि खत हीं बहुधा निर्दोष असावीं असे अनुमान जसें सहज निघते; तसेच ते वृक्ष खुरटलेले फळें किडलेलीं, फुलें शिथिललेलीं दिसताच त्या र्‍हासास आधारभूत असलेल्या प्रकाश, पाणी, खतप्रभृती घटकांपैकी कोणते तरी एक वा अनेक वा सर्वच दोषी झालेली असलीं पाहिजेत हेंही अनुमान तसेच सहज निष्पादित होते. आणि त्या प्रत्येकाची छाननी करून दोष कशात आणि किती प्रमाणात सापडतो याचें निदान करणे आणि तदनुसार ते ते दोष निर्मूल करणे हेंच त्या बागवानाचें आद्य कर्तव्य ठरते.
परंतु या दृष्टीने पाहता हिंदू राष्ट्राच्या अपकर्षास ही आमची जातीभेद संस्था किती प्रमाणात आणि कशी कारणीभूत झाली आहे किंवा झालीच नाही, याचें विवेचन आवश्यक असूनही आम्हांस व्यक्तीश: ते सांगोपांग करणे आज शक्य नाही. कारण जातीभेदाच्या आजच्या स्वरूपाचे परिणाम विशद करू जाताच आमच्या राजकीय परिस्थितीचा विचार क्रमप्राप्तच होणार आणि प्रचलित राजकारण संन्यासाच्या शृंखलेने जखडलेली आमची लेखणी त्यास तर शिवूही शकत नाही. यासाठी तो भाग तसाच सोडून या जातीभेदाने आमच्या राष्ट्राच्या सुस्थितीवर आणि प्रगतीवर सामान्यत: काय परिणाम झालेले आहेत याचें केवळ दिग्दर्शन करूनच आम्हांस या प्रास्ताविक भागास आटोपते घ्यावे लागले.

कोणाचें मत प्रमाण मानावें?

आणि हें दिग्दर्शन करताना या विषयासंबंधी लो.टिळकांवाचून दुसरें कोणाचें मत अधिक अधिकारयुक्त असणार आहे? गेल्या शंभर वर्षांत हिंदुस्थानात आपल्या हिंदू राष्ट्राच्या हिताहिताविषयी उत्कट ममत्वाने, सूक्ष्म विवेकाने आणि स्वार्थनिरेपक्ष साहसाने सर्व बाजूंनी समन्वित विचार केलेला जर कोणी पुरुष असेल तर ते लोकमान्य टिळकच होत. यास्तव आमच्या हिंदू राष्ट्राच्या अपकर्षाच्या कारणपरंपरेविषयीची त्यांचीं मते अगदी सिद्धान्तभूत नसलीं, तरी इतर कोणत्याही मतापेक्षा अधिक आदरणीय, विचारणीय आणि विश्वसनीय असणारच. त्यातही जातीभेदासारख्या धार्मिक संस्था म्हणून, सनातन संस्था म्हणून, साधारण लोक ज्या प्रश्नास समजतात त्या विषयांवर राजकारणात आणि धर्मकारणात सनातनी समजल्या जाणार्‍या कोटी कोटी लोकांचा विश्वास आणि नेतृत्व ज्यानें संपादिलें, त्या लोकमान्यांच्या मताचें महत्त्व विशेषच असलें पाहिजे. वास्तविक पाहता आजकाल कोण सनातन हे ठरविणें दुर्घटच आहे. जो ज्या वेळी एखाद्या सुधारणेस विरोध करतो आणि एखाद्या रूढीस उचलून धरतो तो त्या वेळेपुरता निदान त्या प्रकरणीं तरी सनातनी म्हणविला जातो, इतकेंच काय ते सनातनीपणाचें सध्याचें लक्षण आहे. यास्तव स्वत: लोकमान्यांवरही जरी बहिष्कार पडलेले होते, अनेक धर्ममार्तंडांनी त्यांनाही जरी प्रच्छन्न सुधारक म्हणून हिणविलें होते; तरीही हिंदू संस्कृतीच्या रक्षणार्थ त्यांनी उभ्या आयुष्यभर जी नेटाची झुंज घेतली आणि अगदी निरूपाय होईतो प्रचलित समाज घटनेला कोणाचाही अनावश्य धक्का लागू नये आणि अंतर्गत यादवी वाढू नये म्हणून सुधारणा विरोधाचा तीव्र आरोप सहन करूनही जी सतत काळजी घेतली; त्यामुळे कोट्यवधी हिदूंचा सनातन धर्म संरक्षक म्हणून लोकमान्यांवरच विश्वास बसलेला होता; या सर्व कारणांसाठी जातीभेदाच्या स्वरूपाविषयी लोकमान्यांसारखा अग्रगण्य सनातनी राजकीय पुढारी देखील काय म्हणतो हें पाहिलें असता तो जातीभेद आपल्या हिंदू समाजाच्या अपकर्षाला कसा कारणीभूत होत आहे हें त्यांच्या या लेखावर उद्धृत केलेल्या शब्दावतरणाने दिसून येते. ‘जातीद्वेष आणि जातीमत्सर यांनी आमचा देश कसा करपून जात आहे, कसा भाजून निघत आहे (आणि म्हणूनच तो जातीभेद मोडण्याची किती आवश्यकता आहे)’ याविषयी त्यांचे वरील जळजळीत उद्गार एकिले असता आजचा जातीभेद आपल्या राजकीय जीवनासही किती घातक आहे ते निराळें सिद्ध करीत बसण्याची आवश्यकता उरत नाही.

आजचें विकृत स्वरूप

हा लोकमान्यांसारख्यांचा आप्तवाक्याचा आधार क्षणभर बाजूस ठेवला तरीही, आज आहे या स्वरूपात तरी जातीभेद देशहितास अत्यंत विघातक होत आहे, हें सिद्ध करण्यास एक सर्वसामान्य सबळ पुरावा असा आहे की, चार वर्षांच्या बेटीबंदी रोटीबंदीच्या सहस्रश: हबक्यंात ह्या आपल्या हिंदू जातींच्या जीवनाचा गंगौघ खडंविखंड करून कुजवून टाकणारा हा आजचा जातीभेद तरी घातक आहेच आहे, यात काहीतरी सुधारणा झालीच पाहिजे; याविषयी तरी सनातन्यांतल्या सनातन्यांचाही मतभेद दिसून येत नाही. अगदी पंडित राजेश्वरशास्त्रीदेखील जातीभेदांच्या आजच्या अत्यंत विकृत स्वरूपाचें सर्वस्वी समर्थन करण्याचें साहस करू शकणार नाहीत. मग दुसर्‍याची काय गोष्टी? कारण त्यांच्या सनातन महासभेनेही इग्लंडमध्ये आपला प्रतिनिधी बोलावला असता आपण जाऊ म्हणून ठराव केलाच की नाही? दरभंग्याचे महाराजही बोटीवर चढताच परदेशगमन निषिद्धतेस समुद्रात ढकलून देते झालेच की नाही? त्या प्रकरणात जातीनिर्बंधाच्या बेड्या त्यांनी तोंडल्याच की नाहीत?

परदेशगमनाचा निषेध

जातीभेदाचें प्रस्तुतचें विकृत स्वरूप आपणांस हानीकारक होत असून त्यात काहीतरी सुधारणा केलीच पाहिजे याविषयी प्रस्तुतच्या बहुतेक विचारी पुढार्‍यांचें जसें ऐकमत्य आहे, तद्वतच आपल्या मागच्या वैभवास जे आपण मुकलो, त्यासही ह्या जातीभेदाच्या आणि तदुत्पन्न विटाळ-वेडाच्या भ्रांत समजुतीच पुष्कळ अंशी कारण झाल्या आहेत हेंही कोणी विचारवंत मनुष्यास सहसा नाकारता येणे शक्य नाही. बाकी सर्व भाराभर गोष्टी सोडल्या तरी ह्या एका परदेशगमन निषेधाचाच प्रताप आपणांस केवढा भोवला पाहा! परदेशगमन निषिद्ध कां! तर माझी ‘जात’ जाईल म्हणून... आणि जात जाईल म्हणजे काय? तर जातीबाहेरच्या मनुष्याशी अन्नोदक संबंध घडेल, जातीभेदाच्या प्रवृत्तीमुळे बोकाळलेला, अन्नाचा विटाळ, चिंधीचा विटाळ, अशा विक्षिप्त विटाळ-वेडाने परदेशगमन निषिद्ध होताच परदेशचा व्यापार आणि व्याप ठार बुडाला. इतकेंच नव्हे तर पृथ्वीवरील दूरदूरच्या खंडोखंडी या विटाळ-वेडाच्या रोगाने प्रादुभावापूर्वी हिंदू व्यापार्‍यांनी आणि सैनिकांनी संपादिलेलीं आणि वसविलेली नगरेंची नगरें, बंदरेचीं बंदरे, राज्येची राज्यें मातृभूमीपासून अकस्मात्विलग झाल्याने आणि स्वदेशातून भारतीय स्वजनांचा जो सतत पाठपुरावा त्यांस होत होता, तो नाहीसा झाल्याने तिकडच्या तिकडे गडप झालीं, अक्षरश: ‘नामशेष’ झालीं. कारण आता त्यांची स्मृती केवळ खंडोखंडी अजून विकृतरूपाने का होईना पण प्रचलित असलेल्या नावावरूनच काय ती अवशिष्ट आहे.

परधार्जिणें विटाळवेड

इंडो-चायना (हिंदू-चीन), झांझीबार (हिंदू-बाजार), बाली, ग्वाटेमाला (गौतमालय) अशा नावारूनच काय तो हिंदू वैभवाचा आणि संस्कृतीचा आणि प्रभुत्वाचा त्या त्या खंडी विस्तारलेला व्याप आज अनुमित करता येईल! हिंदुत्व आणि दिग्विजय या शब्दांचा इतका आत्यंतिक विरोधी भाव आला की, जेव्हा अटकेपार होऊन इस्तंबूलवर चढाई करण्याची, अंधुक आकांक्षा मराठी मनात उत्पन्न झाली,  तेव्हा तिची संपन्नता हिंदुत्व राखून करता येणें शक्य आहे ही कल्पनासुद्धा मल्हररावासारख्या हिंदूपादशाहीच्या  खंद्या वीरालाही न शिवता तो वीर गर्जून उठला - ‘हिंदूचे मुसलमान होऊ पण पुढील वर्षी काबुलवर चाल करून जाऊच जाऊ.’ हिंदूचे मुसलमान होण्यावाचून मुसलमानांच्या देशावर सत्ता स्थापण्याचा अन्य मार्गच उरला नव्हता काय? हिंदूही राहू आणि काबूल तर काय पण इस्तंबूलवरही मराठी झेंडा आणि मराठी घोडा नाचवू ही गोष्ट तपनतमोवत्अत्यंत विसंवादी जी वाटली ती ह्या विटाळवेडाच्या, या ‘माझी जात जाईल,’ च्या भीतीमुळेच होय. हिंदू म्लेंच्छदेशी गेल्याने त्याची जात जाईल, पण केवढें आश्चर्य की, म्लेंच्छ स्वदेशी म्हणजे हिंदूदेशी आल्याने मात्र हिंदूंची ती ‘जात’ जात नसे, तो विटाळ होत नसे. वास्तविक पाहता त्यातल्या त्यात विटाळवेडच हवें होते तर ते असे काही सुचलें असते तरी याहून पुष्कळ बरें होते. ज्या हिंदू गावी वा प्रांती तो म्लेंच्छ व्यापारी शिरला, त्याला त्याला त्या म्लेंच्छाचा विटाळ होऊन त्या त्या हिंदू गावाची जात गेली अशी रूढी पडती तर ती आपत्ती खरीच, पण पुष्कळ अंशी ती इष्टापत्ती तरी होती. पण एखादा कासम किंवा क्लाइव्ह हिंद प्रातांत आला, आणि त्याने त्याचा उभा व्यापार किंवा उभें राज्य घशात घातलें तर त्याचा विटाळ आम्हां हिंदूंना होत नसे. त्याने आमची जात जात नसे. तर ती केव्हा जाईल तर एखादा हिंदुजन म्लेंच्छ देशात जाऊन तिकडचें धन वा सत्ता संपादून त्यायोगे आपली मातृभूमी सधनतर आणि सबलतर करण्यासाठी तो परत स्वदेशी आला म्हणजे!

जात राहिली पण धर्म गेला

म्लेंच्छ व्यापार्‍यास त्याच्या वस्तू स्वदेशी आणण्यासाठी, एखाद्या जावयाला मिळणार नाहीत अशा, कित्येक सवलती हिंदूंनी दिल्या. पण स्वदेशीचे हिंदू व्यापारी परदेशात हिंदवी वस्तू विकावयास आणि हिंदू वाणिज्य प्रसारावयास जाऊ लागले तर, शत्रूसही घालू नयेत अशा विशेष अडचणी, त्यांच्या मार्गात घातल्या. असल्या या आत्मघातक अंधळेपणाची शेवटी इतकी पराकाष्ठा झाली की, मलबारच्या राजास आपले काही विश्वासाचे लोक अरबांच्या सामुद्रिक वाणिज्य व्यवसायात प्रवीण व्हावें असे जेव्हा मनात आलें, तेव्हा त्या जातीच्या हिंदूंनी अशी पोक्त युक्ती काढली की, दरवर्षी हिंदूच्या प्रत्येक कुटुंबामागे एकेकाने मुसलमानी धर्म स्वीकारावा, आणि नौवाणिज्य शिकावें! कारण तो हिंदू आहे तोवर त्यास समुद्रवाणिज्य शिकणें निषिद्धच असणार. समुद्र ओलांडताच त्याची जात जाणार! म्हणून जात राहावी यास्तव धर्मच सोडून दिला! सर्पण हवें म्हणून हातपाय कापून चुलीत घातले! बायकोला दागिने हवे म्हणून बायकोलाच विकून टाकली! जात राखण्यासाठी बेजात केलेले तेच हे ‘मोपले’ आज त्याच जातीवाल्या हिंदूंचा निर्वंश करण्यास त्यांवर लांड्यासारखे तुटून पडत आहेत! फार काय सांगावें, क्वचित् एखाद्या अद्भुत देवीप्रसादाने दिल्लीचें सिंहासन चूर्ण करणार्‍या सदाशिवराव भाऊच्या त्या घरास सकाळी लंडनचे सिंहासन चूर्ण करण्याची शक्ती आली असती आणि त्याने दिल्लीच्या प्रमाणे इग्लंडला जाऊन लंडनच्या सिंहासनावर विश्वासरावास चढवून राज्यभिषेक करवून घेतला असता तर इंग्लंडमध्ये हिंदुपद-पादशाही स्थापन होती; पण ते दोघे हिंदू मात्र विदेशगमनाने त्यांची जात जाऊन, अहिंदू होते!!!

पराक्रमाचा संकोच

अगदी इसवीसनाच्या अकराव्या बाराव्या शतकापर्यंत जातीभेदाच्या क्षयाने आमच्या नाड्या आखडत आल्या असताही विदेशगमननिषिद्धतेच्या परमावधीला तो रोग पोचला नव्हता, तोवर मद्राच्या पांड्य वीरांच्या सेना विदेशातही हिंदू राज्यें चालवीत होत्या. शेवटच्या दिग्विजयी पांड्य राजाने त्याच वेळी ब्रह्मदेशाकडे पेगूवर स्वारी केली. नुसते ‘प्रतस्थे स्थलवर्त्मना’ नव्हे तर अगदी मोठें प्रबळ नौसाधन (आरमार) घेऊन ‘जलवर्त्मना’ प्रस्थान केले आणि ब्रह्मदेशाकडे पेगूचा विजय करून येता येता अंदमानादिक त्या समुद्रामधील सारीं बेटें हिंदू साम्राज्यात समाविष्ट करून तो परत आला. पण पुढे जेव्हा तो महासागरसंचारी हिंदू पराक्रम घरच्या विहिरीतला बेडूक होऊन बसला तेव्हा पराक्रम (पर + आक्रम), बाहेरच्या परशत्रूंच्या देशावरच चढाई करणे, हा शब्दच हिंदूंच्या कोशातून लुप्त झाला. शक्यतेचा मूळ उगम आकांक्षेतच असणार. पराक्रमाची, खर्‍या दिग्विजयाची, नवीं राज्यें संपादिण्याची आपली संस्कृती आणि प्रभाव सप्तद्विपा वसुंधरेवर दिग्विजयी करण्याची, आकांक्षाच जेव्हा ‘जातीच्या’ हिंदूस पाप झाली तेव्हा त्यास दिग्विजय करण्याची शक्यताही दिवसेंदिवस नष्ट होत गेली. आकाशात उडण्याची साहसी सवय पिढ्यानुपिढ्या नष्ट झाल्याने ज्यांचे पंख पंगू झाले आहेत असे हें हिंदू पराक्रमाचें कोंबडे आपल्याच ‘जातीच्या’ अंगणास जग मानून त्यातच डौलाडौलाने आरवत बसलें आणि ते केव्हा? तर आततायी पराक्रमासही पुण्य मानणार्‍या मुसलमानी गिधाडांनी आणि युरोपियन गुंडांनी सर्व जगाचें आकाश नुसते झाकून टाकलें तेव्हा! अशा स्थितीत त्यांच्या झेपेसरशी ते अंगणातलें कोंबडें ठिकाणच्या ठिकाणी फडफडून गतप्राण झाले यात काय आश्चर्य?

मराठी साम्राजाच्या क्षय

केवळ अगदी शेवटच्या हिंदू साम्राज्याचा, आपल्या महाराष्ट्रीय हिंदूपदपादशाहीचा, पतनकाल घ्या. आपली पूर्वीचीं साम्राज्यें आणि स्वातंत्र्य जाण्यास केवळ जातीभेदच कारण झाला हें विधान जसें अतिशयोक्तीचें होईल तसेच मराठी राज्य केवळ जातीभेदानेच बुडालें हें विधानही अतिशयोक्तीचें होईल. परंतु हें विधानही तितकेंच विपर्यस्त न्यूनोक्तीचें होणारें आहे की, आपली जी हिंदूपदपादशाही मूठभर इंग्रजी पलटणीच्या पायाखाली तुडविली गेली, ती इतकी निर्बल होण्यास जातीभेदाचा क्षय मुळीच कारणीभूत झालेला नाही! समुद्रगमननिषेध हें या भयंकर क्षयाचें एक उपांगदेखील विचारात घेतलें असता मराठी साम्राज्यकाळीसुद्धा आपलें सामाजिक नव्हे तर राजकीय बलदेखील या भयंकर व्याधीने किती निर्जीव करून सोडलें हें तत्काल ध्यानात येणारें आहे. ज्या वेळी इंग्रजांनी देशातील उभा आयातनिर्‍यात व्यापार हस्तगत केला होता, त्या वेळी त्यांच्या देशात आपल्या व्यापाराची एकही हिंदू पेढी नव्हती. शेवटच्या रावबाजीच्या अंत:पुरात दासी किती, त्यात बोलकी कोण, विश्वासघातक होण्यासारख्या कोण, येथपर्यंत आपल्या देशाची खडान्खडा माहिती त्यांच्या पुण्याजवळील ‘बेटा’मधल्या लेखनालयात टिपलेली असता इग्लंड देश आहे कोठे, इंग्रजांचें राज्य आहे किती, त्यांचे शत्रू कोण, त्यांचें बल किती अशी घाउक माहितीदेखील आम्हांस प्रत्यक्ष पाहून सांगेल असा एकही हिंदू त्यांच्या देशात गेलेला नव्हता! फ्रेंचांची माहिती इंग्रज सांगेल ती आणि इंग्रजांची फ्रेंच सांगेल ती. त्या स्वार्थप्रेरित विपर्यस्त माहितीवर सारी भिस्त!

मुकट्यापायी मुकुट दवडले!

एक हिंदू राघोबादादांचा वकील कोठे एकदाचा विलायतेस जाऊन आला तो त्याच्या त्या भयंकर जात गेल्याच्या पापाचें प्रायश्चित्त त्याला ‘योनिप्रवेश’ करवून आणि पर्वतावरील पाहाडांच्या कडेलाटशेलगतच्या योनीसारख्या आकृतीतून बाहेर येताच तो पुनीत झालासें मानून परत घेण्यात आलें. पाप एकपट मूर्ख आणि त्याचें प्रायश्चित्त शतपटीने मूर्खतर! जसे हजारो इंग्रज हिंदुस्थानात आले, तसे लाखो हिंदू व्यापारी, सैनिक, कारस्थानी युरोपभर जात-येत राहते तर काय त्यांच्या कला, त्यांचा व्यापार, त्यांची शिस्त, त्यांचे शोध आम्हांस आत्मसात्करता आले नसते? काळे, बर्वे, हिंगणे असले पट्टीचे हिंदू राजदूत जर लंडन, पॅरिस, लिस्बनला राहते तर काय आमच्या यादवीचा जसा त्यांनी लाभ घेतला तसा त्यांच्या यादवीचा आम्हांस घेता आला नसता? पण आडवी आली ही ‘जात’ हें ‘सोवळें’ - हा मुकटा’! ह्या मुकट्यापायी मुकुट दवडले पण त्यायोगे त्याची जात गेली नाही पण जर का तो वर उल्लेखिलेल्या पांड्य राजासारखा लंडनवर चालून जाता तर मात्र त्याची जात नि:संशय गेली असती.

समाजाचा देह पोखरणारें जातवेड

भारताचें स्थलबल असे निर्बल झाले. भारताचें जलबल त्या रणतरी-तीं नौसाधनें, जीं अगदी दहाव्या शतकापर्यंत सागरासागरावर हिंदूध्वज डोलवीत संचार करीत होतीं, तीं तर ठारच बुडालीं; त्या महासागरावर पाण्यात नव्हे, अहिंदू पक्षीयांच्या खड्गाचे पाण्यात नव्हे, तर या हिंदू जातवेडाच्या संध्येच्या पळीतील पाण्यात! आजही हे सात कोटी अस्पृश्य, मुसलमानांच्या संख्याबलाइतकेंच हें संख्याबल, एखाद्या तुटलेल्या हाताप्रमाणे निर्जीव होऊन पडलें आहे या जातवेडाने! कोट्यवधी हिंदू बाटले जात आहेत या जातवेडाने! हे ब्राह्मणेतर, हे सत्यशोधक फुटून निघाले या जातवेडाने! ब्राह्मणाच्या जात्यहंकाराचा केव्हा अगदी ठीक समाचार घेताना जो ब्राह्मणेतर सत्यशोधकपंथ समतेच्या एखाद्या आचार्‍यासही लाजवील अशा उदात्त तत्त्वांचा पुरस्कार करतो, त्यातील काही लोक तेच समतेचें अधिष्ठान महार-मांग मागू लागताच अगदी मंबाजीबुवासारखे पिसाळून त्यांच्यावर लाठी घेऊन धावतात, या जातवेडामुळे! ब्राह्मण मराठ्यांचे ब्राह्मण बनू पाहतात! हें जातवेड एका ब्राह्मणाच्याच अंगी मुरलेलें नसून अब्राह्मण चांडालापर्यंत उभ्या हिंदूसमाजाच्याच हाडीमासी रुजलें आहे! उभा समाजदेह या जात्यहंकाराच्या, या जातीमत्सराच्या, जातीकलहाच्या, क्षयाचे भावनेने जीर्णशीर्ष झालेला आहे.

उपेक्षा केली तर?

हिंदू राष्ट्राच्या आजच्या आत्यंतिक अपकर्षाचें हें आजचें जातीभेदाचें विकृत स्वरूप जरी एकमात्र कारण नसलें तरी एक अनुपेक्षणीय कारण आहेच हें वरील अत्यंत त्रोटक दिग्दशनावरूनही स्पष्ट दिसून येईल आणि म्हणून अशा स्थितीत आपल्या अपकर्षाच्या त्या बाह्य कारणांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करणे हें आपणां सर्वांचे एक अगदी अवश्य कर्तव्य होऊन बसलें आहे. जे हिंदूराष्ट्राचें स्वातंत्र्य आपणांस मिळवावयाचें आहें ते जातीभेदाने जर्जर झालेल्या या आपल्या राष्ट्रपुरुषास जरी एक वेळी मिळविता आलें तरी या रोगाचें जोवर निर्मूलन झालें नाही तोवर एका बाजूस ते मिळविताच पुन्हा गमावण्याचाही पाया भरत जाणार आहे.
परंतु जातीभेदाच्या आजच्या विकृत आणि घातक स्वरूपाचे निर्मूलन करण्याचा हा यत्न करीत असता या संस्थेत जे काही गुणावह असेल तेंही नष्ट न होईल अशाविषयी मात्र आपण अर्थातच शक्यतो सावधान असले पाहिजे. आज पाच हजार वर्षें जी संस्था आपल्या राष्ट्राच्या जीवनाच्या तंतूतंतूंशी निगडित झाली आहे, तिच्यात आजही काहीएक गुणावह नाही आणि पूर्वीही काहीएक गुणावह नव्हते असे वैतागासरशी धरून चालणें अगदी चुकीचें होईल. यास्तव या लेखमालेत आम्ही जातीभेदाच्या मुळाशी कोणतीं तत्त्वें होतीं, त्यातला गुणावह भाग कोणता, त्याची प्रकृती कोणती आणि विकृती कोणती आणि कोणच्या योजनेने त्यातील हितावह ते ते न सोडता अनिष्ट ते ते शक्य तो टाळता येईल ह्याचें यथावकाश विवेचन योजिलें आहे.
-    (केसरी, दि. २९-११-१९३०)
हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत् : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार
'हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.
हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्
हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५०)
'हिंदू' शब्दाची उत्पत्ती
... आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. आणि त्या जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू हयाच नावाने ओळखत असत. - (१९२३ हिं.,स.सा.वा. ६ : ५)
हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही
महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले गेल्यापूर्वी हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ४६)
हिंदू शब्दाची व्याख्या
आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥
- (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७५)
सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७४)
हिंदू ह्या दोन अक्षरांत
हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे. - (स.सा.वा.२:४२९)
हिंदुत्व हा एक शब्द नव्हे, तो इतिहास आहे. -(१९२३ हिं., स.सा.वा. ६ : २)
हिंदुत्वाचे स्फुल्लिंग जागृत ठेवा
अग्निहोत्री ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल. - (१९४१ अ.हिं.ल.प.पृ. १४३)
हिंदुधर्म
'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे. - (१९४९ स.सा.वा. ३ : ७१३)
हिंदुधर्मान्तर्गत धर्मांची नावे
बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६९ )
एक धर्मपुस्तक नाही हेच चांगले
कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल. - (१९३७ हिं.स.प.पृ. ३७)
हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही
हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो. - (१९२७ हिं.प., स.सा.वा. ३ : ४०)
ग्राह्यतम धर्म - हिंदुधर्म
काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय ! - (१९३५ स.सा.वा. ३ : ५७२)
माझे राष्ट्रीयत्वही मानवराष्ट्रात विलीन पावेल
जर मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' इतर सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल. जसे माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल की जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन मनुष्यपणा तेवढा जगात मनुष्यमात्रात नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन. - (१९२८ स.सा.वा. ३ : ६४४)
हिंदू शब्दाचा भविष्य काळातील संभाव्य अर्थ
एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ५४)
हिंदुत्वाची परिणती
हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले तीस कोटी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. मनुष्यजातीस ह्या शक्तीस तोंड द्यावे लागेल असा एक दिवस उगवेल. ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत ! - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ९०)
हिंदुस्थान : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार
'हिंदुस्थान' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.

आपल्या देशाचे प्राचीन नाव - सप्तसिंधू वा सिंधू
आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : १९)
सिंधू शब्दाने देशाच्या सीमांचा बोध
संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचा - 'समुद्र रशना' दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्‍या समुद्ररशनेचा बोध असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : २०)
हिंदुस्थान हे देशाचे नाव सर्व नावांत समर्पक
हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : २८)
हिंदुस्थान आमची पुण्यभूमी
...ही भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७१ - ७२)
हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही.
चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही. - (१९३९ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५४)
जगाच्या नकाशात हिंदुस्थान चिरंतन खोदून ठेवा
हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे. - (१९३९ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५५)
हिंदुस्थान हिंदूंचाच देश
वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ? - (१९३७ स.सा.वा. ४ : ३३०)
राष्ट्र, हिंदुराष्ट्र : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार'राष्ट्र, हिंदुराष्ट्र ' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.

जगातील मानव एक व्हावे ही सदिच्छा असली तरी
जगातील मजुरांनी एक व्हावे ही सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. - (१९४३ अ.हिं.ल.प.पृ. २०१)
राष्ट्रवाद कालबाह्य नाही
राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. -(१९४३ अ.हिं.ल.प.पृ. २०१)
सिंधू शब्द राष्ट्रवाचक
..... सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : २०)
हिंदुराष्ट्राचे घटक
'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. - (स.सा.वा. ३ : ७१३)
हिंदूंची समान बंधने , वैशिष्टये
हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ५५)
सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.
सातत्य ही गोष्ट आपणास नवीन नाही. वेद जेव्हा जेव्हा अस्तित्वात आले तेव्हापासून एका सुरात नि स्वरात म्हटले जातात. अशा आपल्या अनेक अभिमानास्पद परंपरा आहेत. - (१९४१ अ.हिं.ल.प.पृ. १०)
आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६३)
राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६४)
ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.
शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत. - (स.सा.वा. २ : ४३४)
कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६२)
हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६३)
हिंदूंमध्ये भेद, वैचित्र्य आहे त्याचे काय ?
कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि तदितर समाजांशी होणार्‍या टक्करीत तगते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणेच अशक्य. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्‍या समाजाशी असणार्‍या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते. - (१९४९ स.सा.वा. ३: ७१८)
ह्या हिंदू संस्कृतीच्या शेवटच्या अक्षरापर्यंत तपशिलाविषयी प्रत्येक हिंदूचे इतर हिंदूंशी एकमत आहे असे नव्हे. परंतु हिंदूंचे अरबांशी वा इंग्रजांशी साम्य आहे त्याहून अधिक साम्य इतर हिंदूंशी आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६४)
हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ?
संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका. -(१९२३ हिं.,स.सा.वा. ६ : ८८,८९)
आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे. - (१९४९ स.सा.वा. ३ : ७१९)
हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही
हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान एक जाती आहेत. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३२४)
हिंदुस्थानावाचून हिंदूंना अन्य गती नाही
हिंदुस्थानात हिंदूंचे पूर्वज राहिले नि वाढले. त्यांची सर्व पवित्र स्थाने याच पुण्यभूमीत आहेत. त्यांना जिवंत राहायला नि मरायलाही या देशाबाहेर दुसरी जागा नाही. त्यांना पृथ्वीतलावरच नव्हे तर स्वर्गात दुसरी गती नाही. त्यांचे देवही क्षीणपुण्य झाले की त्यांना हिंदुस्थानच्या कर्मभूमीवर येऊन पुण्य करुन स्वर्गपद प्राप्त करुन घ्यावे लागते. म्हणून हिंदुस्थान हे हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्र आहे. हिंदुस्थानातील हिंद्वेतरांशी आमचे भांडण नाही परंतु त्यांना हिंदूंबद्दल अभेद्यपणा वाटत नसेल तर हिंदूंनी काय करावे ? -(१९३८ स.सा.वा. ४ : ४१४)
हिंदुराष्ट्र एक सत्य
... वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्‍या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्‍या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३०७)
नकारात्मक दृष्टीनेही हिंदुराष्ट्र
प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते. - (१९३९ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५३)
राष्ट्रीय जीवनाचा धागा पुन्हा उचलून धरा
आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३२४)
हिंदुराष्ट्राचे ध्येय
राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...
हिंदुराष्ट्र हे एकच राष्ट्र असे आहे की त्याने पूर्ण नि:श्रेयसाच्या आधारावरील निर्दोष अभ्युदय हे आपले ध्येय स्वीकारले आहे. - (१९२६ स.सा.वा ६ : ५२१)
मनोराज्ये करावयाची तर अशी करा
उज्जयिनी ही अखिल हिंदुसाम्राज्याची राजधानी झालेली असून तिच्यावर अप्रतिरथ असा तो कुंडलिनी-कृपाणांकित हिंदुध्वज डुलत आहे ! नवे नवे भाऊसाहेब पेशवे, हरिसिंग नलवे, प्रतिचंद्रगुप्त, प्रतिविक्रमादित्य लक्ष लक्ष सैनिकांचे तुंबळ दळभार घेऊन, ज्यांनी ज्यांनी आमच्या पडत्या काळात आमच्या हिदुराष्ट्रास अवमानिले, दडपले, छळले त्यांच्या त्यांच्यावर चढाई करुन चालले आहेत, त्यांची त्यांची रग जिरवून, सूड उगवून कोणी रुमशाम तर कोणी लंडन गाठले आहे, कुणी लिस्बन तर कोणी पॅरिस ! दिग्दिगंती हिंदू खड्गाचा असा दरारा बसला आहे की हिंदू साम्राज्याकडे डोळा उचलून पाहण्याची कोणाची छातीच होऊ नये ! अद्ययावत यंत्रे, अद्ययावत तंत्रे, हिंदू विमानांचे आणि वियानांचे थवेच्या थवे आकाशात उंच उंच उडत आहेत. हिंदूंच्या प्रचंड रणभेरी पूर्व समुद्रात नि पश्चिम समुद्रात (अरबी समुद्र हे नाव सुध्दा बदलून) प्रचंड पाणतोफांचा खडा पहारा देत आहेत; हिंदू संशोधकांची वैमानिक पथके उत्तर धृवावर नव नवे भूभाग शोधून त्यावर हिंदुध्वज रोवीत आहेत ! ज्ञान, कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यक प्रभृती प्रत्येक कर्तृत्वक्षेत्रात सहस्त्रावधी हिंदू स्पर्धालू जागतिक उच्चांक पटकावीत आहेत ! लंडन, मॉस्को, पॅरिस, वॉशिंग्टनादी राष्ट्रप्रतिनिधींची दाटी हिंदुसाम्राज्याच्या बलाढय राजधानीच्या त्या उज्जयिनीच्या महाद्वाराशी हिंदू छत्रपतींना आपापले पुरस्कार अर्पिणास्तव हाती उपायने घेऊन वाट पाहात उभी आहे ! अरे मनोराज्येच करायची तर अशी काही तरी करा!! -(१९३६ वि. नि., स.सा.वा.३ : ४२०)
माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे
वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.
मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !
या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.
माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन.
माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे! - (१९३९ स.सा.वा. ४ : ५३१)
खरा सनातन धर्म कोणता? : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार
आज चालू असलेल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळीच्या दंगलीत सुधारक म्हणजे जो सनातन धर्माचा उच्छेद करू पाहतो तो, अशी "सनातनी' म्हणाविणार्‍या पक्षाच्या परिभाषेत सुधारक या शब्दाची परिभाषा ठरून गेली आहेसे दिसते. लोकांसही लहापणापासून सनातन म्हणजे जीविरुद्ध ब्रही न काढता ती शिरसादंद्य मानणे हे धार्मिक कर्तव्य आहे अशी आज्ञा वा रुढि होय असे समजण्याची सवय लागून गेलेली असल्यामुळे एखादी रुढि व्यवहारात अगदी ढळढळीतपणे हानिकारक होत आहे हे कळत असताही ती सनातन आहे इतके म्हणताच ती मोडण्याचे त्यांच्या जिवावर येते आणि ती मोडू पाहणारा सुधारक काहीतरी अपवित्र, धर्माविरुद्ध अकर्म करू निघाला आहे. असा त्यांचा एक पूर्वग्रह सहजच होऊन बसे. लोकसमाजाचा हा पूर्वग्रह दूर करण्यासाठी आणि अयोग्य आहे हे दोघांच्याही स्पष्टपणे ध्यानात यावे म्हणून या वादग्रस्त प्रकरणातील "सनातन धर्म' ह्या दोन मुख्य शब्दांचा अर्थच प्रथम निश्चित करणे आवश्यक झालेले आहे. नुसते हा सनातनी आणि तो सुधारक असे ओरडत राहण्यात काही अर्थ नाही. आम्ही स्वत:स सनातन धर्माचे अभिमानी समजतो आणि कित्येक सनातनी आपल्या आचरणाने पुष्कळ सुधारणास उचलून धरताना आढळतात. अशा गोंधळास सनातन धर्म म्हणजे काय ठरविली तरी अनेक मतभेद नाहीसे होण्याचा आणि जे राहतील ते का, कोणाच्या अर्थी उरतात ते उभयपक्षांच्या स्पष्टपणे ध्यानात येण्याचा बराच संभव आहे. यास्तव या लेखात आम्ही सनातन धर्म ह्या शब्दास काय अर्थी योजतो, त्या कोणच्या अर्थी धर्म आम्हास सनातन या पदवीस योग्य वाटतो ते थोडक्यात नि:संदिग्धपणे सांगणार आहोत.
    ज्या अर्थी आज ते शब्द योजले जातात ते अर्थ इतके विविध, विसंगत नि परस्परविरुद्धही असतात की, ते आहेत तसेच स्वीकारणे अगदी अयुक्त व्हावे. श्रुति-स्मृतिपासून तो शनिमहात्म्यापर्यंतच्या सार्‍या पोथ्या आणि वेदांच्या अपौरुषयत्वापासून तो वांग्याच्या अभक्ष्यत्वापर्यंतचे सारे सिद्धान्त सनातन धर्म या एकाच पदवीस पोचलेले आहेत. उपनिषदांतील परब्रह्म स्वरूपाचे अत्युदार विचार हेही सनातन धर्मच आणि विस्तवापुढे पाय धरून शेकू नये, कोवळ्या उन्हात बसू नये, लोखंडाचा विक्रय करणार्‍यांचे अन्न कदापि खाऊ नये, रोगचिकित्सक वैद्यभूषणाचे अन्न तर घावातील पुवाप्रमारे असून सावकारी करणार्‍या, व्याजबुट्टा घेणार्‍या गृहस्थांचे अन्न विष्ठेप्रमाणे असल्यामुळे त्याच्या घरी वा सांगाती केव्हाही जेऊ नये (मनू. ४-२२०); गोरसाचा खरवस, तांदुळाची खीर, वडे, घारगे आणि निषिद्ध असून लसूण, कांदा आणि गाजर खाल्ल्याने तर द्विज तत्काल पतित होतो (पतेद्‌द्वि: ! मनु ५-१९); परंतु श्राद्धनिमित्त केलेले मांस जो कोणी हट्टाने खात नाही तो अभागी एकवीस जन्म पशुयोनि पावतो. (मनु ५-३५) "नियुक्तस्तु यथान्याय यो मांस नात्ति मानव: । स प्रेत्य पशुता याति भातापेक्षा ब्राह्मणास वराहाचे वा महिषाचे मांस जेऊ घालणे उत्तम, कारर पितर त्या मांसाच्या भोजनाने दहा महिने तृप्त राहतात आणि वार्ध्रीणस बोकडाचे मांस ब्राह्मणांनी जर का खाल्ले तर भरभक्कम बारा वर्षेपर्यंत पितरांचे पोट भरलेले राहते- "वार्ध्रीणसस्य मांसेन तृप्तिद्वदिशवार्षिकी!' (मनु ३, २७१) हाहि सनातन धर्मच; आणि कोणच्याही प्रकारचे मांस खाऊ नये, "निवर्तेत सर्वमांसस्य भक्षणात्‌!' मांसाशनास्तव प्राणिवधास नुसते अनुमोदिणारा देखील "घातक' महापापी होय. (मनु ५, ४९-५१) हाही सनातन धर्मच! तोंडाने अग्नि फुंकू नये, इंद्रधनुष्य पाहू नये, "नाश्नीयाद्‌भार्यया साधम्‌' स्त्रीसह जेऊ नये, तीला जेवतान बघू नये, दिवसा मलमुत्रोत्सर्ग उत्तराभिमुखच करावे, पण रात्री दक्षिणाभिमुख (मनु ४-४३) इत्यादी हे सारे विधिनिषेध तितकेच मननीय सनातन धर्म होत की, जितके "संतोषे परमास्थाय सुखार्थी संयतो भवेत्‌, संतोषमूल हि सुख दु:खमूल विपर्यय:  । (मनू ४-१२) प्रभूति उदात्त उपदेश हे मननीय सनातन धर्म आहेत!!
    ह्या अनेक प्रसंगी अगदी परस्परविरुद्ध असणार्‍या विधिनिषधांस आणि सिद्धान्तास सनातन धर्म हाच शब्द लुंगेसुंगे भाबडे लोकच लावतात असे नसून आपल्या सार्‍या स्मृतिपुराणातील सनातन धर्मग्रंथातूनच ही परंपरा पाडलेली आहे. वरील प्रकारच्या सार्‍या मोठ्या, धाकट्या, व्यापक, विक्षिप्त, शतावधानी, क्षणिक आचारविचारांच्या अनुष्टुपाच्या अंती अगदी ठसठशीतपणे ही एकच राजमुद्रा बहुधा ठोकून दिलेली असते की, "एष धर्मस्सानातन:!'
    आपल्या धर्मग्रंथातच ही अशी खिचडी झालेली नसून जगातील इतर झाडून सार्‍या अपौरुषेय म्हणविणार्‍या प्राचीन आणि अर्वाचीन धर्मग्रंथांचीही तीच स्थिति आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या मोसेस पैगंबरापासून तो अगदी आजकालच्या अमेरिकेतील मोहंमद पैगंबरापर्यंत सर्वांनी, मनुष्याच्या उठण्याबसण्यापसून, दाढी-मिशा-शेंडीच्या लांबीरुंदीपासून, वारसांच्या, दत्तकांच्या लग्नाच्या निर्बंधापासून तो देवाच्या स्वरूपापर्यंत आपल्या सार्‍या विधानांवर "एष धर्मस्सनातन:' हीच राजमद्रा आणि तीही देवांच्या नावाने ठोकलेली आहे! हे सारे विधिनिषेध देवाने सार्‍या मानवांसाठी अपरिवर्तनीय धर्म म्हणून सांगितले आहेत! सर्व मानवांनी सुंता केलीच पाहिजे हाही सनातन धर्म आणि त्रैवर्णिकांनी तसे भलतेसलते काहीएक न करता मुंजच करावी हाही सनातन धर्मच! लाक्षणिक अर्थीच नव्हे तर अक्षरश: ह्या सार्‍या अपौरुषय, ईश्वरी धर्मग्रंथात एकाचे तोंड पूर्वेस तर एकाचे पश्चिमेस वळलेले आहे! आणि तेही अगदी प्रार्थनेच्या पहिल्या पावलीच! सकाळीच पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना करणे हाही सनातन धर्म आणि सकाळी देखील प्रार्थना म्हटली की ती पश्चिमेकडेच तोंड करून केली पाहिजे हाही मनुष्यमात्राचा सनातन धर्मच! एकाच देवाने मनूला ती पहिली आज्ञा दिली अन् महंमदाला ही दुसरी दिली! देवाची अगाध लीला; राखून दुरून मौज पहात बसण्याचा आरोप शौकतअल्लीवर उगीच करण्यात येतो. हा खेळ चालू करण्याचा पहिला मान त्यांचा नसून असे अगदी परस्परविरुद्ध प्रकार अपरिवर्तनीय सनातन धर्म म्हणून त्या दोघांसही सांगून त्यांची झूंज लावून देणार्‍या गमती स्वभावाच्या देवाचाच तो मान आहे! ही मूळची त्याची लीला ! आणि त्याची नसेल तर त्याच्या नावावर हे ग्रंथ चापून लादून देणार्‍या मनुष्याच्या मूर्ख श्रद्धेची!
    सारे रोम जळत असताना सारंगी वाजवीत ती गंमत पाहणारा असा देवाला कोणी नीरो समजण्यापेक्षा मानवी मूर्खपणावरच वरील विसंगतीचा दोष लादणे आम्हास तरी अधिक सयुक्ति वाटते. या सार्‍या विसंगत आणि परस्परविरुद्ध गोष्टीस सब घोडे बारा टक्के भावाने "सनातन धर्म' ही एकच पदवी देण्यास मानवी बुद्धिच चुकली आहे. सनातन धर्म ह्या शब्दांचा हा रूढ अर्थच ह्या विसंवादाला कारण झाला आहे, आणि त्या शब्दांच्या मूळ अर्थाची छाननी करून त्याला संवादी असणार्‍या गोष्टीसच तो शब्द लावीत गेल्याने ह्या मतामतांच्या गलबल्यात खरा सनातन धर्म कोणता ते निश्चयपूर्वक नि पुष्कळ अंशी नि:संदेहपणे सांगता येते अशी आमची धारणा आहे. त्या शब्दांच्या अर्थाची ती छाननी अशी:
    सनातन शब्दाचा मुख्य अर्थ शाश्वत, अबाधित, अखंडनीय, अपरिवर्तनीय धर्म हा शब्द, इंग्लिश "लॉ' ह्या शब्दाप्रमाणेच आणि तसाच मानसिक प्रक्रियेमुळे पुष्कळ अर्थांतरे घेत आला आहे.
    (अ) प्रथम त्याचा मूळचा व्यापक अर्थ नियम कोणत्याही वस्तूच्या अस्तित्वाचे नि व्यवहाराचे जो धारण, नियमन करतो तो त्या वस्तूचा धर्म. पाण्याचे धर्म, अग्नीचे धर्म प्रभृति त्यांचे उपयोग ह्या व्यापक अर्थीच होतात. सृष्टिनियमांस "लॉ' शब्दही लावतातच, जसे "लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन.'
    (आ) ह्याच व्यापक अर्थामुळे पारलौकिक आणि पारमार्थिक पदार्थांच्या नियमांसही धर्मच म्हणण्यात येऊ लागले. मग ते नियम प्रत्यक्षागत असोत वा तसे भासोत! स्वर्ग, नरक, पुर्वजन्म, पुनर्जन्म, ईश्वर, जीव, जगत्‌यांचे परस्परसंबंध, ह्या सार्‍यांचा समावेश धर्म ह्या शब्दातच केला गेला. इतकेच नव्हे तर हळूहळू तो धर्म शब्द या त्याच्या पारलौकिक विभागार्थच विशेषेकरून राखून ठेवल्यासारखा झाला. आज धर्म शब्दाचा विशेष अर्थ असा हाच होतो, की या अर्थी धर्म म्हणजे "रिलिजन'.
    (इ) मनुष्याचे जे ऐहिक व्यवहार वरील पारलौकिक जगतात त्यास उपकारक ठरतील वाटले, त्या पारलौकिक जीवनात त्याचे धारण करतील असे भासले, तेही धर्मच मानण्यात आले. इंग्लिशमध्ये मोसेस, अब्राहाम, महंमद प्रभृति पैगंबरांच्या स्मृतीतही अशाच खच्चून असलेल्या सार्‍या कर्मकांडास "लॉ'च म्हटले आहे. या अर्थी धर्म म्हणचे आचार.
    (उ) शेवटी वरील आचार वगळून मनुष्यामनुष्यांतील जे केवळ ऐहिक प्रकरणीचे व्यवहार असतात त्या व्यक्तीच्या वा राष्ट्राच्या वर्तननियमांसही पूर्वी धर्मच म्हणत. स्मृतीत युद्धनीति, राजधर्म, व्यवहारधर्म प्रभूति प्रकरणातून हे गोवलेले असतात. पण आज यांपैकी पुष्कळसा भाग स्मृतिनिष्ठ अपरिवर्तनीय धर्मसत्तेतून निघून आपल्या इकडेही परिवर्तनीय मनुष्यकृत नियमांच्या कक्षेत, शास्त्रीपंडितांनाही निषिद्ध न वाटावा इतक्या निर्विवादपणे समाविष्य झालेला आहे. जसे गाडी हाकण्याचे निर्बंध, शिवीगाळ, चोरी, इत्यादीकांचे दंडविधान तो निर्बंधशासनाचा (कायदेशासनाचा) प्रदेश होय. आपल्या इकडे धर्म शब्द आज जसा "रिलिजन' ह्या विशेषार्थी राखीव झाला आहे. तसाच इंग्लिशमध्ये "लॉ' हा शब्द विशेषार्थी ह्या निर्बंधशासनास आज वाहिला जात आहे. ह्या प्रकरणी धर्म म्हणजे निर्बंध (कायदा"लॉ ”).
    या लेखास अवश्य तेवढा सनातन आणि धर्म ह्या शब्दांच्या अर्थाचा उलगडा असा केल्यानंतर आता धर्म शब्दांच्या या वरील विभागांपैकी कोणत्या निभागास सनातन हा शब्द यथार्थपणे लावता येईल हे ठरविणे फारसे अवघड जाणार नाही. सनातन धर्म ह्याचा वर दाखवल्याप्रमाणे आमच्यापुरता तरी आम्ही निश्चित केलेला अर्थ म्हणजे शाश्वत नियम, अपरिवर्तनीय, जे बदलू नयेत इतकेच नव्हे तर जे बदलणे मनुष्याच्या शक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे असे अबाधित जे धर्म असतील, नियम असतील, त्यासच सनातन धर्म ही पदवी यथार्थपणे देता येईल. हे लक्षण वर धर्माचा जो पहिला विभाग पाडलेला आहे त्या सृष्टिनियमांस तंतोतंत लागू पडते. प्रत्यक्ष अनुमान आणि त्यांना सर्वस्वी विरुद्ध न जाणारे आप्तवाक्य या प्रमाणांच्या आधारे सिद्ध होऊ शकणारे आणि ज्याविषयी कोणीही यथाशास्त्र प्रयोग केला असता त्या कार्यकारणभावाच्या कसोटीस जे पूर्णपणे केव्हाही उतरु शकतात असे मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यात जे जे सृष्यिनियम आणि जी जी वैज्ञानिक सत्ये आज आलेली आहेत त्यास त्यासच आम्ही आमचा सनातन धर्म समजतो. नि:शेष परिगणानास्तव नव्हे तर दिग्दर्शनार्थ म्हणून खालील नामोल्लेख पुरे आहेत. प्रकाश, उष्णता, गति, गणित, गणितज्योषि, ध्वनि, विद्युत, चुंबक, रेडियम, भूगर्भ, शरीर, वैद्यक, यंत्र, शिल्प, वानस्पत्य जैन, आणि मनुष्यजातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म होय. ते नियम आर्यांसाठी वा अनार्यांसाठी, मुस्लिमांसाठी वा काफरांसाठी, इस्त्रलियांसाठी वा हीदनांसाठी अवतीर्ण झालेले नसून ते सर्व मनुष्यमात्रास नि:पक्षपाती समानतेने लागू आहेत. हा खरा सनातन धर्म आहे. इतकेच नव्हे तर हा खरोखर मानवधर्म आहे. हा केवळ "कृते तु मानवो धर्म:' नाही तर त्रिकालाबाधित मानवधर्म आहे; म्हणूनच त्यास सनातन हे विशेषण निर्विवादपणे लागू पडते. सूर्य, चंद्र, आप, तेज, वायु, अग्नि, भूमि, समूद्र प्रभूति पदार्थ ह्या, कोणी लोभाच्या लहरीप्रमाणे प्रसन्न वा रुष्य होणार्‍या देवता नसून ह्या आमच्या सनातन धर्माच्या नियमांनी पूर्णपणे बद्ध असणार्‍या वस्तु आहेत. ते नियम जर आणि ज्या प्रमाणात मनुष्यास हस्तगत करता येतील तर आणि त्या प्रमाणात ह्या सर्व सृष्टिशक्तींशी त्याला रोखठोक आणि बिनचूक व्यवहार करता आलात पाहिजे-करता येतोही. भर महासागरात तळाशी भोके पडलेली नाव सोडून मग ती बुडू नये म्हणन जरी त्या समुद्रास प्रसादविण्यास्तव नारळांचे ढीग त्यात फेकले आणि अगदी शुद्ध वैदिक मंत्रात जरी टाहो फोडला की "तस्मा अरं गमाव वो यस्य क्षयाय जिन्वथ । आपो जनयथा चन: ' तरी तो समुद्र आमच्या "जनां' सह त्या नावेस बुडविल्यावाचून हजारात नउशे नव्याण्णव प्रसंगी राहत नाही, आणि जर त्या नावेस वैज्ञानिक नियमांनुसार ठाकठीक करून, पोलादी पत्र्यांनी मढवून "बेडर' बनवून सोडली तर तिच्यावर वेदांची होळी करून शेकणारे आणि पंचमहापुण्ये समजून दारू पीत, गोमांस खात, मस्त झालेले रावणाचे राक्षस जरी चढेलेले असले तरी त्या बेडर रणनावेस हजारांत नउशे नव्याण्णव प्रसंगी समुद्र बुडवीत नाही; बुडवू शकत नाही. तिला वाटेल त्या सुवर्णभूमीवर तोफांचा भडिमार करण्यासाठी सुखरूपपणे वाहून नेतो! जी गोष्ट समुद्राची तीच इतर महद्‌भूतांची. त्यास माणसाळविण्याचे महामंत्र शब्दनिष्ठ वेदांत वा झेंदावेस्तात, कुराणात वा पुराणात सापडणारे नसून प्रत्यक्षनिष्ठ विज्ञानात (सायन्समध्ये) सापडणारे आहेत. हा सनातन धर्म इतका पक्का सनातन, इतका स्वयंसिद्ध नि सर्वस्वी अपरिवर्तनीय आहे की, तो बुडू नये, परिवर्तन पावू नये, म्हणून कोणताही सनातन धर्मसंरक्षक-संघ स्थापण्याची तसदी कलियुगात देखील घ्यावयास नको. कारण या वैज्ञानिक सनातन धर्मास बदलविण्याचे सामर्थ्य मनुष्यास कोणासही आणि कधीही येणे शक्य नाही.
    ही गोष्ट आम्ही जाणून आहोत की, हे सनातन धर्म, हे सृष्टिनियम, संपूर्णपणे मनुष्याला आज अवगत नाहीत-बहुधा केव्हाही तसे अवगत होणार नाहीत. जे आज अवगत आहेसे वाटते त्याविषयीचे आमचे ज्ञान विज्ञानाच्या विकासाने पुढे थोडे चुकलेलेही आढळेल; आणि अनेक नवीन नवीन नियमांच्या ज्ञानाची भर तर त्यात निश्चितपणे पडेल. जेव्हा जेव्हा ती भर पडेल वा तीत सुधारणा करावी लागेल तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या या वैज्ञानिक स्मृतीत न लाजता, ना लपविता किंवा आजच्या श्लोकांच्या अर्थांची अप्रामाणिक ओढाताण न करता नवीन श्लोक प्रकटपणे घालून ती सुधारणा घडवून आणू, आणि उलट मनुष्याचे ज्ञान वाढले म्हणून त्या सुधारणेचे भूषणच मानू.
    आम्ही स्मृतीस सनातन, अपरिवर्तनीय, समजत नाही तर सत्यास सनातन समजतो, अपरिवर्तनीय समजतो. स्मृति बदलाव्या लागतील म्हणून सत्यास नाकारणे हे घर वाढवावे लागले म्हणून मुलांमाणसांचीच कत्तल करण्यासारखे वेडेपणाचे आहे.
    धर्म या शब्दाच्या पहिल्या विभागात मोडणार्‍या सृष्टिधर्मास सनातन हे विशेषण पूर्ण यथार्थतेने लागू शकते हे वर सांगितले. आता त्या धर्म शब्दाचा जो दुसरा विभाग आम्ही वर पाडला आहे त्य पारलौकिक आणि पारमार्थिक नियमांचा विचार करू. या प्रकरणासच आज सनातन धर्म हा शब्द विशेषत: लावण्यात येतो. ईश्वर, जीव, जगत यांच्या स्वरूपाचे नि परस्परसंबंधाचे अस्तिरूप किंवा नास्तिरूप काही त्रिकालाबाधित नियम असलेच पाहिजेत. त्याचप्रमाणे जन्ममृत्यु, पूर्वजन्म, स्वर्गनरक यांविषयीही जी कोणची वस्तुस्थिती असेल ती निश्चितपणे सांगणारे ज्ञानही त्रिकालबाथित म्हणवून घेण्यास पात्र असणारच. यास्तव या पारलौकिक प्रकरणींचे सिद्धान्तही सनातन धर्म म्हणजे शाश्वत, अपिवर्तनीय धर्म होत यात शंका नाही.
    परंतु त्या प्रकरणी जी माहिती नि नियम मनुष्यजातीच्या हाती आज असलेल्या यच्चयावत्‌धर्मग्रंथातून दिलेले आढळतात, त्यातील एकासही सनातन धर्म, अपरिवर्तनीय, निश्चीत सिद्धान्त असे म्हणता येत नाही. निश्चित झालेल्या वैज्ञानिक  नियमाप्रमाणे धर्मग्रंथातील हे पारलौकिक वस्तुस्थितींचे वर्णन प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगांच्या कसोटीस मुळीच उतरलेले नाही. त्यांची सारी भिस्त बोलूनचालून एकट्या शब्दप्रामाण्यावर, आप्तवाक्यावर, विशिष्ट व्यक्तींच्या आंतर अनुभूतीवर अवलंबून असते. त्यातही फारसे बिघडले  नसते. कारण काही मर्यादेपर्यंत प्रत्यक्षानुमानिक प्रमाणास अविरुद्ध असणारे शब्दप्रमाण, आप्तवाक्य, हेही एक प्रमाण आहेच आहे. पण केवळ या प्रमाणाच्या कसोटीस देखील या धर्मग्रंथातील पारलौकिक विधान लवलेशही उतरत नाही. प्रथम आप्त कोण? -तर आमच्या इकडेच धर्मग्रंथच म्हणतात की, चित्तशुद्धीने सत्त्वोदय झालेली ज्ञानी भक्त आणि समाधिसिद्ध योगी चालेल; या पूर्णप्रज्ञ आप्तात शंकराचार्य, रामानुज, मध्व, वल्लभ यांचा तरी समावेश केला पाहिजे ना? महाज्ञानी कपिलमुनि, योगसूत्रकार पतंजलि यांनाही गाळणे अशक्य, उदाहरणार्थ इतके आप्त पुरेत. आप्तवाक्य, शब्दप्रमाण असेल तर ह्यांचा त्या त्या विशिष्ट वस्तुस्थितीचा अनुभव एकच असला पाहिजे. पण पारलौकिक अनुभव एकच असला पाहिजे. पण पारलौकिक आणि पारमार्थिक सत्याचे जे स्वरूप आणि जे नियम ते प्रत्येकी सांगतात ते प्रत्येकी भिन्नच नव्हेत तर बहुधा प्रत्येकी परस्परविरुद्ध असतात! कपिलमुनि सांगणार-पुरुष नि प्रकृति ही दोनच सत्ये आहेत; ईश्वरबीश्वर हम कुछ नही जानते! समाधिसिद्ध पतंजलि सांगतात- "तत्रपुरुषविशेषो ईश्वर:!' शंकराचार्य सांगतात-पुरुष वा पुरुषोत्तम ईश्वर हे मायोपाधिक आणि मायबाधित असून "ब्रह्म सत्य जनन्मिथ्या जीवो ब्रह्मैवनपर:'अद्वैत हेच सत्य! रामानुज सांगतात- साफ चूक आहे; हा प्रच्छन्न बौद्धवाद! विशिष्टाद्वैत हे सत्य! माध्व-वल्लभ म्हणणार, जीव आणि शिव भक्त आणि देव, जड आणि चैतन एक म्हणता तरी कसे? द्वैत हेच सत्य! अशा या महनीय साक्षीदारांच्या स्वानुभूत शब्दांसरशी गोंधळून बुद्धि जर उद्‌गारली-
    पाहियले प्रत्यक्षची । कथितो पाहियले त्याला ।
    वदति सारे । आप्तचि सारे । मानू कवणाला?।।
    तर त्यात तिचा काय दोष? तरी आम्ही या योगसिद्धांच्या साक्षीत त्या परम योगसिद्धाची-त्या तथागत बुद्धाची साक्ष काढली नाही! देवविषयक हा यच्चयावत्‌विधानसमूह त्याच्या समाधिस्थ स्वानुभूतीत निव्वळ "ब्रह्मजाल' म्हणून टाकाऊ ठरला! समाधिमय ज्ञान, स्वानुभूति ही ह्या पारलौकिक वस्तुस्थितीस अबाधित नि विश्वासार्ह प्रमाण कसे होऊ शकत नाही, निदान अजून शकले नाही, ते असे पाहिल्यावर इतके सांगणे पुरे आहे की, शब्दप्रामाण्याचीही स्थिति वरील आप्तप्रमाणासारखीच आहे. अपौरुषेय वेद ज्या कारणासाठी अपौरुषेय मानावे त्याच कारणासाठी तौलिद, इंजिल, बायबल, कुराण, अवेस्ता, स्वर्णग्रंथ-एक का दोन ! जगात जवळ जवळ जे पन्नासएक ग्रंथ तरी आजही ईश्वरदत्त म्हणून प्रख्यात आहेत, तेही सर्व औपरुषेय मानणे भाग पडते. आणि त्या प्रत्येकात देवाने प्रत्येक तदितर अपौरुषेय धर्मग्रंथातील पारलौकिक वस्तुस्थितीच्या दिलेल्या माहितीशी विभिन्न, विसंगत नि विरुद्ध माहिती दिली आहे. वेद सांगतात, स्वर्गाचा इंद्र हाच राजा! पण बायबलाच्या स्वर्गात इंद्राचा पत्ता टपालवाल्यला देखील माहीत नाही. देवपुत्र येशूच्या कंबरेस सार्‍या स्वर्गाची किल्ली! देव नि देवपुत्र दोघे एकच Trinity in Unity, Unity in Trinity!  कुराणातील स्वर्गात "ला अल्ला इल्लिला आणि महमंद रसुलल्ला!' तिसरी गोष्ट नाही. रेड इंडियनांच्या स्वर्गात डुकरेच डुकरे, घनदाट जंगले! पण मुस्लिम पुण्यवंतांच्या स्वर्गात असली "नापाक चीज' औषधाला देखील सापडणार नाही! आणि ह्या प्रत्येकाचे म्हणणे हे की, स्वर्ग मी सांगतो तसाच आहे. प्रत्यक्ष देवाने हे सांगितले; नव्हे, महंमदादि पैगंबर तर वर जाऊन, राहून, स्वत: ते पाहून, परत आले नि त्यांनीही तेच सांगितले! तीच स्थिती नरकाची! पुराणात मूर्तिपूजक नि याज्ञिक तर काय, पण यज्ञात मारलेले बोकड देखील स्वर्गातच जातात असा त्यांचा मेल्यानंतरचा पक्का पत्ता दिला आहे. पण कुराण शपथेवर सांगते की, नरकातल्या जागा, कितीही दाटी झाली तरी, जर कोणाकरिता राखून ठेवल्या जात असतील तर त्या ह्या मूर्तिपूजक आणि अग्निपूजक सज्जनांसाठीच होत! मेल्यानंतरचा त्यांचा नक्की पत्ता नरक! शब्दाशब्दांत भरलेली अशी विसंगति कुठवर दाखवावी! हे सारे धर्मग्रंथ अपौरुषेय यास्तव खरे धरावे तरीही त्यात सांगितलेली पारलौकिक वस्तुस्थिति शब्दाप्रमाणेच देखील सिद्धान्तभूत ठरत नाही-अन्योन्यव्याघातात्‌! ते सारे मनुष्यकल्पित म्हणून खोटे मानले तर  ती सिद्धान्तभूत ठरत नाहीच नाही- वदतो व्याघातात! आणि काही खोटे मानावे तरीही ते तसे नि हे असे का, हे ठरविण्यास त्यांच्या स्वत:च्या शब्दावाचून दुसरे प्रमाणाच नसल्यामुळे, ती नाहीच- स्वतंत्रप्रमाणाभावात्‌!!
    यास्तव प्रत्यक्ष, अनुमान वा शब्द यांपैकी कोणच्याही प्रमाणाने पारलौकिक वस्तुस्थितीचे आज उपलब्ध  असलेले वर्णन हे सिद्ध होत नसल्यामुळे त्यास सनातन धर्म त्रिकालाबाधित नि अपरिवर्तनीय सत्य, असे म्हणता येत नाही. तशा कोणत्याही विधेयास तसे सिद्धान्तसकवरूप येता तेही आमच्या सनातन धर्माच्या स्मृतीत गोवले जाईलच; पण आज तरी तो विषयच प्रयोगावस्थेत आहे आणि आप्तांची या अपौरुषेय ग्रंथांचीहि तद्‌विषयक विधाने सिद्धान्त नसून क्लृप्ति (हायपॉथेसीज) आहेत, फार तर सत्याभास आहे; पण सत्य नव्हे! ते जाणण्याचा प्रयत्न यापुढेही व्हावयास पाहिजे, तथापि त्याविषयी शक्य त्या क्लृप्ति योजून ते स्वर्गीय ऋत आणि अनृत प्राप्त करून घेण्यासाठी इतका अतिमानुष प्रयत्न करून, इतक्या दिक्षांना तरी त्यांचा पत्ता लागत नाहीत; ही कृतज्ञ जाणीव येथे व्यक्तविल्यापासून आम्हास पुढचे अक्षर लिहवतच नाही!
    शेवटी राहता राहिले धर्माचे शेवटचे दोन अर्थ. आचार आणि निर्बंध. या दोन्ही अर्थी धर्म शब्दास सनातन हे विशेषण लावता येत नाही. मनुष्याचे जे ऐहिक व्यवहार त्याच्या पारलौकिक जीवनास उपकारक आहेत असे समजले जाई, त्यास आम्ही आचार हा शब्द योजतो. अर्थात्‌ वर दर्शविल्याप्रमाणे पारलौकिक जीवनासंबंधी अस्तिपक्षी वा नास्तिपक्षी अजून कोणताही नक्की सिद्धान्त मनुष्यास कळलेला नसल्याने त्याला कोणता नक्की सिद्धान्त मनुष्यास कळलेला नसल्याने त्याला कोणता ऐहिक आचार उपकारक होईल हे ठरविणे अशक्य आहे. हिंदूच्याच नव्हे तर मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, यहुदी प्रभृति झाडून सार्‍या धर्मग्रंथांतील कर्मकांडाचा पाया असा वाळूच्या ढिगावर उभारलेला आहे. "क्ष' भू हे बेट की गाव, रान की वैराण, पूर्वेस की उत्तरेस, की आहे की नाहीच हेच जिथे निश्चिले गेले नाही तिथे त्या "क्ष' भूमध्ये सुखाने नांदता यावे म्हणून कोणाच्या वाटेने जावे आणि कोणची शिधाशिदोरी तिथे उपयोगी पडेल ह्याचे बारीकसारीक अपरिवर्तनीय नियम ठरविणे किती अनमान धपक्याचे काम! तसेच हे; यास्तव अमुक ऐहिक आचाराने परलोकी अमुक उपयोग होतो असे सांगणार्‍या कोणत्याही नियमास आज तरी सनातन धर्म म्हणजे शाश्वत अपरिवर्तनीय नि अबाधित नियम असे मुळीच म्हणता येणार नाही. बाकी प्रश्न उरला निर्बंधाचा (कायद्याचा); आणि मनुष्यामनुष्यातील शिष्टाचाराचा. यासही स्मृतीत जरी "एष धर्मस्सनातन:' म्हणून म्हटलेले असले पाहिजे. स्मृतीतही सत्यादि युगातील सनातन धर्मांपैकी काही कलिवर्ज म्हणून पुढे त्याज्य ठरविले. म्हणजे काय? त्याचप्रमाणे बहुतेक "एष धर्मस्सनातन:' पुढच्याच अध्यायातून आपद्‌धर्माच्या अनुष्टुपाने खरडून टाकले जातात. म्हणजे काय? म्हणजे हेच की आपद वा संपद्‌प्रसंगी किंवा युगभेदाने परिस्थितिभेद झाला की हे निर्बंध बदलणेच इष्ट होय. अर्थात्‌ते अपरिवर्तनीय सनातन नसून परिवर्तनीय होत. मनूने राजधर्मात युद्धनीतीचा सनातन धर्म म्हणून जो सांगितला त्यात चतुरंग दलाचा सविस्तर उल्लेख आहे; पण तोफखान्याचा वा वैमानिक दळाचा नामनिर्देशही नाही. आणि सैन्याच्या अग्रभागी शौरसेनी लोक असावेत असे जे सांगितले ते मनूच्या काळी हितावह होते म्हणूनच सांगितले असले तरीही ह्या नियमांस अपरिवर्तनीय सनातन धर्म समजून जर आमचे सनातन धर्मसंघ आजही केवल धनुर्धरांना पुढे घालून आणि आठघोडी रथ सजवून एखाद्या युरोपच्या अर्वाचीन महाभारतात शत्रूस थरारविण्यासाठी-अगदी श्रीकृष्णाचा पांचजन्य फुंकीत चालून गेले तर पांचजन्य करीतच त्यांना परत यावे लागेल, हे काय सांगावयास पाहिजे? हिंदूसेनेच्या अग्रभागी मनुनिर्दिष्ट शौरसेनीय प्रभृति सैनिक होते तोवर हिंदूस मुसलमान धूळ चारतच पुढे घुसत आले; पण मनुस्मृतीत ज्यांचे नावगावही नाही ते मराठे, शीख, ते गुरखे जेव्हा हिंदुसेनेच्या अग्रभागी घुसले तेव्हा त्याच मुसलमानास तीच धूळ खावी लागली ! आचार, रूढि, निर्बंध हे सारे मनुष्यामनुष्यातील ऐहिक व्यवहाराचे नियम परिस्थिति पालटेल तसे पालटीतच गेले पाहिजेत. ज्या परिस्थितीत जो अपार वा निर्बंध मनुष्याच्या धारणास आणि उद्धारणास हितप्रद असेल तो त्याचा त्या परिस्थितीतील धर्म, आचार, निर्बंध. "न हिसर्वहित: कश्चिदाचार: संप्रवर्तते । तेनैवान्य: प्रभवति सोऽपरो बाधते पुन: ।। (म. भा. शांतिपर्व.)
    सारांश
    (१) जे सृष्टिनियम विज्ञानास प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगान्ती सर्वथैव अबाधित, शाश्वत, सनातन असे आढळून आले आहेत तेच काय ते खरे सनातन धर्म होते.
    (२)पारलौकिक वस्तुस्थितीचे असे प्रयोगसिद्ध ज्ञान आपणास मुळीच झालेले नाही. यास्तव तो विषय अद्याप प्रयोवस्थेत आहेसे समजून त्याविषयी अस्तिरूप वा नास्तिरूप काहीच मत करून घेणे अयुक्त आहे. त्या पारलौकिक प्रकरणी नाना क्लृप्ति सांगणारे कोणचेही धर्मग्रंथ अपौरुषय वा ईश्वरदत्त नसून मनुष्यकृत वा मनुष्यस्फूर्त आहत. त्यांच्या  क्लृप्ति प्रमाणहीन असल्याने त्यास सनातन धर्म, शाश्वर सत्य असे म्हणता येत नाही.
    (३) मनुष्याचे झाडून सारे ऐहिक व्यवहार, नीति, रीति, निर्बंध हे त्यास या जगात हितप्रद आहेत की नाहीत या प्रत्यक्षनिष्ठा कसोटीनेच ठरविले पाहिजेत, पाळले पाहिजेत, परिवर्तिले पाहिजेत. "परिवर्तिनि संसारे' ते मानवी व्यवहारधर्म सनातन असणेच शक्य नाही, इष्ट नाही. महाभारतामध्ये म्हटले आहे तेच ठीक की, "अत: प्रत्यक्षमार्गेण व्यवहारविधि नयेत्‌।'

विज्ञाननिष्ठ निबंध :  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार

       वाहत्या नदीत काठी आपटली असता त्या नदीच्या अखंड धारेचे पळभर दोन भाग झालेले भासतात. संध्याकाळी अंधुकलेल्या अखंड आकाशात मध्येच कुठे जी पहिली चांदणी लुकलुकू लागते ती तशी चमकण्यासरशी ह्या अखंड आकाशाला एक गणनबिंदू मिळून त्याच्या चारीकडे चार बाजू चट्‌कन वेगळ्या झाल्याशा भासतात.

ह्या पदार्थजगतातही मनुष्याच्या जाणिवेची चांदणी चमकू लागताच त्याचे अकस्मात्‌ दोन भाग पडतात. उभे विश्व, अनंताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चरकन्‌ कापले जाऊन दुभंग होऊन पडते. सुरूप आणि कूरूप, सुगंधी आणि दुर्गंधी, मंजुळ आणि कर्कश, मृदूल आणि कठोर, प्रिय आणि अप्रिय, चांगले आणि वाईट, दैवी आणि राक्षसी, ही सगळी द्वंद्वे मनुष्य हा ह्या यच्चयावत् ‌विश्वाचा, वस्तुजागताचा, केंद्र कल्पिल्यामुळेच मध्यबिंदू समजला जाताच अकस्मात्‌ उत्पन्न होतात. मनुष्यास जो सुखद तो विश्वाचा एक भाग, मनुष्यास जो दु:खद तो दुसरा पहिला चांगला, दुसरा वाईट.
ज्याने विश्वाचा मनुष्यास सुखद होणारा हा चांगला भाग निर्मिला तो देव; मनुष्यास दु:ख देणारा तो दुसरा वाईट भाग निर्मिला तो राक्षस.
मनुष्याच्याच लांबीरुंदीचा गज घेऊन विश्वाची उपयुक्तता, बरेवाईटपणा, मोजला असता ह्या मोजणीचा हा निकाल फारसा चुकत आहे असे काही म्हणता येणार नाही.
विश्वाची उपयुक्तता आपल्या मापानेच मनुष्याने अशी मापावी हेही अपरिहार्यच होते. विश्वाचे रसरूपगंधस्पर्शादि सारेच ज्ञान मनुष्याला त्याच्यापाशी असलेल्या पाच ज्ञानेंद्रियांनीच काय ते कळू शकतात. विश्वातील वस्तूजात एकेकी गणून, तिचे पृथक्करण करून, ते घटक पुन्हा मोजून त्या अमर्याद व्यापाची जंत्री करीत राहिल्याने विश्वाच्या असीम महाकोषातील वस्तुजाताचे मोजमाप करणे केवळ अशक्य असे समजून आपल्या प्राचीन तत्त्वज्ञान्यांनी, आपल्या पाच ज्ञानेंद्रियानीच ज्या अर्थी हे सर्व विश्व केव्हाही जे काही आकळले जाऊ शकणारे आहे ते जाऊ शकते, त्या अर्थी त्याचे "पंचीकरण' करणे हाच वर्गीकरणाचा उत्कृष्ट मार्ग होय असे जे ठरविले ते एका अर्थी क्रमप्राप्तच होते. इतकेच नव्हे, तर तो त्यांच्या अप्रतिम विजयच होता. ज्ञानेंद्रियेच जर पाच तर विश्वाचे यच्चायावत्‌वस्तुजात त्यांच्या त्या पाच गुणांपैकी कोणत्यातरी एका वा अनेक गुणांचेच असणार. अर्थात्‌त्या पाच गुणांच्या तत्त्वांनी, पंचमहाभूतांनीच, ते घडलेले असणार. ह्या विश्वदेवाचा आम्हाशी जो काही संवाद होणे शक्य आहे तो ह्या त्याच्या पाचमुखांनीच काय तो होणार म्हणूनच तो विश्वदेव, तो महादेव पंचमुखी होय! आपल्या ज्ञानेंद्रियांनी विश्वाच्या गुणधर्मांचे आकलन करण्याचा मनुष्याचा हा यत्न जितका अपरिहार्य नि सहज, तितकाच स्वत:च्या अंत:करणाने त्या विश्वाला निमिणार्‍या देवाच्या अंत:करणाची कल्पना करण्याचा मनुष्याचा यत्नही साहजिकच होता. त्यातही मनुष्याला सुख देण्यासाठीच कोण्या दयाळू देवाने ही सृष्टि निर्मिली असली पाहिजे, ह्या मानवी निष्ठेला अत्यंत प्रबळ असा पाठिंबा ही सृष्टिदेवीच प्रतिपदी, प्रतिपली तिला तशी लहरच आली की सारखी देत राही, आजही देतेच आहे!
खरोखर, मनुष्याच्या सुखसोयीसाठी त्या दयाळू देवाने ही सृष्टीची रचना किती ममताळूपणाने केली आहे पहा! हा सूर्य, हा समुद्र - किती प्रचंड ही महाभूते ! पण मनुष्याच्या सेवेस त्यांना देखील त्या देवाने लावले. दुपारी तहान तहान करीत मुले खेळत दमून येतील तेव्हा थंडगार नि गोड पाणी मिळावे म्हणून आई सकाळीच विहिरीचे पाणी भरून "कुज्या'त घालून गारत ठेवते, तशा ममतेने उन्हाळ्याने नद्या सुकून जाण्याच्या आधीच हा सूर्य त्या समुद्रातले पाणी किरणांचे दोर खोलखोल सोडून भरतो, मेघांच्या "कुज्या'तून साठवून ठेवतो, आणि तेही मध्यंतरी अशी काही हातचलाखी करून, की असमुद्रात असताना तोंडी धरवेना असे खारट असणारे ते पाणी किरणांच्या कालव्यातून त्या आकाशाच्या विस्तीर्ण सरोवरात साचताच इतके गोड नि गार व्हावे की जे पाणी पिण्यासाठी देवांच्याही तोंडास पाणी सुटावे ! पुन्हा समुद्राचे खारट पाणी माणसासाठी गोड करून देण्याच्या धांदलीच साराचा सारा समुद्र गोड करण्याची भलतीच चुकीही न होईल अशी तो दयालू देव सावधगिरीही घेववितो - एका वर्षात हवे तितकेच पाणी गोड करून आटविण्याइतकीच शक्ति सूर्यकिरणात आणि साठविण्याइतकीच शक्ति मेघात ठेविली जाते. नाहीतर सारा समुद्रात गोड झाल्याने मनुष्यास मीठ मिळणे बंद होऊन त्याचा सारा संसार अळणी व्हावयाचा !
हे पशु पहा ! मनुष्यांच्या सेवेला आणि सुखाला हवे तसेच विविध, हवे तितकेच बुद्धिमान, वाळवंटातील ते मनुष्याचे तारू - म्हणून काटे खाऊन पाण्यावाचून महिनोगणती चालण्याची युक्ति त्या उंटाला शिकविली. तो घोडा किती चपल ! त्याच्यावर स्वारी भरणार्‍या मनुष्यास भर रणांगणाताही सांभाळून वहाण्याइतकी नि मनुष्याशी अत्यंत प्रामाणिकपणे वागण्याइतकी बुद्धि त्याला देवाने दिली. पण मनुष्यावरच स्वारी भरण्याइतकी बुद्धिमात्र दिली नाही! ही गाय पहा. एका बाजूला सुके गवत ढकलावे नि दुसर्‍या बाजूला त्याचे बनलेले त्याचे ताजे जीवनप्रद दूध चरव्या भरभरून काढीत बसावे ! असे ते आश्चर्यकारक रासायनिक यंत्र ज्या देवाने घडविले तो खरोखरच किती दयाळू असला पाहिजे! आणि पुन्हा प्रत्येक वेळी जुने यंत्र मोडताच नवे घडण्याचे श्रमसुद्धा मनुष्याला पडू नयेत अशी सोय त्यातच केलेली; पाहिल्या यंत्रातच गवताचे दूध करून देता देताच तसलीच नवीन अजब यंत्रे बनविण्याचीही व्यवस्था केलेली !
एक गव्हाचा दाणा पेरला की त्याचे शंभर दाणे ज्या जगात होऊन उठतात; एक आंबा! रसाने, स्वादाने, सत्त्वाने कोण भरपूर भरलेले ते देवफळ! पण तरीही ते इतके सुपीक की एक आंबा रुजविला की त्याचा वृक्ष होऊन प्रतिवर्षी हजार हजार आंबे त्याला लागावे नि असा क्रम वर्षानुवर्षे चालावा; फार काय सांगावे, एका आंब्याच्या फळापासून होणारी ती लाखो फळे सगळीची सगळी जरी मनुष्यांची खाल्ली तर पुन्हा आंब्याचा तोटा म्हणून पडून नये, यासाठी आंब्याच्या झाडाच्या फांदीचीच कलमे करून त्यांच्या आंबरायांच्या आंबराया भरभराटण्याची सोय ज्या जगात देवाने केलेली आहे; एका कणाचा मण होणारी ही तांदूळ, बाजरी, जोंधळे प्रभृति नानाविध सत्त्वस्थ धान्ये, एक बी पेरले की एका पिढीस सहस्त्रावधि रसाळ फळष पुरविणारी ही फळझाडे; हे फणस, पपनस, अननस, द्राक्षे, डाळिंबे, या गवतसारख्या उगव म्हणताच उगवणार्‍या अति रुचकर बहुगुणी, विविधरस शाकभाज्या, फळभाज्या; ज्या जगात पुरून उरताहेत, ज्याचा गाभाच गोड आहे, तो साखरेच्या पाकाने उरताहेत, ज्याचा गाभाच गोड आहे, तो साखरेच्या पाकाने ओतप्रोत भरलेला ऊस देखील ज्या जगात इतका पिकतो की त्याचे मळेचे मळे माणसांना नकोसे झाले म्हणजे बैल खाऊन टाकतात. त्या जगास निर्मिण्यात देवाने मनुष्यावर जी अमर्याद दया केली आहे तीविषयी मनुष्य त्याचा उतराई होणार तरी कसा!!
तशीच ही मनुष्याच्या देहाची रचना! पायाच्या तळव्यापासून तो मज्जातील सूक्ष्मातिसूक्ष्म पिंडानुपिंडापर्यंत ह्या शरीराची रचना मनुष्याला सुखदायी होईल अशीच सुसंवादी करताना हे मनुष्यच्या देवा, तू जी केसानुकेसागणीक काळजी घेत आला आहेस ती कुठवर सांगावी ! मनुष्याचा हा एक डोळा जरी घेतला तरी, किती युगे, किती प्रयोग, किती अनवरत अवधाने करून तू हा आज आहे तसा घडवू शकलास! प्रथम प्रकाशाला किंचित्‌संवादी असा एक नुसता त्वग्बिंदु; प्रकाशाला नव्हे तर त्याच्या सावलीला तेवढा जाणणारा; अंधेर नि उजेड इतकाच फरक काय तो जाणणारा तो पहिला त्वग्बिंदु; त्याच्यात सुधारणा करता करता किती प्रयोग करून, किती रद्द करून, पुन्हा प्रयोग रचता रचता शेवटी आज मनुष्याचा सुंदर, टपोरा, पाणीदार, महत्त्वाकांक्षी डोळा तू घडविलास! इतका महत्त्वाकांक्षी डोळसपणा त्या मनुष्याच्या डोळ्यात मुसमुसत आहे की, देवा, तुझ्याच कलेत तुझाच पाडाव करण्यासाठी दुर्बिणीचे प्रतिनेत्र निर्मून तो तुझ्या त्या आकाशातील प्रयोगशाळेचेच अंतरंग पाहू इच्छीत आहे! नव्हे तुलाही त्या दुर्बिणीच्या टप्यात गाठून कुठेतरी प्रत्यक्ष पाहता येते की नाही याचे प्रयोग करू म्हणत आहे!!!
आणि त्या मनुष्याच्या डोळ्यास प्रसादविण्यास्तव सौंदर्याचा नि सुरंगाचा जो महोत्सव तू त्रिभुवनात चालू केलास त्याची आरास तरी काय वर्णावी? हे पारिजाताचे सुकोमल फूल, ते सोनचाफ्याचे सुवासमत्त सुमन! हा मोराचा पिसारा पहा, एकेका पिसाची ती ठेवण, ते रंगकाम, ती जिवंत चमक, ते तरल नटवेपण! आद्य कलावन्त! तशा अनेक सुंदर पिसांचा तो पिसारा पसरून तो तुझा मोर जो जो आनंदाने उन्मत्त होऊन नाचू लागतो तो तो देवा, तुझी ललित कलाकुसरी पाहून "धन्य, देवा हृदयही नाचू लागते! आणि जसा पिसारा मनुष्यासही तू का दिला नाहीस म्हणून किंचित रुसूही लागते! हे नयनाल्हादायक रंगांचे नि श्रवणाल्हादक गोड लकेर्‍या घेणारे शतावधि पक्ष्याचे थवेच्या थवे ज्या जगात मंजूळ आनंदाचे किलबिलाट करीत आहेत; गुलाब, चमेली, बकूळ, जाईजुई, चंपक, चंदन, केतक, केवड्यांची बनेची बने सुंदर फुलांचे सडे पाडीत आहेत आणि सुगंधाने सारा आसमंत दरवळून सोडीत आहेत; माणसातून ह्या प्रीतिरति आणि मानसरोवरातून ह्या कमलिनी, कुमुदिनी विकसत विलसत आहेत; ज्या जगात रात्री चांदण्या आहेत, उष:काल गुलाबी आहेत, तारुण्या टवटवीत आहे, निद्रा गाढ आहे, भोगात रुचि आहे, योगात समाधि आहे-देवा! ते हे जग ज्या तू आम्हा मनुजांना इतके सुखमय होऊ दिलेस, होऊ देत आहेस, त्या तू ते आमच्या सुखासाठीच असे निर्मिलेस असे आम्हास का वाटू नये? आम्हाला, जशी आमच्या लेकरांची माया आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या सुखासाठी जपतो तसेच आमच्या सुखासाठी इतके जपणार्‍या देवा, तुला आम्हा मनुष्यांची माया असलीच पाहिज. आम्ही माणसे, देवा, तुझी लेकरे आहोत. तू आमची खरी आई आहेत! आईला देखील दूध येते-तू दिलेस म्हणून! आम्ही मनुष्ये मुझे भक्त आहोत, आणि देवा, तू आम्हा मनुष्यांचा देव आहेस.
इतकेच नव्हे, तर तू आम्हा मनुष्यांचाच देव असून तूझ्यावाचून दुसरा देव नाही! हे सारे जगत्‌तू आमच्या सुखसोयीसाठीच घडविले आहेस!
मनुष्याच्या इच्छेस जुळेशी ही विचारसरणी, सत्यास जुळेल अशीही ठरली असती-जर या जगातील प्रत्येक वस्तु नि प्रत्येक वस्तुस्थिति मनुष्याला सुखकारक नि उपकारक अशीच असती तर! पण मनुष्याच्या दुर्दैवाने या सार्‍या जगातील तर राहोतच, पण ज्या पृथ्वी तो मनुष्य प्रथम प्रथम तरी "सारे जग' म्हणून स्वाभाविकपणेच संबोधित होता, जिला विश्वंभरा, भूतधात्री, अशा नावाने तो अजूनही गौरवितो, त्या पृथ्वीवरील वस्तुजातही वा वस्तुस्थितिही मनुष्यास सर्वस्वी अनुकूल नाही; इतकेच नव्हे, तर उलट अनेक प्रकरणी मारकच आहे.
ज्या सूर्याचे नि समुद्राचे मनुष्यावर झालेले उपकार आठवून आठवून आताच त्यांची स्तोत्रे गाइली तो सूर्य नि तो समुद्रच पहा! उन्हाने तापून चक्कर येऊ लागलेल्या अवश वाटसरूवर, लाठीच्या पहिल्या दोनचार तडाख्यांनी अर्धमेला होऊन गेलेल्या सापावर आपण जसा शेवटचा टोला मारून तो साप पुरता ठार करतो तसा-हा सूर्य आपल्या प्रखर किरणांचा शेवयचा तडाखा मारून त्या मनुष्यांना ठिकच्या ठिकणी ठार करण्यास चुकत नाही! ज्या भारतात त्या सूर्यास लक्षावधि ब्राह्मण, सकाळ संध्याकाळ अर्ध्य देण्यास उभे असत, त्याच भारतात, त्या धर्मशील काळीही दुर्गादेवीच्या दुष्काळाचा सुकाळ करून बाराबार वर्षे आपली प्रखर आग सारखी वर्षत लाखो जीवास जिवंत भाजून काढीत आला आहे! कुराणात, तौलिदांत, भाविक पैगंबरांनी स्तुति केली आहे की "मनुष्यासठी, हे देवा, हे किती असंख्य मासे, किती रुचकर अन्नाचा हा केवढा अखंड साठा तू या समुद्रात ठेवला आहेस!' पण तोच समुद्र मनुष्यास जशाचा तसाच गिळून पचवून टाकणार्‍या अजस्त्र सुसरींना आणि प्रचंड हिंस्त्र माशांनाही तसेच नि:पक्षपाताने पाळीत आहे! मनुष्यांची तारवे पाठीवर वाहून नेता नेता, सदय वाटाड्याचे सोंग घेऊन चाललेला वाटमार्‍या जसा भर रानात त्याच बायाबापड्या वाटसरूंवर उलटून त्यांचे गळे कापतो तसा हा समुद्र अकस्मात हजारो माणसांनी भरलेली ती तारवे नि त्या प्रचंड टिटानिका बोटी आपल्या पाठीवरून फेकून आपल्या भयंकर जबड्यात ढकलतो- गट्‌कुनी गिळून टाकतो! एखादी राक्षरीण रागावली तर एकाद्या लेकराची मानगुटी नदीत दाबून, त्याचा गुदमरून जीव जाईतो धरील! एखादी हिंस्त्र सुसर फार तर दोनतीन सुरेख कुमारिकांना नदीत उतरून लाजत लाजत स्नान करीत असता त्यांचे काकडीसारखे कोवळे लुसलुशीत पाय दातात धरून हिसडून गटकन्‌गिळून टाकील; पण ही गंगामाय, ही जमनाजी, ही देवनदी जार्डन, हा फादर थेम्स, हजारो कुमारींची-मुलालेकरंची-मान एका मानेसारखी, आपल्या पाण्यात यांचा अवश जीव गुदमरून ठार होईतो दाबील, नगरेची नगरे त्यांचा पाया हिसडून गिळून टाकील.
अंजिलकुराणादिक धर्मग्रंथात भाबडी भक्ति लिहून गेली की, बोकड, कोंबडी, ससा, शेळी, हरिण हेही नानाविध प्राणी मनुष्यांना पुष्कळ मांस मिळावे म्हणून, हे दयाळू देवा, तू निर्मिलेस! पण त्यांच्या रुचकर मांसाने, स्मरणाने तोंडास पाणी सुटलेल्या त्या भक्तीस ह्याचे अगदीच कसे विस्मरण पडते की ह्याच जगात त्याच देवाने मनुष्याचेही मांस खाण्यासाठी सिंह, वाघ, चित्ते, लांडगे हेही निर्मिलेले आहेत. हे दयाळू देवा, तू माणसांची कोवळीकोवळी मुले अशाचसाठी निर्मिलीस की, आम्हास काकडीसारखी मुखशुद्धि सदोदित मिळावी अशी मनुष्यास फाडून चिरफाडून खाल्ल्यानंतर त्यांच्या हाडांवर ढेकरा देत बसलेल्या सिंहाच्या नि लांडग्यांच्या रक्ताळलेल्या तोंडातली कृतज्ञ स्तुतिही त्याच देवास पावत आहे! आशिया आणि आफ्रिका यांस जोडणारे खंडच्या खंड ज्या दिवशी महासागरात, त्या खंडावरील वर माला घेऊन उभ्या असलेल्या लक्षावधि कुमारिकांसह, दूधपाजत्या आयालेकरांसह, अर्धभुक्त प्रणयी जनांसह, पुजांजलि वाहत्या भक्तांसह, त्याच देवाची स्तुती चाललेल्या लाखो देवालयांसह ते खंडच्या खंड त्याच देवाने ज्या दिवशी त्या महासागरात गणपति हबकन्‌ बुडवावा तसे बुडविल, त्याच्या दुसर्‍या दिवशी हीच उषा, हीच वेदांनी गाइलेली उषा, असेच गोड गुलाबी हास्य हसत त्या शुकशुकाट दृश्याकडे पहात होती! कुराणात म्हटले आहे की, "चंद्र निर्मिला, अशासाठी की, मनुष्याला निमाज पढावयाच्या वेळा कळाव्या!' पण जो जो निमाज पुढे त्या त्या इस्लामियांची, त्या मुल्लामौलवी मशिदीसुद्धा कत्तल करून, त्या खलिफाच्या घरण्याची राखरांगोळी उडवून त्या लाखो मुस्लिमांच्या कापलेल्या डोक्यांच्या ढिगावर ज्या दिवशी तो निमाजाचा कट्टर शत्रू चेंगिझखान चढून जाऊन शांतपणे बसला, त्या रात्री त्या बगदाद नगरी हाच चंद्र त्या चेंगिझखानालाही त्याच्या वेळा पले पले मोजून असाच बिनचूक दाखवीत शांतपणे आपळी कौमुदी विचरीत होता!
सुगंधी फुले, हे सुस्वर पक्षी, तो मनोहर पिसारा पसरून नाचणारे हे सुंदर मोरांचे थवे, रानचे रान अकस्मात्‌ पेटून भडकलेल्या वणव्यात, चुलीत वांगे भाजावे तसे फडफड करतात न करतात तोच भाजून राख करून टाकतो-तो कोण? गाय दिली तो दयाळू, तर त्याच गाईचे दूध पिऊन तिच्याच गोठ्यात बीळ करून राहणारा तो विषारी साप, त्या गाईचे दूध देवाच्या नैवेद्यासाठी काढावयास येणार्‍या व्रतस्थ साध्वीला कडकडून डसून तिचा जीव घेणारा तो साप, तो ज्याने दिला तो कोण? प्रत्येक भोगामागे रोग, केसागणीक ठणठणणारे केसतोड, नखानखांचे रोग, दातादातांचे रोग, ते कण्ह, त्या कळा, ती आग, त्या साथी, ती महामारी, ते प्लेग, ती अतिवृष्टि, ती अनावृष्टि, ते उल्कापात! जिच्या मांडीवर विश्वासाने मान ठेवली ती भुईच अकस्मात्‌उलटून मनुष्यांनी गजबजलेले प्रांतचे प्रांत पाताळात जिवंत पुरून गडप करून टाकणारे ते भूमिकंप!! आणि कापसाच्या राशीवर जळती मशाल कोसळावी तसे ह्या पृथ्वीच्या अंगावर कोसळून एखाद्या गवताच्या गंजीसारखी भडभड पेटवून देणारे ते दुष्ट धूमकेतु- ते कोणी केले ?
जर ह्या विश्वातील यच्चयावत्‌ वस्तुजातीच्या मुळाशी त्यांना धारण करणारी, चालन करणारी, किंवा जिच्या क्रमविकासाचे ते परिणाम होत आले आहेत अशी जी शक्ति आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर त्या देवाने हे सारे विश्व मनुष्यास त्याचा मध्यबिंदु कल्पून केवळ मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना अगदी भाबडी, खुळी आणि खोटी आहे असे मानल्यावाचून वरील विसंगतीचा उलगडा होऊच शकत नाही.
कोणत्या हेतूने वा हेतूवाचून हे जगड्‌व्याळ विश्व प्रेरित झाले ते मनुष्याला तर्किता देखील येणे शक्य नाही. जाणता येणे शक्य आहे ते इतकेच की, काही झाले तरी मनुष्य हा ह्या विश्वाच्या देवाच्या खिसगणतीतही नाही, जशी कीड, मुंगी, माशी, तसाच ह्या अनादि अनंत कालाच्या असंख्य उलाढालीतील हा मनुष्यही एक अत्यंत तात्पुरता आणि अत्यंत तुच्छ परिणाम होय. त्याला खायला मिळावे म्हणून धान्य उगवत नाही, फळे पिकत नाहीत. कोथिंबीर खमंग झालेली नाही. धान्यपिकते म्हणून तो ते खाऊ शकतो, इतकेच काय ते. त्याला पाणी मिळावे म्हणून नद्या वाहत नाहीत. नद्या वाहतात म्हणून पाणी मिळते इतकेच काय ते. पृथ्वीवर जेव्हा नुसत्या प्रचंड सुसरीच सुसरी नांदत होत्या नि मनुष्याचा मागमूसही नव्हता तेव्हाही नद्या वाहत होत्या, झाडे फुलत होती, वेली फुलत होत्या, मनुष्यावाचून तर काय, पृथ्वी नव्हती तेव्हांही हा सूर्य असाच आकाशात भटकत फिरण्यास भीत नव्हता, आणि या सूर्यही जरी त्याच्या सार्‍या ग्रहोपग्रहांसुद्धा हरवला तरी, एक काजवा मेला तर पृथ्वीला जितके चुकलेसे वाटते तितके देखील या सुविशाल विश्वाला चुकलेसे वाटणार नाही. ह्या विश्वाच्या देवाला ओक पलाचेही सुतक, असे शंभर सूर्य एखाद्या साथीत एका दिवीसात जरी मरू लागले तरी धरावे लागणार नाही!
तरीदेखील ज्या कोणच्या हेतूने वा हेतूवाचून ही विश्वाची प्रचंड जगड्‌व्याळ उलाढाल चालू आहे तीत एक अत्यंत तात्पुरता नि अत्यंत तुच्छ परिणाम म्हणून का होईना, पण मनुष्याला, त्याच्या लांबीरुंदीच्या गजाने मापता यावे असे, त्याच्या संख्येत मोजता यावे असे, इतके सुख नि इतक्या सोयी अपभोगिता येतात हा मात्र आणि एढाच काय तो ह्या विश्वाच्या देवाचा मनुष्यावर झालेला उपकार होय! मनुष्याला ह्या जगात जे सुख मिळू शकते तेवढेही मिळू न देण्यासारखीच जर ह्या विश्वाची रचना ह्या विश्वाच्या देवाने केली असती, तर त्याचा हात कोण धरणार होता! हे सुगंध, हे सुस्वर, हे सुखस्पर्श, हे सौंदर्य, हे सुख, ह्या रुचि, ह्या सोयी आहेत, त्याही अमूप आहेत! ज्या योगायोगाने मनुष्यास ह्या सर्व लाभत आहेत त्या योगायोगाला शतश: धन्यवाद असोत! ज्या विश्वशक्तींनी कळत न कळत असा योगायोग जुळवून आणला त्यांना त्या अंशापुरते मनुष्याचा देव म्हणून संबोधिल्याचे समाधान आपल्यास उपभोगिता येईल, उपकृत भक्तीचे फूल वाहून त्यास पूजिताही येईल!
परंतु त्या पलीकडे ह्या विश्वाच्या देवाशी, वाटच्या भिकारड्याने सम्राटाशी जोडू पहावा तसा कोणचाही बादरायण संबंध जोडण्याची लचाळ हाव मनुष्याने आमूलात्‌ सोडून द्यावी हेच इष्ट! कारण तेच सत्य आहे! आपले चांगले ते देव करील, देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन, ही आशा, ही आशा, हा अवलंब, अगदी खुळचट आहे! कारण तो अगदी असत्य आहे. ज्या ज्या संकटातून आपणास सोडविले म्हणून आपण देवाचा सत्यनारायण करतो त्या त्या संकटात प्रथम आपणास ढकलतो कोण? तोच सत्यनारायण, तोच देव! जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्यास मलम लावतो त्याची मलम लावण्यासाठी पूजा करावयाची तर प्रथम गळा का कापलास म्हणून त्याची आधी यथेच्छ शोभाही करावयास नको काय? विश्वाच्या देवाच्या ठायी ह्या दोन्हीही भावना अनाठायी नि असमंजस आहेत.
ती विश्वाची आद्यशक्ति ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मुनष्याच्या हातात आहे. मुनष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट. अशी निती-अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत; कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत पेक्षा विश्व आपले नाही; फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे-असे जे आहेत ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा!!
कॉंग्रेस पोसतेय विघटनवाद
•अमर पुराणिक•
सन २००९ साल संपून, मनमोहन सिंग सरकारने पुन्हा सत्ता प्राप्त करीत एका बाजूला आपली ताकद वाढवली आहे, तर दुसर्‍या बाजूला जातीय उन्माद वाढवणारी तीन बक्षिसे या देशाला दिली आहेत. कॉंग्रेसने जाहीर केले आहे की, या देशात ‘मुसलमानांचा पहिला हक्क’ आहे. याही पुढे जाऊन कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी म्हणतात की, मुसलमान व्यक्ती या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. आता मुसलमान व्यक्तीला पंतप्रधानपद द्यायची वेळ आल्यानंतर हेच युवराज राहुल गांधी थयथयाट करून नको नको ती कूटनीती वापरून मुसलमानांना पंतप्रधानपद देण्यात खोडा घालतील, हा भाग वेगळा! पण प्रलोभन ही काय चीज आहे, याची कल्पना राहुलचे पणजोबा जवाहरलाल नेहरू, आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी व आता आई सोनिया गांधी या सर्वांना माहीत आहे. आता  कॉंग्रेसच्या ‘या देशात मुसलमानांचा पहिला हक्क’ ही घोषणा कोणत्याही उद्देशानेे केलेली असेल. या घोषणेवर मुसलमान समुदायाकडून जर अनुकूल प्रतिक्रिया आल्या असत्या, तर आपल्या देशातील आतंकवाद हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय केंद्र सरकारचे संचलन करणारे हे कॉंग्रेस संपुआ सरकार विघटनवादाला नव्याने खतपाणी घालत आहे. मुळातच कॉंग्रेस पक्ष हा विघटनवाद किंवा ‘डिव्हाईड ऍन्ड रूल’ या ब्रिटिशांच्या कूटनीतीचा पाईक आहे. राजेंंद्र सच्चर समितीच्या अहवालासारखाच रंगनाथ मिश्र आयोगाचा अहवाल संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सत्राच्या शेवटच्या क्षणी सादर करून त्यावर होणार्‍या घनघोर चर्चेपासून सत्ताधारी कॉंग्रेस बचावली आहे, पण या अहवालाप्रमाणे मुसलमानांतील काही जातींना अनुसूचित जातीत सामील करण्याच्या प्रयत्नामुळे समाजातील खर्‍याखुर्‍या कमकुवत व दारिद्र्य रेषेखालच्या गरीब व मागास वर्गाला मात्र भडकावले जात आहे. आता आश्‍चर्य व चिंतेचा विषय हा आहे की, तथाकथित अल्पसंख्यकांचे उदात्तीकरण करणार्‍या रंंगनाथ मिश्र आयोगाने आपल्या अहवालात वेगळ्या कल्पना सुचविल्या आहेत. राजेंद्र सच्चर समितीच्या अहवालाप्रमाणेच अल्पसंख्यकांतही भेदभाव दर्शवला आहे. मुळात या देशात जे खरेखुरे अल्पसंख्याक आहेत, त्यांच्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सरकारने जरी आपली अधिकृत भूमिका या अहवालांवर जाहीर केली नसली तरी, या कॉंग्रेस सरकारातील मंत्री व नेतेमंडळी मात्र आपल्या स्वत:च्या व आपल्या पक्षाच्या फायद्यावर नजर ठेवून ज्या पद्धतीने वागत आहेत, त्यावरून असे वाटते की, इतर पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेसमध्येच मोठा गदारोळ होणार. याचे ताजे व लख्ख उदाहरण म्हणजे तेलंगणा प्रकरण आहे. तेलंगणा मुद्द्यावरून कॉंग्रेसमध्येच तेलंगणावादी आणि तेलंगणा विरोधी असे तट पडले आहेत आणि कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या या स्वैर वर्तणुकीवर अंकुश ठेवण्यात कॉंग्रेस श्रेष्ठींची असहायता दिसून येते. (की जाणीवपूर्वक तशी असहायता दर्शवते?) त्यामुळे कॉंग्रेसची भूमिका विघटनवादी विषवल्लीला खतपाणी घालणारीच आहे, हे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा विघटनवादी भूमिकेत कॉंग्रेस स्वत:च असून, इतर विघटनवादी संघटनांच्या भूमिकेला पाठबळ देऊन तेलंगणा प्रकरण भडकावण्याच्या दृष्टीने आगीत तेल ओतत आहे. न्यायमूर्ती सगीर अहमद आयोगाचा जम्मू- काश्मीरला स्वायत्तता देण्याची मागणी करणारा अहवाल हीच प्रेरणा दर्शवणारा आहे.
काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आपले आजोबा शेख अब्दुल्ला यांच्या काळातील म्हणजे सन १९५३ च्या पूर्वीची स्थिती काश्मिरात निर्माण करण्याच्या मानसिकतेत आहेत. आता या न्यायमूर्ती सगीर अहमद आयोगाच्या अहवालामुळे त्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे. हा अहवाल आयोगातील सदस्यांच्या संमतीविना आणि त्यांचा कोणताही परामर्श न घेताच मुख्यमंत्र्यांच्या हवाली करण्यात आला आणि आता तर हा अहवाल पंतप्रधानांच्या हातात सोपवण्यात आला आहे. या आयोगात नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांनी या अहवालावर आपला आक्षेप नोंदवला आहे. जम्मू आणि लडाख येथे यावर प्रक्षोभ माजला असून, तेथे आता हे प्रकरण हळूहळू पेट घेत आहे. त्यात जम्मू-काश्मीरची स्वायत्तता एवढेच नव्हे तर स्वतंत्र जम्मू-काश्मीरच्या मागणीचा धुराळा उडवला जात आहे. काय, सरकार जम्मू-काश्मीर राज्याचे तीन तुकडे करायला तयार होईल? जम्मू-काश्मीरच्या स्वायत्ततेची मागणी ही स्वतंत्र जम्मू-काश्मीरच्या निर्मितीचा पाया निर्माण करण्याच्या आधारावर होत आहे, कारण तेथे मुसलमानांचीच संख्या मोठी आहे आणि त्यांचेच बहुमत आहे. काश्मीरला स्वायत्तता देण्याचा जो प्रस्ताव आहे, त्यानुसार संरक्षण आणि परराष्ट्रनीती सोडून काश्मीरवर भारतीय राज्यघटना आणि प्रभुसत्तेचा प्रभाव शून्य होणार आहे. काश्मिरात रफी अहमद किडवाई यांच्यामुळे शेख अब्दुल्ला यांना कारागृहामध्ये घातल्यानंतर जम्मू-काश्मीरला भारतीय प्रजासत्ताकाचे प्रावधान लागू झाले. तथापि कलम ३७० चा विशेष दर्जा प्राप्त झाल्याने अनेक कायदे जम्मू-काश्मीरच्या विधिमंडळाच्या मान्यतेशिवाय लागू करता येऊ शकत नव्हते. सगीर अहमद यांनी संसदेद्वारा जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव दिला, पण कलम ३७० रद्द करण्याचा अधिकार मात्र जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ताब्यात सुरक्षित ठेवला. आता इतक्या वर्षात झेलम आणि चिनाब नदीतून किती पाणी वाहून गेले, पण धर्माच्या आधारवर पाकिस्तान हा देश निर्माण झाला आणि जो काही वादग्रस्त काश्मीरचा भाग आहे, तो त्याच धार्मिक मुद्द्यांवर अजूनही होरपळतोय.
आता एवढे होऊनही जेव्हापासून कॉंग्रेसचे संपुआ सरकार सत्तेत आले आहे, तेव्हापासून पुन्हा धार्मिक आधारावर विशेष सुविधा देण्याच्या नावाखाली गलिच्छ खेळ खेळला जात आहे. कॉंग्रेस नेतृत्व हे आकलन करण्यात संपूर्ण विफल ठरले आहे की, ज्याप्रकारे स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावर निवडणुकीच्या काळात आश्‍वासने देऊन कॉंग्रेसने सत्ता काबीज केली. आता त्या आश्‍वासनांपासून परावृत्त होऊ पहात आहे. या आश्‍वासनांचा पाठपुरावा करण्याचा लकडा तेथील मतदार, तेलंगणावादी लोक त्यांच्या नेतेमंडळींकडे लावत आहेत आणि आता त्याचा अतिरेक होऊन शेवटी दंगली व बंद घडू लागले आहेत. आता ‘मी नाही त्यातली’ असे कॉंग्रेस म्हणतेय. त्यांच्या याच आश्‍वासनखोरीमुळे आंध्र प्रदेश गेल्या काही दिवसांपासून पेटलेला आहे. नेमके हेच किंवा याहीपेक्षा घातक परिणाम धार्मिक आधारावर विशेष आरक्षण सुविधा देण्याच्या आश्‍वासनावरून कशावरून होणार नाही?
आपल्या देशातील काही राज्ये जसे नागालँड आणि मिझोराम ख्रिस्तिबहुल आहेत. आहेत म्हणण्यापेक्षा गेल्या काही वर्षांत ख्रिस्तीबहुल झाली आहेत. तेथील हिंदूंना व हिंदू अदिवासींना धमार्र्ंतरीत करून ही राज्ये ख्रिस्तीबहुल झाल्याने आता त्यांनीही स्वतंत्रता (?) आंदोलन सुरू केले आहे. काश्मीरला दिलेल्या विशेष दर्जाचा परिणाम या राज्यांवर किंवा हिंदू-बौद्धमतप्रधान अरुणाचल प्रदेशात काय परिणाम होईल, याचा अंदाज भलेही सरकारला नसेल, पण या देशातील सर्वच  भारतीयांना आहे. ख्रिस्तीकरणाची ही मोहीम आसाम, ओरिसात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि हा वणवा संपूर्ण पूर्व भारत व ईशान्य भारतात पसरला आहे. वर्षापूर्वी झालेल्या ‘कंधमाल’ प्रकरणात याचा अनुभव सार्‍या जगाने घेतला आहे. राजस्थानात भाजपाच्या वसुंधरा राजे यांचे सरकार पाडण्यासाठी पेटवलेले गुर्जर जमातीच्या आरक्षणाचे अंदोलनही याच विघटनवादाचा नमुना आहे. या बळावर भाजपाला आणि वसुंधरा राजेंना सत्ताच्यूत करणे कॉंग्रेसला शक्य झाले, पण आता त्यांंना आरक्षणाची टक्केवारी निश्‍चित करण्याच्या निमित्ताने कॉंग्रेसनेच लावलेली आग धुमसत असून, ही आग मोठे बळी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिहार, उत्तर प्रदेश राज्यांत अनेक जाती आपला समावेश अनुसूचित जातीत करावा म्हणून मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. महाराष्ट्रातही मराठा आरक्षणाची मागणी तीव्र होत आहे. कॉंग्रेसचे सरकार ज्या राज्यात सत्तेवर आहे, तेथे राज्य व केंद्र सरकारांच्या विरोधात विरोधी पक्षांकडूनही म्हणावा तसा विरोध होताना दिसत नाही. ज्या राज्यात कॉंग्रेसेतर पक्षांची सत्ता आहे, तेथे त्यांना सत्ताच्यूत करण्यासाठी कॉंग्रेस अनेक खेळ खेळत आहे, पण या सर्व प्रकाराला मोठे विचारमंथन होणे आवश्यक आहे, जनांदोलन होणे आवश्यक आहे. कॉंग्रेस मात्र निर्ढावली असून, निर्लज्जपणे आणि सातत्याने विघटनवादाची भूमिका राबवीत आहे आणि केंद्र सरकारमधील कॉंग्रेसचे मंत्री व बिगर कॉंग्रेसचे मंत्रीही कॉंग्रेस सरकारच्या या विघटनवादी भूमिकेचा पुरेपूूर फायदा घेत आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आरक्षण किंवा विशेष जातीय किंवा धार्मिक आधारावर स्वातंत्र्य मागण्यात काहीही औचित्य नाही. इंग्रजांनी कॉंग्रेसला जाता जाता शिकवून गेलेले ‘डिव्हाईड अँड रूल’ हे तत्व मात्र कॉंग्रेस कसोशीने पाळतेय. कारण काय, तर सत्ता. आजपर्यंत आरक्षण किंवा धार्मिक स्वातंत्र्याचा परिणाम काय झाला, याचे विश्‍लेषण होणे आवश्यक आहेच. ज्या तज्ज्ञ विश्‍लेषकांनी याचे विश्‍लेषण केलेले आहे ते हेच की, या आरक्षण व धार्मिक स्वातंत्र्याचा फायदा या देशातील गरिबंाना कधीच मिळाला नाही, तर सत्तारूढ होण्यासाठी कॉंगे्रसने याचा सतत दुधारी हत्यारासारखा वापर केला आहे.  ‘आम आदमी’, कॉंग्रेस का हाथ, आम आदमी के साथ’ आदी लोकप्रिय घोषणा देत कॉंग्रसने सतत गरिबांच्या पेकाटात मात्र सणसणीत लाथाच घातल्या आहेत. कॉंग्रेसचा हा हात, आम आदमीच्या नरडीपर्यंत कधी पोहोचला, हे या आम आदमीला कधी कळलेच नाही. इंदिरा गांधींनीही अशीच ‘गरिबी हटाव’ ही लोकप्रिय घोषणा देत ‘गरिबी’ ऐवजी ‘गरिबां’नाच कोसो दूर हटविले व स्वत:च्या बगलबच्चांची सात पिढ्यांची गरिबी हटवली. घोषणांना घोषणांपर्यंतच मर्यादित ठेवण्यात कॉंग्रेस तरबेज आहे. या देशातील गरिबांच्याच नव्हे तर सुशिक्षित व तथाकथित विद्वानांच्या डोळ्यांत धूळफेक कशी करायची, याचा गेल्या ५० वर्षांचा ‘गाढा’ अनुभव कॉंग्रेसच्या ‘गाठी’शी आणि ‘पाठी’शी आहे. गरिबांची गरिबी वाढवणारी ही आरक्षणाची धोरणे एक दिवस या देशाचाच बळी घेतल्याशिवाय राहणार नाही! सतत धार्मिक व जातीय तणाव यांची मात्र आधोरेखित करणारी ‘भेट’ कॉंग्रेसने या देशाला दिली आहे. खोट्या प्रगतीचा ‘दर’ दाखवण्याचे परिणाम आता आपण पाहतोच आहोत. आपण पाहतोय महागाईचा राक्षस या आम आदमीला कसा विळखा घालतोय ते! पण आता पुढे पुढे तर हा फास जास्तच आवळला जाणार आहे, त्यात देशातील मध्यमवगीर्र्य आणि गरीब मात्र भरडला जाणार आहे. याबाबत कोणतेही सुधारणावादी कार्य करण्याचे सोडून कॉंग्रेस आपली मतपेटी भक्कम करण्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि राजस्थानपासून आसामपर्यंत विघटनवादी विषवल्लीला खतपाणी घालण्यातच गुंग आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय नेतृत्व (हीन) आणि मनमोहनसिंग यांचे (कर्तत्वहीन) कामकाज असलेले कॉंग्रेस सरकार देशाला निरंतर विघटनाच्या खाईत ढकलत आहे. येत्या काही वर्षांत याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहेत, नव्हे भोगावे लागणार आहेत!