ओसामाची हत्या आणि अबू हमजाची अटक

पंचनामा : भाऊ तोरसेकर
सामा बिन लादेन याला गेल्या वर्षी एका छुप्या कारवाईत अमेरिकन सेनेच्या खास तुकडीने पाकिस्तानात घुसून ठार मारले. त्या घटनेने जगात सर्वांनाच चकीत करून सोडले होते. कारण इथे शेजारी पाकिस्तानात तिथल्या लष्करी प्रशिक्षण केंद्राच्या आवारातच, एका बंदिस्त बंगल्यात ओसामाला तिथल्या फ़ौजी यंत्रणेने लपवून ठेवला होता. त्या कडेकोट सुरक्षित बालेकिल्ल्यात धडक मारून ही धाडसी कारवाई उरकण्यात आली होती. इतकेच नव्हेतर ती उरकून अमेरिकेच्या अध्यक्षाने त्याची अधिकृत घोषणा करण्यापर्यंत, पाकिस्तानात त्याची कोणाला खबर सुद्धा लागली नव्हती. सहाजिकच पाकिस्तानी सत्ताच नव्हे तर पाक सेना व त्यांच्या उचापतखोर हेरखाते असलेल्या आयएसआयचे नाक कापले गेले होते. कारण ओसामाला अत्यंत सुरक्षित जागी लपवले याची पाकला खात्री होती. आणि तिथे अमेरिकनच काय कोणी चिटपाखरूही ओसामापर्यंत जाऊ शकणार नाही; याबद्दल पाक हेरखाते निश्चिंत होते. पण अमेरिकेन हेर व सेनेने तिथपर्यंत नुसते जाऊन ओसामाला ठारच मारले नाही. त्याच्याकडचे महत्वाचे साहित्य, कागदपत्रे व पुरावे यांच्यासह त्याचा मृतदेहही उचलून नेला होता. पण ही बाब देखिल एकवेळ सोपी म्हणता येईल. कारण या सर्व गोष्टी एकाच फ़ेरीत वा धाडीत पार पाडलेल्या होत्या. त्यापेक्षा धक्कादायक गौप्यस्फ़ोट अमेरिकेने केला, तो पाकिस्तानला शरमिंदा करणारा होता.

   ज्याला अबोटाबादच्या कारवाईत अमेरिकन सैनिकांनी ठार मारले वा उचलून नेले, तो भलताच कोणीतरी होता, ओसामा नव्हताच; असेही नंतर पाकिस्तान वा अल कायदाचे लोक दावा करू शकले असते. पण तेही करायची सोय अमेरिकेने ठेवली नव्हती. ओसामा जिथे लपला अशी माहिती अमेरिकन हेरांना मिळाली होती, तिथेच खरा ओसामा रहातो, याची खातरजमा त्यांनी खुप आधी केली होती. म्हणजेच पाक सेना व हेरखात्याला अमेरिकेने त्याच दिवशी गाफ़ील ठेवून ही कारवाई घाईगर्दीत उरकली नव्हती. त्या कारवाईची कित्येक दिवस व आठवडे आधीपासून तयारी चालू होती. त्यात अनेक पाकिस्तानी लोकांना सहभागी करून घेतले होते. मात्र त्याचा सुगावा पाक सेना व हेरखात्याला लागू शकला नव्हता. पाकिस्तानची वेदना तीच होती. जेव्हा ओसामाच्या त्या कडेकोट बंदिस्त निवासात अमेरिकन सेनेची तुकडी मध्यरात्रीच्या सुमारास पोहोचली व घुसली; तेव्हा पाकिस्तानी सत्ता व यंत्रणा मस्त साखरझोपेत होती. मात्र तिकडे अमेरिकन अध्यक्षिय निवासात अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा व त्यांचे सर्व वरिष्ठ निकटवर्ति थेट प्रक्षेपणातून कारवाई पहात होते. मृत ओसामाला घेऊन अमेरिकन सेनेचे विमान पाक हवाई हद्दीबाहेर पोहोचल्यावरच, ओबामा यांनी ओसामाला ठार मारल्याची जाहिर घोषणा केली. मगच पाकिस्तानला साखरझोपेतून खडबडून जाग आली. देशात वा जगासमोर पाकिस्तानी सरकार व सेनेला तोंड दाखवायला जागा उरली नाही. नेहमीची स्थिती असती तर पाकने तो ओसामा नव्हताच, असा दावा केला असता. पण तेवढीही सोय अमेरिकेने ठेवली नव्हती. ज्याच्यावर ही कारवाई होणार तो नक्कीच ओसामा बिन लादेन आहे, याची शास्त्रीय वैज्ञानिक खातरजमा आधीपासूनच करण्यात आली होती. ज्याला आजकालच्या भाषेत डीएनए म्हणतात, त्याची परिपुर्तता अमेरिकेने केली, जे प्रत्यक्षात लष्करी कारवाई इतकेच जोखमीचे काम होते.

   ओसामाला अबोटाबादच्या त्या बंदिस्त बंगला व आवारात पाक हेरखात्याने लपवून ठेवले आहे, याची खबर लागल्यापासून अमेरिकन हेरांनी त्याच्या भोवती व्युहरचना आरंभली होती. मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी पाकला विश्वासात घेतले नव्हते. उलट पाकला संपुर्ण अंधारात ठेवून हालचाली सुरू केल्या होत्या. खबर खरी असली, तरी संशयित ओसामा हा खराच ओसामा आहे याची खातरजमा करण्यासाठी त्याच्या डीएनए तपासणीची गरज होती. त्याकामी अमेरिकनांनी त्याच भागात पोलिओ डोस देण्याची सरकारी मोहीम राबवणार्‍या एका डॉक्टरची मदत घेतली. या चाचणीत ओसामाशी रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तीचा शारिरीक नमूना आवश्यक असतो. तो मिळवून देण्यात डॉ. आफ़्रिदी याची अमेरिकन हेरांन बहूमोलाची मदत झाली. ती मदत त्याने विचारपुर्वक दिली, की अनवधानाने दिली ते सांगता येणार नाही. पण ओसामाच्या तिथल्या अस्तित्वावर त्याच डीएनए चाचणीने शिक्कामोर्तब केले. मग पुढली कारवाई झाली. ती चाचणी किंवा पुरावा का आवश्यक होता? नंतर ज्याला मारला तो ओसामा नव्हताच व अमेरिकेने अकारण एका निरपराध पाक कुटुंबाचे हत्याकांड केले; असा कांगावा पाकिस्तान करण्याची शक्यता होती. ती संधी पाकिस्तानला नाकारण्यासाठीच अमेरिकेला ही काळजी घ्यावी लागली होती. पण ती घेतल्याने मेला तो ओसामा होता, हे नाकारणे कोणालाच शक्य झाले नाही. अगदी अल कायदाच्या गोटातूनही ओसामा मारला गेल्याच्या बातमीला लगेच दुजोरा द्यावा लागला. डीएनए चाचणी म्हणुनच प्रत्यक्ष लष्करी कारवाई इतकीच मोलाची कामगिरी होती. म्हणजे प्रयोगशाळेतील चाचणी नव्हे, तर त्या चाचणीला आवश्यक असलेला ओसमाच्या कुटुंबातील कोणाचा तरी शारिरीक नमूना. तो शिताफ़ीने मिळवणे मोठे काम होते. तिथेच अर्धे यश संपादन झाले होते.

   ही एक वर्ष जुनी कहाणी मी आज कशाला सांगतो आहे असे काही वाचकांना वाटू शकते. त्याचे कारण असे की कालपरवा ज्या अबू हमजा उर्फ़ जबीउद्दिन जुंदाल याला सौदी अरेबियातून भारतात आणले गेले, तोच खरोखर मुंबई हल्ल्यातला अबु हमजा असल्याचा डीएनए पुरावाच निर्णायक ठरला. तसे झाले नसते तर अबु जुंदाल भारताच्या हाती आजही लागला नसता. त्याच्या अटकेनंतर जो गदारोळ उठला आहे, त्यानंतर आपला मुलगा निरपराध आहे असा दावा त्याच्या मातापित्यांनी केला आहे. तेवढेच नाही तर ज्याला सौदीमधून पकडून आणले, त्याची डीएनए तपासणी केल्याचा दावाही खोटा असल्याचे या अबुच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. म्हणजे ओसामाच्या मृत्यूनंतर जो दावा पाकिस्तान करू शकेल, हे जाणुन अमेरिकन हेरखात्याने जी काळजी घेतली होती, तशीच भारतीय गुप्तचरांनी घेतली आहे. मात्र त्याची सुतराम कल्पना अबुच्या कुटुंबियाना नाही. म्हणुनच आपली डीएनए चाचणी झाली नसल्याचा दावा किंवा कांगावा त्यांनी केला आहे. कारण त्यांच्या नकळत ती चाचणी, कधी उरकण्यात आली त्याचा त्यांनाच थांगपत्ता लागलेला नाही. त्यांनी ही चाचणी झाल्याचे नाकारावे हे स्वाभाविक आहे. कारण महाराष्ट्र वा कुठल्याही पोलिसांनी त्यांच्याकडे डीएनए चाचणीसाठी नमूने मागितले नव्हते किंवा घेतले नव्हते. त्यामुळेच अबूचा मातापित्यांनी अबूची डीएनए चाचणी झाल्याचा दावा फ़ेटाळून लावला आहे. त्यामुळेच अबूवर मुंबई हल्ल्यातला आरोपी असा आरोप करणार्‍या पोलिस वा भारतीय यंत्रणांवर, अबूचे मातापिता खोटेपणाचा प्रत्यारोप जरुर करू शकतील. पण त्याची पोलिसांना फ़िकीर नाही. कारण आपला दावा खरा करण्यासाठी या अबु कुटुंबियांनाच पुढे यावे लागेल. त्यासाठी न्यायालयात प्रकरण गेल्यास, त्यांना स्वत:च चाचणीसाठी आवश्यक शारिरीक नमूने द्यावे लागतील. आणि तशी चाचणी झाल्यास त्यांचे डीएनए नमूने अबूच्या नमून्याशी शंभर टक्के जुळतील; याची पोलिस वा गुप्तचर खात्याला खात्री आहे. कारण ते काम आधीच गुपचूप उरकण्यात आले आहे. किंबहूना त्याच चाचणीमुळे अबूला सौदीने भारताच्या हवाली केले आहे.

   अबू हमजा उर्फ़ जबीऊद्दीन जुंदाल हा भारताला हवा असलेला फ़रारी भारतीय घातपाती आहे, याची सौदी अरेबियाला खात्री पटवून देण्यात भारताच्या वतीने सर्वात मोठी कामगिरी अबूच्या कुटुंबियांनीच पार पाडली आहे. त्यांच्या अनवधानाने केलेल्या मदतीशिवाय अबूचा ताबा भारताला मिळुच शकला नसता. म्हणुनच अबूच्या अटकेतील सर्वात मोठे रहस्यमय नाट्क त्याच्या डीएनए चाचणीचे आहे. तेच यातले सर्वात मोलाचे वळण आहे. ज्याला आज अबू हमजा म्हणुन भारतात आणले आहे, तो रियासत अली नावाचा पाक नागरिक आहे असा पाकिस्तानचा दावा होता. शिवाय त्याच्याकडे पाकिस्तानचा पासपोर्टही होता. मग त्याची खरी ओळख पटवायची कशी? त्याला भारतातील महाराष्ट्र नावाच्या राज्यातील बीड जिल्ह्यातला भारतीय नागरिक सिद्ध करायचा कसा? त्याचे उत्तर होते त्याची डीएनए चाचणी. त्यासाठी सौदीमध्ये त्याचे नमूने मिळू शकत होते. पण त्याच्या कुटुंबियांचे नमूने कसे मिळवायचे? त्यांच्यावर न्यायालयात जाऊन किंवा अन्य मार्गाने सक्ती करणेही कायदेशीर मार्गाने शक्य नव्हते. मग अबूच्या कुटुंबिय वा रक्ताच्या नातेवाईकाचा शारिरीक नमूना मिळवायच कसा? भारतीय गुप्तचरांना त्यासाठी मोठेच नाट्य रंगवावे लागले. पण त्यात ते यशस्वी झाले आणि अबूच्या पित्याच्या रक्तमासाचा नमूना उपलब्ध होऊ शकला. त्याच्या चाचणीत सौदीमधला पाक पासपोर्टधारक रियासत अली, हा भारतातल्या आईबापांचा मुलगा असल्याचे विज्ञानानेच सिद्ध केले. पाकिस्तानला खोटे पाडणार्‍या त्या चाचणीने व त्याच नमून्याने सौदीमधल्या अबूला भारतात आणायचा मार्ग मोकळा केला. पण अबूच्या आईबापांना गाफ़ील ठेवून त्यांच्या रक्त वा शरिराचे नमूने कसे मि्ळवण्यात आले. ती खरी अदभूत रहस्यकथा आहे. कारण इतके रामा्यण घडून गेल्यावरही अबूचे तेच मातापिता, तशी चाचणी झाल्याचा साफ़ इन्कार करत आहेत. कारण आपण नमूने दिलेच नाहीत याची त्यांना पक्की  खात्री आहे.

   अबू हमजा पाकिस्तानात नाही असा पाकचा दावा होता. त्यांनी अबूला पाकिस्तानी पारपोर्ट देऊन सौदी अरेबियामध्ये पाठवला होता. पासपोर्टमुळे तो पाकिस्तानी असल्याचा दावा करणे सोपे होते. शिवाय त्याला लपवल्याचा भारताचा आक्षेपही खोटा पाडता येत होता. पण भारतीय गुप्तचरांनी अबूला शोधून काढला. तो सौदीमध्ये असल्याचा माग काढल्यावर त्याला भारतात पाठवण्याची मागणी भारत सरकारने सौदीकडे केली. पण अबूची तिथे चौकशी होते कळताच, तो पाकिस्तानी नागरिक असल्याने त्याला भारताच्या हवाली करू नये; असा कांगावा पाकने चालविला होता. तेव्हा त्याचा पासपोर्ट खोटा ठरवून त्याचे भारतीयत्व सिद्ध करण्याचे आव्हान मोठे होते. भारताने ते स्विकारले. त्यासाठी त्याची डीएनए चाचणी आवश्यक होती. पण ती घ्यायची तर त्याच्या भारतातील नातेवाईकाचे शारिरीक नमूने आवश्यक होते. पण हे कारण देऊन इथे अबूच्या बीडमधील कुटुंबियांवर कायदेशीर सक्ती करणे शक्य नव्हते. मग एक मोठा डाव खे्ळला गेला. अबूच्या कुटुंबाशी परिचित असलेल्या एका व्यक्तीला इतल्या गुप्तचरांनी विश्वासात घेऊन ते नमूने मि्ळवण्यासाठी एक नाटक रचले. त्या परिचिताने मुद्दाम अबूचा पिता झकीऊद्दीन याच्याशी सतत भांडण उकरून काढण्याचा उद्योग सुरू केला. नेहमीच्या भांडणाचे पर्यवसान एके दिवशी हाणामारीत व्हावे, हाच त्यामागचा उद्देश होता. झालेही तसेच. त्या माणसाच्य डिवचण्याने भडकलेल्या अबूच्या पित्याची एक दिवशी त्या इसमाशी हाणामारी झाली, दोघेही जखमी झाले. पण त्यात अबूचा पिता झकीऊद्दीनचे रक्त त्या इसमाच्या कपडे व अंगावर लागले. तेवढा नमूना चाचणीसाठी खुप होता. त्याची इथे चाचणी झा्लीच. पण त्याच नमून्याचा काही भाग सौदीकडे पाठवून देण्यात आला. त्यांच्या ताब्यात रियासत अली होताच. त्याची व भारतातून गेलेल्या नमून्याची डीएनए चाचणी जुळली आणि पाकचा दावा खोटा पडला. कारण डीएनए चाचणीसाठी जुळणारे नमूने पाकिस्तान देऊ शकला नव्हता. त्यानंतर अबू जुंदाल याला भारताच्या हवाली करण्यात सौदीला कुठलीच अडचण राहिली नाही. 

   अबू हमजा याला सुखासुखी सौदी अरेबियाने भारताच्या हवाली केलेला नाही. त्याला मुळात कुठे लपला आहे ते शोधून काढण्यासाठी कित्येक दिवसांचे प्रयास खर्ची पडले आहेत. त्यानंतर तोच मुंबई हल्ल्यातला आरोपी असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली आहे. पुढे त्याचे भारतीयत्व सिद्ध करण्याची डीएनए कसरत यशस्वी झाली; म्हणूनच आज तो भारतीय कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. अशा वेळी त्याची आई किंवा वडील काय म्हणतात, याचा गाजावाजा करणे किती योग्य असेल? हाती माईक व कॅमेरा असला, मग काहीही दाखवता येते. पण अबूसारखे गुन्हेगार अकडण्यासाठी कायद्याच्या तारेवर केवढी कसरत करावी लागते, याचा पत्ता स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणार्‍यांना नसतो. मग ते एका मिनीटात कित्येक महिन्यानंतर अबूला झालेल्या अटकेबद्दल शंका व्यक्त करत असतात. कारण साधा डीएनए चाचणीसाठी लागणारा पुरावा, किती त्रासदायक मार्गाने मिळवावा लागतो, याचा थांगपत्ता हाती कॅमेरा असलेल्यांना नसतो. गुप्तचर म्हणून काम करणारे आणि स्टींग ओपरेशन करणारे; यात जमीन अस्मानाचा फ़रक असतो. जे गुप्तचर म्हणुन काम करतात, त्यांना कायद्याचे संरक्षण नसते. ते भले सरकारसाठी काम करत असतात. पण कायदेशीर पुराव्या्साठी अनेक बेकायदेशीर मार्गांचा अवलंब त्यांना करावा लागत असतो. त्याला कायदा किंवा तेच काम सोपवणारे सरकारही संरक्षण देऊ शकत नसते. दुर्दैव इतकेच, की ज्यांना गुप्तच्रर विभागाचे काम किंवा त्यातले कुठलेही बारकावे व गुंतागुंत ठाऊकच नाही, असे दिडशहाणे त्याबद्दल मुक्ताफ़ळे उधळत असतात. म्हणुन तर अबू प्रकरणातील खरेखुरे नाट्य ओसामा इतकेच अदभूत रहस्यमय असूनही, त्याकडे कुठल्याही वाहिनी वा वृत्तपत्राचे अजून लक्ष गेलेले नाही. त्याचा शोधही घ्यावा असे कोणाला वाटलेले नाही. मुळात हस्तांतरणाचा करार नसताना सौदीने अबूला भारता्च्या हवाली करण्यासाठी जी पळवाट शोधली, त्याचीही कुठे माध्यमात चर्चाही होऊ शकली नाही. कारण हे झाले काय व कसे, यातली गंमतच माध्यमांना कळलेली नाही. 

   दिल्लीत पकडलेल्या अबूला तिथले कोर्ट मुंबई पोलिसांच्या हवाली करायला तयार नाही. मग इतक्या सहजपणे सौदीने त्याला भारताच्या हवाली कसा केला? तर सौदीने व्यवहारात त्याला भारताच्या हवाली केला हे खरे आहे. पण कागदोपत्री तसे कोणी सिद्ध करू शकणार नाही. कारण सौदीने तसे कागदोपत्री काहीच केलेले नाही. सौदीने भारताचा दावा मान्य केला असला, तरी अबूला त्यांनी त्यांच्या भूमीत भारतीय पोलिसांच्या हवाली केले नाही. तिथल्या विमानतळावर भारताकडे जाणा‍र्‍या विमानात सौदीच्या अधिकार्‍यांनी त्याला आणुन बसवले. त्यात आधीपासूनच भारतीय पोलिस अधीकारी बसलेले होते. विमान तिथून ऊडाले ते दिल्ली विमानतळावर उतरले. इथे सोबतच्या अधिकार्‍यांसह अबू हमजा बाहेर आला, तेव्हा इमिग्रेशन कक्ष पार करताना त्याला पोलिसांनी अटक केली. म्हणजे कागदोपत्री काय नोंद झाली? पाकिस्तानी पासपोर्टवर इथे आलेल्या एका संशयास्पद व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी विमानतळावर अटक केली. मग त्याची तपासणी चालू केली असता तो मु्ळचा भारतीय असून मुंबई हल्ल्यतला फ़रारी गुन्हेगार असल्याचे आढळून आले. याला कायदेशीर पळवाट म्हणतात. जे कायद्याने करणे अशक्य आहे, अशा अनेक गोष्टी असतात. मग कायद्याचे राज्य राबवणार्‍या सरकारलाही कायद्याच्या बाहेर जाऊन, काही गोष्टी साध्य करून घ्याव्या लागतात. जे कायद्याच्या कक्षेत करणे अशक्य असते, प्ण कायद्याच्या चौकटीत बसवणेही अगत्याचे असते. अबू हमजा उर्फ़ जबीऊद्दीन जुंदाल याची अटक वा त्याचा पाठलाग व शोध, अशा कायद्यासाठी बेकायदा कारवायांचे उत्तम उदाहरण आहे.

   कायद्याची सगळ्यात मोठी अडचण अशी असते, की त्यानुसार काम करायचे तर कायदा मोडणार्‍यालाही संरक्षण द्यावे लागते. आणि कायदा झुगारणारा असतो, त्याला त्याच कायद्याची फ़िकीर नसते. कुठेही घातपात झाला, किंवा बॉम्बस्फ़ोट झाला, मग आपल्या वाहिन्या किंवा पत्रकार गुप्तचरांचे अपयश असा शब्द हमखास वापरत असतात. कारण त्यांना मुळातच गुप्तचर खाते म्हणजे काय व त्याचे काम कसे चालते, त्याचाच थांगपत्ता नसतो. पोलिस, शिक्षण वा आरोग्य वा संरक्षण खाते जसे अधिकृतपणे सरकारचे घटक असतात, तसेच गुप्तचर खाते प्रशासनाचा एक घटक आहे, अशी गैरसमजूत त्याला कारणिभूत आहे. पण वस्तुस्थिती अत्यत विपरित आहे. कुठल्याही देशाचे गुप्तच्रर खाते हे प्रत्यक्षात त्या सरकारचे बेकायदा खाते असते. जे काम कायदेशीर मार्गाने होऊ शकत नाही, ते बेकायदेशीर मार्गाने साध्य करण्याचे कर्तव्य त्याच्याकडून पार पाडले जात असते. म्हणुनच त्याला सरकार कुठलेही संरक्षण देत नसते. दिसायला आयबी किंवा रॉ, आयएसआय किंवा सीआयए अशी नावे घेतली जातात. पण त्यांची कागदपत्रे तपासली, तर त्यात फ़क्त हाती आलेल्या माहितीचे विश्लेषण वा विच्छेदन करून मांडलेले निष्कर्ष सापडतील. पण ती माहिती मिळवायला, शोधायला केलेल्या कारवाया व गुंतलेली माणसे; यांचा तपशील त्यात नसतो. त्यावर झालेल्या खर्चाचे तपशील नसतात. कारण त्यासाठी कायद्यात बसणारे मार्ग वापरलेले नसतात. कारण हेरकथेतील कारवाया मनोरंजनासाठी असतात. प्रत्यक्षातल्या व्यवहारी हेरगिरीत बेकायदा काम चालू असते. त्याचे खुलासे पत्रकार परिषदा घेऊन देता येत नसतात. म्हणुनच अबू हमजा असो की ओसामावरील कारवाई असो, त्यातले अनेक महत्वाचे तपशील कधीच तुमच्याआमच्या समोर येऊ शकणार नाहीत. आपण तसा हट्टही करण्यात अर्थ नाही.
( १/७/१२ )

0 comments:

Post a Comment