अण्णा, आपण किती योग्य केलेत

 सडेतोड : अरुण रामतीर्थकर
आता लक्षात असे आले की अण्णा हजारे यांच्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्यांना आपणच मोठे आहोत असे भ्रम झाला. पत्रकांराना झोडपा म्हणणे, काश्मीर पाकिस्तानला देऊन टाका म्हणणे, रामदेवबाबांनी काय करावे काय नको याचा उपदेश करणे या सर्वांचा जनलोकपालशी काय संबंध?

ऑगस्टला अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगवर एक मजकूर टाकला. त्यामुळे देशातील वृत्तपत्रांना पहिल्या पानासाठी एक ठळक वृत्त मिळाले, पण काही जणांच्या फुग्यातील हवा फसकन गेली. जनलोकपाल विधेयक येण्याची आशा आता मावळली असून आंदोलन, उपोषण हे मार्ग कुचकामी ठरणार असल्याने मी समिती विसर्जित करत आहे असे अण्णा म्हणतात. अण्णा चमू किंवा टीम अण्णा या नावाने जी मंडळी एकदम प्रसिद्धीला आली होती त्यांना हा जबर धक्का असणार. कारण कोणाशीही सल्लामसलत न करता अण्णांनी हा निर्णय घेतला होता. ‘याल तर तुमच्यासह नाही तर तुमच्याविना’ असेही अण्णाना म्हणता येत नव्हते, कारण अण्णा नाहीत म्हणजे भले मोठे शून्य.
अण्णांनी हा निर्णय अगदी योग्य वेळी घेतला. कोठे थांबायचे हे कळायलाच हवे. कॉंग्रेस पक्षाने स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. स्वातंत्र्य मिळाल्यावर गांधीजींनी आता कॉंग्रेस पक्ष विसर्जित करा असे म्हटले होते, पण सत्तेसाठी हपापलेल्या मंडळींनी तो सल्ला ऐकला नाही. त्या काळी ब्लॉग, फेसबुक वगैरे काही नव्हते. मनातील विचार कोणाशी तरी बोलून उघड  करावे लागत. त्यांच्या लाडक्या जवाहरला त्यांनी कॉंग्रेस पक्ष विसर्जित करा असे सांगितलेच असेल, पण हे होणे नव्हते. १९४७ सालची कॉंग्रेस आणि आजची कॉंग्रेस यातील फरक पाहिल्यावर गांधीजींचा सल्ला किती योग्य होता हे दिसते. पूर्वी कृष्णमेनन, टी.टी. कृष्णम्माचारी, जगजीवनराम असे मोजके मंत्री भ्रष्टाचारी निघाले. आता पंतप्रधानांंसह १५ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आरोप खरे का खोटे हे आपल्याला माहिती नाही. चौकशी करून आरोप निराधार आहेत हे सिद्ध करणे सरकारचे काम, पण सरकार चौकशीच करत नसेल तर आरोप खरे आहेत असे मानण्यावाचून गत्यंतर रहात नाही. ज्येष्ठ कॉंग्रेसी नेते नारायणदत्त तिवारी यांचे रंगढंग तर खरे आहेत. यासाठीच कॉंग्रेस जिवंत ठेवली. एक नाव सोडले तर त्या कॉंग्रेसमध्ये आणि आजच्या कॉंग्रेसमध्ये कसलेच साम्य नाही. कार्यकर्त्यांचे म्हणाल तर साम्य सोडाच, दोघात पूर्ण विरोधाभास आहे.
१९४२ च्या आंदोलनात एक गृहिणी स्वयंस्फूर्त सामील झाली. पोलिसांनी पकडल्यावर पोलीस गाडीत बसण्यापूर्वी तिने अंगावरील सोन्याचे दागिने काढले. एका माणसाला खूण करून जवळ बोलावले. दागिने त्याच्या हाती सोपवून माझ्या नवर्‍याला  नेऊन दे म्हणू सांगितले. इन्स्पेकटरने विचारले बाई हा माणूस तुमच्या ओळखीचा होता का? बाईने नकार दिला. अधिकार्‍याने  म्हटले, मग त्यांच्यावर विश्‍वास कसा ठेवला? बाई म्हणाल्या, त्याच्या डोक्यावर गांधी टोपी होती. तो विश्‍वासघात करणार नाही. आजच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांबद्दल त्याच्या घरची मंडळी तरी एवढा विश्‍वास दाखवतील का? कॉंग्रेसचे एवढे पतन झाले आहे.
 असलेले उद्दिष्ट साध्य होत नाही आणि दुसरे कोणते उद्दिष्ट नाही अशा परिस्थितीत अण्णा टीम भरकटतच गेली असती. नव्हे ती भरकटलेली आहेच. स्वामी अग्निवेश नावाचा एक फालतू माणूस. त्याला वेळीच हाकलला हे बरे झाले.  मात्र प्रशांत भूषण आणि शांतीभूषण हे काय दिवे लावत आहेत. १९७१ साली इंदिरा गांधी यांच्या रायबरेलीतून झालेल्या निवडीस त्यांचे प्रतिस्पर्धी राजनारायण यांनी आव्हान देऊन खटला जिंकला. इंदिरा गांधींची लोकसभेवरील निवड रद्द झाली. या खटल्यात राजनारायण यांचे वकील शांतीभूषण होते. या खटल्याने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. त्यालाही आता ४० वर्षे झाली. या शांतीभूषणनी टीम अण्णाच्या व्यासपीठावरून पत्रकारांना धरून चोपा असे कार्यकर्त्यांना सांगितले. काही पत्रकारांना धक्काबुक्की झाली. मग अण्णांनी त्याबद्दल माफी मागितल्याने प्रकरण मिटले. अशा वक्तव्याची गरज काय होती. त्यांचा मुलगा प्रशांत भूषण. त्याने काश्मीर पाकिस्तानला देऊन टाका असे म्हटले आणि मार खाल्ला. बैलगाडी खालून जाणार्‍या कुत्र्याला आपणामुळेच बैलगाडी चालली आहे असा गैरसमज होतो. शांतीभूषण आणि प्रशांत भूषण या बाप-लेकाना आपल्यामुळेच हे आंदोलन उभे राहिल्याचा भ्रम झाला आणि दोघांनी ताळतंत्र सोडले.
 अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे अण्णांचे आणखी दोन शिलेदार. रामदेवबाबा हे आपल्यामुळेच प्रसिद्ध झाले हा त्यांचा गैरसमज. रामदेवबाबांचा कार्यक्रम वेगळा आणि आपले आंदोलन स्वबळावर चालवण्याची धमक त्यांच्यात आहे. ते नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर जाताच या दोघााच्या अंगाचा तीळपापड झाला. या सभेत कॉंग्रेस खासदार विजय दर्डा होते. त्यांनी मोदींची प्रशंसाही केली. कॉंग्रेस पक्षाला त्याचे काही वाटलेले दिसत नाही. केजरीवाल आणि सिसोदियांना मात्र फारच खटकले. नरेंद्र मोदी भ्रष्ट आहेत हा त्यांचा समज. ते कम्युनल तर २००२ पासून आहेतच. या दोघांनी रामदेवबाबांना हरकत घेताच. रामदेवबाबांनी जंतरमंतरवर येणे सोडून दिले. प्रारंभी ते एकदा आले होते, पण नंतर त्यांनी टाळले. अण्णा हजारे आणि रामदेवबाबा एकत्र आले तेव्हा देशातील असंख्य लोकांना आता नक्की काही तरी घडेल असे वाटले होते. या दुकलीने या दोघात अंतर आणले. अण्णांचे काम हलके करण्याऐवजी हे काम नासवणे झाले. केजरीवाल हे तर हवेतच होते. पंतप्रधानांसह १५ मंत्र्यांवर आरोप करताना अण्णांना दाखवून अनुमती घ्यायला हवी होती, पण केजरीवाल यांना ती गरज वाटली नाही.
 आता लक्षात असे आले की अण्णा हजारे यांच्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्यांना आपणच मोठे आहोत असे भ्रम झाला. पत्रकांराना झोडपा म्हणणे, काश्मीर पाकिस्तानला देऊन टाका म्हणणे, रामदेवबाबांनी काय करावे काय नको याचा उपदेश करणे या सर्वांचा जनलोकपालशी काय संबंध? या समितीच्या सदस्या मेधा पाटकर यांच्याबद्दल बोलायलाच नको. मराठवाडी धरणग्रस्तांच्या प्रश्‍नावर मेधा पाटकर, भारत पाटणकर या दोन समाजवादी डोक्यांची नुकतीच जुंपली. मेधा पाटकर यांनी आपली नौंटंकी बंद करावी, असे पाटणकर म्हणाले. मेधा पाटकर यांचे कोणाशी पटले म्हणून समाजवाद्यांशी पटावे.
 या सर्वांपेक्षा संतोष हेगडे बरे. गेल्या वर्षीच त्यांना उपरती झाली आणि ते या आंदोलनातून बाहेर पडले. कारण त्यांना प्रसिद्धीची हाव नव्हती.
शेवटचा मुद्दा अण्णा हजारे यांच्या राजकीय पक्षाचा. हा निर्णय योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल. आज निवडणुका कशा जिंकल्या जातात ते सर्वांना माहिती आहे. त्या मार्गाने अण्णांचा पक्ष जाणार नाही हे नक्की. मनी पॉवर आणि मसल पॉवर याचा उपयोग न करता अण्णांनी निवडणूक जिंकली तर स्वातंत्र्योत्तर काळातील तो एक चमत्कार घडेल, पण उलट घडले तर! खुद्द अण्णांना निवडणूक लढवल्यास अनामत वाचण्याची शक्यता वाटत नाही. मग इतरांचे काय? राजकीय पक्षनिर्मितीच्या जुगाराचे फासे अण्णांना अनुकूल पडोत वा प्रतिकूल. टीम अण्णाचे विसर्जन झाले हे लई बेस झालं.
रविवार, दि. १२ ऑगस्ट २०१२

0 comments:

Post a Comment