मुकी बिचारी कुणी हाका

सडेतोड : अरुण रामतीर्थकर
मला आश्‍चर्य वाटते ते कॉंग्रेस पक्षाचे. मतांसाठी लाचारी ही तर त्यांच्या रक्तात भिनली आहे. कोंडवाड्यात जनावरे घातल्यावर कॉंगे्रस पुढार्‍यांचे तेथे काय काम! तेथे ते कोणाची बाजू घेत होते? पोलीस अधिकार्‍यांना फार दोष देता येत नाही कारण त्यांनी कायद्यानुसार कारवाई केली की कॉंग्रेसवाला तेथे कडमडलाच म्हणून समजा. मग दडपण आणायचे. केलेली कारवाई मागे घेण्याची नामुष्की नको म्हणून कारवाईच करायची नाही अशी वृत्ती यामुळे तयार होते.

वाक्यप्रयोग मनुष्यप्राण्यांबाबत वापरला जातो. मात्र त्यात चतुष्पाद प्राणी अध्याहृत आहेत. पाकिस्तानातील हिंदू किंवा काश्मीर खोर्‍यातील हिंदू अशा माणसांच्या समूहाच्या दुःस्थितीबाबत हे शब्द वापरले जातात. मुक्या प्राण्यांचे हाल होतातच असे त्यात गृहित धरले आहे. आता तसे चालणार नाही. प्राण्यांचे हाल करण्यास कायद्याने शिक्षा आहे. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या पोलिसांना मुळात कायद्याचे ज्ञान हवे. ते असले तरी सेक्युलर दृष्टिकोनातून कायदा राबवण्याची धमक त्यांच्यात हवी. रात्री १० वाजून एक मिनिट होताच त्यांना जो लाऊड स्पीकर आक्षेपार्ह वाटतो तसाच ५-५९ पूर्वी वाजणारा लाऊडस्पीकर वाटला पाहिजे. तसे होत नाही. ध्वनिवर्धकाबाबतच्या कायद्याबाबत पोलीस खाते हे एक तर पूर्णपणे अज्ञानी आहे किंवा विशिष्ट समुदयास ते भितात. खरे काय त्यांनाच माहिती.
हा मुद्दा नव्याने चर्चा करण्याचे कारण कायदा असूनही पोलीस त्याप्रमाणे वागत नाहीत याचे आणखी एक उदाहरण. १९७६ च्या आणीबाणीत झाले ते सर्व वाईट झाले. फक्त एक गोष्ट चांगली झाली. ती म्हणजे गो अणि गोवंश हत्याबंदीचा कायदा महाराष्ट्र विधीमंडळाने एकमताने संमत केला. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. नंतरच्या पुलोदची सूत्रे शरद पवार आणि एस्सेम जोशी या नास्तिक मंडळींकडे होती. त्यांनी किंवा त्यानंतर कोणीच हा कायदा रद्द केला नाही. नेहमीप्रमाणे कायदा राबवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहेत ते पोलीस काहीच करत नाहीत. कायद्याचा आग्रह धरणार्‍यानांच कायदा दाखवतात. महाराष्ट्रात अलीकडे हिंदू समाजात जागृती आल्यानंतर गाय, बैल कापण्यासाठी घेऊन जाणारे ट्रक गोभक्त अडवतात. कायदा हातात न घेता पोलिसांना कळवतात. ट्रकमधील ४०-५० जनावरे म्हणजे काही लाखाचा माल असतो. कापून विक्रीनंतर त्याचे चौपट पैसे होतात. अनेक ठिकाणीस पोलिसांच्या हाती नोटांचे बंडल कोंबल्यावर पोलीस त्यांचा धर्म (कायदा पालन) विसरतात. ट्रकवाला फिर्याद देतो. या लोकांनी खिशातील १० हजार रु. चेन घड्याळ, मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. गोप्रेमी ५ पेक्षा अधिक असतील. दरोड्याचेच कलम लागते. ट्रक जातो निघून. गोभक्तांनाच लूटमार, दरोडा अशा गंभीर कलमाखाली अटक होते. गोमातेच्या सुटकेसाठी धडपडाल तर तुम्ही अडकाल, असा इशारा नोटांच्या बंडलांसाठी हपापलेले पोलीस गावोगावी देतात. सोलापुरात ६ ऑक्टोबर पहाटेपासून जो प्रकार झाला तो एवढा क्लेषकारक नसला तरी फारसा संतोषजनकही नाही. गेल्या शनिवारी पहाटे विजापूर रोडवर ४९ बैल घेऊन येणारा ट्रक प्राणीमित्र आणि गोभक्त यांनी पकडला. पोलीस बोलावले. हे शेतीचे बैल आहेत. खाटकांचा काही संबंध नाही असे ट्रकमधील लोक म्हणत होते. शेतीच्या बैलांची जपून वाहतूक होते. एका ट्रकमध्ये ४९ बैल कसे कोंबले असतील याचा विचार करा. परिस्थितीचे आकलन करून पोलिसांनी हे बैल कोंडवाड्यात धाडले. तेथे पशुवैद्यकाने तपासणी केल्यावर १६ बैल कापण्यास योग्य ठरले. शेतकामासाठीचे बैल असा पहिला दावा १६ बैल खाटकाकडे गेल्यावर आपोआप खोटा पडतो.
मला आश्‍चर्य वाटते ते कॉंग्रेस पक्षाचे. मतांसाठी लाचारी ही तर त्यांच्या रक्तात भिनली आहे. कोंडवाड्यात जनावरे घातल्यावर कॉंगे्रस पुढार्‍यांचे तेथे काय काम! तेथे ते कोणाची बाजू घेत होते? पोलीस अधिकार्‍यांना फार दोष देता येत नाही कारण त्यांनी कायद्यानुसार कारवाई केली की कॉंग्रेसवाला तेथे कडमडलाच म्हणून समजा. मग दडपण आणायचे. केलेली कारवाई मागे घेण्याची नामुष्की नको म्हणून कारवाईच करायची नाही अशी वृत्ती यामुळे तयार होते. कोंडवाड्यात ४ बैल आचके देत जमिनीवर पडून होते. चारापाणी घेण्याचीही ताकद नव्हती. काहींची शिंगे मोडली होती तर काहींचे अंग ट्रकला घासून घासून जखमा झाल्या होत्या. इथे खरे तर प्रिव्हेन्शन ऑफ ऍनिमल क्रुऍलिटी कायद्याखाली कारवाई करायला हवी. कदाचित कॉंग्रेस पुढारी तेथे वावरत असल्याने ही कारवाई झाली नाही.
हे ४९ बैल किंवा उवर्र्रित ३३ बैल सांभाळण्यासाठी आम्हाला द्या अशी गोशाळा चालवणार्‍यांची विनंती होती. या ३३ बैलांची हत्या करता येणार नाही हे एकदा कायद्याने ठरल्यावर बैल गोशाळेच्या सुपुर्द करण्यास अडचण नव्हती. रविवारनंतर दोनदा तसा प्रयत्न झाला, पण दहाच्या तुलनेत शंभर विरोधक जमतात. बैल बाहेर काढून देत नाहीत. कसेही करून हे बैल खाटिकखान्यात घेऊन जायचा त्यांचा निर्धार आहे. त्यांच्यामागे कॉंग्रेस पुढार्‍यांची ताकद आहे.
या कोंडवाड्याची जागा लहान आहे. कर्मचारी कमी. कमालीची अस्वच्छता. अशा जागी चांगले, धष्टपुष्ट बैल फार दिवस ठेवणे अयोग्य आहे. हा लेख लिहिताना ५ दिवस पूर्ण झाले आहेत. आता विजापूर नाका पोलिसांच्या लेखी आदेशाशिवाय बैल गोशाळेसाठी बाहेर काढता येणार नाही. या बैलाच्या नशिबात कत्तलखाना आहे की गोशाळा हे अजून ठरत नाही. गोवंशाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सर्व कार्यकर्त्यांना माझा भगवा सलाम.
आता थोडा वेगळा मुद्दा. शहरातील मांसाहारी लोकांसाठी. त्यातही हिंदू मांसाहरींसाठी. माझ्या समजुतीप्रमाणे हिंदू माणूस १० नंबरचे म्हणजे मोठ्या जनावरांचे मास चुकूनही खात नाहीत. शहरातील बेकायदा कत्तलखान्यांचा विषय मध्यंतरी चर्चेला आला होता तेव्हा कुरेशी जमातीचे एक नेते मला भेटले. एवढे मास आम्हाला लागतच नाही. तुमचेच हॉटेलवाले आमच्याकडून १० नंबरचे मास घेऊन जातात. आमचा धंदा बंद केला तर तुमच्याच लोकांची पंचाईत होईल असे ते म्हणाले. मी पूर्ण शाकाहारी आहे. त्यामुळे माहिती घ्यावी लागली. १० नंबरच्या मांसापेक्षा बोकडाचे मास तिप्पट महाग असते असे मला कळले. १० किलो मांस लागणार्‍या खानावळीत १० नंबरचे मटण वापरल्यास २ ते २॥ हजार रु. वाचतात. ग्राहकांना बोकडाचे मटण म्हणून हे मटण दिले जाते. अनेक जण दारू पिऊन मटणावर ताव मारतात. आपण कोणत्या प्राण्याचे मटन खातो हे त्यांना कसे कळणार. मटणाचे बारीक तुकडे केल्यावर ते बोकडाचे की बैलाचे, गाईचे हे कळणार तरी कोणाला? ५०-५० बैल कापायला आणतात त्याचे ग्राहक आपणच असावे ही किती शरमेची बाब आहे. काही मटण खानावळवाले याचा प्रतिवाद करतील. चोर कोण साव कोण हे कळणार नाही. शाकाहरी हॉटेलात पाटी असते, ‘येथे वनस्पती तेल वापरले जात नाही. रिफाईंड तेलात पदार्थ तयार होतात.’ त्याचपद्धतीने ‘‘येथे १० नंबरचे मटन वापरले जात नाही. फक्त बोकडाचेच मटण आम्ही पुरवतो’’, अशी पाटी मटण खानावळीत लावण्याची तसदी चालक घेतील का? बेइमानीने चार पैसे जादा मिळवताना तुम्ही धर्मद्रोह करत आहात हे लक्षात घ्या.
शेवटचा मुद्दा. माझ्या अल्पमतीप्रमाणे मटणात झटका आणि हलाल असे दोन प्रकार असतात. मुसलमान झटका मटण चुकूनही खाणार नाहीत तर हिंदूंनी हलाल मटण खायचे नसते. मटण खाणार्‍या कित्येकांना ही गोष्ट माहिती नाही. आता हिंदू खाटिक हे लोक व्यवसायातून बाहेर पडून नोकरी धंद्याला लागलेत. हिंदू खाटिकच नसल्याने झटका मटण दुर्लभच झाले. पूर्वी चिवरीच्या यात्रेत मुस्लिम खाटिकच हलाल पद्धतीने बकरे कापायचे. रात्री ट्रकभरून कातडी न्यायचे. खटिक समाजाने विचार करावा. बोकडाचे झटका मटणच ज्याला पाहिजे त्याला ते मिळेल अशी तरी व्यवस्था करावी. धर्मशिक्षण नाही म्हणून ही धर्मभ्रष्टता आली आहे. साधे मटण. त्यात तुम्ही धर्माचरण करा. अर्थकारण कसे लगेच बदलेल तेही पाहा.
रविवार, दि. १४ ऑक्टोबर २०१२

0 comments:

Post a Comment